कोकण प्रदेश निसर्गाने समृध्द आहे. प्रत्येक ऋतूत विविध फळे, भाज्या, फुले मुबलक प्रमाणात होतात. परंतु सुरवातीला शिक्षणाच्या अभावामुळे किंवा आहे त्यात समाधान मानण्याच्या वृत्तीमुळे कोकणी माणसाने स्वत:च्या उपजिविकेसाठी निसर्गाचा फार वापर केला नाही. आता मात्र परिस्थिती बदलते आहे. उन्हाळ्यात येणार्या करवंद, जांभुळ, फणस, आंबा, काजू, कोकम यासारख्या विविध फळांपासून अनेक टिकाऊ पदार्थ मोठया प्रमाणावर बनवले जाऊ लागले आहेत. आधीच्या पिढीतील शेतकरी नैसर्गिकपणे उगवणार्या झाडांवरच अवलंबून होता. परंतु आता व्यावसायिकदृष्ट्या या फळ्झाडांची लागवड करून त्यापासून जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी कोकम या फळाची माहिती देताना कोकण कृषी विद्यापिठाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या माहितीचे संकलन केले आहे.
हे कोकमचे झाड.
कोकमाची फुले
लागवडः कोकम फळासाठी उष्ण दमट हवामान व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन लागते. कोकमाची लागवड पावसाच्या सुरवातीला करावी लागते. कोकमामध्ये रोपापसून लागवड केल्यास ५०% नर आणि ५०% मादी झाडे येतात. मादी झाडे जास्त येण्यासाठी त्याची कलमे लावणे आवश्यक आहे. लागवडीमध्ये ९०% मादी झाडे आणि १०% नर झाडे असावीत. कोकण कृषी विद्यापिठाने काही चांगल्या उत्पन्न देणार्या जाती विकसित केल्या आहेत. लागवड केल्यावर पहिली दोन वर्षे उन्हाळा व हिवाळयात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागते.
कोकमची फळे: फोटो आंतरजालावरून साभार
कोकमाच्या फळापासून विविध प्रकारे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते. कोकमाच्या फळाची आतून रचना अशी असते.
लेख लिहायला घेतला तेव्हा सिझन संपल्याने हे फोटो मिळू शकले नाहीत.
फोटो आंतरजालावरून साभार.
कोकम सोलं किंवा आमसुलं: आमसुलांसाठी ताजी, लाल तयार कोकम फळे घ्यावीत. फळांच्या साली आणि आतील गर वेगवेगळे करावे. गराचे वजन करून एक किलो गरासाठी १०० ग्रॅम मीठ घ्यावे. गरात हे मीठ पूर्ण विरघळवून गाळून घ्यावे. सालींचे तुकडे गाळलेल्या रसात रात्रभर बुडवून ठेवतात. सकाळी बाहेर काढून परडीवर निथळत ठेवतात. निथळून आलेला रस झाकून ठेवावा. रस निथळला की साली उन्हात वाळवाव्यात. ही प्रक्रिया सात दिवस केली जाते. यालाच कोकणात फुट देणे असे म्हणतात. सात फुटांची काळीभोर आमसुले कडक उन्हात वाळवून प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये भरली जातात. आमसुलाचे सार, चटणी केली जाते. भाजी आमटीतही त्यांचा वापर केला जातो. आमसुले दोन दोन वर्षे चांगली टिकतात.
कोकम तेलः विविध पदार्थ तयार करण्यासाठी गर वापरून झाल्यावर कोकमच्या बिया स्वच्छ केल्या जातात. कडक उन्हात वाळवल्या जातात. वाळवल्यानंतर त्यावरचे जाड आवरण काढून टाकतात. त्यानंतर या बिया दळणीयंत्रातून बारीक करून आणतात. उकळत्या पाण्यात टाकून थोडा वेळ उकळवतात. पाणी चांगले उकळून गार झाले की तेल वर येऊन घट्ट होते. यातेलाचे गोळे बनवतात, वाळवतात. कोकम तेल सौंदर्य प्रसाधने, औषधे, साबण यासाठी वापरतात. थंडीत पायाला भेगा पडणे, ओठ फुटणे यावर कोकम तेल रामबाण उपाय आहे. कोकम तेल खाण्यासाठीही वापरतात.
कोकम सरबत(अमृत कोकम): कोकम सरबतासाठी तयार टणक कोकम फळे झाडावरून उतरवून काढली जातात. ही फळे स्वच्छ करून त्यातील गर, बिया बाजूला करून सालाचे ४/६ तुकडे केले जातात. एक किलो सालांसाठी दोन किलो साखर आणि ५० ग्रॅम मीठ असे प्रमाण घेतले जाते. सालांमध्ये साखर, मीठ एकत्र करून प्लॅस्टीकच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ८ ते १० दिवस ठेवतात. अधुनमधुन हे मिश्रण हलवावे लागते. पूर्ण साखर विरघळल्यावर तयार झालेले अमृत कोकम प्लॅस्टीकच्या बाटलीत किंवा कॅनमध्ये पॅक केले जाते. सरबत करताना १:५ या प्रमाणात पाणी, थोडी जीरे पावडर आणि लागल्यास मीठ मिसळून ताजे सरबत कोणत्याही मोसमात तयार करता येते. कोकम सरबत पित्तशामक आहे.
कोकम आगळः कोकम आगळ तयार करण्यासाठीही पक्व टणक फळे झाडावरून उतरवून काढली जातात. फळे स्वच्छ धुवून गर, बिया वेगळ्या कराव्या लागतात. सालींचे तुकडे करावेत, साली आणि गर यांचे एकत्रीत वजन करून एक किलोसाठी १५० ते २०० ग्रॅम मीठ घ्यावे. साली आणि गराच्या मिश्रणात मीठ मिसळून चार दिवस झाकून ठेवावे. चार दिवसांनी मिश्रणातील रस गाळून बाटल्यामध्ये भरावा. कोकम आगळची सोलकढी बनवली जाते.
अशा अनेक गोष्टींसाठी उपयोगी असे हे गुणी फळ मोठ्या प्रमाणात लागवड केल्यास नक्कीच फायदेशीर आहे. आपणही आपल्या घरासमोर अशोकाची झाडे लावून शोभा वाढवतो, त्याऐवजी कोकमची झाडे लावल्यास तीही सरळ वाढतात, आकर्षक दिसतात आणि उत्पन्नही देतात, बघा विचार करून!
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 11:15 am | पैसा
पार लहानपणात नेऊन पोचवलंस! झाडावरून रातांबे पाडून खाणे हा आवडता टैमपास असायचा! त्यातून शिल्लक राहिले तर आईला पन्हं करायला मिळायचे!
16 Oct 2015 - 3:51 pm | सानिकास्वप्निल
उत्तम माहिती दिलीस कोकमांबद्दल अनन्न्या !!
फोटो ही सुरेख आहेत. कोकम तेल वापरून किती किती वर्ष झाली काय सांगू, लहानपणी दर हिवाळ्यात आई हे आम्हाला चोपडून शाळेत पाठवत असे, त्याचा सुवास ही वेगळाच.
छान लिहिले आहेस, लेख आवडला :)
16 Oct 2015 - 4:23 pm | विभावरी
फार छान माहिती,
काेकम हे फळ रंगा बराेबर गुणधर्माने पण उत्तम आहे...
16 Oct 2015 - 10:49 pm | इडली डोसा
लेख छान आहे. आवडला.
16 Oct 2015 - 11:33 pm | रेवती
माहितीपूर्ण लेखन. कोकमाची फुले सुंदर दिसतायत. कोकम सरबत पाहून लगेच पिण्याची इच्छा होतीये पण माझ्याकडे अमृत कोकम नाहीये आत्ता. घरापुढे कोकमाची झाडे लावण्याची कल्पना आवडली.
17 Oct 2015 - 9:43 am | विशाखा पाटील
छान माहिती. फळ एक, उपयोग अनेक...
17 Oct 2015 - 10:59 am | प्रीत-मोहर
कोकमला इथे भिंड म्हणतात.आणि त्याच्या बियांच्या तेलाला भिंडेल. हे भिंडेल काजुबियांच्या टरफलाच्या तेलासारखच बोटीच्या लाकडाला पावसाळ्यात आधी लावुन ठेवतात. बोटीच लाकूड खराब होउ नये म्हणुन.
17 Oct 2015 - 11:00 am | प्रीत-मोहर
लेख मस्तच हे लिहायचे राहूनच गेले.
17 Oct 2015 - 3:32 pm | अजया
माहितीपूर्ण लेख.मस्तच.
17 Oct 2015 - 4:20 pm | सस्नेह
छान माहिती. कोकमच्या तेलाने लहानपणात नेले...!
17 Oct 2015 - 8:08 pm | इशा१२३
मस्त माहितीपुर्ण लेख.कोकम फूल,फळ ,सरबत ,सोलकढि सगळॅच फोटो सुरेख.
17 Oct 2015 - 9:38 pm | नूतन सावंत
लहानपणच्या सुरेख आठवणीत नेऊन पोचवलंस.माझी आजी सात पुटीची कोकमे बनवायची.त्यासाठी लागणारी कोकमे आणणे हे महत्वाचे काम असे.आम्ही सगळी मामे, मावस,भावंडं गाड्यांसोबत जात असू.किती मज्जा.ते रातांबे फोडून खाणं,आणि दातांवर ते पिवळं किटण चढवणं,हाहाहा.
सुरेख लेख.
17 Oct 2015 - 11:48 pm | भिंगरी
मस्त माहितीपुर्ण लेख अनन्न्या
18 Oct 2015 - 2:38 am | मधुरा देशपांडे
तुझ्यामुळे अशा कित्त्येक नवीन गोष्टी कळताहेत, म्हणजे मी फक्त फायनल प्रोडक्ट पाहिलाय पुर्वी, यातुन सगळी प्रोसेस कळतेय, तिही सोप्या भाषेत आणि फोटोसहित. कोकम सरबत, सोलकढी फार आवडते प्रकार.
18 Oct 2015 - 9:21 am | प्रचेतस
सुरेख लेख.
आंबा घाटातल्या देवराईत भटकताना कोकमाची आंबटचिंबट पक्व फ़ळे भरपूर खाल्ली होती.
18 Oct 2015 - 2:43 pm | के.पी.
आमच्याकडे नेहमी आमच्या घरच्या कोकमांचं आमसुल केलं जातं. तसंच कोकम तेलही विकत आणतो, ते मात्र कधी घरी केलेलं नाही.
पूर्ण लेख वाचताना तोंड आंबट-आंबट झालेलं ;)
18 Oct 2015 - 2:50 pm | प्यारे१
मस्त माहितीपुर्ण लेख
18 Oct 2015 - 4:03 pm | मांत्रिक
कोकम विषयी अगदी नवी माहिती वाचायला मिळाली. पण माझ्या मते कोकम आगळ जर एखाद्या कोकणातील ओळखीच्या व्यक्तीकडून घरचं मिळालं तरच एकदम चांगलं दाटसर मिळतं. बाहेर बाजारात मिळणारं आगळ मला तर दोन तीन वेळच्या अनुभवानं इतकं खास वाटलं नाही. बाकी सोलकढी अतिशय आवडीची. नॉनव्हेज जेवण केलं तर हमखास केली जातेच.
19 Oct 2015 - 11:51 am | गिरकी
आईग्ग … आता परत असं शुध्द कोकम हवं झालंय … अलिकडे विकतच्या आगळ चे सरबत पिउन कोकम नकोसं झालेलं … आता शुध्द कोकमाची वाट पाहत बसायला लागणार !
19 Oct 2015 - 12:47 pm | पदम
कोकमाबद्दल एवढि माहिती प्रथमच वाचायला मिळालि.
19 Oct 2015 - 10:47 pm | एस
वा, मस्त लेख. बालपणीच्या काही आठवणी जाग्या झाल्या. :-)
20 Oct 2015 - 7:18 am | बिन्नी
नवी माहितीमिळ्म्ली .
20 Oct 2015 - 1:19 pm | पिशी अबोली
रातांब्याची कोवळी पालवी खायला फार आवडते.. लहानपणीची आठवण झाली. :)
छान माहिती, छान लेख.
21 Oct 2015 - 12:57 pm | भुमी
फोटोज सुंदर!!
21 Oct 2015 - 3:45 pm | Mrunalini
छान झालाय लेख. कोकम सरबत माझे फेवरेट आहे.
लहानपणी आई रोज रात्री झोपताना हे कोकमचे तेल चेहर्याला लावायला सांगायची. तेव्हा वैताग यायचा पण आता तेच खुप miss करतेय.
त्या कोकम सरबताच्या फोटोमधली सोनचाफ्याची फुले बघुन मन प्रसन्न झाले. खुप खुप खुप खुप आवडतात मला ही फुले. फक्त फोटो बघुन दिल खुश हो जाता है.
21 Oct 2015 - 8:25 pm | स्वाती दिनेश
अगदी कोकणात नेलेस ह्या लेखाने.. वाडीतली नारळीपोफळीबरोबरची रातांब्याची झाडं नजरेसमोर आली.
माहितीपूर्ण!
स्वाती
22 Oct 2015 - 2:04 pm | कौशिकी०२५
उपयुक्त लेख...आवडला. फोटो मस्त आहेत.
24 Oct 2015 - 10:13 am | मितान
तुझ्यामुळे खूप नवं नवं कळतंय! या सगळ्यामागे असलेला जिव्हाळा जाणवतो लेखनातून :)
(तू दिलेली अप्रतिम अमसुले संपली गं! आता कधी भेटशील;)
25 Oct 2015 - 3:27 am | विशाखा राऊत
कोकम सरबत, सोलकढी म्हणजे जीव आहे ताई. लेख मस्तच. आवडेश
25 Oct 2015 - 12:07 pm | आरोही
अतिशय माहितीपूर्ण लेख आवडला !
26 Oct 2015 - 2:40 am | जुइ
कोकमाचे झाड आणि फुले प्रथमच पाहिली. तसेच कोकमापासून तयार करण्यात येत असलेल्या पदार्थही खास आहेत. कोकम सरबत आवडते.
26 Oct 2015 - 5:02 pm | अनन्न्या
लेखाला मनापासून दाद दिल्याबद्दल.
@मितान, भेटूया लवकरच कोकणच्या वेगळ्या नविन भेटीसह!
29 Oct 2015 - 5:34 pm | कविता१९७८
मस्त माहीती गं, आमसुलांचा वापर जास्त होतोय आजकाल जेवणात.
29 Oct 2015 - 5:34 pm | कविता१९७८
तु पुणे कट्ट्याला दिलेले कोकम ही मस्तच होते.
30 Oct 2015 - 7:10 am | Maharani
+१
छान माहिती एकदम..
6 Dec 2015 - 12:52 am | हेम
प्रितमोहोर.. भिंड नव्हे भिरंड म्हणतात बियांना. तेलाला भिरंडेल (भिरंड्+ऑईल)= भिरंडेल.. आणि त्या बिया वाळवतांना राख लावून वाळवतात.
लेखात रातांबा शब्द येयास हवा होता.
कोकम सरबत गुळ घालूनही छान लागते