मी प्रथमच क्रेडीट कार्ड घेत आहे तरी नविन क्रेडिट कार्ड घेताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून पुढील मनस्ताप टाळता येईल… आपण सगळेच वर्तमान पत्रात क्रेडीट कार्ड विषयी घडामोडी वाचत असतोच…क़ाय काळजी घेता येईल…मि पा करांच्या ह्याविषयी काय अनुभव आहेत जे ह्या धाग्यात उधृत करता येतील … माझा प्रश्न आहे कि बँकेच्या अवास्तव भूल थापाना कसं रोखता येईल त्याविषयी काही R.B.I. चे कायदे कानू आहेत काय? ह्यासंदर्भात कोणी माहिती देवू शकेल काय … क्रेडीट कार्ड विषयी चांगले आणि वाईट अनुभव…जेनेकरुन समाज प्रबोधन होईल आणि अपप्रवृत्तिना आळा बसेल…. बँक ज्या ग्राहकांना सुविधा देऊ करतात (hidden offers) उदा. आजीवन सभासदत्वात सुट (LIFE TIME FREE) किंवा गेला बाजार चित्रपटांची तिकीटे सवलतीत मिळतील… ह्या स्वरूपातील आश्वासने (खरी/ खोटी? ) ही लेखी स्वरुपात किवा email स्वरुपात ग्राहकांना देणे कायदेशीर रित्या बँकांना बंधनकारक आहे कि कस्से… ग्राहकांचे हित जपणारे कोणते कायदे कानू कोणास अवगत असतील तर येथे त्याच्या विषयी चर्चा (विधायक ) अपेक्षित आहे … म्हणजे सामान्य क्रेडीट कार्ड धारकाला आपल्या हक्कांची ओळख होईल। आणि जागरूकता वाढेल ह्या विषयी हा पत्र प्रपंच… सूज्ञ मि.पा. कर त्यांचा ज्ञानाचा उपयोग इतरांस अवगत करतील हीच अपेक्षा बाळगतो आणि जास्तीत जास्त माहिती पुरवावी हिच मि.पा. कराना नम्र विनंती…लोभ असावा … इति लेखनसीमा…
प्रतिक्रिया
29 Nov 2014 - 5:56 pm | तुषार काळभोर
नायतर व्याज (महिना ३-४% !!!) + दंड(५०० ते कितीपण) + सिबील रिपोर्टमध्ये नोंद (नंतर कर्ज मिळायला अडचणी)
बाकी ऑनलाईन फसवणुक, हॅकींग, इ. साठी कॉमन सेन्स!!
29 Nov 2014 - 6:12 pm | कंजूस
मनस्ताप नको म्हणून SBI डेबीट /एटीम वर समाधानी आहे आणि त्या अकाउंटात थोडेच पैसे ठेवतो.
29 Nov 2014 - 6:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
बेस्ट उपाय. अगदी नाकाशी येईपर्यंत क्रेडीट कार्ड वापरुचं नये. वस्तु घ्यायच्या असतील तर प्लॅनिंग करुन घ्याव्या (रिकरींग, फिक्स्ड डिपॉसिट्स वगैरे त्या वस्तुसाठी करुन). वेळ आणि पेशन्स लागेलं ती वस्तु मिळायला पण नंतर त्रास होणार नाही. आणि वापरलचं तर पुढची सेटलमेंट मुदतीच्या आत नं विसरता करावी.
30 Nov 2014 - 12:40 am | खटपट्या
सहमत !!
30 Nov 2014 - 2:21 am | मुक्त विहारि
कारण आमच्या बाबांनी तसे आम्हाला बरेच गुरुमंत्र दिले आहेत.
"खिशात जितके रुपये असतील त्याच्या पेक्षा जास्त खर्च करायचा नाही."
त्यामुळे क्रेडीट जरी असले तरी,(आमचा किराणा सामानवाला १५/२० दिवस थांबायला तयार असतो.) क्रेडीट कार्ड घेण्याची कधी गरज भासली नाही.
30 Nov 2014 - 12:56 pm | क्लिंटन
तरीही क्रेडिट कार्ड असावे.याचे कारण भविष्यात कधी कर्ज काढावे लागले (होम लोन इत्यादी) तर बँका पहिल्यांदा सिबिलचा क्रेडिट स्कोअर बघतात.चांगला सिबिल स्कोअर नसेल तर बँका कर्ज देत नाहीत. इतकेच काय तर मागच्या वर्षी मी नोकरी बदलली त्यावेळी ऑफर लेटर देण्यापूर्वी माझा सिबिल स्कोअर नव्या कंपनीने चेक केला होता.सिबिल स्कोअर वाढविण्यासाठी क्रेडिट कार्ड बाळगून वेळच्या वेळी बिले भरणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे.
(गेली १२ वर्षे क्रेडिट कार्ड बाळगणारा आणि सगळी बिले वेळच्या वेळी भरणारा) क्लिंटन
1 Dec 2014 - 4:05 pm | रघुपती.राज
आपण चान्गला मुद्दा मान्ड्ला आहे
30 Nov 2014 - 8:22 am | नितिन थत्ते
१. अॅन्युअल फी माफ आहे असे बँक सांगेल. (खाली तीन पॉइंट टायपात- जर वर्षाला दोन लाख रुपये खर्च केला तर...... असं छापलेलं असेल).
२. दोनाहून जास्त कार्डे घेऊ नका. काही गरज नसते.
३. दोन कार्डे असली तरी खर्च एकाच कार्डावरून करा. कार्डावर खर्च झाला की एसेमेस येईल अशी व्यवस्था करा.
सर्वात महत्त्वाचे: मुक्तविहारी यांनी म्हटल्याप्रमाणे क्रेडिट कार्ड असले तरी आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेतच खर्च करा.
क्रेडिट कार्डावर कॅश विथड्रॉअल कधीही करू नका. प्रत्येक कॅश ट्रान्झॅक्शनवर ३००-४०० रु ट्रान्झॅक्शन फी + ३००-४०० रु कॅश विथड्रॉअल फी लावली जाईल.
30 Nov 2014 - 10:09 am | सुनील
क्रमांक १ शी सहमत. अॅन्युअल फी खरोखरच माफ असलेली कार्डे असतात, मात्र ते नीट तपासून पहायला हवे.
क्रमांक २ आणि ३ शी किंचित असहमत.
नेहेमी दोन कार्डे घ्या(च). दोहोंच्या बिलिंग सायकलमध्ये साधारणपणे १५ दिवसांचे अंतर राहील हे पहा. (बिलिंग सायकल बदलून मिळते). दोन्ही कार्डे त्यांच्या त्यांच्या बिलिंग सायकलच्या पहिले पंधरा दिवसच वापरा. आणि अधिक काळ क्रेडिट मिळवा.
प्रत्येक व्यवहारांनतर SMS मिळेल अशी व्यवस्था तर कराच. खेरीज, दररोज एकदा नेटवरून कार्डाची खबरबात बघत चला.
शेवटी क्रेडिट कार्ड हे एक उपयुक्त हत्यार आहे. नेटकेपणे वापरलेत तर, फायदा आहेच. वेंधळेपणा केलात तर खूप नुकसान. पण वापरायचेच नाही, हा निव्वळ करंटेपणा!!
30 Nov 2014 - 11:15 am | मुक्त विहारि
असेल...
तसेही असेल...
पण गेल्या ३० वर्षांत कमवायला लागल्या पासून, कधीच गरज भासली नाही.पाकीटातल्या आजच्या पैशाचा अंदाज आणि पुढील महिन्याभराचा अंदाज घेवूनच खर्च केल्या जातो, तर तो करंटेपणा कसला?
अर्थात तुम्ही जर काटकसरीपणाला करंटेपणा म्हणत असाल तर गोष्टच वेगळी.
मुळात क्रेडीट-कार्ड लागतेच कशाला? त्याच्या वाचून अद्याप तरी माझे काही अडले नाही आणि पुढेही अडेल असे वाटत पण नाही.
तशा माझ्या गरजाच कमी असल्याने मला वैयक्तिक खर्चच फार कमी.४ शर्ट आणि ४ पँट वर २/३ वर्षे सहज निघतात आणि तसेही कंपनीचा ड्रेस असतोच मग अज्जुन कशाला कपडे हवेत्?बरे माझा व्यवसाय पण असा नाही, की ड्रेसमुळे माझे व्यक्तिमत्व उठावदार होईल.
१. रोजची खरेदी रोखीतच केल्या जाते.त्याला कार्ड लागत नाही.भारतातली ९०% जनता अद्याप क्रेडीट कार्ड वापरत नाही, असा अंदाज आहे.मग हे सगळेच करंटे का?
२. अद्याप तरी माझ्या दारापाशी कुणीही धनको उभा राहिलेला नाही.मग तो बँकेच्या स्वरूपात असो किंवा किराणामाल दुकानदाराच्या स्वरूपात असो.आमचा किराणादुकानदार थांबतो, कारण आमच्या शब्दाची किंमत त्याला माहीत आहे आणि अशी वेळ पण ३/४ वर्षांतुन एकदाच येते.आता तर पुढील आयुष्यात ते पण होणार नाही.
आमचे बाबा अज्जुन एक सांगतात.
जो करी रोख व्यवहार, त्याचे मुल्य अपार.
30 Nov 2014 - 11:51 am | सुनील
असेलही.
(आमचे बाबा काहीही म्हणोत) पण आम्ही म्हणतो -
रोखीचा व्यवहार,
लावी काळ्या पैशाला हातभार!
(रोखीचे व्यवहार शक्यतो टाळणारा) सुनील
30 Nov 2014 - 12:23 pm | मुक्त विहारि
कदाचित तुमचा, भाजीवाला, फळवाला, चहावाला आणि दूधवाला क्रेडीटने पैसे घेत पण असेल आणि पेपरवाला तर नक्कीच.शिवाय आजकाल वडापावच्या गाड्या तर सोडाच पण चपला शिवणारे पण क्रेडीट कार्डानेच व्यवहार करतात असे ऐकिवात आहे.परवाच कुठेतरी वाचले की, पानवाले आणि फेरीवाले पण क्रेडीट कार्डा द्वारेच पैसे स्वीकारणार असे.भिकार्यांसाठी पण असाच कायदा करतील नाही?(शिवाय टी.व्ही. दुरुस्त करणारा पण का? हे पण विचारणार होतो, पण लक्षांत आले, तुम्ही टी.व्ही. नादुरुस्त झाला तर लगेच क्रेडीट कार्डाने दुसरा टी.व्ही.पण आणत असाल.)
बादवे,
तुम्ही जी रद्दी विकता तो रद्दीवाला पण तुम्हाला क्रेडीट कार्डानेच पैसे देत असेल नाही?आणि तुमचा किराणी दुकानदार पण रोखीनेच व्यवहार करतो? की तुम्ही त्याला पण क्रेडीट कार्डा द्वारेच पैसे देता?जर तुम्ही अंडी-मटण आणि मासे खात असाल तर, त्यांना पण तुम्ही क्रेडीटकार्डानेच पैसे देता का?
30 Nov 2014 - 1:04 pm | सुनील
माझ्या "शक्यतो टाळणार्या" ह्या शब्दांना, शक्यतो टाळलेले दिसते आहे! ;)
असो. अद्याप काटेखोर हिशोब काढलेला नाही, तरीही माझा जवळपास ९०% खर्च हा प्लास्टिक मनीद्वारे होतो.
(१००% खर्च प्लास्टिक मनीद्वारे होण्याचे 'अच्छे दिन' यायची वाट पाहणारा) सुनील
30 Nov 2014 - 1:31 pm | सस्नेह
जौ द्या हो मुवि, जमाना बदललाय आता !
30 Nov 2014 - 8:52 pm | मुक्त विहारि
जमाना बदलला आहे...
पण म्हणून ज्यांना एखाद्या सुविधेचा फायदा घ्यायचा नसेल, किंवा त्या सुविधेवाचून त्यांचे काही अडत नसेल तर त्यांना करंटे म्हणू नये, इतके तरी मला नक्कीच समजते.
माझ्या घरातील वडीलधारे अद्य्यप मोबाईल वापरत नाहीत.कारण त्यांच्यावाचून त्यांचे काहीच अडत नाही, म्हणून त्यांना 'करंटे" म्हणायचे का?
@ सुनील....
तुम्हीच बघाना, किती ठिकाणी तुम्हाला रोख पैसे द्यायला लागतात?
जर मी वर उल्लेख केलेल्या व्यक्तींना तुम्ही रोख पैसे देत असाल तर बाकी ठिकाणी आम्हाला बिल (हो, पक्के बिल) मिळतेच.नाही तरी वस्तू विकत घेणारच आहोत, मग रोख पैसे दिले तर काय बिघडले?
माझ्या हिशोबाप्रमाणे माझ्या घरातील ७५ ते ८०% व्यवहार मला कितीही प्रयत्न केला तरी रोखच करावे लागतात.साधी मोटर-साय़कल मध्ये हवा भरायची किंवा पंक्चर काढायचे असेल तरी व्यवहार रोखीतच होतो.
30 Nov 2014 - 9:06 pm | सतिश गावडे
मुवि तुम्ही जिंकलात. आता आम्हाला पार्टी हवी. सुनील काकांनाही बोलावू पार्टीला :)
30 Nov 2014 - 10:53 pm | मुक्त विहारि
सुनील बरोबर ह्या आधी पण कट्टा झाला आहे.माध्यम वेगळे होते.(आणि म्हणूनच त्यांच्या बरोबर मुद्द्यावरून वाद घालत आहे.ते आणि मी व्यक्तीगत कधीच घेत न्हवतो. आज पण नाही आणि उद्यापण नाही.)
आता तुमच्याबरोबर कधी कट्टा करायचा ते सांगा.
30 Nov 2014 - 11:25 pm | खटपट्या
यावरून आठवले. क्रुपया खालील लिन्क १:१० पासुन पुढे पहा. (कॄ. ह. घे.)
https://www.youtube.com/watch?v=QqheJvWOZC4
1 Dec 2014 - 12:47 am | मुक्त विहारि
भारी आहे...
1 Dec 2014 - 8:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
यकदम् फॅन्तॅखतॅख हाय !
1 Dec 2014 - 10:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
५००% सहमत.
1 Dec 2014 - 1:00 pm | गजानन५९
डोका लावून वापरल तर क्रेडीट कार्डासारखी भारी सोय कुठली नसेल.
असो ज्याचा त्याचा आणुभव बाकी कायबी नायी
1 Dec 2014 - 2:04 pm | समीरसूर
क्रेडिट कार्डची खरोखर गरज असते का? माझ्याकडे कुठलेच क्रेडिट कार्ड नाही. २००५ मध्ये एक होते (एचएसबीसीचे). मी कधीच वापरले नाही. एकदा त्यांचे तीनशे की पाचशे रुपयांचे बिल आले. मी विचारले की हे बिल कसले. त्यांनी काहीतरी थातूर-मातूर चार्जेस सांगीतले. मी म्हटलं मी नाही भरणार आणि तुमचं कार्ड मी कधीच वापरलेलं नाही; तुम्हाला वाटत असेल तर रद्द करा; मला नकोय. त्यांनी त्यानंतर कार्ड सहा महिने ठेवलं. शेवटी कंटाळून त्यांनीच रद्द केलं. अजून तरी क्रेडिट कार्डाशिवाय माझं काहीही अडलेलं नाही. सगळीकडे माझं डेबीट कार्ड चालतं.
क्रेडिट कार्डावर दिल्या जाणार्या इतके टक्के सूट, तिकिटे मोफत वगैरे ऑफर्स खरोखर फायद्याच्या असतात का? की काहीतरी मोफत आहे म्हणून तुम्ही तुमचं कार्ड स्वाईप करत सुटावं असा ट्रॅप असतो? एनीवे, मी कधी फुकट, सूट वगैरे भूलथापांना बळी पडत नाही त्यामुळे प्रश्नच येत नाही. जेव्हा गरज असेल ते आणि फक्त तेच घ्यावं हे तत्व सोयीचं वाटतं.
कर्ज मिळवण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरावं हे काही पटत नाही. मी आतापर्यंत जी कर्जे घेतली ती क्रेडिट कार्डाशिवायच घेतली. अर्थात याला दुसरी बाजू असू शकते. ती बहुतेक मला माहित नसावी. त्याबद्दल क्षमस्व!
क्रेडिट कार्ड हे लोकांनी जास्तीत जास्त खर्च करावा म्हणून उदयाला आलेलं एक चक्रव्यूह आहे. चार-पाच क्रेडिट कार्डे बाळगून बिले भरण्यासाठी कसरत करणारी माणसे माझ्या पाहण्यात आहेत. क्रेडिट कार्ड घ्यायचं आणि त्यावर मग निरर्थक खरेदी करत सुटायचं. मग त्याची बिलं भरण्यासाठी दुसर्या क्रेडिट कार्डातून कॅश काढायची असं ते चक्रव्यूह आहे. अगदी सांभाळून खर्च करण्याची सवय असेल तर एक क्रेडिट कार्ड पुरेसं असावं असं वाटतं. खरं म्हणजे त्याचीदेखील गरज नाहीच. डेबीट कार्ड पुरेसं आहे. खिशात नसलेला पैसा खर्च करण्यात काय पॉईंट आहे? आणि तो ही मोबाईल, टीव्ही, एसी, वगैरे सारख्या चैनीच्या वस्तूंवर?
माझा सल्ला: अगदीच गरज असेल तरच आणि तरच क्रेडिट कार्ड घ्या. काहीतरी फुकट मिळतेय (सिनेमाची तिकिटे, गोवा ट्रिप, वगैरे) म्हणून क्रेडिट कार्ड घेऊ नका. तुम्हाला अशी सवय लावून तुमच्याकडून खर्च करवून घेण्याचं हे तंत्र आहे. आणि सगळे हिशेब नीट करून प्रत्येक ऑफरमधून नेमका आपला फायदा शोधून काढून आपल्याला भूर्दंड न पडता त्याचा लाभ घेता येण्याचे कसब असेल तरच क्रेडिट कार्ड घ्या. हे करण्यासाठी दिवसभराच्या या धबडग्यात वेळ आणि ऊर्जा खर्ची घालावी लागते. याची तयारी असेल आणि कार्डावर खर्चाच्या बाबतीत काटेकोर शिस्तपालन करू शकणार असाल तरच क्रेडिट कार्ड घ्या.
अर्थात प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतोच. आपल्याला काय योग्य वाटते यावर निर्णय घेणे चांगले. :-)
1 Dec 2014 - 5:49 pm | क्लिंटन
२००५ मध्ये सिबील स्कोअररेकॉर्ड कसा ठेवला जात होता याची कल्पना नाही. पण सध्याच्या काळात क्रेडिट कार्डावर आलेले असे कोणतेही चार्जेस भरले नाहीत तर संबंधित बँका सिबीलला त्याची माहिती देतात.अशातून "विलफुल डिफॉल्टर" हा शिक्का विनाकारण बसून आपला स्कोअर खराब व्हायची शक्यता असते. कदाचित २००५ मध्ये ही पध्दती तितक्या प्रमाणावर फुलप्रूफ नसावी. सध्याच्या काळात असल्या भानगडीत न पडलेले बरे. जर विनाकारण चुकीचे चार्जेस लावले गेले आहेत असे आपले म्हणणे असेल तर रिझर्व्ह बँकेच्या ओंबुड्समनकडे तक्रार करता येईलच.पण असे चार्जेस अजिबात न भरणे आपल्यासाठीच धोक्याचे होऊ शकते.
हे आपल्याला पटून-न पटून काहीच फरक पडत नाही. आज कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यापूर्वी बँका सिबील स्कोअर बघतातच.मी अलिकडेच या अनुभवातून गेलो आहे.मी कर्जासाठी किमान चार बँकांमध्ये चौकशी केली.सगळीकडे सिबील स्कोअर बघणारच असेच मला सांगितले गेले होते.कदाचित तुम्ही कर्ज काढले असेल त्यावेळी सिबील स्कोअरचे महत्व तितके नसेल पण आता नक्कीच आहे.तेव्हा आपला स्कोअर बिघडेल असे काहीही न केलेले श्रेयस्कर.
1 Dec 2014 - 6:17 pm | प्रसाद१९७१
@क्लिंटन - तुमच्या प्रतिसादावरुन असे वाटते आहे की क्रेडीट कार्ड असले की कर्ज मिळायला मदत होते. सिबील चा स्कोर क्रेडीट कार्ड नसले तरी चांगलाच येतो. क्रेडीट कार्ड आहे आणि तुम्ही पेमेंट वेळेवर करत आहात ह्यानी तुमचा स्कोर क्रेडीट कार्ड नसणार्या पेक्षा ( पण बाकी सर्व समान असणार्या ) पेक्षा जास्त येत नाही.
ज्याने क्रेडीट ( कर्ज ) घेतलेच नाही, तर त्याने ते फेडायचा प्रश्न च येत नाही.
सिबिल स्कोर चे हल्ली महत्व आहे पण क्रेडीट कार्ड आहे म्ह्णुन स्कोर वाढत नाही.
1 Dec 2014 - 6:40 pm | क्लिंटन
सिबीलचा स्कोअर कुठले तरी कर्ज वेळेत फेडायचा रेकॉर्ड चांगला असेल तर चांगला होतो. त्यासाठी क्रेडिट कार्डच असले पाहिजे असे नाही हे बरोबर आहे. पण क्रेडिट कार्ड असेल आणि बिले वेळेत भरून रेकॉर्ड चांगला ठेवला तर त्यामुळे सिबिल स्कोअर वाढतो हे नक्की.
हो बरोबर. म्हणूनच ज्यांच्या नावावर कुठलेच कर्ज/क्रेडिट कार्ड नसेल त्यांचा क्रेडिट स्कोअर ऋण १ असतो. मी अगदी अलीकडेच कर्जाला अर्ज केला आहे म्हणून हे अधिकारवाणीने सांगू शकतो.कर्जासाठी मी आणि हिलरी जॉईंट अॅप्लिकन्ट्स होतो.हिलरीच्या नावावर यापूर्वी कुठलेच क्रेडिट कार्ड किंवा कर्ज नव्हते.त्यामुळे तिचा क्रेडिट स्कोअर ऋण १ आला होता.कर्जाची परतफेट करायचा अजिबात रेकॉर्ड नसेल तर बँका गृहकर्जासारखे मोठे कर्ज देत नाहीत. गृहकर्जासाठी किमान ७०० स्कोअर हवा असे माझ्याच रिलेशनशीप मॅनेजरने मला सांगितले.लहान रकमेचे कर्ज कदाचित बँका कमी स्कोअर असूनही किंवा अगदी ऋण १ स्कोअर असूनही देतही असाव्यात. माझा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यामुळे कर्ज मिळायला अडचण आली नाही.आता कर्जाचे हप्ते जसे भरले जात आहेत त्याप्रमाणे त्याचा माझ्या आणि हिलरीच्याही क्रेडिट स्कोअरवर होईल.आणि माझा क्रेडिट स्कोअर कसा चांगला आला? २००८ पासून भारतात माझ्या नावावर क्रेडिट कार्ड आहे आणि त्याची बिले वेळच्या वेळी भरली आहेत. तसेच २०११ पासून शिक्षणकर्जाची परतफेड केली आणि त्यामुळेही माझा रेकॉर्ड चांगला झाला.
तेव्हा नुसते क्रेडिट कार्ड आहे म्हणून स्कोअर वाढत नाही हे बरोबर आहे.पण क्रेडिट कार्डाची बिले वेळेत भरल्यामुळे स्कोअर वाढतो हे स्वानुभवावरून सांगतो.
3 Dec 2014 - 12:19 pm | प्रसाद१९७१
हे फार चुकीचे आहे. :-( कमीत कमी क्रेडीट कार्ड असणार्या इतका स्कोर तरी द्यायलाच हवा होता.
@क्लिंटन - तुम्ही माहीतगार आहात म्हणुन अजुन एक प्रश्न.
मी गृहकर्ज २००५ ला घेतले आणि २००८ ला सगळे फेडुन टाकले. तेंव्हा सिबील नव्हते, तर माझ्या ह्या कर्जफेडीच्या चांगल्या वर्तनाची सिबिल कडे नोंद असेल का?
4 Dec 2014 - 11:59 am | समीरसूर
क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरणे हा सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठीच्या अनेक पर्यांयांपैकी एक पर्याय आहे. तो एकमेव पर्याय नाही. कर्जाचे (गृह, वाहन, शैक्षणिक, वैयक्तिक, व्यावसायिक) हप्ते वेळेवर भरणे, वेळेआधी अटींचे पालन करून कर्ज फेडणे, विमा पॉलीसीचे हप्ते वेळेवर भरणे, इतर गुंतवणूकीमध्ये सगळ्या अटींचे पालन करणे, नियमितपणे भरलेला योग्य तो आयकर, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामध्ये केलेली गुंतवणूक, एफडींवर मिळणार्या व्याजावर इमानाने भरलेला कर, इत्यादी सगळ्या बाबींचा सिबिल स्कोअरवर सकारात्मक परिणाम होत असावा असे वाटते.
4 Dec 2014 - 12:09 pm | सुनील
नाही.
सिबिल फक्त क्रेडिट (कर्ज) इतिहास बघते. त्यामुळे विमा, पीपीएफ, एफडी, आयकर इत्यादी गोष्टी त्याच्या कक्षेत येत नाहीत.
सिबिल स्कोअर हा बाजारातील तुमची पत (घेतलेली कर्जे फेडण्याची क्षमता/सवय) दर्शवतो.
बाकी तज्ञ सांगतीलच.
4 Dec 2014 - 2:12 pm | समीरसूर
धन्यवाद, सुनील. फक्त कर्ज आणि क्रेडीटचा व्यवहार सिबिलसाठी ग्राह्य धरण्यात येतो ही माहिती बरोबर आहे. माझा थोडा गोंधळ झाला.
ही माहिती सिबिलला प्रत्येक महिन्याला बँकांनी पाठवणे अपेक्षित असते असे सिबिलच्या संकेतस्थळावर लिहिले आहे. त्यामुळे एखादे कर्ज फेडले असेल तरी ती माहिती सिबिलने ग्राह्य धरली असेलच असे नाही. त्यासाठी ते संबंधित बँकेकडे डिस्प्युट दाखल करण्याचा सल्ला देतात. असेच क्रेडिट कार्डच्या व्यवहारांच्या बाबतीत देखील होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये सिबिल स्कोअर कितपत विश्वासार्ह आहे? सगळ्या संस्था (राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, वगैरे) सिबिलला कर्जविषयक आणि क्रेडिट कार्ड विषयक माहिती (ग्राहकांच्या व्यवहारांच्या संदर्भात) दर महिन्याला कळवते का? ही प्रक्रिया पारदर्शकपणे आणि शिस्तबद्ध रीतीने होत असते का? सहकारी बँका, खाजगी बँका, खाजगी गृहकर्ज संस्था (डीएचएफएल, एलआयसीएचएफएल), शेड्युल्ड बँका, या संस्था सिबिल स्कोअर बघतात का? या संस्था कर्जाविषयीची माहिती नियमितपणे सिबिलला कळवतात का? की या संस्थांकडून घेतलेले कर्ज सिबिलच्या अखत्यारीत येत नाही? किंवा हे कर्ज सिबिल स्कोअरसाठी ग्राह्य धरण्यात येत नाही?
4 Dec 2014 - 2:31 pm | क्लिंटन
भारतात सिबील नक्की कधी आले हे माहित नाही पण २००८ मध्ये नक्कीच होते. कारण माझ्याच क्रेडिट रिपोर्टमध्ये २००८ मध्ये मी अर्ज केलेल्या क्रेडिट कार्डासाठीची एन्क्वायरी आहे :) तेव्हा २००८ मध्ये कर्ज परत केले असेल तर त्या चांगल्या वर्तनाची नोंद असायला हवी.
2 Dec 2014 - 9:10 am | समीरसूर
२००५ मध्ये बहुधा सिबिल वगैरे काही नव्हते. मी अजून एक कर्ज २००९ मध्ये घेतले होते. त्यावेळेसची परिस्थिती माहित नाही. पण त्यावेळेसही मला सिबिल वगैरे काही विचारले नव्हते. सिबिल स्कोअर चांगला असल्याने नेमके काय होते? कर्ज लगेच मिळते की कर्जाची मर्यादा वाढते की कर्ज मिळणे सोपे होते? सिबिल स्कोअर चांगला असल्याने कर्जासंबंधी नेमका काय फायदा होतो? अर्थात त्यासंदर्भात खूप जबरदस्त फायदे असतील आणि कर्ज घेणे अतिआवश्यक असेल तर क्रेडिट कार्ड घेणे व नियमित वापरणे कदाचित सयुक्तिक असू शकेल. शेवटी निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे. :-)
वैयक्तिकरीत्या मला क्रेडिट कार्ड ही संकल्पना फारशी झेपत नाही म्हणून शक्य असेल तोपर्यंत मी क्रेडिट कार्ड घेणार नाही असे ठरवले आहे. :-) बघू संकल्प कधीपर्यंत टिकतोय ते. :-)
2 Dec 2014 - 10:37 am | क्लिंटन
आपण बँकेत कर्ज काढायला जातो तेव्हा 'तुझा सिबील स्कोअर किती रे' असे बँकेतला माणूस आपल्याला विचारत नाही.तर डायरेक्ट सिबीलकडून आपला क्रेडिट रिपोर्ट मागवला जातो आणि आपला स्कोअर किती ते बघितले जाते.जर तो आकडा बँकेला पाहिजे त्यापेक्षा कमी असेल तर बँक कर्ज देत नाही. मी पण २००९ मध्येच कर्ज काढले होते.त्यावेळी बँकेने माझा सिबील रिपोर्ट मागवला होता-- आणि मला ते कसे कळले? तर २०१२ मध्ये मी माझाच सिबील स्कोअर किती हे कुतुहल वाटल्यामुळे पैसे भरून तो रिपोर्ट मागविला होता.हा रिपोर्ट ४५०-५०० रूपये भरून ऑनलाईन मिळतो.त्यात आपल्या रिपोर्टसाठी किती एन्क्वायरीज आल्या आहेत त्याची यादी असते.त्यात २००९ मध्ये त्याच बँकेची तितक्याच रकमेच्या कर्जासाठीची एन्क्वायरी होती. हा अनुभव असल्यामुळे आणि मी मुळातला बँकरच असल्यामुळे (जरी रिटेल बँकिंगमध्ये नसलो तरी) साधारण पध्दत कशी असते याची थोडीफार कल्पना मला होती.म्हणून आताच्या कर्जाच्या वेळी मी रिलेशनशीप बँकरला सिबील स्कोअरविषयी मुद्दामून विचारले.ते मी विचारले नसते तर कदाचित त्याने मला ते स्वतःहून सांगितले असतेच असेही नाही.
तुमच्या केसमध्ये मुळातल्या कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी फेडल्याचा रेकॉर्ड असल्यामुळे सिबिल स्कोअर चांगला असेल त्यामुळे २००९ मध्ये अडचण आली नसेल. तेव्हा सिबील स्कोअर चांगला ठेवायचा असेल तर कोणते तरी कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड करणे गरजेचे आहे.त्या दृष्टीने क्रेडिट कार्ड असलेच पाहिजे असे नक्कीच नाही पण क्रेडिट कार्ड बाळगून वेळच्या वेळी बिले भरणे हा सर्वात सोपा उपाय आहे.
सिबील स्कोअर चांगला असणे याचा अर्थ कर्जासाठी अर्ज करणारा मनुष्य जबाबदारीने क्रेडिट वापरत आहे आणि तो कर्ज बुडवायची शक्यता कमी आहे असा होतो.आता त्या आकड्याचा वापर नक्की कसा करायचा हे प्रत्येक बँक ठरविते. अमेरिकेत तर चांगला क्रेडिट स्कोअर असेल तर व्याजाचा दरही कमी असतो. भारतात क्रेडिट स्कोअर ही कल्पना अजून त्या मानाने नवीन आहे त्यामुळे असा उपयोग अशा प्रकारे झाल्याचे मला तरी माहित नाही.तसे झाले तर ते नक्कीच चांगले असेल.
2 Dec 2014 - 12:08 pm | मोदक
सिबिल स्कोअर चांगला असल्याने नेमके काय होते? कर्ज लगेच मिळते की कर्जाची मर्यादा वाढते की कर्ज मिळणे सोपे होते?
आवश्यकता असेल तर वरील तिन्ही फायदे होतात. सिबील स्कोअर खूपच चांगला असेल तर कर्जाच्या पात्रतेमध्येही फरक पडतो. काही बँका पात्रतेपेक्षा जास्त कर्ज देतात.
2 Dec 2014 - 2:00 pm | समीरसूर
हे उत्तर अपेक्षित होते:
१) कर्जाची मर्यादा वाढते - उत्पन्नाच्या प्रमाणात एखाद्याचे कर्ज रु. १०० असेल तर सिबिल स्कोअर चांगला असल्याने तितक्याच उत्पन्नाला रु. ११० कर्ज मिळू शकेल. असे असते का? साधारण एकूण मासिक उत्पन्नाच्या ४०% पेक्षा गृहकर्जाचा हप्ता असू नये अशा प्रमाणात गृहकर्ज मिळते. ही मर्यादा चांगल्या सिबिल स्कोअरने उत्पन्न तितकेच असले तरी वाढते का?
२) व्याजदर कमी होतो - सिबिल स्कोअर चांगला असेल तर व्याजदर कमी लागतो असे होते का?
३) कर्ज मिळण्याची प्रोसेस सोपी होते - कागदपत्रे कमी लागतात, वेळ कमी लागतो, झटपट मंजुरी येते, वगैरे होते काय?
माझ्या कर्जाच्या वेळी माझे उत्पन्न, माझे चालू कर्ज, त्याचा मासिक हप्ता, विमा पॉलीसीचे हप्ते, इत्यादी पाहिल्याचे स्मरते.
2 Dec 2014 - 2:57 pm | मोदक
साधारण एकूण मासिक उत्पन्नाच्या ४०% पेक्षा गृहकर्जाचा हप्ता असू नये अशा प्रमाणात गृहकर्ज मिळते. ही मर्यादा चांगल्या सिबिल स्कोअरने उत्पन्न तितकेच असले तरी वाढते का?
हो वाढते. मासिक उत्पन्नाच्या ६५% ते ७०% गृहकर्जाचा हप्ता होईल इतके कर्ज दिले गेलेले खात्रीशीर उदाहरण पाहण्यात आहे.
२) व्याजदर कमी होतो - सिबिल स्कोअर चांगला असेल तर व्याजदर कमी लागतो असे होते का?
अमेरिकेत होते. भारतात अशी सोय असल्यास कल्पना नाही.
कागदपत्रे कमी लागतात, वेळ कमी लागतो, झटपट मंजुरी येते, वगैरे होते काय?
कागदपत्रे हवी ती लागतातच (आणि ती बँकेला द्यावीच असे माझे मत आहे. एखादा मुद्दा आपल्या नजरेतून सुटू शकतो पण बँकेच्या वकीलांच्या नजरेतून सहज सुटत नाही)
सिबील स्कोअर चांगला असेल तर क्रेडीट मॅनेजर जास्त खळखळ करत नाही. झटपट मंजुरी येते.
2 Dec 2014 - 1:55 pm | समीरसूर
सिबिल रिपोर्टबद्दल ही प्राथमिक माहिती होतीच. मला म्हणायचे होते की माझ्या २००९ च्या कर्जाच्या वेळेस हा मुद्दा निघाला नाही. तुमचा सिबिल स्कोअर कमी/जास्त आहे म्हणून कर्ज कमी/जास्त, कमी/जास्त मुदतीचे देऊ वगैरे असे काहीच विषय निघाले नाहीत. त्यांनी मला 'तुमचा सिबिल स्कोअर किती आहे?' असे विचारले नाही. :-) अगदी शब्दशः अर्थ घेता बुवा तुम्ही. :-) असो. माहितीची उजळणी करून दिल्याबद्दल धन्यवाद.
4 Dec 2014 - 2:33 pm | क्लिंटन
अहो फार जुनी सवय आहे ती :)
1 Dec 2014 - 5:59 pm | क्लिंटन
माझ्याकडे अमेरिकन एक्सप्रेसचे एक कार्ड होते.त्या कार्डावर दर महिन्याला २५० रूपयांपेक्षा जास्त रकमेचे चार व्यवहार केले तर दर महिन्याला १००० पॉईंट्स मिळणार अशी स्किम होती.वर्षाच्या शेवटी ४५०० रूपये रिन्युअल चार्जेस होते पण त्याच बरोबर ४५०० पॉईंट्सही मिळणार होते.मी दर महिन्याला १००० पॉईंट्स अगदी इमाने इतबारे गोळा केले होते.ते १२००० आणि रिन्युअलचे ४५०० असे १६५०० पॉईंट्स माझ्याकडे होते.विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण मला त्या पॉईंट्समधून १०,५०० रूपयांची गिफ्ट कार्डे मिळाली होती. अमेरिकन एक्सप्रेस जिथे जिथे चालते त्या सगळ्या ठिकाणी त्या कार्डांचा उपयोग करता येणार्यातला होता. त्यातून हिलरीसाठी नवा फोन झाला आणि माझे फोनचे बील बरेच अॅडव्हान्समध्ये भरून झाले. ६ महिन्यांनंतर पहिल्यांदा मला या महिन्यात फोनचे बिल भरावे लागणार आहे त्यापूर्वी माझा क्रेडिट बॅलन्स होता :)
दर महिन्याला २५० पेक्षा जास्त असे चार व्यवहार व्हायचेच.माझे आणि हिलरीचे फोनचे बिल आणि वीजेचे बील हे ३ व्यवहार दर महिन्याला अगदी ठरलेले असायचे.तसेच महिन्यातून एखादा चित्रपट तरी बघितला जात असेच.त्याचे तिकिटही याच कार्डावरून काढून २५० पेक्षा जास्त रकमेचे चार व्यवहार पूर्ण करत असे.
नंतर त्यांनी दर महिन्याला २५० ऐवजी १००० पेक्षा जास्त रकमेचे चार व्यवहार केले तरच १००० पॉईंट्स मिळतील असा बदल केला.तसेच रिन्युअलबरोबर पॉईंट देणेही बंद केले.त्याबरोबरच मी अमेरिकन एक्सप्रेसचे कार्डही रद्द केले :)
1 Dec 2014 - 7:53 pm | वैभव जाधव
च्यामारी असल्या पाईंटाचा मोनिकासाठी ऊपयोग करायचा की. हिलरीला पण पत्त्या नाय लागणार.
(क्लीण्टणराव हाल्के घ्या बर्का.)
2 Dec 2014 - 9:13 am | समीरसूर
हे दणदणीत फायदे आहेत. पण हे अमेरिकेतले फायदे आहेत ना? भारतात कुणी इतके फायदे देत असल्याचे ऐकीवात नाही. जाणकार सांगू शकतील. भारतात मी फार तर दोन-चार सिनेमाची तिकिटे मोफत वगैरे क्षुल्लक फायदे जास्त ऐकले आहेत. किंवा काही टक्के सूट. सूट वगैरे फायदे तसे फारसे महत्वाचे नसतातच. पण भारतात इतके दणदणीत फायदे मिळतात का हे जाणून घेण्यास उत्सुक आहे...
2 Dec 2014 - 9:16 am | समीरसूर
क्लिंटनरावांना मिळालेले फायदे भारतातलेच आहेत असे दिसते आहे. बेस्ट आहे. :-) हे फायदे खरोखर चांगले आहेत. अस्मादिक एवढा पुढचा विचार करू शकत नाहीत. :-(
1 Dec 2014 - 2:17 pm | मराठी_माणूस
मंथली पास काढायला टोल नाक्यावर क्रेडीट/डेबीट कार्ड का चालत नाही. टोल वरच्या प्रसार माध्यामांच्या चर्चेत सुध्दा हा मुद्दा कधीच चर्चेत आल्याचे पाहीले नाही.
1 Dec 2014 - 2:54 pm | विजुभाऊ
समीरसूर
तुमचे म्हणणे बरोबर आहे.
मी देखील अॅमेक्स कार्ड घेतले होते विचार केला की यदाकदाचित कुठे इमर्जन्सी आली तर क्रेडिट कार्ड बरे पडते.
सुदैवाने पहिल्या वर्षात कधीच वापरावे लागले नाही. दुसर्या वर्षी रीन्यूएअशन चार्जेस ५०००/- आले. झक मारली अन क्रेडीटकार्डच्या भानगडीत पडलो असे वाटले. कार्ड कॅन्सल केले.
लगेचच पैसे काढून द्यावे लागत नाही त्यामुळे होणारा आनंद किती क्षणभंगूर असतो हा अनुभव डेबीट कार्डवर गरज नसताना भरमसाठ खरेदी करून घेतला होताच. डेबीटकार्डासोबत निदान सावकारी पाश तरी नसतो
1 Dec 2014 - 4:18 pm | प्रसाद१९७१
माझ्याकडे पण २००१ नंतर क्रेडीट कार्ड नाही. जे होते ते बंद करताना पण इतके फोन करायला लागले की वैताग आला.
खरच काही गरज नसते क्रेडीट कार्डची. बँकेचे डेबिट कार्ड असते ते पुरेसे असते कधी चुकुन लागलेच तर. थोडी कॅश बरोबर ठेवावी.
पेट्रोल पंपावर तर फार वैताग येतो पुढचा माणुस कार्ड्नी पैसे द्यायला लागला तर्, मागच्यांचा खोळंबा.
1 Dec 2014 - 7:44 pm | सत्याचे प्रयोग
1 Dec 2014 - 10:00 pm | हाडक्या
अच्छा..!! हेच का तुमचे सत्याचे प्रयोग ??
4 Dec 2014 - 5:52 pm | सत्याचे प्रयोग
इतरही प्रयोग चालू आहेत दमादमाने लिहीन
16 Dec 2014 - 5:26 pm | हाडक्या
लिव्हा लिव्हा .. वाटच बघतोय.. ;)
1 Dec 2014 - 10:37 pm | विअर्ड विक्स
क्रेडीट कार्डाचे फायदे
१. विम्याचे हफ्ते ग्रेस काळाच्या शेवटच्या दिवशी ECS सुविधेने विनासायास भरले जातात. ( HDFC ने हि सुविधा उपलब्ध केलीये )( एक महिन्याचे व्याज अधिक मिळाले , हे शहाण्यास सांगणे न लगे )
२. अगर कार्यालयीन कामानिमित्त खर्च करायची वेळ आली तर खिश्यास त्रास होत नाही.
३. वीज , घरफळा , भ्रमणध्वनी सारी बिले क्रेडीट कार्डद्वारे भरून सुट मिळवता येते.
४. आणीबाणी प्रसंगी बँकेतील शिलकेपेक्षा अधिक रक्कम भरण्याची वेळ आली तर क्रेडीट कार्ड उपयोगास पडते
५. आजकाल तर घराचे हफ्ते सुद्धा क्रेडीट कार्ड येण्याचा विचार चालू आहे असे वाचनात आले होते.
आपण क्रेडीट कार्ड बाळगतो याचा वृथा अभिमान नाही पण न बाळगणे म्हणजे काही जगावेगळे केले असेही मानू नये.
क्रेडीट कार्ड हि चैनेची गोष्ट न समजता तिचा समजून उमजून वापर केला पाहिजे.
ज्याप्रमाणे सट्टा बाजारात गुंतवणूक म्हणजे काही मोठे पाप आहे असे अनेक लोकांना वाटते तसाच सूर क्रेडीट कार्ड बाळगणाऱ्या बाबत क्रेडीट कार्ड न बाल्गानार्यांचा असतो.
असो… शेवटी ज्याची त्याची इच्छा…
2 Dec 2014 - 9:33 am | समीरसूर
१. विम्याचे हफ्ते ग्रेस काळाच्या शेवटच्या दिवशी ECS सुविधेने विनासायास भरले जातात. ( HDFC ने हि सुविधा उपलब्ध केलीये )( एक महिन्याचे व्याज अधिक मिळाले , हे शहाण्यास सांगणे न लगे )
यास क्रेडिट कार्डच पाहिजे असे नव्हे. ते बँकेच्या खात्यातून तसेही जाऊ शकतात. मी एलआयसी विम्याचा हप्ता दोन-तीन आठवडे उशीरा भरला (नजरचुकीने). त्याचा मला कुठलाच भूर्दंड पडला नाही. हा हप्ता मी ऑनलाईन भरला. आणि एखाद्या महिन्याचे व्याज असे कितीसे असणार? अगदीच लाखा-दोन लाखात हप्ता असेल तर गोष्ट निराळी.
२. अगर कार्यालयीन कामानिमित्त खर्च करायची वेळ आली तर खिश्यास त्रास होत नाही.
डेबीट कार्डाने खर्च करून नंतर रिइंबर्समेंट मिळतेच. शेवटी क्रेडिट कार्डावरही आपलेच पैसे खर्च होत असतात; कंपनीचे नव्हे.
३. वीज , घरफळा , भ्रमणध्वनी सारी बिले क्रेडीट कार्डद्वारे भरून सुट मिळवता येते.
ह्म्म्म, ही सूट फार जास्त नसते. आणि आजकाल डेबीट कार्डावरदेखील अशी सूट मिळते. आणि क्रेडिट कार्डावर अशी सूट घेऊन पुढे आणखी खर्च वाढण्याची शक्यतादेखील असते.
४. आणीबाणी प्रसंगी बँकेतील शिलकेपेक्षा अधिक रक्कम भरण्याची वेळ आली तर क्रेडीट कार्ड उपयोगास पडते
अशी वेळ कितीदा येत असेल? आणि चुकून आलीच तर बाकीचे जास्त सोयीस्कर मार्ग अधिक सुलभतेने उपलब्ध असतात. त्यासाठी क्रेडिट कार्ड हाच एकमेव पर्याय नक्कीच नाही.
५. आजकाल तर घराचे हफ्ते सुद्धा क्रेडीट कार्ड येण्याचा विचार चालू आहे असे वाचनात आले होते.
हे तितकेसे सरळ नाही. घराचे हप्ते असलेल्या पैशातूनच गेलेले बरे. नाहीतर चक्रव्युहात अडकण्याचीच शक्यता अधिक.
आपण क्रेडीट कार्ड बाळगतो याचा वृथा अभिमान नाही पण न बाळगणे म्हणजे काही जगावेगळे केले असेही मानू नये.
क्रेडिट कार्डचे फायदे असतीलही पण सारासार विचार करता ग्राहकांनी अधिकाअधिक खर्च करण्यासाठी उद्युक्त करणारी एक लोभसवाणी आणि क्रयशक्ती वाढल्याचा सोनेरी भास वाढवाणारी युक्ती असेच क्रेडिट कार्डचे वर्णन करावे लागेल. ज्यांना तिचा योग्य आणि फायदेशीर वापर करणे जमले, त्यांनी क्रेडिट कार्ड अवश्य (पण जपून) वापरावे असे एका प्रतिसादात मी म्हटलेच आहे. क्रेडिट कार्ड न वापरणे कसले जगावेगळे? :-) ते काय अन्न, पाणी आहे की त्याच्यावाचून राहणे अभिनंदनीय ठरावे. :-) ते वापरणे स्टेटस सिंबॉल मानले जाते हे मात्र खरे. हे मी बर्याचदा पाहिले आहे. आणि अधिकाधिक कार्डे पाकिटात असणे आणि ते पाकिट काढून समोरच्यांना चकित करणे हा अनेकांचा आवडता उद्योग असतो हे देखील पाहिले आहे. एका मित्राला त्याबद्दल झापले देखील आहे. त्याची ससेहोलपट पाहिलेली आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड नसणे हे जगावेगळे वाटणे शक्यच नाही पण असण्याबद्दल जे गोड गैरसमज आहेत ते मिटवण्यासाठी सगळे मिपाकर इथे अनुभव सांगत आहेत, इतकेच! :-)
2 Dec 2014 - 9:39 am | समीरसूर
क्रेडिट कार्ड नसणे म्हणजे मागासलेपणा हा देखील एक गैरसमजच! :-) पीअर प्रेशर भारताइतके खरंच कुठेच नसेल.
व्हॉट्सअॅप नाही तुझ्याकडे? अरे कुठल्या जमान्यात आहेस? अरेच्चा, नाहीये माझ्याकडे व्हॉट्सअॅप, काय म्हणणं आहे? तुझ्याकडे आहे ना? मग त्यात काही तू पराक्रम केलेला आहेस असं म्हणणं आहे का तुझं? त्याबद्दल तुला भारतरत्न द्यायचं का? की डायरेक्ट नोबेलच द्यायचे? काहीतरी ओढून-ताणून फायदे आणून वकिली करायची आणि व्हॉट्अॅप फायद्याचे आहे असे सांगायचे, हे ऐकून तर पकलो मी आता.
2 Dec 2014 - 10:07 am | मराठी_माणूस
सहमत
2 Dec 2014 - 10:04 am | विअर्ड विक्स
१. ECS/ auto डेबिट सुविधा ग्रेस काळात बिल भरत नाही. मुद्दा लक्षात न घेत टिप्पणी टाळावी.
२. कार्यालय पैसे परत फेड जरी करत असेल तरी ऐन वेळेस आपण आपल्या खिश्यातून पैसे भरतो.
३. सेवा बिल क्रेडीट कार्डाने भरली जातात म्हणून घरातील दिवे -पंखे , मोबाइल चा अतिरिक्त वापर करू हि शंकाच दुधखूळी वाटते. असो
४. नकाराची घंटा वाजवायचीच ठरवली तर ती कशीपण वाजवता येते. रात्री दोन वाजता परगावी -परदेशी आपण एकटे असाल नि आर्थिक अडचण आल्यावर क्रेडीट कार्ड शिवाय कोणताही सुलभ पर्याय नाही.
५. क्रेडीट कार्ड असणे हा status symbol असे क्रेडीट कार्ड वापरणारे मिपाकर नक्कीच नसतील. पण क्रेडीट कार्ड न बाळगता व त्याचा अनुभव नसता त्यास दुषणे देणारे मिपाकर पाहून आनंद वाटला.
२० वर्षांपूर्वी दूरध्वनी, दूरदर्शन, भ्रमणध्वनी इ. या गोष्टीकडे सुद्धा चैनीच्या वस्तू व उधळपट्टी म्हणून पहिले जाते. परंतु आज त्या अत्यावश्यक व निकडीच्या वस्तू समजल्या जातात.
क्रेडीट कार्ड म्हणजे दुष्ट चक्र न समजता , ५५- ३५ दिवस चक्राचा सुनियोजित पद्धतीने उपयोग केल्यास फायदाच होईल.
महत्त्वाची गोष्ट क्रेडीट कार्ड हि एक सेवा आहे त्यामुळे तेथे सुद्धा बिल वेळेवर भरावे लागते. अन्यथा व्याज भरावे लागेल.
2 Dec 2014 - 11:09 am | समीरसूर
१. ECS/ auto डेबिट सुविधा ग्रेस काळात बिल भरत नाही. मुद्दा लक्षात न घेत टिप्पणी टाळावी.
माझे म्हणणे आहे की ऑनलाईन हप्ता भरता येतो (नेटबँकिंग, डेबीट कार्ड वापरून). आणि या परिस्थितीतही आपल्याला व्याज मिळतेच. हप्ता लक्षात ठेवून भरावा लागतो हे मात्र खरे. ईसीएस मध्ये आपोआप जातो; लक्षात ठेवण्याची गरज नसते हा फायदा आहेच.
३. सेवा बिल क्रेडीट कार्डाने भरली जातात म्हणून घरातील दिवे -पंखे , मोबाइल चा अतिरिक्त वापर करू हि शंकाच दुधखूळी वाटते. असो
शंका ही नाही; शंका ही आहे की लगेच पैसे द्यायला लागत नाही म्हणून जास्त खर्च करण्याकडे कल वाढतो. :-) आणि हे सगळ्याच बाबतीत होते. आत्ता पैसे नाहीयेत ना द्यायला लागत, मग घ्या कॅमेरा, घ्या जॅकेट्...असे. पंखे, दिवे यांचा अतिरिक्त वापर करू असं कसं म्हणेन मी? थोडा असलो तरी इतका काही मी बावळट नाहीये. ;-)
४. नकाराची घंटा वाजवायचीच ठरवली तर ती कशीपण वाजवता येते. रात्री दोन वाजता परगावी -परदेशी आपण एकटे असाल नि आर्थिक अडचण आल्यावर क्रेडीट कार्ड शिवाय कोणताही सुलभ पर्याय नाही.
शक्य आहे. पण अशी परिस्थिती फक्त क्रेडिट कार्डानेच हाताळता येईल असे नक्कीच नाही. असो.
५. क्रेडीट कार्ड असणे हा status symbol असे क्रेडीट कार्ड वापरणारे मिपाकर नक्कीच नसतील. पण क्रेडीट कार्ड न बाळगता व त्याचा अनुभव नसता त्यास दुषणे देणारे मिपाकर पाहून आनंद वाटला.
दूषणे नाहीत. आवश्यक असेल तर क्रेडिट कार्ड घ्यावे असे मी अनेकदा म्हटले आहे. अनुभव नाही हे खरे आहे. इतरांचा अनुभव पाहिला आहे; त्यावरून सांगतो आहे. शेवटी ज्याची-त्याची इच्छा असेही म्हटले आहे. स्वानुभव नसल्याने माझे विचार कदाचित निरर्थक ठरत असतील. नो प्रॉब्लेम!
महत्त्वाची गोष्ट क्रेडीट कार्ड हि एक सेवा आहे त्यामुळे तेथे सुद्धा बिल वेळेवर भरावे लागते. अन्यथा व्याज भरावे लागेल.
१००% मान्य! पण यात ग्राहकांनी अधिकाधिक खर्च करावा हा मुख्य उद्देश असतो. आणि ग्राहकांचा अवास्तव खर्च आणि पैसे भरण्याच्या शिस्तीचा अभाव यात क्रेडिट कार्डाच्या व्यवसायाचे गमक दडलेले आहे हे ही खरेच.
असो. विचार वेगवेगळे असणारच. आपण उगीच त्याला भांडणाचे रूप कशाला द्यायचे? :-)
2 Dec 2014 - 12:06 pm | विअर्ड विक्स
नाही म्हटलं चित्रपटाचे समीक्षक नाहीका ? उगाच चांगल्या चित्रपटांनाही नकाराचा सूर लावतात , तसले झाले असले तर क्रेडीट कार्ड बद्दल म्हणून प्रतिसाद दिला. क्रेडीट कार्ड जरी वापरत असलो तरी फुकाच्या भांडणासाठी शब्दांची उधळपट्टी करणाऱ्यातील मी नव्हे… ( भरपूर झाले हाणून :) , हलके घ्यावे …) बाकी आपले लिखाण आवडते, चित्रपटाच्या समीक्षणाच्या प्रतीक्षेत एक मिपाकर क्रेडीट कार्डधारक ;)
2 Dec 2014 - 1:42 pm | समीरसूर
बरोबर!! :-)
मी समीक्षक वगैरे काही नाही हो. आणि 'जय हो', 'हमशकल्स', वगैरे चित्रपट खरंच चांगले नव्हते म्हणूनच 'नकाराचा सूर' लावला होता. अन्यथा फुकाच्या लेखनासाठी नकारांची उधळपट्टी करणार्यातील मी नव्हे... ;-)
खोटं वाटत असेल तर एकदा 'हमशकल्स' बघा आणि काय तो निर्णय घ्या... :-)
2 Dec 2014 - 4:34 am | स्पार्टाकस
क्रेडीट कार्ड किंवा डेबीट कार्ड किंवा कॅश,
आपण कितपत जपून खर्च करतो अथवा उधळतो यावर अवलंबून.
मी गेल्या १५ वर्षांपासून भारतात आणि परदेशात क्रेडीट कार्ड वापरतो आहे. अमेरीकेत बिझनेस ट्रीपवर असताना तर क्रेडीट कार्ड कंपल्सरी लागतं. हॉटेल आणि कार भाड्याने घेताना डेबीट कार्ड / कॅश घेत नाहीत.
१. भारंभार क्रेडीट कार्डे जमा करु नका. तो स्टॅट्स सिंबॉल नाही.
२. वेळेवर बिल भरा. त्याने व्याजाचा भुर्दंड लागत नाही.
३. कार्ड घेताना झिरो लायबलिटी कार्ड घ्या. तुमचे कार्ड चोरीला गेलं किंवा दुसर्या कोणी ऑनलाईन फ्रॉडसाठी वापरलं तर तुम्ही जबाबदार राहणार नाही.
2 Dec 2014 - 12:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि कॅश या तीनही दुधारी पण आवश्यक व्यवस्था आहेत... नीट उपयोग केला तर उपयोगी व्यवस्था नाहीतर पस्तावा !
मी साधारण अशी पद्धत वापरतो :
१. स्थलपरत्वे जिथली तिथली कॅश ही सर्व जगात हमखास चालणारी व्यवस्था. त्यामुळे जिथली अर्थव्यवस्था नीट माहीत नाही तिथे फिरताना शक्य तेवढी कॅश बरोबर असणे हे सर्वात उत्तम. परंतू, फिरतीवर असताना खूप कॅश जवळ बाळगणे किती धोकादायक हे काही सांगायला नको, तेव्हा तो अतिरेकही नसावा.
२. डेबिट कार्ड जेथे आणि ज्या गोष्टींसाठी उपयोगी ठरते तेथे ते वापरणे जास्त सुरक्षीत... कॅशची चोरी होणे आणि खिश्याला न परवडणारा खर्च होणे हे दोन्हीही आपोआप टाळले जाते. आपल्या राहत्या देशात हा उत्तम उपाय आहे. पाय नेहमीच अंथरूणात राहतात.
३. राहत्या देशातून केलेले परदेशातले बरेचसे व्यवहार क्रेडीट कार्ड शिवाय होत नाहीत. बर्याचदा डेबिट कार्डांचे चलनबदलाचे दर खूपच जास्त असतात. कित्येक आंतरराष्ट्रिय व्यावसाईक संस्था (प्रोफेशनल बॉडीज) आणि कंपन्या क्रेडीट कार्डशिवाय व्यवहार करत नाहीत. क्रेडीट कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेले असल्याने मुदतिच्या शेवटच्या दिवसाला पैसे आपोआप वळते होतात आणि कार्ड-बँकेवर अवलंबून कोणतेही व्याज / चार्ज न पडता ३० ते ९० दिवस पैसे वापरायला मिळतात... पण तरीही बर्याचदा मी मुदतीच्या थोडे अगोदरच पैसे 'बँक खाते --> कार्ड' असे वळते करून (प्रीपेमेंट) करून "शेवटच्या दिवसात पुरेसे पैसे खात्यात असतिल काय?" ही काळजीही काढून टाकतो. क्रेडीट कार्डाचा एक फार उपयोगी वापर मी अनेकदा परदेशप्रवासात केला आहे तो म्हणजे, प्रीपेमेंटने कार्डाच्या लिमीटपेक्षा जास्त रक्कम त्यात साठवणे. त्यामुळे 'कार्डाची लिमीट + प्रीपेमेंट' इतके पैसे आपण फिरताना बरोबर बाळगू शकतो.
अर्थात या तीनही उपयोगी व्यवस्था ज्यानेत्याने आपापल्या (अ) गरजेप्रमाणे, (आ) मनोबलाप्रमाणे आणि (इ) तात्कालिक परिस्थितीप्रमाणे निर्णय घेऊन वापरणे योग्य होईल.
2 Dec 2014 - 2:06 pm | समीरसूर
छान प्रतिसाद! नेमके उत्तर. नो हाणामारी. प्युअर अँड जेन्युईन इन्फो. प्रॅक्टीकली उपयुक्त माहिती. धन्स.
2 Dec 2014 - 1:50 pm | बाळ सप्रे
"कायदे कानू " विषयी अजुन कोणीच कसं बोललं नाही बरं
2 Dec 2014 - 2:14 pm | समीरसूर
अवघा धागा सिबिलमय झाला...कायदे कानू राहिले बाजूला...
ये मेरा सिबिल, कार्ड का दीवाना
स्कोअर के दम पे इसका जीना-मरना
स्कोअर ना हो तो काहे का जीना....
ये मेरा सिबिल, कार्ड का दीवाना....
2 Dec 2014 - 3:09 pm | मोदक
कायदे कानून बद्द्ल फारसे बोलण्यासारखे नसावे.. आपण कोणतेही कर्ज घेताना त्या फॉर्मवरील अटी आणि शर्ती संपूर्ण वाचल्या आणि समजून घेतल्या तर "शक्य होईल तितके कर्ज प्रकरण टाळण्याकडे कल असेल" अशी खात्री आहे.
मात्र सगळे हप्ते वेळच्या वेळेत भरले तर या अटी आणि शर्तींचा त्रास होत नाही.
क्रेडीट कार्डसंदर्भात कोणतेही वाद / चर्चा किंवा नवीन स्किम घेणे वगैरे प्रकार एखाद्या "डॉक्युमेंटेड कम्युनीकेशन" च्या आधारावरच पार पाडावेत.
क्रेडीट कार्डचे बील व्यवस्थीत तपासून पहावे.
(एक ऐकलेला किस्सा - एका प्रतिष्ठीत बँकेने नेहमीच्या क्रेडीट कार्ड बिलामध्ये अचानक ७५ रूपये असे इतर चार्जेस जोडले.. कस्टमर केअरला सूचना दिल्या की एखाद्या कस्टमर तक्रार घेवून आलाच तर विनाविलंब विनाअट ते पैसे परत करावेत. फक्त १० ते १५% कस्टमरांनी तक्रार केली व पैसे परत मिळवले - बाकीचे पैसे बँकेच्या खिशात.)
2 Dec 2014 - 2:06 pm | मनुराणी
आधी माझा पण समज होता की क्रेडीट कार्ड म्हणजे विनाकारण खर्च. पण नवऱ्याकडून फायदे समजले आणि अनुभवले पण.
३ वर्षांपूर्वी सिंगापुरात घर घेतले तेव्हा घराच्या किमतीच्या २०% रोख रक्कम हवी होती, आणि जी शिल्लक होती ती पुरेशी नव्हती त्यावेळी क्रेडीट कार्डवर पर्सनल लोन घेण्याची सुविधा असल्याने सोय झाली. ४-५ वेगवेगळ्या बँकांच्या क्रेडीट कार्ड्स वर लोन घेतले होते.
पण क्रेडीट कार्ड आहे म्हणून करा खर्च हा समज चुकीचा वाटतो. जी खरेदी होते त्याचे बिल लगेच किंवा नंतर आपल्यालाच भरायचे आहे याचे भान असले म्हणजे झाले. क्रेडीट कार्ड वर खरेदी केली म्हणून बँक बिल माफ करत नाही.
2 Dec 2014 - 3:11 pm | मोदक
क्रेडीट कार्ड सोबत येणारे निरनिराळे विमे आणि विमानतळावरती मिळणार्या विशेष सवलती यांचा लाभ कोणी घेतला आहे का..?
2 Dec 2014 - 4:59 pm | बोका
दोन वर्षांपूर्वी एचडीएफसी कार्ड वर मुंबई विमानतळावर लाऊंजमध्ये फुकट जात येत असे, तेव्हा गेलो होतो. त्यांनी कार्ड स्वाईप केले पण पैसे घेतेले नाहीत. नाश्ता आणी पेयही दिले. नंतर ती स्कीम बंद झाल्याने पुन्हा जायचा योग आला नाही.
3 Dec 2014 - 8:41 am | स्पार्टाकस
माझ्याकडे सिटीबँकेचे अमेरीकन एअरलाईन्सचे क्रेडीट कार्ड आहे. त्यांच्या अॅडमिरल क्लबमध्ये जाऊ शकतो.
अर्थात ही सुविधा फक्त वर्षातून दोन वेळा फ्री असते.
2 Dec 2014 - 3:34 pm | मदनबाण
मी कधीही क्रेडिट कार्ड घेउ नये या मताचा होतो आणि आता ते पक्के झाले आहे, या क्रेडिट कार्ड वाल्यांचे फोन आमच्या हापिसात सतत येत असतात, एका एक्स्टेंशन वरुन दुसर्या, मग तिसर्या जाम उच्छात माडंतात मेले ! तर क्रेडिट कार्ड ऑफरवाल्या कॉलला नको म्हणुन टाळणारा मी अचानक भुललो... ऑफर देणारी बाई { क्रेडिट कार्डची } म्हणाली तुमच्या कंपनीसाठी स्पेशल स्कीम आहे, तुम्ही कंपनीचे एम्लॉई असल्याने ही विशेष ऑफर आहे, पहिल्या वर्षी कोणताही चार्ज लागणार नाही, आणि नंतर अमुक एक रक्कम जर वर्षाला खर्च केली तर वार्षिक चार्ज लागणार नाही. ही तिने सांगितलेली वार्षिक रक्कम बरीच कमी असल्याने मी भुललो हे एक कारण दुसरे म्हणजे माझ्या एका जुन्या वरिष्ठ सहकार्यांनी मला काही पॉइंट गेनिंगचे सांगितले होते, ते देखील टाळक्यात होते... शेवटी त्या कॉलवर ते कार्ड घेतले, घरचा पत्त्यावर पाठवा असे सांगुन सुद्धा गाढवीच्यांनी ऑफिसच्या पत्त्यावर पाठवले ! कार्ड उघडुन नीट स्कीम वाचली तर ऑफर केलेल्या स्कीम पेक्षा ती स्कीम वेगळी होती... त्या बाईला फोन लावला { नशिब तीचा नंबर घेउन ठेवला होता ते ! } ती म्हणाली काळजी करु नका बील मधे काही प्रॉब्लेम आला तर मला फोन करा ! तरी माझे समाधान होइना,मग त्या बँकेच्या संकेतस्थळावर गेलो आणि त्या कार्डाच्या ऑफर संबधी माहिती वाचली,तेव्हा लक्षात आले की मला सांगण्यात आलेली स्कीम एकदम बोगस होती आणि ती बाई धदांत खोटे बोलत होती,तीचा फोन करुन पिच्छा पुरवला आधी काळजी करु नका ची टेप वाजवत होती शेवटी मी रुद्रावतार धारण करुन बोलणे चालु केल्यावर तिला तिच्या बॉसशी बोलायचे आहे असे सांगतले, तो जो कोणी तथा कथित बॉस होता तो लाईनवर आला आणि म्हणाला :- आय एम सॉरी ! थीस स्कीम डज नॉट व्हॅलिड नाऊ ! असे डोक्यात गेले होते. शेवटी बॅकेत कॉल करुन कार्ड कॅन्सल करुन घेतले. कामाचा व्याप असल्याने अजुन डोके त्यात घातले नाही,नाही तर त्या दोघांची आणि बँकेची चांगली वाजवली असती मी.
असो... क्रेडिट कार्ड नको रे बाबा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Junction Lo... { Official Song Released }
2 Dec 2014 - 3:36 pm | क्लिंटन
माझ्याकडे असे एक क्रेडिट कार्ड अपग्रेड करून मिळाले. पण त्यावरील विम्याचा लाभ व्हावा असे खरोखरच वाटत नाही कारण तो विमा विमानप्रवासात अपघाती मृत्यू झाल्यास नॉमिनीला मिळतो :) विमानतळावरील लाऊंजमध्ये जायची नक्कीच इच्छा आहे.निदान बघायचे तरी आहे काय असते त्यात इतके ते.हे कार्ड आल्यापासून विमानप्रवास झालेला नाही त्यामुळे अजून वेळ आलेली नाही.पण जेव्हा कधी विमानप्रवास करेन तेव्हा लाऊंजमध्ये नक्कीच जाणार आहे. तसेच त्याच कार्डाबरोबर ताज एपिक्युरिअन म्हणून पण एक भानगड आली आहे.नक्की काय आहे काय माहित? अर्थात या गोष्टीचा वापर मी करायची शक्यता फारच थोडी (स्वगतः पडवळ आणि फरस बी मधला फरकही कळत नसेल तर एपिक्युरिअन ठिकाणी जाऊन काय कपाळाचा खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणार? :) )
2 Dec 2014 - 9:52 pm | श्रीरंग_जोशी
वर सर्वांनी उत्तम माहिती दिली आहेच.
मी भारतात असताना व अमेरिकेत होईल तेवढा क्रेडिट कार्ड्स चा वापर केलेला / करत आहे. भारतात असताना अंदाजे दोन वर्षांच्या क्रेडिट कार्डवर १५०० रुपयांचे पेट्रोल व्हाउचर मिळाले होते (साल २००८).
अमेरिकेत तर दरवर्षी किमान ४०० ते ५०० डॉलर्सचा परतावा मी विविध क्रेडिट कार्ड्स वापरून मिळवतो.
माझ्या कितीतरी वस्तु जसे पहिला पहिला डिजिटल कॅमेरा वगैरे शुन्य टक्के व्याजदरावर २४ हप्त्यांमध्ये घेतल्या आहेत.
आजवर एकदाही क्रेडिट कार्डावर व्याज भरण्याची वेळ आली नाही. भारतात व अमेरिकेत गृहकर्ज मिळवताना चांगल्या क्रेडिट स्कोअरचा नक्कीच लाभ झाला.
क्रेडिट कार्डच्या वापरावर सात वर्षांपूर्वी रेडिफवर प्रकाशित झालेला माझा हा लेख.
अवांतर - रोख रकमेचा वापर कमीत कमी का करावा यासंबंधी माझे विचार येथे मांडले आहेत.
3 Dec 2014 - 11:01 am | समीरसूर
छान प्रतिसाद! विचारपूर्वक वापरल्यास क्रेडिट कार्डचे फायदेशीर असू शकते. संयम इज द की हिअर...
4 Dec 2014 - 1:19 pm | सुनील
धन्यवाद.
रोखीचा व्यवहार कमीतकमी आणि आवश्यकता असेल तर आणि तेथेच करावा, हे मत होतेच. त्याच्या पृष्यर्थ काही नवे मुद्देदेखिल मिळाले.
3 Dec 2014 - 10:15 am | सुबोध खरे
मी गेली १७ वर्षे क्रेडीट कार्ड वापरत आहे. आजतागायत एक पैसाही व्याजापोटी भरलेला नाही.(एच डी एफ सी बँकेचे) दर महिन्याच्या २५ ते ३० तारखेमध्ये एकदा नेट बँकिंगने पैसे भरून टाकतो. आपल्या खिशात पैसा आहे म्हणून खर्च केला पाहिजे अशी वृत्ती असेल तर क्रेडीट कार्ड घेऊ नये. खिशात कितीही पैसे असतील तरी मॉल मध्ये फिरून एकही पैशाची खरेदी न करता मी कित्येक वर्षे परत येतो. त्यामुळे क्रेडीट कार्ड खिशात असून अनावश्यक खरेदी कधीच झाली नाही. तातडीच्या कामासाठी किंवा संकटात कामाला येणारी एक सुविधा/ सोय आहे. रोख रकमेपेक्षा सुटसुटीत अशी यापेक्षा अधिक मी त्याकडे पाहत नाही.
बाकी एक्का साहेबांनी फार छान विश्लेषण केलेले आहेच. त्यांच्या सुंदर वस्त्राला मी आपले ठिगळ लावू इच्छित नाही.
3 Dec 2014 - 11:02 am | समीरसूर
पटले.
3 Dec 2014 - 12:25 pm | प्रसाद१९७१
मी मागे ऑस्ट्रेलिया ला गेलो असताना, क्रेडीट कार्ड ( भारतीय किंवा कुठलेही ) नसल्यामुळे मोठा प्रॉब्लेम आला होता. सर्व हॉटेल किंवा ऑनलाइन बुकींग ला क्रेडीट कार्ड लागते, तेंव्हा ऑस्ट्रेलियात बँक अकाउंट नसल्यामुळे नेट बँकिंग पण शक्य नव्हते, त्यामुळे फार अडचण झाली.
दुर्दैवाने, Axis Bank चे कॅश कार्ड असुन सुद्धा ते नेट वर चालत नव्हते.
3 Dec 2014 - 5:24 pm | रुस्तम
मग तुम्ही प्रॉब्लेम कसा सोडवला?
3 Dec 2014 - 5:33 pm | प्रसाद१९७१
मी कधी कधी कोणाला विनंती केली आणि त्यांचे क्रेडीट कार्ड वापरले आणि त्यांना कॅश दिली.
कधी कॅश कार्ड वरुन कॅश काढुन ट्रॅव्हल एजंट कडे जावुन बुकींग करुन घेतले. त्याला पण आश्चर्य वाटायचे की हा बाबा माझ्याकडे का आला आहे स्वता नेट वरुन बुकींग न करता.
3 Dec 2014 - 5:35 pm | रुस्तम
ह्म्म
26 Aug 2017 - 8:10 am | Sunny Eknath Kamble
सर् माझ्याकडुन चुक झाली. कार्ड पुर्ण वापरल 2-3 वर्ष झाली पण त्यचे पैसे पण भरलत आलो जवळ जवळ दीड पट भरले पण अजैनही बील बाकीच आहे पण आता कपॅसीटी संपले आहे मी आता पैसे भरु शकत नाही पण त्यांचा फोन् येतोय सारखा कोर्ट मॅटर करणार तैम्हाला त्रास होईल प्लीज मी काय करु सांगा