(श्री मंदार पुरंदरे सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यासाठी श्री पुरंदरे यांना धन्यवाद!)
*****************
मूळ पोलिश कविता : Rozmowa z Aktorem ( रोझमोवा झ आक्तोरेम )
मूळ पोलिश कवि: Ildefons Gałczyński ( इल्देफोंस गौचीनस्की )
संवाद : एका नटासोबतचा !
नुकताच तो इथून गेला ,
…
अजूनही या खोलीत त्याचा वावर जाणवतो आहे
त्याची अर्धी सिगारेट मंद धूर सोडते आहे.
जाणवत आहेत त्याच्या हालचालींच्या सावल्या भिंतीवर
मेणबत्त्या हवेत काजळी सोडत आहेत
ऐकू येतो आहे घनगर्द बाख
जंगलात वाऱ्याची गाज घुमावी
तसा घुमतो आहे त्याचा आवाज
इथेच
त्याच्याशी झालेला संवाद घुमतो आहे मनात:
नाटकाबद्दल तो बोलत होता,
भूमिकेबद्दल तो बोलत होता,
तो म्हणाला:
व्हायोलिन कसं छान स्वरात लावतो न आपण ,
तसं प्रेक्षागृहाला ,
प्रेक्षकांना छान स्वरात लावायचं आहे मला ,
----
कधी कधी मला स्वप्न पडतं - म्हणाला :
तेलदिव्याच्या प्रकाशानं भरलेला रंगमंच
सगळीकडे दाटून राहिलेली ऊब
मंचावर नाटक घडतंय
मंचावारचे शब्द प्रेक्षकांकडे धाव घेताहेत,
त्यांच्या अगदी आत शिरू पाहताहेत
तेलदिव्यांच्या मशाली झाल्या आहेत
आणि अस्तित्वात आहेत फक्त : प्रेक्षक आणि नट
-----
- लिहिशील का अशी भूमिका माझ्यासाठी ?
- I hope so !
@-Mandar Purandare
प्रतिक्रिया
22 Oct 2014 - 5:48 pm | एस
खरोखरच अशी एखादी भूमिका एखाद्या नटाला डोळ्यासमोर ठेऊन लिहिली जाणे हे त्या भूमिकेचे भाग्य म्हणावे की त्या नटाचे? अनुवाद छान जमलाय, पोहोचलाय याची तूर्तास फक्त पोच.
24 Oct 2014 - 11:33 am | पैसा
अतिशय प्रभावी जमलेला अनुवाद! अनुवाद वाटत नाही इतका छान जमलाय! लेखकाचे शब्द आणि कथा प्रेक्षकांपर्यंत पोचवणारा नटच ती कथा जगतो, आणि लेखक नंतर बाजूलाच रहातो, उरतो तो नट आणि प्रेक्षक यातला संवद! कल्पना खूपच आवडली.
4 Nov 2014 - 11:07 am | इनिगोय
अनुवादित मुक्तक उत्तम जमलं आहे.
हे वाचून काशीनाथ घाणेकर ह्या मनस्वी ताकदवान नटाची आठवण झाली. स्वतःचं अस्तित्त्व आणि भूमिकेचं त्यावरचं रंगलेपन यातली अत्यंत सूक्ष्म रेखा हा माणूस फार प्रभावीपणे सांभाळत असे. हे मुक्तक म्हणजे थेट त्यांचंच मनोगत वाटलं.
4 Nov 2014 - 1:08 pm | खुशि
सुंदर.
9 Nov 2014 - 4:03 pm | सविता००१
सुरेख अनुवाद