या विषयावर जास्त जाणून घेण्याविषयी रस निर्माण झाला तो अतृप्त आत्मा यांचा विविध स्मायलींचा मुक्त वापर पाहून.
'स्मायली' बहुतकरून एका हसणाऱ्या मानवी चेहऱ्याला संबोधले जाते जसे :-) . स्मायलीची संकल्पना साधारण १९४८ साली प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातून झाली. पोर्ट ऑफ कॉल ह्या सिनेमातील एका दृश्यात दु:खी नायिका
लिपस्टकच्या साह्याने एक चेहरा आरशावर चितारते. त्या चेहऱ्यावरील भाव उदास असून नाकासाठी एक टिंब योजला आहे. त्यानंतर त्या स्वरूपाचे काही आनंदी चेहरे १९५३ आणि १९५८ साली निर्माण केलेल्या काही सिनेमांच्या
जाहिरातींसाठी वापरले. त्यापैकी एका सिनेमाचे पोस्टर.
प्रचलित स्वरूपातील स्मायली प्रथम १९६२ साली न्यूयॉर्क येथील WMCA या रेडियो केंद्राने एक अभिनव कल्पनेद्वारे वापरली. या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या एका लोकप्रिय कार्यक्रमादरम्यान श्रोत्यांना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारल्या जात. नंतर त्यांना भेट म्हणून एक स्वेटर पाठवले जात असे व त्यावर आनंदी चेहऱ्याची स्मायली चितारलेली असे.
त्यानंतर १९६३ साली State Mutual Life Assurrance Company Massachusetts ह्या कंपनीने हार्वे बॉल ह्या कलाकाराला आनंदी स्मायलींचे डिझाइन काढायचे काम दिले. प्रयोजन हे की त्या कंपनीच्या कामगारांचे मनोबल वाढावे. बॉल ह्याने हे डिझाइन केवळ १० मिनिटात काढले आणि त्याचे त्याला ४५ डॉलर्स मिळाले.
गर्द पिवळ्या रंगाची पार्श्वभूमीवर अंडाकृती डोळे आणि चंद्राकृती हास्य ह्या स्वरूपातील ५० मिलियन पेक्षा जास्त बटन्स छापले गेले. हे डिझाइन जरी वर उल्लेख केलेल्या डिझाइनशी मिळते जुळते असले तरी बॉल चे डिझाइन जास्त प्रसिद्ध झाले. सियाटलस्थित जॉर्ज तेनागी ह्याने एका जाहिरात साठी स्मायली चे आपले एक डिझाइन काढले. ते University Federal Savings & Loan च्या जाहिरातीसाठी वापरले गेले. पुढे जाऊन १९९३ साली या जाहिरातीतील स्मायलीचा उपयोग तिच्या निर्मात्याने स्वतःचा सियाटल येथील महापौर पदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपयोग केला.
१९७० साली फिलाडेल्फिया येथील बर्नार्ड आणि मुरे स्पेन बंधूंनी स्मायली छापून बटन्स, कॉफी मग, टी शर्ट इत्यादी "Have a happy day"ह्या घोष वाक्यासह छापले. १९७२ साली त्यांनी या बटणाच्या अनेक प्रती छापल्या. १९७२ सालीच Franklin Loufrani ह्यांनी प्रथम स्मायलीचे ट्रेडमार्क करून घेतले. त्याने आपल्या वर्तमानपत्रातील चांगल्या बातम्या अधोरेखित करण्यासाठी स्मायलींचा उपयोग केला. त्यानंतर त्याने 'The Smiley Company' नावाची कंपनी चालू केली.
१९९६ साली Loufrani चा मुलगा निकोलस याने हि कंपनी चालवायला घेतली आणि कंपनीचा कारभार वाढवून तिचे रूपंतर एका बहुराष्ट्रीय कंपनीत केले. त्यावेळी बॉल ह्याने स्मायली चे प्रथम चित्र आपण निर्माण केल्याचा दावा केला. यावर निकोलसचे उत्तर असे होते की, जरी त्याच्या वडिलांनी वापरलेली स्मायली व बॉल यांनी निर्मिलेली स्मायली यांत बरेच साम्य असले तरी स्मायलीचे चित्र काढायला इतके सोपे आहे की त्यावर कुणी एक व्यक्ती आपला हक्क सांगू शकत नाही. पुराव्या दाखल त्याने त्याच्या संकेतस्थळावर फ्रान्स मध्ये असलेल्या काही अतिप्राचीन गुहांमधील चित्रांमध्ये स्मायलीची चित्र आहेत हे सांगितले आणि १९६० सालीही एका रेडियो केंद्राने स्मायलींचा उपयोग जाहिरातींसाठी केला होता असे नमूद केले.
युनायटेड किंगडम मध्ये स्मायलीच्या हसऱ्या चेहऱ्याचा उपयोग Windsor Free Festival मध्ये १९७० साली वापरले गेले. त्यानंतर त्याचा वापर१९८० साली झालेल्या electronic music and dance culture मध्ये झाला.
आता पाहूयात आपल्या सर्वांना परिचित असलेल्या स्मायलीचा वापर आंतरजालावर कसा सुरू झाला ते.
१९ सप्टेंबर १९८२ रोजी Scott Falhman ह्या कार्नेगी विद्यापीठाशी निगडित असलेल्या व्यक्तीने प्रथम प्रस्ताव ठेवला. Online Message Board वरील विनोदी वाक्यांना ' :- ) ' स्मायली जोडावी. जेणेकरून ती वाक्ये बाकीच्या गंभीर स्वरूपाच्या वाक्यांपासून वेगळी ओळखू यावीत. स्मायलींचा जालीय वापरामुळे दृश्य स्वरूपातील भावनांची देवाणघेवाण सोपी झाली. Falhman याने पुढे ' :-(' ह्या चिन्हाचा वापर गंभीर स्वरुपाच्या लेखनासाठी करावा असेही सुचवले.
त्याच काळात आयबीएमने त्यांच्या नव्या पिढीतील पर्सनल कम्प्युटर्स आणि पुढे जाऊन मायक्रोसॉफ्टने विंडोज 95 नंतरच्या कीबोर्डच्या प्रोग्रॅम मध्ये स्मायली Special Characters म्हणून समाविष्ट केले.
उदा. Unicode smiley characters:
☺ U+263A Alt+1White Smiling Face
☻ U+263B Alt+2 Black Smiling Face
☹ U+2639 White Frowning Face
जगभरातील १०० देशांमध्ये स्मायलींचा ट्रेडमार्क हा The Smiley Company कडे आहे. Smiley World Ltd ही या कंपनी ची उपषाखा आहे. तिचा मालक Nicolas Loufrani आहे. या स्मायली ब्रँड्स बऱ्याच क्षेत्रांमध्ये या कंपनीद्वारे वापरला जातो. जसे की- कपडे, घरगुती सजावट, परफ्यूम्स, स्टेशनरी इत्यादी.
१९९७ साली प्रथम Smiley Company ने स्मायलीचा अमेरिकेत ट्रेडमार्क घेण्याचा प्रयत्न केला ज्यात "smiley" हा शब्दप्रयोग देखिल होता. ह्यावेळी त्यांचे वॉलमार्ट ह्या कंपनीशी मतभेद झाले. कारण त्यावेळी वॉलमार्ट आपल्या जाहिराती मध्ये आनंदी चेहरा जवळजवळ वर्षभरा पासून वापरत होती. वॉलमार्ट ने सुरवातीला निकोलसच्या अर्जावर आक्षेप घेतला. त्यानंतर स्वतः स्मायलीचा चेहरा रजिस्टर करायचा प्रयत्न केला. शेवटी प्रकरण कोर्टात गेले व तिथे हा खटला जवळजवळ ७ वर्ष चालू राहिला. २०१० साली वॉलमार्ट आणि Smiley Company यांनी शिकागो येथे फेडरल कोर्टात आपला वाद मिटवला ज्याच्या अटी गुप्त ठेवण्यात आल्या आहेत.
स्मायलींना जालावर प्रसिद्ध करणारे विविध टुल्स व त्यांचा संग्रह
याहू मेसेंजर - यांच्या चिन्हातच स्मायलीचा कल्पक वापर केलेला आहे.
याहू मेसेंजर
एम एस एन मेसेंजर
गुगल टॉक
ब्लॅकबेरी मेसेंजर
माहिती व चित्रे जालावरून व विकीवरून साभार.
प्रतिक्रिया
8 Mar 2015 - 4:50 pm | मधुरा देशपांडे
मस्त माहितीपुर्ण लेख. :)
8 Mar 2015 - 4:51 pm | आयुर्हित
अतिशय माहितीपूर्ण लेख.
8 Mar 2015 - 6:25 pm | बोका-ए-आझम
:)
8 Mar 2015 - 7:50 pm | सविता००१
:)
सुरेख
8 Mar 2015 - 8:27 pm | स्रुजा
तुझ्या स्मायल्यांचं शिक्रेट आज कळलं. सिग्नेचर ईश्टाईल वर लेख लिहिण्याची कल्पना लय भारी.
9 Mar 2015 - 10:15 am | अजया
स्मायलीवर लेख कल्पनाच किती छान आणि नाविन्यपूर्ण.तू लिहिलंही आहेस सुरेख.
9 Mar 2015 - 10:38 am | मितान
अत्रुप्ताच्या नि तुझ्या स्मायली फारच इंटरेस्टिंग असतात. त्या बघताना या स्मायल्यांचा इतिहास वगेरे कल्पना केली नव्हती. तू खूप छान लिहिलं आहेस. याबद्दल आता नेटवर उचकपाचक करण्याएवढं कुतुहल वाढलं आहे. :)
9 Mar 2015 - 12:56 pm | आरोही
अरेवा स्मायली क्वीन चा लेख हि स्मायलींवरच !!मस्त !! लेख आवडला ..आता जरा उचकापाचक करून बघते मलाही अशा सुंदर स्मायली देता येतात का !!
9 Mar 2015 - 5:34 pm | भाग्यश्री कुलकर्णी
बरीच नवी माहिती कळली.छान लिहीले आहे.
9 Mar 2015 - 10:13 pm | स्वाती दिनेश
स्मायलींवरच्या लेखाची कल्पना आणि लेख दोन्ही खूप छान..
स्वाती
10 Mar 2015 - 1:37 am | अत्रुप्त आत्मा
वाहव्वा! थँक्यूssssssssssss
ना बोलतं केल्याबद्दल.
मी अंतरजालावर आलो..,त्यानंतर काहि महिन्यातच मिपावर चिकटलो. मिपावर ज्या दोन गोष्टींनी प्रथम माझ्या मनाचा कब्जा घेतला..त्यातली पहिली इथली चित्रविचित्र आयडी नेम्स..आणि दुसरी इथे लेखनात डोकावणार्या स्मायली. त्यातली माझी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊउ करत जीभ काढून वेडावून दाखवणारी स्मायली ,आणि नंतर आलेली तशीच नाराज पोझ मधे मागे फिरुन जीभ दाखवणारी स्मायली अत्यंत लाडकी होती/आहे. पण नंतर एकदा परा ने हात अपटत हसणारी स्मायली टाकली(स्मायली संस्थळावरची..) आणि माझ्यासाठी हा खजानाच खुला झाला. मग मी सुरवातीला त्यात बराच म्हणजे बराच वहावलो. पण नंतर वेड कमी झाले. अर्थातच स्मायली वापरण्याचे. शोधण्याचे नव्हे. पण तरिही ह्या सर्व स्मायली विदेशी आहेत..त्यात आपल्या भारतीय संस्कृतीचा रंग नाही.. नाहितर आपल्या कडच्या विविध सांस्कृतिक सण उत्सव या अनुषंगानी स्मायल्या.., कार्टुन मधे जशी भारतीय कार्टुन्स ची प्रगती झाली..अॅनिमेटेड फिल्म्स मधे हनुमान-आला...रामायण इत्यादी आले.,तशी अज्जुन ह्यात नाही..ही खंत आहे.
पण एरवी, स्मायली म्हणजे अशी बात आहे,की अनेक प्रकारच्या भावभावनाच नव्हे,तर काहि प्रसंग आणि अनेकानेक गोष्टीही त्यातून सहज आणि चपखल दाखवता येतात. (ही बाळाची स्मायली पहा. ) विशेषतः मिपावर येणार्या एकोळी आणि त्याच त्या विषयावरच्या धाग्यांना मी अनेकदा...खोदकामाच्या ..पाणि मारणार्या बाबाच्या स्मायल्या टाकुन धमाल उडवुन दिलेली अठवते आहे. तसेच काहि प्रतिसादांवर अत्यंत सूचक स्मायल्या टाकायला मला सुचल्या, त्याही त्या स्मायल्या तयार झालेल्या आहेत म्हणून..नायतर नुस्ती कल्पना शक्ती शब्द प्रकट करेल..
पण भावना फुलवाव्या त्या माझ्या स्मायलीबायनीच!
===========================================
दोनेक वर्षांपूर्वी,मी स्मायल्यांवर एक जिल्बी-तळायला घेतली होती. =)) पण ती नंतर अर्धवट'च राहिली. ती (सर्वाथानीच..) पूर्णत्वास जाइल की नाही मला माहित नाही. (सापडली ती कविता आणि झाली पूर्ण, तर टाकेन स्वतंत्र धाग्यात..ह्या लेखनामुळे ती आठवली...थँक्यु!) पण अत्ताशीक कुठे मला स्मायल्यांचे धर्मशास्त्र समजु लागले आहे. आध्यात्म समजायला अजुन बराच वेळ आहे.. पण समजेल तेंव्हा त्यावरंही लिहिन.
लेखाबद्दल पुन्हा एकवार आभार.
============================
स्मायलींचा वेडापीरः-
आत्मुबाबा स्मायलीवाले.
12 Mar 2015 - 4:17 am | स्पंदना
एका स्मायलीवाल्याच्या मनातलं अस जनांत आलं तेही एका स्मायलीवाल्या शिष्येमुळे!!
11 Mar 2015 - 10:45 am | प्राची अश्विनी
खरेय मला अजुनही हे तन्त्र जमले नाही. त्यामुळे तुम्हा सर्वान्चे फार कौतुक वाटते.
11 Mar 2015 - 12:03 pm | सस्नेह
स्मायल्यांच्या मागे इतका मोठा इतिहास आहे हे माहिती नव्हते !
मस्त माहितीपूर्ण लेख !
11 Mar 2015 - 3:12 pm | पद्मश्री चित्रे
खूप नवीन माहिती मिळाली .. गाथा आवडली
11 Mar 2015 - 8:48 pm | सानिकास्वप्निल
स्मायलींची गाथा आवडली
छान माहिती दिलीस :)
12 Mar 2015 - 4:36 am | स्पंदना
आता खरं सांगायच तर; लिहीण्यासाठी स्मायली वापरायच्या.....स्मायलींवर लिहायचा हा उलटा उपद्व्याप?
साध्या साध्या वाटणार्या, रोजच्या जगण्यात नेहमी येणार्या, वाटायला कमी महत्वाच्या, पण त्याशिवाय अडणार्या, अश्या गोष्टींपैकी एक म्हणजे स्मायली. अगदी आपली देहबोली झटक्यात मांडुन जाणार्या या स्मायल्या नसत्या तर हे सगळ लिखाण निरसं वाटल असतं.
मस्त लेख जुई!!
13 Mar 2015 - 4:36 am | श्रीरंग_जोशी
या वेगळ्या विषयावरचे लेखन आवडले. श्री अतृप्त यांचा प्रतिसादही भावला.
यावरून आठवले - याहू मेसेंजर नवा असताना विविध म्युझिकल स्मायल्यांचे अप्रुप वाटायले. आता वेब बेस्ड किंवा फोन बेस्ड मेसेंजर वापरताना तो अनुभव मिळत नाही.
13 Mar 2015 - 2:17 pm | स्पा
रंजक माहिती मिळाली
13 Mar 2015 - 3:57 pm | इशा१२३
स्माइली गाथा आवडली.तुझ्या छान स्माईल्यांचे रहस्य मस्त उलगडलेस.
14 Mar 2015 - 1:10 am | जुइ
सर्व प्रतिसादकांचे आभार
14 Mar 2015 - 2:48 pm | पलाश
हसरा लेख !!! आवडला. :)
14 Mar 2015 - 9:04 pm | विशाखा पाटील
नवीन माहिती कळली. practice करावी लागेल.
15 Mar 2015 - 12:53 am | उमा @ मिपा
अतिशय छान माहिती. तू अगदी सोपं करून लिहिलंयस.
तुझा स्मायली वापर खूप आवडतो. पण मला अजूनही त्यांचा वापर करणं जमलेलं नाही. आता परत प्रयत्न करेन हे तंत्र शिकून घेण्याचा.
15 Mar 2015 - 8:20 pm | प्रचेतस
सुरेख लेख.
आवडला
17 Mar 2015 - 2:41 am | रुपी
छान माहिती!
17 Mar 2015 - 6:43 am | अजो
मस्त लेख
17 Mar 2015 - 12:04 pm | एस
स्माईल्यांची एकूण अशी ष्टोरी आहे का? बाप रे हे माहितच नव्हतं. आणि स्माईल्या वापरून आंतरजालीय युद्धे खेळली जातात म्हणा बरीच, पण स्माइल्यांवरूनच कॉपीराइटचा एखादा असा झगडा चालू होईल असे वाटले नव्हते. रच्याकने, ह्यांनी कोडतात केलेल्या अपिलांच्या दस्तांवर स्मायल्या टाकल्या होत्या का हो? :-P
19 Mar 2015 - 1:55 pm | कविता१९७८
छान माहिती! लेख आवडला
19 Mar 2015 - 7:41 pm | पैसा
खूपच माहितीपूर्ण आणि मनोरंजक झाला आहे!