इये सुगंधाचिये नगरी!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in भटकंती
19 Jun 2015 - 9:46 pm

.

र्‍हाइनच्या दोन्ही काठावर वसलेली युरोपातली एक महत्त्वाची नगरी म्हणजे क्योल्न! क्योल्न.. लॅटिनमधील कलोनिया म्हणजे कॉलोनी ह्या शब्दापासून आलेलं नांव क्योल्न! (कदाचित जिभेला जास्त व्यायाम नको म्हणून्)इंग्रज साहेबाने त्याचे कलोन असे बारसे केले. जर्मनीचे सांस्कृतिक,व्यापारी आणि दळणवळण केंद्र म्हणून अगदी सुरुवातीपासूनच सक्रिय असलेली ही महत्त्वाची नगरी!रोमन कालातही हिचं स्थान अग्रणी होतं. जर्मनीतली सर्वात जुनी युनिवर्सिटी क्योल्नचीच आणि जगप्रसिध्द एव्ह द कलोनचा जन्म इथेच झाला.इथली भाषा क्योल्श आणि इथली प्रसिध्द बिअरही क्योल्श!
.
फ्रांकफुर्ट ते क्योल्न हे अंतर १९१ किमी.गाडीने दोन तासात हे अंतर सहज पार होते पण आयसीइ ने म्हणजे जलद रेल्वेने मात्र तासाभरातच आपण कलोनला पोहोचतो. तासभर वाचण्यापेक्षाही रेल्वेने जाण्याचे आपुलकीचे कारण म्हणजे आमचे आकिम आजोबा!ह्या जलद रेलट्रॅकच्या बांधणीच्या टिममधले आमचे आकिम आजोबा हे एक इंजिनिअर आहेत. रेल्वेने किवा रस्त्याने क्योल्नच्या दिशेने प्रवास करत असतानाच आकाशाच्या पोटात घुसू पाहणारे दोन उंचच उंच कळस आपण जवळ आल्याची वर्दी देतातच. हेच ते सुप्रसिध्द क्योल्नर डोम अर्थात कलोन कॅथीड्रल!कलोनच्या आर्चबिशपची ही गादी! ह्या कॅथिड्रलच्या आवारात, अगदी अंगणातच रेल्वे स्टेशन आहे असं म्हणता येईल.

.

अतिशय भव्य असं हे कॅथिड्रल बांधणं कित्येक शतकं चाललं होतं.इस.१२७८ मध्ये सुरू झालेलं बांधकाम साधारण १४७३ च्या सुमाराला थांबलं. लोकांचा ह्या डोममधला रस आणि पेशन्स संपत चालला होता. ते तसंच अर्धवट कित्येक वर्षे राहिलं आणि १९ व्या शतकाच्या सुरुवातीला परत काम सुरू झालं आणि शेवटी १८८० मध्ये मूळ नकाशानुसारच पूर्णत्वाला नेलं आणि लवकरच युरोपातलं एक मोठ्ठं आणि महत्त्वाचं स्थान त्याला मिळालं. स्पेनमधील सिव्हेले आणि इटालीतील मिलान येथील कॅथिड्रल नंतर भव्यपणात ह्याचाच नंबर लागतो. ह्या डोमच्या चारही बाजूनी दगडी पायर्‍यांवरुन चढून मुख्य द्वारापर्यंत पोहोचता येते. आत प्रवेश करायच्या आधीच नजरेत भरते ते समोरचे भव्य प्रांगण आणि मुख्य भव्य द्वाराबाहेरची आणि द्वारावरची कलाकुसर आणि ठिकठिकाणी असलेले पुतळे!प्रवेशदारावर थोडे उंचावर असलेले अनेक ऑपोस्टल्सचे पुतळे जणू आपल्याला आशीर्वच देण्यासाठीच आहेत असे वाटते.आत शिरले की जाणवते ती भव्य शांतता! हो, तेथल्या भव्यतेसारखीच तिथली शांततही भव्य वाटते. इतकी चच्र्,कथीड्रलं पाहिली.. पण अशी भव्य शांतता क्वचित कुठे आढळली. अगदी व्हॅटिकन,रोम आणि अगदी पॅरिसमधल्या नॉट्रादॅममध्येही मला असा फिल आला नाही.
.
आत शिरताच दिसते ती एकेका कोपर्‍यातली मेणबत्त्यांची आरास. चहूबाजूच्या कोपर्‍यांतून एकेक संताचा किवा मेरीमातेचा पुतळा आणि त्याच्यासमोर भक्तांनी गार्‍हाणी घालण्यासाठी, अर्चने,प्रार्थनेसाठी केलेली मेणबत्त्यांची आरास त्या भव्य शांतपणात भर घालत असते. सगळीकडे काचेची तावदाने आणि त्यातील काचांवर बायबल आणि ग्रीक पुराणातले चित्रित केलेले प्रसंग दिसतात. सूर्यप्रकाश त्या रंगीत काचातून गाळून आत येतो आणि काचा प्रकाशमान होतानाच काचांवरची चित्रे सजीव झाल्यासारखी भासतात. ह्या डोममध्येच तीन राजांचे अवशेष जपणारे चांदी सोने आणि तांब्यावरती कलाकुसर केलेले निकोलस ऑफ वेर्दुन ह्या फ्रेंच सोनाराने बनवलेले श्राइन आहे.ह्या श्राइनवर अपोस्टल्स आणि ख्रिस्तपुराणातले अनेक प्रसंग कोरले आहेत. तेथे असलेला ओकच्या लाकडातला कोरलेला ख्रिस्ताचा पुतळा, गेरो द ग्रेट ह्या कलोनचा अर्चबिशपला मानाचा मुजरा म्हणून गेरो क्रॉस नावाने ओळखला जातो.

ह्याच डोमच्या कळसावर जाण्यासाठी ५०० च्या वर ,अगदी नेमकंच सांगायचं तर ५०९ दगडी पायर्‍या आहेत. त्या चढून वर गेले की कलोन शहराचे विहंगम विलोभनीय दृश्य पाहताना सारा थकवा दूर होतो.

कथीड्रल मधून बाहेरच्या प्रांगणात आलं की समोरच कलोन दर्शनाच्या वेगवेगळ्या गाड्यांचा बोर्ड दिसतो. हॉप ऑन हॉप ऑफ बस ,किवा आपल्या फुलराणीसारख्या शोकोलाडं एक्सप्रेस म्हणजे चॉकलेट एक्सप्रेस किवा झू एक्सप्रेस हवे ते तिकिट काढून घेऊन कलोनचा फेरफटका मारता येतो किवा सरळ हातात कलोनचा नकाशा घेऊन भटकता येतं. कलोनचे रस्ते अगदी आखीव रेखीव आहेत आणि डोमचे कळस तर कुठूनही दिसतातच, त्यामुळे चुकायची भीती नाहीच. पण हाताशी वेळ कमी असेल तर मात्र बस किवा फुलराणी घेणे सोयीचे होते. क्योल्नर डोम व्यतिरिक्त सेंट मार्टिन चर्च, होली ट्रिनिटी चर्च, संत सेव्हरिनची बॅसिलिका अशी महत्त्वाची धार्मिक स्थळं आहेत पण ह्या सर्वात वलयांकित आहे ते क्योल्नर डोमच!
.
.

.

पुरातन कलोनला मजबूत वेस होती आणि तिला १२ प्रवेशदरवाजे होते. आजही त्यातले तीन सुस्थितीत आहेत. १२व्या शतकातला टाऊन हॉल हा आजही वापरात असलेला कलोनचा टाऊन हॉल हा जर्मनीतलासगळ्यात जुना टाऊन हॉल आहे. कलोनमध्ये ३० च्या वर संग्रहालये आहेत त्यातील सिटी म्युझिअम हे एक महत्त्वाचं म्युझिअम!प्राचीन कलोनचे देखणे मॉडेल येथे ठेवले आहेच पण दुसर्‍या महायुध्दानंतर ९५% बेचिराग झालेल्या कलोनचं चित्रंही येथे दिसते आणि नकळत आपणही इतिहासाचे पान पालटत मागे जातो.
.
ह्या इतिहासातून आपल्याला वर्तमानात आणते ते चॉकलेट म्युझिअम! येथे जाताना चॉकलेट एक्सप्रेसने किवा कथीड्रलच्या मागच्या बाजूने नदीकाठावर उतरुन सरळ सरळ चालत जायचं. अगदी नदीतच काचेचा जास्त वापर करुन एखाद्या जहाजाच्या आकाराचे हे म्युझिअम बांधले आहे.देवाचे पेय असलेल्या चॉकलेटच्या उगमापासून ते पार आजच्या आधुनिक पध्दतींपर्यंतचा सारा इतिहास येथे आपल्याला पहायला मिळतो. चॉकलेटे बनावायचे पूर्वीचे साचे आणि आताची यंत्रेही तेथे आहेत. कोको दळण्यापासून ते चॉकलेट तयार होईपर्यंतची सारी यंत्रे कशी काम करतात हे चित्ररुपाने, मॉडेल्स रुपानदापहायला ठेवले आहे. कोको, कॉफी, व्हॅनिलाची झाडे तेथे हरितगृहात वाढवली आहेत.कोकोच्या बियांपासून ते पार चॉकलेटची वडी होईपर्यंतचा प्रवास पाहताना अगदी आरे मिल्क कॉलनीतली शाळेची ट्रीप आठवतेच. चॉकलेटच्या मोठ्ठ्या कारंज्यासमोर वॅफेलवर ओतून दिलेले चॉकलेट सॉस खाताना सगळे आपली वयं विसरतात. खिसे हलके आणि पिशव्या जड करुन तेथून निघायचे. अगदी नाकासमोर सरळ चालत गेले की कलोनचे कॅथिड्र्ल दिसते. नदीच्या पाण्यात पाय बुडवून ध्यान लावून बसलेल्या साधूसारखं..
.

.

.

कॅथेड्रल पासून १० एक मिनिटाच्या अंतरावर ग्लोकनगासं ४ ह्या रस्त्यावर एव्ह द कलोनचे मुख्यालय आहे. हेच ते सुप्रसिध्द ४७११ हाउस. इथेच कलोनवॉटरने पहिले ट्यां केले.. आणि त्याचा सगळा इतिहास त्या घरात अगदी निगुतीने जपला आहे. १८ व्या शतकात योहान मारिया फारिना ह्या कलोन मध्ये राहणार्‍या,मूळ इटालियन असणार्‍या गंधवेड्याने हा सुगंध तयार केला आणि त्याला नाव दिले एव्ह द कलोन म्हणजेच कलोनचे पाणी!
.

.

त्या काळात एलिट सोसायटीत फ्रेंच जास्त बोलले जात असे त्यामुळे फारिनाने आपल्या ह्या सुगंधी निर्मितीचे नाव फ्रेंच ठेवले असावे.क्योल्नवर थोडा फ्रेंच प्रभाव आहेच आणि नेपोलियनच्या सैन्याने कलोन काबीज केले होते आणि अनेक वर्षे ते फ्रेंचाच्या ताब्यात होते. ह्या क्योल्निश वासर म्हणजेच कलोनच्या पाण्याने कलोन शहराची कीर्ति जगभर नेली.फरिना २५ नोव्हेंबर १७६६ मध्ये सुगंधात विलिन होऊन गेला पण आजही त्याची आठवी पिढी हे गंधाचं देणं जगाला देत आहे. ह्या सुगंधाने मोहून गेली नाही अशी व्यक्ती विरळाच! ह्या आधीचे पोप बेनेडिक्ट १४ ह्यांनी स्वत:साठी स्पेशल कस्ट्म मेड कलोनची खास मागणी केली होती. त्या घराजवळ जात असतानाच तो परिचित सुगंध जाणवू लागतो. आत शिरताच तो दरवळ मन प्रसन्न करतो. आत शिरताच एका तोटीतून सतत वाहत राहणारे ,सुगंधाची उधळण करणारे एव्ह द कलोन आहे.तेथील मांडण्यांमध्ये एव्ह द कलोनचे वेगवेगळे प्रकार, स्प्रे,साबण, टिश्यू विक्रीसाठी सुबकपणे रचून ठेवले आहेत.कोपर्‍यातला जिना चढून वर गेले की तेथल्या गॅलरीत एव्ह द कलोनला वेळोवेळी मिळालेली पदके, बक्षिसे, मानपत्रे आहेतच पण वेगवेगळी जुन्यानव्या काळातली चित्रे आहेत, जुन्या काळातल्या एव्ह द कलोनच्या कुप्या ,बाटल्या कलात्मकरीत्या मांडून ठेवल्या आहेत.
.
.
.
सगळीकडे तो परिचित गंध दरवळलेला असतोच.तो गंध मनात मनसोक्त भरुन घेऊन मगच तिथून बाहेर पडायचे आणि सार्‍या कलोनचाच दरवळ मनात ठेवून गाडीकडे कूच करायचे.

(काही प्र.चित्रे जालावरून साभार)

प्रतिक्रिया

अजया's picture

19 Jun 2015 - 9:55 pm | अजया

सुगंधित सफर!मस्तंच!

श्रीरंग_जोशी's picture

19 Jun 2015 - 9:55 pm | श्रीरंग_जोशी

सुगंधाचिये नगरी उत्तमपणे शब्दबद्ध केली आहे. फोटोजही छानच.
वेशीवरचे प्रवेशद्वार तर भारतातलेच आहे असे वाटते.

या लेखाचा सुगंध मिपावर दरवळत राहो...

मुक्त विहारि's picture

20 Jun 2015 - 11:24 am | मुक्त विहारि

+ १

वा! फारच सुरेख लेख स्वातीताई!

पद्मावति's picture

19 Jun 2015 - 10:26 pm | पद्मावति

खूप वर्षांपूर्वी गेले होते इथे. पण काहीच नीटपणे आठवत नव्हतं. तुमच्या लेखाने सगळं पुन्हा डोळ्यासमोर उभं राहिलं.
सुरेख वर्णन आणि फोटोपण.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jun 2015 - 10:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुरेख सुगंधसफर !

मस्त लेखन. वरून तिसरा फोटू ग्रेट आलाय. पुरातन कलोनची वेस अगदी दणकट आहे.

प्रचेतस's picture

19 Jun 2015 - 11:29 pm | प्रचेतस

अतिशय सुरेख.
शीर्षकावरून कलोनविषयी असेल असे वाटलेच होते.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jun 2015 - 12:47 am | अत्रुप्त आत्मा

प्लस 1 टु आगोबा!

सूड's picture

20 Jun 2015 - 12:58 am | सूड

सहीच!!

रुपी's picture

20 Jun 2015 - 4:46 am | रुपी

फारच छान वर्णन केले आहे..

नूतन सावंत's picture

20 Jun 2015 - 11:13 am | नूतन सावंत

स्वाती, सुरेख सुगंधित वर्णन आणि सफरही.

रामदास's picture

20 Jun 2015 - 12:25 pm | रामदास

सुगंधाची एक कुपी स्वातीताईनी मला दिली होती. जपून ठेवली आहे.

प्रीत-मोहर's picture

21 Jun 2015 - 9:09 am | प्रीत-मोहर

मस्त

जुइ's picture

21 Jun 2015 - 9:18 am | जुइ

माहिती आणि फोटो दोन्ही छान आहेत!

स्पंदना's picture

22 Jun 2015 - 6:48 am | स्पंदना

कलोन!!

माहिती आणी फोटोज दोन्ही आवडले.

माहिती आणी फोटोज दोन्ही आवडले.

अदि's picture

22 Jun 2015 - 10:37 am | अदि

मस्त!!

स्वच्छंदी_मनोज's picture

22 Jun 2015 - 1:23 pm | स्वच्छंदी_मनोज

स्वाती ताई मस्तच..
हा सुगंध माझ्याही आवडीचा. पहील्यांदा भेट दिल्या नंतर एवढे आवडले की प्रत्येक वेळी कलोन ला भेट देऊन ४७११ घेऊन आलोय.

मधुरा देशपांडे's picture

22 Jun 2015 - 9:26 pm | मधुरा देशपांडे

मस्त लिहिलंय स्वातीताई. तसे जवळ असुनही अजुन कलोन भेट राहिली आहे. यावर्षी नक्की जाणार.

सर्वसाक्षी's picture

22 Jun 2015 - 10:08 pm | सर्वसाक्षी

मस्त सफर! माहिती बारकाईने गोळा केलेली दिसते, साद्यंत तपशिल आहे. फोटोही मस्त.
फोटोग्राफी विषयक प्रसिद्ध 'फोटोकिना' प्रदर्शन इथेच भरतं ना?

साक्षी

पैसा's picture

22 Jun 2015 - 11:09 pm | पैसा

मस्त! खूपच माहितीपूर्ण लेख!

यसवायजी's picture

23 Jun 2015 - 12:47 am | यसवायजी

छान. व्यवस्थित,मस्त माहिती दिलीत. मी पाच-सहा दिवस राहिलोय कलोनाला. रोज संध्याकाळी या चर्चच्या बाहेर फिरायला जायचो. लै भारी वातावरण. तुम्हा लोकांकडून (टीम यूरोप) अजुन वाचायला आवडेल. अजुन फोटो टाका की.
-
निनादच्या कलोनवरील लेखाचा दुवा-
जर्मन आख्यान भाग ७

आणी हा माझ्या-
भ्रमण जर्मनी- कलोन

स्वाती दिनेश's picture

24 Jun 2015 - 12:40 pm | स्वाती दिनेश

सर्वांना धन्यवाद.
कलोन फ्राफु हून अगदीच तासदोनतासावर असल्याने अनेकदा जाणे होते. कितीही वेळा गेलं तरी कलोनचे चैतन्य खुणावतच राहते पण अगदी जवळच्या दोस्ताला जसं आपण गृहित धरतो तसं काहीसं कलोनबाबतीत झालं.. त्यामुळेच कदाचित इतक्या वर्षात कधी क्योल्नवर लिहिलं गेलं नाही माझ्याकडून..
परत एकदा सर्वांना धन्यवाद.
स्वाती

उमा @ मिपा's picture

24 Jun 2015 - 1:19 pm | उमा @ मिपा

अहाहा! चॉकलेट आणि सुगंध दोन्ही आवडीच्या गोष्टी, छान वाटलं ग वाचून! अगदी तुझ्यासोबत फिरतेय असं वाटलं
भरपूर माहिती मिळाली.

केदार-मिसळपाव's picture

24 Jun 2015 - 2:27 pm | केदार-मिसळपाव

ह्या डोम ला भेट दिल्यावर नेहमीच खुप छान वाटते.
पुर्वी आउरिख ( ओस्ट्फ्रिसलांड ) ला असतांना सतत डार्मस्टाड ला प्रवास करावा लागायचा, त्यावेळी हमखास क्योल्नला थांबायचो आणि क्योल्नर डोम ला एक फेरफटका मारुन पुन्हा पुढची गाडी पकडायचो. प्रत्येक क्योल्नभेटीत इथे जाणे पक्के असते माझे. एकदम भव्य आहे हे डोम, रेल्वेस्टेशनच्या बाहेर आले की एकदम डोळ्यात भरते, पण कधिही कॅमेर्‍यात पुर्ण आले नाही.
मस्त वर्णन. लिहीत राहा.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

24 Jun 2015 - 5:30 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त सुगंधी सफर..

मदनबाण's picture

25 Jun 2015 - 9:30 pm | मदनबाण

मस्त लेखन... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Amazing Girl Drummer Does BIGBANG ;)