अभिव्यक्ती प्रकट होण्याची प्रक्रिया (Process of expression,or expressing oneself, in living organisms and specially human beings and how various sciences and philosophies explain,describe,perceive or relate to this process) या बद्दल नंतर स्वतंत्र धाग्याने चर्चा करावयाची आहे.
तत्पुर्वी अभिव्यक्त होणे असा बर्याच जणांच्या तोंडी असलेला वाक् प्रचार चुकीचा असल्याचा शेरा प्रमाण आणि शुद्धलेखनवादींकडून वेळो वेळी येऊन मुख्य चर्चा भरकटत राहते असा अनुभव आहे. गूगलराव ऐसी अक्षरेवर किमान २२ उपयोगांचा दाखला देत आहेत; तर मराठी विश्वकोशात नव्वदएक उपयोगांचा दाखला दिसतो आहे. मायबोली डॉटकॉमवर चक्क ४१३ उपयोगांचा दाखला दिसतो आहे. (शोध यंत्रात काही प्रमाणात काही रिझल्ट रिपीट होत असले तरी हे मोठ्या प्रमाणावर वापराचा संकेत नाही म्हणता येणार का
जर मोठ्या प्रमाणावर वापर होत असेल तर तो शब्द वाक्प्रचार भाषेने स्विकारला असे नेमके केव्हा म्हणावे असा प्रश्न मला नेहमी पडत राहतो .
...
...
*तैसा सूक्ष्म नाद शिवसंयोगें । प्राणसंगमें लगवेगें । षटचक्रादिप्रयोगें । वैखरीयोगें अभिव्यक्त ॥६६॥ मरा हे ऐकतां गोठी । ते वाचा सर्वांशें वाटे खोटी । तेंचि अक्षरें केल्या उफराटीं । रामनामें गोमटी निववी वाचा ॥६७॥
-एकनाथी भागवत अध्याय १२ वा (की १८ वा ?)
...
...
*इंद्रियांचे मी इंद्रिय पाहे । त्यांची क्रिया जे जे आहे । ते माझेनि होये अभिव्यक्त ॥६६॥ - एकनाथी भागवत अध्याय १६ वा...
...
*तेथ सकाम आणि निष्काम भक्त । यांचे अधिकार अभिव्यक्त । स्वयें सांगेल भगवंता । कथा अद्भु।त ते आहे ॥९५॥ -- एकनाथी भागवत अध्याय १९ वा
...
...
महाराष्ट्र शासनाच्या २०१०च्या सांस्कृतिक धोरणात भाषेच्या महत्वाची महती गातानाही अभिव्यक्त हे रूप आलेले आहे.
* भाषा आणि साहित्य
::ज्ञानाचे संचयन आणि संक्रमण स्थलकालांच्या मर्यादा ओलांडू शकते, ते प्रामुख्याने भाषेमुळेच होय. संगीतनृत्यांपासून ते चित्रशिल्पांपर्यंत नानाविध कलांना अधिक आस्वाद्य बनविण्याचे कार्यही भाषा नक्कीच करते. ती एकीकडे व्याकरणाच्या आणि लेखनपद्धतीच्या नियमांचा मानही राखते आणि दुसरीकडे काळाच्या ओघात त्या नियमांच्या संहितेला वेगळे वळण देऊन आशयाला सतत ताजेपणाही देत राहते. ती ललित साहित्यापासून ते गंभीर विवेचनापर्यंत विविध मार्गांनी अंतर्बाह्य सृष्टीला अभिव्यक्त करते. भाषेचे हे अंगभूत सामर्थ्य ओळखून मराठी भाषेला अधिक विकसित करणे आवश्यक आहे.
त्या शिवाय खालील उपयोग आंतरजालावर आढळून आले होते
*"'''एकच राग वेगवेगळ्या घराण्यांतून कसा अभिव्यक्त होतो; घराणेबद्ध शैलीतूनही रागाचं मूळ रूपच समोर येतं का,''' हे पडताळून पाहण्याचा एक अभिनव प्रयोग आम्ही १३ फेब्रुवारीच्या दोन सत्रांत करून पाहणार आहोत. नंदिनी बेडेकर, कलापिनी कोमकली आणि कौशिकी चक्रवर्ती या आजच्या आघाडीच्या गायिका आपापल्या शैलीतून सकाळचा प्रहर साजरा करतील. '''[http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=134... संदर्भ:‘सहेला रे’च्या निमित्ताने - संध्या गोखले ,रविवार ६ फेब्रुवारी २०११ लोकसत्ता]{{मृत दुवा}}''' तसेच [http://www.esakal.com/esakal/20110206/5079884776034237361.htm अमोल पालेकर ईसकाळ]
.....
.....
.....
*कुसुमाग्रजांना साहित्याच्या सामर्थ्याबरोबरच ज्या भाषेत '''आपण अभिव्यक्त होतो''', त्या भाषेच्या सामर्थ्याचे यथायोग्य भान होते.''' [http://www.esakal.com/esakal/20110227/5024105498731615494.htm संदर्भ:विनम्र भाषाप्रभू!- नरेंद्र चपळगावकर Sunday, February 27, 2011 ईसकाळ.कॉम]'''
.....
.....
.....
*चित्रपट हे एक माध्यम आहे.जशा इतर माध्यमातून कलाकार अभिव्यक्त होतो तसाच चित्रपटातूनही. [http://www.maayboli.com/node/2206?page=54 हे वाक्य मात्र मायबोली सोशल नेटवर्क फ्याडावर आढळल]
.....
.....
.....
*तरी आपण निरर्थक असे वाचाळपणे सतत बोलत राहतो. '''अथक अभिव्यक्त होत राहतो'''. पण चुकीचे तेवढे मनातच ठेवतो.परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत ज्ञानेश्वरीत. परा म्हणजे नाभीतली अव्यक्त वाणी आणि वैखरी म्हणजे प्रत्यक्ष मुखातून प्रगटणारी शब्दरूप वाणी. परा, म्हणजे खरे तर नेणीवेत विचार येतो तेव्हाच आपण स्वत:शी बोलतो. प्रत्यक्ष बोलतो तेव्हा '''दुसऱ्याशी अभिव्यक्त होतो''' आणि कृती म्हणजे आपले बोलणे समष्टीशी. विचार, वाणी आणि कृती या क्रमाने बहिर्मुख होत जाणाऱ्या आपल्या या अभिव्यक्ती.'''[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6589218.cms संदर्भ:प्रेम -संजय भास्कर जोशी(कादंबरीकार आणि समीक्षक) 20 Sep 2010, 0320 hrs IST महाराष्ट्र टाईम्स]'''
.....
.....
.....
*विवेक हा बुद्धींत '''अभिव्यक्त होतो.''' बुद्धि हे अनात्म तत्त्व आहे [http://www.maharshivinod.org/node/843. संदर्भ:पुस्तकाचे नाव: अनुभवामृतदीपिका लेखक: श्री. प्र.स.सुबंध]
.....
.....
.....
*....आणि असे झाले तर '''कवी नेमकेपणाने अभिव्यक्त होतो'''. कवीचे विचारही वाचकांना थेटपणे कळतात. ...[http://gazalakar.blogspot.com/2011/01/blog-post_9103.html संदर्भ:सामाजीक आशयाची सर्वांगगिण अभिव्यक्ती -श्रीराम गिरी]
.....
.....
.....
*....आपल्या मातृभाषेत '''आपण अभिव्यक्त होतो''', हे कळविता यावे यासाठी व सांस्कृतिक अभिसरण व्हावे, यासाठी अध्यक्ष एका ठिकाणचा व आयोजक अन्य ठिकाणचे याची आवश्यकता असते. [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-4570019,prtpage-... संदर्भ:अवघा रंग एक झाला...- डॉ. सिसिलिया कार्व्हालो महाराष्ट्र टाईम्स]
.....
.....
.....
*... जेव्हा चित्रकार म्हणून '''अभिव्यक्त होतो''', तेव्हा त्या कलेलाही एक तिसरा डोळा असतो. .
.....
.....
.....
*जेव्हा भयानक रस अभिव्यक्त होतो तेव्हा कपाळावर ‘घर्मबिंदू’ जमतात, तर करुण रसाची अभिव्यक्ती होताना ‘अश्रुधारा’ कधी झरझरू लागतात ते समजतच नाही. [http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=7719... संदर्भ:डॉ. कनक रेळे , रविवार, १३ जून २०१० संस्थापक-संचालक (नालंदा नृत्य संशोधन केंद्र) लोकसत्ता]{{मृत दुवा}}
.....
.....
.....
*...कधीकधी तो वेगळ्या तर्हेने अभिव्यक्त होतो....[http://www.navprabha.com/index.php?option=com_content&view=article&id=54... संदर्भ:मानवी भावबंध आणि विसंगती- यशवंत कर्णिक नवप्रभा]
.....
.....
.....
*....श्री.निलेश गद्रे यांच्या गोष्टीमुळे तर नव्या युगातील जगभर आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणार्या विजिगिषू मराठी '''माणसांच्या मनातले चिरंतन द्वंद्व उत्तमरीत्या अभिव्यक्त झाले.''' श्रोत्यांना भरून आले. [http://marathi-e-sabha.blogspot.com/2010/06/blog-post.html संदर्भ:शब्दबंध- नरेंद्र गोळे मराठी ब्लॉगकारांची ई-सभा]
.....
.....
.....
*...खेड्याशी, तिथल्या काळ्या मातीशी, लोककलेशी, संस्कृतीशी माझे नाते जुळले आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांचे सुख-दु:ख मी जवळून पाहिले. माझ्या लिखाणातूनही '''हे जीवन अभिव्यक्त झाले आहे'''.[http://marathi.webdunia.com/miscellaneous/facetoface/interviews/0902/18/... संदर्भ: माझे काव्य काळ्या मातीशी निगडीत-:ना.धो.महानोर]
.....
.....
.....
*....ज्यांचे मन संवेदनशील असते. तो हळवेपणा लेखनात उतरत असतोच. माणसंही एकाकी आणि एकटी जगू शकत नाही. छोटय़ा, छोटय़ा प्रसंगाच्या अनुभवानंतर मनातून दाटून आलेले '''भावविश्व''' नितळ आणि स्वच्छपणे या पुस्तकात '''अभिव्यक्त झाले आहे''', असे समीक्षक डॉ. सतीश बडवे यांनी सांगितले.
.....
.....
.....
*...यशवंतरावांचे चौफेर वाचन आणि चिकित्सक चिंतन ज्या अलवारपणे त्यांच्या लेखनातून अभिव्यक्त झाले तसेच ते त्यांच्या भाषणांमधूनही मुखरित झाले. ... [http://dainikaikya.com/DainikAikya/20100311/4692008091573133346.htm संदर्भ:कृतिशील प्रतिभेचे प्रकाशपर्व - वसंत केशव पाटील]
.....
.....
.....
*.....शब्दांची गरज वाटली तेथे कवितेतून अभिव्यक्त झाले...... [http://72.78.249.126/esakal/20110109/4833114294270660979.htm संदर्भ:...आणि माणसे पुन्हा माणसांशी बोलू लागतील- कविता महाजन]
.....
.....
.....
*....याउलट हे भौतिक जग, केवळ चेतनशक्तीच्या आधाराने अभिव्यक्त झाले आहे. ... [http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20100807/519791161766093258... भगवद्गीता जशी आहे तशी -सच्चिदानंद]{{मृत दुवा}}
.....
.....
.....
*... जे माध्यम हाताळले त्यात खोलवर शिरून त्याबद्दलची जाण पुरेशी परिपक्व करून मग (दिलीप) चित्रे त्यातून अभिव्यक्त झाले. ... [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=312... एका युगाचा अंत-प्रफुल्ल शिलेदार, रविवार, १३ डिसेंबर २००९ लोकसत्ता]{{मृत दुवा}}
.....
.....
.....
*...श्री संत एकनाथ हे श्रेष्ठ लोकशिक्षक होते. समाजशिक्षक होते. तत्कालीन समाजस्थितीचे त्यांनी सूक्ष्म अध्ययन केले. समाजाविषयीच्या कळवळ्यापोटीच समाज मनाचे उत्कट दर्शन घेतले. तितक्याच उत्कटपणे त्यांच्या लेखनात अभिव्यक्त झाले. या अभिव्यक्तीचे लोकभाषेच्या माध्यमातील एक अस्सल मर्हाटमोळे मनोरम रूप म्हणजे नाथांची भारुडे. [http://www.loksatta.com/daily/20041025/extra.htm संदर्भ:शब्द माझा चेहरा,शब्द माझा आरसा - यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलनातील डॉ. रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा -लोकसत्ता]
.....
.....
.....
*.....कारण गझलेच्या तंत्रासाठी जे 'टाळूनी' करावे लागले, ते न करताही कदाचित एखादी सुंदर कविता जन्माला येऊ शकली असती. म्हणजे '''विचारही ताकदीने अभिव्यक्त झाले असते''', आणि व्याकरणदोषांमुळे होणारा रसभंगही टळला असता.[http://www.sureshbhat.in/node/1888 -@मधुघट]
.....
.....
.....
*...हे सर्व लिखाण कोणत्याही डिप्रेशन, निराशा अथवा थकव्यातून नसून छिन्न-विच्छिन्न झालेल्या माझ्या संवेदनेला एकवटून त्याची मांडणी करताना '''अभिव्यक्त झाले आहे''', असे महाजन म्हणाल्या.[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3013355.cms कादंबऱ्यांनी केले आबाद आणि बरबादही...-कविता महाजन यांचे उद्गार म्.टा.]
....
....
समाजव्यवस्थेत केविलवाणे जगावे लागणारा नववास्तवातील माणूस अभिव्यक्त झाला होता - १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह By आनंद यादव
अभि उपसर्गाने ध्वनीत होणार्या अर्थांची माहिती पुस्तक.ऑर्ग या ऑनलाईन शब्दकोशात खालील प्रमाणे मिळते.
उप० [सं०√भा(दीप्ति)+कि, न० त०] एक उपसर्ग जो कुछ शब्दों के आरंभ में लगकर निम्नलिखित अर्थ सूचित करता है।— (क) आगे या सामने की ओर, जैसे—अभिमुख। (ख) मात्रा या मान की अधिकता, जैसे—अभिकंपन, अभिसिंचन, अभ्युदय। (ग) अच्छी तरह से। भलीभाँति। जैसे—अभिव्यंजन, अभ्युदय। (घ) किसी प्रकार की विशेषता या श्रेष्ठता का सूचक, जैसे—अभिनव (बिलकुल नया), अभिभाषण (विवेचनापूर्ण भाषण), अभिपत्र (विद्धत्तापूर्ण लेख)।
१)
अभिव्यक्त शब्दाची नोंद शाब्दबंध या ऑनलाईन मराठी शब्दकोशात आढळते ती खालील प्रमाणे
अभिव्यक्त
Adjective(1)1. (R)(H)(E) अभिव्यक्त, व्यक्त_केलेला, प्रकट_केलेला, जाहीर_केलेला, उघड_केलेला, अनावृत_केलेला - स्पष्ट रूपात समोर आलेला अथवा प्रकट केला गेलेला "अभिव्यक्त भावना का लपवित आहेस?"
*अभिव्यक्त होणे या बद्दल व्याकरण शास्त्रींचे आक्षेप
१) मराठीत व्यक्त हे विशेषण आहे, पण त्याचा उपयोग करणे किंवा होणे या सकर्मक क्रियापदांबरोबर क्रियाविशेषणासारखा होतो. म्हणजे व्यक्त करणे आणि व्यक्त होणे या दोनही शब्दरचना वापरताना कर्म आवश्यक असते. तिथे व्यक्त करणे म्हणजे उघड किंवा जाहीर करणे. उदा० आनंद, खेद, दुःख, प्रेम, भावना, मत, विचार, शोक, हर्ष इत्यादी व्यक्त करणे म्हणजे, मनात असलेल्या या भावना शब्दरूपात उघड करणे. या गोष्टी हेतुपूर्वक केल्या नाहीत तरी त्या नजरेतून, वागणुकीतून किंवा चेहर्यावरील भावमुद्रांनी व्यक्त होऊ शकतात. औदासीन्य, कारुण्य, क्रौर्य, जिव्हाळा असल्या काही गोष्टी व्यक्त करता येत नाहीत, तर त्या फक्त व्यक्त होतात. तर सुख, शौर्य असल्या गोष्टी ना व्यक्त करता येत ना होत. ‘आय वॉन्ट टु एक्सप्रेस मायसेल्फ़‘चे ’मला व्यक्त व्हायचे आहे’ हे अत्यंत ओबडधोबड भाषांतर. जोपर्यंत त्या वाक्यात कर्म नाही तोपर्यंत व्यक्त होणेला काहीही अर्थ नाही. ते मराठी वाक्य नाही.
व्यक्त हे मराठीत नामाआधी येणारे शुद्ध विशेषण म्हणून वापरता येत नाही. पण ’अव्यक्त’ येते. अव्यक्त म्हणजे बोलून न दाखवलेले. अव्यक्त प्रेम, दु:ख इत्यादी.
अभिव्यक्ती म्हणजे प्रकटीकरण. हे भाववाचक नाव आहे. लेखक लेखनाद्वारे त्याच्या विचारांची अभिव्यक्ती करतो. मनापासून स्वयंपाक करणारी कुटुंबवत्सल स्त्री आपल्या कृतीने प्रेमाची अभिव्यक्ती करते, वगैरे. तसला अर्थ नसलेला अभिव्यक्त हा शब्द मराठीत नाही. त्यामुळे अभिव्यक्त होणे किंवा करणे या वाक्प्रयोगांना मराठीत थारा नाही.
अभि या उपसर्गाचा अर्थ आधिक्य दाखवणारा नाही हे खालील शब्दांवरून स्पष्ट होईल. अभियोग=खटला; अभिजात=सुसंस्कृत; अभिधान=विशेष नाम; अभिशाप=तळतळाट; अभिषेक=समंत्र पाणी शिंपडणे; अभिवादन=नमन; अभिसरण=पुढे जाणे, मिश्रण होणे; अभ्यागत=पाहुणा; अभ्यंतर=आतला भाग, असेच अभिमान, अभिजन वगैरे. यांत कुठेही आधिक्य हा अर्थ आलेला नाही.
२) जी गोष्ट अव्यक्त असते तीच व्यक्त होऊ शकते. ’मी’ अव्यक्त नाही, म्हणून ’मी’ व्यक्त होऊ शकत नाही. जी गोष्ट ‘व्यक्त‘ची तीच ‘अभिव्यक्त‘ची. मनातल्या मनात्त दडवून ठेवलेल्या मत, विचार, भाव, भावना आदी गोष्टी अव्यक्त आहेत, म्हणून त्या व्यक्त करता येतात. माणूस व्यक्त किंवा अभिव्यक्त कसा होऊ शकतो ते अनाकलनीय आहे. फारतर देव किंवा भूत यांना व्यक्त म्हणजे प्रकट होता येईल, माणसाला नाही.
३) <अभिव्यक्ती किंवा अभिव्यक्त होणे, या प्रक्रीये संदर्भाने काही प्रश्न> ह्या धाग्याच्या शीर्षकातील 'अभिव्यक्त होणे' हा शब्दप्रयोग अतिशिष्ट आणि कृत्रिम वाटतो. सांगणे, बोलणे, लिहिणे ह्या साध्यासुध्या शब्दांचाच अर्थ अधिक कृत्रिम प्रकाराने 'अभिव्यक्त होणे' हा शब्दप्रयोग दर्शवितो आणि हे एक अलीकवैदग्ध्य वाटते.
'अभिव्यक्त होणे' ह्याचे शब्दशः इंग्रजी भाषान्तर to become expressed असा होईल. इंग्रजीत he said च्या जागी तुम्ही he became expressed असा शब्दप्रयोग तुम्ही कराल काय? अर्थातच नाही कारण तो वापर निरर्थक पांडित्य दर्शवितो. ह्याला इंग्रजीमध्ये एका संदर्भामध्ये Hellenomania - A display of erudition by excessive use of Greek terms असे म्हणतात.
तर या काथ्याकुटाचा/ चर्चेचा मुख्य विषय असा आहे की, सहसा आदेशात्मक व्याकरणात न बसणारा एखादा शब्द अथवा वाक प्रयोग भाषेने स्विकारला आहे असे केव्हा समजावे एखादा उपयोग खूप आहे म्हणून उपयोग मान्य करावा की आदेशात्मक व्याकरणास प्रमाण मानून भाषा शुद्धीकरणाचा मार्ग चोखाळावा. "पायात चप्पल घालणे" असे वाक् प्रचार मराठीत वापरात आहेत कारण लोक मोठ्या प्रमाणावर ते वापरतात आपण ते शब्दशः घेत नाही. मग अभिव्यक्त होणारे नेमकं कोणत घोड मारतात ?
*विषयांतर टाळण्यासाठी आणि विषयास अनुसरुन प्रतिसादांसाठी धन्यवाद.
प्रतिक्रिया
7 Sep 2014 - 10:01 pm | पैसा
पण कधी कधी असे चुकीचे पण प्रस्थापित झालेले शब्दच बरोबर आहेत अन तुम्ही जे शुद्ध शब्द सांगताय ते चुकीचं आहे असं कोणी सांगतो तेव्हा आपण व्याकरण वगैरे कशाला शिकलो म्हणून फार दु:ख होतं. याच संस्थळावर एकदा मी लिहिलेला 'औपरोधिक' हा शब्द चुकीचा आहे आणि ते 'उपरोधिक' असं पाहिजे असं एका महाशयांनी मला सांगितलं होतं. (अर्थातच मला ते वाचून डोकं फिरायची पाळी आली होती हे ओघाने आलंच.) त्याची आठवण हा लेख वाचून झाली.
भाषा प्रवाही असते आणि तशी ती असली तरच टिकेल हे मत आणि प्रवाहीपणा नको तर भाषा शुद्ध असली पाहिजे हे दुसरं मत. यातला झगडा नेहमीच पाहण्यात येतो. भाषेच्या बाबत बरोबर अन चूक या गोष्टी बहुधा व्यक्ति आणि काळसापेक्ष असाव्यात.
8 Sep 2014 - 12:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाषा प्रवाही असते आणि तशी ती असली तरच टिकेल.
सहमत. (पुन्हा विषय शुद्धलेखनाकडे जाईल म्हणुन मी थांबतो)
-दिलीप बिरुटे
8 Sep 2014 - 12:38 pm | एस
व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य (Personal freedom and Freedom of expression) या दोन संज्ञांच्या अनुषंगाने पाहिल्यास व्यक्त आणि अभिव्यक्त यामधील गोंधळ दूर होऊ शकेल. बाकी भाषा पुरेशी प्रवाही असणे आणि पुरेशी प्रमाणित असणे या दोन्ही गोष्टी त्या भाषेचे व्यक्तिमत्त्व तसेच जिवंतपणा जपण्यासाठी अत्यावश्यक असतात.
8 Sep 2014 - 2:34 pm | कवितानागेश
भाषा प्रवाही असते आणि तशी ती असली तरच टिकेल. >
हे बरोबरच आहे. फक्त प्रवाह वेडावाकडा वळू नये, किंवा दुसरा वेगळा/गढूळ प्रवाह भाषेत मिसळून भाषेची चव बिघडू नये, इतकी काळजी घेतली म्हणजे झालं. :)