मला गांधी भेटला होता ही कविता फेसबुकवर वाचायला मिळाली. कवितेतला आशय कसा असावा याबद्दल कुठलंही मत न नोंदवता पण असं म्हणावंसं वाटतं की साहीत्य अकादमी वगैरे वगैरे वाचून अपेक्षा बनल्या त्या मानाने कविता तितकीशी ग्रेट वाटली नाही. पण या अपेक्षा बाजूला ठेवल्या तर नामदेव ढसाळांच्या प्रभावात कविता लिहीली गेली का अशी शंका येते. कवीविषयी माहीती असल्याशिवाय मत बनवू नये असा नियम आहे हे नव्याने कळालं.
आजही श्रावणात घननिळा, क्षणोक्षणी पडे, मधु मागसि माझ्या इ. इ. इ. कविता आवडणे ही जशी आवड आहे, तशी त्याला पाऊस आवडत नाही ही अकविता सुद्धा आवडते, भटांच्या, जमादारांच्या गझला आवडतातच की. ढसाळ आवडतात तसे ग्रेसही आवडतात. थोडक्यात, कवितेचा द्वेष्टा नाही ही पार्श्वभूमी उघड व्हावी.
यातले शब्द सहज आलेले वाटले नाहीत. ढसाळादी कवी ज्यांचं बालपण कुठल्या परिस्थितीत गेलं त्या परिस्थितीतून त्या शब्दाचं दाहक चित्रण करताना वापरलेले शब्द आणि त्यासोबत मराठीला दिलेले काही असाधारण शब्द हा त्या कवितांचा युएसपी म्हणावा लागेल. इथे तो साचा वापरतांना सार्कझमचा अतिरेकी वापर, जो त्या काळी कदाचित नवा असावा, केला गेलाय असं वाटलं. कवीचा प्रयत्न विसंगतीकडे लक्ष वेधून घ्यायचा आहे यात शंका नाही.
आज ही मांडणी बाळबोध वाटू शकते. तसंच कवितेचं प्रारूप निबंध की कविता असं बुचकळ्यात टाकतं. ही कविता वृत्तात, लयीत बसवणं हे आव्हान पेलल गेलं असतं तर एक सौंदर्यस्थळ वाढलं असतं. छंदमुक्त कविता ही धड कविता वाटत नाही आणि निबंध, ललित म्हणून वाचतांना धडकी वाटत नाही. वेगवानही नाही आणि फिरकीही नाही अशी गोलंदाजी कितीही उपयुक्त असली तरी पाहताना रटाळ वाटते तसं. गांधी देवळात भेटला तेव्हां अमूक करत होता यात भावना फोचल्या होत्या हो, पण तेच तेच लांबण लागल्याने रटाळ वाटू लागतं. चांगला चित्रकार कमीत कमी रेघांत व्यक्त होतो, तर कवी किमान शब्दांत.
सगळ्यात महत्वाचं असं की कविता वाचल्यावर खूप काही भन्नाट वाचलंय असा फील आला नाही. एक तर पुण्यात राहत असल्याने उपरोधिक लिखाणाचे (खरं तर चितळे सोडून कशाचेही) कौतुक करावे अशी निकड नाही. त्यातून हल्ली नावीन्य राहीलेलं नाही.
टीप : तर हे जे काही मांडलंय ते सामान्य माणूस (वाचक ही मोठी पदवी आहे ). त्यामुळे लेखकाची आकलनशक्ती पणाला लागेल असे प्रश्न विचारून त्यास अडचणीत आणू नये (ही सध्या तरी) णम्र विनंती.
तळटीप : विनंतीचा मान न राखला गेल्यास पुणेरी बाणा दाखवायचा की नाही याचे सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत याची णोंद घ्यावी ही उपविणंती.
प्रतिक्रिया
27 May 2015 - 10:50 am | खटासि खट
शुद्धलेखनाबद्दल एक डाव माफी
27 May 2015 - 11:00 am | जेपी
कविता डकवायची होती...मंजे वाचली असती..
27 May 2015 - 6:48 pm | खटासि खट
प्रताधिकार भंग झाला असता. तिकडं फेसबुकवर कुणी मनावर घेत नाही. लिंक सेव्ह केलेली नाही.
कुणाला वाचायची असल्यास सुनील तांबे यांच्या प्रोफाईल वर किंवा गुगल वर सर्च देऊ शकता.
27 May 2015 - 11:43 am | संदीप डांगे
प्रकरण वादग्रस्त आहे त्यामुळे लिंक न देऊन बरंच केलंय. इच्छुकांनी मराठीत गुगल सर्च मारून मीडीयावॉच ची तीसरी लिंक उघडावी.
बाकी ही कविता, त्यातली वाक्यं म्हणजे तोफांचे गोळे आहेत एक एक.
27 May 2015 - 6:48 pm | खटासि खट
मराठीत गुगल सर्च मारून मीडीयावॉच ची तीसरी लिंक उघडावी. >>> शाब्बास !
27 May 2015 - 7:14 pm | आदूबाळ
पण कविता वाचून काहीच समजलं नाही.
28 May 2015 - 12:13 am | संदीप डांगे
शक्य आहे. तत्कालिन खूप संदर्भ आहेत त्यात. आज त्या संदर्भांची ओळख पटणे जरा कठीण आहे.