एकाच या जन्मी जणू - आशाताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

शीतल जोशी's picture
शीतल जोशी in जनातलं, मनातलं
8 Sep 2015 - 9:13 am

एकाच या जन्मी जणू !!!!

सगळ्यात पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आशाताई. तुमचा कितवा वाढदिवस, हे लिहिण्यात काहीच अर्थ नाही, नाही का !!! घनरानी साजणा, म्हणताना तुमचा आवाज अगदी, अल्लड वयाच्या, नुकत्याच प्रेमात पडलेल्या शोडष वर्षीय तरुणी सारखाच वाटतो. तुम्ही तुमच्या चिरतरुण आवाजाने तर, तरुण आहातच, पण तुम्हाला पाहणे हा हि एक प्रसन्न करणारा अनुभवच आहे . चेहऱ्यावरचे खट्याळ हसू, अगदी गालावरच्या खळी सहित. नेमकी पण सुरेख वेशभूषा, केसात माळलेले एखादे फूल. गळ्यात एखदी सर, आणि मनमोकळे सूर, तुम्ही वर्षानुवर्षे तश्याच उभ्या राहता डोळ्यापुढे .
तुमच्या बद्दल आणि तुमच्या गाण्याबद्दल किती लिहाव तितके थोडच आहे. अवीट गाणी , पुन्हा पुन्हा ऐकावी अशी. आयुष्यातला कोणताही प्रसंग घेतला तरी तुमचे एक तरी गाणे असेलच, कधी मनात रुंजी घालणारे, कधी हुरहूर लावणारे, कधी आत खोलवर रुजणारे. मला आठवतंय कि माझ्या कित्येक प्रवासाची सोबत, सकाळची सुरवात हि "ऋतू हिरवा " आणि "नक्षत्रांचे देणे" याच गीत संग्रहाने झाली आहे. तुम्हाला प्रत्यक्ष ऐकायचा योग आला तो दिवस तर मी कधीच विसरू शकणार नाही. "एकाच या जन्मी जणू, फिरुनी पुन्हा नवी जन्मेन मी" , हे गाणे परवा सहजच ऐकले, खर तर आईला ऐकायचे होते म्हणून खास लावले होते. तुम्ही गायलेला प्रत्येक शब्द आमच्या पर्यंत पोहचत होता. काव्याची आणि शब्दांची उत्तम जाण, अश्या प्रतीभावंत, प्रज्ञावंत तुम्ही. कदाचित हे गाणे, प्रत्येकाला आपल्या साठीच आहे असे वाटावे, इतके भिडते ते मनाला. कदाचित तुमच्या साठी पण हेच गाणे गायिले असेल तुम्ही. म्हणूनच असंख्य अडचणींना मत देत तुम्ही कलेशी एकनिष्ठ राहिलात आणि आमच्या सारख्या श्रोत्यांच्या ओंजळीत भरभरून दान टाकलात . मोगर्याचा सुवास, मातीचा गंध, ठेवणीतल्या अत्तराचा वास, जसे मन प्रसन्न करून जातात न , तसच मन प्रसन्न होते तुमचा आवाज ऐकला कि .
कधी कधी मला वाटते, तुम्ही गायला नसतात, तर काही शब्द रचना, कविता मला जश्या समजल्या तश्या कळल्याच नसत्या, "होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानाचा पाचोळा", असे काही बेचैन करून जाते कि पुछो मत. तुम्ही गायलात म्हणून कळले हे काव्य. तुम्ही "ऋतू हिरवा" म्हणावे आणि आजूबाजूला तो ऋतू जणू दिसावा, तुम्ही "सावळ्याची जणू साउली" म्हणावे , आणि सांजवेळ नजरे समोर साक्षात उभी राहावी. "चांदण्यात फिरताना" ऐकावे आणि खरच अशीच एखादी "चांदरात" आठवावी. तुमचे निगाहे मिलानो को आठवावे आणि प्रेमाच्या कोमल आणि व्यक्त करायला अवघड अश्या भावनांनी मनात फेर धरावा. "अंग झिम्माड झाले" ऐकताना , खरच पावसात झिम्माड भिजलोय असे वाटावे. "हि वाट दूर जाते", ऐकावे आणि खरच प्रेमात पडावे अशी स्वप्ने पहावीत. कानडा विठ्ठला ऐकावा आणि विठ्ठलाची मूर्ती डोळ्यसमोर उभी राहावी
हिंदी चित्रपट संगीत तर तुमच्या शिवाय अपूर्णच आहे. वेगवेगळ्या अभिनेत्रींना स्वर साज जरी अशा भोसले यांनी दिलेला असला तरी पडद्यावर पाहताना जाणवतो , कि तो आवाज त्या अभिनेत्रींना इतका चपखल वाटतोय कि जणू त्याच गात आहेत. तुमच्या अनेक मुलाखती ऐकताना जाणवला, कि तुमचे काष्ठा आणि अभ्यास आहे त्यामागे. गाण्यामागे हि विचार असतो हे तुम्ही दाखवून दिलेत. आणि तरी हि प्रत्येक वेळा, संगीतकार आणि शब्दाला त्यांचे महत्व देत, तुम्ही नम्रतेने, तुमचे गायकाचे काम करत राहिलात.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही भेटत आला आहात. तुम्हाला मुळात कोणतेच सूर वर्ज्य नाहीत. युगुल गीत असो, व कव्वाली, थोडे खट्याळ गाणे असो कि गझल असो. विरह गीत असो कि आयुष्याचे विदारक सत्य समोर आणणारे काव्य असो, नाट्यगीत असो व अभंग असो, वा एखादी फक्कड लावणी असो. तुम्हाला काहीच वर्ज्य नाही , आणि आम्हाला तुम्ही वर्ज्य नाही. माझ्या आई वडिलांना त्यांच्या तरुणपणातील कृष्ण धवल गाणी ज्या अवीट गोडीची वाटतात, म्हणून तुम्ही त्यांना आवडता, आम्हाला ती तर आवडतातच, पण आमच्या पिढीत गायलेली गाणी, "कम्बख्त इश्क़", "तनहा तनहा ", "जानम समझा करो"," ये लम्ह फिलहाल" आणि अशी असंख्य गाणी हि आम्हाला प्रिय आहेतच कि. नवरंग मधली क्लासिकल गाणी गावून तर तुम्ही दाखवून दिलातच कि हम किसीसे कम नही. असा एकही संगीतकार नसेल कि जांच्या साठी तुम्ही गायला नसाल, तसाच असे खूप कमी गीतकार, कवी असतील कि जांच्या शब्दाला तुमच्या सुरांनी अधिक अर्थपूर्ण केले नसेल. ओ पी नय्यर, आशा भोसले , गीता दत्त, रफी, किशोर यांची गाणी म्हणजे तर जणू खजिनाच.
प्रत्येकाच्या कुटुंबात किती हि जनरेशन ग्याप असेल तरी, तुम्ही आवडत्या गायिका आहात, यावर नक्की एकमत असेल. आम्हा सगळ्यांना जोडून ठेवणारा तुम्ही एक दुवा आहात. कोणत्याही वयाच्या माणसाला तुम्ही अगदी त्यांच्या साठीच गात आहात असे वाटते, इतके तुम्ही, आजच्या भाषेत, आमच्याशी कनॆक्ट करू शकता. स्टेज वरून तुम्ही गाताना ज्या गप्पा मारता ना, एखादी नक्कल करता ना, मिश्किल पणे ती सुद्धा आवडते आम्हाला.
कलाकाराने केवळ सच्चे सूर लावावेत आणि मग जग त्याच्या मागे उभे राहते हे तुम्ही दाखवून दिले आहे. प्रसिद्धी किती संयामानी हाताळायची, आणि ती केवळ आपल्या कलेसाठीची आहे हे लक्षात ठेवायचे, हे तुमच्या कडून शिकावे. अनंत अडचणीचा सामना करत शिखर घातले तरी, आशाताई केवळ गाण्याबद्दल, आपल्या कलेबद्दल बोलतात, दिलखुलास. स्वताच्या मोठेपणाचा दर्प नसतो त्याला. म्हणूनच तुम्ही आम्हाला आमच्यातला एक वाटता. तुमच्या बद्दल एक वेगळीच आपुलकी वाटते. तुमच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे दडपण नाही वाटत. असे वाटते कि तुम्ही जर कधी भेटलात, तरी अगदी आमच्यातल्या एक होवूनच वावराल. अनेक उभरत्या गायकांसाठी तुम्ही आदर्श आहात.

गळ्यात सूर आणि हातात चव असे जबरदस्त वरदान आहे तुमच्या पाशी. तुमचे नाव पण किती छान तुम्हाला शोभेसे आहे. तुमचे गाणे ऐकणे हे जितके आनंददायी आहे, तितकाच तुमची मुलाखत ऐकणे हे हि. एकंदरीत काय, आमच्या आयुष्यात ज्या अतंत्य प्रिय आणि महत्वाच्या काही व्यक्ती आहेत, त्यात तुम्ही आहातच. तुमच्या गाण्याशिवाय आयुष्य, बेसुरच होवून जाईल. तुम्ही गायलेल्या प्रत्येक गाण्यावर एक स्वतंत्र लेख लिहिता येयील. मला आवडणारी कित्येक गाण्याचा इथे मी उल्लेख हि केला नाही, पण भावना पोचल्याशी कारण नाही का !!!
तुम जियो हजारो साल अशीच सदिच्छा आहे. तुमची गाणी ऐकताना, अजूनही असेंच वाटते कि जणू तुम्ही सुराना म्हणत आहात "पाके भी तुम्हारी आरझू हो , शायद जिंदगी इतनी हसी है "
या शेवटच्या ओळी तुमच्या गाण्यच्या, केवळ तुमच्याचसाठी

आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनींचे गूज घ्या जाणुनी
या वाहणार्‍या गाण्यातुनी
लहरेन मी, बहरेन मी,
शिशिरांतुनी उगवेन मी
एकाच या जन्मीं जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
- — ©शीतल जोशी

संगीतशुभेच्छा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Sep 2015 - 9:49 am | ज्ञानोबाचे पैजार

आशा ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा .

ही माझी लहानपणापासुनचि जिवलग मैत्रीण. कधी रेडिओवर भेटायाची तर कधी सिनेमाच्या पडद्यावर.

बाबांनी नवा टेपरेकोर्डर आणल्यावर तर मग ती मला पाहिजे तेव्हा भेटायला लागली. प्रत्येक वेळी भेटली की मन कसे प्रसन्न / प्रफुल्लीत व्हायचे.

अजूनही तीचा आवाज कुठेही कानी पडला तरी कान आओआप तिकडेच जातात, पाय ताल धरू लागतात आणि मी तल्लीन होउन तो आवाज ऐकता रहातो.

तिची बरीचा गाणी मला पाठ आहेत. खालील गाणी पटकन आठवली.

इन आखोकॆ मस्ती के
मेरा नाम है शबनम
हवा के साथ साथ
बहोत शुक्रिया बडी मेहेरबानी
दिलरुबा दिलपे तुम ये सितम किये जा
आईये मेहेरबा
आओ हुजुर तूमको सितारोमे ले चलू
हुस्न के लाखो रंग
जुस्तजु जिसकी ठी उसको ना पाया हमने
मधुबन मी जो कन्हैया किसी गोपी से मिले

माझ्या या चिरतरुण जिवाभावाच्या मैत्रीणीला अजून शंभर वर्षांचे आयुष्य लाभो आणि ही सगळी वर्षे ती अशीच गाती राहो आणि आमची ही मैत्री अशीच फुलत राहो ही शुभेच्छा.

पैजारबुवा,

पांडुरंग कांती पासून आईये मेहरबां पर्यंत
चांदणे शिंपित जाशी पासून जाईये आप कहां जायेंगे पर्यंत
जय शारदे वागीश्वरी पासून तनहा तनहा पर्यंत
फुलले रे क्षण माझे पासून चैनसे हमको कभी पर्यंत
इन आंखोंकी मस्ती के पासून ते मेरा कुछ सामान पर्यंत
उष:काल होता होता पासून तरुण आहे रात्र अजूनी पर्यंत
शारद सुंदर चंदेरी राती पासून जरा सा झूम लूं मै पर्यंत
आवाज कुणाचा? आशाताईंचा!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

8 Sep 2015 - 10:20 am | माईसाहेब कुरसूंदीकर

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.मधुबालेपासून ते उर्मिला मातोंडकर,जवळपास तीन पिढ्यांना स्वरमोहिनी घालणार्या आशाताईंना शुभेच्छा.

इन आंखोंकी मस्ती के मध्ये लागलेला तो रेशमी आवाज..

dadadarekar's picture

8 Sep 2015 - 11:45 am | dadadarekar

कजरा मुहोब्ब्तवाला

माझीही शॅम्पेन's picture

8 Sep 2015 - 1:39 pm | माझीही शॅम्पेन

........आशा ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा .

तुम्ही एकदम जबरदस्त आणि हृदयसपर्शी लेख लिहिला आहे .. खूप आवडला !!!

नाखु's picture

8 Sep 2015 - 2:47 pm | नाखु

एकाच कुटुंबातील तीनही पिढ्यांना आवाज देणारी ही दोन बहीणींचीच जोडी असावी.

या एकाच बाबीतून दोहोंचाही तीन पिढ्यांवरचा प्रभाव दिसून येतो. आशाताईंचे नाव गिनिज बुकात सामावीष्ट झाले आहे असे मध्यंतरी वाचनात आले होतो (सर्वाधीक भाषांमध्ये गाणी गायल्याबद्द्ल)

लेख फ़़क्कड जमलाय चिरतरूण गळ्यासाठी अगदी मनातून आलेला.

सस्नेह's picture

8 Sep 2015 - 3:31 pm | सस्नेह

आशाताईंना वाढदिनाच्या शुभेच्छा !

तुषार काळभोर's picture

8 Sep 2015 - 4:47 pm | तुषार काळभोर

आशाताईंना जन्मदिवसाच्या स्नेहगंधित शुभेच्छा!!

चिरतरूण आवाजाची गायिका! कोणी म्हटलं होतं आठवत नाही, पण लतादीदींच्या आवाजात आत्मा आहे तर आशाताईंच्या आवाजाला शरीर! गाडी घेऊन लांबच्या प्रवासाला जाताना हा आवाज सतत सोबत करतो. जियो आशाताई!

विकास's picture

8 Sep 2015 - 7:37 pm | विकास

आशा आणि लता या वयाने आणि त्याहूनही अधिक मानाने प्रचंड मोठ्या असून देखील त्यांचा एकेरी उल्लेख करताना त्यांचा अपमान नाही तर सामान्यांची कधीही न भेटता झालेली जवळीक दिसते. (जे अजून पटकन आठवते ते, अमिताभ आणि सचीन च्या बाबतीत! आणि अर्थातच या सगळ्यांच्या आधी होऊन गेलेल्या शिवाजीच्या बाबतीत)... :)

एकदा लताला मुलाखतीत विचारले होते की तुमचे आवडते गाणे कोणते, उत्तर आले होते की," आशाने म्हणलेले ही वाट दूर जाते.." अर्थात अशी अनेक गाणी या दोन बहीणींची आहेत की जी त्या त्या वेळच्या मूड प्रमाणे आवडत जातात...

यांच्या मुळे ज्ञानेश्वरांपासून ते गुलझार पर्यंत तमाम संतकवी ते कवीवर्यांचे काव्य जनतेच्या ओठावर आले. नाहीतर ते शक्य नव्हते... म्हणूनच पांडूरंग कांती जितके आवडते तितकेच मेरा कुछ् सामान पण इतक्या वर्षांनी अचानक गुणगुणले जाऊ शकते (इतके डोक्यात असते)..

(अर्थात नंतरच्या काळातील "दिदी तेरा देवर दिवाना" सारखी टुकार गाणी या दोन्ही भगिनींनी म्हणली असली तरी, इतर पुण्याई मुळे माफ! ;) )

आशादिदींना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेछ्चा.

रुपी's picture

8 Sep 2016 - 10:06 pm | रुपी

आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सही रे सई's picture

8 Sep 2016 - 10:08 pm | सही रे सई

मस्त लेख ...
आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

पद्मावति's picture

8 Sep 2016 - 10:32 pm | पद्मावति

मस्त लेख!
आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

चौकटराजा's picture

9 Sep 2016 - 7:53 am | चौकटराजा

जेंव्हा आपण गळा गोडवा याचा विचार करतो तेंव्हा लताबाई या प्रथम मनात येतात. जेंव्हा आपण गायकीचा विचार करतो त्यावेळी आशाबाई प्रथम अवतरतात. या दोघीना नीट समजून घेण्याचा हा प्रयत्न मी गेली ५० वर्षे केला आहे. आशा॑ बाई रफी साहेबांप्रमाणेच गीताचा विचार " कोणासाठी?" या पध्हतीने करतात सबब नर्तिका व गणिका यातील फरक त्या आवाजातून दाखवू शकतात.नाचाची लावणी व बैठकीची लावणी यातील फरक दाखवू शकतात , पत्नी व प्रेयसी हा॑ फरक दाखवू शकतात."आसावल्या मनाला॑ माझाच राग येतो" ( तोडी) असे गंभीरपणे म्हणताना "आळविते केदार" ( केदार )असे आनंदमयी गीत समर्थपणे गातात. जशा ओपी बरोबर वेगळे तसे एस डी बरोबर वेगळे रवी बरोबर वेगळे गातात. अशी गायिका एकमेव ! आशाबाई खूप जगा. सर्व दु:खे पचवून आशादायी जीवन कसे जगता येते याचा आदर्श दाखवीत जगा. आम्हाला त्यामुळे थोडा तरी धीर येतो जगायला !