नांदूर-माध्यमेश्वरचे पाहूणे

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
17 Dec 2014 - 12:07 pm

सध्या थंडी मस्त पडली आहे. कुठे हॉटेलात तर कुठे तळ्याकाठी कुठे डोंगरावर तर कुठे लेण्याच्या सानिध्यात कट्टे करण्याचे मिपाकरांचे कट शिजताहेत. काही अलोट गर्दीत पार पडलेत. चुकलेले हळहळत बसलेत. मीपण येत्या रविवारचा हुकमिएक्का आयोजित भिगवण कट्टा हुकतोय म्हणून कासावीस झालो आहे. खरोखर किती बदललोय मी. मिपावर आल्यापासून कट्टाप्रेमी होत चाललोय. एकटाच भटकणारा मी आता वेगळे अनुभव घेतो आहे. आता जास्ती लांबण न लावता मुद्द्याकडे येतो.

नांदूर-माध्यमेश्वर या पक्षितीर्थाबद्दल ऐकून होतो. इथे एक शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे आणि थंडीत येणाऱ्या स्थलांतरीत पक्षांना ही जागा इतकी आवडली आहे की महाराष्ट्राचे भरतपूर झाले आहे. माझे इकडे चौदा वर्षांपूर्वी जाणे झाले होते (शुक्रवार २४ नोव्हेंबर २०००). परंतू त्यावेळचे फोटो नसल्याने वर्णन लिहायचे टाळले होते. (अशा अनेक भटकंती आहेत).आता विचार केला वर्णन (जुनेच) टाकून तर पाहू. हुकमिएक्का, चौकटराजा, नांदेडीअन जयंतराव, मदनबाण, डॉ बिरुटे, स्वॉप्स, स्पा जाऊन येतील/आलेले असल्यास मस्त फोटो टाकतील आणि नवीन माहितीची भर घालतील. थंडी वाया नको जायला.
तुमचेही विचार लिहा.

नाशिकपासून चाळीस किमी आणि निफाडपासून फक्त १३ किमीटरवर नांदूर-माध्यमेश्वर आहे या माहितीपलीकडे काहीच न कळल्यामुळे गुरुवारी संध्याकाळी शुक्रवारचे तपोवन गाडीचे निफाडचे फक्त जाण्याचे रेझ॰ करून टाकले. येताना बघू काय सोयीचे पडते ते असा विचार केला.

सकाळी सातला कल्याणला तपोवन गाडीत बसलो तेव्हा सैकमध्ये पाणी, चादर, एकवेळचा डबा ,दुर्बिण आणि कैमरा होता. आजच परत येऊ का उद्या हे पण नक्की घरी सांगता आले नव्हते. गाडीत चहा वडे खात वेळ मजेत गेला. दहाला नाशिक आणि साडेदहाला पुढचेच निफाड आले तरी कळले नाही. स्टेशनबाहेर घरे आणि माणसांऐवजी शेतातला ऊस वाट पाहत होता.

पाच सहाजणांना सोडून गाडी गेल्यावर फलाटावर शुकशुकाट झाला. उजवीकडे मागे जी माणसे रिक्षा पकडून गायब झाली तिकडे मी धावलो "नांदूरमा--?" एकाला विचारले त्याने माझ्याकडे प्रश्नार्थक पाहून "ही इकडे कुंदेवाडी आहे. चार किमीटरवर निफाड आहे रिक्षाने जा." तो एकमेव रिक्षावालाही माझ्याकडे पाहत होता. लगेच बसलो रिक्षात आणि निफाडच्या डेपोजवळ उतरलो. हे गाव मात्र अगदी जंक्शन होतं. घरे, दुकाने, धावपळ, सर्व.आता इथे चहा भजी घेऊ विचारू म्हणत डेपोतल्या एका पाटी नसलेल्या रिकाम्या बसमधल्या माणसास "नांदूर- - - -?" "हीच." लगेच चालक आले घंटी वाजली, बस सुटली, चहा बुडला. "किती बस असतात नांदूरला?" "एकच जाते सकाळी साडेसातला आज शुक्रवार. निफाडचा बाजार म्हणून चार असतात दिवसात." आता साडेअकराच वाजले होते. आणखी नऊ किमीवरचे तळे पाहून परत निफाडला पाचपर्यँत पोहोचलो की तपोवन एक्सप्रेसने रात्री साडे नऊला घरी जाईन हा हिशोब करून टाकला. बसमध्येच डबा खाऊन तयार झालो.

एका गावात बस थांबली. "उतरा आले नांदूर." गावात चहाची टपरी दिसली नाही. एकाला विचारले, "नांदूर --?" "हेच नांदूर. तुम्हाला जायचय कुणाकडे?" "नां--माध्य--!" "धरणावर जायचय का ?तेऽऽ तिकडे नदीपलीकडे तीन किमीवर आहे. पुढे नदी लागेल पाणी नसतं. त्यातूनच वर जा." आता पात्रातून गोटे तुडवत दोन तीन किमी जायचे तर एक वाजणार. या ट्रीपमध्ये धरणाच्या भिँतीला हात लावून येऊ. निफाडचा ऊस नेऊ. पुढच्या ट्रीपला दुसरा मार्ग कळेल आणि समजेल भरतपूर जाणं सोपं आहे का हे.

गावातली घरं मागे टाकून नदीकडे येतांना लोकांच्या नजरा पाहून समजून गेलो या बाजूने कोणी येत नसावे.नदीतून वरचा भाग उजवीकडे वाटला तिकडे वळलो. थंडीचे दिवस असल्याने ठीक होतं. उन्हाळ्यात तापलेल्या वाळू गोट्यातून चालता आले नसते. अचानक आकाशात एक हैरिअर टाईप पक्षी दिसला. चला आता जागा जवळ येतीय. पात्रातच एक देऊळ दिसले.हेच ते माध्यमेश्वर असावे ज्यावरून नाव पडले असेल.
आता या देवळात पटकन जाऊन आल्याचं आठवतंय पण ठेवण वगैरे नाही माहित. इथे थोडावेळ बसून धरणाजवळ आलो तेव्हा वस्ती आणि वर्दळ दिसायला लागली. दोन वाजलेले.

वर रस्त्यावर येऊन चौकशी केली तेव्हा पाटबंधारे खात्याचे रेस्ट हाऊस आहे हे कळले. चला आता तिथे जर आसरा मिळाला तर कामच झाले.एका मोठ्या आवारात पोहोचलो. पुढे बाग, मागे एक बैठी रंगवलेली इमारत दिसली. दारं बंद होती. मागे काही बैठी घरं. एकजणास रूमचं विचारले. "आजचे बुकींग नसणार तुमचं. रूम रिकामी असली तर इथेच देतो. आज रिकामी नाही." " आता काही गावात व्यवस्था होईल का?" " विचारून बघा." मी बसने नाशिकला जाण्याच्या विचारात परत फिरलो. त्याने पुन्हा थांबवले.
"कुठून, कशाला आलात?" " पक्षी बघायला आलो. निफाड कडून रेल्वेने." "कैमरा वगैरे आहे?" " हो.""अरेरे, इकडून नाशिक सिन्नरकडून यायचे ना. आता जाऊ नका. रूम नाही पण तुमची आमच्या रूममध्ये उतरायची व्यवस्था करतो. जायचे नाही कुठे. तुम्ही आमचे पाहुणे." पगारे नावाच्या एकाच्या खोलीत झाली माझी व्यवस्था."थोडा आराम करा नंतर सांगतो सर्व."

कर्मचाऱ्याच्या खोल्या असतात तशी खोली होती जागेवर पोहोचलो होतो आणि डोक्यावर छप्पर आले होते. कॉटवर पडल्यावर आजचा प्रवास आठवला. जरा वेळाने तो माणूस =ते आले आणि त्यांनी थोडक्यात सांगितले "आज पाटबंधारेचे सर्व साहेब अगदी मंत्री साहेबांच्या सचिवापर्यँत इथे सहापर्यँत येतील. उद्या एका कालव्याच्या प्रोजेक्टचे भूमिपुजन होणार. रात्री इथे जेवण आहे. त्यासाठी इमारत पूर्ण रंगवून आतील सर्व सामान, पडदे, चादरी नवीन आणले आहेत. एक औरंगाबाद परीमंडळाचे साहेब इथे रात्री राहणार आहेत. त्यासाठी हे सर्वजण महिनाभर कामाला लागलेत. मी एकटा इथे वनखात्याचा पक्षीनिरीक्षक आहे. आमचे हे साहेब नाहीत पण बिडिओसाहेब येतीलच. धरणामुळे पक्षी इथे येतात ते पाहायला हौशी पक्षीनिरीक्षक येतात. आजपण डोंबिवलीहून एकजण आलेत असे मी सांगितल्यावर साहेब विचारतील तेवढीच उत्तरे द्यायची."
"आमच्याकडे पक्षांची पुस्तकेही आहेत."
त्यातली चार पाच पुस्तके त्यांनी आणून दिली. पुस्तके पाहा अथवा आवारातच फिरा पण लांब जाऊ नका या सल्यामुळे धरणाकडे जाता येईना. मिलिंद गुप्तेंचं पुस्तक 'निसर्गाचे मित्र' होतं. जिल्हाकार्यालयाची एक वायरलेसवाली जीप आली होती. त्यावर सारखा निरोप येत होता साहेब कुठे आहेत ते." आज BNHSची लोकं पण यायची आहेत पक्षांना रिँग घालायला पण ते स्वतंत्र आहेत आणि आज त्यांच्या मागे जाता नाही येणार. त्यांना दोन मोठे बांबू काढून दिले की झालं माझं काम. आमचं रेस्ट हाऊस पाहा. माझं नाव पाफाळे."

मी लगेच निघालो. आवारात बरीच झाडं आहेत. एका छोट्या झाडावर सात आठ मिनिवेट मजेत बागडत होते. झाडाखालीच एक म्हातारी धान्य निवडत होती. कांचन, होले ,साळुंक्या ,तांबट होते. हिरवी कबुतरंही दिसत होती.
रेस्टहाऊसमध्ये दोन खोल्या चकाचक केलेल्या दिसत होत्या. बाजूचा डाइनिंग हॉल खूप मोठा होता. एकावेळी तीसजण जेवतील एवढे टेबल मांडलेले होते. इमारतीसमोर मोकळी झेंडावंदनाची जागा होती. एक नवी मिनिबस ट्रावलर आली. बसवर BNHS , donated by TamilNadu government लिहिले होते. त्यातून तिघे उतरले.

पाफाळेंनी बांबू दिल्यावर ते जाळं घेऊन निघाले.
"मला हिरवं कबूतर दिसलं" मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला
"कोणतं? बरेच प्रकार species आहेत."
त्यांचं काम झटपट चालू होतं. आपण BNHS वाल्यांशी बोलतो आहोत हे लक्षात येऊन मी गप्प बसलो.

पाफाळे अधूनमधून साहेब कुठवर आलेत ते सांगत होते आता जवळ येताहेत करता करता एकदम सहा वाजता
"आता काही साडेआठपर्यँत येत नाहीत त्यांची गाडी फिरली दुसरीकडे. आता बोलता येईल थोडे आपल्याला."-पाफाळे.
" नांदूरमाध्यमेश्वर विचारत आलो तेव्हा कोणी नीट सांगतच नव्हते आणि याचे बुकिंग कुठे होते?"- मी.
"याला इकडे खानगाव NID म्हणतात किंवा धरण. इथल्या ऑफिसचा नंबर आहे 02550 238390 आणि नाशिकमध्ये त्रिंबक रोडवर मायको चौकाकडून सिडकोकडे जाण्याचा रस्ता आहे तिथे आहे सिंचन विभाग कार्यकारी अभियंताचे मुख्य
कार्यालय आहे. त्यांचा फोन 0253 2573192 तिथून होते रेस्ट हाऊसचे बुकिंग.
"कसं यायचं?"
"सिन्नर आहे नाशिक-संगमनेर -मंचर-पुणे रस्त्यावर. सिन्नरकडून शिरडीकडे जाताना वाटेत सहाएक किमीटरवर
डावीकडे मांजरगाव-खानगाव-करंजी हा फाटा आहे. सिन्नर-करंजी बस याच मार्गाने जातात." सिन्नर इथून २०किमी आहे. नाशिकहून चांदवडकडे जाणाऱ्या बसने साईखेडा येथे उतरलात तर तिथून १४ किमी आहे." माझ्याकडे धरणावरचे
पक्षी मोजण्याचे काम असतं म्हणत पाफाळेँनी तीनफुटी मोठा छापील कागद काढून दाखवला. एका बाजूला पक्षांची तीसेक नावे आणि पुढे तारखा होत्या. "प्रत्येक महिन्याचा कागद बनवतो आणि नाशिकला वनखात्याला पाठवतो."
"मोजता कसे?"
"दहा/ वीस मोजून त्यांचा आकार मोठ्या थव्यात कितीवेळा बसेल तसं गुणायचं. वीसचे पाच राहतील असं वाटलं तर
शंभर पक्षी आहेत म्हणायचं.
"उद्या आपल्याला साहेबांबरोबर धरणावर सकाळी सातला जायचंय त्यामुळे तिकडे जाऊ नका. आता संध्याकाळी पक्षी घरट्याकडे पाटाच्या पलीकडे त्या वडांवर येतील तिकडे पाहून या."
"रात्री साहेबांबरोबरच जेवायचं आहे. तुम्ही खाता ना सर्व?"
"नाही."
"मग तुमचं जेवण अगोदर करायला सांगतो. आठला तुम्ही जेवून घ्या."
आता अंधार पडणार होता बाजूला पाट्यावर मसाला वाटला जात होता. कोपऱ्यातून आवाज आला कोऽकोऽऽकोऽ-- मी लगेच पाटाकडे निघालोच. वडाच्या झाडावर पांढरे, काळे शराटींची घरटी होती. इतरही वंचक, बगळे होतेच कलकलाट होता. कोकीळ लाल टेंभरं भराभर गट्ट करत होते. ठिपकेवाले कोकीळ मादीपक्षीही खूपच होते. पाटाचे भरपूर पाणी, शेती यामुळे रानपक्षांची सोय झाली होती. अंधार पडू लागला तसा परत फिरलो.
ताऱ्यांनी भरलेले आकाशही छान दिसत होते. आठला परत आलो तेव्हा माझे जेवण तयार होते. चुलीवरचे ते चविष्ट डाळ, भाकरी, वांग्याचा रस्सा जेवून खोलीत पडून राहिलो. दमलेलो असल्याने लगेच झोप लागली. रात्री कुणीतरी उठवले तेव्हा साडेअकरा वाजले होते. मला हॉलमध्ये बोलावले तेवहा सर्व साहेबांची जेवणे होऊन अर्धवतुळात
उभे होते. नाटकात महाराज, परधान, सेनापती कसे उभे राहतात तसे सातजण उभे होते. कर्मचारी वर्ग समोर. सफारीतले दोन मोठ्ठे साहेब सोडून इतर हात बांधून अदबीने उभे. मीपण तेच केले. प्रत्येकजण आपल्या हाताखालच्या साहेबाशी संपर्क साधून. अगदी नाटकातल्यासारखे बोलत होता. नंबर ३ ने २ला २ने १ला सांगितले "धरणातले पक्षी पाहायला पर्यटक येतात आज एक डोंबिवलीहून आलेत."
मग नं १ने थेट मला काही पक्षांबद्दल विचारले त्याची उत्तरे दिली आणि सभा संपली. आम्ही खोलीत परतलो. रात्री पगारे (ज्यांची खोली होती ते) आले "तीन दिवस खाटेवर पाठ टेकायला नाही मिळाली. आता सकाळी सातला तयार राहा."सकाळी लवकर उठून तयार झालो. सातला सर्व गाड्या तयार होत्या. सर्वात पुढे लाल दिव्याची गाडी ,बिडीओ ,नंबरप्रमाणे साहेब त्यांच्या जीपात पिएसह शेवटच्या आठव्यात वनखात्याचे पाफाळे अन मी. सिन्नररोडवर चार किमीवर मांजरगाव आहे तिथे थांबलो.

मांजरगावाच्या रस्त्यापाशीच शेताजवळ किनारा येतो. तिथे उसाच्या आडून पुढे गेले की {पाण}पक्षी दिसतात. बदकं पाहणे हे खास आकर्षण. त्यातही ब्राह्मणी बदकं विशेष. ती होतीच. एकदम वीसपंचवीसजण पुढे धावल्यावर ती घाबरून उडाली. त्यांचा फिकट बदामी रंग आणि तजेलदार काळाभोर डोळा फारच आकर्षक दिसतो. खंड्या होतेच. पाचसात फुटांवर शेतातल्या पाणथळ जागेत तीन चार प्रकारचे धोबीपक्षी तुरूतुरू चालत शेपटी अंगासह वरखाली सतत हलवत
भराभर कीटक टिपत होते. एक बारीकसा मंजूळ आवाजही करतात. एक निरीक्षण मनोरा (जयंतरावांच्या रेखाचित्रातला) आहे. पक्षीदर्शनानंतर गाड्या परत धरणाकडे निघाल्या. पाफाळेनी माहिती सांगितली
"वरच्या एका (?नाव विसरलो) धरणातून पाणी इथे सोडतात आणि भरून घेतात. शेतीला पाटाने पाणी सोडल्यावर
धरणातलं पाणी कमी होऊ लागतं. याचवेळी शेवटी आलात तर थोड्याच जागेत बरेच पक्षी दिसतात."धरणावर पंधरावीस
गावकऱ्यांच्या उपस्थितीत नारळ फोडणे कार्यक्रम पार पडला. परिमंडळाचे एक साहेब रेस्ट हाउसला आले. बाकी गेले मी खोलीवर आलो दुपारचं जेवण घेऊन एक वाजताची सिन्नर बसने आणि पुढे नाशिक स्टेशन गाठले. पावणेसहाची तपोवन मिळाली. इथे पाणपक्ष्यांबरोबर रानपक्षीही पाहता आले आणि एक वेगळाच अनुभव मिळाला.
==================

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

17 Dec 2014 - 12:27 pm | पाषाणभेद

मिपा सदस्य जयपाल यांची आठवण आली.

प्रचेतस's picture

17 Dec 2014 - 12:43 pm | प्रचेतस

लवकरच लिहा.

कंजूस's picture

19 Dec 2014 - 9:17 am | कंजूस

फोटोग्राफी आणि पक्षीप्रेमींसाठी या साईट पाहा:
१)
'फ फोटोचा' फोटो सर्कल सोसायटीचा दिवाळी अंक इथे fotocirclesociety dot com या त्यांच्या साईटवर अनुक्रमणिका पाहा
मराठी आणि इंग्रजी दोन्हीत ३३ लेख आहेत.

२)

भारतीय पक्षांची साईट
११००हून अधिक फोटो ,नावे आहेत.

इथे kolkatabirds dot com वर पाहा.

मुक्त विहारि's picture

17 Dec 2014 - 1:02 pm | मुक्त विहारि

डोंबोलीचे आणि कट्ट्याचे फार आधी पासूनच नाते आहे आणि राग नका मानू, पण एकटे तप करणे वेगळे आणि एकसमान विचाराने एका कुटुंबा सारखे भटकणे वेगळे.

आता फेब्रुवारीत आलो की, परत एक छान ट्रिप आखू या.

एका दिवसात, सकाळ ते संध्याकाळ , लोहगड जमेल का?

डोंबोली-लोहगड-डोंबोली असा बेत आखता येईल का?

प्रचेतस's picture

17 Dec 2014 - 1:03 pm | प्रचेतस

अगदी सहज जमेल.

मुक्त विहारि's picture

17 Dec 2014 - 1:37 pm | मुक्त विहारि

वल्लीदा तुम्ही पण येणार का?

प्रचेतस's picture

17 Dec 2014 - 1:41 pm | प्रचेतस

येणार की.
तुम्ही इंद्रायणीने आलात तर लगेच लोणावळ्याहून कनेक्टिंग लोकलने मळवलीत ८.१५ पर्यंत उतराल. मी इकडून लोकलने ८.३० पर्यंत पोचेन.

मुक्त विहारि's picture

17 Dec 2014 - 1:54 pm | मुक्त विहारि

तुमच्या सुट्टीचे वेळापत्रक कळवा.

एखाद्या ऑड डेला जमेल काय?

शनिवार-रविवार गाड्यांना बरीच गर्दी असते.

प्रचेतस's picture

17 Dec 2014 - 2:04 pm | प्रचेतस

तुमची तारीख ५/६ दिवस आधी कळवलीत तर ऑड डे ला नक्कीच जमू शकते.

मुक्त विहारि's picture

17 Dec 2014 - 2:07 pm | मुक्त विहारि

सुदैवाने वर्षारंभ असल्याने, अजून कुणी येत असतील तर बघू या....

हुकुमीएक्का's picture

17 Dec 2014 - 7:06 pm | हुकुमीएक्का

2-3 दिवस आधी कळले तर नक्कीच जमेल.

मुक्त विहारि's picture

18 Dec 2014 - 1:21 pm | मुक्त विहारि

डन..

८-१० दिवस आधीच धागा काढतो...

पाय भराभर हलवले तर भाजेलेणी +लोहगड करता येते पण खादाडी चालताबोलता करावी लागते.

फक्त लेणी करायची झाल्यास कट्टा +खादाडी +लेणी आरामात करता येते आबाल थोर सर्वच येऊ शकतात.

हुकुमीएक्का's picture

17 Dec 2014 - 1:09 pm | हुकुमीएक्का

मला पक्षी निरिक्षणासाठी अजून एक जागा सुचवल्याबद्दल धन्यवाद. आपल्या लेखाच्या प्रतिक्षेत आहे.

जयंत कुलकर्णी's picture

17 Dec 2014 - 1:26 pm | जयंत कुलकर्णी

मी फार पूर्वी गेलो होतो त्यावेळचे एक रेखाचित्र..............
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पक्षी दिसतात पण फार दुरुन..........

नांदेडीअन's picture

17 Dec 2014 - 2:47 pm | नांदेडीअन

मी खूप लहान असताना गेलो होतो नांदुर-मधमेश्वरला.
Kodak kb10 कॅमेरा होता माझ्याकडे तेव्हा. :-D

छानच....फोटो असते तर आणखी मजा अली असती....

१)माहिती जुनी आहे. फोन नंबर, पत्ते बदलले असल्यास तपासा.
२)पाच सहा वर्षाँपूर्वी मांजरगावालाच पक्षीमित्रसम्मेलन झाले होते.
३)निफाड स्टेशनहून 'शिवरेफाटा' इथे गेल्यास एक किनारा जवळ येतो तिथेही पक्षी असतात असे कळले आहे.
४)धरणातले पाणी कधी नवीन येणार हे फोनवर कळल्यास काम सोपे होईल.
५)नाशिक रेल्वेपुलावर (ओब्रीज) सिन्नरच्या बस मिळतात कसारा मार्गे नाशिक गावात जाऊ नका.
६)सिन्नरचा बाजार रविवारी,घोटी(इगतपुरीजवळ) चा मंगळ आणि शनिवारी,पडघा (शहापूरजवळ)चा रविवारी (सुकट फेम) असतो.
७)इतर धरणातही हेच पक्षी असतात. रोहित आणि समुद्रपक्षी इकडे येत नाहीत.

हुकुमीएक्का's picture

18 Dec 2014 - 11:45 pm | हुकुमीएक्का

      लेख वाचला. छान लिहलयं. लेख आणि नंतरची अपडेट यामूळे खुप मदत होईल त्या भागात जायला. आपली कमालच म्हणावी लागेल आपण एव्हड्या लांब जाऊन आलात तेही केवळ ऐकीव माहितीच्या आधारे. Hats Off *clapping*
      मी तर फॅन झालोय तुमचा. *smile* तुमच्या पुढील ट्रिप्स किंवा ट्रेक वगैरे असतील तेव्हा नक्की कळवा. मी अशी Adventurous संधी शक्यतो सोडत नाही. *smile*

पाषाणभेद's picture

19 Dec 2014 - 9:54 am | पाषाणभेद

निफाड हे माझे गाव आहे. नांदूरमध्यमेश्वर जवळील म्हाळसाकोरे गावातील म्हाळसादेवी ही बर्‍याच गोत्रांची (व आमचीही) कुलदेवता आहे.
गोदावरी नदीवरील हा बंधारा ब्रिटीशकालीन आहे. लहाणपणी आम्ही टॅक्टरवरून या बंधार्‍यावर जात असू. पुर्वी बंधार्‍याखाली फरशी बांधलेली नसल्याने बंधार्‍यावरूनच वाहने जात असत. या बंधार्‍यातून दोन्ही बाजूंनी कालवे काढलेले आहेत. या धरणामुळे आजूबाजूची शेती समृद्ध झालेली आहे. बॅकवॉटरखाली गेलेली जमीन मात्र नापीक आहे.

थेट बंधार्‍यावर गेलात तर पक्षी दिसणार नाही. बॅकवॉटर जेथे आहे - जसे चापडगाव करंजगाव तेथून तुम्ही पक्षी पाहू शकतात.

नांदूरमध्यमेश्वर येथे नाशिकहून थेट बसेस कमीच आहेत. सकाळी ८:३० की ९:०० वाजता आहेत. पण येथे जाण्याचा सोपा मार्ग सांगतो:
१. स्वतःचे वाहन असल्यास नाशिकमार्गेच जावे. सिन्नर मार्गे लांब पडू शकते. निफाडमार्गे उलटा मार्ग आहे.
२. पहिल्यांदा नाशिकला येणे.
२. नाशिकहून सायखेडा या गावी जाणे. (नाशिक-निफाड-औरंगाबाद रस्त्यावर सायखेडा-चांदोरी ही गोदावरीतिरावरील अल्याडपल्याड गावे आहेत.)
२. सायखेड्याला जमल्यास नाश्टापाणी करावा अन तेथेच नांदूरमध्यमेश्वर येथील रस्ता विचारावा. कारण येथून दोन तिन रस्ते एकत्र येतात. येथून नांदूरमध्यमेश्वर १० किमी आहे.
३. नाशिक - सायखेडा - बॅकवॉटर असलेल्या गावांचे (चापडगाव- करंजगाव) फाटे - म्हाळसाकोरे - धरणाच्या मागून नांदूरमध्यमेश्वर असा योग्य मार्ग आहे.

४. थेट नांदूरमध्यमेश्वर धरणावरही जाता येते किंवा त्याच्या अलीकडून बॅकवॉटर असलेल्या चापडगाव- करंजगाव येथेही जाता येते.

भुमन्यु's picture

19 Dec 2014 - 4:45 pm | भुमन्यु

नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरुन "नायगाव" बस पकडून शेवटच्या थांब्यावर उतरावे. तिथुन सायखेडा जाण्यासठी वडाप मिळेल. ह्या मार्गाने गेल्यास साधारणतः १५ किमी अंतर वाचते. तपोवन ने आल्यास सकाळी १०:०० वाजेची नायगाव बस मिळते.

अति महत्वाचे अवांतरः नायगाव मध्ये चांगली मिसळही मिळते. (सकाळी ११:०० पर्यंत)

कंजूस's picture

19 Dec 2014 - 11:01 am | कंजूस

नाशिकला जाणारे बरेच जण कसारापर्यँत रेल्वेने २ तास +कसारा नाशिक बसने दीड तास लागतो ती बस महामार्ग डेपोत जाते (?)+नाशिक चांदोरी बसने(कोणता डेपो ?) सायखेडा दीड तास +सायखेडा ते धरण शिटाभरून जीपने अर्धा तास लागेल का ?

पाषाणभेद's picture

19 Dec 2014 - 3:26 pm | पाषाणभेद

नाशिकमध्ये ४ वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणच्या बसेस लागतात. हे चारही स्थानके तसे जवळ जवळच आहेत.
मुंबई-रायगड साठी महामार्ग
पुणे-औरंगाबाद-कोल्हापूर-सोलापूर- पश्चिम महाराष्ट्रआदीसाठी, तसेच जळगाव धुळे साठी- नविन सिबीएस
नाशिक तालूका- स्थानिक - ओझर- किंवा सटाणा, नंदूधुळे, अक्कलकुआ आदीसाठी - जुने सिबीएस
त्रंबकेश्वर- ओझर सिटीबस - मेळा बस स्थानक

सायखेड्यासाठी बसेस जुन्या बस स्थानकातून सुटतात पण वारंवारता कमी आहे. नविन सिबीएस मधून औरंगाबाद कडे जाणार्‍ञा बसेस जसे येवला, कोपरगाव, लासलगाव आदीं जास्त प्रमाणात आहेत. त्यात बसून सायखेडा फाट्यावर उतरल्यास वेगाने जाता येईल.
सायखेड्यापासून जिप गाड्या असतात. चांदोरी या गावापासूनही जिप्स नांदूरमध्यमेश्वरला जिप जातात.

स्वतःचे वाहन असल्यास सायखेड्याहून खानगाव-थडी बंधारा जावे.
बसने जात असल्यास चांदोरीला उतरून जिपने खानगाव-थडी बंधारा येथे जावे.

लक्षात घ्या. बॅकवॉटर चे प्रमाण जसे असते त्याप्रमाणे निरीक्षणाचे ठिकाण बदलते. बॅकवॉटरमधील गावे आहेत: धरणापासून लांब ते जवळ या प्रमाणे व एका बाजूच्या किनार्‍यावरील : चापडगाव, मांजरगाव, खानगाव आदी.

या गावातील धरणाच्या बाजूने निरीक्षण मनोरे आहेत.

पाषाणभेद's picture

19 Dec 2014 - 3:29 pm | पाषाणभेद

http://mumbaireadyreckoner.org/2010/12/17th-19th-dec-nandur-madhmeshwar-...

या लिंकमधील पाच क्रमांकाचा फोटो पहावा.

इतके पर्याय दिले आहेत की इकडे जाण्यात काहीच अडचण येणार नाही. दिलेली वेबसाइट अगदी जंक्शन आहे.

पाषाणभेद तुमच्या माहितीने धाग्यात चांगलीच भर पडली.

एस's picture

19 Dec 2014 - 8:21 pm | एस

आणि तितकेच माहितीपूर्ण प्रतिसाद. कधी जमल्यास इकडेही वाट वाकडी केली जाईल. पुण्याहून यायचेही मार्ग सुचवा.

पुण्याहून रस्त्याने -मंचर -संगमनेर -सिन्नर-नाशिक स्टे-नाशिक मार्ग आहे.
केवळ (फक्त )नांदूर साठी इतक्या दूर येण्यापेक्षा
१)शिरडी/गोंदेश्वर +नांदूर
अथवा
२) नांदूर -सायखेडा- निफाड- पिंपळगाव- वणी -सापुतारा
अथवा
३)नांदूर-नाशिक -त्र्यंबकेश्वर-जव्हार-वाडा- कल्याण-पुणे

अशी ट्रीप केल्यास प्रवासात दोनतीन ठिकाणे पाहून होतील
स्वत:चे वाहन असल्यास वेळ वाचेल.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य येथे कदाचित अद्ययावत /नवीन माहिती असावी!

@आयुर्हित साईट पाहिली परंतू जावे कसे हे अशाठिकाणी मोघमच लिहितात. याचमुळे पाषाणभेद यांनी दिलेली उपयुक्त वाटते .निफाड १२ किमी वाचूनच मी गेलो होतो परंतू वाटेत नदी आहे हे कोण लिहिणार?पर्यटनाच्या ठिकाणी सहली नेणारे कधीच माहिती उघड करत नाहीत. फोन केल्यास उडवाउडवी करतात असा अनुभव आहे. स्वत: XXशिवाय स्वर्ग दिसत नाही.

पाषाणभेद's picture

20 Dec 2014 - 6:49 pm | पाषाणभेद

९८२३४० २५५४ हा माझा मोबाईल क्रमांक सेव्ह करून येण्याच्या आधी फोन करा. माझी तुम्हास मदत झाली तर मला आनंदच होईल.

ईन्टरफेल's picture

22 Dec 2014 - 8:40 pm | ईन्टरफेल

आता खुप बदल झालेला आहे ,
मि देखिल जवळच राहतो १.५ कि.मि.गाव आहे , कुनि येनार असेल व्यनि करावा ....