पुन्हा एकदा राजगड तोरणा!!--भाग २

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
7 Feb 2015 - 1:58 pm

पुन्हा एकदा राजगड तोरणा!!--भाग 1

रात्री थंडीने कहर केला होता. त्यातच मंडळींची मंदिराच्या आतबाहेर ये जा चालू होती त्यामुळे झोपमोड होत होती. मंदिरात एक लाईट चालू ठेवला असल्याने त्याचाही उजेड जरा त्रासदायक होत होता. पण दिवसभर केलेले श्रम या सर्वांवर मत करत होते आणि डोळे गपागप मिटत होते. पहाटे ४ वाजल्यापासून गावकर्‍यांची नाश्ता पाण्याची लगबग सुरु झाली कारण त्या १७ जणांची ऑर्डर होती. तरीही चिवटपणे प्रयत्न करुन ६ वाजेपर्यंत झोपलो . मग मात्र दिवसभर चालायचे आहे या विचाराने झोपेवर मात केली आणि उठावेच लागले .पद्मावती मंदीराच्या मागच्या बाजुला दिसणारा बुधला आज किती चालायचे आहे त्याची झलक देत उभा होता.सुर्योदय अजुन व्हायचा होता.
a

७ वाजेपर्यंत आवरून तयार चहा पिउन सॅक पाठीवर मारल्या आणि उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून बालेकिल्ल्याला परत येऊ असे सांगून संजीवनी माचीकडे निघालो.पद्मावती माचीचा परीसर पाठी राहिला.

b

बालेकिल्ला डाव्या हाताला ठेवुन चालत पार केला.
c

संजीवनी माचीकडे जाताना वाटेत काही पडके अवशेष , खलबत खाना दरवाजे हत्ती बुरुज वगैरे बघत बघत आणि एकीकडे वेळेचा अंदाज घेत फोटो काढणे चालू होते.
c

संजीवनी माचीचा दुहेरी तट
d

तोरण्याला जाणारी सोंड उजवीकडे दिसत होती. बघता बघता १ तास होउन गेला होता.ढगांआडुन सुर्य डोकावत होता.

f

आता संजीवनी माचीचे शेवटचे टोक दिसू लागले .डावीकडे एक छोटे वळण घेतले आणि सरळ अळू दरवाज्यात आलो. आता खरा ट्रेक सुरु होणार होता.अळू दरवाज्यातून पुढे उजवे वळण घेऊन तटबंदीला समांतर चालत संजीवनी माचीला वळसा घातला आणि तोरण्याच्या वाटेला लागलो.
h

आता खरा कस होता. चढताना जे सामान जड वाटत होते ते आता तेव्हढे वाटत नव्हते पण तीव्र उताराच्या रॉक पॅच वर तोल जात होता आणि सांभाळून उतरावे लागत होते. वाटेत एक साधारण ८० ला टेकलेली म्हातारी तिची सून आणि ७-८ वर्षाचा नातू सामान घेउन त्या वाटेने चढत होते. त्या म्हातारीचे श्रम बघून आम्ही केवळ हात जोडायचे बाकी ठेवले. एव्हढ्या कठीण वाटेवरून हे लोक शनिवार रविवारी गडावर ताक बिस्लेरी वगैरे विकायला येतात असे समजले.

k

उन वाढू लागले होते. एक ब्रेक घेउन जवळचा कोरडा नाश्ता खाल्ला आणि पुढे निघालो. राजगडाची वाट अर्धी उतरली होती आणि बर्‍यापैकी सपाटी चालू झाली. कारवीचे रान चालू झाले. समोर दिसणारा तोरण्याचा बुधला कणाकणाने जवळ येत होता.

g

वाट थोडी खाली उतरली आणि नव्याने झालेला डांबरी रस्ता पार करून समोरच्या झाडीत घुसली. इथे वाट चुकायचा संभव आहे पण मागच्या वेळी इथून आलेलो असल्याने तसे काही झाले नाही. थोडे पुढे गेल्यावर एक झोपडी लागली. गडावर संतोष नावाचा मुलगा भेटला त्याचीच ही झोपडी आहे. तिकडे ताक मिळेल असे समजले होते.पण झोपडीत तर काहीच हालचाल दिसेना. निदान जर वेळ आराम तरी करू म्हणून बसलो . नउ वाजायचा सुमार होता. पक्ष्यांचा मस्त किलबिलाट ऐकु येत होता.
h

राजगडचा बालेकिल्ला धुसर दिसत होता आणि तोरण्याचा बुधला अजून थोडा जवळ आला होता .पक्षी किलबिल करत होते. छान सावली होती. १० मिनिटे गेली आणि झाडीतून एक मावशी धापा टाकत ताकाचा हंडा घेऊन वर आल्या . त्यांना तो १७ जणांचा ग्रुप गाठायचा होता. पण तो ग्रुप तर पुढे निघून गेला होता. त्यामुळे त्या नाराज झाल्या .घराचे काम उरकून इथे यायला कसा उशीर झाला ,आता माझे ताक कोण घेणार अजून काही लोक तुमच्या मागे आहेत का? वगैरे विचारून झाले. दुर्दैवाने आमच्या मागे कोणी उतरले नव्हते . त्या मुळे त्यांचे नुकसान झाले असणार . पण त्या निमित्ताने आम्हाला ताक मिळाले.

u

ताक पिउन पुढे निघालो. पायवाट घेऊन जात होती त्याप्रमाणे चालत होतो. आता जरा दाट झाडी होती.
गप्पा मारता मारता रस्ता कधी खाली उतरला समजलेच नाही आणि आम्ही एका घरापाशी येउन थांबलो. हे घर आधी पाहिल्याचे मला आठवत नव्हते. आणि राजगड तोरणा जोडणारी डोंगर सोंड वरच्या बाजूला राहिली होती .मी हा ट्रेक आधी केलेला असल्याने माझ्या भरवशा वर इथवर आलेल्या तिघांचा चेहरा प्रश्नार्थक झाला .तेवढ्यात आमच्या पुढे असलेल्या १७ जणांच्या ग्रुप पैकी काही लोक त्या घरातून बाहेर पडले . त्यांना विचारले . पण ते ही खात्रीपुर्वक सांगु शकत नव्हते. प्रश्न फक्त वाट चुकली हा नव्हता . आमच्या वेळापत्रकात या वाट चुकी मुळे १ तास वाया गेला होता. वाट सुधारून पुन्हा डोंगर सोंडे वर आलो. आता आम्ही १०-१२ जण एकत्र चालत होतो. कोणी हळू तर कोणी भरभर . त्यामुळे आमचा वेग कमी होऊ लागला . शेवटी एका ठिकाणी संधी मिळाली आणि त्यांना मागे टाकून आम्ही रस्ता सुधारला.उन वाढत चालले होते. दुपारचे १२.३० वाजले होते.मध्ये मध्ये पाणी पिण्यासाठी थांबावे लागत होते पण वेल्हे गावातून स्वारगेट ला शेवटची बस ४ वाजता आहे ही माहिती आम्हाला पाय उचलायला भाग पाडत होती.( शेवटी ती एस्टी मिळाली नाहीच पण खासगी जीपने चेलाडी पर्यंत यायची सोय केली.)
o

आता बुधला अगदी कवेत आला होता .खडे चढ लागायला सुरुवात झाली. त्यातच उन्हामुळे दगड तापले होते. एक खडी चढण चढून बुधल्याला येउन खेटलो. आता उजवीकडे वळून वर चढाई करायची होती. वरच्या बुरुजाला लावलेली लोखंडी शिडी खुणावत होती. घसरड्या वाटेवरून एकमेकांना आधार देत शिडी गाठली . हा ही एक रिस्की पॅच होता. तो पार झाला आणि आम्ही थेट तोरण्याच्या बुरुजावर आलो. एक मोठी लढाई जिंकली होती. सकाळी ७ वाजता सुरु केलेली चाल दुपारी १ वाजता संपली होती.धुसर दिसणारा तोरण्याचा बुधला आता आमच्या हाताशी होता तर सकाळी जिथून निघालो तो राजगड आता धुसर झाला होता.

अजून तोरण्यावरील मेंगाई देवीच्या देवळात पोचायला तासभर तरी लागणार होता. आणि वाटेत २-३ खडे रॉक क्लाइंब आमचे स्वागत करायला तयार होते .तोरण्यावर फिरायला आलेली आणि बुधल्या पर्यंत आलेली मंडळी भेटू लागली .
j
कुठून आलात? राजगडावरून? कितीला निघालात? रस्ता कसा आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती होऊ लागली. तासाभराच्या चाली नंतर देउळ लागले आणि खऱ्या अर्थाने ट्रेक सुफळ झाला .

l

देवळाच्या आवारात बसून राहिलेले सगळे पदार्थ खाउन संपवले.टिकाऊ आणि कोरडे पदार्थ जास्त घेतल्याने जेवण बनवायचा वेळ वाचला होता. पाणी पूर्ण संपले होते. पण गडावरून पुन्हा भरून घेतले. ३ वाजले होते. त्यामुळे तोरणाची झुंजार माची बघायला वेळ राहिला नव्हता . पण एक अद्वितीय ट्रेक पदरात पडल्याच्या समाधानाने त्यावर मात केली आणि झुंजार माचीचा निरोप घेउन तोरणा उतरायला सुरुवात केली.

टिपः- तोरणा किंवा राजगडास यायचे असल्यास स्वारगेटवरुन सरळ भोर गाडी पकडावी. गुंजवणे किंवा वेल्हा बसची वाट बघत वेळ घालवु नये. नसरापुर (चेलाडी) फाट्यापासुन आत जायला भरपुर जीप मिळतील.साधारण ६ वाजल्यापासुन.
वेल्हा गावातुन शेवटची स्वारगेट गाडी ४.३० ला असते. पण तिचा भरवसा नाही. जीपचा पर्याय उत्तम. पण फार उशीर होउन अंधार पडल्यास ते ही पैशासाठी अडवणुक करतात असा अनुभव आहे.

राजगड उतरुन तोरण्याला देवळात पोचायला ६-७ तास लागतात. राजगड चढायला ३ तास तर तोरणा उतरायला २.३० तास लागु शकतात. त्यानुसार वेळ हाताशी ठेवावा.

रोप जवळ असल्यास उत्तम. गरज लागु शकते.

वाटेत पाणी नाही. त्यामुळे माणशी २ लिटर तरी पाणी जवळ ठेवावे.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

7 Feb 2015 - 4:54 pm | प्रचेतस

मस्त लिहिलंत.
आवडलं.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Feb 2015 - 7:22 pm | राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद वल्लीदा

किसन शिंदे's picture

8 Feb 2015 - 1:47 pm | किसन शिंदे

मस्त लिहिलंय !!

काही फोटोंची साईज गंडलीये का? शेवटचे दोन फोटो करून पाह्यले, पण तरीही म्हणावे तसे स्पष्ट दिसत नाहीयेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Feb 2015 - 12:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

मी पण साईझ बदलुन पहिले. पण पि कासावर जसे दिसतायेत तसे इथे दिसत नाहीत. काही फोटो बदलले आहेत. आणि साईझ ५००x५०० केलीये. आता नीट वाटताहेत मला तरी.

स्वच्छंदी_मनोज's picture

9 Feb 2015 - 3:42 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच.. आता बाकीच्या ट्रेकचे पण लेख येऊद्या...

आता बुधल्यावरून खाली उतरायला शिडी लावलीय हे खरे पण शिडी नसताना तो पॅच करण्यात जास्त थरार होता असे मला वाटते. अर्थात शिडी लावूनही फार काही सोपा झाला नसावा.. :). आम्ही हा ट्रेक केला तेव्हा शिडी नव्हती आणी सकाळी वेल्ह्यातून सुरु करून तोरणा करून संध्याकाळी सुर्यास्ताला संजीवनी माचीवर हजर होतो.. जाम तंगडतोड झाली होती पण एक भन्नाट ट्रेक केल्याचे समाधान होते.

मस्त वर्णन .. आवडला ट्रेक..