सेंटर पिच (मराठी दिन लघुकथा स्पर्धा)

मित्रहो's picture
मित्रहो in स्पर्धा
24 Feb 2015 - 7:07 pm

“आई उद्या मला लवकर उठवशील का?”
“कशाला?”
“मला खेळायला जायच आहे”
“बर”
तिने ‘बर’ म्हटले तरीही माझा तिच्यावर आजिबात विश्वास नव्हता. पक्की लायर आहे ती. जेवायला चल म्हणून घरी बोलावते आणि ते रुपये पैशाचे गणित सोडवायला देते. मला तर वाटत जगातल्या साऱ्या आया ह्या लायर आणि सेल्फीश असतात. वेळ मिळेल तिथे आईगिरी करतात आणि मुलांनी ऐकले नाही की त्या शामच्या आईची गोष्ट ऐकवतात. तिही आईगिरीचीच. बिचारा शाम. या आयांना सतत वाटत असत की आपल्या मुलांनी आपलच ऐकल पाहीजे. दहा महीने सतत अभ्यास, अभ्यास म्हणून वैताग आणतात, टिव्ही बघू देत नाही, मोबाईल खेळू देत नाही, आपल्या मनाच काही करु देत नाही. सुट्टी लागली की शुद्धलेखन लिहायला सांगतात. का म्हणून शुद्धलेखन लिहायचे? दहा महीने लिहीतो ते काय घाण होत? मी अजिबात शुद्धलेखन लिहीत नाही. ती कधी माझे ऐकते? स्कूलमधे मी हीला मॅडम म्हणतो पण ही मात्र मला क्लास मधे सुद्धा पिंट्या म्हणते. सारे हसतात, मुलीसुद्धा. हीला म्हटल तर ही म्हणते तू लहान आहेस. लहानांना हसले तर चालते? ज्या स्कूलमधे आई असेल ना त्या स्कूलमधे जाउच नये पण स्कूलमधे अॅडमिशनच्या वेळेला लहान मुलांना विचारतो कोण? सरळ स्कूलमधे नेउन सोडतात. आधी मला तर फार राग यायचा, मी रुसायचो, रडायचो, दूर जाउन बसायचो. मला हीच्याशिवाय झोप येत नाही हे हीला पक्के ठाउक होते. मग मी जवळ आलो की ती मला हसत होती. असा राग यायचा ना. आता मी रुसत नाही, रडत नाही मोठा झालो, नउ वर्षाचा आहे.

“बाबा तुमच्या मोबाईलमधे सकाळी साडेचारचा अलार्म लावता का?”
“का रे?”
“मला सकाळी खेळायला जायचे आहे”
“खेळायला, त्यासाठी इतक्या सकाळी उठायची काय गरज आहे? आरामात जायच.”
क्वश्चन, क्वश्चन आणि क्वश्चन. माझ्या क्वश्चनला कोणी अॅन्सर करत नाही पण मला मात्र सारेच क्वश्चन विचारतात. मी एकदा बाबांना विचारले ‘जिथे एक पण माणूस राहत नाही त्या अंटार्टीकाला सेपरेट काँटिनेंट का केला? आहे त्या काँटिनेंटला जॉइन केला असता तर एक काँटिनेंट कमी झाला असता’ त्याचे स्पेलींग किती कठीण असते पाठ करुन करुन कंटाळा येतो. बाबा म्हणाले ‘मी कामात आहे. भलतेसलते प्रश्न विचारुन डोक उठवू नको.’ काम कायतर टिव्हीवर न्यूज बघायच्या नाहीतर लॅपटॉपवर फेसबुक किंवा मिसळपाव. आई म्हणते बाबांना लॅपटॉपवर काम करायचे पैसे मिळतात.
“हे बघ सकाळी बरोबर अलार्म बंद करायचा. माझी झोपमोड नको.”
“बर. बाबा मी आता क्लॅश ऑफ क्लॅन खेळू?”
“नाही, सकाळी उठायचे आहे ना झोप आता.”

मला कुठे झोप येणार होती आता. माझी एकट्याचीच फक्त सकाळी उठायची सोय झाली होती. इतरांचे काय. तेही उठायला हवे ना. सगळे आले तरच मॅच होणार होती. मला टीमचा विचार करावा लागतो मी कॅप्टन आहे ना टीमचा. तो डुडु फॅटसू मला एक्सरे म्हणतो. तो म्हणतो ‘तुझा एक्स रे काढायला मशीनची गरज नाही फोटो काढला तरी चालेल.’ ह्याच काय ह्याला झोपेत बेड वरुन खाली पडला तरी कळत नसनार नुसता स्पाँजी आहे. तो चांगला मारतो म्हणून टीममधे लागतो. लोळला असेल घरी. आशु, आदुची आई तर त्यांचे अजिबात ऐकत नाही. ध्रुवा तर एकटाच, त्याची आई पण एकटीच असते. ती त्याचे ऐकते बहुदा. कधी कधी ते चॉकलेटवाले अंकल येतात ते आले तर ध्रुवाचे काम होउन जाइन. ते त्याच सार ऐकतात. ध्रुवा लकी आहे. तो आमच्या टिमचा विकेटकिपर आहे. आम्हाला सकाळी उठून पुढ्च्या ग्राउंडमधे खेळायला जायचे होते. खेळायला तर रोजच जातो पण आज सेंटरची पिच पकडायची होती. संध्याकाळी ती पिच मिळत नाही मोठे येउन खेळतात. हल्ली तर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ ती फ्लोरामधलीच मुले खेळतात. दहावी अकरावीची मुले आहेत खूप भाउगिरी करतात. आधी ते अंकल लोक खेळायचे. आता ते दिसत नाही. त्यांची टीम खूप स्ट्राँग होती. कधी कधी ते शर्मा अंकल ग्राउंडमधे रनिंग करताना दिसतात. ते राजस्थानच्या टीममधे होते म्हणतात. आठवडाभर मी रोज सकाळी उठून ग्राउंडवर काय चालते ते बघत होतो. आमच्या मागच्या बाल्कनीतून ग्राउंड दिसत होते. मी रोज त्या सेंटर पिचकडेच बघत उभा राहत होतो. उद्या आम्हाला सकाळी जाउन ती पिच पकडायची होती. टेन्शनमुळे मला झोप येत नव्हती. मी असाच पडलो होतो.

मला ती मॅच आठवत होती. त्या अष्टविनायकच्या मुलांबरोबरची. तीन महीने रोज सकाळ संध्याकाळ प्रॅक्टीस करुन मला वाटले होते की आमची टीम आता स्ट्राँग झाली आहे. माझा एक फ्रेंड अष्टविनायकमधे राहतो. त्यांच्या बिल्डींगमधे त्यांना त्यांची स्वतःची पिच होती. छोटेसे ग्राउंड होते. तो मला स्कूलबसमधे चिडवायचा तुमच्या बिल्डींगमधे मुलांना खेळायला जागा नाही म्हणून. मी त्याला सांगायचो आम्ही मोठ्या ग्राउंडमधे खेळतो तुमच्यासारखे नाही आतल्या आत. आम्ही तुम्हाला कधीही हरवू. मीच मॅच ठरविली. मॅच अष्टविनायकवाल्यांच्या छोट्या ग्राउंडवर होती. अष्टविनायक मधल्या मुलांचे आईबाबा पण मॅच बघायला आले होते. लहान मुलांची मॅच बघायला मोठे येतात का कधी? मला त्यांचे हसू आले. आमच्याइथले कोणीच नव्हते. कुणी अंकल त्यांचा कोच होता. ती मुले आईबाबांना मम्मीडॅडी म्हणत होती. त्यांनी बिस्कीटे आणली होती, पाणी आणले. तशा त्या मम्मी चांगल्या होत्या त्यांनी आम्हाला पण बिस्कीट दिले.

त्या मॅचमधे ती बिस्कीटे सोडली तर आमच्यासाठी काहीच चांगले घडले नाही. आमचा पार धुव्वा उडाला. त्या अष्टविनायकच्या पोरांनी एट ओव्हरमधे सिक्सटीफाइव्ह रन केले. आशुनी दोन विकेट काढल्या पण बाकी कुणाची बॉलींग फार चांगली पडली नाही. डुडु आणि मी ओपनींगला होतो. डुडुनी पहील्याच बॉलला बाउंड्रीच्या बाहेर पाठवला. डुडु असाच खेळला तर टारगेट फार मोठे नव्हते पण पुढचाच बॉल सरळ डुडुच्या डोक्यावर आदळला. डुडु तसाच स्टंपवर पडला. अष्टविनायकच्या मुलांनी मग सतत लेग स्टंपवर बॉलींग करुन आमच्या विकेट काढल्या. त्यांच्या त्या कोच अंकलने त्यांना तसे सांगितले होते. आमची पूर्ण टीम ट्वेंटीफाइव्ह रन काढुन आउट झाली. मी थर्टीन रन काढून नॉट आउट राहीलो पण मलाही त्यांनी लेगवर टाकलेले बॉल मारता येत नव्हते. फार वाइट वाटले. आम्हाला लेगवरचे बॉल का मारता आले नाही हाच विचार मला सतावत होता. मलाच विचार करावा लागतो बाकीचे फक्त जाउन खेळतात. मी कॅप्टन ना टिमचा. मी सारा विचार करुन बघितला पण कारण सापडत नव्हते. मला तर उगाच शंका आली की आमचे आईबाबा मॅच बघायला आले नाही म्हणून तर आम्ही हरलो नसेल. तसे काही नव्हते त्यांनी येउन काय केले असते. उलट आईने सांगितले असते जास्त लोळू नको कपडे घाण होतात. मग काय कारण होते. आणि एक दिवस अचानक मला कारण सापडले.

आधी आम्ही आमच्या बिल्डींगमधे खाली खेळत होतो. एका बाजूला कार पार्कींग आणि दुसऱ्या बाजूला बिल्डींगची कंपाउंड वॉल अशात मधे रस्त्यावरच आम्ही खेळत होतो. बॉल इकडे तिकडे जाउ नये म्हणून आम्ही सरळच शॉट मारीत होतो. एक दिवस एक अंकल ऑफिसला उशीरा गेले त्यांनी आम्हाला तिथे खेळताना पाहीले. त्या अंकलकडे मी आणि डुडु हॅलोवीनच्या दिवशी चॉकलेट मागायला गेलो होतो तर त्यांनी आम्हाला ‘इंडियन कल्चर’ वर लेक्चर दिले होते. नाही द्यायचे चॉकलेट तर नका देउ पण लेक्चर का देता? त्यांचा चेहरा बघून आमचे तिथे खेळणे त्यांना आवडलेले दिसत नव्हते. माझी शंका खरी ठरली दुसरे दिवशी सिक्युरीटीने आम्हाला हाकलून लावले.
“बच्चा लोग यहा नही खेलनेका. बाहर जाके खेलो.”
“क्यू?”
“तुम्हारी बॉल कारको लग सकती है.”
“हम उधर सायकल लगाते है. चार महीनेमे बॉल लगी नही.”
“वो मुझे नही मालूम, सोसायटीवालोने बोला बच्चा लोगोको इधर खेलने नही देनेका”.
सोसायटीमधे छोटी मुले येत नाही? सोसायटीवाले काय फक्त चिल्ड्रेनस डेलाच मुलांना चॉकलेट देतात? इतर वेळेस त्यांना मुले म्हणजे गोंधळ करनारी, त्यांची झोप उडवणारी, उडाणटप्पू कारटीच वाटतात. आम्हाला बाहेर खेळायला सांगण्यापेक्षा मुलांच्या खेळायच्या वेळात हे ह्यांच्या कार का बाहेर पार्क करीत नाही? मला चीड आली होती पण मोठ्यांचेच ऐकायचे असते ना. तो सिक्युरीटी तरी काय करनार त्याला मोठ्यांनी जे सांगितले तेच करनार ना तो.

गेली तीन महीने आम्ही समोरच्या ग्राउंडवर खेळतोय. तिथे खूप साऱ्या टीम खेळायला यायच्या. तिथे खेळायला पिच सापडत नव्हती. आम्ही कोपऱ्यात ग्रासवरच पिच बनवून खेळायचो. सेंटर पिचवर खेळनारी ती फ्लोराची मुल आम्हाला फार त्रास द्यायची. त्यांचा बॉल आमच्याकडे आला तर आम्हालाच थ्रो करावा लागायचा पण आमचा बॉल त्यांच्याकडे गेला तर रागावायचे. ‘इकडे बॉल यायला नको’ असे दमटवायचे. चुकुन कधी बॉल गेला तर जोरात उलट्या दिशेने कीक मारायचे. लांब बॉल गेला की दोन वेळा थ्रो करावा लागायचा, हात दुखायचा. म्हणून मग आम्ही उलट खेळायला लागलो पण दुसऱ्या बाजूला नाला होता. बॉल सतत नाल्यात जायचा. तिथन मलाच बॉल काढावा लागायचा. कॅप्टन न मी. तो बॉल काढा, हात धुवा, कंटाळा आला होता. मग मीच रुल केला नाल्यात बॉल मारला तर आउट. तेंव्हापासून मुले लेग स्टंपवरचा बॉलही ऑफलाच मारत होते. परत लेगला बॉलींग केली की वाइड असाही रुल केला. मॅचमधे हे रुल नव्हते ना म्हणूनच आम्ही हरलो. बिल्डींगमधल्या अंकल लोकांमुळे आणि ग्राउंडवरच्या या मोठ्या मुलांमुळे आम्हाला असे रुल करावे लागले. त्यामुळेच आम्हाला लेगवरचे बॉल खेळता आले नाही. आम्ही हरलो. आता आम्हाला सेंटर पिचवरच प्रॅक्टीस करावीच लागनार होती तरच आम्ही लेगवरचे बॉल खेळू शकनार होतो.

सगळी मुले सकाळीच जमली. डुडु फॅट्सूने थोडा उशीर केला पण आला. आम्ही ग्राउंडवर आलो तेंव्हा ग्राउंड पूर्ण एम्पटी होते. थोडा अंधारच होता. केवढे मोठे ग्राउंड. मी लगेच जाउन स्टंप ठोकले. दोन टिम बनवल्या. सगळ्यांना सांगितले सगळे रुल बंद. फक्त आउट म्हणजे आउट, कुठेही बॉल गेला तरी कोणी आउट नाही. डुडु बॅटींगला आला, मी फिल्डींग सेट केली, आशुला सांगितले फक्त लेग स्टंपवरच बॉल टाक. डुडु ब्लाइंड शॉट मारतो त्याचे काही शॉट लागत होते काही खाली जात होते. मोठ्या ग्राउंडच्या सेंटर पिचवर खेळायला मजा वाटत होती. मी कधी इथे बॅटींग करतो असे मला झाले होते. आता चांगले उजाडले होते. फ्लोरा बिल्डींगमधली मुल आली. आम्हाला सेंटर पिचवर खेळताना बघताच त्यातला एक ओरडला

“ए चिल्लर पार्टी, चला उचला, तिकडे कोपऱ्यात जाउन खेळा.”
“ही पिच आम्ही पकडली आम्ही इथे खेळनार.” डुडु बोलला.
“ए शहाणपणा कोणाला शिकवतो रे.” असे म्हणत त्याने आमचा एक स्टंप उचलला आणि डुडुच्या पायावर जोरात मारला. डुडु एवढा स्पाँजी असूनही रडत होता. तो रडत होता तरी त्यांनी त्याच्या पायावर तीनचार वेळा मार दिला. त्याच्या गालात झापड मारली. बिचारा किती रडत होता. तो ध्रुवा काही बोलला नाही तरी त्यांनी त्याच्या पायावर पण दोन वेळा स्टंप मारला.
“आमची मॅच चालू आहे ती झाली की आम्ही पिच सोडतो.” मी बोललो.
“इंडीया पाकीस्तानची मॅच आहे का रे तुमची? बंद करा म्हटल तर बंद करायच. आम्हाला प्रॅक्टीस करायची आहे.” प्रॅक्टीस करुन जसा हा भारताच्या टीममधेच जानार होता. आम्हीपण प्रॅक्टीसच करत होतो ना.
“तुम्ही आमच्याशी मॅच का नाही खेळत?”
“तू का स्वतःला सचिन समजतो का विराट? आमच्याशी मॅच लावतो साल्या. असा फोडून काढीन.”
“नाही आम्ही हारलो तर आम्ही रोज सकाळी येउन तुमच्यासाठी पिच पकडू. तुम्ही हारले तर मग आम्ही खेळू.”
“ए लगानचा अमीरखान जास्त मस्ती आलीय का?” तो स्टंप घेउन माझ्या अंगावर धावून आला. त्याने तो स्टंप जोरात माझ्या पायावर मारला. मी ‘आई ग’ असा ओरडलो आणि दूर पळालो. मी दूर गेल्यावर परत म्हणालो.
“तुम्ही मॅच का खेळत नाही आमच्याशी?”
“तुला जास्तीच चढली आहे. आता होउनच जाउ दे मॅच. हरला ना तर ग्राउंडला दहा राउंड मारायला लावीन. समजल?”
“हो”
डुडु, आशु, आदु सगळेच माझ्यावर चिडले. आमच्या टिमचे सारेच मला शिव्या घालीत होते. आपण कशाला सेंटर पिचवर खेळायचे कोपऱ्यातच खेळू असे म्हणत होते. प्रॅक्टीस कुठेही करता येते.
“इडीयट आता काय रोज सकाळी उठून यांच्यासाठी पिच पकडायची?” आशु मला सांगत होता.
“धीस एक्सरे हॅज गॉन क्रेझी रे.”
मी शांत होतो. सरळ ग्राउंडच्या बाहेर चाललो होतो. तेवढ्यात त्या फ्लोराच्या मुलांनी आवाज दिला.
“ए मच्छर, तुमच्या टीममधे मुल कमी पडत असतील ना तर आमच्या टीममधली घ्या. मॅचमधे दम पाहीजे. मच्छर साले.”

हो आमच्या टीममधे सातच मुले होती, अष्टविनायकच्या विरोधात पण आम्ही सातच मुले खेळलो होतो. फ्लोराची बिल्डींग मोठी असल्याने त्यांच्या टीममधे चांगली सतरा अठरा मुले होती. त्यांची मुले आमच्या टीममधे घेउनही फारसा फरक पडनार नव्हता. आता इथेही खेळणे बंद होनार काय अशीच भिती आमच्या टीममधल्या मुलांना वाटत होती. सारी मुले ग्राउंडच्या बाहेर सर्कल करुन डोक्यावर हात ठेवून बसली होती. मी त्यांच्यात जाउन बसलो. त्यांना माझा राग आला होता. माझ्याशी कुणी बोलत नव्हते. सारे माझ्याकडे रागात बघत होते. मी शांत बसलो होतो. काही बोललो तर ते माझ्यावर पेटले असते. तेवढ्यात दोन बाइक वेगात ग्राउंडमधे आल्या. त्यांनी व्हाइट कलरचा क्रिकेटचा ड्रेस घातला होता. त्याच्या हातात बॅट होत्या, बॉल होता त्यावरुन ते खेळायलाच आले असे वाटत होते. त्या बाइक आमच्या बाजूलाच येउन उभ्या झाल्या. त्यांनी हेल्मेट काढले ते सकाळी रनिंग करनारे शर्मा अंकल होते. त्यांच्या सोबत बर्वे अंकल आणि इतर दोन अंकल होते. शर्मा अंकल माझ्या जवळ येउन बोलले
“क्यू कॅप्टन टॉस हो गया क्या?”
“नही अभी टॉस करनेही जा रहा हू.” असे म्हणत मी टॉस करायला वेगात ग्राउंडमधे पळालो. डोक्यावर हात ठेवून बसलेल्या आमच्या मुलांमधे अचानक जोश आला. ते उठून टाळ्या वाजवायला लागले. मला चीअर करायला लागले. फ्लोराची मुले डोळे फाडून बघत होती. शर्मा अंकलने सांगितलेला प्लॅन सक्सेस झाला होता.
अष्टविनायकवालो थांबा काही दिवस, आम्ही येतोय.

मित्रहो
www.mitraho.wordpress.com

प्रतिक्रिया

जेपी's picture

24 Feb 2015 - 7:27 pm | जेपी

मस्त.. आवडली कथा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2015 - 7:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

शलभ's picture

24 Feb 2015 - 8:19 pm | शलभ

मस्तच..

बहुगुणी's picture

24 Feb 2015 - 8:19 pm | बहुगुणी

आवडली!

सानिकास्वप्निल's picture

24 Feb 2015 - 8:27 pm | सानिकास्वप्निल

छान आहे कथा...आवडली.

पैसा's picture

24 Feb 2015 - 8:48 pm | पैसा

एकदम मस्त लिहिलंय!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2015 - 8:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडली.

आतिवास's picture

24 Feb 2015 - 9:37 pm | आतिवास

कथा आवडली.

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2015 - 11:04 pm | टवाळ कार्टा

मस्तच

लॉरी टांगटूंगकर's picture

24 Feb 2015 - 11:57 pm | लॉरी टांगटूंगकर

मस्त!!!

स्पंदना's picture

25 Feb 2015 - 6:55 am | स्पंदना

फुकटात प्रॅक्टिस!!

:)

मृत्युन्जय's picture

25 Feb 2015 - 11:12 am | मृत्युन्जय

आवडली कथा.

एस's picture

25 Feb 2015 - 11:21 am | एस

भारी!

विनिता००२'s picture

25 Feb 2015 - 1:18 pm | विनिता००२

मस्त कथा

>>पक्की लायर आहे ती>> मात्र हे वाक्य खटकले. आजकालची मुले अशी विचार करतात की काय! माहीत नाही.

मित्रहो's picture

25 Feb 2015 - 5:44 pm | मित्रहो

हा सारा राग क्षणिक असतो पुढच्या क्षणालाच सारे विरघळते. म्हणूनच ती मुले असतात.

क्रेझी's picture

2 Mar 2015 - 12:13 pm | क्रेझी

लहान मुलांचं विचारविश्व चांगल्यारितीने मांडलं आहे पण अगदी शेवटच्या ओळीत जो ट्वीस्ट आहे तो थोडा आधी हवा होता. कदाचित पार्श्वभूमी तयार करण्यात जास्त लिखाण झालं आहे,पण छान आहे कथा.

मित्रहो's picture

4 Mar 2015 - 1:49 pm | मित्रहो

सूचनेबद्दल धन्यवाद
आधी ट्वीस्ट टाकता आला असता म्हणजे वाचकांना काय व का घडते आहे हे माहीत असते पण मोठ्या मुलांना नाही. त्यासाठी कथेची मांडणी लहान मुले विरुद्ध मोठी मुले अशी करावी लागली असती. कदाचित वेगळीच कथा झाली असती.
मूळ उद्देष्य लहान मुले (८-१२), त्यांचे विचार विश्व आणि मोठ्यांची मुलांच्या भावविश्वाविषयीची उदासिनता विशेषतः त्यांच्या खेळाविषयची उदासिनता हा होता. मी हाच धागा पकडून कथा लिहीली. अगदी घरातील मोठ्या मंडळीपासून ते त्यांच्या पेक्षा वयाने चार वर्षाने मोठ्या असनाऱ्या मुलापर्यंत सारेच उदासिन असतात. कथानक हे येत गेल.

बॅटमॅन's picture

2 Mar 2015 - 1:04 pm | बॅटमॅन

अर्रे मस्ताड कथा. :)