उद्या स्वातंत्र्यदिन. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळून आपल्याला ६७ वर्षे झाली. एकूणच या ६७ वर्षात आपण काय केले, मिळवले, गमावले याचा हा एक सहज आढावा.
मिळवले :
१. तंत्रज्ञान प्रगती
यंत्रसामुग्री, संवादमाध्यमे, अभियांत्रिकी इ. क्षेत्रात गेल्या ६७ वर्षात भरीव कामे झाली आहेत. त्यामुळे राहणीमानाच्या दर्जातही सुधारणा झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानात आपण जगात तिसऱ्या स्थानावर आहोत. टेलिफोन वापरामध्ये आपण जगात नवव्या क्रमांकावर आहोत. दूरदर्शन वापरामध्ये चौथ्या, इंटरनेट वापरामध्ये तिसऱ्या तर मोबाईल वापरामध्ये जगात सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहोत.
अर्थात ब्रेन ड्रेन मधेही आपण बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहोत.
२. शैक्षणिक क्षेत्र
१९४७ मध्ये आपला साक्षरता दर १२ % होता तो सध्या ७४.०४ % झाला आहे. यावरून आपण शैक्षणिक क्षेत्रात केलेली भरीव प्रगती दिसते. एकविसाव्या शतकात भारतात शैक्षणिक संस्थांचे अमाप पीक उगवून आले आहे. इतर कोणत्याही देशात मिळणारे सर्व शैक्षणिक पर्याय आज भारतात उपलब्ध आहेत. कित्येक परदेशी विद्यार्थी आज भारतात शिक्षणासाठी येत आहेत. हि नक्कीच गौरवास्पद बाब आहे.
३. शेतकी
शेतकी क्षेत्रात आपण भरघोस प्रगती केली असून धान्ये, फळे, भाज्या ए. शेतकी उत्पादनांच्या बाबतीत आपण पहिल्या पाचात जागतिक स्थान मिळवले आहे. विविध शेतकी उत्पादनांची आकडेवारी इथे आहे.
४. आर्थिक
आर्थिक बाबतीत आपण केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल जागतिक बँकेचा हा अहवाल बोलका आहे. त्यानुसार आपण लवकरच जपानला डावलून आर्थिक क्षेत्रात जगात तिसरे स्थान पटकावत आहोत. अर्थात याचा अर्थ आपण श्रीमंत आहोत असा होतो का याचा उहापोह इथे केला नाही.
५. क्रीडा जगत
एक क्रिकेट आणि नेमबाजी वगळता इतर खेळांमध्ये आपण फारशी चांगली कामगिरी करू शकलो नाहीओत. क्रिकेटमध्ये आपण जगात तिसऱ्या स्थानावर आहोत तर नेमबाजीमध्ये नवव्या.
६. वैद्यकीय
वैद्यकीय क्षेत्रात भारत अग्रेसर आहे हे सत्य पचायला जड वाटते. पण ते खरे आहे. टॉप टेनच्या जागतिक क्रमवारीत दोन भारतीय हॉस्पिटल्स चा समावेश आहे. एक फोर्टिस हॉस्पिटल, बेंगलोर आणि एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, मुंबई.
...आता, तुमच्या गावात तुम्हाला कोणत्या दर्जाची वैद्यकीय सेवा मिळते हे कृपया विचारू नये अन सांगू नये !
गमावले :
७. अस्थिर राजकीय सत्ता.
सुरुवातीला काँग्रेसने भरीव कार्ये केली अन स्थिर सत्ता देण्यात यशस्वी ठरली. नंतर कुठेतरी बिनसले. लोककल्याण बाजूला पडले अन सत्तेचे राजकारण सुरु झाले. कार्ये संपली अन कार्यकर्ते उदंड झाले. मोदीजी हे चित्र बदलू शकतील का ?
८. दहशतवाद
स्वातंत्र्यातच याची बीजे रोवली गेली. आज त्या बीजाचा बऱ्यापैकी विशाल वृक्ष झाला आहे. आपण जगात चौथ्या क्रमांकाचे दहशतवादी राष्ट्र आहोत.
९. लोकसंख्या
याबाबतीत आपण भलतीच नेत्रदीपक प्रगती केली आहे. आज आपल्या देशाची लोकसंख्या १२७ करोड आहे आणि आपण जगात याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहोत.
भ्रष्टाचार
स्वातंत्र्यानंतर भ्रष्ट्राचाराची पाळेमुळे दूरवर पसरून एकूण सर्वांगीण विकासामध्ये ही कीड खीळ घालते आहे. भ्रष्ट्राचारात आपण ९४ व्या जागतिक स्थानावर आहे तर आपल्यापेक्षा १ दिवसाने मोठा असलेला पाकिस्तान १२७ व्या स्थानावर आहे. आकडेवारीवरून सत्तेचे राजकारण यातून वगळले असावे अशी शंका घ्यायला जागा आहे.
१०. नैतिकता आणि संस्कृती
सर्वसाधारणपणे स्वातंत्र्यानंतर समाजात जी नैतिक अन सांस्कृतिक पातळी आढळत होती त्यापेक्षा सध्याची पातळी नक्कीच बऱ्याच अंशी खालावली आहे. १९५३ पासून २००७ पर्यंतचे दखलपात्र गुन्ह्यांचे प्रमाण असे आहे.
सांस्कृतिक ऱ्हास अन नैतिक अध:पतन यासाठी अगदी आंतरजाल धुंडाळण्याची गरज नाही. रोजच्या वर्तमानपत्रावरची एक नजर पुरेशी आहे.
........ अशी आहे आपली ६७ वर्षांची वाटचाल.
भारतीय स्वतंत्रता चिरायू होवो ! ! !
संकलन संदर्भ :
http://www.thetoptens.com/high-tech-countries/
http://en.wikipedia.org/wiki/International_rankings_of_India
http://thediplomat.com/2014/05/world-bank-india-overtakes-japan-as-world...
http://www.mtqua.org/providers/top-10-worlds-best-hospitals-for-medical-...
http://en.wikipedia.org/wiki/Global_Terrorism_Index
http://articles.economictimes.indiatimes.com/2013-12-04/news/44757314_1_...
प्रतिक्रिया
14 Aug 2014 - 12:04 pm | विटेकर
आता वाचून सावकाश प्रतिसाद देईन
14 Aug 2014 - 2:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
छान आढावा घेतलाय. नेहरू व काश्मीर राहिले.(ह.घे.हे.वे.सां.न.ल.)
14 Aug 2014 - 3:20 pm | टवाळ कार्टा
मग २००-३०० तर नक्कीच होतील :)
14 Aug 2014 - 2:06 pm | केदार-मिसळपाव
१. तंत्रज्ञान प्रगती-???
आपण फक्त तन्त्र तंत्रज्ञान विकत घेतोय. मालकी हक्क आपला नाही.
२. शैक्षणिक क्षेत्र
बर्यापैकी. तरीही मातृभाषेतुन शिक्षण अजुनही नाही.
३. शेतकी
इथेपण बर्यापैकी आहे.
४. आर्थिक
इथे छान आहे.
५. क्रीडा जगत
शुन्य कारण अस्स्ल भारतिय खेळ फक्त भारतियच आहेत आणि युरोपिय खेळ आणि त्यांचे अर्थकारण ह्यामुळे भारतात त्याला वाव नाही.
६. वैद्यकीय
इथेही खुप प्रगती आहे.
७. अस्थिर राजकीय सत्ता.
हा मुद्दाच नाही.
८. दहशतवाद
हा मुद्दाच नाही.
९. लोकसंख्या
हा मुद्दाच नाही.
१०. नैतिकता आणि संस्कृती
हे मस्त आहे. खरे तर हाही मुद्दाच नाही आणि असला तर आपण अधोगतीच केली आहे
14 Aug 2014 - 2:38 pm | आदूबाळ
>>आपण फक्त तन्त्र तंत्रज्ञान विकत घेतोय. मालकी हक्क आपला नाही.
काय करायचंय मालकी हक्क घेऊन?
14 Aug 2014 - 2:48 pm | केदार-मिसळपाव
ह्या देशांकडे बहुतांश गोष्टींचे मालकी हक्क आहेत किंवा हे देश मोठ्या प्रमाणावर वस्तुंचे उत्पादन करतात.
आता विचार करुन बघा.
14 Aug 2014 - 4:13 pm | आदूबाळ
प्रातिनिधिक उदाहरण म्हणूनः
रिसर्च अँड डेव्हलपमेंट भारतात होते
उत्पादन चीनमध्ये होतं
सहाय्यकारी सेवा व्हिएतनाममधून पुरवल्या जातात
विक्री भारतात होते
मालकीहक्काचा एक कागद आणि त्याला चिकटलेली थोडीफार रॉयल्टी मिळते. अर्थव्यवस्थेला चालना देणार्या मुख्य गोष्टी मालकीहक्क ज्या देशाकडे आहे त्याव्यतिरिक्त दुसर्या देशात घडतात.
या गोष्टी आपल्या देशात घडाव्यात (पर्यायाने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी) म्हणून ते मालकीवाले देशही प्रयत्न करत असतात. उदा. ओबामाचे आउटसोर्सिंगविरोधी धोरण, मेक्सिकन माकिलाडोरा वगैरे.
---
मला असं म्हणायचंय की जागतिकीकरणात, बहुराष्ट्रीय व्हॅल्यू चेन्सच्या युगात आपल्याकडे मालकी पाहिजे हा हट्ट धरून चालणार नाही.
14 Aug 2014 - 2:54 pm | थॉर माणूस
तंत्रज्ञान वापरण्यातली प्रगती आहे ती. संशोधन हा विषयच घेतलेला नाही लेखामधे.
आणि मुद्दा क्रमांक सात पासून पुढे तर अधोगतीचेच मुद्दे आहेत त्यामुळे तुमच्या शेवटच्या ओळीचा संदर्भ लागत नाहीये.
बाकी, लोकसंख्या ही फायदा आहे की नुकसान यावर एक छान चर्चा आंतरजालावर कुठेतरी वाचली होती. आता दुवा सापडतच नाहीये.
14 Aug 2014 - 2:11 pm | केदार-मिसळपाव
"ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळून आपल्याला ६७ वर्षे झाली"
हे अतिशय ऐतिहासिक वाक्य आहे.
माझे प्रश्न:
ब्रिटिशांपासून?
स्वातंत्र्य?
मिळून?
आपल्याला?
इतक्या सगळ्या सज्ञां (ची व्याख्या)/(चा आवाका) खुप मोठा आणि बहुअर्थी आहे.
14 Aug 2014 - 2:13 pm | मृत्युन्जय
आपण जगात चौथ्या क्रमांकाचे दहशतवादी राष्ट्र आहोत.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
तुम्हाला दहशतवादग्रस्त म्हणायचे आहे काय?
14 Aug 2014 - 3:47 pm | सस्नेह
खालून दुसरा दुवा पहा.त्यात Terrorist activity म्हटले आहे.
14 Aug 2014 - 5:02 pm | प्यारे१
दहशतवाद करणारे भारतीय नागरीक नाहीत काय?
माणसांना मारणं म्हणजे दहशत/आतंक/नक्षल/.... वाद ना? काही बाहेरचे बर्याच आतल्याना हाताशी धरुन, आपल्या लोकांना ट्रेन करुन बाकीच्यांना मारतात असं काही गोंधळाचं वातावरण आहे.
त्या मुद्द्यावर भारत दहशतवादी आहे असं म्हणायला पर्याय नाही.
14 Aug 2014 - 2:52 pm | विटेकर
सांस्कृतिक गुलमगिरीतून आपली अजून मुक्तता झालेलीच नाही !
आपल्या जगण्याचे तत्त्वज्ञान अजून एत्तद्देशीय नाही, सेक्युल्यारेझम च्या नावाखाली आपण आपल्या देशाचे उत्तम कडबोळे करुन ठेवले आहे !
पारतंत्र्य काय राजकीयच असायला हवे का?
14 Aug 2014 - 2:56 pm | चौकटराजा
ब्रिटीश जमान्यापेक्षा प्रगति झाली आहेच. कारण स्वातंत्र्यामुळे संस्थानिकांच्या ( आता उद्योगपति नी ते स्थान घेतले आहे )चे बरोबरच मतांसाठी सामान्य माणसाचे कल्याण हे अपरिहार्य झाले. त्यात मग मतदारांचे लांगूलचालन हा ही प्रकार सुरू झाला. ( व्होट बॅंक).
आता आपलीच प्रगति झाली आहे का ? व ती आपल्यामुळेच झाली आहे का हे पहाणे आले. आफिकी व काही प्रमाणात
दक्खन आशियाई देश सोडले तर सर्वच देशात अशी प्रगति झाल्याचे दिसते. या प्रगतिला कारणीभूत असलेल्या शास्त्रीय संशोधनाची किती पेटंट्स आपल्याकडे आहेत? भारतीय माणसाची एकंदरीत कार्यक्षमताही जर्मनी जपान चीन , कोरिया यांच्या तुलनेत कमीच आहे.
मुक्त अर्थव्यवस्थेत कामगार संघटनाही तितक्याच प्रभावी असाव्या लागतात. भारतातील कामगार चळवळ मरण्याच्या मार्गावर आहे. सबब प्रचंड आर्थिक विषमता हे आपले दुखणे झाले आहे. आज भारताचे जे चित्र दिसते त्यात मोठा वाटा
हा सेवा क्षेत्राचा आहे जे बदलल्या तांत्रिक दुनियेत केंव्हाही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकते. उत्पादन व शेती हीच खरी जीवनास जोडणारी क्षेत्रे आहेत. त्यांचा व्याप जी डी पी मधे वाढला तरच आपले खरे आहे.
रहाता राहिला भ्रष्टाचार. तो आपल्याकडे असला जरी जगात कोठेही नाही व आपल्याकडेच आहे असे चित्र नाही. कारण त्याचा संबंध आर्थिक नीतीशी नसून मानवी वर्तणुकीशी आहे. सबब तो रामाच्या वेळी होता. आजही आहे. तो मुक्त अर्थ व्यवस्थेत असतो व समाजवादी अर्थ व्यवस्थेत सुद्धा. तो घालवायचा की नाही हे मुल्यांवर अवलंबून. त्याचा मागणी पुरवठ्याशी थेट संबंध येत नाही. मंत्री खातो, तसा नागरिकही खातो. राजा करप्ट असतो तशी प्रजाही असते.
दहशतवादाला अनेक पदर आहेत. कोणी म्हणतात बदलल्या सामरिक परिस्थेतीत समोरासमोर युद्ध अशक्य झाले आहे. मग " आमच्या नागरिकांसाठी, आमच्या धर्मासाठी " असे काहीतरी कारण पुढे करून परस्परांचे स्थैर्याला चूड लावण्याचे उद्योग देश करीत असतात. भौगोलिक वेगळेपणामुळे न्युझीलंड ऑस्ट्रेलिया याना दहशतवादाचा धोका पोहोचत नाही हे ही लक्षांत घेणे जरूर.
भारत माझा देश आहे याचा अभिमान आहे.पण येथील राजकारणी, अठरापगड जाती, अनेक भाषा, कायदा मोडण्याची
नागरिकांची प्रवृत्त्ती या प्रगतिच्या आड येणार यात जराही शंका नाही. एक भाषा,धर्म जात विरहित सार्वजनिक जीवन,
या गोष्टींचा विचार करून एक नवा भारत देश निर्माण करण्यात १९२० ते १९६० या काळातील सर्वच नेते राजकारणी विद्वान अपयशी झाले असे माझे मत आहे. मी तरी त्याना द्रष्टे मानत नाही.
15 Aug 2014 - 12:32 pm | नितिन थत्ते
प्रतिसादातला १९२० ते १९६० या स्पेसिफ़िक कालखंडाचा उल्लेख रोचक आहे.
16 Aug 2014 - 7:20 am | सुनील
१९२० ते १९६४ असे असते, तर ते 'डबल' स्पेसिफिक झाले असते! ;)
असो!
15 Aug 2014 - 1:58 pm | अनुप ढेरे
+१