काही दिवसांपूर्वी एअर इंडियाने ठराविक काळात आरक्षण व ठराविक काळात प्रवास ह्या दोन बाबींवर विमान भाड्यात मोठी सवलत जाहीर केली होती.त्या वेळी एप्रिल मध्ये गोव्यात जाण्यासाठी तिकिटे बुक केली. ही आमची पहिलीच गोवा ट्रीप आहे. आजपर्यंत गोवा केवळ चित्रपटात व सिरियल मध्येच पाहीला आहे.
मिपाकर जर खालील गोष्टींबाबत मार्गदर्शन करु शकले तर त्याची मला खूप मदत होऊ शकेल.
(दोन दिवसांसाठीच व तेही ऑफसीजनला जात असल्याने कंपनीतल्या सहकार्याचा सल्ला नॉर्थ गोव्यातच राहा हा होता.)
१) गोव्यातले चांगली बजेट लॉजेस/हॉटेल्स/रिसोर्ट्स. (राहणार त्यापैकी फक्त एकातच आहे. मिपाकरांनी ह्यावरुन गोव्याच्या धाग्याचे काश्मीर करु नये. )
२) दोन दिवसांत पाहण्यासारखी ठिकाणे/बीचेस.
३) खवय्येगिरीसाठीची ठिकाणे.
(हा धागा टाकण्यापूर्वी मी मिपावर गोवासंबंधी काही लेख आहेत का ह्याचा शोध घेतला. त्यात बरेच मटेरियल गावले.( मिपावर आधी उपलब्ध असलेली शोधा ही कार्यप्रणाली काही सापडली नाही. गोवा + मिसळपाव असे गुगलले तेव्हा काही लेख सापडले.)
पांथस्थ व जयदीप ह्यांच्या धाग्या वरुन गोवा किती प्रेक्षणीय आहे हे समजले. सोत्रिंच्या धाग्यात ते दूर कुठेतरी साऊथ गोव्यात बिअर रिचवत बसले होते हे समजले. व पैसाताईंच्या ( टीम गोवा) धाग्यात गोव्याची भौगोलिक + ऐतिहासिक माहीती होती. सर्वच धागे वाचनीय आहेत परंतु त्यात वरील मुद्द्यांबाबत काही माहीती मिळु शकली नाही.
ट्रीपअॅडवायजर वगैरे संस्थाळवरच्या माहीतीवर इतका विश्वास नाही.)
प्रतिक्रिया
4 Mar 2015 - 8:45 pm | मुक्त विहारि
१) गोव्यातले चांगली बजेट लॉजेस/हॉटेल्स/रिसोर्ट्स....
कलंगूट बीचला जा आणि हवे ते हॉटेल निवडा.भरपूर बार्गेनिंग करा.
२) दोन दिवसांत पाहण्यासारखी ठिकाणे/बीचेस....
गोव्याचा मॅप मिळतो.कलंगूट बीचच्या आसपासच मोटर-सायकल किंवा कायनॅटिक होंडा भाड्याने देणारी माणसे असतात.दर दिवसा प्रमाणे रेट असतो.बिंधास्त भटका.
३) खवय्येगिरीसाठीची ठिकाणे....
तुमच्या कडे मॅप आणि मोटरसायकल असेल तर, ज्या हॉटेलच्या आसपास, लोकल पब्लिक असेल तिथे जावा.
--------
बादवे, गोवा ट्रिप हे व्यसन आहे.एकाच भेटीत पुर्ण गोवा बघायचा अट्टाहास करू नका.
4 Mar 2015 - 9:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोवा ट्रिप हे व्यसन आहे.एकाच भेटीत पुर्ण गोवा बघायचा अट्टाहास करू नका.
सहमत आहे. आठ दिवस राहुनही गोवा बघायचं राहीलं आहे. गोव्याच्या आठवणी दाटून आल्या.
बिचेस, मद्य, खाणार्यांना मासे, मजा आहे. स्नॅक्सला आठ दिवस वेगवेगळे काजु प्रकार होते.
मजा आली. बोटी, डान्स, सागरी किनार्यावर तासंतास बसणं. समुद्रगाज. अगं आई गं...!
विद्यापीठ विश्रांतीगृहात आठ दिवस होतो सकाळी मॉर्निंगवॉकला समुद्रच होता. हं आता लोक तिथेही सकाळी 'बसलेले' दिसायचे पण एवढं तेवढं चालायचंच. पण, सकाळी एखादा कोळी होडीवरुन दिसायचा, त्याचं जाळं जमा करणं, मासे निवडणे, अतिशय शांतपणे पाहता आलं.
आपल्या मिपाकर पैसा यांना अडीनडीला फोन करा माहिती अद्यावत मिळेल. भेटीचा अजिबात प्रयत्न करु नका.
कोणी मिपाकर येणार म्हटलं की त्या दोन तिनशे किमी दुर गावाला गेलेले असतात. आणि पुढच्या खेपेला नक्की भेटू असं म्हणायला त्या विसरत नाही. (मेलो आता)
-दिलीप बिरुटे
4 Mar 2015 - 10:55 pm | सुबोध खरे
गोवा ट्रिप हे व्यसन आहे.एकाच भेटीत पुर्ण गोवा बघायचा अट्टाहास करू नका.बिरुटे सर
साडे चार वर्षे गोव्यात राहून बारक्या बारक्या खेड्यात जाऊनही अजूनही मनाचे समाधान झालेले नाही. परत एकदा एक महिना राहून गोवा पाहावे असा विचार करतो आहे.
5 Mar 2015 - 9:46 am | पैसा
याच पुन्हा गोव्यात तुम्ही! =))
गेल्या वेळी तुमची खरेदीच संपेना!
5 Mar 2015 - 5:34 pm | विशाखा पाटील
खरंच, आठवणी दाटून आल्या. विद्यापीठ विश्रांतीगृहातलं जेवण सोडून बाकी गोवा मस्तच.
गोयेकरांनी बिबिंका, पेरूचे जाम असे गोडाधोडाचे पदार्थ खाऊ घातले होते.
5 Mar 2015 - 5:39 pm | गवि
..प्रा. डॉ.
षेवटच्या मजकुराशी शमत.. ;-)
4 Mar 2015 - 9:02 pm | पैसा
G.T.D.C. च्या वेबसाईटवरून त्यांचे एखादे हॉटेल बुक करा.
http://goa-tourism.com/
तुम्हाला टुरिस्ट लोक बघतात ती पॅकेजेस त्यांच्याकडे मिळतील. आणखी काही शोधायचा त्रास नको. स्वस्त वगैरे हॉटेल्स शोधून मिळतील, पण हे सरकारी कॉर्पोरेशन असल्याने सगळ्यात सुरक्षित आहे आणि फसवणूक नाही. त्यामुळे मी सगळ्यांना याच हॉटेल्समधे रहायचा सल्ला देते.
4 Mar 2015 - 9:40 pm | बहुगुणी
गोंय (गोवा) पाटणे बीच भाग १
गोंय (गोवा) पाटणे बीच भाग २
4 Mar 2015 - 10:30 pm | कानडाऊ योगेशु
हे लेख ही मी चाळले होते पण सोत्रि ठरवुन साऊथ गोव्याला गेले जे एअरपोर्ट पासुन साधारण ६० कि.मी दूर आहे त्यामुळे हा पर्याय मी टाळला. (परंतु लेखातील फोटोज वगैरे पाहुन एकदा तरी भेट द्यावी असे ठिकाण नक्कीच वाटत आहे.)
4 Mar 2015 - 10:31 pm | कपिलमुनी
पालोलीम ( पाळोले) ला जावा आणि ३ दिवस तिथेच र्हावा
5 Mar 2015 - 2:33 pm | मोहनराव
सगळ्यात आवडते ठिकाण - पालोलेम
5 Mar 2015 - 2:46 pm | कपिलमुनी
:)
6 Mar 2015 - 3:00 pm | मोहनराव
नक्कीच!!
4 Mar 2015 - 11:37 pm | खटासि खट
वास्को ला जा आणि अन्नपूर्णा हाटेलमधे मुक्काम ठोका. बिल काय पळत नाही. वर महाराष्ट्रीयन शाकाहारी थाळी मिळते, ती संपता संपत नाही. गोव्यावरून आल्यावरा बिनधास्त ठोकून द्यायचं, खूप मासे खाल्ले.
या अन्नपूर्णा हाटेलातून सकाळी इडली डोसा खाऊन बाहेर पडलं की डाव्या हाताने चौकात यायचं. इथं सकाळी नॉर्थ गोवा टूरच्या बशी उभारलेल्या असतात. (सोलापूरचे म्हणून नीट सांगतोय). त्यातल्या कुठल्या पण बशीत बसायचं. नाहीतर त्या किंवा रेल्वे स्टे च्या चौकात व्हॅन, कार्स भाड्याने मिळतात. मग एकाच बीच वर रेंगाळत बसा, नाहीतर सगळे बसा.
( मी गेलो होतो तेव्हां एकूण एक बीचेस वर सगळे युरोपियन्स सिक्स्टी प्लस होते आणि त्यांनी काही न काही परिधान केलं होतं. तद्वत देवळं आणि चर्चेस पहायला जाणं अगदीच चुकीचं ठरणार नाही. नंतर म्हणू नका आधी का नाही सांगितलं..
5 Mar 2015 - 9:40 am | कंजूस
धाग्याचं काश्मीर करणार नाही परंतू ताजमहालला तारेचं कुंपण.वेळोवेळी गोव्याचं साहित्यिक वर्णन (बाकिबाव, पिंगे, पुलं) ते गोव्याहून परतलेल्यांचे आनंदी चेहरे पाहिले की वाटतं एकदा जाऊन यावं. परंतू "तुला तुरट, रंगीत, खारं पाणी अथवा त्यातल्या जीवांशी वाळुच्या कणाइतकाही संबंध नाही तर तू तिकडे जाऊन काय करणार?" या सलल्याने जाण्याचं टाळलं. मागच्या हंपिच्या ट्रीपशेवटी सकाळी सहा ची एक गाडी दुपारी दोनला मडगावला जाते त्याने गोवा करून यावे हा विचार होता. शिवाय दुधसागरही गाडीतूनच दिसला असता. आता सोलापुरकरांच्या पोस्टने थोडा हुरूप आलाय. स्वत: मेल्याशिवाय गोवा दिसत नाही म्हणतात.तसा मी पर्यटनाला गेल्यावर नातेवाइकाकडेही न जाण्याचा विचाराचा असल्याने कुणा मिपाकराला भेटण्याचे दूरच राहिले. आमचे शेजारी मुक्तविहारीच यातून मार्ग दाखवतील. तोपर्यँत गोँय Xकंजूस.
*आल्यावर आपल्या आनंदी चेहऱ्याचे फोटु टाकणे.
5 Mar 2015 - 11:08 am | खंडेराव
काही माहिती -
स्कुटर भाड्याने - २००/३०० रुपये दिवस
कार भाड्याने - १०००-१२०० रुपये दिवस
मला अन्जुना आवडतो. ५०० ते २५०० मधे उत्तम जागा आहेत रहायच्या. बजेट सांगीतले तर बरे होईल.
वगातोर च्या आधी मंगो ट्री ला जेवायला अवश्य जा. मस्त जेवन.
5 Mar 2015 - 1:03 pm | विभावरी
गोव्याला कधीही जा गोवा सुंदरच दिसतो . हिंडा ,फिरा किंवा नुसते समुद्र किनारी भटका गोव्याचा निसर्ग , तिथली घरे ,
झाडे ,लाल मातीचे रस्ते ,मनमोकळी माणसे ,शांत संथ जीवन आणि चवदार मासळीचे जेवण हे सगळे इतके छान आहे
की पुन्हा पुन्हा तिथे जावेसे वाटते .
खरच गोव्याला जाणे हे एक व्यसनच आहे .
5 Mar 2015 - 2:15 pm | गवि
उत्तर गोव्यातच जाण्याचं तुम्ही ठरवलं आहे असं गृहीत धरतो. तुम्हाला फार आडबाजूला, खेड्यापाड्यात जायचं नसून साधारण प्रसिद्ध पर्यटनस्थळीच रहायचं आहे असं दिसतं. चालेल. त्यातही वेगळी मजा आहे.
फक्त काहीही सांगण्याआधी दक्षिण गोव्यात जरा दूरवर असलेल्या पाळोळे, पाटणे, अगोंदा या त्रिकुटापैकी अगोंदा या छोट्याशा गावात असलेल्या अगदी थोड्या बीचसाईड घरांमधे राहण्यासाठी पुढेमागे वेगळी ट्रिप काढा. जन्मभर त्या आठवणी उरात ठेवाल याची खात्री देतो.
एक उदाहरण म्हणून क्यूबा अगोंदा:
सौजन्य : Tripadvisor
सौजन्यः cubagoa.com
आता तुम्ही द. गोव्यात जाणार नसल्याने या सुंदर भूभागाविषयी लिहिण्यात श्रम वाया घालवत नाही.
उत्तर गोव्यामधे शेकडो ठिकाणं राहाण्यासाठी अन खाण्यासाठी सांगता, रेकमेंड करता आणि तुम्हाला स्वतःलाही शोधता येतील.
पण शेकडो चॉईस असले की निवड जास्त कठीण होऊन जवळजवळ अशक्य होते. त्यामुळे सध्या एखाददुसरा कोणतातरी उत्तम पर्याय समोर आला तर तुम्हाला जास्त आवडेल. याकरिता ठिकाण, परिसर, उल्लेखनीय बीचेस आणि खाद्यठिकाणांची नजिकता या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करुन मी "कलोनिया सान्ता मारिया" - Colonia Santa Maria हे ठिकाण राहण्यासाठी सुचवतो. उत्तर गोव्यात बागा बीचवरच हे ठिकाण आहे. पोर्तुगीज कलोनियल पद्धतीचे व्हिला आहेत. मोठ्या परिसरात पसरलेला आहे रिसॉर्ट.
सौजन्यः agoda.com
तपशीलवार माहिती आणि इतर फोटो खालील वेबसाईटवर पाहता येतीलः
http://www.csmgoa.com/
व्हिला, बंगले वगैरे पाहून किंमतीबाबत दचकण्याची गरज नाही. हे गोव्याच्या मानाने आणि एरियाच्या मानाने एरवीही बरंच रास्त दराचं रिसॉर्ट आहे. आणि ऑफसीझनला जाताय त्यामुळे ते आणखी किंमत पाडून तुम्हाला बुकिंग देतील. फोन करुन कमीतकमी टेरिफ किती देतात ते विचारा.
खुद्द कलोनिया सान्ता मारियामधे जेवण्याखाण्यापिण्याची उत्तम सोय आहेच.. तिथेही ठराविक वेळी संगीत आणि कॅम्पफायर वगैरे असतो. विचारुन पहा नेमके तेव्हा आहे का ते.
या रिसॉर्टपासून खालील ठिकाणं अतिशय जवळ, काही तर चालत जाण्याजोगी आहेत.
- बागा बीच
-अन्जुना बीच
-कलंगुट बीच
-बागा फ्ली मार्केट
- कवाला - खाद्य आणि संगीतठिकाण. ( तपशील आणि तुम्ही जाल त्या रात्री कोणता बँड असेल, रेट्रो, जाझ की काय ते कळण्यासाठी आधी चवकशी करा. माहिती http://www.cavala.com/ इथे मिळेल.)
- इन्फन्टारिया हे एक रेस्टॉरंट आहे. कलंगुट बसस्टँडच्या बाजूलाच आहे. पुण्यातल्या पेठीय हॉटेल्सना लाजवेल अशी सर्विस आहे. आम्ही तुम्हाला अन्न देतो यात आनंद माना असा अॅटिट्यूड किंवा गिर्हाईक म्हणजे सर्वात दुर्लक्षणीय वस्तू असा अनुभव मिळण्याची खात्री असूनही आवर्जून जाण्यासारखं ठिकाण.. पण दुपारी बारानंतर लंचला जा. तरच सगळा मेनू मिळेल. सकाळी फार मर्यादित पदार्थ असतात. लोकल सीफूड पासून केक्स आणि बेकरी आयटेम्सपर्यंत स्वादाबाबतीत अत्यंत तृप्त करणारं ठिकाण आहे हे.
ब्रिट्टोजः संध्याकाळी गोअन सॉसेज (अतिआंबट असल्याने मला वैयक्तिक आवडत नाही) आणि पाव किंवा अन्य काही गोव्यातलं फूड पोर्तुगीज + पाश्चात्य लाईव्ह संगीतासकट खायचं असेल तर बागा बीचवर असलेल्या ब्रिटोज (Britto's) मधे डिनरला जा. फेणीचे घोट अन सुकी सुरमई / चणक चाखत समुद्राकडे पाहात (आधी योग्य सीट पकडून) लाईव्ह संगीताची मजा घ्या.
दुपारी टाईमपासच हवा असेल तर इथून दिवसभराची टॅक्सी घेऊन फोंड्यानजीक असलेल्या अनेक स्पाईस गार्डन्सपैकी एक पाहून या. जेवणाखाण्यासहित अॅग्रो टुरिझम टाईप फॅन्सी प्रकार आहे, पण तीनचार तास उद्योग मिळतो. त्याच टूरमधे जुन्या गोव्यातली मूळ मोठी आमनेसामनेवाली चर्चेस पाहिली नाहीत तरी चालेल पण टेकडीवर असलेलं Chapel of Our Lady of the Mount हे १५१० मधलं चर्च जरुर पहा. त्याच्या आत बहुधा जाता येणार नाही, पण तो पूर्ण एकांत असलेला शांत परिसर आणि तिथून दिसणारं खालचं सुंदर दृश्य पाहून शांत व्हाल. इतकी शांतता गर्दीविरहीत जागा आणि एअर कंडिशनरसारखा सततचा वारा इतरत्र क्वचित मिळेल.
तसंच वागातोरला चापोरा किल्ला (लहानशीच चढण) जरुर पहा. या किल्ल्याची खरी मजा पावसाळ्यात असते. दुरुन समुद्रावरुन येणारा पाऊस आपण कोरडेपणी पाहात असतो आणि आपल्यादेखत तो वेगाने येऊन आपल्याला भिजवतो. पूर्ण परिसर थंड आणि हिरवागार ओला असतो त्या काळात. अप्रतिम. पण तुम्ही एप्रिलमधेही एक चक्कर टाकाच. तिथून दिसणार्या समुद्राच्या पॅनोरमिक व्ह्यूसाठी. (संदर्भ: दिल चाहता है मधली मित्रांची गोवा ट्रिप)
बागा या ठिकाणचं एकूण मार्केटही मजेदार आहे. त्यातून नुसता फेरफटकाही मारायला फुलटू धमाल येते.
काजू फेणी आणि नारळफेणी दोन्ही उत्तम असतात. मला नारळफेणी जास्त आवडते.
सोबत लहान मुलं नसल्यास आणि डान्सची आवड असल्यास टिटोज (हेही सान्ता मारियापासून चालत जाण्यासारखे) मधे जाऊन दमून पडेस्तोवर धमाकेदार डान्स करा.
दोन दिवसांत इतके बास होईल.
बागा बीच परिसरात अनेक सर्व्हिस अपार्टमेंट्सही आहेत. इंटरनेटवर शोधून आधी फोन करुन बुक करता येतील. ही एक आल्टरनेट सजेशन.
(डिस्क्लेमरः केवळ चांगल्या हॉटेल्सची माहिती देणे या हेतूने हे सांगत आहे. माझा या हॉटेल्सशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही)
5 Mar 2015 - 2:52 pm | कानडाऊ योगेशु
ह्याला म्हणतात अगदी "गविस्तर" प्रतिसाद.
तूर्तास ही फक्त पोच.बाकी वाचुन व समजुन लिहिनच!
8 Mar 2015 - 10:28 pm | चाणक्य
आवडला शब्द. धाग्याचं नाव वाचलं आणि धागा उघडून सरळ गविंचा प्रतिसाद शोधायला घेतला.
5 Mar 2015 - 2:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता पुन्हा जाणं आलं.
-दिलीप बिरुटे
5 Jul 2015 - 1:32 am | निनाद मुक्काम प...
गवी तुम्ही सांगितलेल्या क्युबा चे सगळे हॉटेल्स डिसेंबर साठी बुक्स झाले त्यात समुद्री झोपड्या सुद्धा आल्या.
समुदाच्या लगत झोपड्या हा पर्याय आवडला असून त्याबद्दल अधिक सविस्तर माहिती दक्षिण गोव्यासाठी सांगावी .
किणकिनाट च्या सल्ल्यावरून मारिया पौलो गेस्ट होऊस ला बुकिंग साठी मेल केली; आंजा वर पहिले तर ह्या गेस्ट हौस चे खूप चांगले रीव्युं आहेत आहे पाहूया काय होते ते
नॉर्थ मध्ये काही दिवस अपार्टमेंट बुक करायचा आहेत
बीच जवळच्या
पाहूया
24 Nov 2016 - 3:46 pm | पुंबा
गवि, दक्षिण गोव्याबद्दल सांगाल का प्लिज. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला गोव्याला जाणार आहे, तेव्हा नेहमीच्या बीचेस वर न जाता आजूबाजूच्या अनवट, खेड्यांत वगैरे जावं असं वाटतंय.
5 Mar 2015 - 2:33 pm | खंडेराव
@गवि : नविन माहिती मिळाली, इतक्या वेळेस जाउनही ते चर्च पाहिले नाही. धन्यवाद.
5 Mar 2015 - 3:26 pm | मनिमौ
मी बी सोलापूर करीन हाय
5 Mar 2015 - 4:33 pm | मालोजीराव
पालोलेम बीच - शांत समुद्रकिनारा आहे, कलंगुट बागा सारखी जास्त धामधूम असलेली बीचेस नको असतील तर हा उत्तम पर्याय आहे. इथे राहण्याच्या सोयीसुद्धा सुंदर आणि स्वस्त एकदम. बीच हट्स या प्रकारामध्ये राहून पहा. हट पासून फक्त ५० पावलांवर समुद्रकिनारा पुढ्यात. रेट्स कमी अगदी दोघांसाठी ७०० प्रतीदिन पासून.
रैश मागोश किल्ला - बार्देझ ला असलेला अतिशय सुंदररीत्या रिस्टोरेशन केलेला किल्ला. आतमध्ये मारियो मिरांडा यांच्या चित्रांची आर्ट ग्यालरी आहे. आवर्जून बघा.
अग्वादा किल्ला - बार्देझ मधला आणखी एक किल्ला, अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. छत्रपति संभाजी राजे आणि पोर्तुगीज यांच्यातील लढायांमुळे जास्त प्रसिद्ध.
कलंगुट, बागा - लोकप्रिय आणि व्यस्त असणारे बीचेस, राहण्याच्या चांगल्या सोयी उपलब्ध आहेत. अपार्टमेन्ट,विला भाड्याने मिळतात. वॉटर स्पोर्ट वगैरे आहे.
शांतादुर्गा मंदिर - फोंड्याला असणारे गोव्यातील सर्वात मोठे मंदिर असावे, थोरले शाहू छत्रपति यांनी हे बांधून घेतले.
खाण्यासाठी - अंजुना बीच वरचे कर्लिस आणि बेतलबतिम चे मार्टिन कॉर्नर (एवढ्यात गेलेल्या मित्रांकडून मार्टिन चे रीव्युज चांगले आले नाहीत )
क्लब क्युबाना - नाईटलाइफ़, पार्टी वगैरे मध्ये इंटरेस्ट असेल तर हे बेस्ट प्लेस आहे. बुधवार रात्री ११०० एन्ट्री तर शनिवारी रात्री १८०० एन्ट्री असते (कपल्स अलौड फक्त ) … रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत …अनलिमिटेड ड्रिंक्स सह.
एलपीके(love passion karma) वाटरफ्रंट - क्युबानासारखे आणि तितकेच प्रसिध्द आहे. फिरंग्यांची आवडती जागा.
१५००-१८०० च्या आसपास एन्ट्री आहे अनलिमिटेड ड्रिंक्स सह, आशियातल्या मोठ्या क्लब्स पैकी एक
बाकी सांगण्यासारख्या अनेक गोष्टी…पण लिहायचा कंटाळा :(
5 Mar 2015 - 4:39 pm | गवि
..मी स्वतः मार्टिनप्रेमी आहे. पण लेटेस्ट खेपेला चव किंचित
घसरलेली वाटली..इतरत्रही असे अनुभव ऐकले म्हणताय म्हणजे कायतरी गडबडलंय.
5 Mar 2015 - 6:11 pm | सौंदाळा
+१
७/८ महिन्यापुर्वीच मार्टीन्सला जाऊन आलो.
जेवण जेवढे ऐकले होते त्यामानाने ठिकठाक होते
सेर्नाबातिम बीचजवळ फर्ताडोज बीच रिसॉर्ट आहे. तिकडे बीचवर फिरायला गेलो होतो तर रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमधे बरेच लोकल लोक जेवायला आले होते म्हणुन तिकडेच जेवलो आणि मार्टीन्स विसरलो.
पुढची सर्व जेवणे तिकडेच केली.
24 Nov 2016 - 5:48 pm | यशोधरा
पाळोळें.
27 Apr 2015 - 4:45 pm | निनाद मुक्काम प...
येत्या डिसेंबरला गोव्यात दोन आठवडे जाण्याचा बेत आहे.
पिक सिझन आहे पण आम्हास सुट्टी ह्याच महिन्यात मिळत आहे , दर वेळच्या भारत भेटीत आम्ही एका राज्यास भेट देऊन मी न पाहिलेला भारत पाहून घेतो .मात्र सध्या आमची कन्या आधीच वर्षाची असल्याने जास्त धावपळ करून धावता दौरा करून गोवा भ्रमंती सोयीस्कर ठरणार नाही व भटकंतीचा लुफत घेता येणार नाही म्हणून समुद्र किनार्यालगत
एखादे हॉटेल अथवा अन्य कोणताही स्वस्त व मस्त पर्याय शोधून बीच वर वेळ घालवणे व रुचकर देशी व परदेशी खानपान सेवेचा लाभ घ्यायचा मनसुबा आहे.
सल्ला हवा आहे. एखादे ओळखीचे हॉटेल व पिक सिझन मधील रेट्स व ह्य ह्या सिझन मध्ये कराव्यात आणि करू नयेत अश्या गोष्टी जरूर सुचवाव्यात.
27 Apr 2015 - 4:50 pm | गवि
.वरचा माझा एक प्रतिसाद उपयोगी पडतोय का ते पहा.
27 Apr 2015 - 4:53 pm | निनाद मुक्काम प...
योगेश
तो धागा मी आधीच वाचला आहे ,मात्र मी पिक सिझन मध्ये जात आहे , तेव्हा आर्थिक समीकरणे बदलली असतात आणि कमवण्याचा सिझन असल्याने प्रत्येक गोष्ट महागडी असणार मी स्वतः ह्या शेत्रासंबंधित असल्याने मला कल्पना आहे , म्हणूनच पीक सिझन साठी वेगळी माहिती हवी होती.
शक्यतो प्रत्येकजण गोवा पिक सिझन च्या वेळी
टाळेल. पण आम्हाला ह्यावेळचा नाताळ भारतात साजरा करायचा आहे व ह्याच दरम्यान सुट्ट्या सद्धा आहेत
24 Nov 2016 - 2:57 pm | अनिकेत वैद्य
जानेवारी २०१७ च्या शेवटच्या आठवड्यात गोव्याला जायचा बेत आहे.
ह्या वेळी दक्शीण गोव्यात जायचा मानस असून शक्यतो गर्दीपासून दूर, शान्त ठिकाणी, समुद्राजवळ जायचे आहे.
गोव्यातली स्थानीक सन्स्क्रूती, जास्त प्रसिद्ध नसलेली ठिकाणे बघायची आहेत.
24 Nov 2016 - 4:10 pm | पुंबा
इथे देखील चांगली माहिती दिसतेय.
24 Nov 2016 - 4:59 pm | अनिकेत वैद्य
इथली बरीच माहीती ही cosmo वाटते.
स्थानिक स्थलदर्शन, स्थानिक खाद्य/पेये ह्याविषयी माहीती शोधत आहे.
केवळ मज्जा, गोन्धळ, जिवाचा गोवा करणे हे उद्देश नाहीयेत.
24 Nov 2016 - 4:27 pm | सुकामेवा
मी नुकताच पालोलेम बीचला जाऊन आलो, उत्तम ठिकाण आहे. रु ८००/- मध्ये राहायची सोय झाली. जेवणाची सोय चांगली आहे
तिथेच जवळ मल्लिकार्जुन मंदिर आहे गेलात तर ते नक्की बघा
24 Nov 2016 - 4:29 pm | पुंबा
हॉटेलचे नाव सांगाल का प्लीज.
24 Nov 2016 - 5:48 pm | यशोधरा
पाळोळें.
24 Nov 2016 - 4:40 pm | प्रीत-मोहर
१. काणकोण तालुक्यात पाळोळें, तळपण, गालजीबाग,आगोंद , राजबाग असे बरेच प्रसिद्ध आणि तुननेत कमी गर्दीचे बीच आहेत.
२. जेवण ह्या बीचेस वर मांसाहारी जेवण मिळते.
३.श्रीस्थळ येथे श्री मल्लिकार्जुनाचे भव्य आणि जुने देउळ आहे.
४. पैंगिण येथे श्री वेताळाचे मंदिर आहे
५. खोतीगाव येथे अभयारण्य आहे (प्राणी कैद नाही ठेवत, मुक्त संचार अस्तो. आणि ह्या भयारण्याच्या जागेतच बरीच गावं आहेत)
६. झालच तर कुस्कें आणि बामण्बुडो धबधबे आहेत
७. काब दी राम किल्ल्याचे अवशेष ही आहेत.
अजुन काही सुचल तर लिहितेच.
६.
24 Nov 2016 - 5:36 pm | स्मिता श्रीपाद
मॉन्टेगो बे व्हिलेज
http://www.montegobaygoa.com/
दिवाळीत ईथे जाउन आले.
सुन्दर, शांत मोरजीम बीच वरील रेसॉर्ट.
सुंदर स्वच्छ खाजगी बीच.हॉटेल एकदम बीच वरच आहे.
जेवण उत्तम, स्टाफ अतिशय मस्त व मदतीला तत्पर होता.
लॉग केबीन मद्धे राहिलो होतो. त्यांचा आकार जरासा छोटा वाटला नॉर्मल हॉटेल रूम पेक्षा.पण रूम मस्त होत्या.आम्ही जास्तीत जास्त वेळ बीचवरच काढला सो आम्हाला रुम साईज बद्दल काही तक्रार नाही.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीच अतिशय शांत आणि व्यवसायीकरण न झालेला आहे. एकही वॉटर स्पोर्टस चा प्रकार नव्हता त्यामुळे गडबड गोंधळ अज्जीबात नव्हता.आमच्या सोबत असलेल्या २ छोट्या मुलींनी खुप मनापासुन बीच एंजॉय केला. १ दिवस संध्याकाळी बागा बीच वर फिरायला गेलो तेव्हा तिथला गोंधळ आणि गर्दी बघुन लेक वैतागली व आपल्या समुद्रावर परत जाउ म्हणुन धोशा लावला होता.
ज्याना गर्दी व गोंधळ टाळुन शांत ठीकाणी जायचे आहे त्यानी नक्की विचार करा.
24 Nov 2016 - 8:06 pm | बोलघेवडा
कालच गोव्यावरून आलो. आठवणी ताज्या आहेत. वर म्हणल्याप्रमाणे, "गोवा हे व्यसन आहे...." एकदम सगळे बघण्याचा अट्टाहास करू नका. आम्ही सर्व्हिस अपार्टमेंट राहिलो. ३ रात्र ४ दिवस भाडे = ९०००
कार बुकिंग (Hyundai I १०) = १००० x २ दिवस = २०००
पेट्रोल = १०००
ठिकाणे :
कलंगुट, कांदोलिम बीच
शांतादुर्गा आणि मंगेशी मंदिर ( हि ठिकाण थोडी लांब आहेत)
basilica of bom jesus church
बाकी पूर्ण वेळ kandolim बीच वर पडून होतो.
24 Nov 2016 - 8:59 pm | प्रचेतस
बॅसिलिका ऑफ बॉम जीझस जबरदस्त आहे. त्याच्याजवळचेच सेन्ट ऑगस्टीन टॉवरचे भग्नावशेष उतरत्या उन्हात विलक्षण सुंदर भासतात.