वाचन प्रेरणा दिवस

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
9 Oct 2015 - 10:48 am
गाभा: 

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करावा अशी कल्पना महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मांडली आहे. (बातमी संदर्भ दैनिक लोकसत्ता) तत्त्वतः कल्पना चांगली आहे. अर्थात गणेशोत्सव ते दिवाळीच्या सुट्ट्या याच्या मधला कालखंड शैक्षणिक क्षेत्रात सहामही परिक्षेपुर्वीच्या तयारीच्या झटापटीतला असणार तर खासगी क्षेत्रात कार्यरत लोकांचीही स्थिती दिवाळीपूर्वी कामे निपटण्यावर लक्ष केंद्रीत असणे यावर मात करुन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वाढ दिवस साजरा तर केलाच पाहीजे.

या निमीत्ताने कदाचीत दिवाळीच्या सुट्ट्यात काय वाचन करावे याची चर्चा आणि पुर्व तयारी करता येईल. कौशिक लेले यांनी वेगळ्या धाग्यावर पुस्तक परिक्षणांचा विषय काढलाच आहे. कुणी आपली पुस्तक परिक्षणांचे किमान दोन परिच्छेद मराठी विकिपीडियासाठी प्रताधिकार मुक्त करत असेल तर त्यांनी या धाग्यावर तसे जाहीर करुन दुवे जरुर द्यावेत. उल्लेखनीय पुस्तक परिक्षणांची दखल मराठी विकिपीडियातून घेणे कदाचित अधिक सोपे होऊ शकेल.

वाचन प्रेरणा दिवसाची बातमी वाचून मी महाराष्ट्र सरकारच्या ग्रंथालय संचालनालयची वेबसाईट https://dol.maharashtra.gov.in उघडण्याचा प्रयत्न केला तर This website cannot be browsed in Mozilla Firefox. या संदेशाने नकार दिल्यावर आम्ही विंडोज ब्राऊजरला शरण जाऊन वेबसाईट उघडली. वाचन प्रेरणा दिवसाच्या निमीत्ताने https://dol.maharashtra.gov.in या संस्थळाचे परिक्षण कुणी करु शकेल का ?

बाकी वाचन प्रेरणा दिवस कसा साजरा करता येईल आपल्या काही कल्पना आहेत का ?

चर्चेत सहभागासाठी आभार