आधुनिक संगीत - एक चिंतन !

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
25 Mar 2015 - 4:01 pm

बप्पी लहिरी पासून सुरु झालेली आधुनिक संगीतातली क्रांती आता हनी सिंगपर्यन्त येउन स्थिरावली आहे. आधुनिक संगीत म्हणजे नवसंगीत नव्हे. संगीत आणि आधुनिक संगीत हे सर्वस्वी भिन्न विषय आहेत. संगीताची निर्मिती ही शब्द,सूर,लय,ताल, वाद्य ह्यांच्या अभ्यासपूर्ण एकत्रीकरणातून होते. शब्द कसे असावेत, ते ताल,सूर,लय यांचा वापर करून कसे वापरावेत या सगळ्या गोष्टींना संगीतामध्ये नियम आखून दिलेले आहेत. आधुनिक संगीत या असल्या प्रकारांना मानत नाही. शब्द आणि वाद्य ह्यापासून ध्वनीनिर्मीती हा आधुनिक संगीताचा एकमेव उद्देश आहे! त्यातही शब्द एकाच भाषेतले असले पाहिजेत असं काही नाही. मुळात शब्दांना अर्थ असतो किंवा असावा यावर आधुनिक संगीतकारांचा विश्वास नाही.ऐकणाऱ्याने शब्दाचे अर्थ आपापल्या सोयीने लावून घ्यावे असं त्याचं मत आहे.आणि वाद्यांमध्ये रस्त्यावरच्या गाड्यांच्या आवाजापासून ते घरातल्या भांड्याकुन्ड्यापर्यन्त काहीही वापरता येतं. संगीतामध्ये जसं एखाद्या कवितेचं गाण्यात अलगद रुपांतर होते तसं इथे होतं नाही. अलगद,हळुवार,मधुर हे शब्दच आधुनिक संगीतकारांना मान्य नाहीत. इथे धांगडधिंगा,कर्णकर्कश् अशे शब्द जास्त प्रचलित आहेत. या संगीत निर्माणाचे एक प्राथमिक सूत्र आहे. दहा-पंधरा विस्कळीत शब्द घ्यायचे (इंग्लिश असतील तर बेस्टच!) आणि वाद्यांच्या आवाजात त्यांना बसवायचे. नंतर गायकाकडून ते केकाटुन घ्यायचे. त्यात वेगवेगळे संगीतकार आपापल्या शैलीने बदल करतात. कमी जागेत जास्त सामान जबरदस्तीने भरताना जशी कसरत आपल्याला करावी लागते त्यालाच आधुनिक संगीतात रचनात्मकता म्हणतात. जुन्या काळात बघा प्रख्यात संगीतकारांचा वाद्यवृंद असायचा. मग रेकॉरडिंग सुरु असताना संगीतकार समोर उभं राहून त्यांना मार्गदर्शन करायचा. आधुनिक संगीतात वाद्यवृंदाला मार्गदर्शनाची गरज नसते. 'मार्ग दिसेल तिकडे वाजवा' या नियमानुसार ते वाजवतात. 'आधी कविता, मग चाल, त्यानंतर संगीत' या पुरातन कल्पनेला आता जागा नाही. जी कशीही 'चालवता' येते ती चाल ही नवीन संकल्पना आता रुजलेली आहे. त्याप्रमाणे 'आधी आवाज, मग चाल, त्यानंतर चालीत बसतील ते शब्द' ही आधुनिक संगीताची पद्धत आहे.
जुने-जाणते रसिक या संगीतप्रकारावर टीका करतात. पण 'कुछ तो लोग कहेंगे' या उक्तीनुसार आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. कारण आधुनिक संगीत आपल्याला वाटतं तितकं सोपं नाहीये. किंवा ते पाश्चात्य संगीताचं अनुकरणही नाहीये. आता हेच बघा ना, जुन्या काळात गीत-संगीताला न्याय देऊ शकेल अश्या क्षमतेचा गायक निवडण्यात यायचा. आधुनिक संगीतात आधी गायकाची लायकी ओळखून मग संगीत निर्माण केलं जातं. उदा. काहीही झालं तरी संजय दत्त चालीत गाऊ शकणार नाही हे आधीच ओळखून," ऐ शिवानी ...तू लगती हैं नानी" या गाण्याला चाल दिलीच नाही. तुला जमेल तसं म्हण बाबा! किंवा प्रेक्षकांना आपल्या गाण्यापेक्षा कतरीना चा डान्स बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे हे लक्षात घेऊन, स्वत: च्याच एका मराठी गाण्याचं संगीत तसच्या तसं उचलून "चिकनी चमेली" गाण्याला देण्यात आलं. फुकट मेहनत कशाला करायची ? मागणी तसा पुरवठा ! असे अभिनव प्रकार पाश्चात्य संगीतात होत असतील का ? पाश्चात्य संगीतातले पॉप आणि रॉक आपल्याइथे वापरतात या आरोपातही तथ्य नाहीये. कारण त्यासाठीसुद्धा प्रशिक्षण लागतं. आधुनिक संगीत हे मुक्त संगीत आहे. किंवा मोकाट संगीत म्हटलं तरी चालेल.मला सांगा ,"आता माझी सटकली ..मला राग येतोय" या गाण्यासाठी कोणतंही प्रशिक्षण घेण्याची गरज आहे का ? हनी सिंगची सुद्धा गरज नव्हती. रोहित शेट्टी पुरेसा होता! मला तर नवीन गायकांच कौतुक वाटतं. जुन्या काळी गाण्याचा भावार्थ रसिकांपर्यन्त पोहोचवणं ही जबाबदारी गायकाची असायची. "आज ब्लू हैं पानी पानी” या गाण्यातून बिचार्यांनी रसिकांपर्यन्त काय पोहोचवणं अपेक्षित आहे? तरीसुद्धा तल्लीन होऊन गातात.
शाळेत असताना बघा आपल्याला बडबडगीते शिकवण्यात यायची. थोडीफार करमणूक आणि त्याद्वारे बालशिक्षण असा त्याचा ठराविक साचा असायचा. हा बालशिक्षणाचा वसा आधुनिक संगीतानेसुद्धा घेतला आहे. फक्त त्यात थोडा बदल करून बालवयातच प्रौढ शिक्षण असा नवीन साचा तयार केला आहे. पूर्वी घरादारात उच्चारायला अघोषित बंदी असलेले शब्द आता गाण्यांमध्ये सहज वापरतात. कुटुंब सोबत असताना रस्त्यावर एखाद्याने शिवी हासडली तर आजकाल कोणाला ओशाळल्यासारखं होत नाही कारण मुलाबाळांच्या कानांवर ते संस्कार आधीच झालेले असतात. उलट या प्रसंगातून त्या शिव्यांचा "वाक्यात उपयोग" कसा करायचा हे ज्ञान मुलांना मिळते. प्रौढशिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून आधुनिक संगीतकारांचा गौरव करायला हवा. भविष्यात शाळेत प्रौढशिक्षणाचं विधेयक संमत झालंच तर त्यासाठी आधुनिक संगीताचा कितीतरी उपयोग होईल. सरकारच्या रोजगारनिर्मिती धोरणाला सुद्धा आधुनिक संगीताचा पाठींबा आहे. संगीत ही फक्त कलाकारांचीच मक्तेदारी नसून कोणीही त्याची निर्मिती करू शकतं हा विश्वास आधुनिक संगीतानेच निर्माण केला. त्याद्वारे कितीतरी होतकरू तरुणांना रोजगार मिळाला आहे. पूर्वी ज्यांना वाद्यांची साफसफाई करायला सुद्धा ठेवलं नसतं तेचं लोकं आता वाद्यांचा सफाईने उपयोग करतायेत. शिवाय आधुनिक संगीताला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद ही त्यांच्या यशाची पावती आहे.
तरीसुद्धा आधुनिक संगीताला अजून योग्य तो मान मिळत नाहीये ही आमची खंत आहे. या संगीत प्रकाराला अभिजात संगीताचा दर्जा मिळायलाच हवा. कारण दिसण्यासारखे फरक कितीही असले तरी संगीत आणि आधुनिक संगीतात बरचसे साम्यसुद्धा आढळते.म्हणजे बघा, दोन्ही संगीतप्रकारांना प्रेरणेची गरज आहेच. संगीताला निसर्ग,अध्यात्म, प्रेम वगैरे गोष्टीतून प्रेरणा मिळते. तर आधुनिक संगीताला कुठूनही प्रेरणा मिळू शकते. म्हणजे अगदी बाई नं बाटली पासून झंडू बाम किंवा अगदी लुंगी पर्यन्त कुठूनही ! शिवाय प्रत्येक कलाकृतीचा एक ठराविक प्रेक्षकवर्ग असतो. संगीताचा प्रेक्षकवर्ग म्हणजे दर्दी, तर आधुनिक संगीताचा प्रेक्षकवर्ग म्हणजे गर्दी! कधी एखाद्या डिस्को-पब मध्ये जाउन बघा. आधुनिक संगीताचे कदरदान तुम्हाला तिथे दिसतील. त्या वातावरणातच या संगीतप्रकारातले बारकावे कळतात. "चार बोतल व्होडका" या गाण्याचा मतितार्थ चार बाटल्या रिचवल्यावरचं कळतो (अरे एवढी पिल्यावर लोकांना आयुष्याचा अर्थ कळतो तर गाण्याचं काय घेऊन बसलात!). थोडक्यात म्हणजे, संगीत ऐकून धुंद होण्यापेक्षा आधी धुंद होऊन नंतर संगीत ऐकले तर त्याची मजा औरचं!

संगीतसमीक्षा

प्रतिक्रिया

थोडक्यात म्हणजे, संगीत ऐकून धुंद होण्यापेक्षा आधी धुंद होऊन नंतर संगीत ऐकले तर त्याची मजा औरचं!

हा म्हणजे मास्टरपीसच!

पॉइंट ब्लँक's picture

25 Mar 2015 - 10:36 pm | पॉइंट ब्लँक

+१००

चिनार's picture

26 Mar 2015 - 9:52 am | चिनार

धन्यवाद !

अत्रन्गि पाउस's picture

25 Mar 2015 - 4:59 pm | अत्रन्गि पाउस

अग्दि अग्दि ...
आणि मार्ग नसेल किंवा आधीच गर्दी असली तरी 'ढूकून"..घुसा... घुसा म्हणजे शिरकाव होईल ...

तुम्हाला नक्की आधुनिक संगीत्/नवसंगीत आवडतं; की नाही हे काही कळलं नाही धाग्यातून. पण

पूर्वी ज्यांना वाद्यांची साफसफाई करायला सुद्धा ठेवलं नसतं तेचं लोकं आता वाद्यांचा सफाईने उपयोग करतायेत.

या वाक्यासाठी टाळी घ्या ! कडक.

चिनार's picture

25 Mar 2015 - 5:20 pm | चिनार

वेल्लाभट साहेब,
हे संगीत जर आवडलं असतं तर वरील टाळी मिळवणार वाक्य लिहू शकलो नसतो.
असो. कदाचित लेखाचा शेवट तेवढा प्रभावी झाला नसावा !

वेल्लाभट's picture

25 Mar 2015 - 5:34 pm | वेल्लाभट

हो म्हणजे शेवटी तुम्ही पब, कदर, धुंद वगैरे शब्द वापरून पार गोंधळ करून सोडलात ना.

काही बदल करता येईल का ते बघतो !

मराठी_माणूस's picture

25 Mar 2015 - 5:16 pm | मराठी_माणूस

लेख आवडला

अनुप ढेरे's picture

25 Mar 2015 - 5:17 pm | अनुप ढेरे

मला तर ब्वॉ बप्पीदा, हिमेस यांची अनेक गाणी आवडतात. ब्लू है पानी पानी गाणं देखील आवडत खूप. लोक उगाच शिव्या घालतात.

वेल्लाभट's picture

25 Mar 2015 - 5:39 pm | वेल्लाभट

आय एम विथ यू.
सर हिमेश रेशमिया; नाकगंधर्व

त्यांच्यासारखं कुणीच नाही.
बप्पीदा लिजंड !
हनी सिंग होतकरू आहे. मेहनत घेतलीन तर पुढे जाईल मुलगा.

जितकं शास्त्रीय संगीत प्रिय आहे तितकंच नवसंगीतही. ज्याची त्याची मजा वेगळीच आहे.

सांगलीचा भडंग's picture

26 Mar 2015 - 8:23 pm | सांगलीचा भडंग

बप्पी लहरी ची गाणी भारी आहेत . खास करून शराबी मधली सगळी

बॅटमॅन's picture

30 Mar 2015 - 3:02 pm | बॅटमॅन

मलाही हिमेसची अनेक गाणी आवडतात.

गोविंदा-कादर्खान वगैरेंचेही कैक पिच्चर आवडतात.

पण मग लोक नीचभ्रू म्हणतात. त्याकरिता पिंक चड्डी क्यांपेनसारखी नीचभ्रू क्यांपेन सुरू केली पायजे.

विजुभाऊ's picture

25 Mar 2015 - 5:34 pm | विजुभाऊ

तुम्ही वर लिहीलेली गाणी ही फारच सौम्य आहेत.
हे ऐकुन बघा. विषेषतः डोक्याचे पार भजे होते.

व्हीडिओ आणि ऑडिओ एकदम चौकार षट्कात अष्टकार काही म्हणु नका

तिमा's picture

25 Mar 2015 - 6:32 pm | तिमा

आधुनिक संगीतावर टीका करण्याऐवजी ते आपल्याला कळत नाही, असं म्हणावं. त्रास होत असेल तर कानांत इअर प्लग्स (हल्ली चांगले मिळतात) घालावे. सृष्टीत सगळ्याच गोष्टींची आवर्तने होत असतात, तसेच पुढे कुठल्यातरी पिढीत ते जुने कर्णमधुर संगीत परत येईल, अशी आशा बाळगावी. तेही नाही जमलं तर,
'हे चिंचेचे झाड दिसे मज "चिनार" वृक्षापरी', असे म्हणून आपली समजूत करुन घ्यावी.

सांगलीचा भडंग's picture

26 Mar 2015 - 8:14 pm | सांगलीचा भडंग

सृष्टीत सगळ्याच गोष्टींची आवर्तने होत असतात

हे मात्र एकदम बरोबर आहे

सृष्टीत सगळ्याच गोष्टींची आवर्तने होत असतात,

या वाक्याशी सहमत !

आधुनिक संगीतावर टीका करण्याऐवजी ते आपल्याला कळत नाही, असं म्हणावं.

असहमत
या वाक्यावर तांत्रिक चर्चा करण्याची माझी तयारी आहे. मी टीका करत असलेले आधुनिक संगीत कोणते हेच तुम्हाला कळले नसावे. त्या संगीतात समजून घेण्यासारखी एकही गोष्ट नाही. त्याला तुम्ही संगीत मानत असाल तर चर्चा करण्यात उपयोग नाही.
राहिला प्रश्न आमच्या आवडीचा, तर मदन मोहन ,शंकर जयकिशन जितके प्रिय तितकाच ए आर रेहमान आम्हाला प्रिय आहे ! आधुनिक संगीत काय ते त्याच्याकडून शिकावं !
बाकी धांगडधींग्याला मी संगीत मानत नाही !
तुम्हाला आवडत असेल तर जरूर ऐका.

तिमा's picture

27 Mar 2015 - 6:03 pm | तिमा

तुम्हाला आवडत असेल तर जरूर ऐका.
माझ्या प्रतिसादातला उपहास तुम्ही लक्षांत घेतलेला दिसत नाही.
मी संगीत ऐकताना इतके फिल्टर्स लावतो की लताची गाणी ऐकताना, मला त्याच्या मधे दुसरे कोणी आलेले चालत नाही. प्ले लिस्ट्स तशाच बनवून घेतल्या आहेत. हल्लीचे संगीत तर सोडूनच द्या पण रेहमानचे संगीतही(काही अपवाद सोडून) मला आवडत नाही. जुन्या संगीतात रमणारा जीव आहे मी. त्यांत,गाणे चाललेले असताना मधे कोणी ब्र ही काढलेला मला चालत नाही. कानसेनांच्या अरण्यातला 'एकुल' च म्हणा ना!

तुम्ही उपहासाने म्हणत आहात ते माझ्या लक्षात आलं नाही.
जाहीर माफी !

चलत मुसाफिर's picture

25 Mar 2015 - 7:39 pm | चलत मुसाफिर

भारतीय चित्रपट संगीत हा प्रेक्षकशरण कलाप्रकार आहे. दुसरे म्हणजे चित्रपटगीते हा प्रकार वेगाने कालबाह्य होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तिन्हीत्रिकाळ गाण्यांचा मारा टीव्हीवरून होत असल्याने थेटरात पुन्हा ती गाणी बघायचा पेशन्स लोकांना नसतो. कथानके व निवेदनपद्धतीही बदलत चालल्या असून संगीताची जागा दिवसेंदिवस कमी होत आहे. यासोबत दुसरीकडे स्पर्धा आणि निर्मितीखर्च अफाट वाढत असून पहिल्या तीन दिवसांत होणारा व्यवसाय हा चित्रपटासाठी निर्णायक ठरत आहे. या परिस्थितीचा परिणाम संगीतावर होणे साहजिक आहे.

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2015 - 7:57 pm | श्रीरंग_जोशी

आजकालच्या चित्रपटसंगीतावर चिमटेकाढू लेखन आवडलं. मी आजकालच्या चित्रपटांचे संगीत अभावानेच ऐकतो त्यामुळे मला बरेच संदर्भ लागले नाहीत.

माझा आवडता चित्रपटसंगीताचा काळ म्हणजे अंशीच्या दशकाच्या शेवटापासून गेल्या दशकाची सुरुवात. त्यानंतर आलेली बोटावर मोजण्याइतकी सुमधुर गीते ऐकाविशी वाटतात. त्यातली बहुतांश राहतने गायलेली आहेत.

जाता जाता: लेखात जरा अधिक परिच्छेद असते तर बरे वाटले असते. याखेरीज तुमच्या शैलीत टॉलिवुडी हिंदी चिंगमछाप चित्रपटांवर वाचायला आवडेल.

माझा आवडता चित्रपटसंगीताचा काळ म्हणजे अंशीच्या दशकाच्या शेवटापासून गेल्या दशकाची सुरुवात.

शक्य आहे.

काहींसाठी तो ५०-६० चे दशक असेल तर काहींसाठी ते ७० चे दशकही असू शकेल.

शेवटी, ज्याची त्याची पौगंडावस्था तोच त्याच्यासाठीचा सुवर्णकाळ!

मित्रहो's picture

26 Mar 2015 - 12:37 pm | मित्रहो

काही लोक कायदेशीर मार्गाने पैसे कमवितात , बेरोजगारी कमी होते आणि आपण कशाला चिमटे काढायचे.चालू द्या जे चालले ते. तसेही पबमधे तसलेच काही हवे असते.

राहीले चित्रपट संगीताचे त्याला नेहमीच नावे ठेवण्यात आली आहेत. १९५०-६० या दशकात नौशाद, शंकर जयकिसन, मदनमोहन असे संगीतकार झाले त्यांनाही नांवे ठेवण्यात आली होती. आज हनी सिंग आहे तर दुसऱ्या बाजूला अर्जीत सिंग सुद्धा आहेच. तो रॅप प्रकारच तसा आहे. गुलजार, प्रसून जोशी सारखे गीतकार आहेत. मराठीत गुरु ठाकूर आहे. मला तर हल्लीचे मिथुन, अंकीत तिवारी, शामल मित्रा यासारखे संगीतकार जुन्या जमान्यातील जतीन ललित, आनंद मिलिंद पेक्षा कितीतरी पटीने सरस वाटतात.

तुमची लिहीण्याची पद्धत आवडली.

पिवळा डांबिस's picture

27 Mar 2015 - 9:50 am | पिवळा डांबिस

जुने जाऊ द्या मरणालागुनी...
पूर्वी स्त्रियांनी स्लिव्हलेस ब्लाउझ घालायला सुरवात केल्यावर तत्कालीन म्हातारे जसे लोभावलेल्या नजरेने त्यांच्यावर टीका करायचे त्याची आठवण झाली....
:)
असो.
"ये दुनिया, दुनिया पित्तल दी,
दुनिया पित्तल दी,
दुनिया पित्तल दी!
मैं गुडिया सोनेदी, सोनेदी,
मै गुडिया सोनेदी!!!!!!"
-पिवळा धम्मक सोनडांबिस
:)

चिगो's picture

27 Mar 2015 - 2:06 pm | चिगो

मैं गुडिया सोनेदी, सोनेदी,
मै गुडिया सोनेदी!!!!!!"

हे काय? उगाच हिंदीकरण कशाला? 'बेबी डॉल" सनीऐवजी "गुडीया" सायराबानू / आशा पारेख येतात डोळ्यासमोर उगाच..

घाटावरचे भट's picture

30 Mar 2015 - 3:59 pm | घाटावरचे भट

यातून आपल्याला आधुनिक म्हणजे काय आणि संगीत म्हणजे काय दोन्ही ठाऊक नसल्याचे तेवढे लक्षात आले.

चिनार's picture

31 Mar 2015 - 11:44 am | चिनार

मला संगीत कळतं असा दावा कुठेही केलेला नाही. तुम्हाला कळत असल्यास चर्चा करायला आवडेल