दुसरं घर पहावं बांधून (पाठपुरावा)

कौन्तेय's picture
कौन्तेय in काथ्याकूट
3 May 2015 - 1:20 am
गाभा: 

गवि भाऊ,
जवळपास तीनेक वर्षांपूर्वी काढलेल्या धाग्याचा पाठपुरावा आहे हा. त्यावेळी मी पनवेलनजीक एका अनोळखी गावात दुसरं घर बांधायला काढत होतो आणि गावकऱ्यांकडून होणाऱ्या काही अडवणुकींसाठी सल्ला मागण्यासाठी तो निम्नोल्लेखित धागा काढला होता. भरपूर् जणांनी उदंड प्रतिसाद दिले, चिमटे काढले, सल्ले दिले, युक्त्या सांगितल्या, शुभेच्छा दिल्या ... एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढल्या - मजा केली.

http://www.misalpav.com/comment/382942#comment-382942 या तुमच्या टिपणीद्वारे तुम्ही "दुसरे घर ही नापास संकल्पना आहे. ती यशस्वी झाल्याचे माझ्या पहाण्यात नाही; काही वर्षांनी मला तुमचा अनुभव सांगा" अशा अर्थाची सूचना केली होती. त्यानंतर पाताळगंगेतून बरेच पाणी वाहून गेले. रस्ता व माझे घर यांच्या मधे गावातल्या राजकीय धेंडांनी एका गरीब कातकऱ्याला भरीस पाडून माझ्या प्रवेशद्वाराशेजारीच एक ओंगळवाणे झोपडे टाकवले. त्याला बेकायदेशीर घरपट्टीही देववली. आमची लेखी तक्रार दाबून ठेवली. त्या बहाद्दराने तिथे कोंबड्या कापायचा व्यवसाय सुरू केला. ज्यांनी आमचे घर बांधायचे कंत्राट घेतलेले त्यांनी त्याला तिथून काढून द्यायचे काही पैसे मागितले. ते न देता आम्ही पोलिसांकडे गेलो. पोलिसांनी त्याच्या घरात घुसून त्याला व त्याच्या अपरोक्ष त्याच्या बायकोला दमदाटी वगैरे केली. शेवटी तो उठला नाहीच; पण फ़ुकट आमचे नाव खराब झाले इ.इ. तऱ्हा तऱ्हा झाल्या.

एव्हाना घराच्या बांधकामात स्थानिक कसबामुळे राहून गेलेल्या त्रुटी डोके वर काढू लागल्या. दोन पावसाळ्यांत दुरुस्त्या करूनही वेगवेगळ्या ठिकाणांहून येऊन पाण्याची थारोळी फ़रशीवर दिसू लागली. सगळे बीम-बॉटमचे जोड उलगडू लागले. त्या दुरुस्त्या आता आटोक्यात असल्या तरी अजून सुरूच आहेत. त्यानंतर एक चांगलीशी घरफ़ोडीही झाली. पोलिसांनी तंटामुक्त गाव म्हणून गुन्हा नोंदवून घेतला नाही. हे सगळं सगळं निस्तरायला मी तिथे नसतोच. सगळा राडा माझे वडील व पत्नी यांनाच उचलावा लागतो. मग या दुसऱ्या घरावरून मला किती शिव्याशाप, कटकटी ऐकून घ्याव्या लागल्या असतील कल्पना करा. असो. या चोरीत नुकसान काही फ़ार झाले नाही तरी तो टर्निंग पॉइंट ठरला!
बाहेरून घर बऱ्यापैकी दिसत असले तरी घरफ़ोडी केल्यावर आतमधे माल काहीच नाही, म्हणजे हे शेट लोक नाहीत हे आजूबाजूच्या सगळ्यांना पटले. एक सहानुभूतीची भावना निर्माण झाली. आमचे बाबा, माझी पत्नी व मुले तिथे पंधरा एक दिवसांनी जात असल्याने, चार लोकांशी मुद्दाम ओळखी वाढवून हसून बोलत असल्याने, समोरच्या आदीवासी पाड्याला काहीबाही मदत करत असल्याने आमच्याबद्दलचा साशंकपणा, दुरावा कमी होत असल्याचे गावकऱ्यांच्या नजरेतून जाणवत होते.

गावात कातकरी आदीवासी नि मराठे असे दोन मुख्य गट. आम्ही दोघांच्या धुमश्चक्रीत एक प्रकारे सापडलेले. पण पहिल्या वर्षापासूनच दोन्हींकडच्या उत्सवांना, मंदीराला तिथल्या जबाबदार लोकांना भेटून, बोलून मी काही यथाशक्ती मदत सुरू केली होती. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून असेल कदाचित पण वातावरण निवळत असल्याचे काही संकेत मला मिळू लागले. पण वडील उत्साहात असले तरी अद्याप पत्नी व मुले तिथे जाऊन राहण्यासाठी अनुत्सुक असल्याचे पाहून माझी काळजी काही जात नव्हती. डोक्यात तुम्ही दिलेली कमेंट नि या अनुषंगाने लोकसत्तात वाचलेले धोक्याचे इशारे देणारे लेख सतत फ़िरत असत. काही महिन्यांपासून तिथे झाडे लावायला चहू बाजूंनी चांगलीशी सोय करून घेतली, जिथे सतत तण-झाडोरा माजे ती अंगणाची बाजू सरळ पेव्हर ब्लॉक्स टाकून वापरती केली व मुख्य म्हणजे झाडांना फ़क्त पाणी टाकायला एक कातकरी गडी ठेवला. घरात आवडीची झाडं, काही बियाणं, जंतुनाशके इ. येऊन पडले. पाणी देण्या व्यतिरीक्तची कामे रोजंदारीप्रमाणे त्या गड्याकडून करून घेत असल्याने वरकमाईपोटी तोही खुष झाला.

मागल्या दारातली पपई अल्पावधीत फ़ोफ़ावली. आता प्रत्येक ट्रिपमधे उतरवून आणलेले साखरेसारखे गोड फ़ळ शेजाऱ्या पाजाऱ्यांमधे, मित्रमंडळींत चांगलेच लोकप्रिय आहे. गावकऱ्यांची नरमाई व हे व्यवस्थात्मक स्थैर्य यांबरोबरच अंगणात जिवंत झाडे असल्याने आता बायकोला, मुलांना तिथे जाऊन त्यांची काळजी घेण्यात विशेष रस आहे. इतके दिवस हे लोक या घरातून बाहेर पडत नसत. आता गावात जाऊन, आजूबाजूच्या पाड्यांवर जाऊन कैऱ्या पाडून घरी घेऊन येण्यापर्यन्त मुलांचा धीर चेपला आहे. गावातून हमरस्त्याला जाणारी भाजी, मासळी आमच्या घरच्या खरेदीसाठी मिनिटभर दारात थांबते. गावाच्या हनुमान जयंती उत्सवात ‘देशपांडे सरांना’ मंचावर मानाची जागा राखून ठेवण्यात आली व तिथे आमच्या बाबांनी एक छोटेखानी भाषणही केले!

अजूनही ही सुरुवातच आहे, पण आज हे एवढ्या पाल्हाळिकपणे लिहिण्याचे कारण की आमचा प्रवास अपयशाच्या दिशेने चाललेला नाही. नव्या मुंबईतील आमच्या रहात्या घरापासून हे दुसरे घर फ़क्त २५ किमी अंतरावर आहे हा मुद्दा फ़ार महत्वाचा असला तरी माझ्या अनुभवांती सांगतो की काळ हे सर्वावर उत्तम औषध आहे. जोवर परिस्थिती आपल्या अपेक्षेप्रमाणे नियंत्रणात येत नाही तोवर फ़ार न उड्या न मारता योग्य मार्गाने सावकाश पुढेपुढे जात रहावे. कालांतराने गोष्टी जागेवर पडेस्तोवर आपण बऱ्यापैकी प्रगती केलेली असते.
॥ शुभम्‌ भवतु ॥

प्रतिक्रिया

..ग्रेट.खूप आवडला हा अपडेट.प्रत्येकाचा अनुभव वेगळा हे पटलं.

..धन्यवाद.

आदूबाळ's picture

3 May 2015 - 2:00 am | आदूबाळ

वा! अभिनंदन!

श्रीरंग_जोशी's picture

3 May 2015 - 2:16 am | श्रीरंग_जोशी

मनःपूर्वक अभिनंदन.
जुनी चर्चा तेव्हा वाचली होती. ते पाहून फारसे आश्वासक वाटत नव्हते.

तुम्ही माघार न घेता संयमाने व समंजसपणाने परिस्थितीला सामोरे गेलात हेच या यशाचे कारण आहे असे वाटते.

गावकर्‍यांतले एक झालात हे फार मोठी गोष्ट!!
यशाबद्दल अभिनंदन!!

जुइ's picture

3 May 2015 - 5:13 am | जुइ

खुप अभिनंदन!!

पैसा's picture

3 May 2015 - 7:59 am | पैसा

अपडेटसाठी धन्यवाद आणि तिथे तग धरून राहिलात त्याबद्दल अभिनंदन! आता घराच्या दुरुस्त्या सोडता काही प्रॉब्लेम येऊ नये.

आता मेरा गाव बडा प्यारा चा माझाही अपडेट. ज्या जमिनीवर गावगुंडाने केस घातलीय. त्या केसचा निकाल मामलेदार, प्रांत आणि दिवाणी कोर्टात आमच्या बाजूने लागला. आता तो जिल्हा कोर्टात कधी केस घालतोय याची वाट बघत आहोत. वकील आमच्या घराचा एक भाग झाला आहे. आणि त्याचा पगार चालू आहे!

दरम्यान त्याला कुळाचे पत्र देणार्‍या सरपंचाने आपली चूक झाली पण त्याच्याकडे आपले काही प्रकारे हात गुंतल्याने कोर्टात किंवा अन्यत्र तसे कबूल करू शकत नाही असे माझ्या सासर्‍याना सांगितले. मामलेदार कचेरीतील लँड रेकॉर्ड्स ठेवणार्‍या खात्यात अशा पिकाची नीट नोंद नसलेल्या जमिनी हेरून कोणाला तरी पुढे घालून केसेस करायच्या आणि मग हैराण होऊन त्या मालकाने जमीन विकायला काढली की स्वस्तात घेऊन लोणी वाटून खायचे असे उद्योग मामलेदार कचेरीतीलच लोक करतात अशी बातमी लागली. तेव्हा घरात विजेचे कनेक्शन सुद्धा नसलेला माणूस वकिलाला इतके पैसे देऊन केस कशी लढवू शकतो या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळाले. आता कितीही वर्षे आणि पैसे लागले तरी केस लढवायची असे माझ्या सासर्‍यांनी ठरवले आहे.

वकिलांशी गप्पा मारताना अजून एक प्रकार कळला. तुमच्या जमिनीची किंमत समजा ५० लाख आहे. तुम्ही जमीन विकायला काढल्याची बातमी लागली की बिल्डर आणि इतर दलाल लोक तुमचे असले नसलेले नातेवाईक शोधून काढतात आणि मग हे नातेवाईक जमिनीत हक्क सांगतात आणि दावे लावतात. केस चालू झाली की तुमची जमीन विकली जात नाही. मग वैतागून तुम्ही समेट करायला बघता आणि नातेवाईकांनाही पैसे वाटायला तयार होता. दरम्यान तुमच्या जमिनीची किंमत २५ लाखांवर आलेली असते. सगळ्यांना पैसे वाटत मूळ मालकाच्या हातात ५ लाख रुपये पडतात! त्यांनी असे घडल्याची २/३ उदाहरणे सांगितली तेव्हा विश्वास ठेवणे भागच पडले. सचाई का जमाना नहीं रहा!

धन्यवाद मंडळी
गविभाऊ, तुमची तेव्हाची टिपणी ही खोडसाळपणाची नव्हती, प्रामाणिक होती हे माहिती होतं म्हणून हा पुनश्च पंक्तिप्रपंच केला हो -
पैसाताई, काय बोलायचं? कल्याऽऽणमस्तु म्हणणं इतकंच आपल्या हाती आहे! :-)
पूर्वी देशोदेशीचे राजकारणी पैसा खाण्यासाठी प्रसिद्ध असायचे. आजकाल भारत, चीन सगळीकडेच राजकारण्यांचा, प्रभावशाली व्यक्तींचा, आपला, नातलगांचा सगळा रोख हा जमिनीकडे असतो. म्हणजे पैसे खाणारा राजकारणी परवडला, पण जमिनी हडपणारा नको असे म्हणायची स्थिती येऊन ठेपली आहे.
***
उत्तर टाकल्यावर लक्षात आलं! ... या लेखनात अभिप्रेत असलेला - खाल्ला, वाटला, कमावला, खर्चला, लुटला इ. जाणारा पैसा व मिपा.वरची पैसा यांत हे उत्तर वाचताना गल्लत होऊ नये याची नोंद घेन्याची कृपया. :-D

पैसा's picture

3 May 2015 - 8:32 am | पैसा

=))

पनवेलनजिक कोणत्या भागातलं वर्णन आहे हे? आपटा?
या अनुभवातून शिकण्यासारखे बरेच आहे!

कौन्तेय's picture

3 May 2015 - 8:57 am | कौन्तेय

अजयाबेन, हा आणि तीन वर्षे आधीचा दोन्ही लेख लिहिताना माझ्या मनात कटुता असली तरी मी कुठेही व्यक्तीगत दोषारोपण होऊ नये, व्यक्तींचा थेट संदर्भ येऊ नये याचा आटोकाट प्रयत्न केला आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. काही बाबतींत नाविलाजच आहे त्याला काय करणार? आताही गावाचं नाव बदनाम झालं म्हणून माझ्यावर नवा आक्षेप घेतला जाईल. त्यामुळे नकोच ते! क्षमस्व.

मी रसायनी भागात सतरा वर्ष झाली राहाते आहे,स्वतःचे घर बांधुन!अर्थात माझ्या व्यवसायामुळे मिसळुन गेल्याने असेल कधी गाववाल्यांचा त्रास अनुभवला नाहीये म्हणून कुतुहल वाटले.पण तुमचेही बरोबरच आहे.पोलिस किंवा स्थानिक राजकारणाचा फार काही त्रास जाणवल्यास अामच्या जवळच्या भागात असाल तर संपर्क साधा कधीही!

उगा काहितरीच's picture

3 May 2015 - 9:07 am | उगा काहितरीच

तीन वर्षापूर्वीच्या लेखाचा संदर्भ घेऊन आवर्जून अपडेट केल्याबद्दल धन्यवाद . आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा .

आवर्जून दिलेल्या अपडेटचे कौतुक वाटले. तुमचे बरे चालले आहे याचा आनंद वाटला.
पेशन्स ठेवलात तुम्ही!

नंदन's picture

3 May 2015 - 9:21 am | नंदन

वाचून बरं वाटलं, अभिनंदन!

नाखु's picture

4 May 2015 - 2:21 pm | नाखु

अनुभव कथन आणि चिकाटी+धाडसाला सलाम.

आपल्या कुटुंबीयाचे खास अभिनंदन सहसा शहरी/नागरी ठिकाणाहून अश्या ठिकाणी जाण्याची तयारी नसते.

खेडेगावातून शहरात यायला सारेच तयार असतात.

घरबांधणे ते उभारणे यात
बरेच शिकलेला+अजूनही शिकत असलेला विद्द्यार्थी नाखु

बाबा पाटील's picture

3 May 2015 - 12:20 pm | बाबा पाटील

गरिबांना मदत करा आणी आडवे आलेल्यांना कायमचे आडवे करा.गावगुंडांना काय पोर बाळ नसातत का ? हा विचार पहिला करा साला सगळ्यात भित्री जमात असते ही.एक कानफाटात बसली की परत थोबाड वर काढत नाहीत.जवळपासच्या परिसरात जसा प्रेमाचा संवाद हवा तसा अल्प प्रमाणात का होइना धाकही हवा. माझी चार ठिकाणी घर आहेत.पण आधीच अश्या प्रकारे वागायच की स्थानिक सरपंच असुदे नगरसेवक असु दे नाहीतर आमदार्,बाबा रिस्पेक्ट दे रिस्पेक्ट घे. नसेल जमत तर गेलास उडत. हा अ‍ॅप्रोच ठेवा,जग सुरळित चालत.

कौन्तेय's picture

3 May 2015 - 11:03 pm | कौन्तेय

बाबाजी, अगदी खरं. पण कसं आहे, मी वर्षाकाठी दोनदा दोन दोन आठवडे सुट्टीवर येणारा टुरिस्ट. आजतरी लफ़डी अंगावर घ्यायला कुचकामाचा आहे. घरी दोन लहान मुलं असताना वडील आणि पत्नी यांना आणखी एक टेन्शन! प्रवेशद्वारासमोर जे अनधिकृत झोपडं टाकलं गेलं ते मी तिथे असतो तर पहिल्याच दिवशी स्वतःच्या हातांनी त्याच्या चारी खांबांसकट उचकटून टाकलं असतं. पण घरबांधणीतल्या गुणवत्तेचा आपला कटाक्ष कंत्राटदाराला माहिती असूनही त्याच्याकडून नेमकी तिथेच राजरोसपणे होणारी चालढकल ते या असल्या बाबी - यांसगळ्यांकडेच बाहेर बसून चरफ़डत बघणे व मग रक्तदाब वाढला म्हणून सोडून देणे असं करत करत हे घर बांधून झालं आहे. भाईगिरी करायची तर तिथे ठांबेठोक बसायला हवे. माझा मूळ पिंड मवाळ असला तरी शेपुट घालणाऱ्याचा नाही. पण या शेळ्या उंटावरुउन हाकता येत नाहीत. तुमच्या या सल्ल्याचा मोक्याच्या क्षणी फ़ायदा होणार हे मात्र नक्की! आभार.

अजया, आपण दिलेल्या मदतीच्या ऑफ़रसाठीही आभारी आहे. जमेल तसे भेटू. मी पत्नीला बोलून ठेवतो.

मंडळी, निर्भेळ कौतुकासाठी सगळ्यांचाच ऋणी आहे.

नगरीनिरंजन's picture

3 May 2015 - 11:26 pm | नगरीनिरंजन

बराच त्रास झालेला दिसतोय तुम्हाला. पण तुम्हाला हवं ते मिळालं असेल आणि इफ यु थिंक इट वॉज वर्थ इट, तर तुमचे मनापासून अभिनंदन!

बाकी राहवत नाही म्हणून... बाबा पाटील व त्यांच्यासारखा प्रतिसाद देणार्‍या अन्य लोकांना मुद्दा समजला नाहीय असे वाटते. बाबा पाटलांचं "माझी चार ठिकाणी घरं आहेत" हे वाक्य तर या संदर्भात विनोदी वाटलं. असो.

बाबा पाटील's picture

4 May 2015 - 12:33 pm | बाबा पाटील

चार घरांच वाक्य उगिच टाकल नाही तर ती खरच आहेत.प्रत्येक ठिकाणी जी बांधकाम केली आहेत ती लेबर वर्क वर केली आहेत.कारण काँट्रक्टर जे काम ११००-१२०० रु प्रती चौ.फुट घेतो ते आपण करुन घेतल की ७००-७५० रुपयाने पडत. याच्यात त्रास भयानक असतो,प्रसंगी स्पेशली प्लंबिंगवाला आणी लाइटवाला,पाणीवाला यांच्यावर हातही टाकावा लागतो कारण हेच लोकल असतात बाकीचे परप्रांतिय असतात.ते निट काम करतात.लोकल पब्लिक भयानक माज करत त्याच्या दुप्पट माज आपल्याला करावा लागतो.त्याशिवाय कामच होत नाही.आताही मी माझ्या हॉस्पिटलच्या बांधकामात आहे.दररोज सकाळ आणी संध्याकाळी एकादी तरी सगळ्यांचा उद्धार करावाच लागतो.त्याला पर्याय नाही.

कवितानागेश's picture

3 May 2015 - 11:56 pm | कवितानागेश

कौन्तेय, मी येते एकदा! :)

कौन्तेय's picture

4 May 2015 - 6:19 am | कौन्तेय

येस डॉक्टर. श्युअर. मी जुळवतो. :-)