आई मला भूक लागली!
घरातले बाळराजे मोठे व्हायला लागले की त्याच्या आईची फार धांदल उडायला लागते. बाळाच्या वेगवेगळ्या वयातल्या भूकेला त्याला काय सुयोग्य आहार द्यावा या विचाराने भांबावलेल्या एका अनाहितेने, पिलीयन रायडरने, हा धागा अनाहितावर सुरू केला होता. यात बर्याच जणींनी भर टाकली आणि अंकाच्या निमित्ताने हा धागा सर्वांसाठी खूला करत आहोत.
(माहिती संकलन-सुरन्गी)
बाळाच्या आहाराची सुरुवात करायची मऊ भात आणि साय, किंवा मऊ भात घट्ट गोडं वरण, किंवा मऊ भात मेतकूट, साजूक तुपाने. याच्या सोबतीला मसाला दूध, पियुष, हॉट किंवा कोल्ड चॉकलेट, रागीव्हिटा, अधमुर्या दह्याचे ताजे ताक, साबुदाण्याची खीर आणि वेगवेगळी सूप्स-सार असे पेय पदार्थ द्यावेत. हळू हळू भात, पुरी, पोळी, भाकरी यांच्या जोडीला डोसे, उत्तपे वेगवेगळ्या डाळींसोबत किंवा आमट्यांसोबत/भाज्यांसोबत द्यावेत. मिश्र पिठाचा उपयोग नेहमी करावा.
१. मेतकूट भात - मऊ गुरगुट्या भात त्यात तूप आणि मीठ. आईच्या हातचा कालवलेला भात बाळ नक्की खाईल!
२. रागीव्हिटा:- २:१:अर्धे:अर्धे, या प्रमाणात अनुक्रमे नाचणी:गहू:मुगडाळ:चणाडाळ घेऊन धुवून वाळवावे, नंतर बारीक दळून घ्यावे. हवाबंद डब्यात ठेवावे. एका लहान पातेल्यात एक कप पाण्यात दोन चमचे पीठ घालून मिसळावे, गुठळी राहू द्यायची नाही हा नियम विसरू नये. नंतर मंद आचेवर ठेऊन ढवळत ५/६ मिनिटे शिजवावे. पिठ्ल्यासारखे झाले की उतरवावे. एक कपभर गरम दुधात दोन चहाचे चमचे साखर, किंचित वेलचीपूड घालून द्यावे किंवा ताज्या ताकात घालून मीठ, हिंग, जिरेपूड घालून द्यावे.
हे पेय उत्साहवर्धक असून नियमित घेतल्याने बाळाचा चिडचिडेपणा, अशक्तपणा आणि भोकाड पसरण्याची प्रवृत्ती कमी होते.
बाळ नीट जेवत नसल्यास आईलाही भोकाड पसरावेसे वाटते.तर तिनेही नियमित हे घ्यायला हरकत नाही.यातला विनोदाचा भाग सोडला तर आईही बाळासोबत काही खातेय,पितेय हे पाहून बाळही निमूटपणे खाते/पिते.आणि आईलाही शक्तीची आवश्यकता असतेच.
३. मसाला दुधः- मसाला दुधात घालायचा मसाला पातळ काप करून घातला तर कधी मुले खात नाहीत, थुंकून टाकतात. त्यासाठी सुरुवातीला बारीक पूड करून वापरावा.
बाकी दात येतानाच मुलांना बदाम, खारीक ,खोबरे आणि गजर, मूळा यांचे तुकडे अशा कडक गोष्टी चघळायला द्याव्यात. त्यामुळे चवीचा बदलता आस्वाद मुले घ्याल्या शिकतात. परंतु अशावेळी आपण सोबत राहून लक्ष द्यावे. घशात अडकू देऊ नये.
४. साबुदाण्याची खीर:- अर्धी वाटी साबुदाणा धुवून दोन वाट्या पाण्यात १५/२० मिनिटे भिजत ठेवायचा. नंतर त्याच पाण्यात शिजवून घ्या. शिजला की तो चकचकीत दिसू लागतो. तसं त्याचं रूप खुललं की, त्यात एक कप कोमट दूध, सहा चहाचे चमचे साखर घालून पाच मिनिटे शिजवावे २ काजू आणि दोन बदामाचे पातळ कप करून आणि दोन मिनिटे शिजवावे. ४/५ खजुराचे बिया काढून तुकडे करून घ्यावेत. खीर उतरवून त्यात घालावेत. थोडी वेलची भूरभुरावी.
५. नारळपोहे:- शहाळ्यातले जाडसर खोबरे किसून किंवा मिक्सरवर भरड फिरवून घ्यावे. एक वाटी खोबऱ्यात एक ते दीड वाटी पोहे घालुन, एक मोठा चमचा साखर आणि दोन वेलदोडे पूड करून घालून ढवळून १० ते १५ मिनिटांनी खायला द्यावेत.
६. मिश्र भाज्यांचे सूप:- एक गाजर, एक बटाटा, दोन टोमॅटो, प्रत्येकी अर्धी वाटी कोबी आणि फ्लॉवर अशा सर्व भाज्या किसून घ्या. टोमॅटो वेगळा कीसा. कांदा अतिशय बारीक चिरून तीन चहाचे चमचे लोण्यावर परतावा. पारदर्शक झाला की, भाज्या घालून ४/५ मिनिटांसाठी परता. चार कप उकळते पाणी घालून उकळावे. २ चहाचे चमचे कॉर्नफ्लॉअरची पेस्ट घालून ढवळावे. दोन मिनिटांनी टोमॅटो घालून अजून दोन मिनिटे उकळून चवीपुरते मीठ आणि साखर घालून उतरावे. हवे असल्यास ब्रेडचे तुकडे तळून घालावे.
हे सूप आजारानंतर येणारा अशक्तपणा घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मलेरिया, टायफॉईड, कावीळ या सारख्या आजारातून बाहेर पडल्यावर हे सूप पंधरा दिवस तरी द्यावे. याने शरीराची झीज भरून यायला मदत होते.
७. दुधीचे सूप:- २ ते ३ वाट्या दुधीचा कीस पण बारीक किसणीने किसून, तसेच १ इन्च आले किसून घ्या. १ कांदा बारीक चिरून दोन चहाचे चमचे लोण्यावर परतून घ्यावा. पारदर्शक झाला की कीस घालून परतावे. चार कप उकळते पाणी घालून ४/५ मिनिटे उकळावे. २ चहाचे चमचे कॉर्नफ्लॉअरची पेस्ट घालून ढवळावे. चवीनुसार मीठ, मिरपूड, साखर घालून उतरावे.
८. मसूरडाळीचे सूप:- १ कांदा आणि १ टोमॅटो बारीक चिरावे. १ वाटी मसूरडाळ धुवून १०/१५ मिनिटे भिजवून घ्यावी. टोमॅटो आणि अर्धा कांदा घालून मसूरडाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी. पुरणयंत्रातून काढून घ्यावी. २/३ चहाचे चमचे साजूक तुपावर एक दालचिनी तुकडा आणि ५/६ मिरी फोडणीत घालून उरलेला अर्धा कांदा परतावा. किती परतायचा ते तुम्हाला आतापर्यंत समजलेच असेल. त्यावर दोन चहाचे चमचे कणिक परतावी, अर्धा कप दूध घालून गुठळ्या होऊ न देता शिजवावे, त्यात पुरणयंत्रातून काढलेले डाळीचे मिश्रण घालून ढवळावे. सूप दाट वाटल्यास गरम पाणी घालायचं. चुकूनही थंड पाणी घालायचं नाही. मीठ, साखरही किती घालायची तेही तुम्हीच ठरवायचं.
९. पालकाची डाळ:- पाऊण वाटी मूगडाळ धुवून १५ मिनिटे भिजवावी. एक जुडी पालक निवडून धुऊन बारीक चिरा. एक कांदा, हवा असल्यास, एक टोमॅटो, बारीक चिरून, दोन हिरव्या मिरच्या उभ्या कापून, बिया काढून सर्व डाळीबरोबर एकत्र शिजवावे. मीठ, साखर चवीनुसार घालावे. लोखंडी कढल्यात २/३ चमचे साजूक तूप घालून त्यात ७/८ लसूण पाकळ्यांची फोडणी करून ती डाळीत सोडून वरून झाकण घालावे. पाच मिनिटांनी वाढावे.
यात तूरीची डाळ किंवा अख्खे मसूरही वापरता येतील.
१०.कोथिम्बिरीचे वरण:- तुरीची आणि मुगाची डाळ अर्धी अर्धी घेऊन हिंग, हळद, जिरे आणि दोन थेंब तेल घालून कुकरमध्ये शिजवून घोटून घ्यावी. तेलात मोहरी, कढीपत्ता, दोन/तीन मिरच्यांचे मोठे तुकडे, यांची फोडणी करून डाळ घालावी. ३/४ आमसुले, चवीपुरता गुळ, मीठ घालून उकळावे भरपूर कोथिंबीर घालून उतरावे. असेच पुदिन्याचे करायचे तेव्हा मिरचीचे प्रमाण कमी करावे. बदल म्हणून गोडा मसाला चमचाभर घालू शकता.
११. डाळ दोडका:- अर्धी वाटी मुगडाळ धुऊन १५ मिनिटे भिजवून शिजवायला ठेवा. एक किंवा दोन, आकारमानाप्रमाणे साधारण वाटी/दीड वाटी तुकडे होतील असे, कोवळे दोडके घेऊन, साल किसणीवर किसून तुकडे करा. एव्हाना डाळ अर्धी शिजली असेल त्यात दोडके घालून शिजवा. तेलात मोहरी, हिंग, हळद, जिरे घालून फोडणी करा, तयार शिजलेली डाळ घालून उकळा, तिखट, धणेपूड, गोडा मसाला घाला. मीठ साखर चवीपुरती घाला.
यात चवबदल म्हणून आमसूल घालता येतील, घातलीच तर गुळही घाला.
या डाळीच्याऐवजी तुरीची, मसुराची डाळ वापरता येईल. तसे भाज्याही वेगवेगळ्या घालू शकाल. पडवळ, दुधी, लाल भोपळा, घोसाळी, नवलकोल, सुरण (याला मात्र आमसूल आणि गूळ हवंच.)शिवाय पालेभाज्या त्याही चवळी, माठ, पालक, अशा वेगवेगळ्या. बाळाच्या जिभेवरच्या स्वादकळ्यांना वेगवेगळ्या चवी देऊन त्यांची वाढ करण्याची हीच वेळ असते. हे लक्षात घेतलंत तर तुमच्या बाळाच्या सगळ्यात मोठा हितैषी तुम्हीच असाल यात काही शंकाच नाही.
१२. गाजराची भाजी:- दोन गाजरे, धुवून, साल काढून, बारीक चौकोनी तुकडे करावेत. कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून हिंग, मोहरी आणि चमचाभर उडदाची डाळ घाला. डाळ गुलाबीसरच ठेवा, काळी करू नका. हळद, दोन लाल मिरच्या तुकडे करून, कढीपत्ताही घाला. आता गाजर टाकून एक मिनिट परतून घ्या. चवीनुसार मीठ, साखर घाला आणि एक शिट्टी होऊ द्या. कोथिंबीर, नारळ घालून सजवा.
यात मुगाची, मसूराची डाळ घालू शकता. पाव वाटी डाळ घेऊन, धुवून १५ मिनिटे भिजत घालून वापरा. गाजराबरोबर घाला.
१३.गवारीची भाजी:- गवार मोडून घ्या. दोन वाट्या गावर असेल तर एक कांदा बारीक चिरून घ्या. कुकरमध्ये तेलाची फोडणी करून तयार हिंग, जिरे घाला, एक हिरवी मिरची मोडून टाका. कांदा परतावा. त्यात गवार धुवून घाला. एक मिनिट परतवा. चवीनुसार मीठ, साखर घालून एकच शिट्टी घ्या, खोबरे, कोथिंबीरने सजवा. हळद बिलकुल घालू नका.
अशीच पडवळाची करा. पण त्यात हळद घाला.
१५. बटाटा रस्साभाजी:- दोन टोमॅटो आणि चार बटाटे घ्या बटाटे सोलून त्याचे आणि टोमॅटोचे एका आकाराचे तुकडे करा. तुपावर जिऱ्याची फोडणी करून त्यावर बटाटे घालून परता, त्यावर ३ कप गरम पाणी घाला. बटाटे अर्धे शिजले की टोमॅटो घालून त्यात तिखट, धणेपूड, गोडा मसाला घाला. चवीनुसार मीठ, साखर घालून बटाटे पूर्ण शिजले की कोथिंबीर घालून उतरवा.
१६.मटारची भाजी:- दोन वाट्या मटाराचे दाणे धुवून घ्या, तेलावर मोहरी, मेथीदाणे, कढीपत्ता, हिंग, हळद, अशी फोडणी करून, त्यात एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा. त्यावर मटार परतून, अर्धा चमचा संडे मसाला पसरवा. झाकणीवर पाणी ठेऊन मंद आचेवर शिजू द्या. शिजले की भाजी ढवळून चवीनुसार मीठ, साखर घालून खोबरे, कोथिंबीरीने सजवा.
हवा असेल तर यात बटाटा, टोमॅटो घालून करू शकता, पण मुलांना आवडतो म्हणून किंवा बटाटा आवडीने खातात म्हणून नेहमी बटाटा घालू नका. आपल्याला त्यांच्या जिभेवरच्या स्वदकाळयांना विकसित करायचे आहे.
मांसाहारी लोकांनी मुलांना मटण, चिकन सूप द्यावे.
या व्यतिरिक्त पापलेट, घोळ, रावस, सुरमई असे मासे तळून, गोडं वरण भाताबरोबर द्यावे. अतिशय आवडीने खातात.
या पुढच्या यादीतील तिखट-मिठाचे प्रमाण आपापल्या घरातल्या चवीनुसार ठेवायचे.
इस्टंटः-
१. रवा डोसा :- रवा दह्यात भिजवुन रात्रभर ठेवा (किंवा २ तास ठेवला तरी चालतो) त्यात आलं-लसुण पेस्ट टाकुन डोसे करा.
किंवा हे मिश्रण एका कुकर मध्ये पाणी टाका आणि कुकरचं भांडं तेल लावुन त्यात ठेवुन गॅस सुरु करा. भांड गरम झालं की रव्याचं मिश्रण त्यात ओता. आणि कुकरची शिट्टी काढुन टाकुन १० मिनिटं गॅस वर मध्यम आचेवर ठेवा. निवल्यावर उतरवून घ्या आणि वर फोडणी टाका.
२. गव्हाच्या पिठात गुळ आणि खोबरं, मीठ टाकायचं आणि पाणी ओतुन सरबरीत करुन घ्यायचं. १० मिनिटांनी तव्यावर धिरड्यासारखा पसरायचं. तूप टाकून भाजून घ्यायचं.
३. बाजारात आंबोळीचे (तांदुळ + उडीद + मेथ्या) असे तयार पीठ मिळते. नसल्यास नुसते तांदळाचे पीठ / मिश्र डाळींचे पीठ घ्या. पीठ + चिमुटभर हळद + तिखट + मीठ टाकुन पाणी ओतुन सरबरीत करुन घ्या. पातळ झाले तरी चालते. हवे असल्यास त्यात गाजर किसुन घाला. नॉनस्टिक तव्यावर थोडेसे तेल लावुन तवा तापला की हे मिश्रण ओता. पसरवायची गरज नाही. आपोआपच तव्याचा आकार ते घेईल. चांगले भाजल्या गेले की चटणी सोबत देऊ शकता.
४ ऑम्लेट नुसतं मीठाचं किंवा त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड टाकायची आणि तूप टाकून बनवायचं.
५ पीठात किंचीत रवा घातला तर जाळीदार होतात धिरडी.
शिवाय गोड करायचं असेल तर थोडी काकडी खिसून घातलेली छान लागते.
६. मोडावलेल्या हिरव्या मुगाचे पेसरट्टू :- मोडावलेले हि. मूग, किंचित आलं लसूण हि. मिरची मिक्सरवर बारीक करून, सरबरीत पिठाचे दोसे करा.
७. झटपट उत्तपा
साहित्य - दीड वाटी बारीक रवा, अर्धी वाटी तांदूळाचे पिठ, एक वाटी ताक्, अर्धा टी-स्पुन बेकींग पावडर, चवीनुसार मीठ, दोन मोठे कांदे, एक-दोन टोमॅटो, तीन्-चार हिरव्या मिरच्या(अथवा आवडीनुसार कितीही), अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती - रवा, तांदूळाचे पिठ, ताक्, बेकींग पावडर, चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करुन थोडे पाणी घालून सरसरीत भिजवा, आता हे दहा मिनिटे बाजूला ठेवा, तोपर्यंत कांदा, टोमॅटो, मिरच्या हे सर्व बारीक चिरुन ठेवा.
आता आपला नॉनस्टीक तवा गरम करुन घ्या, त्याला थोडेसेच तेल लावुन त्यावर पळीने पिठ घाला व जरा जाडसरच पसरा, त्यावर कोथिंबीर, कांदा, टोमॅटो पसरुन घाला. हा उत्तपा दोन्ही बाजुने भाजावा. नारळाच्या चटणीबरोबर खावयास द्यावा.
डाळ, तांदूळ भिजवून पिठ आंबवण्यापे़क्षा हा झटपट उत्तपा मुलांच्या डब्यासाठी जरुर देता येईल.
८. मुगडाळीचे डोसे
साहित्यः मुगडाळ तीन वाट्या, उडीदडाळ एक वाटी, १०-१२ लसूण पाकळ्या, एक इंच आल्याचा तुकडा, मीठ, ७-८ ओल्या मिरच्या.
कृती: मुगडाळ आणि उडीदडाळ स्वच्छ धुऊन ४/५ तास भिजवावी. मिक्सरला बारीक वाटून रात्रभर पीठ झाकून ठेवावे. स़काळी त्यात आले लसूण मिरची वाटून घालावी. चवीनुसार मीठ घालावे. आवडीप्रमाणे डोसे घालून नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत. हे डोसे अतिशय हलके होतात.
९. रवा ढोकळा
साहित्य: १ वाटी रवा, २ वाट्या ताक, २-३ टेस्पून तेल, १ टेस्पून आले + हिरवी मिरची पेस्ट, १/४ टेस्स्पून खायचा सोडा, मीठ चवीनुसार, अर्ध्या लिंबाचा रस.
फोडणीचे साहित्य: १ टेस्पून तेल, ७-८ कढीपत्ता, १ टीस्पून मोहरी, १/२ टीस्पून तीळ, १/४ टीस्पून हींग.
पाकृ:
एका बाऊलमध्ये रवा घ्या. त्यावर खायचा सोडा घालून त्यावर लिंबू पिळा, त्याचा फेस येईल. २-३ चमचे तेल घालून चांगले मिक्स करुन घ्या. त्यात आले + मिरची पेस्ट व ताक घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत फेटा. एकपण गुठळी राहता कामा नये. ग्रीझ केलेल्या थाळीत मिश्रण ओतावे. झाकून १०-१५ मिनिटे वाफावून घेणे. प्रेशर कुकर मध्ये ठेवल्यास शिट्टी न लावता वाफवून घेणे. फोडणीचे साहित्य वापरून फोडणी तयार करावी व ढोकळ्यावर घालावी. सुरीने तुकडे कापावे. तयार रवा ढोकळा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करावा.
आंबवुन
१. पानपोळे- दोन वाट्या तांदूळ + १ चमचा मेथी दाणे ४ तास भिजत घालायचे. मग बारीक वाटायचे, वाटताना त्यात नारळाची अर्धी वाटी (ओले खोबरे) खवून घालायची. मग हे मिश्रण साधारण २ तासांनी डोसे करण्यासारखे होते. पीठ डोशांच्या पिठापेक्षा पातळ झाले पाहिजे. (मेथी आणि खोबर्यामुळे अगदी मऊ पोळे होतात.) मग तवा चांगला तापवून मध्यम आचेवर थोडे तेल घालून साधारण ६/७ इंच व्यासाची धिरडी घालायची
२. नेहमीप्रमाणे डोस्याचे पीठ बनवायचे. मिक्सरमधून वाटून झाले कि त्यात थोडे नाचणीचे पीठ घालायचे. ३-४ तास आंबू द्यायचे. आणि डोसा करताना त्यात घरात असतील नसतील त्या भाज्या कीसून, बारीक चिरून टाकायच्या. थोडे तेल ह्या पातळ पिठातच टाकायचे आणि नॉन-स्टिक तव्यावर डोसे टाकायचे. खूप चविष्ट लागतात आणि भाज्या कोणत्याही घालता येतात.
पराठे
१. लाल भोपळा कुकर मध्ये पाणी न घालता शिजवून घ्यायचा. थोडे गुळाचे पाणी करून ठेवायचे. आणि या भोपळ्यात गुळाचे पाणी टाकून पुरेशी कणिक भिजवायची. गुळाचे पाणी पण थोडेच. आणि छान तूप लावून पोळी लाटायची आणि तूप लावून भाजायची
२. थोडं गाजर, लाल/दुधी भोपळा कीसून त्यातच पाणी न घालता कणिक भिजवायची. आणि त्याचा पराठा करायचा.
३. दुधी भोपळा भाजी आपल्यासाठी करून झाल्यावर अर्धी वाटी भाजी हाताने कुस्करून चवी अॅडजस्ट करून मावेल तेवढी कणिक व त्याचे पराठे. थंडीत जवस, तीळ, खोबरे सुकी टाईप चटणी करून त्यात कमी तिखट घालावे व तूप लावून पराठ्याच्या आत पसरून गुंडाळून
केक / सॅण्डविच
१. रवा केक -
एक वाटी रवा, एक वाटी साखर, एक वाटी दही, दोन चमचे लोणी, अगदी थोडेसेच दूध असे भिजवून अर्धा तास ठेवले तरी पुरते. त्यात आवडीप्रमाणे व्हॅनिला/मँगो/स्ट्रॉबेरी इसेन्स किंवा ताज्या फळाचा रस मिसळा, अर्था चमचा सोडा आणि मीठ चवीपुरते घालून फ्रायपॅनमध्ये पंधरा मिनिटे मंद गॅसवर ठेवा. मस्त लागतो हा केक.
याचाच रूचिराच्या दुसर्या भागात रूमझुम म्हणून प्रकार दिलाय. तोही फ्रायपॅनमध्येच दोन्ही बाजूंनी धिरड्यासारख्या भाजून करतात. प्रमाण वर दिलेय तसेच.
२. एगलेस चॉकलेट केक
साहित्यः मैदा १५० ग्रॅम, लोणी १०० ग्रॅम्, मिल्कमेड्साठी ( दूध पाऊण ली.+ साखर पाऊण वाटी), १ चमचा बेकींग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, कोको पावडर अडीच चमचे, ५/६ चमचे साखर लागल्यास, दूध अर्धा कप, तूप.
क्रुती: पाऊण ली. दूध + पाऊण वाटी साखर मंद आचेवर आटवावे. मिश्रण मिल्कमेड सारखे झाल्यावर गार करावे. मिक्सरला फिरवून एकजीव करून घ्यावे. मैदा, बेकींग पावडर, खायचा सोडा, कोको पावडर चाळणीने तीन वेळा चाळून घ्यावे. यामुळे सोडा, बेकींग पावडर नीट मिक्स होईल. तयार मिल्कमेड आणि लोणी परातीत घेऊन फेसावे. फेसताना अर्धा कप दूध मिश्रणात घालावे. आता चाळलेला मैदा मिश्रणात मिसळावा. मिश्रण एकजीव करावे. ५/६ चमचे साखर मिसळावी. नॉनस्टीक फ्रायपॅनला तूप लावून घ्यावे. साखर घातल्यावर एकजीव झालेले मिश्रण फ्राय पॅनमध्ये ओतावे. मंद गॅसवर १५ मिनिटे ठेवावे. १५ मिनिटांनी झाकण काढून सुरीचे टोक घालून पहावे. मिश्रण सुरीला चिकटले नाही म्हणजे केक तयार झाला असे समजावे.
काहीना मिल्कमेड्ची गोडी पुरेशी वाटते, त्यांनी वरून साखर घालू नये. साधी साखर वरून घातल्यामुळे ती विरघळली की केकला छान जाळी पडते.
केकवर केलेली आयसिंगची फुले लोणी साखरेची आहेत. नेट्वर शोधून त्याची कृती मिळाली.
३. खात्रीशीर ब्रेड मिळत असल्यास होल ग्रेन ब्रेडचे नारळाची पुदिना कमी व कोथिंबीर जास्त घातलेली चटणी (तिखट झेपेल तसे, भाज्या हव्या तर), लोणी लावून सँडविच, पुन्हा याचे विविध आकारही कापता येतात.
४. कधी साधा ब्रेड ,कधी गव्हाचा, तर कधी मल्टिग्रेन ब्रेड मध्ये उकडलेल्या बटाट्याची भाजी (हळद मीठ आणि तिखट टाकून) बटर (कधी मेयॉनीज ) लावून चांगले भाजून घ्यावे ..त्यावर चीज किसून टोमाटो सॉस बरोबर द्यावे.
५. ब्रेडवर बटर/मेयॉनीज लावून त्यावर उकडलेल्या मक्याचे दाणे ठेवून त्यावर पिझ्झा चीज किवा इतर कुठलेही चीज किसून ते चीज मेल्ट होईपर्यंत भाजून मग ते ब्रेड पिझ्झा म्हणून देता येईल.
कोरडा / तयार खाऊ
१. लाडूंचे प्रकार :- मुगाचे, चुरम्याचे, रव्याचे , बेसनाचे लाडू, चुरमुर्याचा लाडू.
* नाचणीचे पौष्टिक लाडू -
साहित्यः अर्धा कि. नाचणीचे पीठ, एक मध्यम वाटी (अंदाजे १०० ग्रॅम) सुके खोबरे, दोन वाट्या पोहे, १०० ग्रॅम खारीक पावडर, पाव कि. तूप, अर्धा कि. पिठी साखर, वेलची पावडर स्वादानुसार.
कृती: अर्धा कि. नाचणीचे पीठ घ्यावे. अर्धी वाटी तूप बाजूला ठेवून बाकीचे कढईत घ्यावे. त्यामध्ये नाचणीचे पीठ घेऊन बेसनाच्या लाड्वाप्रमाणे भाजून घ्यावे. नाचणीचा रंग मुळात काळपट असल्याने भाजताना खमंग वास सुटेपर्यंत भाजावे. (अंदाजे १० ते १५ मिनिटे) भाजलेले पीठ गार करण्यास ठेवावे. सुके खोबरे किसून खमंग भाजून घ्यावे. पोहे भाजून घ्यावे. खारीक पावडर जरा गरम करावी. भाजलेले सुके खोबरे मिक्सरला भरडसर फिरवावे. भाजलेले पोहे मिक्सरला फिरवून घ्यावे. नाचणीचे पीठ गार झाले की त्यात फिरवलेले सुके खोबरे, खारीक पावडर, पोह्यांचे पीठ मिसळावे. एक चमचा वेलची पावडर मिसळावी. मिश्रण नीट एकत्र करून त्यात पिठीसाखर मिसळावी. लाडू वळताना लगेच तुटतायत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या तुपापैकी लागेल तसे तूप घालावे. साखरेचे प्रमाण आपल्या चवीनुसार बदलण्यास हरकत नाही.
हे लाडू मुलांसाठी उन्हाळ्यात अतिशय उत्तम!! मुलांनाही खूप आवडतात. वरील प्रमाणात साधारणपणे मध्यम आकाराचे ३५ लाडू होतात.
* शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू -
साहित्यः एक वाटी दाण्याचे कुट, अर्धी वाटी गूळ, चिमुटभर वेलची अगर जायफळ पावडर, खाण्याचा चमचाभर साजूक तूप.
कृती: शेंगदाणे भाजून सालं काढून कुट करून घ्यावे. कुटाच्या निम्मा गूळ, एक चमचा तूप, वेलची किंवा जायफळ पावडर सर्व मिक्सर मधून थोडे फिरवून एकजीव करून घ्यावे. तूप लाडू वळता यावे यासाठी असते. त्याचे प्रमाण गरजेनुसार कमी जास्त करावे. लाडू वळून मुलांना द्यावे.
* झटपट चुरम्याचा लाडु
कुस्करलेली पोळी + किसलेला गुळ + तुप एकत्र करुन लाडु वळा.
२. सुक्या मेव्याची भेळ - बदाम, काजू, पिस्ते, खारीक, अक्रोड यांचे बारीक तुकडे करून ठेवावे, वाटीत प्रत्येकातलं थोडं थोडं घेऊन सोबत भरपूर मनुका.
३. किसलेल्या कैरीचा साखरांबा + पोळी रोल, गुळ + तूप + पोळी रोल, जॅम + रोल, चटणी + पोळी रोल.
४. भडंग
साहित्यः अर्धा कि. चुरमुरे, तीन चमचे मेतकुट, एक चमचा तिखट, चवीनुसार मीठ, दोन तीन चमचे पिठी साखर, शेंगदाणे, कढिलिंब, तेल, फोडणीचे साहित्य.
कृती: चुरमुरे चाळून घ्यावे. त्यात मेतकुट, तिखट, पिठीसाखर, मीठ घालावे. पाव वाटी तेल घालून हे सर्व चुरमुर्यांना लावून घ्यावे. कढईत तेल तापत ठेवावे. त्यात शेंगदाणे तळून बाजूला काढावे. साधारण अर्धी वाटी तेल लागेल. याच तेलात नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यावी. कढिलिंबाची पाने घालावी. ती चुरचुरीत झाली की तयार चुरमुरे घालावेत. तळलेले शेंगदाणे घालावेत. मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतावे. पिठीसाखर, तिखट याचे प्रमाण आवडीनुसार घ्यावे.
५. जाड पोह्यांचा चिवडा
साहित्यः जाड पोहे, तेल, तिखट, मीठ, पिठीसाखर, फोडणीचे साहित्य, शेंगदाणे.
कृती: जाडे पोहे चाळून पोह्यांना तेल चोळून घ्यावे. साधारणपणे पाव वाटी तेल अर्धा किलो पोह्यांना लागेल. तेल लावून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून घ्यावेत. अर्धी वाटी तेल घेऊन त्यात शेंगदाणे तळून घ्यावेत. आवडत असल्यास सुक्या खोबर्याचे काप तळून घ्यावेत. उरलेल्या तेलात नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात भाजलेले पोहे, शेंगदाणे, चवीनुसार तिखट, मीठ, पिठीसाखर मिसळावी. मंद गॅसवर चिवडा नीट मिक्स करावा. हा चिवडा मस्त लागतो.
* गोडाचा शिरा / सांजा
१. केळ्याचा शिरा
साहित्यः १ वाटी रवा, १ वाटी दूध, १ वाटी पाणी, ३/४ वाटी साखर, १/२ वाटी साजूक तूप, १ पिकलेले केळं स्लाईस केलेले, काजू, बदाम व बेदाणे, १ टीस्पून वेलचीपूड.
पाकृ:
एका पॅनमध्ये २ टीस्पून तूप गरम करून त्यात सुकामेवा हलका परतून घ्यावा. त्यात केळ्याचे स्लाईस घालून मध्यम आचेवर सोनेरी रंगावर परतून घ्यावे. दुसर्या भांड्यात तूप गरम करून मध्यम आचेवर रवा चांगला भाजून घ्यावा. रवा हलक्या सोनेरी रंगावर भाजायचा. एकीकडे दूध व पाणी एकत्र करून उकळी काढावी. भाजलेल्या रव्यात केळ्याचे मिश्रण घालून चांगले एकजीव करावे. आता त्यात उकळलेले दूध पाणी घालून, झाकून ४-५ मिनिटे शिजवावे. रवा चांगला फुलला पाहिजे. आता त्यात साखर घालून एकत्र करावे व पुन्हा झाकून ३-४ मिनिटे शिजवावे. शेवटी वेलचीपूड घालून चांगले मिक्स करावे. गरमच सर्व्ह करावे.
२. मँगो शिरा
साहित्यः १ वाटी हापूस आंब्याचा रस, १ वाटी रवा, १ वाटी दूध, १ वाटी पाणी, ३/४ वाटी साखर, २-३ टेस्पून साजूक तूप, बदाम व बेदाणे, १ टीस्पून वेलचीपूड, १/२ टीस्पून जायफळपूड, केशर.
पाकृ:
एका भांड्यात तूप गरम करून मध्यम आचेवर रवा चांगला भाजून घ्यावा. रवा हलक्या सोनेरी रंगावर भाजायचा. एकीकडे दूध व पाणी एकत्र करून उकळी काढावी. भाजलेल्या रव्यात आता त्यात उकळलेले दूध पाणी घालून, झाकून ४-५ मिनिटे शिजवावे. रवा चांगला फुलला पाहिजे. आता त्यात साखर घालून एकत्र करावे व पुन्हा झाकून ३-४ मिनिटे शिजवावे. त्यात बदाम, बेदाणे व केशर घालावे. आंब्याचा रस घालून चांगले एकत्र करा व झाकून २-३ मिनिटे शिजवणे. शेवटी वेलचीपूड, जायफळपूड घालून चांगले मिक्स करावे. गरमच सर्व्ह करावे.
३. गोडाचा सांजा
साहित्यः १ वाटी लापशी रवा (दलिया), १ वाटी चिरलेला गुळ (साधारण एवढा लागतो, तरी आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे), १ वाटी दूध, १ वाटी पाणी, १/२ वाटी खवलेला ओला नारळ ( आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे), २-३ टेस्पून साजूक तूप, १/२ टीस्पून वेलचीपूड, काजु, बदामाचे काप, बेदाणे.
पाकृ:
प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून लापशी रवा मंद आचेवर सोनेरी रंगावर परतून घ्या. दुसर्या भांड्यात दूध व पाणी एकत्र करुन त्यात परतलेला रवा घालून प्रेशर कुकरला ३-४ शिट्ट्या काढून शिजवून घ्या. कढईत शिजवलेला लापशी रवा व गुळ एकत्र करा व मंद आचेवर गुळ विरघळेपर्यंत परतून घ्या. आता त्यात सुका-मेवा व ओला नारळ घालून सगळे एकत्र करा. सतत परता कारण गुळामुळे सांजा लागू शकतो. वेलचीपूड घाला आणी एकत्र करा. आवडत असल्यास वरुन साजूक तूप सोडा. गुळामुळे सांजा खमंग होतो .
पोहे / उपमा/ तिखट सांजा / खीर / इतर
१. साळीच्या लाह्या
साळीच्या लाह्या पाण्यात भिजवून पिळुन घ्या. त्यात दही + साखर + मीठ टाका. त्यावर हिंग + जिरे + शेंगदाणे / उडदाची डाळ + कढिपत्ता + थोडी हिरवी मिरचीची फोडणी टाका. नीट कालवुन घ्या.
२. दडपे पोहे
पातळ पोहे + बारिक चिरलेला कांदा + टोमॅटो + काकडी (हवी असल्यास) + किसलेली कैरी (सिझनल उपलब्ध असल्यास) + लिंबु (बाकी काही आंबट नसेल तर)
वेगळे पाणी टाकु नका, भाज्यांच्या पाण्यातच पोहे भिजतील.
वरुन त्यावर हिंग + जिरे + शेंगदाणे + कढिपत्ता + थोडी हिरवी मिरची ची फोडणी टाका. नीट कालवुन घ्या.
थोडा वेळ हे मिश्रण झाकुन (दडपुन) ठेवा.
३. बटाटा, टोमॅटो ,गाजर, मटार घालून मुगाची खिचडी.
४. चुरमुर्याचा उपमा / सुशिला
पोह्यासारखी फोडणी करायची आणि त्यात पाणी घालून उकळायचे, मग चुरमुरे घालायचे / चुरमुरे भिजवुन घेऊन, फोडणीत परतायचे.(पोहे करतो तसेच.. फक्त चुरमुरे वापरायचे)
५. शेवयांची / नाचणीची / रव्याची / दलियाची खीर
६. गव्हाची पेज - गव्हाचे पीठ तुपात भाजून घ्यायचं. अगदी १ चमचा पीठ पुरे होतं. छान गुलाबी भाजलं की त्यात गुळाचे पाणी घालायचे.
७. पोहे थोडे भाजून त्याचे पीठ करायचा आणि त्यात दुध,गुळ घालून ते पण खाता येतं.
८. बटाट्याची भाजी : शेंगदाणे ४-५ तास भिजत ठेवावेत. ३-४ बटाटे आणि भिजवलेले शेंगदाणे कुकरला ३-४ शिट्ट्या करून उकडून घ्यावेत. कढाईत तेल टाकून एखादी हिरवी मिरची कापून त्यात उकडलेल्या बटाट्याच्या सालं काढून, फोडी करून, शेंगदाण्यासोबत टाकून मीठ टाकून परतून घ्यावे. खूप मस्त लागते हि भाजी पण नुसतीच खाता येते.
तशीच बटाटे बारीक कापून तेलामध्ये थोडी मिरचीची फोडणी देऊन शिजू द्यावेत थोडे खरपूस होत आले की मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट थोडेसे घालून थोडे परतून घ्यावे. ही भाजी पण नुसती किवा दह्याबरोबर छान लागते.
९. गोडाचे आप्पे : रवा हलकासा भाजावा आणि तो भिजेल इतपत गुळाचे पाणी करून त्यात रवा भिजवून ४ तास ठेवावा. नंतर अप्पेपात्रात साजूक तूप घालून त्यात नेहमीप्रमाणे आप्पे कारावेत .
१०. चाटः- मोडाचे मुग / मटकी / चणे मीठ घालून वाफवून घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक शेव, लिंबू पिळून द्यायचे.
११. अंजीर - सफरचंदाचे मिल्कशेक
साहित्य: एका सफरचंदाच्या फोडी, ४-५ सुके अंजीर, दीड कप थंड दूध, १ टेस्पून मध (ऐच्छिक / अंजीरमुळे मिल्कशेकला गोडवा येतो).
पाकृ: ब्लेंडरमध्ये सगळे एकत्र करुन २०-३० सेकंदासाठी फिरवून घेणे. ग्लासमध्ये ओतून ,वरुन चिमूटभर दालचिनीपूड घालणे व सर्व्ह करणे.
______________________________________________________________________
चला तर आता चिंता न करता मुलांना जेवायला घाला नि सशक्त बनवा!!
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 11:04 am | पिलीयन रायडर
हा माझा सर्वात प्रिय धागा आहे ग बै! प्रिंट काढुन चार जणींना वाटला आहे एव्हाना..
सुरंगी ताई.. इतकं सुंदर संकल केल्याबद्दल आभार! आणि फोटो टाकत जाऊ नका हो.. बाळाआधी आईची भुक चाळवते..!
21 Oct 2015 - 8:40 pm | आरोही
अगदी असेच म्हणते ...अनेक धन्यवाद या लेखासाठी.सुरंगीताई....
16 Oct 2015 - 11:45 am | जिन्गल बेल
सुरंगीतै खूप आभार...अगदी सोपे आणि पटकन होणारे पदार्थ सांगितल्या बद्दल ....रोज तुमची आठवण काढत करेन १-१ पदार्थ :)
16 Oct 2015 - 11:55 am | मीता
मस्त संकलन ताई .आणि लिहिण्याची हातोटीही..
16 Oct 2015 - 12:47 pm | नूतन सावंत
पिरा,तुझा मूळ धागा सशक्त होताच.फोटोंचे श्रेय मात्र अजयाचे आहे.आणि बाळासोबत आईलाही जेवायला हरकत नाही असे वर नमूद केले आहेच.त्७त
16 Oct 2015 - 2:15 pm | वेल्लाभट
एक्क्क नंबर धागा...
एक्क नंबर संकलन
आणि एक नंबर पदार्थ !
सहीच. सुरंगी ताईंना व्हॉट्सॅपचे अनेक थंब्सअप
16 Oct 2015 - 2:38 pm | कविता१९७८
वाह सुरगण ताई, प्रचि छान, लेख वाचते नंतर...
16 Oct 2015 - 4:04 pm | विभावरी
लहानां बराेबर माेठ्यांनाही आवडतील हे पदार्थ !!
16 Oct 2015 - 4:24 pm | उमा @ मिपा
मुलांच्या पोषणाचा, चवींबद्दलच्या त्यांच्या आवडीनिवडींचा आणि त्याच बरोबरीने आईलाही सोपे जावे असा सगळा विचार करून अतिशय निगुतीने या पाकृ जमवल्या आहेत. त्याबद्दल पिरा, अनन्न्या, सानिका आणि त्यात योगदान देणाऱ्या सगळ्याच अनाहितांचे खूप खूप कौतुक. सुरंगीताईंनी ही सर्व माहिती इतकी छान संकलित करून दिलीय. पिराने लिहिलंय तसं, बस एक प्रिंट काढून ठेवायची मग त्यात बघून जे हवं ते बनवावं, हे इतकं सोपं करून दिलंय सुरंगीताई तुम्ही. इ लोवे यु!
फोटोंमुळे हा लेख नयनरम्य आणि तत्काळ भूक चाळवणारा बनला आहे, अजयाताई आणि सानिका... मस्त!
16 Oct 2015 - 4:46 pm | मितान
आजच या लेखाच्या प्रिंटा काढून लेकुरवाळ्या किंवा अजुन स्वतःच लेक्रु असलेल्या मित्रमैत्रिणिंना वाटत आहे !!!
सगळ्यांचे दुवा तुला सुरंगीतै :))
16 Oct 2015 - 5:22 pm | प्रीत-मोहर
मी हा लेख आणि अॅक्च्युअली बरेच लेख. स्पँडी ताईचा सुद्धा. मला एक प्रिंट काढुन ठेवलाय. आणि आमच्याकडे सवाष्णी असतात त्यांना देणारे. स्प्रेड करायला. :)
16 Oct 2015 - 7:55 pm | इशा१२३
अप्रतिम संकलन.उपयोगी धागा लहान बाळांच्या आयाना.
फोटो तर सुरेखच.
16 Oct 2015 - 10:07 pm | अजया
मस्त झालंय हे संकलन.बहुपयोगी!
17 Oct 2015 - 2:02 am | रेवती
मस्त संकलन झालय. धन्यवाद सुरंगीतै.
पिराने हा तमाम आयांच्या इंटरेस्टचा विषय काढल्यावर सगळ्याजणी किती उत्साहाने रेसिपीज देत होत्या ते आठवले.
सानिकेने, अनन्यानं फोटू देऊन धागा रंगीत केलाय. छान आलेत सगळेच फोटू.
17 Oct 2015 - 6:11 am | स्रुजा
कमाल संकलन सुरंगी ताई, पिराने अगदी जिव्हाळ्याची तार छेडली होती. तू त्या धाग्याला चार चांद लावलेस तुझ्या शैलीने. तुम्हा दोघींचे खुप कौतुक. लाडु चिवड्याचे आणि सगळे फोटो तर खास च.
17 Oct 2015 - 11:27 am | अनन्न्या
तुझे सगळेच लेख देखणे झालेत, लेखनशैलीही छान!
17 Oct 2015 - 6:58 pm | पैसा
खूप उपयोगी धागा!
17 Oct 2015 - 10:05 pm | सानिकास्वप्निल
छान संकलन झालय.
धागा उपयोगी आहेच आणि सगळ्यांना त्याचा फायदाच होणार आहे.
18 Oct 2015 - 2:48 am | मधुरा देशपांडे
+१
18 Oct 2015 - 2:25 pm | प्यारे१
लिन्क घराकडं धाडतोय. अत्यंत 'उपयोगी' धागा.
18 Oct 2015 - 4:45 pm | मांत्रिक
अतिशय उत्कृष्ट संकलन. फोटो तर कातिलच. मुगडाळीचे डोसे जबरा दिसताहेत.
19 Oct 2015 - 11:49 am | पद्मावति
आहा..मस्तं रेसेपीस. किती पौष्टिक आणि सोप्या. हा लेख पुन्हा पुन्हा वाचून त्यातल्या पाककृती करून पाहणार.
19 Oct 2015 - 12:04 pm | गिरकी
खूप छान :) मला स्वत: साठी सुद्धा उपयोगी पदार्थ आहेत खूप :)
19 Oct 2015 - 1:04 pm | सस्नेह
एकदम सुपर्ब कलेक्शन आहे !
इथे वाखू साठवायची सोय नसल्याने गोची झाली आहे...
20 Oct 2015 - 4:30 am | रातराणी
सही संकलन!
21 Oct 2015 - 5:56 pm | Mrunalini
सगळ्या पाकृ एकाच ठिकाणी एकत्र केल्यामुळे खुप उपयोग होईल सगळ्यांना ह्याचा. थँक्स सुरन्गी. :)
23 Oct 2015 - 8:54 pm | चतुरंग
खाण्यासाठी हट्ट करावा का? :)
(अजाण बालके)रंगा
25 Oct 2015 - 12:03 am | एस
हा आणि अपर्णाताईंचा धागा फार आवडला. दोन्ही धाग्यांच्या छापील प्रती काढून संग्रही तर ठेवाव्यातच, शिवाय लोकांनाही आवर्जून वाटाव्यात इतपत हे धागे उपयुक्त आहेत.
रूची अंकातील धाग्यांना वाखु लावता येत नसल्याने मोठाच विरस झाला आहे!
25 Oct 2015 - 1:57 am | चैत्रबन
वा वा काय मस्त मस्त पदार्थ आहेत.. नक्कीच प्रिंट काढून ठेवणार... धन्यवाद ताई.
25 Oct 2015 - 3:40 am | विशाखा राऊत
मस्त उपयुक्त माहिती. नक्की छापुन ठेवणार
25 Oct 2015 - 11:15 pm | स्वाती दिनेश
खूप छान धागा!
स्वाती
26 Oct 2015 - 4:00 pm | स्नेहल महेश
अप्रतिम संकलन.उपयोगी धागा
फोटो तर सुरेखच.
28 Oct 2015 - 1:02 pm | पदम
लहान मुलांपासुन ते मोठ्यांपर्यंत सर्वजणांसाठी पाकृ एकाच लेखात.
30 Oct 2015 - 7:07 am | Maharani
सुंदर संकलन..उपयुक्त माहिती
28 Nov 2018 - 4:24 pm | रंगासेठ
हा धागा कित्येक महिने माझ्या बुकमार्क मधे आहे. केवळ लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठी पण यातील कित्येक पदार्थ करण्यासारखे आहेत.