वक्त ने किया...(मराठी दिन लघुकथा स्पर्धा )

Maheshswami's picture
Maheshswami in स्पर्धा
19 Feb 2015 - 12:12 pm

"सहाला पाच कमी आहेत, आणि अजून इथेच आपण. शार्प साडे सातला सगळे येतील. आपण काय पार्टी संपल्यावर पोचायचे का? आटप तुझी रंग रंगोटी लवकर." शौमिकचा पारा थोडा चढला होता.

"का रे असं घालून पाडून बोलतोस नेहमी. नेहमी बघावं तेंव्हा वैतागलेला! पाच दहा मिनिटं इकडे तिकडे झाली तर काय जातं तुझं? अंघोळीला गेला होतास आत्ता , अर्धा तास बाहेर नाही आलास. भसाड्या आवाजात जोरजोरात गाणी म्हणत बसला होतास. तेंव्हा नाही झालं का वेळेचं भान? " ओठ दुमडून लिपस्टिक नीट करत , आरशात बघत नताशा करड्या स्वरात उत्तरली.

"भसाडा आवाज ? लग्नाआधी , ह्याच आवाजात तासंतास गाणी ऐकायचीस माझ्याकडून. जाऊ दे, आणि पावणे सहाला निघायचं ठरलं होतं ना आपलं? मी शूज घालून तयार होतो पावणे सहाला. गेली दहा मिनिटं ताटकळत ठेवलंयस तू. "

"तुझं काय रे , स्वतःच आटपलं कि झालं. परीचं कोण आवरणार? मलाच करावं लागत ना सगळं? म्हणे पावणे सहाला तयार होतो. आणि ठीक आहे, दहा मिनिटं वाट पहिली कधीतरी तर एवढं काय आकाश कोसळलं म्हणते मी? कॉलेज मध्ये असताना , तासंतास माझी घराबाहेर निघण्याची वाट बघत असायचा ना तू , खालच्या दुकानासमोर बसून ?"

"आता जुन्या गोष्टी उगाळत बसू नकोस उगीच. चूक कबूल करायची सोडून नेहमी आपलं काहीतरी विषयांतर करायचं, झालं!"

"हे बघ मलाही फारसा इंटरेस्ट नाहीये जुन्या गोष्टींमध्ये, पण सुरुवात तू केलीस म्हणून मीही आठवण करून दिली." लालचुटुक साडीवर मैचींग पर्स शोधत नताशा म्हणाली.

"परी, बेटा तो मिकी माऊसचा मास्क काढ पाहू! आपण पार्टी ला जातोय ना? मम्मानी एवढं छान सजवलंय तुला. आणि तुझी ती स्टारवाली टिकली कशी दिसणार सगळ्यांना, तू मास्क घातला तर?"
परीने मोठ्या समजूतदारीने मास्क काढून टेबलावर ठेवला. बाबांचं बोट धरून ती घराबाहेर पडली.
गाडीत बसल्यावर शौमिकने जगजीत सिंघ चं "मरासिम" लावलं. गाडीने वेग पकडला आणि हायवे ला लागली.

"नेहमी काय हि रडकी गाणी! सदा न कदा ही एकच सीडी लावलेली असते. एक तरी बंद कर , नाही तर रेडीओ ऑन कर. "

शौमिक काहीच बोलला नाही. फक्त गाडीचा वेग वाढवला आणि उगीच समोरच्या कारवर खेकसला. " साले, ईंडीकेटर क्यो ऑन रखा है , अगर टर्न नही लेना है तो? बाप का रोड है ना ? करो जो मर्जी है!"

"शेवटचा टोला माझ्यासाठी होता वाटतं ! " पुटपुटत नताशाने रेडीओ मिर्ची लावले.

"हे बघ , उगाच भांडणं उकरून काढू नकोस. तुला काही बोललो का मी? मग काय प्रोब्लेम आहे?"

"तोच तर प्रोब्लेम आहे रे शौमिक, मला काही बोलतच नाहीस तू!"

"तुझ्यापर्यंत पोचत असेल तर बोलू ना ! नुसतं कानांनी ऐकणे म्हणजे ऐकणे नसते, नताशा. हृदयापर्यंत झिरपले पाहिजे. "

दोघंही शांत झाली.
"ट्राफिक से परेशान! टेन्शन मत लिजिये दोस्तो, आप सबका चहेता आर जे मोहित आपके लिये लाया है एक सदाबहार नगमा. " रेडीओ मिर्ची वरचा आर जे किंचाळत होता.
"वक्त ने किया क्या हसीन सितम, तुम रहे ना तुम , हम रहे ना हम… " गीता दत्त गायला लागली.
डोळ्यातले अश्रू लपवत नताशा खिडकीबाहेर पाहू लागली. शौमिकने सिगारेट बाहेर काढली. गाडीतले परीचे अस्तित्व जाणवून परत ठेवून टाकली.
थोड्या वेळाने , काहीतरी बोलायचं म्हणून नताशा म्हणाली

"रणजीत जाम खुश होता. पार्टीचे आमंत्रण देताना म्हणाला, हीनाला आज काहीतरी सरप्राईज गिफ्ट देणार आहे. मैकबुक ओर्डर केलंय म्हणे ते मागच्या आठवड्यात रिलीज झालेलं. भारी आहे तो एकदम , सरप्राइज गिफ्ट वगैरे!"

"हीना पण काही कमी नाहीये. ती पण अशाच भेटींचा वर्षाव करते त्याच्यावर." शौमिक म्हणाला.

"शौमिक, माझ्या भेटींचे काहीच महत्व नाहीये न तुला? दोन महिने वेळ काढून स्वेटर विणला रे तुझ्यासाठी. कोरडेपणाने नुसता म्हणालास हो चांगला आहे, थैक्स! एकदा सुद्धा बाहेर पडताना नाही घातलास रे."

"हे बघ मला नाही तो रंग आवडत. आणि ऑफिस मध्ये थोडा भडक वाटेल. "

"मग आज घालायचास ना? मला किती बरं वाटलं असतं. "

"It's always about you ! मला शेवटचं कधी बरं वाटू दिलंस तू , लक्षात आहे का तुझ्या? गेल्या आठवड्यात तुला सरप्राईज म्हणून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन घरी आलो. आणि तू काय म्हणालीस? आज माझी पार्टी आहे मैत्रिणीसोबत, तू जेवून घे , आणि ग्रोसरिज घेऊन ये, संध्याकाळी! मला वाटलं होतं आपण दोघे कुठेतरी फिरायला जावं , थोडा वेळ घालवावा एकमेकांसोबत. "

"अरे पण त्या पार्टी ला परी च्या टीचर पण येणार होत्या. आपल्या परीबद्द्ल त्यांच्याशी बोलायचं पण होतं. म्हणूनच तर मी गेले ना? आणि तू कधी करतोस का रे कॅन्सिल एखादी पार्टी माझ्यासाठी?"

"हे बघ तुझी आणि माझी गोष्ट वेगळी आहे. माझं प्रमोशन ड्यू आहे तीन महिन्यांनी. गेल्या वर्षभर केलेल्या कामावर पाणी फेरू का? माझी नोकरीच तशी आहे, पार्टीज वगैरे ला जाणं भाग आहे. आणि परीचा विचार तू एकटीच नाही करत. पुढच्या वर्षी त्या इंटरनेशनल स्कूल ची फी किती असेल माहितेय न तुला?"

परत गाडीत ती अवघडलेली , निरव शांतता पसरली. गाडी थोड्या वेळातच मैरिओट च्या पोर्च मध्ये पोचली.

"सात पंचवीस झालेत म्हटलं. पाच मिनिटं आधीच पोचलो ठरवल्यापेक्षा."

"मी वाटच बघत होतो ह्या वाक्याची."

"सॉरी तर तू म्हणणार नाहीयेस , मीच समजून घेते कि तू म्हणाला असशी…. "

"चल, फंक्शन रूम मध्ये जाऊया आपण. नाहीतर असं करा तुम्ही दोघी व्हा पुढं. मी येतोच मागनं" नताशा ला अर्धवट तोडत शौमिक म्हणाला.

"सिगारेट फुंकायची असेल, दुसरं काय?" म्हणत परीचा हात धरून नताशा लिफ्ट कडे वळली.

*******************************************************************

"कसलं सॉलिड कपल आहे ना शौमिक आणि नताशा. धम्माल लोकं आहेत एकदम! फुल्ल ऑफ लाईफ !" रणजीत कारला वेग देत म्हणाला.

"हो ना, पार्टी मध्ये जान आली त्यांच्यामुळे. शौमिक चा सेन्स ऑफ ह्युमर भन्नाट आहे. आणि नताशा त्याचा वरचढ. एकमेकांना कोम्प्लीमेंट करतात दोघे. एक दुजे के लिये आहेत एकदम." हीनाने होकार दिला.

"गळ्यात गळा घालून होती पार्टी मध्ये पूर्ण वेळ. नताशा म्हणत होती की आजीबात करमत नाही शौमिक ला तिच्याशिवाय. महिन्यातून चारदा तरी सुट्टी घेऊन घरी बसतो. भरपूर फिरतात म्हणे दोघेही. "

"शौमिक पण बोलला मला, म्हणे नताशा नेहमी फुलासारखं जपते त्याच्या मनाला. वाईट वाटेल त्याला असं कधीही बोलत नाही. म्हणाला फक्त बायकोच नाही तर त्याआधी एकदम चांगली मैत्रीण आहे ती."

"आणि काय रे रणजीत, एक रोजेस चा बुके आणायला सांगितला होता मी तुला साधा, विसरलास ना ?"

"अगं पण एवढी कामं होती मला, मित्रांना बोलावणे, पार्टी एरेंज करणे. विसरून गेलो असेल. तू कटकट नकोस सुरु करू"

"कटकट ? अरे आजच्या दिवस तरी नीट बोल ! जाउदे मला सगळं माहितीय, पण तुला माहितीय न मला रोजेस किती आवडतात. प्रत्येक एनीवर्सरीला तू आणतोस ना फुलं माझ्यासाठी. आजकाल काय झालंय काय माहिती तुला. सगळा वेळ ती पार्टी एरेंज करणे, मित्र आणि दारू !"

"काय म्हणतेस हीना, हे काय माझ्या एकट्यासाठी केले का मी ? तुला ना मी काहीही करो , महत्त्वच नाही कशाचं"

"पैसे उडवणे म्हणजेच सगळं सुख आनंद असतो का रे?"

"हे बघ तू फिल्मी होवू नकोस. तू एकदम मला विलन वगैरे असल्यासारखे फिलिंग द्यायला लागली आहेस. तुझ्याकडे सुद्धा आजिबात वेळ नसतो माझ्यासाठी. एखादा बुके विसरलो तर एवढं ओवररीएक्ट करायची गरज नाहीये. आणि मैक बुक कडे ढुंकून सुद्धा नाही पाहिलंस तू!"

"मला नकोयत रे त्या सगळ्या एलेकट्रोनिक गोष्टी. जीवनाला जळू सारख्या चिकटून बसल्या आहेत त्या. सगळा मोकळा वेळ कसा अधाशासारख्या शोषून घेत आहेत. शुष्क बनवून टाकलंय त्यांनी जीवन"

"याच साठी केला अट्टाहास ! धन्यवाद हीना , खूप बरं वाटलं हे ऐकून. तुला काही कल्पना आहे किती वेळ , एनर्जी खर्ची घातलीय मी त्या मैकबुक साठी. गेला महिना भर झालं झटतोय तुला आज ते गिफ्ट करता यावं म्हणून. एका वाक्यात तू त्या सगळ्याची बेकिंमत केलीस. "

गाडी रस्त्यावर दौडतच होती. दोघेही मौन व्रत असल्यासारखी गप्प झाली होती. कुणालाही माघार घ्यायची नव्हती. स्वतः होऊन पुढच्याची समजूत काढायची नव्हती.

"कॉम्प्लेक्स येतो मला त्या शौमिक ला आणि नताशा ला बघून. आपण का नाही राहिलो आहेत तसे ? सगळं एवढं का बदललं आहे ? What really went wrong ? आधी सारखं काहीच नाही राहिलंय. "

"सगळं आधीसारखंच आहे रणजीत , बदलला फक्त तू आहेस………. आणि कदाचित मी पण !" हीना ने डोळे मिटून घेतले.
*******************************************************************

घरी पोचेपर्यंत परी कार मध्येच झोपी गेली होती. तिला बेडवर टाकून शौमिकने तिच्या अंगावर चादर टाकली. फ्रेश होऊन एक स्कॉचचा पेग बनवून बाल्कनीत जाऊन बसला. थोड्या वेळाने नताशा पण ग्लासात थोडीशी वाइन घेऊन त्याच्या शेजारी येवून बसली. बराच वेळ निशब्दपणे दोघेही तसेच बसून होते.

"खरंच सगळं किती बदललं आहे ना शोमु? आधी बोलायला लागलो कि थांबायचो नाही आपण. आणि आता विषयच सापडत नाही बोलायला. "

"भांडायला सापडतात भरपूर." स्कॉचचा जळजळीत घोट घशाखाली ढकलत शौमिक म्हणाला.

"माहित नाही काय झालंय. आणि कशाची कमी आहे. सगळं आहे आपल्याकडे. फक्त माझ्याकडे तू आणि तुझ्याकडे मी नाही राहिलेय."

"मी कधीच स्वतः हून नाही निघून गेलो तुझ्यापासून , तूच दूर केलंस मला नताशा."

"तू काहीही म्हण रे , परिणाम एकच ना शेवटी त्याचा. "

"परत सगळं आधीसारखे नाही होऊ शकणार का रे?"

गप्प बसून तो स्कॉच रिचवित राहिला. बऱ्याच वेळानी त्याने तोंड उघडले
"हे बघ … मला असं वाटत…. "

"अर्रे सॉरी शौमिक. मी विसरलेच. उद्या पाच वाजता उठायचं आहे मला. परी ची ट्रीप चाललीय न उद्या ! सॉरी , पण उद्या नक्की बोलू." म्हणून नताशा आत पळाली.

बदलले काहीच नव्हते. सगळं जशास तसे आहे. बदलली आहेत ती फक्त माणसं. त्यांची स्वप्नं. स्वतःकडे जे नाहीये ते मिळवण्याची धडपड. ते मिळवण्यासाठी सुरु झालेला पैशांचा अनंत, न थांबणारा पाठलाग. त्यातून येणारे ताण , त्या ताण तणावानी बोथट केलेल्या सगळ्या भावना. नाती टिकवण्यासाठी सगळ्यात जास्त ज्या गोष्टीची गरज आहे ते म्हणजे एकमेकांसाठी दिलेला वेळ. या सगळ्या गोंधळात , वेळ शोधायचा कुठून?

दोन पेग संपवून शौमिक बेडरूम मध्ये पोचला. नताशा आणि परी गाढ झोपल्या होत्या. तोही आडवा झाला.
पाहिलं तर , बाजूच्या टेबलवर परी चा मिकी माऊस चा मास्क पडला होता. मनात विचार केला त्याने , आज पार्टी ला जाताना परीला तिचा मास्क सोबत नाही घेऊ दिला आपण. पण आपण दोघे मात्र आपापले मास्क्स घालून गेलो. असो, जपून ठेवले पाहिजेत, पुढच्या पार्टी मध्ये परत गरज पडेल त्यांची कदाचित !
******************************************************************

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

19 Feb 2015 - 1:36 pm | मुक्त विहारि

"बदलले काहीच नव्हते. सगळं जशास तसे आहे. बदलली आहेत ती फक्त माणसं. त्यांची स्वप्नं. स्वतःकडे जे नाहीये ते मिळवण्याची धडपड. ते मिळवण्यासाठी सुरु झालेला पैशांचा अनंत, न थांबणारा पाठलाग. त्यातून येणारे ताण , त्या ताण तणावानी बोथट केलेल्या सगळ्या भावना. नाती टिकवण्यासाठी सगळ्यात जास्त ज्या गोष्टीची गरज आहे ते म्हणजे एकमेकांसाठी दिलेला वेळ. या सगळ्या गोंधळात , वेळ शोधायचा कुठून?"

हा परिच्छेद फार आवडला...

Maheshswami's picture

19 Feb 2015 - 8:31 pm | Maheshswami

धन्यवाद!!!

छान लिहिअय ! भावना पोहोचल्या

कपिलमुनी's picture

19 Feb 2015 - 1:56 pm | कपिलमुनी

मस्त लिहिला आहे . असे बरेच लोक आजूबाजूला पहातो .

रानडेंचा ओंकार's picture

19 Feb 2015 - 2:16 pm | रानडेंचा ओंकार

खरच असच जीवन झालं आहे, सर्व काही आहे. फक्त वेळ नाहीये...

विटेकर's picture

19 Feb 2015 - 2:22 pm | विटेकर

आवडले !

जागु's picture

19 Feb 2015 - 2:41 pm | जागु

छान वास्तव लिहीले आहे.

मृत्युन्जय's picture

19 Feb 2015 - 3:59 pm | मृत्युन्जय

एक नंबर. ही लघुकथा स्पर्धेसाठी का नाही टाकली?

बहुगुणी's picture

19 Feb 2015 - 9:37 pm | बहुगुणी

असं होऊ नाही हे वाटलं तरी हे मेट्रोपॉलिटन शहरांतलं हे जळजळीत वास्तव होत चाललंय का?

कथा स्पर्धेसाठी टाकायला हवी होती. अजूनही संपादकांना विचारून प्रवेशिका चालेल का विचारा.

Maheshswami's picture

20 Feb 2015 - 6:56 am | Maheshswami

धन्यवाद ! मी आज बऱ्याच दिवसांनतर मिसळ पाव वर आलो. काही कल्पना नाही लघुकथा स्पर्धेची. कृपया , लिंक शेअर कराल का त्या बद्दलची ?

बहुगुणी's picture

20 Feb 2015 - 6:03 pm | बहुगुणी

लघु-कथास्पर्धा

संपादक मंडळ या आय डी वर व्य नि पाठवून विनंती करू शकाल.

असे मुखवटेच जास्त दिसतात अवतीभवती...
यात बिचार्‍या पोरांनाही तीच शिकवण मिळते :(

कथा म्हणून आवडली.

अजया's picture

19 Feb 2015 - 9:47 pm | अजया

आवडली कथा.

चाणक्य's picture

19 Feb 2015 - 11:44 pm | चाणक्य

कथा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2015 - 7:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कथा...! सालं सर्व असून अपुरेपणाचं फिल भयंकर त्रासदायक असतं.

-दिलीप बिरुटे

मोहनराव's picture

20 Feb 2015 - 7:37 pm | मोहनराव

फारच छान लेखन!!

सस्नेह's picture

21 Feb 2015 - 3:30 pm | सस्नेह

हिंदी स्टाईल शब्दासाठी मराठी प्रतिशब्द वापरले असते तर आणखी मृदूतेने भाव उतरले असते.

कथा आवडले. लघुकथा स्पर्धेसाठी छान आहे.

किसन शिंदे's picture

21 Feb 2015 - 8:50 pm | किसन शिंदे

कथा आवडली !!

आजकालच्या वैवाहिक जीवनात नेमकं हेच घडताना दिसतंय.

पुणेकर भामटा's picture

22 Feb 2015 - 10:14 am | पुणेकर भामटा

आभासी जगातलं वास्तव उत्कृष्ठ पणे सादर केलंय, शेवटात मुखवट्या संबधीची रुपकात्मक वाक्यरचना सर्वोत्तम.
पु ले शु

सखी's picture

22 Feb 2015 - 7:16 pm | सखी

आवडली कथा, फेसबुकचा अवतार आल्यावरतर हे जास्तच दिसायला लागतं.

आतिवास's picture

22 Feb 2015 - 10:48 pm | आतिवास

कथा आवडली.

प्रास's picture

22 Feb 2015 - 10:53 pm | प्रास

जीवनात मुखवटे घालून वाटचाल ही खूपदा सामान्य बाब होऊन जाते, अशा वाटचालीचं प्रत्ययकारी वर्णन भावलं.

पैसा's picture

25 Feb 2015 - 10:33 am | पैसा

हरवलेल्या माणसांची आणि नात्यांची कथा आवडली.

मधुरा देशपांडे's picture

25 Feb 2015 - 10:00 pm | मधुरा देशपांडे

कथा आवडली.