ओ कॅनडा

स्रुजा's picture
स्रुजा in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:18 pm

रुची विशेषांकाची घोषणा करणारा पहिला धागा आला आणि मी उत्साहाने कॅनडा बद्दल लिहायचं ठरवलं. लिहायला बसले आणि लक्षात आलं की हे "खायचं" काम नाही. मग खोदकाम करत गेले तसं हा आवाक्याबाहेरचा विषय निदान नजरेच्या टप्प्यात तरी आला. "शनिवार रविवार घरी जेवलं की फाऊल" ही पुण्याची खोड इथे आल्यावर पण कायम होतीच, ती बर्‍यापैकी कामाला आली. पण गेल्या ३ वर्षातली नुसती निरिक्षणं उपयोगाची नव्हती. कार्यकारण भाव शोधायला हवा होता. तो शोधायला गेले तर एक इतिहासाचा पट उलगडत गेला. मुळात रुढार्थाने कॅनडाचं कुणीच नाही, फर्स्ट नेशन्स शिवाय. सगळे आले ते बाहेरुनच. साहजिकच त्यांच्या डायनिंग-टेबलवर वाढले गेलेले पदार्थ पण पूर्वाश्रमींची अंगभूत छाप मिरवणारे. एखादी स्त्री कशी माहेरचे दागिने मिरवते, "आमच्याकडे असं नसतं बाई" असं म्हणते, तसंच. पण, हळुहळू बाहेरुन आलेले लोकं इथलेच झाले, त्यांनी कॅनडाला आपलं म्हणलं आणि कॅनडाने पण त्यांना सामावून घेतलं. इतर कुठल्याही जागेप्रमाणे याही जागेचं हवामान, लेकुरवाळी जमिन आणि इतर खास घटकांनी त्यांच्या स्वयंपाकघरात जागा मिळवलीच आणि कॅनडाची खाद्य संस्कृती स्वतःची स्वतंत्र ओळख मिरवायला लागली. इथे आलेले लोकं, त्यांची मूळ ओळख, त्यांचे खास पदार्थ आणि चवी-ढवी, त्यावर चढलेला कॅनडाचा स्वतःचा साज याबद्दल लिहिल्याशिवाय त्यांची सांस्कृतिक ओळख अपूर्ण राहणार.

कॅनडामध्ये सर्वप्रथम १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंच आले आणि पाठोपाठ ब्रिटिश. त्या आधी म्हणजे जवळपास १०००० वर्षं, कॅनडामध्ये अब ओरिजिनल्स शिवाय दुसरं कुणीही नव्हतं. ५०००० वर्षांपुर्वी इथे अस्तित्वात असलेल्या विस्कॉन्सिन ग्लेशिएशन कालखंडातली तगून राहिलेली शेवटची मानवी वसाहत म्हणजे हे अब ओरिजिनल्स. हे अतिशीत तापमान साधारण १०००० वर्षांपूर्वी मानवी वसाहतीस पुन्हा धार्जिणं झालं आणि कॅनडामध्ये वसाहत वाढू लागली. उपलब्ध रीसोर्सेस चा अत्यंत कार्यक्षम वापर करुन घेणे हे या लोकांचं ठळक वैशिष्ट्य. मुख्यत: शिकारी असलेली ही जमात. पण यांच्यातल्याच काही लोकांनी बदलत्या हवामानाचा वापर करुन अधिकाधिक घटक आपल्या खाण्यात आणायला सुरुवात केली आणि जन्म झाला सुप्रसिद्ध मेपल सिरपचा. मेपल सिरपचा शोध इथे आलेल्या वसाहतकारांनी लावला की अब ओरिजिनल्स नी यात मतांतरं आहेत. मात्र बराच मोठा प्रवाह अब ओरिजिनल्सच्या बाजूने मत देतो. अब ओरिजिनल्स मेपलच्या झाडावर ईंग्रजी व्ही अक्षरासारखा एक छेद देऊन त्याचा रस गोळा करायचे. त्या काळी योग्य साधनांअभावी घट्टपणा येण्यासाठी या रसाला बर्फामध्ये ठेवलं जायचं. वसाहतकार आले तशी ही प्रक्रिया सुधारत गेली आणि आजच्या स्वरुपात दिसणारं मेपल सिरप हळुहळु आकार घेत गेलं. मेपल सिरपच्या जन्मदाखल्यावर पालकांचे नाव कोणतेही असो, जगाला ही भेट कॅनडाने दिली हे निश्चित. आज ही मेपल सिरप च्या एकूण उत्पादनाच्या ८०% उत्पादन कॅनडा मध्ये होतं आणि सर्वात जास्त निर्यात देखील इथूनच होते.

मेपल सिरप आणि अनुषंगाने येणारे गोड पदार्थ काळाच्या ओघात सर्वाधिक पसंती मिळवणारे पदार्थ ठरले. सहसा, गोड पदार्थ जेवणात सगळ्यात शेवटी वाढले जातात पण कॅनडाचा गोडघाशा स्वभाव बघता त्यांना आधी मान द्यायला हरकत नाही. फ्रेंच आणि ब्रिटिश ज्या काळी इथे जहाजं भरभरुन येत होते त्या काळी म्हणजे १७ व्या शतकाच्या सुरुवातीला समजलं गेलेलं मानाचं डीझर्ट म्हणजे बटर टार्ट. आधी येऊन प्रस्थापित झालेले त्यांचे मूळ देश बांधव आपल्या लोकांचं शाही स्वागत करायचे, त्या मेजवानीचं प्रमुख आकर्षण असायचा बटर टार्ट. कॅनेडियन मांसाहाराच्या बरोबरीने बटर टार्ट असा हा त्यांचा "पुरणा - वरणाचा" स्वैपाक असणार त्या काळात. बटर टार्ट ची प्रेरणा आणि श्रेय दोन्ही ब्रिटिश कॅनेडियन्स कडे जातं. शॉर्ट ब्रेड, अंडी, साखर आणि सिरप चा एक चविष्ट संगम!

vutter tart

कॅनडाने शोधून काढलेले काही खास गोड पदार्थ आहेत. बीव्हर टेल्स , नानैमो बार्स, बटर टार्ट्स, फिगी डफ, सॅस्कॅचुन बेरी पाय हे खास कॅनडा मध्ये जन्माला आलेले आणि आज जगभरात प्रसिद्ध असलेले काही सेलेब्रिटी पदार्थ.

बीव्हर टेल्स चा जन्म ओंटारिओचा. १९७० च्या दशकात एका दांपत्याने त्यांच्या कुटुंबात परंपरेने चालत आलेल्या एका पाककृतीला व्यावसायिक स्वरुप द्यायचं ठरवलं. पहिला स्टॉल त्यांनी आटोवाच्या मध्यवर्ती ठिकाणी, बायवर्ड मार्केटमध्ये उभारला. गव्हाच्या पेस्ट्री वर कॅनेडियन्सच्या मिठास बोलीसारखी पेरलेली साखर आणि दालचिनीचा कळेल न कळेल असा मंद भास हे या पेस्ट्रीचं मूळ स्वरुप. ती गरम गरम खाण्यात जास्त लज्जत आहे. या पेस्ट्रीने थोडक्या काळात राज्यामध्ये आणि नंतर देशामध्ये पण लोकाश्रय मिळवला. तिला स्टार स्टॅटस मिळाला तो मात्र बराक ओबामांच्या कॅनडा भेटीत. २००९ सालची कॅनडा भेट ही बराक ओबामांनी प्रेसिडेंट म्हणून केलेला पहिला आंतरराष्ट्रीय दौरा. अनेक दृष्टींनी ती गाजली आणि त्यात बीव्हर टेल्सचा सिंहाचा वाटा होता. कॅनडाचं पार्लमेंट बायवर्ड मार्केटला लागून आहे. आटोवाच्या पर्यटनामधला केंद्रस्थान समजला गेलेला हा भाग. साहजिकच, ओबामा भेटीमध्ये तो अंतर्भूत होता. परतीच्या वाटेवर, विमानतळाला जाताना ओबामांनी गाडी बीव्हरटेल समोर थांबवली आणि एक पेस्ट्री विकत घेतली. भारावून गेलेल्या मालकांनी आता ओबामा टेल्स नावाची एक पेस्ट्री मेनु मध्ये अ‍ॅड केली आहे. हाच तो सुप्रसिद्ध क्षणः

obama visit

इथेच असलेल्या एका बेकरी मध्ये ओबामा कूकीज पण आहेत. आटोवा मधली ही सर्वोत्तम बेकरी. या बेकरीमध्ये ओबामांनी येऊन कूकीज घेतल्या होत्या, त्या या कुकीज :)

cookies

बाकी कॅनेडियन गोड पदार्थांची ही झलकः

नानैमो बारः

nanaim bars

सॅस्कॅचुन बेरी पायः

berry

फिगी डफ:

figgy duf

कॅनेडियन्स चं डोनट प्रेम पण मालिका सिनेमांमधून विनोद म्हणुन बिंबवलं जातंच, ते खरंही आहेच :)

अर्थात हे कुझिन गोडाबरोबर तिखट पदार्थांना सुद्धा तितकंच महत्त्वाचं स्थान देतं. कॅनडाचं मुख्य उत्पादन म्हणजे गहु, सफरचंदं, बटाटा आणि बीफ. अटलांटीक आणि पॅसिफिक किनार्‍यांवर कॉड, सॅमन, लॉबस्टर यासारखे मासे आणि समुद्री प्राणी प्रामुख्याने आढळतात. हे म्हणजे आपल्यासारखं देशावर आणि कोकणात कसं वैविध्य आहे, त्याच्या जवळ जाणारा प्रकार. अटलांटीक किनार्‍यावरचा कॅनडा जितका नितांत सुंदर आहे तितकंच तिकडचं सी फूड प्रसिद्ध आहे. हॅलिफॅक्स राज्यात लॉबस्टर खाण्यासाठी खवय्ये आवर्जून हजेरी लावतात. "फिश आणि ब्रेविस" हे कॅनडाच्या अती पूर्वेकडील अटलांटिक किनार्‍यावरील न्युफाऊंडलँड राज्यात जन्माला आलेलं प्रमुख खाद्य. इथे मुबलक उपलब्ध असलेला कॉड मासा खारवुन, ब्रेड आणि खारवलेल्या पोर्क बरोबर शिजवतात. या राज्यातली ही पारंपारिक पाककृती. इटली आणि पोर्तुगालमध्ये पण कॉडची विशेष मागणी आहे आणि त्यासाठी लागणारा कॉडचा पुरवठा हा उत्तर अटलांटिक किनारपट्टीवरच्या या कॅनेडियन राज्यातून होतो.

फिश आणि ब्रेविसः

fish and brewis

चित्रात सुरेख दिसतंय पण सोडियमचं आणि कॅलरीजचं प्रमाण यात प्रचंड आहे. एकूणच कॅनेडियन्स भरपूर कॅलरीज खातात. त्यांच्या अतिशीत वातावरणात ते जरुरी पण आहे. आता कॅलरीचा विषय निघालाच आहे तर पुटिन बद्दल सांगायलाच हवं. अमेरिकन हॅम्बर्गरचा उगम जसा अज्ञात आहे तसं पुटिनचं मूळ आणि कूळ पण अजुन वादप्रवण आहे. पण पुटिनचा जन्म ग्रामीण कुबेक मध्ये झाला हे नक्की. डेअरी फार्मिंग हा इथला मुख्य धंदा. १९५७ मध्ये फ्रेंच फ्राईज वर चीज कर्ड घालुन एक दुकानदार विकत होता, ती पुटिनची जगाला पहिली ओळख. कुणीतरी त्यावर बीफ ग्रेव्ही घातली आणि गोठवणार्‍या थंडीमध्ये गरमागरम फ्रेंच फ्राईज, त्यावर वाफाळणारी ग्रेव्ही आणि चीज कर्ड हा पदार्थ प्रचंड भाव खाऊन गेला. कुबेक हे कॅनडाचं फ्रेंच राज्य. इथेच फ्रेंच वसाहत देखील होती. अजूनही या राज्यात मुख्य आणि बर्‍याच अंशी एकमेव भाषा बोलली जाते ती म्हणजे फ्रेंच. पारंपारिक आणि काहीसे पुराणमतवादी, फुटीरवादी मतप्रवाह असलेलं हे राज्य. अजूनही ते फ्रांसशी इमान राखुन आहेत. थोडक्यात सांगायचं तर हा यांचा खलिस्तानवादी गट. अर्थात यांना वेगळं काढून पंक्तिप्रपंच करणे योग्य नाही. ब्रिटिश वसाहती जिथे होत्या तिथे कॅनडात आजही राजघराण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथे तुम्ही घर विकत घेतल्यावर राणीच्या जमिनीवर लीजनी राहताय अशा आशयाचं करारपत्र तयार होतं. ते बाकीचं राजकारण काहीही असलं तरी दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनामध्ये कॅनडाला स्वयंपूर्ण करण्यात यांचा मोठा वाटा आहे. त्याच डेअरी प्रेमाने पुटिन जन्माला घातलं आणि आज ते देशभर अत्यंत लोकप्रिय आहे. आज ती ग्रेव्ही शाकाहारी, व्हीगन अशा विविध पर्यायांत उपलब्ध आहे. कॅनडामध्ये यायचं असेल तर सहल पुटिन खाल्यशिवाय अपूर्ण राहते. कस्टममध्ये विसा आहे का या प्रश्नाआधी तुम्ही आमचं पुटिन खाणार का हे विचारतात अशी दंतकथा आहे, खरं खोटं ती राणी जाणे ;) पुटिनचा हा फोटो:

poutine

कॅनेडियन पुटिन इतकंच कॅनेडियन बेकन पण अत्यंत नावाजलेलं आहे. याचं खरं नाव पीमील बेकन. डुक्कराच्या पाठीपासून बनवलेलं हे बोनलेस बेकन. यावर मक्याचं पीठ लावतात. जगभरात हे कॅनॅडियन बेकन याच नावाने ओळखलं जातं. याच नावाचा एक सिनेमा पण ९५ मध्ये येऊन गेला. अमेरिका-कॅनडा च्या नात्यावर एक सटायर. अर्थातच अमेरिकेत बनल्याने कॅनेडियन्सना तो फार आवडत नाही ;) बेकन हे इथे फक्त नाश्त्यालाच नाही तर इतर जेवणांच्या वेळेस पण सढळ हाताने वापरतात. कॅनडाच्या कॅलरीप्रेमाचं हे अजून एक उदाहरण. डुक्कराचं मांस म्हणून आपण नाक मुरडू पण कुठल्याही कॅनेडियन विमानतळावर सकाळी उतरा अथवा सकाळी सकाळी हाटेलात जा, तेच नाक या बेकनच्या वासाने खुश होईल. शाकाहारी माणसं सुद्धा बेकनमुळे चळतात इतका त्याचा महिमा.

बेकनः

becon

बेकनसारखंच फिडलहेड ही पण इथली एक वैशिष्ट्यपूर्ण आवड. पूर्व ओंटारिओ मध्ये जंगलात उगवणार्‍या या फर्न जातीच्या वनस्पतीला इथे ऑलिव्ह ऑईल आणि बटरमध्ये हलकंसं परततात. रोजच्या जेवणात पण याला विशेष पसंती दिली जाते. सीझन संपल्यावर इथल्या सगळ्या सुपरस्टोअर्स मध्ये ही फ्रोझन सेक्शन मध्ये सर्रास दिसते. या भाजीचं बाह्यरुप बघून अजून तरी खाण्याचा धीर झालेला नाही :)

fiddle head

या व्यतिरिक्त माँट्रीअल स्मोक्ड मीट, बेगल्स, अब ओरिजिनल्स चा एक ब्रेड आणि क्रीम चीज या फ्रेंच कॅनेडियन्सच्या काही खास पाककृती आहेत.

कॅनेडियन खाद्यसवयींबद्दल बोलायचं असेल तर कॉकटेल्सना आणि वाईनला वगळुन चालणार नाही. इथलं सगळ्यात लोकप्रिय आणि अमेरिकन ब्लडी मेरीच्या जवळ जाणारं कॉकटेल आहे सीझर. आता हे मराठीत लिहिते आहे म्हणून ठीक आहे पण कॅनडाला मात्र ज्यात त्यात अमेरिकेशी तुलना केलेली चालत नाही. ब्लडी मेरीचं नाव काढलं की हमखास तुम्हाला "don't get confused, ours is much better" असं ठसक्यात (म्हणजे त्यांना जितकं ठसक्यात सांगता येतं तितक्या) सांगितलं जातं. अमेरिकन मेडियामध्ये एखाद्या कॅनेडियन पात्राच्या तोंडी हे वाक्य प्लीझ ने सुरु होतं, तुम्हाला खोडून काढलं म्हणुन नंतर सॉरी ने संपतं ;) पण ते महत्त्वाचं नाहीये, महत्त्वाचं आहे सीझर! व्होडका, क्लॅमॅटो ज्युस आणि वोर्सेस्टरशायर सॉसने बनलेलं हे सीझर खरंच ब्लडी मेरी सारखं नुसतं दिसतं, चवीला ते थोडं वेगळं आहे आणि कॅनडा सोडून इतर कुठे क्वचितच पाहायला मिळतं.

ceaser

आईसवाईन ही देखील इथली एक खासियत. नायाग्रा अणि आजुबाजुच्या परिसरांमध्ये बर्फात गोठवलेल्या द्राक्षांपासून ही वाईन बनवतात. इतर द्राक्षांपेक्षा ही द्राक्षं महिनाभर जास्तच झाडावर राहतात. बर्फामुळे त्यातली साखर ही जास्त मुरते आणि तयार होणारी वाईन स्वर्गीय चवीची असते. बर्फामुळे या पिकाचं नुकसान देखील खूप होतं त्यामुळे ही वाईन इतर वाईनपेक्षा दणदणीत महाग असते. मात्र चव एकदम पैसा वसूल. गोडसर चवीमुळे ही डीझर्ट वाईन म्हणुन मुख्यतः वापरली जाते.

कॅनडाच्या ड्रिंक्स बद्दल खरं तर लिहायला एक वेगळा लेख हवा. पण विस्तारभयामुळे आता इथे हा विषय आवरता घेते. तरी देखील करिबु, शूटर एह!, व्हाईट आईस कॉस्मो, मेपल लिफ कॉकटेल यांचा उल्लेख जाता जाता करतेच. ही सर्व कॉकटेल्स इथलीच, इथल्या लोकांची अत्यंत लाडकी !

कॅनडाची लोकसंख्या सुरु झाली ब्रिटिश आणि फ्रेंच वसाहतींनी मात्र जगभरातून लोकं इथे स्थलांतरीत होत राहिले आणि त्यांच्या सहवासाने कॅनेडियन कुझिन समृद्ध होत गेलं. निव्वळ आकारमानात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या या अतिप्रचंड देशात नैसर्गिक साधनसंपत्तीची रेलचेल आहे. मानवी वसाहत मात्र त्या मानाने कमी कारण टोकाचं थंड तापमान. मात्र हा देश आज जगातल्या सगळ्यात स्थिर अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. काहीशी समाजवादी अंगाने जाणारी त्यांची अर्थव्यवस्था स्थलांतरीत (इमिग्रंट्स) लोकांवर मोठ्या प्रमाणार अवलंबून आहे, किंवा होती म्हणू आपण. गेल्या ३-४ वर्षांत इथे व्हिसा प्रक्रियेत खूप स्थित्यंतरं येत आहेत. तरी देखील आज ही हा ओघ कायम आहे आणि पूर्वीही तो तितकाच होता. आशियाई, पूर्व युरोप आणि मध्यपूर्वेकडचे लोकं इथे सगळ्यात जास्त बघायला मिळतील. त्यांच्या महत्त्वाच्या पाककृतींना पण कॅनडामध्ये फार आवडीने आणि हौशेने सामावलं गेलं. मुळातच कॅनेडियन्स तसे गोडबोले, नम्र, प्रचंड मेहनती. (एवढं हाय कॅलरी खाऊन पण क्वचितच कुणी जाडा मनुष्य दिसेल, म्हणजे युएस मधल्यासारखा जाडा) आणि खर्‍या अर्थाने सर्वसामावेशक आहेत. तुम्ही भारतीय वंशाचे आहात हे कळलं तर येऊन नमस्ते करुन जातात, बटर चिकन बद्दल दोन बरे शब्द सांगुन जातात आणि हे सहज येताजाता दिसणारं दृष्य. तर अशा लोकांनी हसतमुखाने, भरभरुन बाकी पदार्थाचं स्वागत केलं नसतं तरच नवल! भारतीय जेवण इथे अतिशय कुतुहलाचा विषय आहे. आजपर्यंत पाहिलेल्या सगळ्या कुझिन्समध्ये भारतीय इथे महाग आहे आणि तरी देखील सतत गर्दीने फुलून गेलेली हॉटेल्स पण भारतीयच आहेत. त्यांच्या चवीला मानवतील असे अनेक शाकाहारी- मांसाहारी भारतीय पदार्थ (बटर चिकन, चिकन टिका, सामोसा इ.) यांचा इथे खूप खप आहे. इतकंच काय आजकाल चाट, दाक्षिणात्य पदार्थ ही खूप भाव खाऊन जात आहेत. मध्य पूर्वेचा शवर्मा पण इथे आवडीने खाल्ला जातो. सगळीकडे दिसणारी हसतमुख, तुरुतुरु चालणारी आणि समोरच्याशी जमेल तसा संवाद साधणारी चायनिज मंडळी पण आपापले फ्राईड राईस, स्प्रिंग रोल्स घेऊन जागोजागी हॉटेल्स इथे काढतात आणि अर्थातच ती चालतात.

आज दिसणारं कॅनेडियन कुझिन हे या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिपाक आहे. प्रत्येक हॉकी सीझनला, एक जुलैला, थँक्सगिव्हिंगला, नाताळात देशाच्या कानाकोपर्‍यात हे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. सुट्यांवरुन कामाला परत आल्यावर "हॉलिडे फूड" बद्दल गप्पा रंगतात. फार वर्षांनी भेटलेल्या एखाद्या चुलत-मावस भावंडांबरोबर एखाद्या कौटुंबिक रेसिपीबद्दल ते नॉस्टेल्जिक होतात. कुठे एकमेकांच्या बटर-चिकन, मेपल सिरप बद्दल बोलता बोलता नवी नाती तयार होतात. जगात कुठेही गेलं तरी माणूस सारखा हे बघायचं असेल तर वैविध्यात दडलेला हा समान धागा बघावा. कुठे भारतासाऱख्या अत्यंत सुपीक प्रदेशामध्ये अन्नपूर्णेचं संपन्न रुपडं आहे, कुठे कॅनडासारखा कठोर हवामानावर जिद्दीने मात करत मानवाने या अन्नपूर्णेला नांदवलं आहे. हे पूर्णब्रह्म कुठल्याही संस्कृतीमध्ये फक्त उदरभरण नाही, अनेक पिढ्यांच्या नसानसात खेळणारा तो जीवनरस आहे. अनेक प्रवाह येऊन मिळतात आणि मूळ प्रवाहाचं रुप उत्तरोत्तर खुलत जातं. सगळ्यांना एका रेशीमबंधनात अलगद जोडणारी खाद्यसंस्कृती जागोजागच्या मानवसमूहाची एक ओळ्ख बनत जाते, कॅनडा ही त्याला अपवाद नाहीच!

**** सर्व फोटो आंतरजालावरुन साभार *****

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 10:22 am | प्रीत-मोहर

कॅनडाच्या खाद्यसंस्कृतीची सफर आवडलीच, ड्रिंक्स वर अजुन लिहिल अस्त तर आवडलच असत. हरकत नाही. आता लवकरात लवकर कॅनॅडियन ड्रिंक्स वर लेख लिहिणे. सीझर चा फटु अत्यंत आवडलेला आहे.

मस्त लिहिलंय सृजा .शेवटचा परिच्छेद तर एकदम खासच .

स्वप्नांची राणी's picture

16 Oct 2015 - 12:03 pm | स्वप्नांची राणी

केनेडियन लोक इतके गोड कसे काय , याचं गुपित हा लेख वाचून उमगलं!!

त्या पुतीन ची चव भीत भीत घेतली होती. तीच ग ती , अंडच असेल का याची सनातन भीती!!! पोरगं मात्र बेकनचं दिवानं झालय!!

खूप मज़्ज़ा आली हा लेख वाचून..!!

वेल्लाभट's picture

16 Oct 2015 - 1:14 pm | वेल्लाभट

लेख अजून वाचला नाहीये...

पण फोटो..

ल--- व्ह--- ली !

हाहा's picture

16 Oct 2015 - 3:20 pm | हाहा

धावता आढावा छान घेतलाय

अनोखी खाद्यसंस्कृती. फारच वेगळे पदार्थ आणि मस्त फोटो. आवडले !

लेख खुपच छान झालाय..छान आढावा घेतलायस केनेडियन खाद्यसंस्कृतीचा.

उमा @ मिपा's picture

16 Oct 2015 - 6:58 pm | उमा @ मिपा

सुरेख वर्णन! फोटो मस्त. खूप माहिती मिळाली यातून.

पैसा's picture

16 Oct 2015 - 7:38 pm | पैसा

खासच लिहिलंस! फोटोही सुंदर! अजून लिही नेहमी.

मधुरा देशपांडे's picture

16 Oct 2015 - 8:00 pm | मधुरा देशपांडे

सुंदर लिहिलं आहेस. शेवटचा परिच्छेद तर अप्रतिम.

क्या बात है! लेखाची सुरुवात झोकात झाली व सांगता हुरहुर लावून गेली. लेखात आलेले टोमणे कळले आहेत.
तुमच्या देशात लगेच कळून येणारा फरक हा फूडचा आहे. चवीतील चांगला बदल पटकन समजतो. लोक खरच कुटुंबवत्सल वाटले. उगीच कुत्सितपणे, दुस्वासाने बोलत नाहीत हे जाणवते. जाडपणाबद्दल निरिक्षण योग्य आहे व ते कुटुंबपद्धतीमधील फरकामुळेही आहे. तुम्ही जितके प्रेमाने, नातेवाईकांसोबत, मित्रमंडळींबरोबर रहाल तितके तब्येतीने चांगले रहता. या लोकांचे तसेच काहीसे वाटले. सुट्टीचा आनंद घेताना बरीच जनता ही आजी आजोबा, मुले, नातवंडे यांच्या समवेत फिरताना पाहण्यात आले. एका आजोबांनी त्यांच्या नातीसाठी उपहारगृहातील मोकळी खुर्ची घेऊ का? हे इतक्या अदबीनें विचारलं की मी कितीही प्रेमानं बोलले तरी ते दुखावतील की काय असं वागणं होतं. मी पुन्हा येणार स्रुजा! आपलं पुटीन खायचं राहिलं त्यादिवशी पण पास्ता, सूप व चॉकलेटचा हेवी डोस पोटात गेल्यावर आणखी काही खाण्याची शक्यता नव्हती.

कॅनडीयन खाद्यसंस्र्कुतीची छान ओळख, सर्व पदार्थ तों.पा.सु.

पद्मावति's picture

16 Oct 2015 - 9:39 pm | पद्मावति

सृुजा अप्रतिम लिहिलं आहेस. कॅनडाच्या खाद्यसंस्कृतीविषयी इतकी सुंदर आणि विस्तृत माहिती आधी मी कधीही वाचली नव्हती. कित्येक पदार्थ तर पहिल्यांदाच ऐकतेय. सर्वांगसुंदर लेख. लेखन शैली, वर्णन, फोटो सगळंच टॉप नॉच. आता केनेडियन ड्रिंक्सवर सुद्धा लेख येऊ दे.

इडली डोसा's picture

16 Oct 2015 - 10:41 pm | इडली डोसा

मस्तच झालाये लेख. आता फक्त खाण्यासाठी एक कॅनडा ट्रीप करायला लागणार. तिथे आल्यावर यातलं काय काय खायला घालणार स्रुजा?

सानिकास्वप्निल's picture

17 Oct 2015 - 3:46 am | सानिकास्वप्निल

कॅनेडियन खाद्यसंस्कृतीबद्दल टू बी ऑनेस्ट मी पहिल्यांदाच वाचतेय, याआधी फारसे वाचण्यात आले नव्हते.
अप्रतिम झालाय हा लेख, हॅट्स ऑफ!!
इतके नव-नवीन पदार्थ समजले, याआधी काही पदार्थांची नावेदेखील माहित नव्हती. उत्तम माहितीपूर्ण लेख आहे हा स्रुज, अगदी तपशीलवार लिहिले आहेस, फोटो टेम्प्टिंग आहेत.

नानैमो बार, ब्रेव्हिस, फिगी डफ, पुटिन हे सगळे कधीतरी नक्की नक्की चाखणार आहे मी.
शेवटचा परिछेद तर क्या कहने!! कॅनेडियन पदार्थांची रेलेचेल खूप आवडली :)

धन्यवाद

चतुरंग's picture

17 Oct 2015 - 6:48 am | चतुरंग

खाद्यसंस्कृतीबद्दल लिहिणं तसं अवघड असतं तेही एखाद्या परक्या देशाच्या तर अधिकच. असं असूनही कॅनडाच्या खाद्य संस्कृतीबद्दल इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि तरीही अजिबात रुक्ष न होऊ देता लेख लिहिला आहे त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
आमच्या कॅनडा भेटीत पुटिन खायचं राहून गेलं त्याची चुटपुट आता जास्त वाढली पण पुढल्या भेटीत त्याची भरपाई केली जाईल! :) या लेखात चॉकलेट फाँड्यू दिसतोय का म्हणून मी शोधत होतो पण नाही दिसला, पण हा माझा गोडघाश्या स्वभावाचा छिद्रान्वेषीपणा झाला त्यने लेखाला काही कमीपणा येत नाही.
अत्यंत ओघवत्या, रंजक आणि माहितीपूर्ण लेखाबद्दल आणि सुंदर फोटोंबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद! :)

-फाँड्यूरंग

नूतन सावंत's picture

17 Oct 2015 - 1:54 pm | नूतन सावंत

वा सृजा,सहीच.प्रिमोसारखंच मत आहे ड्रिंक्सबाबत.सविस्तर लेख येऊदे आता.अगदी अभ्यासपूर्ण लेख.फोटो पाहून ऊत्कंठा वाढली आहे.द८

नूतन सावंत's picture

17 Oct 2015 - 1:54 pm | नूतन सावंत

वा सृजा,सहीच.प्रिमोसारखंच मत आहे ड्रिंक्सबाबत.सविस्तर लेख येऊदे आता.अगदी अभ्यासपूर्ण लेख.फोटो पाहून ऊत्कंठा वाढली आहे.द८

उत्तम ,महिती नानैमो बार फार आवडले.

कॅनडा खाद्यसंस्कृतीबद्दल एवढि माहिती प्रथमच वाचली.
पुरक साजेसे फोटो आणि तुझ्या लेखनशैलीमुळे लेख खास झालाय.

अनाहिता भारी लिहितात. मस्त सुरुवात, छान विस्तार आणि रुखरुख लावणारा शेवट.

त्रिवेणी's picture

17 Oct 2015 - 6:42 pm | त्रिवेणी

कधी येवु ग तुझ्याकड़े. आणि मस्त लिहिलय.

स्रुजा's picture

20 Oct 2015 - 2:28 am | स्रुजा

त्रि, इडली डोसा कधी ही या, स्वागत च आहे. खवय्येगिरी ने पाहुणचार केला जाईल :)

प्रिमो आणि सुरंगी ताई लिहीन मी ड्रिंक्स वर पण..

सुंदर लेख.शेवट फार आवडला.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2015 - 10:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

अतिशय मस्त लेख!! खुप खुप आवडला, डिस्कवरी चॅनल वर "फ़ूड फॅक्टरी" ह्या कार्यक्रमात कैनेडियन फ़ूड प्रोसेसिंग अन कुजीन ची सुंदर ओळख होत असते त्यात मायमराठीत हा लेख आला अन एक पर्सनल टच जाणवला लेखनात,

पूर्व ओंटारिओ मध्ये जंगलात उगवणार्‍या या फर्न
जातीच्या वनस्पतीला इथे ऑलिव्ह ऑईल आणि बटरमध्ये हलकंसं परततात

फ़र्न थोड़िशी गिळगिळीत लागतात , अर्थात मी खाल्ली होती तेव्हा फ़क्त मीठ घालुन उकडलेली होती (जंगल सर्वाइवल ट्रेनिंग मधे) शिवाय वैरायटी मधे ही अंतर असणार सिक्किम मधे सापडणारे अन कैनेडियन, एकंदरित मजेदार प्रकार होता तो

जंगल सर्व्हाईवल ट्रेनिंग ! क्या बात हे. तुम्ही मजेदार म्हणताय तर मी आता एकदा चव घ्यावी म्हणते.

फूड फॅक्टरीचा हा कार्यक्रम माझ्या नजरेतून सुटला आहे, नक्की बघेन मी. धन्यवाद :)

विशाखा पाटील's picture

18 Oct 2015 - 10:09 am | विशाखा पाटील

वा! अप्रतिम! तुझी चवीने खाण्याची आवड लेखात मस्त उमटलीये. इतिहास, भूगोल आणि खाद्यसंस्कृती यांचा छान मेळ... त्यात नर्मविनोदाचे सिझनिंग...

मांत्रिक's picture

18 Oct 2015 - 3:40 pm | मांत्रिक

मस्त आहे लेख! अतिशय सोप्या भाषेत लिहिलेला!

थोडक्यात खूप चांगली माहिती दिली आहेस. मेपल सिरप ही कॅनडाची भेट आहे हे आता समजले.

गिरकी's picture

19 Oct 2015 - 11:38 am | गिरकी

फार मस्त लिहिलं आहेस :) क्यानडाची खाद्य संस्कृती फॉक्स लाईफ वर पाहिली होती तेव्हाच आवडली होती. तुझ्याकडून अजून मस्त सफर घडली :)

कौशिकी०२५'s picture

19 Oct 2015 - 5:42 pm | कौशिकी०२५

वा..लेख खुपच छान झालाय, शेवटचा परिच्छेद तर फारंच भावला. स्वतःच्या खाद्यसंस्कॄतीबद्दल लिहिलंय असं वाटावं इतक्या प्रेमाने, मनापासुन लिहिलंय..मस्तच..

माणसाला नाती बनवायला, आवश्यक तेवढं एकमेकांना वाटायला, समूह बनवायला नेहमीच आवडतं.
त्यातल्या त्यात नाती बनण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे खाणं नि खिलवणं.

लेख आवडलाच. ___/\___

प्रश्नलंका's picture

19 Oct 2015 - 9:22 pm | प्रश्नलंका

वाह!! काय लिहिलयंस गं. सुरेख निव्वळ अप्रतिम. किती मस्तं लेखन्शैली आहे गं तुझी. सर्व माहिती आवड्ली. फोटो सुद्धा सुरेख आहेत. _/\_

सगळ्यांना मनापासुन धन्यवाद.

स्वरा, हो गं अंड्याची च काय बाकी सगळ्याची भीती बाळगलीस तरी चालेल इकडे आलीस की, सार्थ असते ती. पण तरी खाऊन बघ, बेकन खरंच क्लास लागतं,मी पण मोहाला बळी पडुन चव घेतलीच ;)

रेवाक्का, नक्की ये, मी वाट पाहते आहे आणि या वेळी पुतिन साठी आपण जगभर न फिरता थेट दुकानात जाऊन च खाऊ ;)

फाँड्युरंग , तुमच्यासाठी खास :

a

आपण चौघं भेटायच्या आधी हा लेख पुर्ण करुन दिला होता नाही तर अशी चूक झाली नसती ;)

पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद.

मितान's picture

20 Oct 2015 - 8:38 am | मितान

काय भारी लिहिलंयस !
फोटो झकास !
दणदणीत,क्यालरींनी उतू जाणारा सुपर लेख !

अस्मी's picture

20 Oct 2015 - 10:03 am | अस्मी

स्रुजा खूप छान लिहीलयस.
तुझी लेखनशैली मस्त आहे एकदम, शेवटचा परिच्छेद अगदी सुंदर!!

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2015 - 12:27 pm | पिलीयन रायडर

आधी स्पेन.. मग जर्मनी आणि आता कॅनडा..!

काय लेख लिहीलेत वा!!!

कॅनडा बद्दल फारशी माहिती नव्हती. तुझ्या डेट्टेल्वार लेखाने ती कळाली.
इन्शागणपती.. वापिस कभी हामेरिका आयेंगे तो कॅनडाका व्हिजा जरुर निकालेंगे.. और फॉन्ड्यु खायेंगे!!

वा वा वा,... काय भारी लिहलाय लेख. तोंपासु.
मला हे सगळे खायचे आहे. आता मला कॅनडाला यायला लागेल.

बोका-ए-आझम's picture

22 Oct 2015 - 7:37 pm | बोका-ए-आझम

कॅनेडियन पुटिन्स आणि मेपल सिरप आता भारतातही हळूहळू लोकप्रिय होताहेत. चंदीगडमधली प्रसिद्ध निक्स बेकरी आता अस्सल कॅनेडियन मेपल सिरपवाले पॅनकेक्स आणि वॅफल्स यांच्या मदतीने पराठा-सब्जीशी स्पर्धा करतेय.

स्वाती दिनेश's picture

23 Oct 2015 - 7:17 pm | स्वाती दिनेश

मस्त लेख! खूप छान लिहिले आहेस,
स्वाती

पियुशा's picture

25 Oct 2015 - 10:31 pm | पियुशा

बाई ग काय कठिन नाव , असे विशिष्ठ न चविष्ट पदार्थांची ओळख करुन् दिलीस आता कैनडा ला येउन तुझ्याकडे ४ दिवस राहीन म्हणते ;)

टक्कू's picture

26 Oct 2015 - 12:00 am | टक्कू

थोडक्यात बरीच माहिती. लेख आवडला आणि शेवटचे वाक्य तर जास्तच.