पुन्हा एकदा राजगड तोरणा!!--भाग १

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
3 Feb 2015 - 9:04 pm

नमस्कार मंडळी
आपला महाराष्ट्र गडकिल्ल्यांच्या बाबतीत समृद्ध आहेच , आणि विविध हौशी ट्रेकर मंडळी आणि ट्रेकिंग ग्रुपनी वर्षानुवर्षे या स्थानांना भेटी देउन आणि बर्याच ठिकाणी चांगले उपक्रम राबवून हि ठिकाणे जागती ठेवली आहेत .
याच परंपरेला जागुन आणि बऱ्याच दिवसात एखादा भन्नाट ट्रेक झालेला नसल्याने आलेली खुमखुमी जिरवण्याच्या उद्देशाने आम्ही राजगड तोरणा ट्रेक आखला .जानेवारी महिना असल्याने पाण्याची चिंता नव्हती.मी स्वत: २००४ मध्ये तोरणा राजगड असा उलट ट्रेक केला असल्याने रस्ता बऱ्यापैकी ओळखीचा होता (असे मला वाटत होते,पण ते नंतर सांगतो :) )
तोरण्याविषयी काही दंतकथा ऐकिवात असल्याने आणि राजगड मुक्कामाला जास्त सोयीस्कर असल्याने प्रथम राजगड करायचे ठरविले.

आता ट्रेक म्हटला की आपली येष्टी आलीच की हो. माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच स्मरणीय ट्रेक मध्ये या लाल डब्ब्याचे फ़ार महत्वाचे स्थान आहे . म्हणजे शुक्रवार किंवा शनिवारची रात्र असावी, हौशे नवशे गवशे ट्रेकर फोनाफोनी करुन,कोणी थेट कामावरुन ,कोणी पनवेल कर्जत मुंबईहुन धावपळ करीत स्वारगेट ला जमावेत , लवकर आलेल्या मेंबराने बाकीच्याना फोनावून शिव्या घालाव्या ,मागच्या वेळी कोणी कशी टांग दिली होती आणि कोणामुळे उशीर झाला वगैरे चर्चा करत एसटी उपहारगृहाचा चहा मारावा ,राहिलेले शेवटचे कायतरी जसे की एक्स्ट्रा सेल , गोळ्या वगैरे खरेदी व्हावी , कोणाच्या बुटाला ग्रिप नाहीये, कोणाकडे रोप आहे, वगैरे ची झाडाझडती आणि न आणल्या चा उद्धार व्हावा . आणि हे सगळे चालु असताना आजूबाजूचे लोक आपल्याकडे "काय वेडेपीर आहेत ब्वा " च्या नजरेने बघत असावेत . वा ,माहौल बना गया. म्हणजे स्वत:च्या वाहनाने ट्रेक करता येतो, पण ती शहराच्या गर्दी पासुन दूर नेणारी गावाशी नाते जोडणारी एसटी म्हणजे ट्रेकिंग चा जीव की प्राण वाटते मलातर .
तर या ट्रेकमध्ये सुद्धा गुंजवणी गावातून पद्मावती माचीवर जाउन राजगड वर पहिला मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी तोरण्यावरून वेल्हे गावात उतरण्याचा बेत असल्याने स्वत:चे वाहन नेणे शक्य नव्हते.म्हणुन गुंजवणॆला पहिली एसटी कीती वाजता आहे याची खात्रीपूर्वक माहिती मिळवण्यासाठी स्वारगेट चौकशी खिडकीचा नंबर फिरवला .आता ज्यांना सरकारी लोकांशी बोलण्याची सवय असेल त्यांना स्वारगेट चौकशी खिडकी हे काय प्रकरण आहे हे वेगळे सांगायला नकोच. एकतर फ़ोन बिझी असतो ,जर रिंग वाजलीच तर कोण उचलेलच याची खात्री नाही. पन्नास वेळा प्रयत्न केल्यावर एकदा(चा) नंबर लागला आणि गुंजवणे ला पहिले एसटी नऊ वाजता आहे अशी महत्वपूर्ण माहिती मिळाली . नऊ म्हणजे फ़ारच उशीर होता. आमचा पुढचा सगळा बेत त्यामुळे बोम्बलला असता .शिवाय एसटी वेबसाईट काहीतरी वेगळेच सांगत होती आणि नक्की कोण अपडेट आहे समजत नव्हते . दुसरा पर्याय म्हणजे वेल्हा बस ८ वाजता होती. पण आम्हाला तोरणा बघुन पुढे राजगड पर्यंत मजल मारता येइल का हे समजत नव्हते . शिवाय राजगडला पोचल्यावर रात्रीचे जेवण बनविणे वगैरे होतेच .त्या मुळे तो बेत रद्द झाला .शेवटी आम्ही असे ठरवले की ७ वाजता स्वारगेट ला जमायचे आणि जी पहिली गाडी मिळेल त्याने जायचे .
हो ना करता करता शेवटी ४ जण तयार झाले. कोणी काय घ्यायचे याची यादी तयार झाली आणि मंडळी भल्या पहाटे (?) ७ वाजता स्वारगेट ला जमली.
स्वारगेटला गेल्यावर समजले की भोरकडे जाणाऱ्या बऱ्याच एसटी आहेत त्याने चेलाडी (नसरापूर) फाट्यापर्यंत जाता येइल आणि तिथुन गुंजवणे ला जायला जीप मिळू शकेल. वेळ घालवण्यापेक्षा हा पर्याय बरा वाटला आणि तो लगेच अमलातही आणला . चेलाडी फाट्याला उतरुन जीपची चौकशी केली आणि वेल्हे गावात जाणारी एक जीप मधल्या काही सीट घेऊन आणि थोडे जास्त पैसे (माणशी १००) घेऊन आम्हाला गुंजवणे गावात सोडायला तयार झाली .तिथल्याच हॉटेल मध्ये नाश्ता उरकून जीपमध्ये बसलो. एकदम टिपिकल ढाचुक ढाचुक गाणी ऐकता ऐकता गुंजवणे कधी आले समजलेच नाही .
गुंजवणे गावात एक फक्कड चहा मारला आणि गडाची वाट धरली .अजून १० चा सुमार होता. उन फार तापले नव्हते त्यामुळे पावले भरभर पडत होती.थोडा चढ पार करुन पहिल्या सपाटीवर आलो तर समोरची डोंगर सोंड आम्हाला आव्हान देत होती. ती चढण पार केली आणि एक ओळखीची झोपडी लागली. ताक पिण्यासाठी पहिला ब्रेक घेतला. गप्पा टप्पा करीत पुन्हा चालायला लागलो. अजून मध्ये मध्ये बर्‍यापैकी झाडोरा शिल्लक असल्याने उन जाणवत नव्हते. पण पाठीवरची सॅक मात्र खडा चढ जाणवून देत होती. माझ्या पाठीवर रात्रीच्या जेवणासाठी आवश्यक क्लिक्स सिलेंडर आणि काही कच्चे सामान होते. मयुरेश प्रवीण आणि अतुलचीही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यामुळे फर्स्ट गियर टाकून गाड्या कशाबशा चढत होत्या. वाटेत जिथे जिथे ताक लिंबू पाणी वगैरे मिळत होते तिकडे आस्वाद घेणे चालू होते. आता वरच्या बाजूचा चोर दरवाजा दिसू लागला. आमच्या आधी पोचलेली उत्साही मंडळी त्या तशा अडचणीत बसुन फोटो सेशन करीत होती. शेवटचा खडा चढ आणि रेलिंग पर केले आणि चोर दरवाज्यातुन पद्मावती माचीवर पाय टाकला .थंड वार्‍याने आमचे स्वागत केले.

a

b

दुपारचा एक वाजला होता. प्रथम पद्मावती देवीचे दर्शन घेउन देवळात जागा पकडली आणि पथार्‍या टाकल्या. आपापले डबे उघडून पोटोबा केला.
c

राजगड बघायला एका दिवस पुरेसा नाही. कारण तीन माच्या (पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी ) दूर दूर आहेत. फक्त सुवेळा माचीकडे टोकापर्यंत जायलाच दोन तास आणि यायला तेव्हढाच वेळ लागतो. बालेकिल्ला आणि पाली दरवाजा वगैरे बघायला दुसरा दिवस लागणारच .आम्ही बालेकिल्ला आधीच बघितलेला असल्याने यावेळी सुवेळा माची प्रथम करणार होतो. त्याप्रमाणे चालायला सुरुवात केली

d

सदर, अंबरखाना वगैरे बघत पुढे निघालो. आमच्या बाजूला बालेकिल्ल्याची सावली असल्याने उन्हाचा ताप जाणवत नव्हता
e

वाटेत थोडे खाली उतरुन गुंजवणे दरवाजा बघितला. काहीही दुरुस्ती आणि देखभाल नसताना अजून अभेद्य राहिलेली तटबंदी ,दरवाजे पाण्याची टाकी आणि इतर अवशेष पाहता पाहता थक्क होउन पुढे निघालो.

f

g

सुवेळा माचीचे मुख्य आकर्षण म्हणजे नेढे. गुंजवणे गावातून गडावर चढत असताना हे नेढे डावीकडे कायम खुणावत राहते .लांबून जरी ते छोटे दिसत असले तरी प्रत्यक्षात ४-५ माणसे बसू शकतील एव्हढे मोठे आहे.
g
नेढ्यात जायला जमिनीपासुन १५-२० फुट वर प्रस्तरारोहण करायला लागते. पण तिथून आसपासच्या दरीचा जो विहंगम देखावा दिसतो त्याने डोळ्याचे पारणे फिटते .आम्ही गेलो तेव्हा सुर्य डावीकडे होता आणि त्याचे उन नेढ्यातून आरपार जाऊन पलीकडच्या दरीत पडले होते. फारच सुंदर दृश्य होते ते.

बराच वेळ तिकडे बसल्यावर शेवटी मन आवरले आणि पुढे निघालो. दुहेरी तटबंदी , बांधीव बुरुज आणि बेलाग कडे पाहताना सुवेळा माचीच्या टोकाला कधी येउन पोचलो समजलेच नाही. भुतोंडेचा जलाशय एकीकडे तर सिंहगडचे टी. व्ही.चे मनोरे डावीकडे दिसत होते. थोडे फोटो काढुन परत फिरलो.
k
पद्मावती मंदिरात परत आलो. गावकर्‍यांना आता चांगलेच माहीत झाले आहे की शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी भरपूर ट्रेकर मंडळी राजगडावर येतात . त्यामुळे त्यांनी मंदिराच्या कोपर्‍यात बस्तान बसवले होते. चहा पोहे ,जेवण काय सांगाल ते मिळत होते. आम्हीपण चुल पेटवायचा कंटाळा केला आणि तयार चहाचा आस्वाद घेतला . रात्रीच्या जेवणाची पण सोय होइल म्हणत होते. पण आम्ही तयारीने आलो असल्याने रात्रीचे जेवण सांगितले नाही. एक मोठा १७ जणांचा ग्रुप आला होता. ते मात्र दर थोड्या वेळाने हे द्या ते द्या अशा ऑर्डर सोडत होते. आश्चर्य म्हणजे एव्हढा मोठा ग्रुप असून बरोबर काही जेवण खाण्याचे सामानही आणलेले दिसत नव्हते. सगळा कारभार तयार जेवणावरच अवलंबून होता.
j

मस्त संध्याकाळ पसरत चालली होती. दरीतील गावे धुसर होऊ लागली होती. मनात एक नोस्टॅल्जिक फिलिंग येत होते. पण बसुन चालणार नव्हते. खिचडी करायची होती. एकीकडे दुसर्‍या दिवशी किती लवकर निघायचे ह्याची चर्चा चालू झाली तर दुसरीकडे कांदे बटाटे कापणे वगैरे कामे सुरु झाली. चुल पेटवायची नव्हती. पण क्लिक्सवर खिचडी शिजायला किती वेळ लागेल ह्याचा अंदाज नव्हता .त्यामुळे जरा चिंता होती.
हळूहळू खिचडी तयार झाली. अंधार गडद होत चालला होता पण पौर्णिमेचे चांदणे असल्याने दिसत होते. जोरदार वारा रात्री किती थंडी वाजणार आहे ते जाणवून देत होता.

l

मंदिरात आरती सुरु झाली. ट्रेकर मंडळी गडावर येतच होती. पद्मावती मंदीर तर फुल झालेच पण किल्लेदाराची कोठी आणि इतर ठिकाणी सुद्धा लोकांनी मिळेल तश्या पथार्‍या पसरायला सुरुवात केली.

m
आता जागा सोडली तर रात्री झोपायचे वांधे होतील हे ओळखून आम्ही पटापट खिचडी खाउन घेतली आणि एकाला राखणीला मंदिरातच बसवून भांडी वगैरे घासून सामान आवरले .मस्त चांदणी रात्र होती. बुरुजावर मंडळींनी गप्पांचा फड जमविला. काही प्रोफेशनल लोक सरळ तंबू वगैरे घेउन आले होते. त्यामुळे त्यांची तंबू बाहेर शेकोटी वगैरे ची धमाल चालू झाली. रात्र चढू लागली तसे तसे उद्याचे विचार डोक्यात घोळू लागले. सर्वांचे घरी फोन वगैरे करून झाले होतेच. त्यामुळे सरळ मंदिरात परतलो आणि सॅक डोक्याशी घेउन पडी मारली .

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Feb 2015 - 12:07 am | मुक्त विहारि

पुभाप्र

वेल्लाभट's picture

4 Feb 2015 - 11:19 am | वेल्लाभट

क्या बात है !

३१ ऑक्टोबर ला गेलो होतो. आप्पा परबांबरोबर. राजगड पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा जायची चीज आहे.

तुमचा पहिलाच भाग 'माहोल सेट करणारा आहे' त्यामुळे पुढे वाचण्यास उत्सुक !
येऊद्यात.....

जय भवानी जय शिवाजी

सतीश कुडतरकर's picture

4 Feb 2015 - 11:58 am | सतीश कुडतरकर

मी सुद्धा धावत-पळत राजगड पाहिलाय. फक्त बालेकिल्ल्यावर जाण झाल आहे, सुवेळा माची आणि संजीवनी माची दुरूनच पाहिली आहे.

राजेंद्र एक तंबू घेऊनच टाका, जास्त पैसे लागत नाहीत आता आणि त्यासाठी professional असण्याची गरज अजिबातच नाही. Decathlon मध्ये कधीतरी चक्कर मारा, चांगल्या offers असतात. आम्ही मागे दुबई वरून १० मेन तंबू फक्त ३०००/- रुपयांना मागवलेला. कोणी येत असेल तर त्याला घेऊन यायला सांगायचा.

गर्दी पासून दूर जाऊन चांदण्यांचा प्रकाश अनुभवायचा आनंद वेगळाच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Feb 2015 - 12:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद मुवि,वेल्लाभट आणि सतीश

होय, डेकॅथ्लॉन मध्ये एक चक्कर मारायचीच आहे. वनाज जवळ एक स्टेप इन म्हणुन दुकान आहे. तिकडे एकदा रोप घ्यायला गेलो होतो. तिथे भाड्याने सुद्धा टेंट मिळतात. शिवाय ईतर साधने देखील बरी वाटली.

किसन शिंदे's picture

4 Feb 2015 - 8:00 pm | किसन शिंदे

राजगड म्हटलं की लग्गेच पळत येतो, पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

रच्याकने, मेहंदळे काका तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक द्या हो आणि मलाही हाक मारत चला ट्रेकला निघायच्या वेळी. :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Feb 2015 - 3:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

भ्र्मणध्वनी व्य. नि करतो. पुढचा ट्रेक कदाचित कमळगड करु वन डे.

बाकी राजगडावर आता प्रवेश फी द्यावी लागणार म्हणे.

स्वच्छंदी_मनोज's picture

5 Feb 2015 - 8:38 pm | स्वच्छंदी_मनोज

महाबळेश्वरहून उतरून कमळगड करा..मस्त ट्रेक होईल.. आम्ही पावसाळ्याच्या सुरुवातीला केला होता. केट्स पॉईंट वरून सुरु करून बलकवडी डॅमच्या भिंती पाशी उतरता येते आणी तिथून कमळगड आणी एक दिवसात वाईला परत :) तसा कमळगड अजून दोन मार्गानी एक दिवसात करता येतो म्हणा..

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Feb 2015 - 1:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

केटस पॉईंट वरुन एक दिवसात करता येतो म्हणताय? पण पुणे ते पुणे एक दिवसात होइल कि वाईला मुक्काम करावा लागेल? आमचा प्लॅन पुणे-वाई -नांदवणे आणि परत असा आहे.

स्वच्छंदी_मनोज's picture

6 Feb 2015 - 2:33 pm | स्वच्छंदी_मनोज

एका दिवसात करण्यासाठी महाबळेश्वरहुन सकाळी एकदम लवकर सुरुवात करावी लागेल तरच केट्स पॉईंटवरून बलकवडीला उतरून कमळगड चढून व उतरून परत संध्याकाळी वाई गाठता येईल.. जर एस्टीने करणार असाल तर बलकवडीवरून संध्याकाळि ६.००/६.३० ला वाईसाठी शेवटची एस्टी आहे..

पुण्यावरून स्वतःच्या गाडीने करणार असाल तर डायरेक्ट बलकवडी किंवा वासोळ्याला गाडी लावून एका दिवसात करता येतो..

स्वच्छंदी_मनोज's picture

4 Feb 2015 - 8:17 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्त सुरुवात, लवकर पुढचा भाग टाका.. किती वेळा राजगड बघीतला आहे पण तरीही दरवेळेला नवीनच जाणवतो.

फार पुर्वी राजगडावर एकांत अनुभवला असल्याने, सध्याची गर्दी पाहाता आता शनीवार-रविवार जावेसे वाटत नाही

रचाकने: स्वारगेट वरून वेल्हा पहीली गाडी सकाळी ६.३० ला आहे, पोस्टाचे टपाल घेवून व्हाया पुणे स्टेशन जाते.. त्याही गाडीने आपण जाऊ शकतो..

गणेशा's picture

5 Feb 2015 - 3:17 pm | गणेशा

मस्त .. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.. फोटो आनखिन येवुद्या

प्रचेतस's picture

6 Feb 2015 - 2:15 pm | प्रचेतस

झकास सुरुवात.
मिपावरचे भटकंतीचे दालन समृद्ध होत आहे.

पैसा's picture

12 Feb 2015 - 10:09 am | पैसा

खूप छान लिहिलंत! खिचडी कशावर केली होती ती? क्लिक्स म्हणजे काय?