तो आणि ती :- सविता००१
तो: हे काय गं?आज सुद्धा हिरवी चटणी नाही केलीस तू. तुला माहित आहे ना, मला फार आवडते म्हणून? तरी?
ती: अरे, कंटाळा आलाय रे. आणि लाल चटणी आहे की पानात. झालंच तर खमंग काकडी आहे.
तो: पण तू हिरवी चटणी करणार म्हणाली होतीस.
ती: अरे, नाही जमत एखाद्यावेळी. एवढं काय त्यात? चांगली तुला आवडते म्हणून मटार उसळ, खमंग काकडी, लसणीच तिखट, गरम पोळी अगदी तुला आवडते तशी तव्यावरून ताटात, शिवाय गाजर हलवा. तरी तरी तू नाखूषच.
तो: असं म्हणालो मी?
ती: अर्थ तोच ना..........
तो: आधी किती लहान सहान गोष्टी सुद्धा अगदी आठवणीत ठेवून करायचीस. हल्ली मात्र विसरतेसच.
ती: अरे, दोघांमध्ये किती करायचं एकटीने? मला त्रासच होतो.
तो: का? मी मदत नाही करत तुला? सगळे मित्र म्हणत असतात, वहिनीच्या बरोबरीने हा किचनमध्ये असतोच.
ती: मी नाही म्हणतेय का?
तो: मग? मिक्सर तर फिरवायचा. तरी हिरवी चटणी नाहीच.
ती: ओ मिस्टर... मला पण माहितीये. फक्त मिक्सर फिरवला की होते चटणी.
तो: ????
ती: पण तू विसरतो आहेस अरे. असा हट्ट काय करतोस? जसा तू सत्तरीला आलायस, तशी मी पण पासष्टीची झालेच की....
-------------------------------------------------------------------------------------------
एक अनुभव -स्नेहल महेश
मिसळ पाव हा असा परिवार मला मिळाला कि त्यावरील उत्तम लिखाण वाचता वाचता दिवस कसा जातो ते समाजतच नाही. नवीन ऑफिस आणि तसेच कलीग त्यामुळे नेट सर्फिंग ची सवय लागली आणि नवीन नवीन मराठी साईट शोधता शोधता अचानक ही साईट मिळाली आणि त्या वरील नवीन लेख आणि सर्व क्षेत्रातील माहिती अक्षरशः अगदी झपाटल्या सारखी वाचू लागले. त्यातील प्रत्येक विषयावरील वाचकांनी दिलेले प्रतिसाद आणि अनुभव आयुष्यातील प्रत्येक वळणावर उपयोगी पडतील असेच आहेत. त्यामुळे आपणही आपले अनुभव आणि आवडलेल्याला लेखावर उत्तम प्रतिसाद द्यावा असे नेहमी वाटायचे. पण इथेले सगळे काय म्हणतील? आपल्याला लिहिता येईल का? लिहिलं तर कोण वाचेल का? आणि असेही आपण काय लिहू शकतो? अशा अनेक प्रश्नांमुळे फक्त मूक वाचक झाले.
पण एके दिवशी अनाहिता साठी लिहा, सगळयानी लिहिते व्हा हे वाचून आपण सुद्धा लिहीले पाहिजे ,मोडके-तोड्के का असेना ते आपले स्वतःच असेल.........असे मानून लिहायचं ठरवल पण विषय काहीच सुचेना. तशी वाचनाची आवड अगदी लहान पणापासून, माझं बालपण तस खेडे गावातच गेलं घरातील वातवरण फारस काही वाचनासाठी पोषक नव्हत त्यामुळे जमेल तेवढी आणि मैत्रिणीची मिळालेली गोष्टीच्या पुस्तकापासून अगदी शेंगदाण्याच्या पुरचुंडीचा कागद पण वाचून काढत असे पण पदवीधर झाल्यावर नंतर न वाचन न लिखाण......... लग्नानंतर मिस्टरांनी अनेक गोष्टीत मदत केली अगदी ऑफिस मध्ये कसे वागायचे त्या पासून सुरवात....ते अगदी इंटरनेट वर साईट सर्फिंग पर्यंत. त्याचही डोक खाऊन झाल पण विषय काही मिळेना, शेवटी जेव्हां अजया ताई फक्त ३ आठवडे शिल्लक राहिले म्हणाल्या तेव्हा म्हटलं चला मुलीच्या एडमिशनवरच लिहूया... अरे काही मेडीकल किवा इंजिनीअर नाही तर के.जी. च्या.... हसू नका पण मेडीकल साठी पण करणार नाही एवढी तयारी मुलीकडून आणि आम्ही दोघांनी पण केली (आज काल पेरेन्टचा पण इंटरव्ह्यू घेतात... जॉबच्या वेळी पण भीती वाटली नाही एवढी घाबरले होते) त्यात ssc/cbsc/icsc यापेकी कोणत्या शाळेत घालायचे यावर ओबामा पण करत नसेल एवढी गहन चर्चा करून घरापासून जवळ आणि आर्थिक दृष्टा सोयीस्कर असें ssc बोर्ड चे स्कूल फायनल झालं
एक चांगली गोष्ट म्हणजे मुलीला ABCD/1234/BIRDS/FRUIT/ANIMALS नाव असा रोजचा अभ्यास चालू होता ऑफिस/मित्र-मैत्रिणी कडून फादर काय काय प्रश्न विचारतात याची एवढी माहिती गोळा केली होती कि माझ्या आई-वडिलांनी माझ्या पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी पण केली नव्हती. त्यात अजून भर म्हणजे जर मुलाचं आधारकार्ड नसेल तर अॅ डमिशन नाही मग काय आधार कार्ड काढले ( त्या साठी काय काय केलं त्यावर अजून एक लेख होईल) तर शेवटी अॅ डमिशनचा दिवस उजाडला.. अगदी आदल्या दिवशी पर्यंत मुलगी सगळ्या प्रश्नाची उत्तरे तोड पाठ देत होती, तिथले सर जे विचारणार त्याची नीट उत्तर द्यायची, POEM बोलायची, मग तुला हे देऊ आणि ते देऊ त्यामुळे लेक पण जाम खुश होती.
अॅEडमिशनच्या लाईनमध्ये उगीचच पोटात भीतीचा गोळा येत होता हि नक्की बोलेल ना/ फादर काय काय विचारेल. शेवटी फायनल टच अप म्हणून एकदा तिला म्हटलं नीट बोलायचं मग तुला आईस्क्रीम घेऊन देणार..... झालं! मला पण नको त्या वेळी आईसक्रीम सुचलं. आणि ती पण त्यावर आडून बसली आत्ताच दे नाहीतर मी नाही बोलणार जा. नवरा पण माझ्या,कडे असा बघत होता कि सुचवत होता भोग आता आपल्या कर्माचे आईस्क्रीम.. तिला कसं तरी बाबा-पुता करून गप्प केलं आणि आत गेलो. मुलीनेपण अगदी सगळ्या प्रश्नाची नीट उत्तरे दिली. सरते शेवटी आमच्या साठी अचानक पण खूप खूप महत्त्वाचा प्रश्न आला How much you can pay for our school? , आम्ही थोडे गप्प झालो, प्रश्न अपेक्षित होता पण तो आत्ताच समोर येईल याची कल्पना नव्हती. आमचे गंभीर चेहरे पाहून, फादर आजून ज्ञान देऊ लागला..... YOU KNOW VERY WELL FOR OTHER SCHOOL RATE.... DON'T WASTE MY & YOUR TIME......(त्याचा मते time is money च होत).... SEE OUTSIDE A LONG QUE WAITING WITH HARD CASH (पहिले माहित नव्हते कि आपण बोलायचं कि आम्ही शाळेसाठी एवढी मदत करू डोनेशन हा शब्द नाही घ्यायचा मग फादर चिडतो) आणि त्याने अगदी स्वच्छ शब्दात त्याची किंमत सांगितली हो त्याचीच किंमत पैसे द्या आणि अॅाडमिशन घ्या नाहीतर नाही. मग तुमच्या मुला-मुलीला काही येऊदे नाहीतर नको त्याच्याशी त्याला काही देणं-घेणं नसते फक्त पैशाचा सरळ हिशोब!
सगळी मेहनत जवळ जवळ पाण्यात होती खूप वाटत होतं कि हे सगळ चुकीचं आहे पण आम्ही नाहीतर दुसरे तयारच होते या बाजारीकरणाला. एकीकडे मुलाच्या शिक्षणाची काळजी तर दुसरीकडे फक्त पैश्याचा खेळ ,कळत होतं हे सगळं चुकीचं आहे अशानेच भ्रष्टाचार फोफावतो आहे आणि आपण त्याला खत पाणी घालतोय... पण ही नाहीतर दुसरी शाळा आणि सगळीकडे एकच हिशोब नाहीतर अॅाडमिशन नाही.
घरातले सगळे बोलत होते कि आमची मुले म्युन्सिपल शाळेत शिकली... अरे हे कशाला आम्ही पण तिथेच शिकलो पण आजची त्याची अवस्था बघीतली की नको वाटतं. कोणत्या पण आई-वडिलाना आपल्या मुलाला सगळ्यात चांगले शिक्षण मिळावे असंच वाटत असते, जे आपल्याला मिळाल नाही ते मुलांना मिळावे म्हणून सतत प्रयत्न करत असतात. त्यामुळे हे सगळ कळत होतं पण वळत नव्हतं.. पण नाही वळवून घेण्याची परिस्थितीच शिल्लक राहिली नाही. एवढे दिवस दुसर्याणनाना ज्ञान देणारे, आम्ही पण तेच करत होतो खरंच खूप चुकल्या सारखं वाटत होता पण दुसरा पर्याय नव्हता..............................आजच्या शिक्षण पध्दतीला आणि पिढीला नक्की कशाची गरज आहे तेच कळत नव्हत............असो............
जसं मनात आल तसं लिहित गेले काही चुकलं किवा आवडलं नाही तरी वाईट नाही वाटणार. अनाहिताच्या रूपाने एवढं तरी बोलू शकले, परत १०-१२ वर्षाने लिहीलं त्यातच खूप खूप छान वाटतंय तुम्ही सगळ्या खूप हुशार आहात तुमचे सगळ्यांचे लिखाण मी अगदी मनापासून वाचते आणि वाचत राहीन......
-------------------------------------------------------------------------------------------
तुझ्यामुळे......... निवेदिता-ताई
आज सकाळी माझ्या मुलीला उठवत होते , कारण १० वाजता तिचा ड्राईग चा क्लास होता . तिने सांगितले होते नऊ वाजता उठव पण मी काम करत होते , त्यामुळे एक पाच - दहा मिनिटे उठवण्यास उशीर झाला , मुलगी उठली पण उठल्याउठल्याच म्हणाली आई तुझ्यामुळेच उशीर झाला मला . हे पालुपद मला दिवसातून हजार वेळा ऐकून घ्यावे लागते . आता असे बघा माझ्या नवर्याला वेळेत डब्बा भरून दिला , वेळेत बाहेर पडले , अन कोण एक मित्र भेटला बसले त्याच्याशी बोलत , मग काय बस चुकली आले घरी आणि म्हणाले तुझ्यामुळेच बस चुकली , आता घ्या ...... कशाला बोलत बसायचे . अशा शुल्लक शुल्लक गोष्टी असतात पण त्याचे खापर स्त्रीच्याच माथी मारले जाते. काहीही मनासारखे घडले नाही कि तुझ्यामुळेच असे म्हंटले जाते .जेवणात सुद्धा मीठ जास्त झाले , तिखट जास्त झाले तरी ते तुझ्यामुळे . पण चांगले झाले तर तुझ्यामुळे झाले असे कोणी नाही म्हणत . मुले अभ्यास करत नसली , मार्क कमी पडले , पाणी वाया गेले , सर्वच कामे आधी तिलाच करावी लागतात आणि काही घडले कि तुझ्यामुळेच ................ हि पदवी मिळते बिचारीला . आता काय म्हणावे या कर्माला . बाईचा जन्म घेतला हाच एक गुन्हा.
-
प्रतिक्रिया
8 Mar 2015 - 2:59 pm | सविता००१
ही छोट्या छोट्या अनुभवांची गुंफण खूप आवडली.
8 Mar 2015 - 3:43 pm | विशाखा पाटील
तीन जणींचे तीन टप्प्यातले अनुभव आवडले.
8 Mar 2015 - 9:14 pm | अजया
स्नेहल्,निवुताई छान अनुभव लिहिले आहेत्,रोजच्या जगण्यातले.सविताताई तर लेखिका झाल्या आता! ऐकत नाह्ही!!
8 Mar 2015 - 10:42 pm | मधुरा देशपांडे
तीन वेगवेगळ्या टप्प्यातील स्त्रियांचे मनोगत आवडले.
9 Mar 2015 - 2:12 pm | आरोही
साध्या शब्दात मांडलेले मनोगत आवडले ....
9 Mar 2015 - 7:48 pm | सुचेता
अग्दि मनातल आलय कागदावर आपलं स्क्रिनवर .
10 Mar 2015 - 8:57 am | इशा१२३
मनोगत आवडले.तिघिचीहि शैली छान!
10 Mar 2015 - 9:15 am | स्रुजा
भारीच !
10 Mar 2015 - 5:28 pm | सस्नेह
सह्हीये एकदम !
10 Mar 2015 - 8:53 pm | स्वाती दिनेश
अनुभवांची गुंफण करण्याची कल्पना आणि अनुभव दोन्हीही भावले.
स्वाती
11 Mar 2015 - 5:56 pm | कन्यारत्न
स्त्रि असो वा पुरुष सुसवाद गरजेचा....
11 Mar 2015 - 9:07 pm | सानिकास्वप्निल
अनुभव आवडले.
11 Mar 2015 - 10:04 pm | रेवती
लेखन आवडले.
13 Mar 2015 - 5:11 pm | मितान
बाईपण आवडले.
13 Mar 2015 - 9:50 pm | प्रीत-मोहर
आवडले!!
14 Mar 2015 - 12:26 am | जुइ
तीन वेगळ्या वेगळ्या कथा गूंफायची कल्पना आवडली!
15 Mar 2015 - 1:26 am | उमा @ मिपा
सवु, स्नेहलताई, निवुताई... तुम्हा तिघींनाही प्यारभरी झप्पी! तिघींनीही छान लिहिलंय.
या तीन कथांना एकत्र गुंफून त्याला दिलेलं "बाईपण" हे शीर्षक विशेष आवडलं.
15 Mar 2015 - 3:56 pm | प्रियाजी
तीनही अनुभवलेखन आवड्ले अन टोचले/बोचले देखिल.पण मला प्रष्ण पडलाय की या सर्वात कधीच बदल होणार नाही का? आपण काय करायला पाहिजे?
16 Mar 2015 - 3:28 pm | पिशी अबोली
मुक्तके आवडली.
17 Mar 2015 - 7:07 pm | Mrunalini
लेख आवडला. :)
19 Mar 2015 - 12:07 am | मनुराणी
मनापासून आवडले.
19 Mar 2015 - 2:15 pm | कविता१९७८
साध्या शब्दात मांडलेले मनोगत आवडले ....,
20 Mar 2015 - 3:53 pm | विभावरी
किती छान आणि सहज लिहील आहे सगळ्या जणींनी .
20 Mar 2015 - 5:22 pm | अनन्न्या
तिघींनीही चांगलं लिहीलय!
25 Mar 2015 - 1:10 am | आतिवास
अनुभवांची गुंफण आवडली.