नमस्कार मंडळी,
आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
यंदाच्या फराळात हे कणकीचे लाडू करून बघा.
साहित्य:
- २ वाटी कणीक
- ३/४ वाटी तूप
- ३/४ वाटी पिठी साखर
- २ टीस्पून पोहे (जाडे किंवा बारीक)
- ७-८ बदाम बी (सजावटीकरिता)
कृती:
सर्वप्रथम पोह्यांचा चुरा करून घ्यावा.
थोडे तूप तव्यावर टाकून ते तापल्यावर त्यात पोह्यांचा चुरा खरपूस होईपर्यंत परतून घ्यावा.
पोहे बाजूला काढून अर्धी वाटी तूप तव्यावर तापवावे.
तूप तापल्यावर त्यात कणीक मिसळून मंद आचेवर भाजत राहावी.
१०-१२ मिनिटांत कणकीचा रंग सोनेरी होतो व खमंग वास येऊ लागतो.
या सर्व काळात कणीक हालवत राहावी जेणेकरून ती करपणार नाही.
रंग बदललेल्या कणकेत पिठीसाखर घालावी व ते मिश्रण एक दोन मिनिटे परतावे.
हे मिश्रण पातेल्यात काढून घ्यावे.
सुरुवातीला तुपात भाजलेला पोह्यांचा चुरा या मिश्रणात घालावा.
लाडू बांधण्यास सुरुवात करावी व गरजेनुसार अधिक तूप त्यात घालावे.
बांधलेल्या लाडवांवर बदाम बी किंवा त्यांचे काप लावावे.
प्रतिक्रिया
21 Oct 2014 - 6:29 pm | रेवती
छान पाकृ! पोह्यांचे कण खाताना ते डिंकाच्या लाहीसारखे भासतात.
21 Oct 2014 - 7:40 pm | मधुरा देशपांडे
पाकृ, फोटो, सादरीकरण सगळेच आवडले.
21 Oct 2014 - 11:12 pm | स्वामी संकेतानंद
वाह! मस्त..
'Bachelor's Dish' वाटत आहे. :P
22 Oct 2014 - 1:09 am | अमित खोजे
छान दिसतीये डिश. करून बघतो.
23 Oct 2014 - 7:33 am | सुहास झेले
वाह... फोटो आणि सादरीकरण अल्टीमेट :)
23 Oct 2014 - 10:06 am | जेपी
छान. करुन पाहतो.
23 Oct 2014 - 1:29 pm | इशा१२३
मस्त लाडु.मी करते असे पण पोह्यांचे नविन कळले.धन्यवाद.
23 Oct 2014 - 8:16 pm | प्रभाकर पेठकर
आमच्याकडे कणकेचा शिरा (सा़जूक तुप आणि दुध घालून) केला जातो. अतिशय चविष्ट लागतो.
हे कणकेचे (कणकीचे नाही हं!) लाडू पहिल्यांदाच पाहिले. एक वेगळाच प्रकार आहे. करून पाहिले पाहिजेत. बेसनाच्या लाडूंसारखे दिसत आहेत पण कणीक, साजूक तुप आणि पिठीसाखर हे मिश्रण चांगलेच लागते.
23 Oct 2014 - 9:56 pm | श्रीरंग_जोशी
प्रोत्साहनासाठी सर्व प्रतिसादकांचे आभार. पाकृ लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न.
छायाचित्रणासाठी मिपाकर जुइ यांचे आभार. दोन वर्षांपूर्वी पाकृ टाकण्यासाठी एकट्यानेच लाडू करता करता फोटो काढले होते. तेव्हा फोटो काढण्याच्या नादात कणीक करपून तांबडी झाली होती. यावेळी पूर्ण लक्ष लाडू बनवण्याकडेच होते.
'कणकेचे' हे देखील बरोबर असले तरी जाणूनच 'कणकीचे' असे लिहिले. माझ्या गावाकडच्या बोलीभाषेचा प्रभाव. कणकीचे असे ऐकताना जो गोडवा मला जाणवतो तो कणकेचे असे ऐकताना जाणवत नाही. जरा रुक्षपणा जाणवतो. इतरांच्या बाबतीत हेच पूर्णपणे उलट असू शकते हे मान्य आहेच.
23 Oct 2014 - 10:21 pm | एस
अतिशय छान फोटोपण.
23 Oct 2014 - 10:31 pm | सखी
फोटो आणि सादरीकरण दोन्ही छान. मी यात अख्खे बदाम घालण्याऐवजी बदाम+काजु पावडर, वेलदोडा, आणि साखरेऐवजी गुळ घालते (ब-याचदा तुप कढवल्यावर उरलेल्या बेरीचं काय करायचा हा प्रश्न असायचा तेव्हा या लाडवात बेरीपण मिसळुन जायची). तुमच्या पद्धतीनेपण करुन पाहीन येत्या हिवाळ्यात.
26 Oct 2014 - 11:35 am | वैशाली हसमनीस
मस्त
26 Oct 2014 - 1:31 pm | सानिकास्वप्निल
पाककृती व फोटो छान आहे :)
1 Nov 2014 - 6:23 pm | अनन्न्या
आधी गहू भाजून घेऊन मग रवाळ दळले तर नंतर तुपावर फार भाजावे लागत नाही, त्याची चवही वेगळी येते.
7 Nov 2014 - 5:53 am | स्पंदना
मस्त दिसताहेत लाडु.
पोहे घातल्याने टेक्स्चर येतं असावं.
करुन पाहेन.
8 Nov 2014 - 10:25 am | पैसा
पाकृ आणि फोटो एकदम झकास आलेत!
16 Apr 2015 - 9:28 pm | सूड
वाह!! तुपाचं प्रमाण नेहमी कमीजास्त व्हायचं. धन्स.
16 Apr 2015 - 9:41 pm | स्रुजा
मस्त ! जुईचे फोटो पण छान. करून बघेन आता. पोटभरीचे होत असेल आणि एकदम.