----------------------------------------
"बर्गोमी, काय करायचं बोल! शेवटी प्रश्न आपल्या फॅमिलीच्या धंद्याचा आहे. यात उडी घेतलीच आहे तर फॅमिलीला धक्का लागता कामा नये, काय?"
"ए माल्डिनी, काय बोलतोयस? कसला धंदा? आणि हे फॅमिली, फॅमिली काय प्रकार आहे?"
"अरे दोनादोनी, सांग रे याला! लक्ष्य कधी नव्हे ते येवढं जवळ दिसतंय आणि हा मात्र.... ए, घुसळ रे याला, तू चेंडू घुसळतोस तसं."
"बर्गोमी, सध्या माल्डिनी पुझो वाचतोय रे..."
"हो का रे, मग काय आता पाब्लो माल्डिनीच्या ऐवजी डॉन कॉर्लिओनी म्हणायचं का तुला?"
"अरे नाय रे! मी पुढच्या मॅचबद्दल विचारतोय. काय करायचंय?"
"असं आहे बघ, उद्या मैदानावर जायचं. खेळायला उतरायचं. ते देतील तितके गोल खायचे आणि हरून परत यायचं. बस्स, सोप्पी स्ट्रॅटेजी!"
"आयला, हे बरं नाय हं का बर्गोमी! साला, कापितानोच असं म्हणायला लागला, तर टीमचं कसं होणार?"
"दोनादोनी, गेली पाच वर्षं चॅम्पियन आहे जर्मन टीम, ते काय उगाच? त्यात आपण स्पर्धेत पहिल्यांदा खेळतोय. चेचणार रे ते आपल्याला उद्या, हे सांगायला तुला नॉम्स्टर्दामुस पायजेल का?"
"मग काय उद्या मार खायलाच जायचं का?"
"भाईलोक्स, म्हणून तर कधीपासून विचारतोय, काय करायचं बोला! शेवटी प्रश्न आपल्या फॅमिलीच्या धंद्याचा आहे. यात उडी घेतलीच आहे तर फॅमिलीला धक्का लागता कामा नये, काय?"
"माय गॉड, पुझो पुन्हा बोलायला लागला..."
"माल्डिनी, जे होईल ते ताठ मानेने घेऊ. पहिल्याच प्रयत्नात इथपर्यंत पोहोचू असं वाटलेलं का?"
"तरी बर्गोमी, कापितानो म्हणून तू उद्याच्या गेमची स्ट्रॅटेजी ठरवायलाच पाहिजेस."
"खरंय दोनादोनी. उद्या सगळ्यात जास्त शिव्या झेंगा खाणार. तसा तो प्रत्येक गोल खाल्यावर खातोच. उद्या एरवीपेक्षा तिप्पटीने खाईल."
"हो ना? मग हे मला झेंगाला सांगितलेच पायजे."
"थांब रे, माल्डिनी....."
"ए झेंगा, उद्या उतरणार तुझा लेंगा.....!"
"काय कुचाळक्या करताय रे पोट्टेहो? तुम्ही असताना कुणाचा हात माझ्या लेंग्याच्या नाडीपर्यंत पोहोचणारे?"
"उद्याच्या मॅचबद्दल बोलतोय रे! यंदाची जर्मन टीम नेहमीप्रमाणेच भारीये..."
"मग तुम्ही दहा लोक मैदानात काय चणे खाणारात का रे?"
"होय. बर्गोमीने स्ट्रॅटेजी ठरवली नाही तर आम्ही चणे खाणार आणि तू गोल्स. शिवाय तुला बरोबर तोंडी लावायला लोणच्यासारख्या चरचरीत शिव्यासुद्धा मिळणारेत, एकदम फ्री! बरोबर ना दोनादोनी?"
"हे बाकी खरंय रे..."
"अरे, तुम्ही तुमचं काही म्हणणं सांगा की मग..."
"माझं मत सरळ आहे. दोनादोनी, तू मिडफिल्ड सांभाळ. चेंडू माल्डिनीकडे सरकव म्हणजे माल्डिनी गोल मारेल नि चेंडू बर्गोमीकडे सरकला की तो डिफेन्ड करेल. माझ्यापर्यंत कुणाला येऊच देऊ नका म्हणजे झेंगा रहेगा चंगा ही चंगा! हॅ! हॅ! हॅ!"
"हो रे हो, जर्मन टीमचे माथायुस, क्लिन्जमन, जोकिम, ब्रॅह्म आणि म्युलर, सग्गळे चणे- फुटाणे खात बसणारेत मॅचमध्ये, नाही का?"
"म्हणूनच विचारतोय ना, शेवटी प्रश्न आपल्या फॅमिलीच्या धंद्याचा आहे. यात उडी घेतलीच आहे तर फॅमिलीला धक्का......"
"ए बाबा शांत रहा बरं. आपण प्रत्येकाने आपापलं काम नीट केलं तरच आपला टिकाव लागणार आहे."
"बरोबर आहे रे बर्गोमी, ते तर करूच पण उद्याच्या मॅचमध्ये वाईट्ट हरण्यापासून कसं वाचता येईल?"
"दोनादोनी, मग काय करायचं?"
"हे बघ, डी'नापोली, डी'ऑगस्टिनी आणि पाग्लिउका तुला डिफेंडींग करायला मदत करतील, विआली, सेरेना आणि टाक्कोनी मिडफिल्डमध्ये माझ्याबरोबर राहतील आणि माल्डिनीला शिल्लाची मदत करेल. झेंगा गोलपोस्टवर असेलच. काय माल्डिनी?"
"लेकाच्यांनो पण हे पुरणार आहे का?"
"पुरेल न पुरेल, आणखी काय करणार?"
"बर्गोमी, माझ्याकडे एक आयडिया आहे. त्याप्रमाणे केलं तर आपण जिंकूही शकू."
"काय सांगतोस माल्डिनी? ते कसं शक्यंय?"
" मी जर्मन संघाला अशी ऑफर देईन की ते ती नाकारूच शकणार नाहीत.”
"आयला, बोलला, पुन्हा पुझो बोलला..."
"डॉन माल्डिनी, आपण आपले आदर्श, तरूण, तडफदार, देशभक्त डॉन कॉर्लिओनी, यांच्याकडून प्रेरणा घेऊन अंडरवर्ल्डच्या मदतीने मॅच फिक्सिंग वगैरेंच्या विचारात आपल्या स्वतःच्या टाळक्याचा फुटबॉल तर करून घेत नाही आहात ना?"
“नाय रे भाई, म्हणजे मी अशी योजना आखेन की जर्मन टीम तिच्या परिणामापासून वाचूच शकणार नाही."
"काय करणारेस तू, माल्डिनी?"
"मैं जो डावे हात से करताय वो उजवे हात को पता नही चलताय. झेंगा, चल माझ्याबरोबर. बरीच झाली प्रॅक्टीस. आता माझी पेटली."
"दबंग आणि सिंघमसुद्धा मारियो पुझोने लिहिलेले का रे, दोनादोनी?
---x---
"बर्गोमी, आपण धुपणार रे आता...."
"काय झालं दोनादोनी? आपण चांगलं खेळलो की!"
"तसं नाही रे. माल्डिनीने काय केलं कळलं?"
"साला, गेम सुरू असताना डिफेंडींग करण्यातून वेळ झाला तर बघेन ना मी. त्यात कोचचे हातवारे, खाणाखुणा! शिंचा भुगा होऊन बसला भेज्याचा... आता सांगतोस का?"
"तू बघितलं नाहीस का जर्मनांकडे? कसले चुळबुळत, खाजवत खाजवत खेळत होते? कधी असे खेळतात का ते? जणू खरारा चाललेला..."
"आयला हो रे! मलाही वाटलं तसं. त्यांचे पासेस् चुकत होते, आपल्याला गोल करायचा चान्सही देत होते. त्यांना मिळालेले दोन चान्स मात्र त्यांनी घेतले. ते ही नसतं होऊ शकलं पण आपण माल्डिनी आणि झेंगालाच हाफ टायमात बदललं ना! पण आपण एकूण बरे खेळलो. जर्मनांच्या विरुद्ध २-० हार म्हणजे काही फारसं वाईट नाही. स्पर्धा राऊंड रॉबिन असल्याने ही मॅच हरूनही आपण फायनलला आलोत. ते ही पहिल्याच प्रयत्नात..."
"दिसतं तसं नसतं, बर्गोमी...."
"असं का म्हणतोस?"
"हाफ टायमात माल्डिनी आणि झेंगाला कोचनं पकडलं. मॅचच्या सुरूवातीला त्यांनी जर्मन टीमवर आणि त्यांच्या सामानावर खाजखुजलीची पावडर टाकली."
"आँ? काय सांगतोस?"
"म्हणून तर त्यांना शिक्षा केली कोचनी आणि हाफ टायमानंतर बाहेर बसवलं. नशीब जर्मनांनी आयोजकांकडे तक्रार केली नाही."
"हे देवा! माल्डिनीची आयडीया 'ही' होती होय?"
"जर्मन कोचने आपल्या कोचना सांगितलंय, फायनलला भेटू, म्हणून...."
"चल, आपल्या कोचना भेटू. विचारू, फायनलला आहेत का दोघे?"
"आहेत. त्या दोघांनाही फायनलला खेळवण्याच्या अटीवरच जर्मनांनी तक्रार केलेली नाही."
"अँ? काय विचार काय आहे त्यांचा?"
---x---
"आज आपल्या शाळेच्या क्रीडा विभागासाठी फारच आनंदाचा दिवस आहे. गेली दोन वर्षं पाटील सरांनी केलेल्या मेहनतीचं फळ आज मिळालं असं म्हणता येईल. शाळेच्या वीस वर्षांच्या इतिहासात कधीही न केलेला पराक्रम यंदाच्या मुलांनी केलेला आहे. पदार्पणातच आंतरशालेय बिपीन फुटबॉल चषकामध्ये त्यांनी उपविजेतेपद मिळवलं आहे. तुम्हाला माहितीच आहे की गेली दोन वर्षं आपण आपला फुटबॉल संघ बांधण्याचा प्रयत्न करतोय. मला पाटील सर म्हणालेले की मुलं इटालियन संघाचे फॅन बनलेत. त्यांनी स्वतःसाठी इटालियन नावंही घेतली आहेत. मला खरच त्यांच्या डेडिकेशनबद्दल आणि झोकून देण्याच्या प्रवृत्तीबद्दल त्यांचा अभिमान वाटतो. या त्यांच्या पहिल्याच स्पर्धेमध्ये मुलांनी सुंदर खेळ केला. गेल्या पाच वर्षांच्या विजेत्या संघाला आधीच्या राऊंडमध्ये एकदम टफ फाईट दिली. पण स्पर्धेच्या फायनलमध्ये मुलं ढेपाळली. हरकत नाही. त्यांचा फायनलचा हा पहिलाच अनुभव होता. या अनुभवापासून धडा घेऊन पुढल्या वर्षी ते आपली कामगिरी नक्कीच सुधारतील अशी मला खात्री आहे. मी पुन्हा एकदा आमच्या फुटबॉल संघाचं आणि विशेषतः त्यांच्यावर मेहनत घेणार्या पाटील सरांचं अभिनंदन करतो आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देतो."
---x---
"माल्डिनी, झेंगा, ऐकताय ना?"
"होय सर."
"फायनलला आपण १८-० हरलोय. प्रिन्सिपॉल देशमुख सर म्हणतायत त्याप्रमाणे आपल्याला सुधारणेला खूप वाव आहे, नाही का?"
"..............."
---x---
प्रतिक्रिया
22 Oct 2014 - 5:55 pm | एस
आधी नुसताच चाळला होता, आता वाचून सगळे संदर्भ लक्षात आले आणि फुटलो! क्या लिवताय तुम! लय भारी प्रासराव! लेख जरा अनुक्रमणिकेच्या तळाला असल्याने फारसे प्रतिसाद अजून कुणी दिले नाहीयेत. तरी हरकत नाही. पुन्हा अनेकवेळा वाचणार आहे. मस्त! भन्नाट.
हे तर जबरदस्तच! :-D
23 Oct 2014 - 11:25 am | पैसा
लै भारी! वाचता वाचता ह.ह.पु.वा.!!
23 Oct 2014 - 8:09 pm | स्वप्नज
वाचायला सुरुवात केली, पण कंटाळवाणे वाटले. पुढे वाचणार नव्हतो,पण प्रतिसाद वाचल्यावर जाणवले की लेखन वाचनीय असावे. म्हणून पुर्ण वाचला आणि ह.ह.पु.वा.... खरंच अप्रतिम लेखन. ( स्वॅप्स भाऊ आणि पैसाताईंचे आभार)
25 Oct 2014 - 9:14 am | पैसा
"यशस्वी खेळाडू कसे व्हावे" मालिकेतला लेख वाटला काय तुम्हाला?
बाकी या कथेला प्रासभाऊंच्या स्वानुभवाचा आधार आहे का काय अशी शंका एकदा मनात डोकावून गेली! :D
25 Oct 2014 - 9:55 am | एस
तुम्ही या पैतैंकडे लक्ष देऊ नका. काल्पनिक कथांनाही सत्यात काहीतरी आधार शोधायची त्यांची जुनीच खोड आहे! :-D लईच शंकेखोर हैती त्या. ;-)
26 Oct 2014 - 6:23 pm | सविता००१
मस्तच लिहिलं आहेस रे. खरच ह्.ह.पु.वा.
27 Oct 2014 - 10:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
म्या पामरानी चुकुन संपादिका वाचलं हो ;)...लेख मस्तय ह.ह.पो.दु.पु.झा.
28 Oct 2014 - 9:44 pm | सस्नेह
भारी डायलोग्ज ! इथे ओशाळला मारिओ पुझ्झो..
30 Oct 2014 - 1:57 pm | झकासराव
हाहाहाहा :)
30 Oct 2014 - 4:01 pm | आतिवास
आधी थोडा कंटाळा आला होता. पण तरीही नेटाने लेख वाचला - आणि सार्थक झालं.
मस्त जमलाय लेख!