प्रो.देसायांच्या नातवाचं तत्वज्ञान

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
30 Aug 2008 - 11:19 pm
गाभा: 

"पण अलिकडे मला वाटू लागलं की देवाची जरूरी आहे.मी मानतो की सायन्समुळे विश्वकर्त्याची जरूरी भासत नाही पण हे एक त्याचे रूप असावं."

आज जरा गम्मतच झाली.आज प्रो.देसाई आपल्या नातवाबरोबर तळ्यावर फिरायला आले होते.रोजच्या ठिकाणी मी भाऊसाहेबांची वाट पहात बसलो होतो.
गम्मत झाली हे म्हणण्याचे कारण, आजोबा आणि नातू तावातावाने बोलत येत होते.दोघांचा कोणत्या विषयावर वाद चालला होता,ह्याचं मला जरा कुतुहल होतं.ते जवळ आल्यावर त्या दोघानां उद्देशून मी म्हणालो,
"भाऊसाहेब,तुमचा नातू आपल्या दोघांनाही वादात हरवणार ह्याची मला खात्री आहे.अहो,पुढची पिढी नक्कीच जास्त इंटिलीजंट असते असं मी कुठेतरी वाचलंय.हा तर आपला नातू म्हणजे तो आणखी एक पिढी पुढे गेलेला,मग काय विचारता."
हे ऐकून प्रोफेसर मला म्हणाले,
"अहो,तो वाद घालत नाही काय,तो त्याचं तत्वज्ञान सांगतोय आणि तेही देवाच्या अस्थित्वा बाबत."
मी म्हणालो,
"भाऊसाहेब,तुमचा नातू आहे.तेव्हां तो लेक्चर देत असेल तर तसं करणं त्याचा हक्कच आहे"
माझा सपोर्ट बघून भाऊसाहेबांचा नातू मिष्किल हंसू लागला.
मी त्याला म्हणालो,
"ऐकूया तर खरं तुझं चिंतन"

हे ऐकून खूषीत येवून तो बोलू लागला,
"मला वाटतं ईश्वराला भविष्य माहित नसावं,कसं ते सांगतो.मी ह्या निर्णयाला यायला मला खूप लांबचा आणि कठिण प्रवास करावा लागला.आणि तो सुद्धा जी श्रद्धा मी वाढत असताना माझ्या मनाशी जोपासून ठेवली होती ती ठेवून.अगदी लहानपणी मला खूप लोक सांगायचे की ’देवाला सर्व माहित असतं’ बराच काळ मी माझा हा विश्वास ह्या समजुतीवर जखडून ठेवला होता.पण शेवटी मी माझ्या स्वतःच्याच विश्वासाला घेवून एक मोठी झेप घेण्याचा प्रयत्न केला.मी असा विचार केला की ईश्वराला रुढीमुळे असलेल्या विश्वासापेक्षा एखाद्दयाचा प्रामाणिकपणा जास्त आवडत असावा.माझं चैतन्य जिथे मला नेईल तिथे मी जायचं ठरवलं.
मला वाटतं जगाचं भवितव्य धर्माच्या पुस्तकात लिहील्याप्रमाणे नसून निसर्गाच्या नियमानुसार असणार. बऱ्याच लोकाना वाटतं,की सूर्योदय,सूर्यास्थ,जीवन,मरण,भूकंप आणि पूर वगैरे हे दैविक असतात.

पण मी शास्त्रज्ञ काय म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवतो.या पृथ्वीवरचे होणारे बदल,हवामान वगैरे गोष्टी ह्या निसर्गाच्या ठरलेल्या नियमानुसार होत असतात.हे माहित झाल्यामुळे मला वाईट गोष्टी देव कसा करू देतो असल्या म्हणण्यावर काहीच त्रास होत नाही.त्यामुळे क्रिकेट मॅच जिंकायला देवाची मदत हवी असते हे मुळीच पटत नाही.खरं म्हणजे कोण जिंकणार हे कुणालाच अगोदर माहित नसतं देवाला सुद्धा.
मी सायन्स आणि इंजिनीयरींग शिकायला लागल्या पासून मला खूप लोकांना भेटल्यावर कळलं की देवावर कुणीच विश्वास ठेवू मागत नाहीत.ते म्हणतात जर का सायन्स सर्व काही समजावून सांगू शकतं इलेक्ट्रॉन्स पासून गॅल्याक्सीस पर्यंत,तर मग देवाची कुणाला जरूरी आहे.

पण अलिकडे मला वाटू लागलं की देवाची जरूरी आहे.मी मानतो की सायन्समुळे विश्वकर्त्याची जरूरी भासत नाही पण हे एक त्याचे रूप असावं.पदार्थविज्ञानाचे गणीताचे नियम जरी अगदी नेमके आणि व्यक्तिसादृश्य नसतात,तरी जगात आणखी अनेक अशा गोष्टी आहेत जसे की आपल्या सारखे प्राणीमात्र आहेत त्यांना वगळून चालणार नाही.आणि त्याचं कारण त्यांच्या अस्थित्वाला काहीनाकाही उद्देश आणि अर्थ असतो.चंद्र तारे आणि गुरुत्वाकर्षणाशी त्याचा काडीचाही संबंध नाही.
विज्ञानाला आवाजाच्या लहरी आणि संगीत यातला फरक कळत नाही.प्रेम आणि दुःख हयातलाही फरक कळत नाही.
विज्ञानाला माझ्या शरिराबद्दल सांगता येईल पण माझ्या आत्म्याचं काही सांगता येत नाही हाच खरा फरक आहे.

मला वाटतं माझा आत्मा मला चैतन्य देवून दुखापतीचं दुखणं कमी कसं करावं ही क्षमता देतो.कुणाला स्पर्श करून त्याच्या बद्दल प्रेमाची भावना जागृत करतो.प्रयत्न करूनही कधी यश मिळतं कधी अपयश. एखाद्दया चांगल्या दिवशी सर्व दिवस आनंदात जातो.
मात्र हे पाहून देव आनंदाने आश्चर्य चकित होतो,असं मला वाटतं"
हे त्याचं सर्व चिंतन ऐकून मी त्याला म्हणालो,
"म्हणजे ह्याचा अर्थ प्रत्येकाने बॅलन्स ठेवून राहिलं पाहिजे.कुठचीही टोकाची भुमिका घेवून चालणार नाही.असंच तुला म्हणायचं आहे नां?"
"काका,तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात"
असं म्हणत आम्ही सर्व घरी जायला उठलो.

श्रीकृष्ण सामंत