(काही दिवसापूर्वी नसीरुद्दिन शाहच्या आत्मचरित्रावर इथे लिहिलं होतं. त्याला बरेच प्रोत्साहनपर प्रतिसाद मिळाले. त्यामुळे आणखी एक पुस्तक-परिचय लिहिण्याचे धारिष्ट्य करीत आहे. हेही पुस्तक सिनेमाबद्दल आहे, हा केवळ योगायोग.)
सत्तरदशकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या आम्हाला सिनेमा या पदार्थाची लज्जत हळूहळू समजायला लागली, तेव्हा अमिताभ बच्चन त्रिखंड व्यापून राहिल्यागत होता. इतर अभिनेते खिजगणतीत नव्हते. प्राथमिक शाळासोबत्यांमध्ये पंखे फक्त आणि फक्त अमिताभ बच्चनचे असत. मोजके काही चाहते बलदंड धर्मेंद्रचे किंवा नृत्यनिपुण जितेंद्र-मिथुनचे. राजेश खन्ना हा सामान्यतः विनोदाचा विषय मानला जाई. त्याचे दिवस फार अगोदरच फिरलेले होते.
मुळात मुंबईपासून कोसों दूर अशा कोकणातल्या लहान गावांत मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंबातील मुलांना सिनेमा पाहायला मिळणे हे विरळ (टीव्हीचा शोध वैज्ञानिकांनाच लागलेला नसावा बहुतेक! आम्हाला तर नव्हताच नव्हता). सिनेमे मुंबईत रिलीज झाल्याच्या किमान आठदहा महिन्यांनंतर गावांत पोहचत. तोवर दूध-पाणी वेगळं झालेलं असे. कोणता सिनेमा पहायचा, ही निवड आईबाबांच्या हातात. अशात खन्नाच्या सिनेमांचा नंबर लागणं दुष्प्राप्य होतं. आम्हां पोरांनाही राजेश खन्नाला पहायची फार हौस नव्हती. सुरुवातीच्या सहासात शालेय वर्षांत खन्नाचा 'थोडी सी बेवफाई' हा एकमेव सिनेमा आईबाबांनी थेटरात नेऊन दाखवल्याचं आठवतं. त्यात अजिबात मारामारी नसल्यामुळे तीन तासानी बाहेर पडताना घोर निराशेने तोंड वाकडं झालं होतं एवढंच लक्षात आहे. कारण शाळेत सिनेमाची ष्टोरी हाणामारीसकट सांगून भाव खायचा स्कोप उरला नव्हता.
हळूहळू वय वाढू लागलं, तशी अधूनमधून एकट्याने जाऊन सिनेमा पहायची परवानगी घरातून मिळू लागली. (बरेचसे सिनेमे खरोखरच एकट्याने पाहिले हे खेदजनक सत्य नमूद करणे आवश्यक!). तोपर्यंत थेटरांच्या जोडीने व्हिडिओ सेंटरं सुरू झालेली होती. पण त्याही वेळी कधी खन्नाचा सिनेमा जाऊन पाहिल्याचे आठवत नाही. अमिताभ सिनेमात यायच्या आधी खन्ना 'नंबर वन' होता हे फिल्मी मासिकांत कुठेकुठे लिहिलेले असायचे. त्यापलीकडे कधी शालेय वयात त्याची दखल घेतली नाही. सिनेमाची भक्कम भुरळ पडलेली असली तरी आम्हा पोरांच्या दृष्टीने खन्नाचा यू. एस. पी. काहीच नव्हता.
पुढे अमिताभलाही मागे सोडून, आधी अनिल कपूर, गोविंदा, सनी देओल, मग खानत्रय, राहुल रॉय (होय!), अक्षयकुमार, देवगन असा मानसिक प्रवास करत यथावकाश हिंदी सिनेमा नामक मायावी इंद्रजालातून बाहेरही पडलो.
अशा प्रकारे, राजेश खन्ना या नावाशी भावनिक बंध कधीच निर्माण झाले नसले, तरी त्याला एकेकाळी डोळे दिपून जावेत अशी लोकप्रियता मिळालेली होती हे माहीत होतं. मुली त्याला रक्ताने पत्रं लिहीत, त्याच्या फोटोशी लग्न करीत वगैरे सांगोवांगीच्या कथा ऐकल्या होत्या. पुढे टीव्हीवर पाहिलेले त्याचे 'आराधना', 'आनंद' वगैरे काही जुने चित्रपट आवडलेही होते. त्यामुळे हे नक्की काय रसायन होतं, हे कुतूहल मनात राहून गेलं. २०१२मध्ये त्याचा मृत्यू झाला तेव्हा अंत्ययात्रेला दुतर्फा उसळलेली तोबा गर्दी पाहून, आपण सपशेल दुर्लक्ष करण्याइतका हा कलाकार मामुली नव्हता हे समजून चुकलं.
पत्रकार गौतम चिंतामणी यांनी लिहिलेलं 'The Loneliness of Rajesh Khanna- The Dark Star' हे पुस्तक हातात घेतलं ते मोठ्या उत्सुकतेनेच. सांगण्यास आनंद होतो की एका अस्सल चाहत्याने विषयाशी समरस होऊन अभ्यासपूर्वक लिहिलेलं हे पुस्तक फारच वाचनीय झालेलं आहे.
वास्तविक चिंतामणी यांना खन्ना किंवा त्याचे कुटुंबीय यांच्यापैकी कुणाशीही बोलता आलं नाही. त्यामुळे पुस्तक एकांगी किंवा अपुरे ठरण्याचा मोठा धोका होता. पण तसं होत नाही. १९६६ ('आखरी खत') ते २०१२ ('वफा') या खन्नाच्या प्रदीर्घ कारकीर्दीचं ते वर्षवार आणि चित्रपटवार सखोल मूल्यमापन करतात. खन्नाच्या विस्मरणात गेलेल्या अनेक चित्रपटांबद्दल विस्ताराने लिहितात. तो तो काळ संदर्भासह दाखवतात. हे सर्व करताना एक माणूस म्हणून खन्नाचं शक्य तितकं परिपूर्ण चित्रही उभं करतात.
राजेश खन्नाचं नाव इतिहासात नोंदलं गेलं आहे ते १९६८-७० या इनमिन तीन वर्षातल्या त्याच्या अशक्य अशा यशामुळे. (सुरुवात झाली अर्थातच 'आराधना'पासून). पुढेही त्याने सुपरहिट चित्रपट दिले, नाही असं नाही. पण ती तीन वर्षं फिरून पुन्हा आली नाहीत. साध्या रेल्वे कंत्राटदाराचा हा मुलगा कुणाच्या -त्याच्याही- ध्यानीमनी नसताना लोकप्रियतेच्या, डोळे फिरावेत इतक्या प्रचंड उंचीवर जाऊन पोचला. त्याच्या नावावर थेटरबाहेर तुडुंब गर्दी उसळू लागली. निर्माते वाटेल ती किंमत मोजायला तयार होऊ लागले. मुलींचे थवे त्याच्या मोटारीला वेढे घालत. देशभरातून ढिगांनी प्रेमपत्रे येत. त्याचं ओझरतं दर्शन घडावं याकरिता लोक तासनतास तिष्ठत असत.
असा दैवी, अकल्पित चमत्कार आयुष्यात घडल्यावर, खन्ना पुन्हा सामान्य माणूस होऊच शकला नाही. वैभवाचे दिवस सरले तरी तो मनाने तिथंच राहिला. चित्रपट उद्योग बदलला. प्रेक्षक बदलले. अमिताभ बच्चन नावाच्या नव्या वादळाने जुने हिशेब उधळून टाकले. खन्ना मात्र अखेरपर्यंत पुनरागमनाचे प्रयत्न करत राहिला.
अभिनेता म्हणून तो फार उच्च दर्जाचा होता असं मला कधीही वाटलेलं नाही. पण चिंतामणींच्या पुस्तकात, या कलावंताने जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या वेगवेगळ्या भूमिका, चित्रपटांतून केलेले प्रयोग यांचे तपशील वाचताना मी अचंबित झालो. व्यावसायिक चित्रपट तेव्हा संपूर्ण त्याज्य मानत होता असे अनेक विषय आणि मुद्दे खन्नाच्या चित्रपटांतून वारंवार येतात. हे चित्रपट यशस्वी झाले नसतील. पण म्हणून त्यांचं महत्व कमी होत नाही. आता त्याबद्दल वाचताना या माणसाची दुर्दम्य आशा आणि स्वप्ने पाहण्याची ताकद हीच लक्षात राहतात.
चिंतामणींची भाषा सोपी आणि सौम्य आहे. टीका करतानाही ते अनुचित शब्द वापरत नाहीत. खन्नाच्या जीवनात विशेष स्थान असलेल्या शक्ती सामंता, आनंद बक्षी, राहुलदेव बर्मन, जॉनी बक्षी, डिंपल कपाडिया, अंजू महेंद्रू, हृषिकेश मुखर्जी, किशोरकुमार या निकटवर्तीयांनाही ते पुरेशी जागा देतात.
विस्मृतीत गेलेले अनेक लहान लहान किस्से आणि घटना पुस्तकात जागोजागी भेटतात. त्यापैकी काही इथे देण्याचा मोह आवरत नाही:
- राजेश खन्ना ज्या नवोदित अभिनयस्पर्धेच्या पुरुष गटात विजेता ठरला, त्यात पहिली आली होती फरीदा जलाल. द्वितीय स्थानी होते विनोद मेहरा आणि लीना चंदावरकर.
- 'सत्यम शिवम सुंदरम'चा नायक म्हणून खन्नाला घेण्याचा राज कपूरने निर्णय घेतला होता. पण कपूर कुटुंबीयांनी हट्ट धरल्यामुळे तिथे शशी कपूरची वर्णी लागली.
- दिग्दर्शक मोहनकुमार यांच्या 'अवतार'साठी अमिताभने आधीच होकार दिलेला होता. पण कुमार यांच्या मनात त्या भूमिकेत खन्नाच दिसत होता. अखेर त्यांनी अंतर्मनाचा आवाज ऐकला.
पुस्तक संपल्यावर एक प्रश्न रेंगाळत राहतो (ते खरंतर लेखकाचं यशच आहे) तो म्हणजे, हा अवलिया नक्की होता कोण? अफाट पैसे, अफाट प्रसिद्धी, प्रेक्षकांचं असीम प्रेम हे सर्व लाभूनही तो काहीसा निःसंगच राहिला. सुपरस्टार काका आतून कसा होता हे अखेरपर्यंत कुणालाच ठामपणे सांगता आलं नाही. कुणी त्याला दिलदार म्हणतं, कुणी उद्धट, कुणी हेकेखोर, कुणी साधाभोळा, कुणी संशयी. पण हे सर्व काही एकच माणूस एका वेळीही असू शकतो..
All said and done, Khanna was a good man.
खन्नाची समकालीन शर्मिला टागोर हिने लिहिलेल्या छोटेखानी पण नेमक्या प्रस्तावनेने पुस्तकाच्या मूल्यात भर पडते.
खन्नाच्या चाहत्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं हे सांगायची गरज नाही. पण त्याला कधीही गंभीरपणे न घेतलेल्या माझ्यासारख्यांनी तर ते मुळीच चुकवू नये. टीव्हीवर खन्नाचा चित्रपट चालू असेल तर मी आता रिमोटचं बटन दाबणार नाही हे पक्कं.
प्रतिक्रिया
21 Sep 2015 - 2:17 am | पद्मावति
उत्तम जमलाय लेख .
तुम्ही या पुस्तकाची एका वाचकाच्या नजरेतून खूप ओळख करून दिलित. खूप छान लिहिलंय.
बाकि एक अवांतर निरीक्षण ..
....पुढे राजेश खन्ना कुठल्या कुठे उंचीवर पोहोचला आणि फरिदा जलाल मात्र सहाय्याक भूमिकांमधेच अडकून राहिली. पण योगायोग असा की तिची बहुतेक एकमेव नायिकेची भूमिका मात्र राजेश खन्नाबरोबरच होती पुढे आराधानामधे.
21 Sep 2015 - 7:33 am | फारएन्ड
आवडली ओळख. पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. वाचणार नक्कीच.
थोडे तपशीलाच्या अचूकपणाबद्दल - राजेश खन्नाचा काळ हा १९६९ ते १९७२ पर्यंत असावा. कारण आराधना १९६९ चा.
राजेश खन्नावर बॉम्बे सुपरस्टार नावाने यू ट्यूब वर एक व्हिडीओ उपलब्ध आहे. जरूर पाहा
https://www.youtube.com/watch?v=fWmucHoZN3U
30 Sep 2015 - 11:17 pm | चलत मुसाफिर
चू. भू. द्या. घ्या. :-)
21 Sep 2015 - 5:55 pm | बोका-ए-आझम
चमुभाऊ, तुमचा लेख एकदम छान आहे. राजेश खन्नाच्या यशात अार.डी.,लक्ष्मी-प्यारे, कल्याणजी-आनंदजी हे संगीतकार आणि किशोरकुमार आणि थोड्याफार प्रमाणात रफी यांचा खूप मोठा हातभार होता. त्याचबरोबर त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेश्या भूमिका त्याला देणाऱ्या शक्ती सामंता यांच्यासारख्या निर्माता-दिग्दर्शकांचाही त्यात वाटा होता. पण सलीम-जावेद सारखे समर्थ लेखक आणि लोकांची नस पकडणारे अँग्री यंग मॅन टाईप विषय त्याला झेपले नाहीत. धर्मेंद्र, जीतेंद्र यांची कधीच सुपरस्टार म्हणावं अशी लोकप्रियता नव्हती त्यामुळे अमिताभच्या तुफानासमोर नमतं घेत ते टिकून राहिले. पण खन्नाचं तसं झालं नाही. तो आपण सुपरस्टार आहोत या गुर्मीत राहिला. शिवाय त्याला हे यश त्याच्या तिसऱ्या-चौथ्या चित्रपटांते मिळालं - आराधना आणि दो रास्ते. अमिताभने ओळीने बारा फ्लाॅप्स दिले मग जंजीर आला. तरी खन्ना रोमँटिक हीरो म्हणून अमिताभच्या हिंसक इमेजला पर्याय बनू शकला असता, पण त्याला लेखक-दिग्दर्शकांची साथ लाभली नाही.
30 Sep 2015 - 11:16 pm | चलत मुसाफिर
खन्नाने आयुष्यभर स्वतःला नंबर वन स्टार मानले आणि अमिताभला टोमणे मारले
21 Sep 2015 - 6:20 pm | रेवती
राजेश खन्नाचा एखाद दुसराच चित्रपट पाहिलाय त्यामुळे फारसे काही माहित नाही. पुस्तकाची ओळख चांगली करून दिलीये.
21 Sep 2015 - 8:20 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
उत्तम जमलाय रे लेख.जेवढे पूर्वी वाचले होते त्या आठवणीप्रमाणे राजेश खन्ना हा श्रीमंत घराण्यातला होता.
शूटिंगसाठी तो स्वतःच्या वडलांची मर्सेडिझ गाडी घेऊन येत असे वाचल्याचे आठ्वते.असो.
मिजास्,लोकांना ताटकळत ठेवणे ह्या काही सवयीने तो मागे पडला.अभिनयात तो काही खास नसला तरी चेहर्यावरचा त्याचा भावूकपणा प्रेक्षकांना जिंकून घ्यायचा.अगदी अभिनयसम्राट दिलीपकुमारलाही तसे जमायचे नाही.चांगले दिग्दर्शक्,संगीतकार त्याला लाभले हे त्याचे भाग्य.
30 Sep 2015 - 11:29 pm | चलत मुसाफिर
धन्यवाद
21 Sep 2015 - 9:08 pm | निनाद मुक्काम प...
बॉलीवूड वर खुपदा आसपास घडणाऱ्या सामाजिक राजकीय परिस्थितीचा पगडा असतो त्यानेच सिनेमांचे ट्रेंड येतात.
१९७१ नंतर अमेरिका भारतावर विशेतः इंदिरा सरकार वर नाराज झाली भारतच्या आर्थिक मुसक्या बांधल्या गेल्या पुढे इंदिराचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्याच्या आता तिने चालू केलेली आणीबाणी ह्या सर्व काळात ७१ ते ८० चा काळातील बेरोजगारी, तरुणाच्या मनातील असंतोष सलीम जावेद ने लेखणीतून उतरवला, त्याला न्याय देण्यासाठी अमिताभ ची निवड केली , सलीम ह्यांनी अमिताभ ची अनेक ठिकाणी रदबदली केली. , त्याचवेळी यशात बेफाम झालेला कौटुंबिक पातळीवर अस्वस्थ झालेला राजेश व्यसनात खुश मस्कर्या मित्रांमध्ये मग्न होता तर अमिताभ तरुणांच्या असंतोषाचे प्रतिक बनला ,
सलीम जावेद नसते तर अमिताभ अपयशी नट म्हणून राहिला असता
सलीम जावेद नंतर अमिताभ चे पुनरागमन झालेले आज का अर्जुन ते गंगा जमुना सरस्वती पहिले तर तो उत्कृष्ट दिग्दर्शकाच्या हाताखाली वावरणारा नट वाटतो
.राजेश वर शिरीष कणेकर ह्यांनी खूपवेळा लिहिले आहे
गिरगावकर राजेश शिरीष ह्यांच्य्शी आवर्जून मराठीतून बोलायचा
राजेश चे पुनरागम त्यामानाने बर्यापैकी यशस्वी झाले होते टीना मुनीम बरोबर सुत व कामाची भट्टी जमली होती
सौतन सारखे अनेक हिट त्याने दिले.
अमिताभ ला सोलो हिट यासाठी असामान्य प्रतिभेचा दिग्दर्शक किंवा त्या प्रतीची कथेवर अवलंबून राहावे लागले
आजचा सलमान स्वताच्या जीवावर सिनेमे यशस्वी करतो
राजेश च्या संपूर्ण कारीर्दीत देवी चौबळ व पुढे शोभा ने तृतीय पानाची रुपेरी परंपरा बॉलीवूड मध्ये सुरु केली.
त्यांनी कारकीर्द राजेश ला शिव्या देत त्यास प्रसिद्धी देत सुद्धा प्रसिद्ध होत गेल्या.
पुढे आर्थिक उदारीकारानासोबत जागतिकीकरणाचे युग सुरु झाले दिलवाले दुल्हनिया ..... ने परत पूर्वीचे प्रणय बॉलीवूड रुपेरी पडद्यावर आणला
अमिताभ ची कारकीद असंतोष बेरोजगारी अश्या घटकांवर पोसल्या गेली त्याचकाळात संगीताचा गळा घोटाण्याची प्रकिया सुरु झाली
आजही कोणत्याही क्षणी किशोर चे राजेश वर चित्रित झालेले गाणे ऐकले की मन भरून येते
मानवी आयुष्याच्या आनंद प्रेम दुख्ख वेदना आशय अनेक भावनांचे चित्रण शब्दातून संगीतातून व्यक्त होते राजेश इतकेच त्याचे चाहते व हिंदी संगीत ऐकणारे भाग्यवान आहेत.
म्हणूनच ती गाणी पर्यायाने किशोर काका आर डी
अजरामर चिरतरुण वाटतात
अमिताभ साठी सुद्धा किशोर ने गाणी म्हणाली
पण ती सहजरीत्या तोंडात येत नाहीत
आजही इंडियन सुपरस्टार हे बिरुद ज्याच्यासाठी खास बनवले गेले तो लोकांच्या मनी राहतो.
शोभा म्हणते राजेश च्या तो झंझावाती काळ आजच्या पिढीला कळणार नाही एवढा थरारक रोमांचक होता
देव राज दिलीप अश्या त्रयींच्या वाट्याला एकत्र जेवढे चाहत्यांचे वेडे कट्टर प्रेम लाभले नाही ते काका ला लाभले
विशेतः महिलांचे
आमचे बाबा माझ्या लहानपणी सांगायचे की शेजारच्या चाळीतील मिनू
लग्न करेल तर राजेश शी असे घरी सांगून त्याच्या फोटोशी लग्न करून चेष्टेचा विषय झाली पण ते तिच्या गावी नव्हते.
मला असे काही घडले असेल व जर ते घडले तर असे घडूच कसे शकते असा प्रश्न तेव्हा हि पडायचा व आजही पडतो
22 Sep 2015 - 5:15 am | अभिदेश
त्याने राजेश खन्नाला संपवले म्हणून का?? उलट राजेश खन्नाचे चित्रपट हे केवळ चान्गल्या सन्गितामुळे चालले. अमिताभने अनेक टुकार चित्रपट केवळ त्याच्या एकत्याच्या जिवावर चालवले. उदा. मि. नटवरलाल , शराबि ...आणि अनेक.
22 Sep 2015 - 8:52 am | फारएन्ड
राजेश बद्दलची मते बरोबर आहेत. पण अमिताभचे 'युग' ज्यांनी पाहिले आहे त्यांना या वरच्या वर्णनातील चूक सहज दिसेल. पिक्चर मधे पन्नास हीरो असले तरी पब्लिक अमिताभलाच बघायला जमायचे. अमिताभ पब्लिक शी कसा कनेक्ट करत असे ते अमर अकबर अँथनीमधे सहज दिसेल.
१९७५-८२ मधला अमिताभ व आत्ताचे हे हीरो यांच्यात बराच फरक आहे. या हीरोंची चित्रपट निवड ही नक्कीच अमिताभच्या १९८२ नंतरच्या सिलेक्शन पेक्षा चांगली आहे. पण यांना मार्केटिंगची प्रचंड मदत होते. अमिताभच्या काळात मीडिया व त्याचे वितुष्ट होते, त्याच्यावर मीडिया ने बहिष्कार टाकला होता. कोणत्याही मासिकात त्याचे फोटो, मुलाखत येत नसे, टीव्हीवर तो दिसत नसे. पब्लिक ला तो फक्त त्याच्या पिक्चर्स मधून भेटत असे - ते ही चित्रपट लागल्यावर. आधी होणार्या मार्केटिंग चा फायदा इतरांना आजकाल मिळतो तो तेव्हा नव्हता. १९७९ च्या स्टारडस्ट मासिकावर विजयेन्द्र घाटगे व इतर दोन जणांचे 'नवीन सुपरस्टार' म्हणून प्रमोशन चालले होते तेव्हा अमिताभचे ८-१० पिक्चर्स एका वेळेस जोरात चालत होते.
अमिताभ हा डायरेक्टर्स अॅक्टर आहे हे अगदी खरे आहे. पण स्वतःच्या जीवावर पिच्कर चालवणे ही टर्मच अमिताभपासून आली.
22 Sep 2015 - 9:53 am | नाखु
अगदी नेमेके.
मी दोन्हींचा पंखा तरी दोघांचेही अलिकडचे सिनेमे पहाताना त्यांचा "उत्तम" सिनेमांशी तुलना होऊन खंत जरूर वाटत असे.
काही सिनेमी त्यांच्या साठीच आले इतके त्यांना (राजेश -अमिताभसाठी) चपखल बसले होते.
अमिताभ :डॉन्,जंजीर्,काला पथ्थर,मि.नटवरलाल्,त्रिशूल्,शराबी,दीवार आणि शक्ती
राजेशः हाथी मेरे साथी,अपना देश, दी ट्रेन्,आपकी कसम,दो रास्ते आणि सच्चा झुटा
दोघे एकत्र : आनंद पेक्षाही मला नमक हराम मध्ये जास्त तुल्यबळ+परस्पर पूरक मुकाबला वाटला.
30 Sep 2015 - 11:34 pm | चलत मुसाफिर
"राजेशचा तो झंझावाती काळ आजच्या पिढीला कळणार नाही एवढा थरारक रोमांचक होता"
नक्कीच असणार.
मला हॉवेल पंख्यांची ती जाहिरात फार आवडली. "मेरे फँन्स मुझसे कोई छीन नही सकता" वाली. खन्नाचा तो पडद्यावरचा अखेरचा प्रवेश होता.
21 Sep 2015 - 11:43 pm | दिवाकर कुलकर्णी
सुंदर भाषा! शिरीष कणोकराच्या एका पुस्तकाला राजेश खन्नाने प्रस्तावना लिहिली आहे,खूपसचांगली जमली आहे,
गुड्डी सिनेमात जया भादुरी धर्मेंद्रवर जीव टाकत असते उत्पल दत्त त्याला हे सागतात ,त्यावेली धर्मेद्र म्हणतो, इस बारेमे मैने
राजेष खन्नाका नाम सुना है
22 Sep 2015 - 5:55 am | चित्रगुप्त
लेख आवडला.
राजेश खन्ना याचा एकही चित्रपट बघितलेला नाही, अधून मधून टीव्हीवर एकादा सुरु असला, तरी तो बघण्याची इच्छा झाली नाही. परंतु मला The Loneliness of Rajesh Khanna या शीर्षकाबद्दल, म्हणजे रा.ख.च्या एकटेपणाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. या पुस्तकात या विषयी काय लिहिले आहे, ते जाणून घ्यायला आवडेल.
22 Sep 2015 - 10:38 am | मुक्त विहारि
१. इत्तेफाक (https://www.youtube.com/watch?v=9vjiQcJUjc4)
२. खामोशी (https://www.youtube.com/watch?v=KWCzjoKGgbw)
३. बावर्ची (https://www.youtube.com/watch?v=tGIzjOoAeZc)
22 Sep 2015 - 6:26 pm | राही
देवयानी चौबळने काकाबद्दल जितकं लिहिलं तितकं दुसर्या कुणीच लिहिलं नसेल. तिला काकाविषयीच्या सगळ्या बातम्या असायच्या. जणू तिचाच सोल राइट होता काकावर. ह्या मोनॉपलीमुळे तिला काहीच्या काही भाव मिळाला. तिच्या कॉलमसाठी लोक मॅगझीन विकत घेत. त्याचं लग्नसुद्ध लोकांनी जणू आपल्याच घरातलं लग्न असं भरभरून एन्जॉय केलं. त्याची गाडी रथयात्रेसारखी चाहात्यांनी जुहूचा संपूर्ण रस्ता हातांनी ढकलली. अख्खा जुहू-विले पारले परिसर वरातीत सामील झाला होता. अशी उत्स्फूर्तता कोणत्याही वरातीत दिसली नसेल. डिंपल आणि त्याच्या वयात कितीतरी अंतर. शिवाय डिंपलच्या पूर्वेतिहासाविषयी प्रचंड गॉसिप. पण चाहात्यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. जणू त्यांच्या देवाला हे सर्व लागू होत नव्हतंच.
डार्क तारा म्हणण्याऐवजी धूमकेतू हा शब्द कदाचित अधिक समर्पक ठरला असता.
22 Sep 2015 - 7:03 pm | पद्मावति
बरोबर आहे, राही.
देवयानी चौबळ, येस. राजेश खन्ना आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गॉसिप कॉलम ला कमालीचं ग्लॅमर मिळवून देण्यात यांचा खूप मोठा हातभार होता. त्यांच्या लेखणीबरोबरच त्यांची बिनधास्त अॅटिट्यूड, बोलणं, दिसणं या सर्वच गोष्टी चर्चेचा विषय असायच्या.
शेवटी मला वाटतं त्यांना परॅलिसिस झाला होता नं? त्यांचं काही आत्मचरित्र किंवा त्यांच्यावर कोणी काही पुस्तक लिहिलंय का?
22 Sep 2015 - 10:13 pm | अविनाशकुलकर्णी
देवीन पत्रकारितेचे धडे आचार्य अत्रे यांच्या कडे गिरवले होते..शिरिष पै व देविची खास मैत्री होति..एका दिपावली अंकात ताईनी "देवी" नावाचा तिच्या जिवनावर व आठवणी वर एक लेख लिहिला होता..
23 Sep 2015 - 4:03 am | निनाद मुक्काम प...
देवयानी चौबळ ह्या सुधीर गाडगीळ ह्यांच्या परिचयाच्या होत्या असे गाडगीळांच्या मुलाखतीतून कळले.
त्यांची आज जी फिल्मी पत्रकारिता प्रचलित आहे तिचा शुभारंभ केला होता.
किंबहुना काकाचे सिनेमे प्रदर्शित होण्याआधी ती नेहमी चटकदार लेख त्याच्या विषयी द्यायची आजकाल हे फंडे सिनेमा चे प्रमोशन करण्यासाठी सर्रास वापरले जातात, पण त्याकाळी लोकासाठी हे सर्व नवीन होते.
देवी व काका हे एकेमेकांच्या मदतीने लोकप्रियतेच्या शिखरावर चढले असेच म्हणावे लागेल.
अमिताभ च्या आधी एकहाती सिनेमा चालवणे हे काकाने सुरु केले म्हणून सुपर स्टार हे बिरुद त्यास मिळाले.
अमिताभ ने काकास संपवले नाही.
काळ बदलला व झपाट्याने देशाची परिस्थिती बदलली खालावली आणि लोकांची अभिरुची बदलली.
माझ्या आजोबांचा आवडता गायक सेहेगल माझ्या पिढीच्या विनोदाचा विषय होता.
सलीम खान च्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की
एकाच वेळी दहा माणसांना मारेल असे हावभाव व देश्बोली अमिताभच साकारू शकेल असे आम्हास वाटले म्हणून आम्ही त्याला प्रमोट केले.
थोडक्यात अमिताभ चा उदय हा तत्कालीन परीस्थीती मुळे झाला.
शहरी मध्यमवर्गीय तरुणाच्या भाव विश्व साकारणाऱ्या अमोल पालेकारचे एक गाणे आहे सपने मी देखा एक सपना
त्यात तो स्वप्नरंजन करून अमिताभला स्वतःच्या पेक्ष्या कमी लेखतो.
कारण आपण जे करू शकत नाही किंवा आपणास जे करावेसे वाटते ते अमिताभ पडद्यावर सराईत पणे करतो हे मध्यम वर्गाला त्याच्या विषयी वाटणारे आकर्षण होते.
पुढे राजकारणात राजीव चा प्यादा बनून बोफार्स मध्ये बळी गेलेला अमिताभ परत बॉलीवूड मध्ये आला पण ती लोक्प्र्यता परत मिळवू शकला नाही.
काकाला पुरस्कार अमिताभ ने दिला तेव्हा काकाने त्याला उद्देशून आपल्याच सिनेमातील डायलॉग ऐकवला होता. ,काकाला डिंपल सोडून गेली
त्यांनतर त्यांच्या मुली होस्टेल ला गेल्या
आता कोणासाठी का म्हणून काम कार्याचे म्हणून त्याने
करियर च्या दुसर्या खेळीत फारसे लक्ष घातले नाही
बोनी कपूर ने देऊ केलेला मिस्टर इंडिया त्याने नाकारला
असे कितीतरी नाकारले
ह्याउलट अमिताभ च्या पडत्या काळात व आजही जया त्याच्या पाठीशी उभी रहिली अमिताभच्या जीवनात शिस्त व नियम तिने घालून दिले प्रसंगी मिडिया च्या वाईट पणा ओढून घेतला
हे सुख काकाच्या नशिबी नव्हते
सरत शेवटी एवढेच म्हणेन की बॉलीवूड हे गाण्यांच्या साठी ओळखले जाते अभिनयाच्या साठी नसीर अमोल फारुख आजच्या काळातील इरफान ,राव , नवाजुद्दिन साठी जागा राखीव आहे
व्यावसायिक मसाला सिनेमांत लक्षात राहतात ती गाणी, आपल्या आयुष्याचा कोणत्याही प्रसंगात चपखल बसणारी
मनातील भाव शब्दांच्या वाटे मांडणारी गाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे .
आणि ह्यात काकाला अमिताभ च काय कोणीही
आणि काकाची गाणी किशोर व व आर डी ह्यांची साथ ह्याला तोड नाही आहे.
काका शापित यक्ष होता.
धुमकेतू ही संकल्पना जितेंद्र ला चपखल बसते त्याचे युग अचानक आले व गेले मात्र त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत
तो धुमकेतू सारखे आपले अस्तित्व दाखवत राहिला त्यांच्या सुरवातीचा काळ ओसरल्यावर मग दक्षिणात्य सिनेमांचे युग त्याने आणले त्याधी आर्ट धाटणीचे सिनेमे व अप्रतिम गाण्यांची जोड असलेले सिनेमे असे अधून मधून तो आपले अस्तित्व दाखवत राहिला त्याच्या पंक्तीत धर्मेंद्र पुढे मिथुन अनिल , श्रॉफ
असे अनेक धुमकेतू बॉलीवूड मध्ये ठराविक टप्यावर येतच राहिले
असो आता अवांतर आवरते घेतो
22 Sep 2015 - 7:36 pm | दमामि
शोभा डे आणि देवी यांचा छत्तिसचा आकडा होता. शोभा डेच्या पुस्तकात तिच्याबद्दल आकसाने लिहिलेले आहे.
23 Sep 2015 - 11:33 am | स्वाती दिनेश
पुस्तकाची ओळख आवडली,
स्वाती
23 Sep 2015 - 1:50 pm | माझीही शॅम्पेन
एखाद्याचा मृत्यू नंतर टीका करू नये अस म्हणतात तरी पण राजेश खन्ना अत्यत सुमार अभिनेते(?) होता अस माझ मत आहे
अभिनयाच्या नावाखाली ते जे काही करायचे ते एकदम फालतू वाटायचे .. बर झाल लवकरच त्यांच युग आटोपल ते :)
सध्या तरी पुस्तक वाचण्याचा अजिबात विचार नाही
24 Sep 2015 - 11:30 am | बोका-ए-आझम
राजेश खन्नाचा काही चित्रपटांमधला अभिनय हा धन्यवाद होता यात शंकाच नाही, उदाहरणार्थ चलता पुर्जा, अनुरोध, सौतन, अवाम वगैरे पण तो सुमार अभिनेता होता याच्याशी असहमत. आराधना, अमरप्रेम, आनंद, अवतार, आज का एम.एल.ए. रामअवतार, बावर्ची हे त्याने चांगला अभिनय केलेले काही चित्रपट आहेत.
24 Sep 2015 - 8:11 pm | मांत्रिक
सहमत बोक्या! काका सुमार नक्कीच नव्हता!!! त्याच्या काही स्टाईल्स तर अगदी सुप्पर्ब! आराधना, कटी पतंग, आनंद तर अगदी मनाच्या कोपर्यात जपून ठेवाव्यात अशा कलाकृती!
30 Sep 2015 - 11:21 pm | चलत मुसाफिर
खन्ना हा सुमार असेल, तर फिरोज खान ते सलमान खान अशा अनेक लोकप्रिय कलावंतांना सुमार म्हणावे लागेल.
एकवेळ हिंदी चित्रपट हा एक सुमार आणि प्रेक्षकशरण कलाप्रकार आहे असं म्हटलं तरी चालू शकेल.
23 Sep 2015 - 5:41 pm | कलंत्री
राजेश खन्नाचा मी 'दुश्मन' चित्रपट पाहिला आणि मी त्याचा सार्वकालिक चाहता झालो. राजेश आवडण्यासाठी कोणत्याही तर्काची गरज नाही असेच मला वाटते.
राजेश मध्ये अमिताभपेक्षा तुलनेमध्ये अनेक कच्चे दुवे होते हे मान्य करतानाही राजेश हा राजेशच आहे हे मान्य करावेच लागते.
24 Sep 2015 - 8:08 pm | मांत्रिक
वा! आवडला लेख! मस्त लिहिताय! ओळख करून देत जावा अशीच विस्मृतीत गेलेल्या कलाकारांची! काका तसा मला पण विशेष कधी आवडला नाही. पण त्याचा "ए पुष्पा!!!" हा डायलाक लै फेमस होता आमच्यात लहानपणी!!!