दिप्सचा कर्नाळा भटकंती लेख वाचून तिकडे पुन्हा जावेसे वाटू लागले. विचार केला कोकण रेल्वेने जाताना रसायनी,आपटा स्टेशनच्या पश्र्चिमेस कर्नाळ्याचा सुळका दिसतो तर तिकडून जावे.
१)ठाकरवाडीतला जैतू आणि कर्नाळा
२)
३)पाताळगंगा नदी
४)नदीकाठचे सिध्देश्वर,गुळसुंदा
५)लाल सावरीचे फुल
६)पांढरी सावर कमी आढळते
७)रानफुले
सकाळच्या दिवा सावंतवाडी रेल्वेला फार गर्दी असते म्हणून ९.१०च्या दिवा रोहाने जायचे ठरवले. डोँबिवलीहून लोकलने दिवा स्टेशनला उतरण्यापेक्षा विशाळगडाची खिंड लढवणे सोपे असावे. पुढचा प्रवास छान झाला. बरेच प्रवासी नावड्याला उतरून गेले. चहा, भेळ जागेवरच मिळते त्याचा आस्वाद घेत खिडकीतून गम्मत पाहताना पनवेल कधी ओलांडले ते कळलेच नाही. सोमाटणे स्टेशन आणि जवळची कमळांची तळी पाहून वाटलं इथेच उतरावं आणि बसावं तळ्याकाठी. परंतू अचानक डावीकडे तीस मजली दहा इमारतींचे बांधकाम पाहून छाती दडपून गेली. आणि विचार रहीत केला. रुळाकडची लालचुटुक गणेशवेलींची फुलंमात्र रेल्वेहद्दीत असल्यामुळे सेफ होती. पुढच्या प्रचंड कंटेनर डेपोकडे आणि रसायनीची धुरांडी यांकडे पार दुर्लक्ष केलं. उजवीकडचा लिंगुबाचा डोंगर (कर्नाळा )खुणावत होता.
८)भुताचे झाड याचे नाव मी विसरलो
९)
१०)ओढा
११)राखणदार वनदेवता ?
१२)किल्ला
१३)
१४)दरवाजा
साडेदहाला आपटा स्टेशनला उतरलो.
डावीकडे बाहेर कर्जत-पेण रस्ता आहे. इथून कर्नाळा दिसेचना कारण मध्ये एक डोंगररांग पसरली आहे. प्रथम पुढे आपटा गावाच्या (अडीच किमी) दिशेने चालायला सुरुवात केली कडेने दाट झाडी आहे. पंधराएक मिनिटांनी एक ऑरेंज जाकिटवाला गाववाला भेटला. त्याला विचारले त्याने माहिती दिली. "परत फिरा. गुळसुंदा गावाच्या रेल्वेपलीकडे अकलुडवाडी आहे तिथून वाट आहे हा माझा फोन नंबर घ्या.पटरीतून गेलात तरी चालेल."
परत फिरलो. स्टेशनला जवळचे गाव आहे लाडीवली. नंतर गुळसुंदा .दीड किमी असेल. गावात सुरेख सिध्देश्वराचे देऊळ आहे. तिथे पाताळगंगा नदी आहे. भिरा विद्युतकेंद्राचे पाणी बारा महीने वाहते पण मासे नाहीत. पाण्यात कारखान्यांचे विषारी सांडपाणी आहे. नाहीतर औंदुबर(सांगलीजवळचे दत्ताचे) यापुढे फिके पडले असते. आत भक्तनिवास २०१२ला बांधला आहे .पूर्वी पलीकडच्या कऱ्हाडे गावातली मुलं होडीने गुळसुंद्याच्या शाळेत यायची त्यांच्याबरोबर आम्हीही गेल्याचं आठवलं. देऊळ पाहून रुळापलिकडच्या अकलुडवाडीत आलो तेव्हा बारा वाजले होते. ही दोन्ही गावं टापटिप आणि स्वच्छ आहेत.
अकलुडवाडीतला वळणावळणाचा डांरी रस्ता आणि सुरेख घरं लक्षवेधक आहेत. आता इथून पायवाट आहे. गावात वाटेची चौकशी केलीँ "इकडून किल्याकडे वाट आहे का ?" "हो आहे हा समोरचा टेप आहे तिथे सरळ जा वर ठाकरांची पाचेक घरं आहेत त्यापैकी कोणालातरी बरोबर घ्या कारण इकडून कोणी जात नाही ती ठाकरं जातात फाटीसाठी."
वरच्या ठाकरवाडीत पोहोचलोँ एकाला विचारले "ही बघ वाट याने सरळ किल्याकडे जायचे डावीकडे उजवीकडे फिरू नको मग सापडायचं न्हाय दोनपर्यँत जाशील वर. थांब चा पिऊन जा. मी जाणार आहे फाटीला पण अजून वेळ आहे"
मी चा होईपर्यँत गप्पा मारत बसलो. कोरा चा कपभर आला. बोलताबोलता तोही तयार झाला. "चल मीपण आज लवकर येतो तुझ्याबरोबर." दोन वाजता निघालो. प्रथम एक ओढा लागला. "इथूनच नेतो आम्ही पाणी." फारच स्वच्छ आणि चवदार होते. एका ठिकाणी जैतू(नाव)थांबला. "इथे येतो आम्ही फाटीला आता असाच चढत जा पोचशील." मी त्याला पन्नास रुपये दिले. प्रथम घेईना. "मी फाटीला येणारच होतो पैसं कशाला ?"मग आणखी बराच पुढे बरोबर आला आणि सोडले. तिथून अर्ध्या तासाने देवळापाशीच वर आलो. जैतूमुळे पटकन पोहोचलो.
१५)कोणते पक्षी दिसू शकतात
१६)माहिती केंद्र
१७)पुन्हा येणार ना ?
साडेतीन वाजलेले .किल्ला पाहून नेहमीच्या वाटेने उतरून पनवेलमार्गे बसने पाय न हलवता घरी परतलो.
प्रतिक्रिया
4 Dec 2014 - 11:17 pm | मुक्त विहारि
पुभाप्र...
तुमच्या मोबाईलच्या अडचणीवर मात करून लिहीत आहात, ह्याची कल्पना आहे.
8 Dec 2014 - 11:44 am | कंजूस
१२)गुळसुंद्याच्या शाळेतून कऱ्हाडे गावात परत चाललेली मुले.
हा फोटो बारा वर्षाँपूर्वीचा काढलेला होता त्याचा पुन्हा फोटो एवढा ठीक आलेला नाही.
4 Dec 2014 - 11:26 pm | प्रचेतस
मस्त.
तुमच्या लिखाणात सहजता आहे.
5 Dec 2014 - 2:22 pm | अत्रुप्त आत्मा
+१
5 Dec 2014 - 12:51 am | खटपट्या
मस्त.
फोटोंच्या प्रतीक्षेत.
5 Dec 2014 - 7:38 am | स्पा
सुरेखच वर्णन
कंजुस काकांसोबत एखादा ट्रेक करायची मनापासून इच्छा आहे
5 Dec 2014 - 8:40 am | अजया
सुरेख वर्णन.तेही आमच्या कर्मभूमीतल्या गावांचं. गुळसुंद्याचं मंदिर खरंच सुंदर आहे.दुर्गभ्रमणगाथेत कर्नाळ्याच्या भागात गोनिदांनी त्याचं वर्णन केलंय.नदीच्या काठावरच्या या सर्व गावांना दुषित नदीमुळे पाणी नाही.चार दिवसातुन एकदा!ठाकरं तसंच हिरवं पाणी पितात.त्यावर सुरेखा दळवींनी केलेली चळवळ दबली गेली.असो.
आपटा गावात एक पुरातन पेशवेकालिन गणपती मंदिर आहे.
तुमचं वर्णन वाचुन आजच अाकुळवाडी नाहीतर लाडीवलीच्या एखाद्या पेशंटला सांगुन ट्रेक जमवावासा वाटतोय!ही वाट कशी आहे?अनुभवी नसलेल्या अनाहितांना घेऊन जाण्यासारखी आहे का?
6 Dec 2014 - 10:00 pm | कंजूस
अनाहितांसाठी रसायनी वाट उत्तम असा शोध आज लावला.
आजच रसायनी स्टेशन मार्गे कर्नाळा करून आलो. ही वाट गार सावलीची आहे आणि गुळसुंदाकडून येणाऱ्या वाटेपेक्षा अधिक रम्य आहे [रिटर्न तिकीट रु २० :-).] मला कर्नाळा किल्यापेक्षा अभयारण्याची भटकंती आवडते ती इथे मिळाली.:) पक्षी,फुलपाखरे,कीटक भरपूर आहेत.आता त्याचे बाराएक फोटो याच धाग्यात टाकू का वेगळे टाकू?धागा जड होईल का?
8 Dec 2014 - 2:37 am | मुक्त विहारि
धागा कशाला जड होतोय?
३००-३०० प्रतिसाद असलेला धागा जड होत नाही, मग तुमचा तरी होईल का?
5 Dec 2014 - 8:52 am | नाखु
वर्णन आणि फोटोंची वाट पहात आहे.
5 Dec 2014 - 9:14 am | कंजूस
@अजया,मी रसायनीकडूनचीही वाट पाहून येतो आणि नंतर योग्य वाटेने तुमच्या सोयीच्या दिवशी येईन. कर्नाळा गेटकडून रविवारी बाजारचे स्वरूप येते असे कळले.
पुढीलपैकी एक मार्ग तुमच्या रसायनीकडून जात असावा:-
१)पनवेल -आपटा बस रसायनी रे स्टे वरून पुढे जाते . २)जांभिवली बस कोन-रसायनी फाटा -गेस्ट हॉउस पोस्ट ऑफिस सिध्देश्वर-चांदवली-जांभिवली जाते. इथे धरण आणि रम्य जागा आहे. ३)सवणे बस सावळामार्गे जाते. ४)कर्जत पेण बस दांड फाटा -रसायनी फाटा/गाव -रे स्टे -आपटा -आपटा फाटा-गोवा रस्ता पेण जाते. यातली कोणतीतरी कामाची आहे.
जांभिवली हे ठिकाण वनभोजनासाठी उत्तम जागा आहे मागे माणिकगड आणि धरणाची भिंत आहे.
@स्पा,कधी सांगशील तेव्हा येतो.
5 Dec 2014 - 9:43 am | अजया
जांभिवलीला सत्यनारायण घालता येईल.सर्वच मार्ग रसायनीवरुन.दांडफाटामार्ग मोहोपाड्यावरून.जास्त कामाचा.
आणि हो,सोमाटण्याचं कमळाचं तळं बघुन ठेवाच.एअरपोर्टच्यामुळे हे सर्व डोंगरासकट विकले गेलेले आहे.त्या मोठ्या बिल्डिंग्ज इंडियाबुल्सच्या.त्यानी बरीचशी जागा ठाकरांना पाजुन अल्प किमतीत मिळवली आहे.आणि एअरपोर्टचे काम चालु होताच ते एक्सपांशनच्या नावाने बाकीचा हिरवागार भाग पण गिळंकृत करणार आहेत.अशीच कमळांनी फुललेली तळी पूर्वि पनवेलला होती.त्याचं आता नामोनिशाण नाही.इथेही तेच चालले आहे.
5 Dec 2014 - 11:11 am | कंजूस
कॉलिंग स्पा ते कमळांचे फोटो काढच लवकर पोकलेन आणि जेसिबि पोहोचायच्या अगोदर.
विमानतळ आणि विमाने आली की लिंगुबाच्या डोंगरावरचा झेंडा थटू नये म्हणून लालबत्ती लागणार!
ता॰क॰ मला सत्यनारायणाचा शिरा (चुकलो ,प्रसाद )बशीभर लागतो.
5 Dec 2014 - 11:27 am | स्पा
काका आता हरिश्चंद्र ला जाऊयात, पाचनई वाटेने
5 Dec 2014 - 11:58 am | दिप्स
छान.मस्त वर्णन. फोटोंच्या प्रतीक्षेत.
आम्ही ह्या भागात नवीन, त्यामुळे सोप्या मार्गाने गेलो होतो.
उद्या राजमाचीला चाललोय नाईट ट्रेकिंगला.
जाणकारांनी काही उपयुक्त माहिती दिली तर बर होईल.
5 Dec 2014 - 3:34 pm | कंजूस
@स्पा येतो.
@दिप्स मीपण सोप्या वाटेनेच जातो. दोर लावून वगैरे नाही .आता जरा वेगळ्या वाटेने जातो इतकेच.राजमाचीचा कोंदिवडेकडूनचा माझा लेख आहेच तुमचा रात्रीचा ट्रेक लोणावळाकडून असावा.
5 Dec 2014 - 5:56 pm | मॅक
मस्त.......
5 Dec 2014 - 6:25 pm | प्रचेतस
सुरेख फोटो काका.
ती राखणादार वनदेवता नसून महिषासुरमर्दिनी आहे. एका हातात चक्र, दुसर्या हातात गदा किंवा खट्वांग, तिसर्या हाताने महिषाला दाबून धरून चौथ्या हातातला त्रिशूळ खुपसला आहे.
मूर्ती बहुधा शिवकालीन असल्याने साधीशीच आहे.
5 Dec 2014 - 7:04 pm | कंजूस
१८)देऊळ,गुळसुंदा
१९)भक्तनिवास,गुळसुंदा
२०)रानफळे
२१)वनदेवता /स्थानदेवता? गडावरचे देऊळातली मूर्ती आणि या देवळाबाहेर ती वरची मूर्ती आहे
वल्ली धन्यवाद.
5 Dec 2014 - 11:03 pm | एस
मस्त फोटो!
कर्नाळा करण्याची खूप इच्छा आहे तिथल्या पक्ष्यांसाठी. पाहूयात.
5 Dec 2014 - 11:17 pm | विनोद१८
.पुन्हा जायचे का, सांगा किंवा ठरवा ??
6 Dec 2014 - 5:05 am | मुक्त विहारि
१००%
6 Dec 2014 - 4:26 am | कंजूस
विनोद ,जाऊ .सर्वांना घेऊन जाता येईल असा आटोपशीर प्लान काढतोँ हॉटेल कर्नाळा (जिथे मिलिंद गुणाजी आणि मान्यवर येतात आणि सह्या आहेत)मध्ये कांदा भजी चांगली मिळतात.
7 Dec 2014 - 11:46 am | दिपक.कुवेत
आणि टाका ईथे जळवणारे फोटो/वर्णन...
7 Dec 2014 - 5:08 pm | मदनबाण
वा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- RJ Dhvanit on Guitar Guruwar Ahmedabad with Aishwarya Majmudar { Cool Video,Must Watch }
8 Dec 2014 - 11:59 am | आतिवास
वर्णन आणि फोटो आवडले.
19 Dec 2014 - 12:00 am | हुकुमीएक्का
फोटो व माहिती दोन्ही आवडले. फोटोंमधील क्र. १२ आणि १४ नंबरचा फोटो विशेष आवडला. कर्नाळा ट्रिप लवकरच करायचा विचार आहे तेव्हा नक्कीच व्यनि करेन तुम्हाला. तुमच्या अनुभवाचा नक्कीच उपयोग होईल. *smile*
19 Dec 2014 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा
राखणदार वनदेवता..
आणि ते भुताचं झाड वाटत नाही,झाडावरच एखाद भूत-बसलय की काय? ;) असं वाटतं!