मंडळी,
सध्या आम्ही इंटरनेट वरून कोथरूड परिसरात भाड्याने फ्लॅट शोधतो आहे. 99acres.com किंवा magicbricks.com वर मालक किंवा ब्रोकर असा पर्याय निवडता येतो. पण बर्याच वेळा मालकाला फोन केला तरी तो एक महिन्याचे भाडे ब्रोकरेज म्हणून मागत आहे. हे फार चुकीचे नाही का? स्वत: मालक असताना देखील अशा प्रकारे ब्रोकरेज मागणे हे कोणत्या नैतिकतेत बसते?
दुसरी गोष्ट म्हणजे उठसूट कोणीही येतो आणी ब्रोकर बनतो. २०११ च्या जानेवारी मधली गोष्ट. माझे नुकतेच लग्न झाले होते आणी मी असाच कोथरूड मध्ये फ्लॅट शोधत होतो. माझ्या एका मैत्रिणीला एका भाजीवालीने एका बिल्डिंग मध्ये मोकळा फ्लॅट असल्याचे सांगितले होते. (ती भाजीवाली त्याच बिल्डिंगच्या बाहेर भाजी विकायला बसायची). मैत्रीणीने फ्लॅटच्या मालकाचा नंबर, जो त्यानेच दरवाजावर लिहून ठेवला होता तो मला दिला. नंतर मालकाने स्वत: येउन फ्लॅट दाखवल्यावर, फ्लॅट घेतलात तर मला एक महिन्याचे भाडे (ब्रोकरेज म्हणून) द्यावे लागेल हा अशी काडी भाजीवालीने सोडली. कशाबद्दल? असे मी विचारले तर 'मी सांगितले ना तुमच्या मैत्रिणीला इथे मोकळा फ्लॅट आहे.'
बर मग तुम्हाला जर ब्रोकरेज दिले तर सर्व अग्रीमेंटचे सोपस्कार तुम्हीच करणार का? नंतर काही लफडी, समस्या निर्माण झाली तर आम्ही तुमच्याकडेच यायचे का? तर उत्तर 'नाही. तुमचे तुम्हाला बघून घ्यावे लागेल'. म्हणजे फक्त फ्लॅट आहे म्हणून सांगितले ह्यासाठी ब्रोकरेज हवे होते तिला.
कुणाला एक महिन्याचे, कुणाला दीड महिन्याचे तर कुणाला दोन महिन्याचे भाडे ब्रोकरेज म्हणून हवे. प्रत्येक ब्रोकरची मनाची मर्जी. कसलाच नियम नाही. ब्रोकर चा धंधा करण्याबद्दल काही आक्षेप नाही पण एकंदरीत ह्याबद्दल काही तरी नियम केले गेले पाहिजेत.
प्रतिक्रिया
15 Jul 2015 - 4:57 pm | जडभरत
हं मुद्दा बरोबरंय! पैसे घ्यायचे तर जबाबदारी पण घेतली पाहिजे.
15 Jul 2015 - 5:58 pm | द-बाहुबली
या बद्दल नियम आहेत पण त्यासाठी अधिकृत एजंट गाठावा.
अजुन एक पिळवणूक म्हणजे तुम्हाला त्याच जागी कंटीन्यु करायचे असेल तर तो पर्यंत दरवर्षी ब्रोकरेज मागितले जाते, (केवळ फ्लॅट कंटीन्यु करण्यासाठी) कारण का तर म्हणे असे केल्याने तुम्ही त्यांचा (संघटीक अनाधिकृत ब्रोकरालोक्सचा) धंदा कमी करत आहात. अर्थात हा प्रकार अमराठी व्यक्तींबाबतच बरेचदा घडतो कारण त्यांना पर्याय नसतो.
फ्लॅट सोडताना बॅचलर्स स्वतःच नवीन गिर्हाइक बघुन त्याचेकडुनही ब्रोकरेज घेतात... सगळा सप्लाय डिमांडचा खेळ आहे. देणारे आहेत म्हणून घेणारे आहेत.. :(
15 Jul 2015 - 7:17 pm | अस्वस्थामा
असं वाटतं तुम्हाला ? आमचा मुंबईतला घर मालक म्हणे, या एरियात हाच एक्मेव ब्रोकर आहे आणि त्याचे असेच काम/चार्जेस आहेत. आणि त्याला पर्याय नाही.
शहाण्या माणसास याचा अर्थ जास्त सांगायची गरज नसावी. :)
15 Jul 2015 - 8:06 pm | द-बाहुबली
मुंबै मधे जागेचा सप्लाय कमी अन डिमांड मात्र पलंगतोड आहे... इतर प्रवृत्ती फोफावण्याचे प्रमुख कारण तेच आहे. तुम्ही नसल तर दुसरे हजार जण हे अॅक्सेप्ट करायला तयार आहेत व तरीही रहायला येतील थोदक्यात डिमांड जोरात अन जागेचा सप्लाय कमी...
15 Jul 2015 - 7:49 pm | श्रीरंग_जोशी
मलाही अजिबात न पटणारा प्रकार.
या विषयावर पूर्वी इथे टंकले होते. तेच च्योप्य पस्ते करतो.
पुण्यात भाड्याचे घर मिळवताना मला न पटलेला प्रकार म्हणजे एजंट. घरमालक व घर शोधणारा भाडेकरू थेट व्यवहार करू शकत असताना दिड दोन महिन्यांचे भाडे त्या एजंटला कशाला द्यायचे? तो एजंट बहुतेकवेळी जवळपासचा दुकानदार असतो ज्याचे नगरसेवकाशी व स्थानिक गुंडांशी चांगले संबंध असतात. भविष्यात भाडेकर्याने त्रास दिल्यास त्याचा बंदोबस्त थेट एजंट करेल अशी काहीशी व्यवस्था असते.
माझ्या मित्रमंडळींच्या मदतीने मी पुण्यात एजंटशिवाय भाड्याची घरे मिळवू शकलो.
मी दोनदाच भाड्याची घरे घेतली. दोन्ही ठिकाणी पूर्वीच्या भाडेकर्यांनी सोसायटी अन वीजबिल थकवून ठेवले होते. मी दुसरे घर सोडताना मालकाने एजंटशिवाय घर दिले याबाबत उपकारच केले असा शेरा मारला. सगळी बीले वेळच्या वेळी भरून किंवा जे मला भरायचे नसते (जसे प्रॉपर्टी टॅक्स) त्याची माहिती वेळोवेळी घर मालकाला कळवून अन त्याच्या वतीने भरूनही त्याबाबत एकदाही धन्यवाद म्हंटले नाही.
अमेरिकेतील रेंटल अपार्टमेंट्स - मध्यंतरी मला कुणीतरी विचारले होते की अमेरिकेतली कोणती गोष्ट भारतात असायला हवी. मी लगेच उत्तर दिले रेंटल अपार्टमेंट्स. इथे व्यावसायिक कंपन्या हे काम उद्योग म्हणून करतात. पूर्णवेळ कर्मचारी अशा अपार्टमेंट कम्युनिटीची व्यवस्था बघतात.
जे भाडेकरी भाडे थकवतात. त्यांना जास्तीत जास्त महिनाभराची मुदत दिली जाते त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांना त्या जागेतून बाहेर काढण्यात येते. (अपार्टमेंट्स शोधण्याची संस्थळे - http://www.rent.com/, http://apartment.com/)
भारतातल्यासारखे एजंट नसतात. बाह्य सुरक्षेची व स्वच्छतेची काळजी अपार्टमेंट्सचे कर्मचारी घेतात. घरातील दुरुस्तीची कामे तक्रार केल्यानंतर समस्येच्या गांभीर्यानुसार ठराविक वेळात केली जातात. घर सोडल्यावर अस्वच्छता किंवा काही मोडतोड झाली असल्यास त्याची किंमत अनामत रक्कम परत करताना वजा केली जाते.
15 Jul 2015 - 8:06 pm | चैतन्य ईन्या
पण प्रश्न असा आहे कि त्यासाठी कायदे धड असावे लागतात आणि लगेच न्याय मिळाला पाहिजेल. इथे एक साधी गोष्ट पोलिसात गेली कि आधी तो पैसे खाणार. मग न्यायालात गेलात कि किती वर्ष लागतील ते सांगता येणार नाही म्हणून मग हे असले अंधाधुंदी कारभार करावे लागतात. माझ्या काकांनी एका बँकेच्या कर्मचार्याला घर दिले होते. तो तिथे ४ वर्ष राहिला. पुढे काका पुण्यात स्थाईक होणार म्हणून त्याला नोटीस दिली. ३ वर्ष लागले त्याच्या तावडीतून घर सोडवायला. शिवाय उलट त्यालाच थोडे पैसे देवून बाहेर घालवावे लागले. पोलीसंही भारी होते. दोघांकडून चिरीमिरी घेवून काहीच करत नव्हते. हे असले असल्याने एजंट लोकांचे पण फावले आहे आणि आता सापळाच तयार झाला आहे. काही ठिकाणी तुम्ही एजंट शिवाय काही केले तर कुठले कुठले जुने ड्यूज दाखवतात आणि तुम्हाला छळतात. थोडक्यात काय दोन्ही बाजू आहे आणि त्या त्रासदायकच आहेत.
15 Jul 2015 - 8:14 pm | श्रीरंग_जोशी
ही परिस्थिती ठाऊक आहेच. पण एजंटच्या मार्फत भाड्याच्या घराचा व्यवहार करणे हा यावर उपाय कसा होऊ शकतो ते कळले नाही.
15 Jul 2015 - 8:23 pm | चैतन्य ईन्या
उपायापेक्षा सोय आहे. एजंटवर आपला भर टाकणे हा कल आहे. तो बघून सगळे. उद्या काही झाले तात त्याची मान धरायची आणि त्याला कामाला लावायचे. असा थोडा प्रकार आहे, पण हा फार चालत नाही हे लक्षात यायला वेळ जातोच.
15 Jul 2015 - 8:36 pm | श्रीरंग_जोशी
धन्यवाद.
थोडक्यात एजंट हे असे विमा संरक्षण आहे की ते गरजेच्या वेळी उपयोगी पडेल की नाही याची काहीच खात्री नाही. परंतु ती वेळ येईपर्यंत स्वतःला दिलासा देण्यासाठी उपयोगी आहे.
15 Jul 2015 - 8:49 pm | चैतन्य ईन्या
म्हणजे तोच भाडेकरू बघणार. तोच डील ठरवणार, तुम्ही नसाल तर तो सगळे रंगरंगोटी करून, ते डील रजिस्टर करणार. वकील त्याचाच. काय त्याला थोडे फार पैसे दिले कि आपल्याला हे सगळे करावे लागत नाही. फक्त गेम अशी आहे कि तो दोघांकडून पैसे काढतो. उद्या एखादा भाडेकरू गेला आणि तुमचा ईएमआय असेल तर घर बंद ठेवणे परवडत नाही. असा सगळा सोयीचा मामला आहे. पण जे डायरेक्ट जातात ते कसे काय १ महिना जास्तीचे भाडे घेतात हे कळत नाही.
15 Jul 2015 - 8:14 pm | खटपट्या
खरंय - अमेरीकेतील रेंटल अपार्ट्मेंट्स जर भारतात सुरु झाली तर झोपडपट्टीवर देखील चांगला उपाय मिळेल. बाहेरुन येणार्या कामगारांना कमी दरात त्यांना हव्या त्या दर्जाची स्वस्त भाडे असलेली घरे उपलब्ध करुन दील्यास नवीन झोपडपट्टी कमी होउ शकते.
15 Jul 2015 - 8:06 pm | सौंदाळा
http://www.nobroker.in/
ही नविन साईट हल्लीच ऐकण्यात आली होती. सध्या सेवा मर्यादीत ठिकाणांसाठीच आहे पण त्यात पुणे आहे.
ईकडे प्रयत्न करुन बघा.
15 Jul 2015 - 8:45 pm | काळा पहाड
ब्रोकर ही भिकारडी जमात म्हणजे राजकारणी आणि बिल्डर नंतर तिसर्या क्रमांकाचे हरामखोर लोक आहेत. त्यातून हे भाजीवाले, पान टपरी वाले, इस्त्रीवाले आणि टेलर वगैरे लेवल चे लोक ब्रोकर झाल्यामुळे त्यांची कल्पना ब्रोकर चं काम फ्लॅटचा नंबर सांगणे इथपर्यंतच अशी असते. आपल्या लायकी बद्दल अवास्तव कल्पना झाल्या की असं होतं. शक्यतो सकाळ बिकाळ बघून डायरेक्ट मालकाशी बोलून फ्लॅट घ्यावा किंवा ऑनलाईन पोर्टल मधून घ्यावा.
15 Jul 2015 - 9:20 pm | राम
अर्थात काही अपवाद असतातच कि ...
माझा स्वताचा अनुभव सांगतो. मी पुण्यात पिंपळे सौदागर मध्ये flat शोधत होतो, OLX वर जाहिरात सापडली, मालकांशी संपर्क केला, त्यांनी सगळे व्यवस्थित सांगितले सोसायटीचे नियम , पोलिसांची NOC, रेंट अग्रीमेंट वगैरे करण्यासाठी त्यांनीच मला ब्रोकर सुचवला करांन या संगाल्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता.
जेव्हा मी त्यांना या सगळ्या गोष्टी मी स्वतः पूर्ण करीन तेवा मालकांनी परवानगी दिली,
पोलिसांची NOC काढणे सगळ्यात कठीण काम, कधी पोलीस स्टेशन ची पायरी न चढणारा माणसाला रुक्ष अशा पोलिसांकडे जाऊन माझे काम करून द्या म्हणताना पोटात गोळाच आला होता. तिथे जाऊन NOC चे काम जो पोलीस करतो त्याला शोधून काढणे हेच एक दिव्य होते. नंतर एक एक कागदपत्रे जमा करून त्याच्याकडून NOC घेतली माझ्याकडून एकही पैसा मिळणार नसल्याची खात्री झाल्यामुळे त्याने माझ्या कंपनीच्या ID, अपोइन्त मेंट Letter पासून सगळी कागदपत्रे घेतली. सोसायटीचे ऑफिस चे लोक कोणतेही कमिशन न भेत्लायामुळे तर मला एक गुन्हेगार असल्यासारखेच वागवत होते, शेवटी एकदाचे सगळे सोपस्कार झाले, वकिलाने व्यवस्थित अग्रीमेंत बनवून दिले, मालकांनी ते वाचायला १ आठवडा घेतला आणि सही केली.
थोडक्यात जरी मालकाची आणि भाडेकरूची बिना ब्रोकरचा व्यवहार करायचा ठरवला तरी ते सोपे नाही, म्हुणुन ब्रोकर बरा. जरा अंगात थोडी चिकाटी आणि वेळ वाया घालवायची तयारी असेल तरच हा पर्याय वापरावा.
16 Jul 2015 - 11:52 am | आवडाबाई
99acres.com किंवा magicbricks.com वर मालक म्हणून ब्रोकरच जाहिरात टाकतात असा अनुभव आहे. फोन करून पहाणे हाच पर्याय आहे.
बरेच लोक अग्रीमेंट, पोलिसांकडे रजिस्ट्रेशन ई चा त्रास नको म्हणून ब्रोकरकडे जातात. त्या साठी काही सोपे आणि ऑनलाईन पर्याय आहेत.
भाडेकरूचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन येथे करा - http://tenantreg.in
काही कागदपत्रे (ठराविक साईज मधे) अपलोड करावी लागतात. त्यासाठी http://jpeg-optimizer.com/
तसेच ऑनलाईन १०/२०रु पेमेट ही करावे लागेल
कराराचे रजिस्ट्रेशन घरी येवून करून देणार्याही संस्था आहेत. ( मी त्यांची ब्रोकर नाही :-) पण गूगलून पाहिल्यास मिळू शकेल.) अथवा मला व्यनि करा.