अन्नपूर्णेचा वारसा

मितान's picture
मितान in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:25 pm

कधीतरी आपल्या जिभेची लहानपणची स्मृती वर येते नि मग तेच लहानपणचे पदार्थ खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. लेकीसाठी रोज काही नवं करतानाही आपण लहानपणी खाल्लेले पदार्थ आधी आठवतात. आजीचे, पणजीचे हे पदार्थ, त्यांच्या पाककृती नव्या ग्लोबल चवींच्या मार्‍यापुढे हरवून जातील अशी भिती वाटते. मागच्या पिढीनं हस्तांतरित केलेला हा अन्नपूर्णेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे खरं तर अलिखित कर्तव्यच. तो वारसा पुढे चालवायचा की नाही हे पुढच्या पिढीने ठरवावं.
म्हणून ठरवलं की असे काही पदार्थ लिहून ठेवुया.

परवा उकडशेंगोळे करताना गडगिळ्यांची आठवण झाली. हिवाळ्याच्या दिवसात रोज काहीतरी गोड खायचा आम्हा मुलांचा हट्ट असायचा. आई किंवा आजी मग घरात असलेल्या रोजच्या जिन्नसांपासून काहीतरी जादूचा पदार्थ करून आमचे लाड करायच्या. त्यातला हा पदार्थ लाडका! जाडसर कणिक तुपाचे मोहन घालून घट्ट भिजवायची. त्याचे कडबोळे वळायचे आणि एका पातेल्यात गुळाचा जरा घट्ट पाक करून त्यात शिजू द्यायचे. कडबोळी शिजेपर्यंत पाकही घट्टसर व्हायचा. यावर तूप घालून आम्ही आनंदाने खायचो.

आमच्या लहानपणी लाखाची डाळ आमच्या भागात बरीच यायची. घरोघरी त्याचा भरडा वेगवेगळ्या पदार्थात वापरला जायचा. श्रावणात घरोघरी जेव्हा पुरणावरणाचा स्वयंपाक असे तेव्हा लाखाचे वडे केले जात. भरडा तिखटमीठ हिंग जिरेपुड टाकून ताकात घट्ट भिजवायचा. त्याचे छोटे चपटे वडे आधी वाफवून आणि मग चुर्चुरीत फोडणीत परतून घेतले जायचे. हे वडे कढीसोबत खायला मज्जा यायची. दात नसणारी मंडळी हे वडे सुरुवातीलाच कढीच्या द्रोणात बुडवून ठेवत असत. मग भातासोबत खात.

पुरणावरून आठवलं. शेजारच्या काकुंकडे कोणत्यातरी सणाला बदामाचे पुरण खाल्ले होते. त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही पाककृती म्हणे. बदाम्, हरभरा डाळ आणि खवा समप्रमाणात वापरून त्याचे पुरण वाटायचे. मग एका मोठ्या परातीत तूप घ्यायचे न तव्यावरची पोळी थेट त्या परातीत बुडवायची न काढायची. त्यांच्या घरच्या मंडळींना ३-३ अशा पोळ्या खाताना बघून जीव दडपून गेला होता. आम्ही आपले एकच खाऊन आऊट !!!

बदाम एकुणातच फार प्रिय. हिवाळ्याच्या दिवसात पौष्टिक म्हणून आई ५ दिवस रोज सकाळी बदामाचा शिरा द्यायची. त्यासाठी रात्रभर बदाम भिजवायचे. सकाळी सोलून वाटायचे आणि मग त्याचा शिरा करायचा. छोट्या वाटीत हा शिरा हातात घेतल्यापासून २ मिनिटात संपूनही जायचा! आता उद्या... असं उत्तर ऐकून खवळलेल्या जिभेने शाळेत जाणं व्हायचं.

.

कुठेही गावाला निघायचं म्हटलं की दशम्या धपाटे आजही घरात होतात. गावी दुध उदंड. दूध वापरून केलेले पदार्थ पणजीला सोवळ्यातही चालत. गावाला जायच्या तयारीला चुलीवर भाजल्या जाणार्‍या या खमंग दशम्या धपाट्यांचा वास असे. धपाटे वेगवेगळ्या प्रकारचे होत. ज्वारीचं पीठ, त्यात थोडं हरभरा डाळीचं पीठ, घसघशीत लसूण, तिखट, हळद, मीठ, ओवा आणि हे पीठ ताकात मळायचं. ताक मात्र आंबट हवं. मग एक स्वच्छ पांढरं कापड ओलं करून त्यावर पातळ धपाटे भाकरीसारखे थापायचे न लोखंडी तव्यावर तेल घालून खरपुस भाजायचे. गरम खाताना लोण्याच्या गोळ्यासोबत आणि प्रवासात गार खाताना शेंगादाण्याची उखळात कुटलेली चटणी आणि आंब्याच्या लोणच्यासोबत! दिवाळीनंतर शेतात वाळकं यायला लागत. जराशी आंबुस पण दळदार असलेला हा काकडीचाच एक प्रकार. या वाळकांना किसून त्यात बसेल एवढं पिठं घालून आजी धपाटे करायची.कोणतीही पालेभाजी घालून धपाटे. परातीत भाकरीसारखे थापून तेलावर भाजलेले हे धपाटेही प्रवासात विनातक्रार २-३ दिवस आरामात चांगले राहत.
ज्वारीचं पीठ वा कणिक दुधातच मळून त्याच्या दशम्या म्हातार्‍या मंडळींना काही उपासांना चालत. आजी त्यासोबत दुधाचे पिठले करायची. नेहमीचेच पिठले पण त्यात पाण्याऐवजी दूध वापरून केलेले हे पिठले खाण्यापेक्षा पातेल्याच्या बुडाशी लागलेली त्याची खरवड खायला मला जास्त आवडायचं. या दशम्याही अनेक प्रकारच्या होत. कधी लाल भोपळा, कधी केळ तर कधी काकवीत पिठ मळले की वेगवेगळे प्रकार तयार होत.

सणावारांच्या गर्दीत नैवेद्य म्हणून सुधारस, भोपळ्याची खीर, कणकेचा चॉकलेटी शिरा, वळवटाची(बोटव्यांची) खीर असे पदार्थ होत. गुळाचा सांजा करून त्याच्या पोळ्याही होत. कणकेची धिरडी आणि गुळवणी होई. त्यात एकदा एका आजींकडे बालाजीच्या नैवेद्याला त्रिपूरसुंदरी नावाचा पदार्थ खाल्ला तो ठळक लक्षात आहे. भली मोठी जाडजुड पुरणपोळी, त्यावर तुपाची झारीने ओतलेली धार, त्यावर पिठी साखर पेरलेली आणि त्यावर चक्क लिंबू ! मला मुळात पुरणाचाच कंटाळा असल्याने कशीबशी सुंदरी खाल्ली. पण इतर लोक व्यवस्थित आडवा हात मारत होते.

आजोबा किंवा घरातली कर्ती मंडळी गावाला गेली की आळशी स्वयंपाक व्हायचा. त्यात प्रामुख्याने कुटके ! २-३ दिवसात उरलेल्या दशम्या किंवा पोळ्या कडक उन्हात वाळवून शिंकाळ्यात स्वच्छ कापडात बांधून ठेवल्या असत त्या खाली येत. मग चुलीवर कढई नाहीतर पितळेचे पातेले ठेवून त्यात बचकाभर लसूण आणि कढिलिंब आणि तिखट घालून पाणी फोडणी दिले जाई. त्याला आधण आले की दशम्यांचे तुकडे/कुटके त्यात सोडायचे. वरून किंचित बेसन सोडायचे. ५ मिनिटात एक चमचमीत चविष्ट पदार्थ ताटात ओरपण्यासाठी तयार असायचा.

दुसरा आळशी प्रकार म्हणजे हुरड्याच्या किंवा बाजरीच्या कण्या. दरवर्षी हुरडा खायला खूप लोक यायचे. खूप हुरडा भाजला जायचा. गरम गरम खाल्ला जायचा. तरीही जो उरे तो उन्हात वाळवून अजून एकदा भाजून जात्यावर भरडून ठेवला जायचा. बाजरीही अशीच भाजून भरडली जायची. मग कधीतरी लहर आली की याच्या कण्या शिजवल्या जायच्या. पद्धत तीच. कांदा वा लसणाची फोडणी त्यात वाटलं तर आणि असतिल तर भाज्या आणि या हुरड्याच्या कण्या. हुरड्याची गोडुस चव वरून घेतलेल्या कच्च्या तेलाची (करडी किंवा शेंगदाणा) चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय.
येसर पातोड्या (पाटवड्या) आणि भाकरी हा पण आळशी स्वयंपाक. येसर आमटीत बेसनाच्या वड्या थापून शिजवायच्या. वरून कोथिंबिर.

.

दशमीचा मलिदा मला भयंकर आवडायचा. द्शमी बारीक कुस्करायची. त्यात कच्चं तेल तिखट मीठ हिंग आणि बारीक चिरलेला कांदा. सोबत ताजे ताक! तशीच फोडणीची पोळी. पोळीवर मेतकूट लोणचे वगैरे आवडते प्रकार पसरायचे न पळीत फोडणी करून ती यावर पसरायची. मग त्याचे रोल करून गिळून आपण पसरायचे ;)
शेपूफळं हा प्रकार वरणफळाचा मावसभाऊ. फक्त वरणात शेपू शिजवून लसणाची फोडणी देऊन त्यात हाताने तोडून कोणताही आकार न देता ही कणकेची फळं शिजवायची. शेपू आवडणारांना हा प्रकारही खूप आवडतो असा अनुभव आहे.

.

सासरी आजेसाबांच्या हातचे गाकर खाल्ले नि या पदार्थाच्या प्रेमातच पडले. पतळसर कणिक भिजवायची. मीठ घालायचं. आणि थेट तव्यावर थापायचं. एकदा थापून झालं की तेलाचा हात लावून पुन्हा घडी करायची. पुन्हा थापायचं. असं किमान तीनदा. मग छिद्र पाडून त्यात तेल सोडून थालिपिठासारखं एका बाजूने भाजायचं. हे गुळ तूप, लोणचं, ठेचा कशासोबतही खायचं. मी यात तेलाचा हात लावताना वेगवेगळ्या चटण्या, मेतकुट, लोणचे काहीही घालते. गाकर अधिक खमंग होते.

.

अशाच काही अनवट पदार्थात रसातला भात आठवतोय. उसाच्या रसात शिजवलेला भात आणि दूध. राळ्याचा भात आणि दूध गूळ नक्की कोणत्या सणाला खाल्ला जायचा आठवत नाही. त्याच जातीतला पदार्थ राजगिर्‍याची गाठोडी. शेतातला राजगिरा पुष्कळ असायचा. मग आषाढी एकादशीला ही गाठोडी व्हायची. पांढर्‍या सुती कापडात राजगिरा निवडून धुवून गच्च बांधायचा आणि उकळत्या पाण्यात ही गाठोडी उकडायची. त्यात नंतर दूध गूळ घालून खायची. गुळपापडीचे लाडू आजी खास करायची. घरात लग्न असेल तेव्हा सुद्धा तांदूळ धुवून सुकवून जात्यावरच भरडले जायचे. एवढ्या वर्हाडी मंडळींना पुरतील एवढे लाडू केले जायचे. हा भरडलेला तांदूळ खरपुस भाजून त्यात तूप गूळ घालून लाडू वळायचे. या लाडुंना तूप फार कमी लागते हे विशेष.

माझ्या आईची आई चहा पीत नसे. तिलाही आणि आम्हा मुलांनाही पांढरे दूध घ्यायचा फार कंटाळा यायचा. मग आजी फोडणीचं दूध करायची. कॅरेमल दूध !!! पातेलं चुलीवर ठेवलं की त्यात आधी साखर पसरायची. ती सोनेरी झाली की त्यावर दूध घालून पातेलं उतरवायचं. मस्त सोनेरी रंगाचं साखरेच्या फोडणीचं दूध आजही माझं आवडतं आहे. असाच गुळाचा चहा पण लाडका. पाणी, गूळ्, तुळस्, लिंबाची पानं (कडुनिंब नव्हे..लिंबू) आलं आणि थोडीशी चहापूड एकत्र उकळायची आणि मग गाळून त्यात थोडंसं दूध घालून हा चहा प्यायचा ! सर्दी खोकल्यात औषध म्हणून आणि एरवीही पावसाळ्यात थंडीत प्यायला खूप चांगला हा चहा.

दह्यातल्या मिरच्या, भुरका, चिंचेचा ठेचा, कारळाची चटणी, कायरस, पंचांमृत, गुळांबा, पिकलेल्या कवठाची चटणी, आणि सखुबद्दा हे पदार्थ आठवले की भूकच लागते. सखुबद्दा हा लोणच्याचा प्रकार. मोहरी फेसताना तीळही त्यात बरोबरीने घालायचे, थोडा गूळ घालायचा आणि मग हा लोणच्याचा मसाला कैर्‍यांना लावायचा. पंचांमृत करताना तीळ शेंगदाणे हिरव्या मिरच्या चिंचेचा कोळ आणि गूळ, काळा गोडा मसाला आणि भरपूर हिंगाची फोडणी !

.

.

आजीकडे इन्स्टंट पदार्थही तयार असत. गहू आणि हरभर्‍याची डाळ, सुंठ एकत्र वाटून केलेले सातूचे पीठ तयार असे. या पिठात गुळाचे पाणी किंवा दूध साखर नुसती मिसळून ते प्यायले की पुढचे चार तास भूक लागत नसे.
कणिक किंचित तुपावर भाजून त्यात गार झाल्यावर किसलेला गूळ आणि वेलची घालून तयार होई ती फक्की! ती नुसती चमच्याने खा किंवा कोरडं जात नसेल तर दूध घालून खा.
ज्वारीच्या लाह्यांचं पीठ सुद्धा घरात तयार असे. त्यात ताक आणि साखर घालून खायचे.
मेतकूट लावलेले कच्चे पोहे, लाल तिखट तेल मीठ मुरमुरे, गूळ तूप पोळीचा लाडू असे पदार्थ आज खाल्लेच जात नाहीत.

हे सगळे माझ्या आजी पणजीचे पदार्थ. रोज उठून तोच स्वयंपाक करायचा कंटाळा येतो असं मनात आलं की मी ही यादी बघते आणि स्वयंपाकाला लागते.
तुम्हालाही आठवणारे असे पारंपारिक आणि खास तुमच्या आजीच्या हातचे पदार्थ थोडक्यात कृतीसह इथे लिहा. फार मोलाचा ऐवज तयार होईल. नै का ?

नोट : सर्व छायाचित्रे आंतरजालावरुन साभार.

प्रतिक्रिया

पैसा's picture

16 Oct 2015 - 10:59 am | पैसा

दुष्ट मितान!

भूक लागली .आता दे करून हे सगळेच्या सगळे पदार्थ

पदम's picture

16 Oct 2015 - 12:17 pm | पदम

वाचतानाच तोंडाला पाणी सुटल.e

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 1:19 pm | प्रीत-मोहर

रुची अंक येइपरेंत थारा नव्हता. आता हे लेख उघडु वाटत नाहीयेत. कोण देणार आता हे पदार्थ करुन? :(

सस्नेह's picture

16 Oct 2015 - 3:06 pm | सस्नेह

फोटो आहेत म्हणजे सगळे केलेस की काय लेखासाठी ?

पिलीयन रायडर's picture

16 Oct 2015 - 3:34 pm | पिलीयन रायडर

अगं तू लेखांखालच्या नोट वाचत नाहीयेस का? आंतरजालावरुन साभार लिहीलय ना तिने..

पिलीयन रायडर's picture

16 Oct 2015 - 3:33 pm | पिलीयन रायडर

काय लेख आहे मितान!!! वा!!! मला नेहमी वाटतं की आम्हा आजकालच्या मुलींना (!) तुमच्या अर्धेही पदार्थ येत असतील का.. बहुदा नाहीच.. पण शिकायला हवं..

लेख अत्यंत आवडला.

उमा @ मिपा's picture

16 Oct 2015 - 4:44 pm | उमा @ मिपा

अगं हा लेख संपूच नये असं वाटत होतं. स्वयंपाकाबद्दल तुला असलेली माहिती (किती काय काय आठवतंय तुला!), करण्याची आवड, प्रचंड हौस आणि ते इतकं छान लिहून काढण्याची हातोटी... सलाम!
मला आठवणारी माझी आजी म्हणजे खूप म्हातारी, स्वतःच्या बाजेवर बसून आम्हा नातवंडांना कुरवाळणारी, स्वयंपाकघराची महाराणी माझी मामी. तिच्या हातचे शिरवाळे, घावणे खूप आठवतात. घरचे तांदूळ धुवून, सुकवून, जात्यावर दळलेलं पीठ. सकाळी लवकर उठून त्या तांदुळाच्या पीठाचे उंडे तयार करायची ती आणि ते उंडे पाण्यात उकडायची. काहीसं अंधारं स्वयंपाकघर, त्यात चुलीचा धूर, उंडे उकड्ण्यासाठी ठेवलेल्या गरम पाण्याची वाफ त्यामुळे वातावरण अजूनच गडद, चुलीसमोर मामी आणि शेजारी गुडघ्याएवढ्या उंच लाकडी साच्यावर मामा शिरवाळे काढताहेत मामा. साच्यावर शिरवाळे काढायला इतकी ताकद लागायची, मामी बिचारी नाजुका. मामीने नारळ किसून खोबऱ्याचं दुध काढलंय, गुळ वेलची आहे त्यात आणि किंचित हळद. आम्ही मामीची लाडकी भाचरं गरमागरम शिरवाळे आणि थंड, गोड नारळाचं दुध असं मस्त भरपेट खातोय. हे चित्रं, ती चव कधीही पुसली जाणार नाही.

अप्रतिम लेख.हे सर्व हौशी हौशीने करणाऱ्या तुला दंडवत!

ग्रेट लेखन आहे. सुदैवाने आजी, काकू, मामी, मावशी, आत्या यांच्या आपापल्या चवदार रेसिप्या होत्या व त्यांनी आनंदाने करून खायलाही घातल्या. तू सांगितलेल्या काही पाकृ होत असत, काही खास त्या त्या प्रांतातल्या असल्याने तिथेच शिजवल्या जातात म्हणून माहित नसतात किंवा वेगळ्या नावाने ओळखल्या जातात. आता गडगीळ, सखुबद्दा, गाठोडे हे पदार्थच नव्याने ऐकतिये. त्यांची नावेही मजेदार वाटतायत. गाकर आजी बनवत असे पण आईला आवडत नसल्याने माझ्यापर्यंत ती रेसिपी कधी आली नव्हती. आज हाती पडलिये म्हटल्यावर सत्कारणी लावणे आलेच! ;)
बाजरीच्या कण्या, धपाटे, रसातला भात, बिशिबेळे भात, पुरणपोळी, सांज्याची पोळी, सातूचे पीठ, लाह्याचे पीठ, गणंगांचे पीठ, तिखटाची, गोडाची थालिपिठे, विविध उकडी, अनेक प्रकारचे लाडू, खिरी असे नेहमी केले जात असे पण त्यावेळी त्याची कदर तेवढी नसते व हे आपल्याला नेहमीच मिळणार असल्याचा थाट असतो. दोन्ही आज्ज्यांनी आम्हा नातींना दिलेला मोलाचा संदेश म्हणजे "सासरी आपल्याला हवे ते रांधून खावे व दुसर्‍यालाही वाढावे" त्याने खूप फायदा झाला. तुझ्या लेखाच्या निमित्ताने दोन्ही आज्यांची फार आठवण आली.

स्रुजा's picture

17 Oct 2015 - 2:16 am | स्रुजा

दंडवत घे !! काय झकास लिहिलयेस :) , केवढी ती हौस आणि सुरम्य आठवणी.

माझी आजी तू दिलेल्या पाकृ सारख्याच पद्धतीने धपाटे बनवायची. इतकी चव होती तिच्या हाताला ! साधी बिनफोडणीची पिवळी मुगाची खिचडी, त्यावर वरुन लाल मिरची आणि हिंग मोहरी ची फोडणी, हे धपाटे हा आमचा दर शनिवार चा हट्टाचा मेनु असायचा. आई ला आणि मावशीला आम्ही नेहमी म्ह्णायचो की आजीसारखी चव नाही तुमच्या खिचडी- धपाट्यांना. आता माझी भाची हेच म्हणते ;) तिला तिच्या आजीच्या च हातचा उपमा, खिचडी असं लागतं. माझी आजी साधी कमी तिखटाची चवळीची उसळ पण फार सुरेख करायची. सगळ्या खाण्या पिण्याचे नखरे असलेली मी आणि माझ्या ही वरताण माझा मामेभाऊ, आम्ही दोघं वाटी वाटी घेऊन ही उसळ नुसती संपवायचो. तिच्या हातची लेकुरवाळीची भाजी + लोणी + भाकरी, आईशपथ !! आजी ची आज तुझ्या निमित्ताने अगदी मनापासून आठवण आली. आपलं बालपण इतकं भाव समृद्ध करण्यात आज्यांचा, परंपरेने चालत आलेल्या या खाद्य पदार्थांचा केवढा मोठा वाटा आहे ! आईचे ही असे खास पदार्थ आहेत, किती ही तिच्या रेसिपीने केले तरी तिची चव येत च नाही. नवरा ताटात कढी, कटाची आमटी, बदामाचा शिरा, उकडपेंड, वरणफ्ळं (वेगवेगळ्या दिवशी असतं हां हे ताटात, एकाच नाही, एवढी पण हौशी नाहीये मी ) वगैरे बघुन खुश झाला तरी माझं समाधान होत नाही. हेच आईने केलं की मग दिलखुश :)

भुमी's picture

17 Oct 2015 - 2:10 pm | भुमी

बदामाचा शिरा निव्वळ अप्रतिम !!!

पुष्करिणी's picture

17 Oct 2015 - 5:20 pm | पुष्करिणी

मस्तं मस्तं

नूतन सावंत's picture

17 Oct 2015 - 7:56 pm | नूतन सावंत

कशाकशाला नावाजायचं गं,तुझ्या स्मरणशक्तीला,लेखनशैलीला की आई,आजी,मावश्या,यांच्यावरच्या प्रेमाने त्याच्या हाताचे पदार्थ निगुतीने करणाऱ्या तुला?धपाटे,गाकर, रसातला भात, राजगिऱ्याच गाठोडं,गडगीळं,सखुबदा,बदामाचा शिरा इ. इ. खायला पथ्य मोडून यावंसं वाटतंय यातच आलं.

नूतन सावंत's picture

17 Oct 2015 - 7:57 pm | नूतन सावंत

यातच सगळं आलं,असे वाचावे.

सानिकास्वप्निल's picture

17 Oct 2015 - 8:53 pm | सानिकास्वप्निल

हा सर्वात आवडता लेख आहे माझा, सुंदर आठवणींची आणि एकसे एक पदार्थांची गुंफण, सगळे वाचून मलाही माझ्या आजीच्या पाककृती आठवल्या.

आजी माझी अन्नपूर्णाच आणि तिचे नावही तेच, नारळाच्या रसातील अळूवड्या, भाजपिठाचे लाडू, कापण्या, ठेचलेल्या बटाट्याच्या काचर्‍या, वालाचे बिर्डे (हे तर अप्रतिम लागतं), खजुराच्या सांजोर्‍या, लंगडीतला केक, कायलोळ्या, तांदळाच्या पिठाची बोरे, आंबट वरण सगळे पदार्थ म्हणजे अहाहा!! सुख सुखचं ते !!

आईच्या हातचे अनेक पदार्थांची मी चाहती आहे. वालाचे बिर्डे अगदी आजीसारखेच बनते, तिच्या हातचे काकडीचे वडे, पातोळ्या, रवा-नारळाचे पाकातले लाडू, शेवयांची खीर, डाळीची भजी, आप्पे, चिवडे, चटण्या अप्रतिम!! दिवाळीतल्या फराळातील करंजी मी फक्त आणि फक्त माझ्या आईच्या हातचीच खाते इतर कुणाच्याही नाही, नाजूक पदर सुटलेले, भरगच्च सारण भरलेल्या करंज्या आई गं!! कमाल लागतात. मला कधीच नाही जमणार यांच्यासारखे बनवायला, त्या चवीची तोडचं नाही पण मी त्यांच्या पाककृती संग्रहित नक्कीच ठेवणार आहे.

मधुरा देशपांडे's picture

18 Oct 2015 - 2:34 am | मधुरा देशपांडे

अफाट सुंदर लिहितेस गं तु. सहज साधं, प्रफुल्लित प्रसन्न करणारं.
काही पदार्थ ऐकले होते, काही नवीन कळाले, शेपुफळं नक्की करणार, गाकरसाठी विशेष धन्यवाद. नवर्‍याला फार आवडतात, त्याने मागे केलेही होते, पण एवढ्यात झालेले नाहीत, करते आता.

या लेखाला नक्की काय प्रतिसाद द्यावा हे समजत नाहीये.

शेपू घालून केलेल्या चकोल्या नाक मुरडत खातो.
(मुळात शेपू ही भाजी च आवडत नाही. बाकी मेथी पालक माठ पोकळा चाकवत करडई तांदुळजा काहीही खाऊ शकतो)

तुम्ही कागल कोल्हापूरकडच्या का? कारण तिकडे आजोळी दुधातले पिठले व दुधातली चपाती उपासाला केलेली बघितली आहे. बेळगावकडे बिनकांद्याचे पोहे करतात उपासाला.
अगदी लहाणपणीच्या मित्रांना भेटल्यासारखं वाटलं. कारण यातल्या अनेक पदार्थांची चव लहानपणापासून परिचित आहे.
बाकी लेख मस्तच!!!!

त्याला फोडिव झुणका असं काही म्हणतात का? पाक्रू दया कुणीतरी. :)

आता हे सगळं बनव आणि जेवायला बोलाव. त्याशिवाय काय जीव शांत व्हायचा नाही माझा.

एस's picture

19 Oct 2015 - 11:01 pm | एस

वा! मला माझ्या आजीची आठवण आली. तिची स्पेशालिटी म्हणजे 'मासवड्या'. खरोखरच तशा मासवड्या परत कधीच, कुठेच खायला मिळाल्या नाहीत.

स्वाती दिनेश's picture

20 Oct 2015 - 12:02 am | स्वाती दिनेश

फार सुंदर लिहिले आहेस ग!
स्वाती

भारी! बदाम शिर्याची सविस्तर पाक्रू द्याल का? यम्मी दिसतोय. बदाम भिजवून वाटल्यावर त्याची पेस्ट नाही होत का?

पिशी अबोली's picture

20 Oct 2015 - 1:29 pm | पिशी अबोली

अगंगंगंगं.. घरच्या जेवणासारखाच आहे हा लेख.
हे सगळे पदार्थ आम्हा 'आजकालच्या मुलींना' शिकवा की वो अक्काबाई.. एक महिनाभराचा कोर्स करावा म्हणते तुझ्याकडे.

स्मिता श्रीपाद's picture

20 Oct 2015 - 5:56 pm | स्मिता श्रीपाद

किती सुरेख सुरेख लिहिलय्स गं....
टु गुड.....खुप खुप आवडलं...

मांत्रिक's picture

20 Oct 2015 - 7:20 pm | मांत्रिक

बोटव्याची खीर खूप वर्षांपूर्वी खाल्लेली. आई करायची. आता विस्मृतीत गेली थोडीशी. पुन्हा करुन बघणार आता.

अफाट भन्नाट लिहले आहेस मितान ताई. खुप खुप आवडला लेख.
माझ्या आजीच्या अशा काही आठवणी नाहित पण गावला माझी काकी मस्त जेवण बनवायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेलो कि एक पुर्ण दिवस काका आम्हाला शेतावर घेउन जायचा. शेतात जाताना आधी रस्त्यात आंब्याची आणि जांभळाची झाडे लागायची. तेच आंबट-गोड आंबे आणि जांभळे हा आमचा नाश्ता असायचा.
दुपारी जेवणाला चुलत बहिण जेवण बनवुन घेउन यायची. साधी वांगे- बटाट्याची भाजी, भाकरी, मिरचीचा ठेचा आणि बुक्कीने फोडलेला कांदा. स्वर्गसुख असायचे ते जेवण.
गावला तेव्हा कधीकधी सकाळी बहिणीं सोबत नदिवर जायचे. आम्हाला कधी नदिमधे जाऊन दिले नाही पण काठावर बसुन ताईसोबत, आजीच्या लुगड्यामधे आम्ही छोट छोट मासे पकडायचो. घरी आल्यावर लोखंडी तवा गरम करुन त्यात तेल, ठेचलेला लसुण, हळद, लाल तिखट, मिठ आणि ते छोटे पकडलेले मासे परतवायचे. भाकरी सोबत गट्टम करायचे. आहाहाहा काय दिवस होते ते. खुप आठवणी ताज्या झाल्या.
गाकर मी कधी खाल्ले नाही. पण पाकृ वरुन तरी वाटतेय कि मस्त चव लागेल त्याची. नक्की करुन बघणार. बाकी शेपुची मी फॅन आहे सो शेपुफळ हमखास आवडणार.
कॅरॅमल दुध नवर्‍याला करुन देते, मी असे नुसते दुध पिऊ शकत नाही.

विशाखा राऊत's picture

22 Oct 2015 - 2:33 pm | विशाखा राऊत

काय मस्त लेख आहे.. खुपच आवडला. येवु का तुझ्याकडे शिकवणीला :)

कौशिकी०२५'s picture

22 Oct 2015 - 2:50 pm | कौशिकी०२५

बापरे...कित्ती पदार्थ...खुप नविन पदार्थ कळले.
अप्रतिम झालाय लेख.धन्यवाद या लेखासाठी.

अनेक नवीन प्रकार कळले आणि लहानपणीच्या आठवणीत घेऊन गेले नकळत.

बोका-ए-आझम's picture

22 Oct 2015 - 8:13 pm | बोका-ए-आझम

ये आपका गॅस्ट्रोनाॅमिक और इमोसनल अत्याचार कैसे सहन करे? बाकी तो हुरडा प्रकार मस्तच असतो. सुरतमध्ये त्याला पोंक म्हणतात.त्याची चटणी आणि वडेही करतात. लेख सुंदरच!

मितान's picture

24 Oct 2015 - 10:14 am | मितान

आभार मंडळी :)

अप्रतिम लेख , यातले जवळ जवळ सगळेच पदार्थ नविन आहेत माझ्याकरीता
पण तुझी सान्गन्याची इश्टाइल अशी आहे की तु करुन घालतियेस न मी पोट भरुन खातेय असच वाट्ल वाचताना :)

विशाखा पाटील's picture

28 Oct 2015 - 10:55 am | विशाखा पाटील

अहाहा!
पाठीत धपाटेच घालायला हवेत. दशम्या, धपाटे...कशाला नसत्या त्या आठवणी... बाकी पाटवड्या- भाकरी आळशी स्वयंपाक कसा काय गं?

पद्मावति's picture

28 Oct 2015 - 8:16 pm | पद्मावति

अप्रतिम लेख. काय मस्तं मस्तं पदार्थ आणि लेखनशैली तर फारच छान. सर्वांगसुंदर लेख.

जुइ's picture

28 Oct 2015 - 8:34 pm | जुइ

बदाम शिरा, धपाटे, दशम्या अतिशय आवडते पदार्थ आहेत. या लेखात नवीन बरेच प्रकार समजले. लेख खूप छान जमून आला आहे. आवडला!!

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:33 pm | कविता१९७८

वाह , काय काय पदार्थ आहेत एकेक, तोंडाला पाणी सुटले, वेळही काहीतरी खाण्याची आहे गं, मस्तच सर्व पदार्थ

बरेच नवे पदार्थ समजले.मस्त लेखनशैली.

पूर्वाविवेक's picture

2 Jan 2016 - 4:48 pm | पूर्वाविवेक

झकास लिहिलयेस :)