रंगभूत सुळका (माहुली किल्ला) आणि ५२ वर्षांचा तरुण
सन २००७ साली गिरीविराज हायकर्सने पारंपारिक मार्गाने म्हणजेच रंगभूत सुळक्याचा मागील बाजूने माथा गाठला होता. पण या चढाई दरम्यान किरण काकांच्या मनात सुळक्याची सरळसोट ३५० फुटी धार मनात भरली होती. असे अवघड मार्ग सर करण्याचे सोडून पारंपारिक मार्गानेच बहुतेक ठिकाणी चढाई केली जाते. याला छेद द्यावा म्हणून त्याच वेळेस या एकसंध खडकाळ धारेवरूनच चढाई करावी अस काकांनी मनोमन ठरवलं. पण त्यासाठी २०१२ साल उजाडाव लागलं.
५२ वर्षांच्या तरुणाची थरारक चढाई पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=nMKwcVVx4-Y
१.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
गिरीविराजसाठी हा काळ थोडासा कठीणच होता. मनीष, प्रदीप सारखे मुरब्बी चढाईपटू आपापल्या लग्नाच्या गडबडीमध्ये होते, आशिष, योगेश यांनी फक्त सल्लागार कम मदतनिसाची भूमिका घेतली होती. दिवाकरने तर थेट निवृत्ती जाहीर केली होती. उरले किशोर आणि हितेश, या दोघांकडे बऱ्यापैकी अनुभव. बाकी मी, संजय, वासुदेव, अनिकेत, दर्शन सगळेच नवखे. त्यामुळे एव्हढी अवघड चढाई उरावर घ्यावी का, याची जोरदार चर्चा दसरा मेळाव्यात झाली. सरतेशेवटी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे काकांनी आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर दिवाळीत १० दिवसांचा कार्यक्रम ठरवला.
जवळपास विसेक सभासदांनी सहभागी होण्याची इच्छा दर्शवली पण प्रत्यक्षात दहा-बारा जणच जमले. हरकत नाही, एकदा ठरवलेली मोहीम पूर्णत्वास नेणें हाच इतिहास आहे संस्थेचा. दिनांक १६ नोव्हेंबर २०१२, भाऊबिजेच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी ९ वाजता आसनगाव स्थानकावर उतरून आमचे वाटाडे अर्थात माहुली गडाची खडानखडा माहिती असलेले गुरु आगलावे यांनी आणलेल्या टेम्पोने सकाळी ११ वाजता माहुली गडाचा पायथा गाठला. नोव्हेंबर सुरु झालेला असला तरी हवेत उकाडा फार होता. त्यातच आम्हाला आता भर दुपारी पाठीवरल्या सामानासहित गडमाथा गाठायचा होता. माणस कमी असल्याने आम्ही गुरूच्या पाठीवर पण एक बॅग देऊन त्यानासुद्धा कामाला लावल होत. संजय सारख्या नवख्या मंडळींची चांगलीच दमछाक झाली. सरतेशेवटी मजल दरमजल करत संध्याकाळी ४ वाजता गड माथा गाठला. माहुलीगडावरच्या एकमेव पाणवठ्यावर पोटपूजा केली आणि पाणी भरून भांडार गडाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. आता यापुढे १० दिवस आमचा मुक्काम असणार होता माहुली आणि भंडारगड यांच्या खिंडीत. या खिंडीत भंडारगडावर जाण्यासाठी एक लोखंडी शिडी लावलेली आहे. या खिंडीतूनच उजव्या हाताला खिंडीच्या टोकाला खाली आहे रंगभूत सुळका.
२. २ वर्षांपूर्वी आम्हीच या टाक्याची साफ-सफाई आणि बांध बंदिस्ती केली होती.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
संध्याकाळ होत आलेली असल्याने लवकरात लवकर कॅम्पसाठी जागा निश्चित करून तंबू ठोकायचे होते. गुरूने एक जागा दाखवली पण ती पसंत पडली नाही, मग परत शोधाशोध केल्यावर खिंडीच्या थोडेसे अलीकडे, वाटेवरून उजव्या हाताला खाली कड्याच्या अगदी टोकाला एक जागा निश्चित करण्यात आली. इथून रंगभूत सुळका अगदी समोर हाकेच्या अंतरावर दिसत होता. तिथे जाण्यासाठी कारवी साफ करून वाट तयार करण्यात आली. आता पुढील दहा दिवसांसाठी पाण्याची सोय जवळपास कुठे होऊ शकते याची विचारणा गुरुकडे केली. माहुलीगडावर पाणी फक्त मुख्य गडावर गुहेच्या इथेच सापडते. पण गुरूने सांगितल्याप्रमाणे मी आणि अनिकेतने भंडारगडावर जाऊन तिथे असलेल्या एकमेव टाक्यात आणि तळ गाठलेल्या पाण्याची चाचपणी केली. पण आम्हाला ते योग्य वाटल नाही. तेंव्हा आता पाण्यासाठी कॅम्पपासून जवळपास १ किमी वर असलेल्या माहुलीगडावरील एकमेव टाक्याचाच आसरा होता. इथे आता पाण्याचे रेशनिंग करावे लागणार होते.
३.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
जागा निश्चिती झाल्यावर राहुल आणि गुरु आल्यावाटेने परत घरी निघून गेले. आता तंबू ठोकून सर्व आवाराआवर करेपर्यंत अंधाराने आम्हाला गाठलच. सकाळपासून उपवास घडल्याने सकाळी आसनगावहून योगेशने आणलेल्या कोंबडीवर सगळ्यांनी अक्षरशः आडवा हात मारून सगळेजण निद्रादेवीच्या अधीन झाले. दिवसभर उकाडा असूनसुद्धा संध्याकाळी मात्र वातावरण त्याच्या अगदी विरुद्ध होते. आम्ही कड्याच्या अगदी टोकाला असल्याने खिंडीतून वारा रोरावत वर यायचा आणि आमचे तंबू अक्षरशः थरथरायचे.
१७ नोव्हेंबर - दुसऱ्या दिवशी पक्ष्यांच्या किलबिलाटाने लवकरच जाग आली. पण चहापाणी, सामान बांधून सुळक्याच्या पायथ्याशी जाण्यास सकाळचे साडे दहा वाजलेच. आता रोजच काट्याकुट्यातून, ओढ्यातील खडकांवरून उड्य़ा मारत सामानासहित कॅम्प ते सुळक्याचा पायथा असा दीड दोन तासांचा प्रवास करायचा होता.
भंडारगडावर जाण्यासाठी शिडी असलेल्या खिंडीत उजव्या हाताला एक ओढा रंगभूत सुळक्याच्या पायथ्याला जातो. नेहमीप्रमाणे सह्याद्रीला नमन करून ठीक अकरा वाजता किशोरने चढाईला सुरुवात केली आणि त्याचा बिले घेऊन मी उभा राहिलो. इथे किशोरचा अनुभव थोडा कमी पडल्यामुळे २ खिळे मारावे लागले. किंचित उताराच्या रॉकपेंचवर २ खिळे आणि एक मेख ठोकून जवळपास ८० फुटांची चढाई करून पहिली लेज गाठण्यात आली. याचा आम्हाला एक उपयोगही झाला, खिळे कसे ठोकावेत याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हा नवख्यांना मिळाला. अनुभव हि काय चीज असते त्याची थोडीशी झलक आम्हा नवख्यांना मिळाली होती. आता या लेजवरूनच आमची जवळपास ९० अंशाच्या कोनातली मुख्य चढाई सुरु होणार होती. इथे आता किशोरने सलग ३ खिळे ठोकून दिवसभरातली चढाई थांबवण्यात आली.
४.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
५.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
६.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
१८ नोव्हेंबर - तिसऱ्या दिवशी किशोर आणि हितेशने दिवसभरात ६ खिळ्यांची भर घालून फक्त २० फुट चढाई केली होती. आज हाती काहीच लागल नव्हत. रात्रीच्या मिटिंगमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा दिसत होती, त्या काळजीने जेवणसुद्धा गेल नाही.
चढाई टीम आणि बेसकॅम्प टीम मिळून फक्त सातच जण होतो, त्यामुळे प्रत्येकाला सगळीच काम करावी लागत होती. सकाळी एक जण उठून १ किमी वरील माहुलीच्या गुहेत जाऊन तेथील टाक्यातील पाणी आपल्या पाठीवरून वाहून आणायचा (जवळपास ४० लिटर). एव्हढस पाणी सगळ्याच गोष्टींसाठी वापराव लागत होत. पण का कोण जाणे, एव्हढ्या दूरवरून ओझ वाहून आणण्याची ताकद कुठून यायची तो सह्याद्रीच जाणे. घरी आईने ५ किलोची पिठाची पिशवी उचलायला सांगितल्यावर कपाळाला आठ्या पडतात. राधेश आणि योगेश बेसकॅम्पवर असल्यामुळे जेवणखाण्याचा प्रश्न तसा मिटलेला. चढाई टीम सुद्धा दिवसभर थकून रात्री परत इतर मदतीसाठी धावत होतीच. राधेश एक दिवस उशिरा येऊन सामील झाला आणि गडावर येतेवेळी त्याला पायथ्याकडील गावातील एक ग्रुप गडावरून खाली उतरताना दिसला. त्यांच्याकडे पाठीमागे बांधलेली एक कोंबडी याच्या अधाशी नजरेस पडली. याने सहज म्हणून विचारणा केली तर त्या मंडळीनी त्याच्या त्या तोंडातून पाणी गळत असलेल्या अवस्थेकडे पाहून चक्क विनामोबदला ती कोंबडी याला देऊन टाकली.
१९ नोव्हेंबर - चौथ्या दिवशी काकांनी नवख्या वासुदेवला चढाईची धुरा सोपवली. काल चढाई थांबवलेल्या ठिकाणी झुमार्रींग करीत जाईपर्यंत, नवखा असल्याने वासुदेवची चांगलीच दमछाक झाली. वासुदेव एव्हढा थकला होता कि, तो हातोडी अक्षरशः थोपटल्यासारखी ठोकत होता, त्यातच हातोडी हातातून सुटून खोल दरीमध्ये जाऊन पडली. त्याचीही पहिलीच मोहीम असल्याने थकव्यामुळे फक्त तीनच खिळे ठोकून त्याने दिवसभराची चढाई दुपारी ३ वाजताच थांबवली. पायथ्याला मी, त्याचा बिले घेउन उभा होता आणि माझ्या बाजूला किरण काका देखरेख ठेऊन उभे होते. वासुदेव लवकर खाली आल्याने ते काहीसे नाराज होते आणि त्यांची नजर माझ्यावर पडली आणि मी मात्र मनातून चरकलो, कारण आता माझा नंबर लागणार होता.
माझा सुद्धा पहिलाच अनुभव असल्याने मनातून थोडासा घाबरलो होतो. मिळालेल्या वेळात फक्त २ खिळे ठोकून संध्याकाळ झाल्याने दोर तिथेच बांधून परत पायथ्याला खाली आलो. आजही फक्त जेमतेम १५ फुट चढाई झाली होती. काळजीचे ढग आणखी दाटून आले होते.
७.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
८.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
२० नोव्हेंबर - पाचव्या दिवशी परत एकदा किशोरनेच दिवसभरात चेन बोल्टिंग करत ५ खिळे ठोकत आणखी फक्त २० फुटांची मजल मारली होती. चढाई सुरु होऊन ४ दिवस झाले होते, पण म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. सलग ३ दिवस हाती काहीच लागल नव्हत. मी आणि किशोर, हितेश, वासुदेव वगैरे मंडळीनी रोजच्या संभाषणादरम्यान असा विचार मांडला होता कि, काकांना चढाई करायला न लावता इतर अनुभवी साथीदारांच्या अनुपस्थितीत स्वबळावर कामगिरी फत्ते करायची. पण आता आम्ही अक्षरशः तोंडावर आपटलो होतो. आमचा बार फुसका निघाला होता. ४ दिवसातली आमची कमाई होती फक्त १४० फुट. त्यातलीही ९० फुट सोपी चढाई वजा केल्यास कमाई काहीच नाही. अद्यापही जवळपास २०० फुट अवघड चढाई शिल्लक होती आणि आम्ही जर असेच अनावश्यक खिळे ठोकत बसलो तर महिनाही पुरला नसता.
रात्री सेफ्टी मिटिंग मध्ये काळजीचे फक्त काळेच नाहीतर पांढरे, निळे, जांभळे सगळेच ढग एकदम दाटून आले आणि संपूर्ण कॅम्प मध्ये अनुत्साही वातावरण पसरलं. काकानंतर अनुभवी म्हणाव तर कॅम्पमध्ये फक्त योगेशच होता, पण त्याने सुद्धा प्रस्तरारोहण सोडून दोनेक वर्षे झाली होती आणि त्याच्या वाढलेल्या कंबरेच्या आकाराने ते जाणवतच होत. शेवटी ५२ पावसाळे पाहिलेल्या किरण काकांनी स्वतःच चढाईचा निर्णय घेतला, खरतर ते सुद्धा याबद्दल साशंक होते.
२००६ सालच्या कोकणकडा मोहिमेनंतर तब्बल ६ वर्षांनी प्रथमच कृत्रिम चढाईसाठी काका तयार झाले.
२१ नोव्हेंबर - सहाव्या दिवशी सगळे परत नव्या उमेदीने सुळक्याच्या पायथ्याशी जमा झालो. आज प्रत्यक्षात गुरुमाउलीच चढाई करणार होती आणि मी त्यांचा बिले घेणार असल्याने आमच्याही अंगावर मुठभर मांस चढल होत. सकाळी बरोबर नऊ वाजता झुमारिंग करत किरण काका काल चढाई थांबवलेल्या ठिकाणी पोहोचले. पहिल्याच प्रयत्नात त्यानी सुमारे दहा फुटांची सुरेख मुक्त चढाई करत एका तिरकस रॉकपेंचवर पोहोचले. गेल्या चार दिवसात एकदाही मुक्त चढाई न पाहिल्यामुळे त्यांच्या या प्रयत्नामुळे सगळ्यांचेच चेहरे फुलून गेले होते. रॉकपेंचवर जेमतेम उभे राहत फक्त कोपरातून हात हलवत हातोड्याच्या सहाय्याने पंचिंग करत अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नाने एक खिळा ठोकून त्यात दोर पास करून स्वतःला सुरक्षित करून घेतले. हातोडीचा फटका जराही चुकला असता तर त्या धक्क्याने निसटून खाली पडण्याची १०० टक्के खात्री होती.
उजवीकडे पाहिल्यानंतर त्यांना वरच्या दिशेने पुढे सरकण्याची संधी दिसली. पुन्हा एकदा जिद्दीने सरसावत जवळपास ४० फुट मुक्त चढाई करूनच त्यांनी दम घेतला. इथे पुन्हा एकदा सुरक्षेसाठी एक खिळा ठोकून मुक्त चढाई केली. इथे दिवसभरातला तिसरा खिळा ठोकून बिले घेण्यासाठी हितेशला वर बोलावून घेतलं. हितेश तिथे पोहोचेपर्यंत काकांनी थोडीशी विश्रांती घेतली. आता पुढे मुक्त चढाईसाठी वाव नसल्याने २ खिळे ठोकले. आता हितेशला सावध राहायला सांगून अंगावर आलेल्या पेंचवर तिरकस रेषेत चढाई करण्याचे २ प्रयत्न फसले, पण तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवून वरच्या भागात पोहोचून सहावा खिळा ठोकला. आता त्यांना आपण प्रचंड दमलो असल्याची जाणीव झाली, त्यामुळे सहाव्या दिवसाची चढाई थांबवण्यात आली. आज लागोपाठच्या मुक्त चढाईमुळे जवळपास तब्बल ९० फुटांची मजल मारण्यात आली होती. इतका मोठा टप्पा गाठल्यामुळे बेसकॅम्पवर पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण पसरलं.
९.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
१०.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
११.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
१२.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
२२ नोव्हेंबर - सातव्या दिवशी उत्साही वातावरणात किशोर आणि हितेशने चढाई सुरु केली. सलग चार खिळे ठोकून किशोरने संधी मिळताच सुमारे ३० फुटांची मुक्त चढाई केली आणि वरचा टप्पा गाठला, इथे एक मेख ठोकून स्वतःला सुरक्षित केल्यावर परत आणखी २ खिळ्यांची भर घालून दिवसभराची चढाई थांबवली. आजची कमाई होती जवळपास ५० फ़ुट.
२३ नोव्हेंबर - आठव्या दिवशी किरण काकांनी परत चढाईची सूत्र आपल्या हाती घेतली. त्यांना मदतीसाठी किशोर आणि हितेश होते. किशोरने काल चढाई थांबवलेल्या ठिकाणी उंची वाढलेली असलेल्या कारणाने झुमारिंग करीत पोहोचेपर्यंत वेळ गेला. काकांनी नंतर थोडेसे डावीकडे जाऊन मुक्त चढाई करण्याचा प्रयत्न केला. शेवटी तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाल, पण डावीकडे सरकल्याने थोडी अवघड परिस्थिती ओढवली. पुढेही जाता येईना आणि खाली परत उतरणे तर त्याहून कठीण. शेवटी द्विधा मनस्थितीत, आहे त्याच जागी उभा राहून तोल सांभाळत पंचिंग करण्याचा निर्णय घेतला. जवळपास अर्धच छिद्र झाल आणि दुर्दैवाने पंच जाम होऊन आतमध्येच तुटला. थोड्याश्या खटपटीनंतर छिद्रातून तुटलेला पंच काढण्यात यश आल पण अजूनही छिद्र खिळा ठोकण्याइतपत पुरेसे खोल झाल नव्हत. त्यातच मुक्त चढाई करावी म्हणून अंगावरच बरचस सामान खालच्या खिळ्यावर लटकवल होत. त्यामुळे मग त्याच अर्धवट छिद्रात खिळा ठोकून त्याच्या भरवशावर त्याला दोर बांधून परत खालच्या खिळ्यावर जाऊन सामान घेतलं आणि आपल्या चढाईच्या मार्गावर परत आले. आता त्यांनी किशोरला आणखी वर येऊन बिले घेण्यास सांगितले.
किशोर आपल्या जागी स्थिरस्थावर होताच त्यांनी आपल्या समोरील एका कपारीत मेख ठोकून दोर पास करून स्वतःला सुरक्षित करून घेतल आणि तिच्या भरवशावर जवळपास ३० फुटांची सुंदर मुक्त चढाई केली आणि थोडेसे डावीकडे सरकत एका चांगल्या लेजवर पोहोचले. या लेजवरून आणखी विसेक फुटांची मुक्त चढाई करत एके ठिकाणी एक स्टीलची गिरीविराज हायकर्स च्या नावाची स्मरणिका ठोकली आणि परत खालच्या लेज वर आले. हा किरण काकांच्या प्रस्तरारोहण कारकिर्दीतला ४०० वा खिळा ठरला. आता किशोरलाही या लेजवर बोलवून घेतले, किशोर आता इथूनच बिले घेणार होता. किशोर आपल्या जागी येताच परत वरच्या बाजूने जवळपास ४० फुट मुक्त चढाई करत सुळक्याच्या उजव्या बाजूला असलेली थोडीशी ऐसपैस लेज गाठली. आता माथा एकदम आवाक्यात आला होता.
१३.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
१४.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
१५.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
१६.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
१७.बिनाआधार बोल्टिंग करताना
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
१८.स्मरणिका
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
१९.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
२०.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
२१.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
२२.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
२३.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
२४.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
पण काकांनी प्रथम माथ्यावर जाण्याचा मान किशोरला दिला आणि त्याला सुद्धा या लेजवर बोलावून घेतले. आता पुढची चढाई किशोर करणार होता तर बिले देण्याच काम काका करणार होते. १०-१५ फुटांची मुक्त चढाई करत किशोरने एक मेख ठोकून स्वतःला सुरक्षित करून घेतलं आणि ढिसाळ दगड आणि मातीच्या घसाराऱ्यातून वाट काढत ठीक पावणेपाच वाजता सुळक्याचा माथा गाठला.
२५.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
२६.
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
सहभागी मंडळ:
किरण अडफडकर, योगेश सदरे, किशोर मोरे, हितेश साठवणे, संजय गवळी, सतीश कुडतरकर, वासुदेव दळवी, दर्शन एडेकर, राहुल शिंदे, निकिता अडफडकर, राधेश तोरणेकर, अनिकेत साळुंखे
From Rangbhut Pinnacle, Mahuli Range
गिरीविराज हाईकर्स
डोंबिवली
प्रतिक्रिया
19 Feb 2015 - 5:52 pm | जयंत कुलकर्णी
थरारक....आणि मस्त...विजयामुळे...
19 Feb 2015 - 5:53 pm | कपिलमुनी
दंडवत !
वाचताना सुद्धा श्वास रोखला गेला होता
19 Feb 2015 - 6:04 pm | सुहास झेले
निशब्द जाहलो... !!
19 Feb 2015 - 6:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
_/\_
19 Feb 2015 - 7:06 pm | सूड
__/\__
19 Feb 2015 - 7:21 pm | किसन शिंदे
तुमच्या पायांचा फोटो पाठवा मालक.
_/\_
19 Feb 2015 - 8:29 pm | अत्रुप्त आत्मा
+++++++++++११११११११११११११११११११ टू किसनद्येव.
__/\__/\__/\__
मला सांगा, तुमचे काळीज तुंम्ही कसे घडवता? कारण आमची नुसतं पहाताना टरकते. त्यामुळे तुमचं करताना-काय होत असेल? असा प्रश्न वारंवार पडतो.
याची एक व्हिडिओ फिल्म करून द्या..म्हणजे आंम्ही हे खरेखुरे स्पायडरमॅन बघू..आणि लहान मुलांनाहि हेच दाखवू.
ते शिनुमावालं स्पायडरमॅन पाहुन मजा वाटते .स्फुरण येतं..पण तुमचे हे स्पायडरमॅन पाहिले,की धडकीच भरते हो!
20 Feb 2015 - 10:24 am | सतीश कुडतरकर
कौतुकाबद्दल धन्यवाद!
वर दिलेली लिंक देतोय. अवश्य पहा!
५२ वर्षांच्या तरुणाची थरारक चढाई पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=nMKwcVVx4-Y
20 Feb 2015 - 10:44 am | अजया
मला this video is not available असं येतंय :(
20 Feb 2015 - 11:18 am | सतीश कुडतरकर
व्हिडीओ आहे.
गूगलसर्च वर नुसतच giriviraj rangbhut अस सर्च केलत तरी दिसेल.
21 Feb 2015 - 4:22 pm | अत्रुप्त आत्मा
वाचुन जेव्हढा थरकाप उडत होता.. तो प्रत्यक्ष जणू अनुभवायला मिळतोय तुमच्या यु ट्यूब लिंकवर .. खरच कमाल आहात राव तुम्ही.. शेवटाला जो माणूस सुळक्यावर वरती पोहोचला, त्याला बघताना असं वाटत होतं..की तो घटकाभर बसेल..आणि मग काय ती घोषणा देइल. पण तो शिडीच्या पायर्या चढून टाकिवर जावं इतक्या सहजतेने तिथे जाऊन ,तसच उभ्यानी तात्काळ- "छत्रपति शिवाजी महाराज की...जय.." म्हणतो. तेंव्हा त्याच्या मनात काय काय दाटून येत असेल.याची कल्पना तर येतेच.पण ह्या साहसा मागची नम्रताहि दिसून येते. __/\__ तुंम्हा सगळ्या मंडळींना भेटायची मनोमन इच्छा आहे. कुठे? कधी? कसं? सांगा बाबा एकदा आता. तुम्हाला भेटल्या शिवाय गार नाही वाटायचं आत्म्याला. __/\__
23 Feb 2015 - 10:38 am | सतीश कुडतरकर
४ दिवसांपूर्वी मुक्त विहारीं यांची भेट झाली. आपलीही भेट लवकरच होईल.
19 Feb 2015 - 7:24 pm | नि३सोलपुरकर
थरारक..._/\_.
निशब्द जाहलो.
19 Feb 2015 - 7:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
खरंच __/\__ !
बावन्न वर्षाच्या तरुणाला दंडवत सांगा !!
सर्वच फोटो थरारक !!! त्यातल्या त्यात १७ क्रमांकाच्या फोटोत बिनाआधार बोल्टिंग करताना "तो तरूण" चक्क हवेत तरंगत ते करत आहे असे दिसत आहे !!!!!!
19 Feb 2015 - 7:48 pm | आनन्दिता
____/\_____
19 Feb 2015 - 7:50 pm | पदम
_/\_
19 Feb 2015 - 8:12 pm | स्वच्छंदी_मनोज
सतीश जबरी... किरणकाकांना पुनः एकवार साष्टांग दंडवत.. _/\_
अगोदर एका ठिकाणी वाचले होते पण पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद..
19 Feb 2015 - 8:26 pm | टवाळ कार्टा
याला म्हणतात लय भारी
19 Feb 2015 - 8:54 pm | प्रचेतस
जबरदस्त.
माहुली दुर्गत्रिकुट नवरा, नवरी, करवली, भटोबा, वजीर अशा एकापेक्षा एक जबरदस्त सुळक्यांनी परिपूर्ण आहे. तिथल्या अजूनही मोहिमांचे वृत्तांत येऊ द्यात.
24 Feb 2015 - 11:16 am | सतीश कुडतरकर
हो नक्कीच!
19 Feb 2015 - 9:31 pm | अजया
साष्टांग लोटांगण त्या काकांपुढे _/\_
20 Feb 2015 - 10:57 am | प्रभो
भारी!!
20 Feb 2015 - 11:14 am | खटपट्या
_/\_ जबरदस्त !!
एकदा तुम्हा सगळ्यांना भेटावे लागणार.
20 Feb 2015 - 11:36 am | खटपट्या
व्हीडीओ बघीतला !! शहारा आला !!
20 Feb 2015 - 12:11 pm | एस
एकेक वाक्य फार सावकाश वाचून काढले. दर शब्दागणिक अंगावर शहारे येत होते, जणू आपण स्वतः त्या कातळाला भिडलोय, तोल सावरत पुढचा होल्ड शोधतोय असे वाटत होते. मस्त.
20 Feb 2015 - 12:56 pm | नांदेडीअन
बाब्बौ ऽऽऽ *wacko*
20 Feb 2015 - 1:56 pm | मुक्त विहारि
__/\__
20 Feb 2015 - 3:22 pm | ज्ञानोबाचे पैजार
अरे बापरे, कसल डेअरींग, ते देखील वयाच्या ५२ व्या वर्षी?
साष्टांग दंडवत.
नुसते फोटो बघताना सुध्दा छातीत धडधडत होते.
पैजारबुवा,
20 Feb 2015 - 3:40 pm | सविता००१
_________/\___________
21 Feb 2015 - 10:45 am | यशोधरा
काकांना साष्टांग दंडवत!
22 Feb 2015 - 7:26 am | जुइ
खुप थरारक आहे हे.
23 Feb 2015 - 3:34 pm | शरभ
घरातल्या माळ्यावर चढलो तरी मला भीति वाटते, खाली उतरेपरेंत. दंडवत स्वीकारा. __/\__
23 Feb 2015 - 4:51 pm | जे.पी.मॉर्गन
तुमची "सुळक्याच्या उजव्या बाजूला असलेली थोडीशी ऐसपैस लेज" फारच छान आहे ब्वॉ ! आणि तिथूनचा व्ह्यू तर फारच सुंदर! असं वाटतं की .....च्यामारी तुमच्या..... डोक्यावर पडलेली लोकं आहात.
जाऊदे... ...किसनद्येवांनी सांगित्ल्याप्रमाणे पायांचा फोटो पाठवून देणे. आणि काकांच्या पायाचे तीर्थ इथे दिल्लीला कुरियर करणे.
आचरट लोकं......
जे.पी.
24 Feb 2015 - 11:03 am | सतीश कुडतरकर
*yahoo*
23 Feb 2015 - 7:06 pm | सांगलीचा भडंग
थरारक आणि अप्रतीम ।
एक शंका : जे बोल्ट मारलेले असतात ते किती वर्षे टिकतात . म्हणजे समजा परत कोटी त्याच रूट मी वरती गेला तर ते तो बोल्ट वापरू शकतो का ?
24 Feb 2015 - 11:14 am | सतीश कुडतरकर
पाणी न लागल्यास आम्ही वापरतो ते बोल्ट चांगले १५-२० वर्षे राहतात. एकदा रूट सेट झाला कि कोणीही त्या बोल्टच्या साहाय्याने चढाई करू शकतो.
१९८८-९० साली माथेरानला आम्ही एको पॉइन्ट, लेंडस्केप पॉइन्ट, किंग एडवर्ड पॉइन्ट, लुईझा कातळभिंत यावर चढाई केली होती.
२०११-१२ मध्ये यांच्यावर आमच्या नवीन पिढीने चढाई केली त्यावेळेस काही बोल्ट अजूनही तग धरून होते, ज्यांचा वापर आम्ही केला.
सध्या स्टेनलेस स्टीलचे बोल्ट वापरात आले आहेत. ड्रीलमशीनच्या साहाय्याने होल करून त्यात एक विशिष्ट 'ग्लू' टाकून बोल्ट फिक्स केला जातो. हा उपाय खूप महाग आहे, एका बोल्टची किंमत जवळपास ७००-८०० रुपये पडते.
23 Feb 2015 - 7:46 pm | राजेंद्र मेहेंदळे
सतीश कुडतरकरांचे लेख एक ट्रेंड सेट करत आहेत मिपावर. एक एक लेख पुन्हा पुन्हा वाचुन काढावा असा.
तुम्हा सर्वांच्या जिद्दीला सलाम. विडिओ सावकाशीने बघतो.
24 Feb 2015 - 12:06 pm | स्नेहल महेश
अरे बापरे,फोटो बघूनच भीती वाटली
24 Feb 2015 - 1:02 pm | राजेंद्र मेहेंदळे
किरण अडफडकरांना एक कडक सलाम. कातळावर ग्रिप शोधतानाचे प्रसंग अंगावर काटा आणतात...विशेष्तः ते ज्या उंचीवर आहेत त्याचा विचार करुन
26 Feb 2015 - 2:39 pm | शेखर बी.
थरार....
27 Feb 2015 - 1:07 pm | मदनबाण
च्यामारी ! फोटो पाहुनशानच गार झालो म्या ! *SCRATCH*
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राती... अर्ध्या राती... असं सोडुन जायाचं न्हाय ! ;) { बेLa }
2 Mar 2015 - 1:07 pm | हरकाम्या
वीडिओ पाहिला अतिशय " थरारक " ही मंडळी खाली कशी उतरली ? त्याचे फोटो किंवा वीडिओ काढलाय का ?
काढला असल्यास टाका राव, या मन्डळींना आपला सलाम.......
2 Mar 2015 - 9:18 pm | साधा मुलगा
पुन्हा एकदा _/\_!!!
वाचनखुण म्हणून हाही लेख साठवला आहे.
"त्याचा बिले घेऊन मी उभा राहिलो"
"झुमरिंग"
म्हणजे काय समजले नाही.
स्मरणिका काय प्रकार होता?
3 Mar 2015 - 7:16 pm | राजेंद्र मेहेंदळे
मुख्य क्लाईंबर च ढाई करत असताना त्याच्या कंबरेला सेफ्टी रोप बांधलेला असतो. खाली उभा असलेला दुसरा मेंबर त्या रोपची वेटोळी हळुहळु सोडत जातो जेणे करुन त्याला रोप कमी पडणार नाही आणि फार लूज पण राहणार नाही. ह्याला बिले देणे म्हणतात. थोडेफार पतंगाची फिरकी पकडण्यासारखे काम.
झुमारींग हे रॅपलिंगच्या विरुद्ध असते. रॅपलिंग मध्ये रोपला धरुन खाली उतरायचे तर झुमारींगमध्ये वर जायचे. त्यासाठी पेट्रोल पंपावरच्या नोझल सारखे एक साधनपण असते जे रोपवर वरच्या दिशेने सरकवत नेउन लॅच करता येते .
5 Mar 2015 - 2:33 pm | सतीश कुडतरकर
From Hanuman Pinnacle, Anjaneri mountain range
Belay - लीड क्लाईम्बर स्वतःबरोबर दोन दोर घेऊन जातो. एक Supply दोर असतो ज्याच्या साहाय्याने आवश्यक साधनसामुग्री त्याच्यापर्यंत पोहोचवली जाते. दुसरा मुख्य दोर त्याच्या कंबरेला बांधलेला असतो, हा दोर त्याचा जीवनरक्षक असतो ज्याच नियंत्रण सेकंड मॅनकडे असते. फोटोत दाखवल्याप्रमाणे सेकंड मॅन दोर हळूहळू सोडत राहतो, या दोराचे घर्षण त्या belay device वर होते, त्यामुळे दोर नियंत्रितपणे सोडता येतो. एखादे वेळेस लीड क्लाईम्बर तोल जाऊन खाली पडला तर सेकंड मॅन, दोर त्या belay device भोवती आवळून धरतो. जेणेकरून लीड क्लाईम्बर चे पडणे नियंत्रीत होते. तुम्ही जर दोर थेट हातात पकडला तर तुम्हाला ते शक्य होणार नाही. कारण होणाऱ्या आघाताने दोर तुमच्या हातातून सुटणार आणि होणाऱ्या घर्षणामुळे तुमचाही हात भाजून निघणार. यासाठी सेकंड मॅनलाही स्वतःस anchor करून ठेवावे लागते.
5 Mar 2015 - 2:34 pm | सतीश कुडतरकर
स्मरणिका - आमच्या नावाची थाळी
5 Mar 2015 - 11:48 pm | पैसा
वाचायलासुद्धा भीती वाटतेय!
8 Mar 2015 - 2:58 pm | साधा मुलगा
छान माहिती.
दोघांनाही धन्यवाद!