शाळेत असताना मिरासदारांची साक्षीदार ही कथा आम्हाला धडा म्हणून होती. तेंव्हापासून तो सक्षीदार मनात घर करुन होता पण मिरासदारांची पुस्तके वाचण्याचा योग बरीच वर्षे काही आला नाही. साक्षीदार मात्र मनात पक्का भरला होता. मराठी आणि इंग्रजी मधे बराच वाचन प्रवास करुन झाल्यानंतर त्या साक्षीदाराने परत आपल्या अस्तित्वाची साक्ष दिली. यावेळेला मी क्षणाचाही विलंब न करता बुकगंगावर ‘मिरासदारी’ची ऑर्डर दिली. त्यानंतर मग ‘चकाट्या’, ‘भोकरवाडीच्या गोष्टी’, ‘माझ्या बापाची पेंड’ सारे घरी घर करुन गेले. मराठीत ग्रामीण कथा म्हटली की जी काही मोजकी नावे डोळ्यासमोर येतात त्यात द. मा. मिरासदार हे नाव फार मोठे आहे. मराठी विनोदी ग्रामीण कथेचे शिवधनुष्य या माणसाने गेली कित्येक वर्षे लीलया पेलले आहे. त्यांच्या कथा वाचल्यावर केवळ ग्रामीण विनोदी कथा लेखन करुन ह्या माणसाने इतके वर्षे मराठी साहित्यात स्वतःचे असे वेगळे स्थान का निर्माण केले ह्याचे उत्तर मिळते. एक वाचक म्हणून मला भावलेली मिरासदारांच्या कथेची वैशिष्ट्ये, लकबी याचा घेतलेला हा आढावा.
मिरासदारांच्या कथेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या कथेतून कधी कुणाची बाजू घेत नाहीत, त्यात स्वतःचा दृष्टीकोण, स्वतःचा मुद्दा मांडत नाहीत तर ते जे घडले तसेच लिहीत जातात. बऱ्याचदा कथाकार स्वतःचा मुद्दा, दृष्टीकोण पात्रांच्या तोंडून मांडतो तर कधी कथेच्या निवेदनातून मांडतो. उदा. वपुंनी मध्यमवर्गीय जीवनावरच्या कथा लिहिताना त्यांचे मत, त्यांचे तत्वज्ञान पात्रांच्या तोंडी दिले. मिरासदार तसे करीत नाहीत त्यामुळेच त्यांची पात्रे अगदी अस्सल वाटतात कुठेही साहित्यिक वाटत नाहीत. त्यांच्या कथा कुठेही उगाचच ‘जीवनविषयक सूत्र’ वगेरे सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत. तसेच मिरासदार मी ग्रामीण जनतेच्या समस्या वेगरे मांडतोय असा आव नाहीत किंवा ‘ब्लॅक कॉमेडी’ या सारख्या प्रकारांच्या मागे लागत नाहीत. काहींना कदाचित त्यामुळे त्यांच्या कथेत साहित्यिक मूल्य कमी आहे असे वाटू शकते. मुळात प्रत्येक साहित्यात काहीतरी तत्वज्ञान असले पाहिजे, काहीतरी संदेश असला पाहिजे हा अट्टहासच का? काही साहित्य केवळ निखळ आनंदासाठी सुद्धा असू शकते. तसेही माणसाला जगण्यासाठी शंभरात नव्याण्णव वेळा या निखळ आनंदाची गरज असते आणि कधी एखादे वेळेस तत्वज्ञानाची गरज भासते. मिरासदार निखळ आनंदाची गरज व्यवस्थित पूर्ण करतात.
मिरासदारांच्या कथेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कथानक, ते कधीही ओढून ताणून आणलेले वाटत नाही. त्यांचे कथानक फार असे क्रांतिकारी, चित्तथरारक किंवा गुंतागुंतीचे नसून तो एक सरळ साध्या सोप्या घटनांचा सुरेख आलेख असतो. ‘शिवाजींचे हस्ताक्षर’ मधे शिवाजी महाराजांना लिहिता येत होते की नाही या विषयावर बाबा आणि गुरुजी यांच्यातल्या तात्विक लढाईत मधल्या मधे त्या मुलाची कशी ससेहोलपट होते ह्याचे मिरासदार गमतीदार चित्रण करतात. ही कथा वाचताना माझ्या लहाणपणी रामाचे आडनाव काय या विषयावरुन आमच्या वाड्यात झालेली चर्चा आठवली. सांगायचा मुद्दा हाच की त्यांच्या कथेत घडणारे कथानक हे कुठेही घडू शकते ते अगम्य वगेरे असे नसते. कथानक जरी सरळ असले तरी तेच त्यांच्या कथेचे मुख्य सूत्र असते, ते उगाचच समांतर कथानक जोडत नाही. मुख्य कथानकाच्या प्रवाहातूनच सारी विनोद निर्मिती होत राहते. कधी तो ‘माझ्या बापाची पेंड’ सारखा विनोदी विषय असतो तर कधी शेतातून जाणारा नवीन रस्ता यासारखा रुक्ष विषय असतो. त्यांनी कथेचे निवडलेले विषय ग्रामीण जीवनात चपखल बसनारे असतात. कुत्रा चावल्यानंतर चौदा इंजेक्शन घ्यायचे असतात, तेंव्हा तो कुत्रा कावलेला आहे की नाही ह्याची खात्री करुन घेताना घडलेली गंमत किंवा फोटो काढल्यावर आपण फोटोत कसे दिसू ह्याची ग्रामीण माणसाला असलेली उत्सुकता, हे असे विषय आणि यातून घडणारे नाट्य कुठेही ओढूण ताणून आणलेले वाटत नाही. भूत, गुप्तधन हे ग्रामीण जीवनाशी निगडीत विषयही मिरासदारांच्या कथेत बऱ्याचदा येतात. मिरासदार कुठेही या भाकडकथांचे समर्थन करीत नाहीत पण तसे करताना ते उगाचच उपदेशकची भूमिका मात्र घेत नाही.
मिरासदारांच्या कथेच तिसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथेतली पात्रे कथानकापेक्षा मोठी होत नाहीत. पात्रे ही कथा पुढे सरकवायला मदत करतात पण कथेपेक्षा श्रेष्ठ होत नाहीत. ग्रामीण कथा म्हणून मिरासदार इरसाल पात्रांची ढीगभर वर्णन लिहीत बसत नाहीत. पात्रांचे पेहराव, त्यांची स्वभाववैशिष्टे मिरासदार सांगत बसत नाहीत तर ती पात्रे ज्याप्रकारे वागतात त्यावरुन आपल्या डोळ्यापुढे ती पात्रे उभी राहतात. कदाचित ते चित्र मिरासदारांनी कल्पिलेल्या चित्रापेक्षा वेगळे असेल पण प्रत्येकाला स्वतःचे चित्र रंगवायचे स्वातंत्र्य असते. मूळ कथा बाजूला सारुन ते उगाचच पात्रांच्या इरसालपणाचा आधार घेउन विनोदनिर्मिती करीत बसत नाही. ते पात्रे उभी करीत नाही असे नाही. भोकरवाडीच्या गोष्टीमधे शिवा जमदाडे, नाना चेंगट, गणा मास्तर, बाबू पैलवान अशी कितीतरी पात्रे मिरासदार रेखाटतात. प्रत्येक पात्राची आपली आपली वैशिष्ट्ये आहेत. गणा मास्तर संमजस, शिकलेला, सारासार विचार करणारा, रोज पेपर वाचणारा असा व्यकती असतो तर नाना चेंगट थोडासा आळशी, निरोप्या, गावच्या चौकशात जास्त रस घेणारा आणि साऱ्या गावातल्या बायांच्या रागाचे कारण असा व्यक्ती असतो. शिवा जमदाड्याला तुकाबाचे अभंग म्हणायाची खोड असते तर बाबू पैलवान हा मारुतीसारखाच मारुतीचा भोळा भाबडा भक्त असतो. पुस्तक वाचताना प्रत्येक पात्र त्याच्या लकबीसहीत आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. हे करीत असताना कुठेही ही पात्रे त्या कथेतल्या कथानकापेक्षा मोठी होत नाही. मुळात कथा लिहीताना व्यक्ती चित्रणापेक्षा मिरासदार कथेलाच जास्त महत्व देतात. त्याला काही कथा ‘साक्षीदार’ किंवा ‘नव्याण्णवबादची सफर’ ह्या अपवाद असतील पण ते अपवादच. या कथांच कथानकच मुळात त्या पात्रांच्या इरसालपणावर आधारित होते त्यामुळे इथे ती पात्रे कथेपेक्षा मोठी वाटतात.
ग्रामीण कथा म्हटली की त्यात ग्रामीण जीवनाची शहरी जीवनाशी तुलना आणि त्यातून घडणारी विनोद निर्मिती असते परंतु मिरासदार हा आधार घेत नाहीत. त्यांची कथा ही ग्रामीण माणसांची गावातच घडणारी कथा असते. ते कधीही शहरी जीवनाशी तुलना करून शहरापेक्षा ग्रामीण जीवन किती गोड असला भाबडा आशावाद दाखवीत नाहीत. शहरी माणसाची गावात होणारी फजिती किंवा ग्रामीण माणसाची शहरातल्या सुसंकृत समाजात होणारी हसवणूक असे काही मिरासदारांच्या कथेत घडत नाही. बऱ्याच ग्रामीण विनोदी कथा वरील विषयांच्याच अनुषंगाने लिहिलेल्या असतात पण मिरासदार याला तडा देतात आणि स्वतःचा एक वेगळा असा मार्ग निवडतात. आमच्यासारख्या शहरी वाचकाला मिरासदारांचे हे वेगळेपण हळूहळू जाणवायला लागते आणि मग आवडायला लागते.
आचार्य अत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे विनोदनिर्मितीची तीन शस्त्रे आहेत उपहास, विसंगती आणि अतिशयोक्ती. मिरासदार उपहासाच्या मार्गाने फारसे जात नाहीत, त्यांची कथा ही विसंगतीवरच जास्त अवलंबून असते. मग ही विसंगती काहीही असू शकते माणासाच्या स्वभावातली विसंगती, दोन माणसामाणसातली विसंगती, परिस्थिती आणि माणूस यातली विसंगती. मिरासदार मिळेल तशी ही विसंगती टिपत जातात. जगाला मूर्ख वाटणारा साक्षीदार साऱ्या जगापेक्षा इरसाल असतो ही विसंगती मिरासदार ‘साक्षीदार’ या कथेत टिपतात. ‘स्वभाव’ या कथेत मी कुणाला काही सांगणार नाही करीत कथेची नायिका साऱ्या गावाला बातमी देउन येते. पोलीस तपास या कथेच पोलीसाचा पोलीस तपास करण्याचा प्रामाणिक हेतु आणि ग्रामीण भागात येणारे अडथळे, आव्हाने यातील विसंगती टिपलेली आहे. दरोडा टाकून झाल्यावर त्यातून जर नफा होत नाही आहे हे लक्षात आले तर ते पैसे परत करायची विसंगती मिरासदारांच्याच कथेत येउ शकते. ‘निरोप’, ‘शाळेतील समारंभ’, ‘माझी पहीली चोरी’ या कथा अतिशयोक्तीवर आधारीत आहेत.
मिरासदार कथा सांगत नाहीत तर ते कथा दाखवितात. त्यांचे निवेदन हे दृक माध्यमाच्या अधिक जवळ जाणारे असते. कदाचित याच कारणाने मिरासदार ‘एक डाव भुताचा’ किंवा ‘गोष्ट धमाल नाम्याची’ यासारख्या धमाल विनोदी चित्रपटांची पटकथा सहज लिहू शकले असतील. सासु सुनेच्या दुष्ट चक्रात अडकलेल्या टिव्हीला सोडवायला पटकथेसारख्या लिहिलेल्या मिरासदारांच्या कथा कदाचित उपयोगी पडू शकतील. मिरासदारांची निवेदन शैली वाचकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत नाही तर ती त्याला कथेतच गुंतवुन ठेवण्याचा प्रयत्न करते. ते पात्रांच्या मनात काय चाललेय हे सांगण्यापेक्षा पात्रांच्या आजूबाजूला काय घडतेय यावर जास्त भर देतात. त्यांची निवेदनाची भाषा ही सरळ सोपी आणि सहज आलेली वाटते. साधा विषय, त्याची सुलभ मांडणी, सोपी भाषा यामुळे मिरासदारांची कथा ही प्रत्येक वेळेला पोट धरुन हसवत जरी नसली तरी मनाला निखळ आनंद देऊन जाते हे नक्की.
-मित्रहो
प्रतिक्रिया
21 Oct 2014 - 2:11 pm | स्पा
अजूनही मिरासदारी वाचताना तेवढेच हसू फुटते , आणि तेवढेच अंतर्मुख व्हायला होते
मिरासदारीची जादू काही वेगळीच हे नक्की
22 Oct 2014 - 1:39 am | सुहास झेले
अगदी अगदी... कालच पुन्हा अनुभवली मिरासदारी... कितव्यांदा माहित नाही :)
21 Oct 2014 - 5:06 pm | प्रभाकर पेठकर
'दमां'चे लिखाण मन गुंतवून ठेवणारे असते. एकदा सुरु केलेले पुस्तक संपवत नाही तो पर्यंत अस्वस्थ वाटते. ग्रामीण जीवनाची फार जवळून ओळख होते. खेडेगावातील चित्र वेगळे असले तरी परके वाटत नाही उलट त्यांच्या साधेपणाचा हेवाच वाटतो.
21 Oct 2014 - 7:35 pm | एस
फार ओघवते लिहिले आहे. दमा हे आवडते लेखक आहेतच. पण
ह्याच्या अनुषंगाने येणारे मुद्दे म्हणजे 'दमां'ची कथा हे करत नाही, ते करत नाही हे किंचित जास्तवेळा येते आणि थोडासा रसभंग होतो. 'दमा' आणि इतरही विनोदी लेखनप्रकार हाताळणार्या लेखकांना साहित्यिक म्हणून अभिजनांनी काहीशी नाके मुरडली. पण तुम्हांआम्हांसारख्या त्यांच्या चाहत्यांना त्यामुळे काहीच फरक पडत नाही हे जास्त महत्त्वाचे. बाकी लेख प्रचंड सुंदर लिहिलाय हेवेसांनल! धन्यवाद!
21 Oct 2014 - 8:30 pm | मित्रहो
तुम्ही सांगितल्यावर आता मलाही जाणवायला लागलेय की दमा काय करीत नाही हे जरा जास्त आलेय. त्यापेक्षा काय करतात ह्यावर अधिक भर द्यायला हवा होता. पुढल्या वेळेला तुमची ही सूचना नक्कीच लक्षात ठेवील.
21 Oct 2014 - 9:19 pm | बोका-ए-आझम
मिरासदार कथा सांगत नाहीत तर ते कथा दाखवितात. त्यांचे निवेदन हे दृक माध्यमाच्या अधिक जवळ जाणारे असते. कदाचित याच कारणाने मिरासदार ‘एक डाव भुताचा’ किंवा ‘गोष्ट धमाल नाम्याची’ यासारख्या धमाल विनोदी चित्रपटांची पटकथा सहज लिहू शकले असतील. सासु सुनेच्या दुष्ट चक्रात अडकलेल्या टिव्हीला सोडवायला पटकथेसारख्या लिहिलेल्या मिरासदारांच्या कथा कदाचित उपयोगी पडू शकतील.
शंभर टक्के सहमत. सध्या विनोदाच्या नावाखाली जो हास्यास्पद गोंधळ सगळ्या वाहिन्यांवर चाललेला असतो, त्याला मिरासदारांच्या कथा नक्कीच सुसह्य करू शकतील. पण कोणत्याही वाहिन्यांच्या कार्यक्रम निवड करणा-या अधिका-यांचा अाणि अकलेचा काही संबंध नसला पाहिजे अशी प्राथमिक अट असल्यामुळे तसे होणे कठीणच दिसते.
21 Oct 2014 - 10:10 pm | रेवती
कथा एकेक करून आठवत गेल्या. छान वाटले.
21 Oct 2014 - 10:29 pm | सस्नेह
'मिरासदारी' चे सुबक रसग्रहण !
'माझ्या बापाची पेन्ड' सर्वात जास्त आवडीची. अजूनही वारंवार वाचायला आवडते.
22 Oct 2014 - 12:24 pm | सौंदाळा
सुंदर रसग्रहण,
माझ्या काकुला मिरासदार शिकवायला होते (कदाचित गरवारे कॉलेज) ती अजुनही त्यांच्या आठवणी सांगत असते.
ग्रामीण विनोदी कथांमधे मिरासदारांचा हातखंडा आहेच.
मात्र मिरासदारीमधल्याच 'कोणे एके काळी', 'स्पर्श', 'गवत' वगैरे गंभीर कथा वाचल्या तरी त्यादेखिल तितक्याच ताकदीने लिहिल्या आहेत. तेवढ्याच परिणामकारक आहेत.
22 Oct 2014 - 1:05 pm | मुक्त विहारि
१ नंबर...
मला त्यांची एक कथा खूप आवडते.सुदैवाने त्यांचे कथाकथन "यु ट्युब" वर उपलब्ध असल्याने कधी कंटाळा आलाच तर लगेच कथेच आस्वाद पण घेता येतो.
तुम्हाला पण ही कथा नक्की आवडेल. लिंक देत आहे...
https://www.youtube.com/watch?v=pQnXz7IcCBo
23 Oct 2014 - 10:40 pm | मित्रहो
यापलीकडे मी पण मला कंटाळा आला तर ही लिंक नक्की बघत जाइन.
23 Oct 2014 - 11:25 pm | बोबो
माझेसुद्धा आवडते लेखक :)
24 Oct 2014 - 8:27 am | चौकटराजा
मिरासदार स्वतः त्यांची कथा फार सफाईने सादर करीत. एकूणात त्यांचे " ते" त्रिकूट फार उच्च दर्जाचे होते. सलाम !
24 Oct 2014 - 11:38 am | पैसा
मिरासदार अत्यंत आवडते लेखक. द.मा., शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगुळकर यांना प्रत्यक्ष पाहण्यचे भाग्य लाभले आहे. त्यानंतर मिरासदारांच्या कथांनी खूप हसवले आहे. त्यातली एकाच वेळी बेरकी आणि निरागस असणारी पात्रे अत्यंत जिवंत वाटतात. मिरासदारांच्या सगळ्या कथा अतिशय चित्रदर्शी असल्या तरी त्यांना पडद्यावर न्याय देईल असा समर्थ निर्माता दिग्दर्शक मराठीत आहे का, असेल तरी व्यावसायिक गणिते जुळवताना त्या कथांचे काय होईल असे अनेक प्रश्न पडतात.
लिखाण अतिशय सुंदर झालंय. धन्यवाद!
27 Oct 2014 - 10:54 pm | मित्रहो
कदाचित बरेच असतीलही, शाळामुळे उदाहरण डोळ्यासमोर येते ते सुजय डहाके चे.
28 Oct 2014 - 1:28 am | सानिकास्वप्निल
माझ्या बापाची पेंड ऑल टाईम फेव्हरीट आहे :)
मस्तं लिहिले आहे, लेख आवडला.
28 Oct 2014 - 3:43 am | पिवळा डांबिस
चांगला लेख.
द. मा. हे आवडत्या लेखकांपैकी एक आहेत.
30 Oct 2014 - 6:11 pm | झकासराव
छान लेख.
अगदी नेमकेपणाने मांडलं आहे. :)
मला (नागु गवळी आणि त्याची) झोप ही कथा वाचताना चक्क हसुन हसुन बेजार होउन मध्येच वाचन थांबवाव लागलेलं.
झोपेचा व्हायरल फेव्हर आमच्या चारही रुम पार्टनरना झालेला.
1 Nov 2014 - 5:26 pm | मित्रहो
धन्यवाद झकासराव
काल झोप ही कथा परत वाचली.
साऱ्या वाचकांचे धन्यवाद
आजही मिरासदारांच्या कथा आणि त्यांच्या कथेविषयी वाचले जाते हेच मिरासदारांच्या कथेचे यश आहे.