टी.व्ही.च्या बातम्या

तिमा's picture
तिमा in काथ्याकूट
5 Jul 2015 - 1:59 pm
गाभा: 

सकाळी लवकर उठल्यावर एकदा, ताज्या बातम्या बघण्याचा माझा रिवाज आहे. कारण मी व्हॉटस अ‍ॅप वापरत नाही. टी.व्ही. बघण्याची माझी पद्धत जरा वेगळी आहे. मी कायम टी.व्ही. आवाज बंद करुनच बघतो. त्यामुळे अनेक त्रासांतून माझी सुटका होते. जाहिराती, मुख्य बातम्या सांगताना चॅनेलचे तबले बडवणे आणि गोंगाटी संगीत, हे कानावर आदळत नाही. बातम्या खाली लिहून येतच असतात, सकाळी घरांतील इतर माणसे झोपलेली असतात, त्यांनाही त्रास होत नाही. सकाळी घरांतून निघण्यापूर्वी, बाहेर काही आक्रित वाढून ठेवलेले नाही याची खात्री करुन घ्यायची असते. त्याहून तशीच काही विशेष बातमी असेल तर तेवढ्यापुरता आवाज करता येतो. तर अशा या सकाळच्या न्यूज चॅनेलच्या मूक अवलोकनाची ही काही निरीक्षणे.

काही चॅनेल्सवर कुठल्यातरी आयुर्वेदिक संस्थानाची जाहिरात पडदाभर आणि खालच्या बारीक सरकत्या बातम्या असतात. कधीकधी अचानक जाहिराती संपून, 'फटाफट' नांवाखाली तुमच्या तोंडावर, दर दोन सेकंदाला एक, या वेगाने बातम्या फेकल्या जातात. त्यांतल्या १०० बातम्यांपैकी पहिल्या काही बातम्या संपल्यावर बॉलिवुडच्या बातम्या फेकल्या जातात, बहुतेक १०० हा आंकडा पूर्ण करण्यासाठी!

काही चॅनेल्सवर एखादा आध्यात्मिक बुवा, तोंडे वेंगाडीत, आपणाच या जगांत कसे शहाणे आणि भक्त कसे मूढ, अशा आविर्भावात बोलत असतो, एखादा दाढी कुरवाळत बोलत असतो तर कोणी हुशार बाबा, पूर्ण आरामशीर अवस्थेत बसून,नुसताच हात उंचावून कृपाप्रसाद देत असतो. तरीही त्यांच्या खाली, बातम्यांची भेंडोळी उलगडतच असतात.

काही चॅनेल्सवर मात्र, अगदी इंच इंच वापरु, या न्यायाने एकाच पडद्यावर चार किंवा पांच ठिकाणी बातम्या दाखवत असतात, आणि मध्यभागी काल रात्री झालेल्या महाचर्चेचे अवशेष दाखवत रहातात. आपली मात्र, चार ठिकाणच्या बदलत्या बातम्या वाचताना भंबेरी उडालेली असते.

मध्येच व्यापारी चॅनेल्स आल्यामुळे आपल्याला भराभरा सर्फिंग करता येते. सरकारी चॅनेलवर, एकदोन बायका विणकामाच्या सुया ओवल्यासारख्या खाणाखुणा करत असतात.

भारतीय चॅनेल्स संपल्यावर दिसतात, सीएनएन आणि बीबीसी. त्यांतील सीएनएनवर माझी आणि बातम्यांची वेळ सहसा जुळत नाही. बीबीसी वर जर नेमके साडेसहाला पोचलो तर जगभरातल्या ताज्या बातम्या बघायला मिळतात. गंमत म्हणजे, ब्रिटिश चॅनेल असूनही, प्राधान्य मात्र अमेरिकेतील घडामोडींनाच असते. भारतात काही वाईट झाले तर लगेचच दाखवतात. पण चांगले काही असेल तर सपशेल दुर्लक्ष करतात. अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने म्हणून हे पण तसाच चष्मा लावतात.

हिंदी आणि इंग्रजी चॅनेल्स संपले की मी मराठी बातम्यांकडे वळतो. तिथे कित्येकदा, ब्रेकिंग न्यूजचा पत्ताच नसतो आणि रात्री बघितलेल्या शिळ्याच बातम्या खाली ओघळत असतात. साधारण साडेसहानंतर ते एकदम जागे होऊन ताज्या बातम्या दाखवतात.

पावसाच्या बातम्यांबद्दल मात्र सगळे चॅनेल्स अगदी दक्ष असतात. विशेषतः, मुंबईत पाणी साठणे व लोकल्स बंद झाल्यात, या बातम्या विशेष आवडीने चघळल्या जातात. खिडकीबाहेर पाहिलं तर बारीक पण संततधार दिसत असते. चॅनेलवाल्यांच्या मते मात्र, तो मुसळधार पाऊस असतो. बहुतेक, आजच्या पिढीने 'मुसळ' कधी बघितलेच नसावे, कुसळ शोधण्यांत मात्र अगदी पटाईत असतात. ज्या ठिकाणी कायमच पाणी तुंबते हे अगदी मुंबईतल्या शेंबड्या पोरालाही माहित असते, त्याचेच फोटो परत परत दाखवून, मुंबईवर कसे आभाळ कोसळले आहे अशी वर्णने चालू असतात. मिठी नाला, मिलन सबवे, अंधेरी सबवे आणि हिंदमाता हे भाग आता देशभरातल्या प्रत्येकालाच माहिती झाले असतील!

टीपः हे आवाज बंद करुन टी.व्ही. बघण्याचे टेक्निक संध्याकाळी व रात्रीही कामाला येते. प्रत्येक चॅनेलवर चाललेल्या 'चेर्चा' मूकपणे बघायला फारच मजा येते. त्यांतून जर समोर, 'बोलती जे अर्णव' असतील तर खरा मूकाभिनय पहायला मिळतो.

प्रतिक्रिया

आमच्या टिव्हिला ( आणि बय्राच इतर) इक्सटर्नल स्पिकर सॅाकेट नाही. असते तर त्याला स्पिकर जोडून दूरवरून बारीक आवाजात कार्यक्रम ऐकता आले असते.रिपेरिंगवाले ते सॅाकेट लावून देत नाहीत.मग एक दिवशी हे रिकामपणचे उद्योग केले.आता लोकांस त्रास न देता ऐकता पाहता येतात.

सूचना: टिव्ही बंद करून प्लग काढावा आणि दोन तास गेल्यावरच मागचे झाकण काढावे

विवेकपटाईत's picture

5 Jul 2015 - 2:34 pm | विवेकपटाईत

मी बातम्या फारच कमी बघतो. त्यापेक्षा खाण्याचे चेनल बघणे जास्ती चांगले.

सुधांशुनूलकर's picture

6 Jul 2015 - 5:44 pm | सुधांशुनूलकर

बातम्यांच्या वाहिन्यांवर मी मुख्यतः जाहिराती बघतो.
कधीकधी जाहिरातींमधल्या बातम्याही बघतो विरंगुळा म्हणून.
कारणं मुख्य धाग्यात आलीच आहेत सविस्तरपणे.