भिमाशंकरचा रानडुकर

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
27 Aug 2014 - 3:44 pm

(१)
मार्च महिना होता .थंडी सरली होती .अशा दिवसांत भटकंतीसाठी ठरावीक डोंगर उरतात .१४ तारखेला (२००६) होळी होती .भिमाशंकरला जायचे ठरवले परंतू त्यादिवशी सकाळी निघायला उशीरच झाला .तरी साडेबारा पाऊणला नेरळला पोहोचलो ,दुपारची वेळ त्यामुळे रिक्षा मिळून कशेळे व तिथून खांडसला पोहोचायला पावणेतीन वाजले .

नेहमी सकाळी नऊला खांडसहून चढायला सुरुवात करतो आणि रमतगमत तीन वाजता गणपतीघाटाने वर चारपर्यँत जातो .पण आज अंधार पडायच्या आत साडेसातपर्यँत वर जायलाच हवे होते .वाटेत एक गाववाला शेतावरून परतत होता ."एवढ्या उशीरा ?जरा पाय उचला लवकर .पोहोचाल ." हो म्हणालो .

तासाभरात गणपती देवळाजवळ आलो .पाचच मिनीटे थांबून निघालो . उन उतरते आणि पूर्णपणे सैकवर मागून पडत असल्याने त्रास जाणवला नाही .आता पदरगडाला वळसा घातला की दाट झाडी लागणार होती पण नेहमीप्रमाणे थांबणार नव्हतो .
झाडीची आडवी वाट आली .उन्हे उतरू लागली होती .धबाधबा फांद्या हलवत इकडून तिकडे जाणारी माकडे गप्प होऊ लागली होती .अळूचा पाला खाणारी काळतोंडी वानरे उंचावर जाऊन आपली रात्रीची विश्रांतीची जागा पकडत होती . यांची एक लकब असते बेचक्याच्या दोन आडव्या डहाळ्यांवर दोन तंगड्या टाकतात कुल्ला बेचकीवर ठेवतात ,शेपटी खाली लोंबते आणि तोंड मावळतीकडे करतात .बैठक पक्की असते .त्यांचे पिंगट भुरे केस सोनेरी पिवळ्या किरणांत चमकत होते .पक्षांचे आवाज टिपेला पोहोचले होते .एक दोन शेकरूंनी चौकसपणे पाहून उंबरे आणि अळू कुरतडायचे काम चालूच ठेवले .मीपण ओझरते पाहत पाय झपाझप उचलले .पशुपक्षी पाहण्याची खरी वेळ हीच .आज अनायसे मला जमले .

पाच वाजले आणि चहाच्या टपऱ्यापाशी आलो . आज तिथे कोणी नव्हते .इथे ताक विकणारा असतो .एक वाट डावीकडून शिडीघाटाकडून येते .उजवीकडे आंब्याकडून दोन्ही वाटा वरच्या चढणीकडे जातात तर सरळ पुढे गेलो तर पाच दहा घरांची पदरवाडी आहे. याच वाडीतले लोक इथे चहा विकतात .तसा हा इथला वडखळ नाका आहे कारण हल्ली इथे वनखात्याचा माणूस प्रत्येकी वीस रुपये टोल घेण्यास पावतीपुस्तक घेऊन उभा असतो . आता नव्हता .

आंब्याखाली जरावेळ बसलो .एक नंदननाचण पक्षी डोक्यावरच्या फांद्यांवर चिलटे पकडतांना पांढरी शेपटी फरफरवत नाचत होता .आज वेळ नव्हता आणि पक्षी भरपूर दिसताहेत .उद्या वेळ मिळेल या विचाराने निघालो .दोन तास हाताशी होते आणि निश्चिँत होतो .हा भाग मावळतीकडे आणि उंची असल्यामुळे उजेड बराच वेळ असतो .

थोड्या वेळाने पदरवाडीवरच्या कड्यावर आलो .खाली दूर नांदगाव दिसू लागले तर लगेच खाली माचीवर पदरवाडीची घरं .दूरच्या शेतात राब भाजत असलेला दिसत होता त्याचा पांढुरका लोट आकाशात चढत होता .इथली पायवाट अगदी दरीच्या कडेवर आहे .सावकाश जावे लागते .अंधार नको .यानंतरची झाडी अधिक दाट आणि गार आहे .ही पार झाली की हलका चढ आणि वाट उत्तराभिमुख होते .येथून सिध्दगड समोर दिसतो तर उजवीकडे वरती बस डेपोचे पठाराचे कुंपण दिसते .उंची आठशे मिटर्स गाठलेली असते आणि गारवा जाणवू लागतो .याठिकाणी चमकणारी बुरशी जुलै अमावस्येच्या आसपास पाहायला मिळते .

संध्याकाळी चालल्यामुळे थकवा न येता चढता आले आणि पाण्याचीही जास्ती गरज भासली नाही .वरच्या तळ्यापाशी पोहेचलो तेव्हा साडेसहा झाले होते .रस्त्यावर आलो आणि वरच्याच विठ्ठलमंदिरवाल्या धर्मशाळेत खोली मिळाली .

खोलीत थोडा आराम केला आणि हॉटेलात चहा पोहे झाल्यावर तरतरी आली .होळी असलीतरी गर्दी नव्हती .शेजारच्या कमळजा मंदिरापाशी गावाची होळी रात्री नऊला पेटली .रात्री पथारीवर अंग टाकल्यावर कधी झोप लागली ते कळलंच नाही .मध्येच जाग आली तर बाहेर एक फेरी मारण्याचे काही कारण नव्हते .आज पोर्णिमा .रात्रभर आकाशात चंद्र असणार होता ,ताऱ्यांना सुटी होती .

सकाळी जाग आली तेव्हा चांगलेच उजाडले होते .एक फेरी देवळाकडे टाकून ,चहा नाश्ता करून नऊ वाजता निघण्याचे ठरवले .देऊळ साडेपाचलाच उघडते आणि सुटीचा दिवस असेल तर साडेआठपासून गर्दी सुरू होते .नुकतीच महाशिवरात्र होऊन गेली होती आणि आता मे महिन्यापर्यँत निवांत होते .

परत निघतांना त्या वातावरणातून जावेसे वाटत नाही .घाईगर्दी नसलेलं सुस्त वातावरण असतं आणि यासाठीच इथे आलेलो असतो .पुन्हा एकदा चहा मारून निघालो.कमळजाच्या पटांगणातल्या होळीची लाकडे विझत आली होती .

पटापटा उतरत चहाच्या टपरीपाशी कधी आलो ते कळलंही नाही .नाचण नव्हता .काल टोलवाला माणूस इथे पाचपर्यंत होता हे वरती इतरांकडून समजलं होतं .पण मी उशिरा आलो त्यामुळे वाचलो होतो.एक नजर शिडीघाटाकडून येणाऱ्या वाटेकडे (उगाच )टाकून आपली गणपतीघाटाकडे जाणारी झाडीची वाट धरली .तसे त्याबाजूस पक्षी नसतात आणि इथे कोणाला घाई आहे ?कोल्ह्याला द्राक्षे आंबट .झाडीतून पक्षांचे आवाज ऐकत चाललो होतो .माकडांचा नेहमीचाच हैदोस सुरू झाला होता .पदरगड/कलावंतीणच्या पायथ्याच्या विहिरीपाशी आलो त्यावेळी अकरा वाजले होते .इथे एक पांढऱ्याफुलाच्या शिवरीचे झाड आहे पण आता फुले नव्हती . एक कापसाचा पुंजका हळूच उचलला .समोरच्या कड्यावर शिडीने चढणारी माणसे दिसत होती .

इतक्यात एक गाववाला खांद्यावर ताकाचा हंडा घेऊन आला ."रामराम ,काय इतक्या लांबून खांडसहून ताक आणता ?"मी .
"छे ,इथून जवळच आहे आमचे गाव ." "कोणते ?" "काठेवाडी जवळच आहे खाली ." "कुठेय वाट ?" "पुढेच उजवीकडे खाली उतरते नंतर ओढ्यातून उतरा .घोगोळ वाट म्हणतात ."या वाटेचं नाव ऐकून होतो आणि आता संधीचा घोगोळ घालायचा नक्की केलं .

पुढे वाट लगेच दिसली .खाली लगेच ओढा आला .त्यातून उतरायला सुरुवात केली . ओढ्यात पाणी नव्हते तीन ते सात फुटी गोल गोटे होते .त्यातून ढोपर गुडघे संभाळत खाली जायला लागलो .घी देखा लेकिन बडगा {गोटा} नही देखा ही म्हण आठवली .विचार केला ताकवाला माणूस हांडा घेऊन इथूनच वर आला होता .एक चांगली गोष्ट म्हणजे झाडांनी वरून हिरवीगार सावली धरली होती .बारा वाजून गेले होते पण ऊन लागत नव्हते .

(२) दिवस अर्धा बाकी होता आणि घाई काहीच नव्हती .एक चांगलीशी दगडाची खुर्ची पाहून सैक उतरवली .डबा उघडून जेवण केलं .माकडंही नव्हती त्रास द्यायला .

आता पुढच्या वेळी या घाटानेच उतरायचे या विचारात निघालो . वीसेक मिनीटे गेली आणि खालून बोलण्याचे आवाज ऐकू येऊ लागले .जसजसा जवळ गेलो तसं लक्षात आलं ट्रेकिंगवाले नाहीत गाववाले असावेत .बोलत नव्हते ओरडत होते .आणखी खाली उतरलो .बोलणं नीट ऐकू येऊ लागलं .
"इकडून येतोय रेऽ."
"नाऽल्यातून येतोय ."
पलीकडच्या झाडीतून दोन तीनजण ओरडत होते .
"है है है"
"आला आला रे ऽनाल्यातून खाली आला रे ऽ "
मी उतरत होतो तेव्हा गाववाल्यांसारखे टकाटक न जाता धसमुसळेपणाने पाय टाकल्यामुळे ओढ्यातले गोटे सुटून खाली घरंगळत जाऊन मोठा आवाज होत होता .शिवाय मधेच पाचोळ्याच्या ढिगाऱ्यातला पाय खाली जाऊन भसळ फुस आवाज व्हायचा .
वाचलेल्या साऱ्या शिकारकथा डोक्यातून झरकन सरकल्या आणि आता गाववाले शिकारीसाठी हाकारे करत असावेत आणि माझ्या धडपडीतून त्यांना वाटले असेल की सावज बहुतेक नाल्यातून खाली येतंय ."नाल्यातून येऽतोय "ने खात्री झाली आणि मी जोरात ओरडलो "ओय कोण आहे ?"

(३)उगाच गावठी कट्टा वगैरे असेल तर इथेच भीमाशंकर इथेच काशी व्हायची माझी .ओरडण्याचा अपेक्षित परिणाम झाला आणि माझा तर्क खरा असल्याची खात्री झाली ."माणूस आहेऽ "खालच्या नालेवाल्याने हाकाटी केलेली मी ऐकली .समोर आल्यावर "हीऽ वाट नाहीऽये मागे फिरा !"तो ओरडला माझ्यावर .त्याचा राग मला समजला .रानडुकर भलताच मोठा निघाला होता .

मागे हळूच पाहिले तीनचारजण अगतिक उभे होते .पुढे एक लांबलचक जाळे जमिनीलगत लावले होते .रानडुकराला चार पाचजण हाकारे करून बिळातून उठवतात तो पळत उताराकडे जातो तिकडे जाळ्यात अडकतो आणि त्याला लगेच दोरीने बांधतात .हत्यारवगैरे वापरत नाहीत .

"तुमच्या माणसानेच वाट दाखवली "या माझ्या उत्तराने तो गाववाला थोडा गडबडला .(ताकवाला आला धावून )
"इकडून यायचं नाही त्या गणपतीघाटानेच खांडसला जायचं ."तंबी दिली त्याने .
माझ्यामुळे शिकारीची तयारी वाया गेली असा विचार करत पुढे सटकलो .लगेच काठेवाडी गाव दिसायला लागले .गावातूनच एक वाट शिडीकडे जाते .नदीपुलावर गणपतीघाटाकडचा रस्ता डावीकडून येऊन मिळाला आणि खांडस गाव गाठले .पुढे रिक्षा आणि रेल्वेने पाय न हलवता घरी पोहोचलो .

प्रतिक्रिया

एस's picture

27 Aug 2014 - 3:45 pm | एस

मस्तच . वाचतोय.

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2014 - 4:03 pm | प्रभाकर पेठकर

वर्णन अतिशय सुरेख जमले आहे. तुम्हा डोंगरदर्‍यात फिरणार्‍या मित्रांचे फार कौतुक आणि हेवा वाटतो. आता हे सुख पुढच्या जन्मीच बहुतेक (माणुस म्हणून किंवा निदान रानडुक्कर म्हणून तरी).

एस's picture

27 Aug 2014 - 4:26 pm | एस

आधी फक्त थोडासा भाग टाकलेला वाचला होता म्हणून तसा प्रतिसाद दिला होता.

हा घोगोळ घाट म्हणजे पदरगडाला (इथे कलावंतीणचा संबंध नाही. तो कलावंतीण सुळका प्रबळगडाचा वेगळा) अर्धा वेढा घालून पुढे एका धनगरवाड्याला नाळेतून उतरते तोच ना? आम्ही रात्रीच्या अंधारात उतरला होता फार पूर्वी. पदरगडाच्या त्या खिंडीतून परत येतेवेळेस डावीकडे भिमाशंकराची वाट आहे, तर उजवीकडे जामरुखला पूर्वी उतरायची वाट होती असे गावकरी सांगतात. आता ती वाट वापरात नाही.

रानडुकराची शिकार गोप्या घाटात पाहिली होती एकदा.

मस्त लेख. फक्त सर्व लेख एकत्रच प्रसिद्ध करा शक्यतो. आणि फोटोपण टाका.

विअर्ड विक्स's picture

27 Aug 2014 - 11:10 pm | विअर्ड विक्स

बरोबर.... कलावंती सुळका आणी प्रबळ गड अशी संयुक्त मोहीम करता येते. कलावंती सुळक्यावर जाणाऱ्या पायऱ्या हरिहर हून अधिक थरारक आहेत.
अगर आपण विमानाने मुंबईस येत असाल आणि विमानात DESCEND ची सूचना मिळाली असेल नि आपण उजव्या बाजूच्या खिडकीला असाल तर जरूर खिडकीतून खाली बघा आपले विमान प्रबळ गड आणि कलावंती सुळक्याच्या वरून जाते. मोहक दृश्य दिसते. केवळ त्यासाठी उजव्या बाजूच्या खिडकीचा मी हट्ट धरतो. बाकी पण अनेक डोंगर दिसतात. पण सुळका नि बाजूला गडाचे पठार यावरून कलावंती शिखर ओळखता येते.

कलावंती अनुभव कथन बाकी आहे. तुम्ही नाव काढले नि TO - DO लिस्ट मधल्या हुकलेल्या मुद्द्याची आठवण झाली. लवकरच लिहीन.....

सौंदाळा's picture

27 Aug 2014 - 4:29 pm | सौंदाळा

जबरदस्त वर्णन
खुप मस्त लिहिता हो तुम्ही, वाचताना स्वतः तिकडे आहे असे वाटत होते.
आम्ही केलेला भिमाशंकर, सिध्दगड ट्रेक आठवला. तेव्हादेखिल शिकारीच्या तयारीने निघालेले गाववाले भेटले होते. "कसली शिकार?", आम्ही विचारले. "रानडुक्कर" म्हणुन लगबगीने जंगलात गेले ते लोक. आम्ही पुढे चालत राहीलो. साधारण अर्ध्या तासाने एका ओढ्याकाठी थांबलो तेव्हा जंगलातुन माणसांचा जोरजोरात आवाज आला. शिकार मिळाली असावी.

खुशि's picture

27 Aug 2014 - 4:53 pm | खुशि

सुन्दर,अप्रतिम.

अगदी थरारक लिहिलंय.दिवाळी अंकात पण लिहा हो काका,तुमच्या जबरदस्त भटकंतीची एखादी कथा.

मुक्त विहारि's picture

27 Aug 2014 - 9:56 pm | मुक्त विहारि

उत्तम कथा...

विअर्ड विक्स's picture

27 Aug 2014 - 10:04 pm | विअर्ड विक्स

एक वेगळाच अनुभव.दुर्गांडू कडे अशा अनुभवांची खाण असते. पुढील अनुभव कथनाच्या प्रतीक्षेत......

सस्नेह's picture

27 Aug 2014 - 10:06 pm | सस्नेह

माडगूळकरान्च्या जंगलकथा आठवल्या.

बहुगुणी's picture

27 Aug 2014 - 10:19 pm | बहुगुणी

वर्णन इतकं चित्रदर्शी आहे की अगदी तुमच्या जोडीने भटकत असल्यासारखं वाटलं. आणखी येउ द्यात.

खटपट्या's picture

28 Aug 2014 - 5:28 am | खटपट्या

+१

आतिवास's picture

28 Aug 2014 - 11:51 am | आतिवास

+२
आवडले.

कंजूस's picture

28 Aug 2014 - 8:19 am | कंजूस

सर्वाँना धन्यवाद .पेठकर काकांच्या विनंतीप्रमाणे संपामंने लेख एकत्र केला छान झाले ."रानडुकर गेला कुठे ?"या प्रश्नाने लेखकाला शीर्षकाचाच विसर पडून रानात वाट चुकला की काय असे वाटणे ही एक मजाच झाली .असो .काका ,पुढच्या वेळेस भेटू त्यावेळी चालावे /चढावे लागणार नाही पण रानाचा अनुभव येईल अशा जागी जाऊ .नेरळला भिमाशंकरच्या पायथ्याशी नदीकाठी जागा आहे .(येथेच उतरते पदरगडची जामरुख वाट)
स्वॉप्स ,पदरगडावर एक छोटीशी गुहा दिसते त्याला कलावंतिणीचा महाल असे काहीजण म्हणतात आणि चुकून यालाच कलावंतिणगड म्हटले जाते .याची कथा विअर्डविक्स देणारेत .त्यांच्या आताच्या लेखातल्या गुगुळच्या उल्लेखावरून ही आठवण झाली .प्रमोद देर्देकरांनीही सांगितले की लेखांना प्रतिक्रिया देण्यापेक्षा भटकंतीचे लेखच लिहा .वर्णन वाचून रानाची थोडीफार कल्पना आली हेही नसे थोडके .आताच्या भटकंतीचे फोटो टाकत जाईनच .त्यावेळचे २०००सालापासूनचे वर्णन खर्चासकट डायरीत आहेच पण फोटो नव्हते. जगातल्या सगळ्याच जागांना आपण सारे भेट देऊन पाहू शकणार नाही .तिथे जाणारे लिहितात ते वाचूनच आपल्याला आनंद घ्यावा लागतो जसे खुशींची नर्मदापरिक्रमा अथवा आजपासून येणारे नगाधिराज .

एस's picture

28 Aug 2014 - 11:27 am | एस

स्वॉप्स ,पदरगडावर एक छोटीशी गुहा दिसते त्याला कलावंतिणीचा महाल असे काहीजण म्हणतात आणि चुकून यालाच कलावंतिणगड म्हटले जाते .

अगदी बरोबर. तसेच पदरगडाला काही जण चुकून तुंगी असंही म्हणतात. पण तुंगीचा डोंगर प्रत्यक्षात खांडस आणि टेंभरे या गावांच्या मध्ये आहे. नाशिक जिल्ह्यातील मांगी-तुंगीचे सुळके वेगळेच. महाराष्ट्रातील किल्ल्यांची अचूक आणि अधिकृत नावे कोणती याबाबतीत डोंगरयात्रींमध्येच गोंधळाचे वातावरण आहे. उदा. भैरवगड की बहिरवगड, महाराष्ट्रातील बरेच किल्ले भैरवगड या नावाने उल्लेखले जातात. ढाकच्या भैरीचं पण तसंच. किल्ला ढाक असला तरी तो 'गडदचा बहिरी' आहे.

पदरगडावरील गुहा खरंच भन्नाट आहे. तसेच किल्ल्यावरील मोठाली पाण्याची टाकीपण. एकूणच हा सगळा भाग खूप जैववैविध्याने समृद्ध, पुण्या-मुंबईवरून त्यामानाने जवळ आणि देखणा आहे. फक्त तो भोरगिरी ते भिमाशंकर रस्ता किंवा दार्‍या घाटातून रस्ता इत्यादी बाबी व्हायला नकोत असे मनापासून वाटते.

प्रचेतस's picture

28 Aug 2014 - 9:13 am | प्रचेतस

अतयंत चित्रदर्शी वर्णन.
लेखन खूप आवडले.

जय२७८१'s picture

28 Aug 2014 - 5:27 pm | जय२७८१

सर , वर्णन अप्रतिमच.........

सह्यमित्र's picture

28 Aug 2014 - 6:12 pm | सह्यमित्र

सुरेख वर्णन !!

जोशी 'ले''s picture

31 Aug 2014 - 9:29 pm | जोशी 'ले'

सुरेख लिहलय..

रवीराज's picture

8 Sep 2014 - 11:12 pm | रवीराज

भिमाशंकर माझ्या आवडत्या ठिकाणापैकी एक.मागे एकदा आम्ही भट्टीच्या रानातुन गोरक्षगडचा प्लान केला होता, भट्टीच्या रानातुन पुढे गेल्यावर घळीतुन खाली उतरलो आणि खालच्या जंगलात वाट चुकलो तेव्हा दोन शिकारी भेटलेले,त्यांनीच बरोबर वाट दाखवली.