नुकतीच वर्तमान पत्रात बातमी वाचली की "आता प्रजनन करण्या साठी पुरुषांची गरज लागणार नाही. क्लोनिंगच्या सहाय्याने आता पुनरुत्पादन करणे शक्य आहे." आणि माझ्या पोटात एक मोठा गोळा आला. कारण पुरुषजातीचे अंध:कारमय भविष्य मला स्पष्ट पणे दिसू लागले. इतके दिवस माझ्या मनात जो संशय होता त्याला या बातमीमुळे बळकटीच मिळाली होती. स्त्रीजातीचे अनेक वर्षांपासून सुरु असलेले कारस्थान यशस्वी होण्याची वेळ अगदी जवळ आली आहे या बद्द्ल माझ्या मनात कोणताही संशय उरला नाही. आता पुरुषजात नष्ट होण्यास आता फारसा अवधी उरला नाही. पुरुषांचे दिवस आता संपले आहेत. सोप आहे मित्रांनो, नीट विचार करा, पुरुषांना दुसरा पुरुष निर्माण करण्या साठी अजूनही एका स्त्रीची गरज लागणार आहे. त्या प्रक्रियेतही पुरुषाचे पुनरुत्पादन होण्याची शक्यता केवळ ५०%च असते. पण स्त्रियांची मात्र ती गरज आता संपली आहे. क्लोनिंगच्या सहाय्याने १००% स्त्रियांचे पुनरुत्पादन हे केवळ काही दिवसच दूर आहे. स्त्रियांनी आतापर्यंत पुरुषांना टिकवून ठेवले आहे ते स्त्रियांच्या पुनरुत्पादना साठीच. ती गरज एकदा संपली की मग त्या पुरुषांना नष्ट करण्याची एकही संधी स्त्रिया सोडणार नाहीत याची मला १००% खात्री आहे.
सुरुवातीला मला केवळ संशय होता. पण जसजसा मी सखोल विचार करत गेलो आणि जे परिस्थितीजन्य पुरावे माझ्या समोर आले त्या नंतर माझी खात्रीच पटली आहे. "पुरुषजमात लवकरच नामशेष होणार आहे". म्हणूनच मी आता जिवावर उदार होउन माझ्या सगळ्या मित्रांना कळकळीचे आवाहन करतो आहे की जागे व्हा. स्वतःचे अस्तित्व टिकवण्या साठी, पुरुषवंश पुढे चालण्या साठी एकत्र या आणि या स्त्रियांचे कारस्थान उलथवून टाकण्याचे कसोशीने प्रयत्न करा. मी कदाचित तुम्हाला वेडसर, मुर्ख वगेरे वाटत असेन. किंबहुना तुम्हाला तसे वाटणे काहीही गैर नाही. कारण तुमच्या डोळ्यांवर एक छानशी सुंदरशी झापड लावण्यात आली आहे. तुम्ही जे जग बघता ते केवळ आणि केवळ बायकांच्या नजरेतून. स्त्रिया जेवढं दाखवतील तेच आणि तेवढेच बघण्यावाचून कोणताही पर्याय पुरुषांपुढे नसतो. त्यामुळे पुरुषांना काही वेगळे अस्तित्व असते, पुरुषांच्या काही वेगळ्या गरजा असतात याचे तुमचे भान सुटून गेले आहे. स्वतंत्रपणे विचार करण्याची तुमची क्षमता या स्त्रियांनी पध्दतशीर पणे हिरावून घेतली आहे. तुम्हाला माहित आहे का? हत्तीला त्याच्या लहान पणापासूनच साखळदंडाला जखडून ठेवतात. लहान असताना तो हे बंधन तोडण्याचा जीवापाड प्रयत्न करतो. पण अयशस्वी होतो. आणि मोठा झाल्यानंतर आपण हा साखळदंड तोडू शकतो हा विचारच मुळी त्याच्या मनात येत नाही. त्या वेळी कुत्र बांधायची साखळी जरी त्याच्या पायात अडकवली तरी पुरते. मित्रांनो तुमची अवस्था त्या साखळदंडाने जखडलेल्या हत्ती सारखी झाली आहे. उठा तोडुन टाका ती स्त्रियांनी घातलेली बंधने. मुक्त व्हा आणि स्वतंत्र पणे विचार करा. तेव्हाच माझे म्हणणे तुम्हाला पटू लागेल.
नीट विचार करा मित्रांनो, लहानपणी तुम्ही तुमच्या आईच्या ताब्यात असता. लहान किंवा मोठी बहीण असली तरी ती तुम्हाला तिच्या तालावर नाचवत असते. लग्न झाले की आई तुम्हाला तुमच्या बायको कडे सोपवते. बायको पण तुमच्याशी तुमच्या आई पेक्षा काही वेगळे वागत नाही. तुम्ही कसे बावळट आहात, तुम्हाला कसे काही समजत नाही आणि माझ्याच सल्ल्याने चालल्याने तुमचा कसा फायदा आहे हे सतत ती तुम्हाला पटवुन देत असते. लक्षात ठेवा दोघी जणी जरी तुमच्या समोर एकमेकींशी भांडत असल्या तरी त्या बायकाच आहेत. आतून त्या एकमेकींना मिळालेल्याच असतात. डोळस पणे लक्ष ठेवाल तर याचे अनेक पुरावे तुम्हाला तुमच्या घरातच सापडतील. म्हातारपणी तुम्ही सुनेच्या किंवा मुलीच्या ताब्यात जाता. त्या वेळीही तेच ज्ञानामृत पाजण्याचा कार्यक्रम अखंड पणे चालू असतो. म्हणजे आयुष्यभर एका स्त्रीकडून तुमचा ताबा दुसर्या स्त्रीकडे जातो. पण त्या तुम्हाला स्वतःच्या ताटाखालचे मांजर बनवण्याचा कशोशीने प्रयत्न करत असतात. तुम्ही सतत आणि सतत त्यांच्यावरच कसे अवलंबून रहाल याची त्या सदोदित काळजी घेत असतात. नीट विचार करा मित्रांनो. मी सांगतो म्हणुन नव्हे, तर आपला आपण स्वतंत्र पणे, कोणत्याही स्त्रीचा सल्ला न घेता.
आता तुम्ही म्हणाल की स्त्रिया असे करणार आहेत याला पुरावा काय? आता पर्यंत तर स्त्रिया पुरुषप्रधान संस्कॄती मधेच वावरत होत्या मग असे एकदम काय झाले की त्या पुरुषांविरुध्द बंड करुन उठल्या? तर मी असे म्हणेन की स्त्रिया कधीच पुरुषांच्या वर्चस्वा खाली नव्हत्याच. त्या सगळ्या म्हणायच्या गोष्टी. इतिहास नीट पणाने वाचला तर तुमच्या सहज लक्षात येईल. स्त्रियांमुळे अनेक युध्दे झाली पण त्यात बळी कोण गेले? पुरुषच ना? कधी ऐकले आहे पानिपतावर स्त्रियांचे घनघोर युध्द झाले आणि त्यात लाखो स्त्रिया मारल्या गेल्या? नाही ना? का बरे? असे का व्हावे?
तर पुरुषप्रधान संस्कृती कधी नव्हतीच मुळी. ती बायकांनी पध्दशीर पणे पसरवलेली एक अंधश्रध्दा आहे. असे म्हणणे म्हणजे पुरुषांविरुध्द अनेक शतकांपासून खदखदत आलेल्या असंतोषाचा परिपाक आहे. आणि आपण पुरुषही भोळे पणाने त्यांच्या या नाटकी प्रचाराला बळी पडतो. मला तर आत्तापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीचा एकही पुरावा मिळु शकला नाही. पण या लेखात मी स्त्रियांच्या या कारस्थानाचे अनेक पुरावे सादर केले आहेत, व अजून असेच हजारो पुरावे माझ्या कडे तयार आहेत. गरज आहे ते माझ्या पुरुषमित्रांनी डोळस पणे त्यांच्या कडे पहाण्याची.
तुम्ही कधी नीट पाहिले आहे का की दोन बायका समोरासमोर आल्या की एकमेकींशी काहीतरी कुजबुज करतात. दोन पुरुष अशी कुजबुज करताना मी कधी पाहिलेले नाहित. पुरुष जरा जवळ गेले तर मात्र त्या एकदम गप्प बसतात. विचारलं तरी काहीही सांगत नाहीत आणि हे अगदी नऊवारी घातलेल्या स्त्रीसमोर जीन्स टीशर्ट घातलेली स्त्री आली तरी कुजबुज ही चालतेच. हे म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून गुप्त संदेशांची देवाणघेवाण चाललेली असते. जगातल्या सगळ्या बायका एकमेकींशी घट्ट बांधल्या गेलेल्या असतात. परदेशी स्त्रिया सुध्दा एकमेकांमधे कुजबुजत बोलताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे.
बायकांनी एकएक करत आता पर्यंत केवळ पुरुषांचा कब्जा असलेली क्षेत्रे काबीज करायला सुरुवात केली आहे. जसे की पोलीस व सैन्यदलातही आता स्त्रिया घुसल्या आहेत, मोठमोठ्या कारखान्यांमधे, सरकारी ऑफिसात सगळी कडे त्या बायका बेमुर्वतपणे घुसखोरी करत आहेत. भिक्षुकी पासुन ते दुकानदारी पर्यंत सगळी कडे पुरुषांना मोठ्या आगतिक पणे त्यांना वाट मोकळी करुन द्यावी लागत आहे. पण जी बायकांची राखीव अशी जी क्षेत्र आहे तिथे मात्र त्या पुरुषांना फारसे काही करु देत नाहीत. अर्थात बायकांच्या क्षेत्रात घुसखोरी केल्याने पुरुषांचा फारसा काही फायदा होईल असे नाही. पण पुरुषांच्या राखीव क्षेत्रात घुसल्यामुळे बायकांचे पुरुषावलंबित्व कमी होत चालले आहे. हा सगळा त्यांच्या व्यापक योजनेचाच एक भाग आहे. समस्त पुरुष नष्ट केल्यावर बायकांना स्वतंत्रपणे हे जग चालवता आले पाहिजे म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.
मी असा विद्रोही पुरुषहिताचा विचार करतो, माझ्या आजूबाजूच्या पुरुषांना सावध करायचा सतत प्रयत्न करतो याची खबर शत्रुपक्षाला मिळत नाही असे काही नाही आहे बरं का. त्यांचे गुप्तहेर सदोदित माझ्यावर पाळत ठेवून असतातच. आणि माझ्या या कारवायांवरती शत्रुपक्ष हातावर हात ठेवून गप्प बसला आहे असेही नाही. मित्रांनो, परवाच माझ्यावर एक प्राणघातक हल्ला झाला.
म्हणजे झाले असे की मी माझ्या घरा समोरील रस्त्यावर कंपनीच्या बसची वाट पहात सावध पणे उभा होतो. हो आजकाल सावध असावेच लागते कारण बरेच शत्रु आजुबाजूला घिरट्या घालत फिरत असतात. तेव्हढ्यात एका वेगवान दुचाकी वाहनावर स्वार झालेली एक स्त्री माझ्या अंगावर चालून आली. लांबूनच तिने एक जोरदार आरोळी ठोकली आणि सरळ माझ्या अंगावर तिची दुचाकी लोटली. आपला चेहरा तिने एका फडक्याने झाकुन घेतला होता आणि डोळ्यांवर एक मोठासा गॉगल घातला होता, जेणे करुन तिला कोणी ओळखू शकणार नाही. तिच्या पाठीवर एक छोटीशी पिशवी होती, ज्यात काही प्राणघातक शस्त्रे असावीत असा माझा अंदाज आहे. हातात तिने मोजे घातले होते आणि पायात अणुकुचीदार टाचांचे सँडल होते. मी मोठ्या चपळाईने बाजुला झालो आणि तिचा वार अलगद चुकवला. ती दुचाकी सकट रस्त्यावर पडली. पण ती स्त्री झटकन सावध झाली आणि मोठ्यांदा कांगावा करत रडू लागली. मीच अडाण्यासारखा रस्त्याच्या मधे उभा होतो असा तिने माझ्यावर आरोप केला. ती भलतीच आक्रमक झाली होती. तिच्या डोळ्यांमधे मला पराभवाचे शल्य मला स्पष्ट पणे दिसत होते. जवळच उभ्या असलेल्या पोलिसाकडे मी मदत मागायचा प्रयत्न केला. खुनाच्या प्रयत्नांच्या आरोपा खाली त्या स्त्रीला अटक करावी अशी मी त्याच्या कडे मागणी केली. पण तो ट्रॅफिक हवालदार असल्या मुळे त्याने तसे करण्यास असमर्थता दाखवली. जवळपास जमलेल्या पुरुषांना पण मी मदतीची विनंती केली पण त्यांनीही या बाबत काहीही करण्यास नकार दिला. त्या बापड्यांना मी मनापासून क्षमा केली. कारण ते काय करत आहेत याची त्यांना अजिबात जाणिव नव्हती.
पण मी त्या हल्लेखोर स्त्रीचा गाडी क्रमांक मोठ्या हुशारीने टिपून घेतला. स्त्रियांनी आत्मघातकी पथकही तयार केले आहे हेच या घटने मधून सिध्द होते. पण मला मिळालेल्या माहितीच्या आधारे मी या आत्मघातकी पथकाची पाळेमुळे खणून काढीन याची मी माझ्या सर्व मित्रांना खात्री देतो. जाता जाता मी तिला ठणकावून सांगीतले की असल्या भेकड हल्ल्याचा मी निषेध करतो. असले भ्याड हल्ले करुन त्या मला माझ्या उद्दिष्टापासुन दूर लोटू शकत नाहीत. अर्थात तिने या सगळ्या आरोपांबद्दल अनभिज्ञता दाखवली. उघडपणे या गोष्टी कबूल करायचा निगरगट्टपणा अजून त्यांच्यात आला नाही याची माझ्या पुरुष मित्रांनी नोंद घ्यावी.
पण मित्रांनो असल्या घटनांमुळे मी मुळीच नाउमेद झालो नाही. मी माझ्या प्राणांची आहुती द्यायलाही सज्ज आहे. इतके दिवस लपून छपून चाललेले माझे पुरुषबचावाचे हे कार्य मी आता जाहीर पणे सुरु केले आहे. हा लेख म्हणजे त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे. मला ठाऊक आहे की या नंतर माझ्या जिवाला असलेला धोका अजून वाढला आहे. पण मी माझ्या प्राणाची पर्वा करत नाही. मित्रांनो, मला समस्त पुरुषजमातीला वाचवायचे आहे. मला याची पूर्णपणे जाणीव आहे की पुरुषवंश पुढे चालवायचा असेल तर अजूनही आपल्याला स्त्रियांवरच अवलंबून रहावे लागेल. पण स्त्री जात नामशेष करणे हा आपल्या संघनेचा उद्देश नसेलच मित्रांनो. पण आपले अस्तित्व टिकवण्या साठी आपल्याला एकत्र येऊन संघर्ष करावाच लागेल आणि आता ती वेळ आली आहे. तेव्हा जागे व्हा, कृतीशील व्हा. नाहीतर काही वर्षांनी स्त्रिया आपल्या मुलींना पुरुषांचे फोटो दाखवून सांगतील की डायनोसर सारखा हा देखील नामशेष झालेला एक प्राणी आहे.
प्रतिक्रिया
6 Sep 2014 - 9:14 am | कवितानागेश
अरेरे!! कसं काय व्हायचं आता? :)
6 Sep 2014 - 9:48 am | वैभव जाधव
काय बुवा?
सकाळी चा नाश्ता मिळाला नाही का? ;-)
6 Sep 2014 - 10:09 am | नगरीनिरंजन
हा हा हा! लै भारी लेख.
प्लॅनेट ऑफ एप्सच्या धर्तीवर प्लॅनेट ऑफ विमेन असा चित्रपट लवकरच येईल असे वाटतेय.
6 Sep 2014 - 10:15 am | नानासाहेब नेफळे
जो मुद्दा थोडक्यात सांगता येतो त्यासाठी तुम्ही त्यासाठी ईतके पाल्हाळ लावलेत याचा अर्थ तुम्ही नक्कीच स्त्री आहात, पुरषांच्या कंपूत शिरुन काँन्फीडेन्शियल डेटा शत्रुपक्षाला (स्त्री) पुरवण्याचा तुमचा डाव लक्षात आलेला आहे. आम्ही मंथरा सोयरा 'ध चा मा थेअरी' शुर्पनका पुतना मेनका यांच्या मोडस आँपरेंडींचा अभ्यास केलेला आहे.तुम्ही काय आम्हाला इतके दुधखुळे समजता काय...
6 Sep 2014 - 10:38 am | पैसा
तुम्ही काय पण करा, विधीलिखित चुकायचें नाही हों. बाकी तुम्ही बरेच दगड मारलेले दिसताहेत. तुमच्यावर झालेला हल्ला, म्हणजे तुमच्या दृष्टीकोनातून केलेले त्याचे वर्णन वाचून सदर घटना एका पुरातन शहरात झाल्याचा सौंशय आहे. म्हणजे तिथल्या मंडळींना भिऊन तुम्ही नाव लिहायचे टाळलेत का काय असा ही सौंशय येत आहे.
समस्त पुरुषजातीला गंपतीबाप्पा भरपूर सद्बुद्धी देवो आणि त्यांचे प्रयत्न 'योग्य' त्या ठिकाणी पोचोत अशा शुभेच्छा व्यक्त करून माझे भाषण संपवते.
6 Sep 2014 - 11:23 am | कपिलमुनी
+ १००
6 Sep 2014 - 1:03 pm | प्रसाद गोडबोले
पुरुष जे करता ते प्रजननासाठी पुनुरुत्पादना साठी करतात असा तुमचा गैरसमज झालेला दिसतो ... ते केवळ आनंदासाठी करावयाची गोष्ट आहे , मेन प्रॉडक्ट आनंद आहे निखळ आनंद ! प्रजोत्पादन हे फारफार तर बायप्रॉडक्ट अन बहुतांश वेळा रेसिड्यु असते ....
7 Sep 2014 - 11:11 am | साती
स्पर्म डोनेशनच्या अगोदर आणि नंतरही बरेच उपयोग आहेत या स्पेशिजचे. सबब प्रत्येक स्त्रीमागे किमान एक या स्पेसिजचा प्राणी असे गुणोत्तर सांभाळून ठेवण्यात येईल.
:)
8 Sep 2014 - 11:34 am | प्रसाद गोडबोले
>>> करेक्ट ! पण दुर्दैवाने सगळ्याच स्त्रीयांना हे कळत नाही ... मात्र आनंदाच्या मार्गावर चालणार्या काही मोजक्या स्त्रीया मात्र हे रहस्य नीट समजुन घेवुन आनंदी होतात !
येथील " किमान " ह्या शब्दाने ह्या वाक्याला दिलेली छटा बव्हर्थसुचक आहे :) पण आमच्या मते हे प्रमाण २:१ पेक्षा कमी आणि १:३ पेक्षा हे जास्त होवु देवु नये *blum3*
8 Sep 2014 - 12:49 pm | नानासाहेब नेफळे
२:१ अनेकांना फेवरेबल असावे.
6 Sep 2014 - 1:48 pm | सस्नेह
पैजारवहिनींनी वाचला आहे का ?
असल्यास पळा...
6 Sep 2014 - 3:47 pm | स्पंदना
आता काय करावं? एक तरी पुरुष सुटलेला दिसतोय या जाळ्यातुन. त्याला शुद्ध आलेली दिसतेय. इतक लहाणपणापासुन घुटीमधुन पाजलेलं बाळकडू व्यर्थ कसं काय गेल?
10 Sep 2014 - 3:32 am | काउबॉय
ओव्हर कोंफिड्न्स ;)
6 Sep 2014 - 4:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
अहो पुरुष नामशेष होणार हा शोध तर संशोधकांनी अगोदरच लावला आहे... आणि यांत बायकांना कॉन्स्पिरसी करायची काही गरज नाही. निसर्गच पुरुषांच्या मूळावर उठला आहे... Male producing Y chromosome likely to disappear, says geneticist Jenny Graves at ANU.
6 Sep 2014 - 6:25 pm | एस
वरील लेख वाचून अगदी हीच बातमी आठवली होती. पण इतर शास्त्रज्ञांनी नंतर याचे खंडन केले. त्यांच्या मते वाय रंगसूत्राची हानी होणे आता बहुतांशी थांबले असून गुणसूत्राची सध्याची रचना स्थिरावली आहे. सबब पुरूष जातीला धोका नाही. स्त्रियांनी निश्चिंत रहावे. नवरे नावाचे बकरे तुम्हांला भरपूर पिढ्यांपर्यंत नक्कीच मिळणार आहेत.
The male sex-determining chromosome has lost only one gene in 25 million years.
अर्थात वाय गुणसूत्र नष्ट होईल अशी भविष्यवाणी करणारी जेनिफर ग्रेव्हज् आणि वाय गुणसूत्राला धोका नाही असे म्हणणारी जेनिफर ह्यूज ह्या दोघीही जेनिफरबाई स्त्रिया आहेत ह्याची पैजारबुवांनी नोंद घेतली असेलच. :-P
6 Sep 2014 - 7:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
काय पण तुम्ही ! २५ दशलक्ष वर्षांत एक जीन हे गुपीत असे उघड नसते करायचे ! ;)
6 Sep 2014 - 9:52 pm | एस
आम्ही आपलं निरागसपणे युद्धात मध्यस्ती करायला गेलो! :-|
6 Sep 2014 - 7:11 pm | अविनाशकुलकर्णी
सन्नी,सई आदींच्या क्लोनिंग चा कार्यक्रम केंव्हा आहे..
माऊलि जळगावकर.. एक शंका..क्लोनिंग केले तर एक दम शोडषा तयार होणार कि वाट पहायची??
महत्वाचा खुलासा करावा
6 Sep 2014 - 11:06 pm | टवाळ कार्टा
किती उतावीळपणा...जरा धीर धरा की ;)
6 Sep 2014 - 7:41 pm | जेनी...
हि ही हिही .. मला कि नै शिर्शक फारच आवडलं बै !
7 Sep 2014 - 9:38 pm | राजेश घासकडवी
लेख आवडला. खवचटपणाचा टोन इतका छान जमला आहे, की पाशवी शक्ती आणि अपाशवी शक्ती, दोघेही तुम्हाला हाणायला तयार होतील.
8 Sep 2014 - 8:19 am | किसन शिंदे
आवल्डा लेख बुवा..
8 Sep 2014 - 6:33 pm | सुहास..
हा हा हा हा हा !!
अट्टल महाखवचटपणा आहे हा ;)
8 Sep 2014 - 6:51 pm | रेवती
छान! लेख आवडला.
9 Sep 2014 - 7:17 pm | सूड
लैच शिरेस म्याटर दिस्तोय!!