सियाची कहाणी

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
1 Jul 2015 - 1:26 am

आज सिया खुष होती. पहिले कारण म्हणजे आज बालवाडीत जाण्यासाठी कोणी तिला आग्रह करत नव्हते व तिच्या घरी मामे ,मावस बहिणी आल्या होत्या. सियाने कपाटातून भातुकलीचा सेट व गाण्यावर नाचणारी बाहुली बाहेर काढली व बेडरूममध्ये भातुकलीचा खेळ मांडला. सिया आज आई झाली होती एरव्ही आई कोणी व्हावे ह्यावरून बहिणींमध्ये भांडने व्हायची. सिया जे जे म्हणेल ते आज मान्य केले जात होते. भातुकलीचा खेळ रंगात आला होता बाहुलीही गाण्यावर ठुमके मारत होती एव्हड्यात

सियाला बाहेर घेवून या असे सियाच्या काकुने आवाज दिला. सिया भातुकलीचा खेळ अर्धवट टाकून बाहेर येण्यास तयार नव्हती. अगं आपण नंतर खेळू असे म्हणून तिच्या बहिणींनी सियाला बाहेर आणले. बाहेर येताना सियाने आपली लाडकी बाहुली बरोबर घेतली होती. सिया अंगणात आल्याबरोबर तेथे जमलेले सगळे एकदम शांत झाले.

आज सियाची आई आपला भातुकलीचा डाव अर्धवट टाकून गेली होती. सियाच्या काकूने तीचा हात पकडला बाहुली तिच्या बहिणीकडे दिली व तिच्या आईच्या पार्थिवाला नमस्कार करायला सांगितले सियाने निरागसपणे कृती केली. पुढे जे जे काही घडत होते त्याच्याशी सियाला काही देणे घेणे नव्हते. गाडीतून उतरल्या उतरल्या सिया सरळ बेडरूममध्ये आपल्या बहिणींबरोबर गेली व आपला अर्धवट टाकलेला भातुकलीचा खेळ खेळू लागली.

त्या दिवसापासून सिया आपल्या काकूजवळच झोपू लागली व तिलाच आपली मम्मी समजू लागली.काकू आताच कुठे मुलांच्या जबाबदारीतून मुक्त होणार होती तेव्हड्यात काकूच्या पदरात ३ वर्षाच्या सियाची जबाबदारी पडली जी तिने कहीही कुरकुर न करता पार पाडली.

सिया मुळातच हुशार होती शाळेत अभ्यासापासून ते खेळापर्यंत स्रर्व बाबतीत ती अग्रेसर होती. रडणे तीला माहीतच नव्हते, परंतू आज सिया शाळेतून आली तिच मुळी रड्वेला चेहरा घेवून. आज ती तिच्या पप्पांशीही बोलली नाही,जेवलीही नाही तशीच काकूच्या मांडीवर झोपी गेली. संध्याकाळी सियाला ताप भरला. डॉक्टरांनी सियाला तपासले घाबरण्यासारखे काही नाही व ताप उतरण्याचे औषध दिले. झोपेत सिया मम्मी मम्मी करून काकूचा हात घट्ट पकडत होती. पहाटे ताप ओसरला. आज सियाला शाळेत पाठ्विले नाही. दिवसभर सिया नॉर्मल होती परंतू रडण्याचे कारण विचारले की ती गप्प बसे. संध्याकाळी सियाची वर्गमैत्रिण सियाला भेटायला आली ताप सोडल्यास बाकी कोणताही विषय सियाच्या मैत्रिणीसमोर काढला नाही. सियाचे पप्पा मैत्रिणीला सोडवायला बाहेर आले. रस्त्यात सियाच्या रडण्याचा विषय निघाला तेव्हा मत्रिणीकडून जे कळाले ते ऐकून सियाच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले.

६ वीचा वर्ग. मराठीचा तास. बाईंनी निबंधाच्या वह्यांचा गट्ठा सोडला. सर्व वर्गाच्या वह्या वाटून झाल्या फक्त सियाची वही बाईनी स्वतःकडे ठेवली. सियाचा निबंध वर्गात बाईंनी वाचून दाखवला, उत्कृष्ट निबंध लिहिल्याबद्दल सियाचे कौतुक केले व
सियाला तीची वही दिली. सियाने आपले रडू कसेबसे रोखून धरले. निबंधाचा विषय होता ' माझी आई'.

सिया ने आज थोडेफार जेवण केले व थोड्याच वेळात झोपी गेली. सियाच्या पप्पांनी दप्तरातून निबंधाची वही काढली, निबंध वाचल्यावर घरतील सगळे रडू लागले. खोटे लिहिले सियाने,ह्या संसाराचा गाडा ओढताना मी सियाला ती म्ह्णते इतके प्रेम इच्छा असूनही दिले नाही असे म्हणत तीची मम्मी(काकू) रडू लागली.

आज सियाच्या पप्पांना मुख्याध्यापक बाईंनी भेटायला बोलावले. अहो सगळ्या मुलांनी आपाल्या आईचे आधार कार्ड जमा केले. फक्त तुमच्या मुलिने अजून जमा केले नाही. आईचे जे काही नांव सांगते ते शाळेच्या रेकॉर्ड्शी जुळत नाही. १० वीच्या मुलीला आपल्या आईचे नांव माहीत नाही हे पटत नाही. सियाच्या पप्पांनी खरी हकिकत सांगितली तरी मुख्याध्यापक बाईंना त्यात काहीतरी गडबड वाटली. त्यांनी सियाला बोलावून घेतले व पुढे तिला जे काही प्रश्न विचारले ते ऐकून सियाच्या पप्पांना धरणीने पोटात घेतले तर बरे असे वाटले.

हे तुझे कोण?
पप्पा.
मम्मीचे नांव?
तेच जे अगोदर सांगितले
तुला काका आहेत का?
होय.
त्याना बायको आहे का ?
नाही.
कुठे आहे ती ?
माहीत नाही.
तुझ्या पप्पांना बायको आहे का?
हो.
तीचे नांव काय?
पुन्हा तेच नाव.
आता मुख्याध्यापक बाई रागाने लाल झाल्या होत्या. त्यांनी सियाला बाहेर पाठविले.
सिया तिच्या काकूला आई समजू लागली त्यामुळे आम्ही सियाला तीच्या आईबद्दल कधिच काही सांगितले नाही. आज तिला सगळे कळत असले तरीही तिचे मन ते मानत नाही. सियाच्या पप्पांच्या खुलाशाने मुख्याध्यापक बाईंचे समाधान झाले नाही.

दुसर्‍या दिवशी सियाच्या पप्पांनी आपल्या पत्नीच्या डेथ सर्टिफिकेटची झेरॉक्स शाळेत जमा केली तेव्हाच मुख्याध्यापक बाईंचा आत्मा शांत झाला.

शिक्षण

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

1 Jul 2015 - 7:21 am | उगा काहितरीच

अशा कथांना सुंदर कसे काय लिहावे तेच कळत नाही.

एक एकटा एकटाच's picture

1 Jul 2015 - 7:44 am | एक एकटा एकटाच

लिखाण चांगलय.

मार्मिक गोडसे's picture

1 Jul 2015 - 9:54 am | मार्मिक गोडसे

मागच्याच आठवड्यात सियाच्या (नांव बदलले) बाबबतीत घडलेली (आधार कार्ड) ही सत्यघटना आहे.

टवाळ कार्टा's picture

1 Jul 2015 - 11:30 am | टवाळ कार्टा

य्झ साले

मागच्याच आठवड्यात सियाच्या (नांव बदलले) बाबबतीत घडलेली (आधार कार्ड) ही सत्यघटना आहे

.
दुर्दैवी घटना.

आधार कार्ड देताना आपला आधारच हरपला आहे असे वाटले असेल सियाच्या वडलांना.

बॅटमॅन's picture

1 Jul 2015 - 12:14 pm | बॅटमॅन

.........

किती दुष्ट मुख्याध्यापक! एवढ्या निरागस जिवाला रडवायचे म्हणजे काय!
पण कथा खरेच अगदी ह्रिदयस्पर्शी!

नुसती कथा नाही तर सत्यकथा.

पाटीलअमित's picture

4 Jul 2015 - 2:03 am | पाटीलअमित

मी अश्या बर्याच शाळा बघितल्या आहेत ,मुख्याध्यापिका स्वतः घरी खाजगी क्लास घेतात जबरदस्ती

अभिजित - १'s picture

9 Jul 2015 - 7:41 pm | अभिजित - १

इथे नाव टाका कि ..

सानिकास्वप्निल's picture

4 Jul 2015 - 2:18 am | सानिकास्वप्निल

ओह.... :(

श्रध्दा जाधव's picture

5 Jul 2015 - 9:03 am | श्रध्दा जाधव

नुसती कथा वाचूनच मन हेलावून गेलयं.. जर ही सत्य घटना असेल तर त्या मुलीच्या अवस्थेची कल्पनाही अंगावर काटा आणते.

भिंगरी's picture

6 Jul 2015 - 2:06 pm | भिंगरी

त्या मुलीला समुपदेशनाची आवश्यक्ता आहे असे वाटते का?

विवेकपटाईत's picture

5 Jul 2015 - 9:45 am | विवेकपटाईत

मस्त कथा आवडली. सत्य कधी कधी भयंकर असते ...

ऋतुराज चित्रे's picture

9 Jul 2015 - 4:08 pm | ऋतुराज चित्रे

वाईट वाटले.
आईच्या निधनानंतर लगेचच सियाला तिच्या काकूच्यारुपाने मायेचा आधार मिळाला, खरे तर हाच एकत्र कुटुंबापद्धतीचा मुळ उद्देश असतो. नुसते एकत्र असून चालत नाही तर सियाच्या काकूसारखा समजुतदारपणा,आपलेपणा लागतो. सलाम सियाच्या मम्मीला (काकूला).
मुख्याध्यापकबाईंचे वर्तन तर विकृतच वाटले. एका सुंदर मुर्तीवर छिंन्नी हातोड्याचे घाव घालून मुर्तीला विद्रुप करण्याचे पाप ह्या बाई विद्यामंदिरात कशा काय करू शकतात? संताप संताप होतो अगदी असे काही ऐकले की.
शालेय प्रवेशाच्या मुलाखतीपासून कोवळ्या जिवांवर अत्याचार केले जातात, कधी गणवेषावरून, तर कधी फी वेळेवर न भरल्याने ह्या कोवळ्यांचा काहीही दोष नसताना शाळेतुन हाकलले जाते. त्यात हे आईच्या आधारकार्डाचे नवीन खूळ. कशासाठी शाळांना हे आधार कार्ड लागते. वरील लेखात शाळेत मुलीच्या आईचे आधार कार्ड नसल्याने मृत्युचा दाखला चालू शकतो तर मुलीने खर्‍या आईऐवजी आपल्या काकूचे नांव सांगितल्याने मुख्याध्यापक्बाईंना काय फरक पडणार होता?

दुष्ट लोक हो दुसरं काही नाही. त्यांना दुसर्याला त्रास झालेला बघायला आवडतो!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2015 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

:(

श्रीरंग_जोशी's picture

9 Jul 2015 - 10:59 pm | श्रीरंग_जोशी

कथा वाचून वाईट वाटले अन मुख्याध्यापिका बाईंचा राग आला. यावरून आठवलेले काही...

१९९९ साली सौदीमध्ये राहणार्‍या आमच्या ओळखीच्या एका कुटूंबाचा एका सहलीदरम्यान अपघात झाला. कुटुंबातली आई व ८ वर्षांचा मुलगा यांचा त्यात मृत्यू झाला. वडील काही दिवस इस्पितळात होते. लहान मुलगी बहुधा अडीच वर्षांची असावी तिला सुदैवानी काही झाले नाही.

नंतर ते गृहस्थ भारतात राहू लागले व मेहुणीबरोबर लग्न केले. त्यानंतर बहुधा दीड दोन वर्षांनी त्या लहान मुलीने शाळेत कुणाचे तरी तिच्याबद्दलचे बोलणे ऐकले अन घरी येऊन मावशीला (नव्या आईला) प्रश्न विचारला.

मेली म्हणजे काय गं?

:-(

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

10 Jul 2015 - 9:42 pm | अरवीन्द नरहर जोशि.

एकत्र कुटुंबाचा हाच खरा फायदा आहे .

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

10 Jul 2015 - 9:42 pm | अरवीन्द नरहर जोशि.

एकत्र कुटुंबाचा हाच खरा फायदा आहे .

पैसा's picture

13 Jul 2015 - 10:36 pm | पैसा

मुख्याध्यापिका बाईंचे वागणे नियमावर बोट ठेवून भावनाशून्य असे वाटते. पण आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ते जुन्या काळचे नाते उरलेले नाही. बिचार्‍या सियाला खूप मोठा धक्का बसला हे खरे पण तिला प्रेमाने तिची खरी आई दुसरी होती हे नीट समजावून सांगितले पाहिजे. म्हणजे असे बाहेरून अजून धक्के बसणार नाहीत. यासाठीच दत्तक घेतलेल्या मुलांना ती जरा कळती झाली की सत्य सांगावे असे म्हणतात. यामुळे तिला काकूच्या मायेचे महत्त्व जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येईल.