मराठी भाषेसंदर्भातल्या तीन यशस्वी उपक्रमांनंतर अजून एक नवीन कल्पना डोक्यात आली आहे. त्याबद्दल आपली मते जाणून घेण्याची इच्छा आहे.
मराठी भाषेत सातत्याने नवनवीन पुस्तके प्रकाशित होत असतात. वर्तमानपत्रांतून त्यावरची परीक्षणे लिहिली जातात. अनेक वाचक त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल फेसबुक वर लिहितात. किंवा "मिसळपाव" सारख्या संकेतस्थळावर त्याबद्दल लेख लिहितात. स्वतःच्या ब्लॉगवर त्याबद्दल लिहितात.
बऱ्याच पुस्तकांची परीक्षणे मुद्रित माध्यमातून डिजिटल माध्यमात येत नाहीत. आणि अनेकदा तर ती मनातल्या मनात (किंवा डोक्यातच) राहतात.
जास्तित जास्त परीक्षणे लिहिली गेली व ही सर्व परीक्षणे एकाच ठिकाणी उपलब्ध असतील तर त्याचा फायदा होईल ना?
मी libraywala.com ही ऑनलाईन लायब्ररी लावली आहे. त्यातून इंग्रजी, मराठी पुस्तके मागवता येतात. इंग्रजी पुस्तकाचे नाव वाचले की ऑनलाईन सर्च करून ते पुस्तक कशाबद्दल आहे, कसं आहे, आवर्जून वाचण्यासारखं आहे का याचा अंदाज येतो. amazon.com वरूनच बऱ्याच वेळा ही माहिती मिळून जाते.
पण मराठीत अश्या परीक्षणांची विशेषतः ऑनलाईन परीक्षणांची कमतरता जाणवते.
अशी वेबसाईट ही पोकळी भरून काढायला मदत करू शकेल. स्वतंत्र वेबसाईटवर लोक जास्त संख्येने परीक्षणे टकतील. इतर वाचक त्यावर टिप्पण्या करू शकतील. वृत्तपत्रांमधली परीक्षणे त्यात टाकता येतील.
मी असे संकेतस्थळ तयार करायच्या तयारीत आहे.
आपल्याला काय वाटते ?
प्रतिक्रिया
8 Oct 2015 - 8:18 pm | पैसा
आमचे (मिपाचे) पुस्तकविश्व आहे पुस्तकांबद्दल सबकुछ असलेले. सध्या काही तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. मात्र नीलकांतला वेळ झाला की नक्कीच पुन्हा सुरु होईल. तिथे बराच डेटा आहे जुना.
8 Oct 2015 - 8:35 pm | कौशिक लेले
ते स्वतंत्र संकेतस्थळ होते की मिपाचाच भाग ?
8 Oct 2015 - 8:50 pm | पैसा
पुस्तकविश्व स्वतंत्र आहे, तिथे आयडी पुन्हा घ्यावा लागतो. त्याची थीम, रचना वगैरे संपूर्ण वेगळी आहे. मात्र पुस्तकाचे मुखपृष्ठ अपलोड करणे, त्या पुस्तकावर चर्चा इ. मिपाप्रमाणे खरडवही, प्रतिक्रिया इ. आहे. शिवाय पुस्तक कोडे इ. काही काही उद्योग सतत सुरू असायचे. मध्यंतरी द्रुपल अपग्रेड करताना आणि सर्व्हर वगैरे बदलताना ते बंद झाले. मात्र डेटा आहे. आणि आज ना उद्या पुन्हा सुरू होईल. त्याचे मालक, व्यवस्थापन मिपाचेच आहे.
तुमच्या उपक्रमाला खूप शुभेच्छा! प्रतिसाद कमी मिळण्याची शक्यता आहे, कारण मराठी पुस्तके वाचून त्याब्द्दल आंतरजालावर लिहिणारे किती लोक राहिलेत माहीत नाही, पण तरी बघू!
9 Oct 2015 - 10:52 am | कौशिक लेले
पुस्तकविश्व पुन्हा सुरू व्हायची शक्यता किती ? कारण तुम्ही वर लिहिलेल्या गोष्टी सध्या तरी पुरेशा वाटतात. पुस्तकविश्व पुन्हा सुरू व्हायला वर्ष-सहा महिने लागणार असेल तरी हरकत नाही. माझा विचार डोक्यातून कागदावर आणि तिथून प्रत्यक्षात यायलाही वेळ जाणारच आहे. उगाच चाकाचा पुन्हा शोध लावण्यात अर्थ नाही.
9 Oct 2015 - 12:16 pm | पैसा
येत्या ६ महिन्यात होईल बहुतेक.
9 Oct 2015 - 2:25 pm | कौशिक लेले
छानच मग !! वाट बघतो. पुस्तकविश्व नव्याने सुरू करण्यात माझा किंवा इतर सदस्यांचा काय हातभार लागू शकतो ? मिपा वर त्याची आधीच एखाद्या ठिकाणी चर्चा झाली असल्यास त्याचा दुवा दिला तरी चालेल.
11 Oct 2015 - 3:06 pm | पैसा
चर्चा अशी लेखात झालेली नाही, पण नीलकांत यांना व्यक्तिगत संदेश पाठवून संपर्क करू शकता.
8 Oct 2015 - 8:19 pm | धर्मराजमुटके
चांगला उपक्रम ! लवकरात लवकर चालू करा.
याची जरा जास्त माहिती देता काय ?
8 Oct 2015 - 8:27 pm | कौशिक लेले
माझे "Marathi Dictionary For Learners" अॅंड्रॉईड अॅप
http://www.misalpav.com/node/30187
"लर्न मराठी फ्रॉम इंग्लीश, हिन्दी ! ऑनलाईन अॅंड फ्री !!" माझा उपक्रम http://www.misalpav.com/node/25737
नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द
http://www.misalpav.com/node/27459
8 Oct 2015 - 8:38 pm | एस
मराठी पुस्तकपरीक्षणांची माहिती आंतरजालावर फारच कमी उपलब्ध आहे. अगदी विकिपीडियावरही इंग्रजी पुस्तकांबद्दलच्या माहितीच्या तुलनेत तशी माहिती मराठी पुस्तके, मराठी साहित्यिक, प्रकाशने वगैरेंबद्दल फारच तोकडी आहे.
तुम्ही जी नवीन साईट सुरू करताय त्यावर किती पुस्तकांची माहिती / परीक्षणे असतील? ती विकिपीडियाप्रमाणे संपादनास मुक्त असतील का याबाबत उत्सुकता आहे. थोडक्यात म्हणजे ही परीक्षणे कोण लिहिणार आहेत.
8 Oct 2015 - 8:44 pm | कौशिक लेले
विकिपिडिया प्रमाणे ते मुक्तस्त्रोत असेल. माझी अशी योजना आहे की
१) एखाद्या पुस्तकाचा परीक्षण नसेल तर वाचकाला नवीन पुस्तक अॅड करता येईल.
२) पुस्तक आधी पासूनच असेल तर आपले परीक्षण टाकता येईल
३) दुसऱ्याच्या परीक्षणावर टिप्पणी करता येईल.
पुस्तकांची संख्या अमर्याद. कारण तुमच्या-आमच्या सारखे वाच जितकी परीक्षणे लिहितील किंवा इतर ठिकाणहून जमा करून त्यात टाकतील, इतरांना उद्युक्त करतील तितके ते संस्थळ अधिक समृद्ध होईल.
8 Oct 2015 - 9:04 pm | प्रसाद गोडबोले
मराठी पुस्तके कोण वाचतो ? फार महाग असतात राव शिवाय नवीन पुस्तके विकत घेवुन वाचायचे डेरींग होत नाही .
सध्या मराठीत अप्रतिम कादंबरी लिहिणारा लेखक कोण असा प्रश्न विचारला तर आमच्या डोक्यात हे भल्ले मोठ्ठे प्रश्न चिन्ह उभे ठाकते !
मराठी पुस्तकांचे इ व्हर्जन मोफत किंव्वा अत्यंत स्वस्तात देता येईल असे काही अॅप डिझाईन करा :)
8 Oct 2015 - 10:16 pm | आदूबाळ
नेमू आजोबा!
9 Oct 2015 - 10:55 am | कौशिक लेले
"ई-व्हर्जन मोफत किंव्वा अत्यंत स्वस्तात" देण्याचा उपक्रम चांगला आहे.
पण त्यात बऱ्याच आर्थिक , कायदेशीर आणि ई-सुरक्षा संबंधित बाबी निगडित आहेत. उदा. लेखकाचे मानधन, प्रकाशकाचे मानधन, स्वामित्त्व हक्क, फुकट ई-आवृत्ती मिळवणे इ. मी त्यातला तज्ञ नाही. आणि त्यावर काम करायला सध्या इतका वेळ नाही. त्यामुळे माझ्याकडून तरी तो उपक्रम सुरू व्हायची शक्यता दिसत नाही.
8 Oct 2015 - 9:25 pm | आदूबाळ
हेतू स्तुत्य आहे, पण "और एक" संस्थळ करण्यापेक्षा गुडरीड्स सारख्या संस्थळाचा एपीआय वापरून ते मराठी पुस्तकांसाठी वापरता येईल असं वाटतं.
9 Oct 2015 - 11:01 am | कौशिक लेले
तोच विचार माझ्याही डोक्यात चालू आहे.
सध्याच्या संस्थळांपेक्षा माझ्या संस्थळात काही नवीन असेल का ? असेल तर काय ?
आणि सध्याच्या संस्थळांना जर फार प्रतिसाद मिळत नसेल तर माझ्या उपक्रमाला तरी का मिळेल? आणि मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल ई.
या सर्व गोष्टींची चर्चा व्हावी आणि त्यातून वाट स्पष्ट व्हावी म्हणूनच हा लेखप्रपंच.
त्यामुळे जितके मुद्दे, जितक्या बाजू , जितक्या सूचना लक्षात येतील तितक्या इथे टाकाव्यात ही विनंती.
9 Oct 2015 - 12:09 pm | मित्रहो
वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे नवीन पुस्तके आणि नवीन लेखक हीच खरी समस्या आहे. चांगली पुस्तके आलीच नाहीत. फक्त अनुवादाच्या भरवशावर मराठी प्रकाशकांचे चाललेय की अशी शंका येते हल्ली.
कदाचित कुठल्याही भाषेतील पुस्तकाचे मराठी परीक्षण चालू शकेल.
एकाच विषयाला वाहलेली मु्क्तपीठे इंग्रजी व्यतिरीक्त इतर भाषेत यशस्वी झाल्याची उदाहरणे नाहीत पण ते होनारच नाही असे नाही. मुळात मराठी वाचक कमी, त्यात इंटरनेटवर वाचनारा कमी, त्यात पुस्तकाचे परीक्षण वाचनारा किती. या सर्व बाबींचा विचार करावा.