येथे सध्या विम्यामध्ये होणार्या फसवणुकीविषयी चर्चा चालली आहे.
पण विमा म्हणजे केवळ कंपनीचा फायदा/एजंटचा फायदा, असं नाही. तर विचारपुर्वक गरजेनुसार घेतलेला विमा नक्कीच 'आपल्या' फायद्याचा ठरू शकतो.
मला थोडी माहिती: योग्य/अयोग्यः आहे, आणि थोड्या शंकाही आहेत, त्यावर चर्चा व्हावी असे वाटते. सर्वांच्या अनुभवातून (व वादविवादातून ...... ऊप्स! चर्चेतून!! ;) ) हा धागा नक्कीच माहितीपुर्ण होईल.
१. जीवन-विमा व गुंतवणुक या वेगळ्या गोष्टी आहेत. टर्म इन्श्युरन्स सोडून इतर सर्व पॉलिसीज या फक्त आणि फक्त विमा कंपनी व एजंट यांच्या आर्थिक फायद्यासाठी असतात. टर्म इन्श्युरन्स साधारण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या २०-३० पट असावा. टर्म इन्श्युरन्स हा प्रत्येक कमावत्या व्यक्तीचा असावा. टर्म इन्श्युरन्स म्हणजे कमावत्या व्यक्तिच्या मॄत्युनंतर त्याच्या परिवारातील लोकांसाठी आर्थिक उत्पन्नाची रिप्लेसमेंट असते.
(त्यामुळे कमावत्या नसलेल्या व्यक्तिचा(मुले-निवृत्त झालेली व्यक्ती-गृहिणी इ.) टर्म इन्श्युरन्स काढणे म्हणजे, त्याच्या मृत्युनंतर मोबदला मिळेल/आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा ठेवणे आहे-असे माझे 'वैयक्तिक' मत आहे)
(**माझा मॅक्सलाईफचा टर्म इन्श्युरन्स आहे)
२. आरोग्य विमा: आजकाल १ रात्रजरी अॅडमिट व्हावं लागलं तरी किमान ३-४ हजार बिल होतं.(मध्यम दर्जाच्या रुग्णालयात). त्यामुळे आजारपण-शस्त्रक्रिया-अपघात अशा वेळी हा खर्च लाखांमध्ये होतो, ज्याने चांगली आर्थिक परिस्थिती अस्लेल्या कुटुंबाचंही गणित कोलमडू शकतं. त्यामुळे संपुर्ण कुटुंबाचा आरोग्यविमा कम्पल्सरी!! आपल्याला कोणत्या दर्जाच्या रुग्णालयात उप्चार घ्यायचे आहेत, कुटुंबात किती व्यक्ती आहेत, त्यांचं वय, आजारांचा पुर्वेतिहास, या सर्वांचा विचार करून आरोग्यविम्याची रक्कम ठरवावी. (माझा भारतीअॅक्साचा फॅमिलीफ्लोटर आरोग्यविमा आहे+कंपनीतर्फे आयसीआयसी लोंबार्ड आहे)
३. वाहन विमा: शक्यतो थर्ड पार्टी न करता पुर्ण वाहनविमा करावा. (किमान थर्ड-पार्टी) कारण अपघातात आपल्या गाडीचं होणारं नुकसानदेखील कित्येक हजारात असू शकतं. शिवाय आपली गाडी चोरीला गेली, तर आपल्याला विम्याचे पैसे मिळून आर्थिक दिलासा मिळतो.
मी हे ३ विमा/विमे काढलेले आहेत. इतर प्रकारच्या विम्यांचा(मालमत्ता, इमारत, फायर, इ) मला अनुभव नसल्याने, त्याविषयी काही बोलत नाही. इतरांनी कृपया भर घालावी.
माझे स्वत:चे काही प्रश्न आहेत.
१. अजूनपर्यंत मला आरोग्यविमा क्लेम करायची वेळ आलेली नाही. कंपनीतील लोक गरज पडल्यावर लोंबार्डचा क्लेम करतात, आणि कॉर्पोरेट ग्राहक असल्याने ते सहज होतात. पण वैयक्तिक आरोग्य विमा क्लेम करताना अडचणी येतात का? कोणत्या? त्या टाळण्यासाठी काय करता येऊ शकते? कोणाला चांगले/वाईट अनुभव आहेत का?
२. टर्म विमा क्लेम नाकारला जाणं हे, मृत्युनंतर घरच्यांसाठी एक दु:स्वप्न होऊ शकते. नाकारण्याची कारणे काय असू शकतात? आपल्या विम्याचा क्लेम नाकारला जाऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी.
३. वाहनविमा: समोरच्या पार्टीला कोणत्या परिस्थितीत नुकसानभरपाई मिळते? (उदा. माझ्या मोटारसायकलने जर एका कारला धडक दिलत, कारचा स्वतःचा विमा असेल, तर कारची नुकसानभरपाई माझ्या गाडीच्या विम्यातून जाईल का त्या कारच्या विम्यातून?) अशी नुकसानभरपाई मिळण्यात कोणत्या अडचणी येऊ शकतात ?
प्रतिक्रिया
25 Jul 2014 - 4:04 pm | धन्या
हल्ली मोठी रुग्णालये रुग्णाला भरती करुन घेतानाच आरोग्य विमा आहे का असं विचारतात. :)
25 Jul 2014 - 4:16 pm | चौकटराजा
आपण माणसे आयुर्विमा काढतो. तो आपल्यासाठी नाही हे प्रथम लक्षांत घ्या. आपण जन्माला येतो ते त्यागासाठी की भोगासाठी याचा विचार पक्का करा. आपण मेल्यानंतर आपण फक्त वर्ष श्राद्धाचे धनी असतो हे कटू सत्य ध्यानात घ्या.
तेंव्हा आपल्या बायकोवरचे प्रेम , मुलांवरचे वात्सल्य असे विषय घेऊन तुम्हाला इमोशनली विकत घेणार्या विमा कंपन्यांच्या जाहिरातीच्या प्रभावाखाली मुळीच येऊ नका. पण याचा अर्थ आपले आयुष्याला एक आणखी मिती प्राप्त करून
देणार्या बायकामुलांच्या भवितव्याचा, कदाचित आपल्या मागे आपले आईवडील जिवंत राहिले तर त्यांच्या बायकोवर पडणार्या जबाबदारीचा विचार हा हवाच.सुरूवातीस जास्त विमा घेऊन पुढे पुढे कमी कमी रक्क्म करा. कारण तुम्ही त्याना
पोसण्याची तुमची कर्तव्यता बर्यापैकी पाळलेली असते. आयुर्विमा एक गुंतवणूक म्हणून कुचकामी आहे.
25 Jul 2014 - 4:30 pm | वामन देशमुख
२. टर्म विमा क्लेम नाकारला जाणं हे, मृत्युनंतर घरच्यांसाठी एक दु:स्वप्न होऊ शकते. नाकारण्याची कारणे काय असू शकतात? आपल्या विम्याचा क्लेम नाकारला जाऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी.
यावरील चर्चेच्या प्रतीक्षेत.
25 Jul 2014 - 5:10 pm | धन्या
टर्म इन्शुरन्सचे क्लेम काही लाखाच्या (बरेच वेळा पंचवीस लाखांपासून पुढे) घरात असतात.
आपल्या खिशातून पैसे काढून दुसर्याला देणं कुणालाही जडच जाते, मग ती विमा कंपनी का असेना. विमा हा धोका वाटून घेणे अर्थात रिस्क शेअरींग असते. उदा. एका कंपनीने दहा जणांकडून विम्याचे हप्त्यांच्या स्वरुपात पैसे घ्यायचे आणि त्याच पैशातून त्या दहा जणांपैकी जे मृत होतील त्यांच्या वारसदारांना विमानिधी (सम अॅश्युअर्ड) दयायचा, म्हनजेच क्लेम सेटल करायचे असा प्रकार असतो.
त्यामुळे जितके क्लेम कमी तितका विमाधारकांना दयावा लागणारा पैसा कमी. पर्यायाने तितका जास्त विमा कंपनीचा नफा. एखादा पन्नास लाखाच्या पॉलीसीचा क्लेम विमा कंपनीने नाकारणे म्हणजे पन्नास लाख कंपनीला विमाधारकाच्या वारसास देणे नाकारणे असा साधा हिशोब असतो.
या सार्या गणितांमुळे विमा कंपन्या क्लेम नाकारण्याचे प्रयत्न करतात. त्यासाठी विमा कराराच्या अटींमधील पळवाटा शोधल्या जातात.
आपण सामान्य माणसे विमा एजंटांकडून विमा पॉलीसी घेतो. ते कागदपत्रांवर "साहेब इथे सही करा, तिथे सही करा" असे म्हणतील तिथे आपण सह्या करतो. विमा पॉलीसीच्या अटी वाचतच नाही. अशीच आपल्याकडून पुर्तता न होणारी अट विमा कंपनी क्लेम नाकाराण्यासाठी वापरते.
बरेच वेळा टर्म पॉलीसी घेताना ग्राहकाकडून धुम्रपान, धुम्रपान तसेच गंभीर आजार यांचा उल्लेख टाळला जातो. पुढे जेव्हा क्लेम येतो आणि विमा कंपनीच्या लक्षात येते की विमा ग्राहकाने विमा घेताना माहिती दडवली होती. अर्थातच कंपनी या मुद्दयाचा वापर करुन क्लेम नाकारु शकते.
आपण विमा ग्राहक म्हणून काय करावे:
१. आपणास धुम्रपान, मदयपान अशा सवयी असल्यास विमा अर्जात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा.
२. आपणासं काही गंभीर आजार असल्यास विमा अर्जात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा.
३. काही गंभीर आजार असल्या तो विमा पॉलीसीमध्ये कव्हर होतो का त्याची विमा कंपनीकडून खात्री करुन घ्यावी.
४. विमा पॉलीसी स्विकारण्यापूर्वी त्या पॉलीसीचे पॉलीसी डॉक्युमेंट बारकाईने वाचावे. ज्या बाबी आपल्याला कळलेल्या नसतील त्या विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडून समजून घ्याव्यात.
५. पॉलीसी मंजूर झाल्यानंतर विमा कंपनी ग्राहकास विशीष्ट दिवसांचा अवधी देते. या कालावधीत ग्राहकास पॉलीसी कॅन्सल करण्याची संधी असते. या कालावधीस "कुलींग ऑफ" पिरियड म्हणतात. हा कालावधी साधारणपणे १४ दिवसांचा असतो. या कालावधीत पॉलीसी कॅन्सल केल्या विमा कंपनी पॉलीसी मंजूर करण्यासाठीचा मोबदला म्हणून काही रक्कम कापून घेउन उरलेल्या आपण भरलेले आपले पहिल्या हप्त्याचे पैसे परत करते.
25 Jul 2014 - 6:41 pm | धमाल मुलगा
लै भारी धन्या.
बहुतांश क्लेम्स हे आजार/व्यसनं विमा कंपनीपासून लपवणं आणि ड्रिंक & ड्राईव्ह केसेस ह्या बाबतीत नाकारलेले ठाऊक आहेत.
आरोग्यविम्यासंदर्भात :
माझ्या ऐकिवात कॉर्पोरेट पॉलिसी असतील तर विशेष त्रास नाही, मात्र वैयक्तिक विमा असेल तर विमा कंपन्या छळतात, कुठे ६०%च दे, ७०% दे असं करतात असं पाहण्यात आहे. त्यासंदर्भात काय काळजी घ्यावी हे मात्र अजून नीट कळालेलं नाही.
25 Jul 2014 - 7:08 pm | धन्या
कॉर्पोरेट पॉलिसीमध्ये ग्राहकाच्या पॉलीसीच्या हप्त्याची काही रक्कम ग्रहकाची कंपनी भरत असते. कंपनी एकाच वेळी आपल्या हजारो कर्मचार्यांचा आयुर्विमा उतरवत असते. त्यामुळे अशा कॉर्पोरेट आयुर्विमा ग्राहकाच्या क्लेम सेटलमेंटला नाटकं करणे विमा कंपनीला परवडणारे नसते. कंपनीच्या कर्मचार्यांनी कंपनीकडे तक्रार केल्यास ती कंपनी पुढच्या वेळी दुसर्या विमा कंपनीकडे जाऊ शकते.
शक्यतो वैयक्तिक विमा हा आपल्या ओळखीतल्या विमा एजंटकडून घ्यावा. क्लेम करायची वेळ आली तर त्या विमा एजंटला हाताशी धरुन त्याचे विमा कंपनीतील कॉन्टॅक्ट वापरुन क्लेम सेटल करुन घेता येतो. :)
25 Jul 2014 - 8:06 pm | धमाल मुलगा
एक मित्र स्वतः एजंट आहे, त्याच्या घरातला मेडिक्लेम असाच कमी करुन मंजूर केला गेला. तो स्वत: त्या हापिसात जाऊन तासभर भांडला तेव्हा गाडं पुढं सरकलं. आता बोला!
25 Jul 2014 - 8:12 pm | धन्या
आता काय बोलणार? कप्पाळ? :D
25 Jul 2014 - 5:44 pm | कपिलमुनी
बरयाच जणांना कंपनीकडून आरोग्य विमा दिला जातो.
सध्या काहीजणांचे वय ५०-५५ असेल आणि आरोग्य विमा नसेल तर फार अवघड होते कारण विमा कंपन्याचा ३ लाखांचा हप्ता १५,००० च्या आसपास जातो. आणि तो दर ५ वर्षांनी वाढत जातो .
एंट्री ऐज जास्त असेल तर विमा कंपन्यांचा जास्त हप्ता सोसावा लगतो.
यावर उपाय म्हणजे राष्ट्रीयीकृत बँकामध्ये बचत खात्याशी संलग्न विमा घेणे.
या विम्यामधे प्री मेडिकल चेक अप नसते आणि ५ लाखांसाठी साधारण ६५००-७३०० एवढा वार्षिक हप्ता असतो . जो ( हा आरोग्य विमा वय ७९ वर्षे पर्यंत असतो)७९ वर्षे तेवढाच राहातो.
महाराष्ट्र बँक मधे एंट्री ऐज ६५ वर्षे आणि पंजाब नॅशनल बँक मधे एंट्री ऐज ७९ वर्षे आहे.
महाराष्ट्र बँक स्वास्थ योजना
पंजाब नॅशनल बँक
या दुव्यांवर माहिती पत्रके आणि अर्ज आहेत . त्यामध्ये संपूर्ण माहिती आहे.
28 Jul 2014 - 9:04 pm | विअर्ड विक्स
आई वडिलांसाठी कोणता विमा घ्यावा या विवंचनेत होतो. floater policy त हफ्ता फारच मोठा होतो. जवळपास ४० हजार. याउलट PNB त खाते उघडलेले बरे. १२ हजारांत दोघांनाही ३ लाखाचे कवर मिळते. सल्ल्याबद्दल धन्यवाद..
29 Jul 2014 - 10:24 am | तुषार काळभोर
दोन्ही बँकांच्या योजना किफायतशीर आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असणार्या कुटुंबांसाठी.
यांच्या क्लेम प्रोसेस चा /क्लेम मान्यतेचा/क्लेम धुडकावण्याचा कोणास अनुभव आहे का?
25 Aug 2014 - 5:39 am | एस
उपयुक्त माहिती.
असाच प्रश्न मलाही पडलाय.
29 Jul 2014 - 11:00 am | शैलेन्द्र
खरच सुंदर माहीती ..
30 Aug 2014 - 1:35 pm | तुषार काळभोर
http://www.jagoinvestor.com/2013/07/health-insurance-policies-from-banks...
25 Jul 2014 - 10:05 pm | आयुर्हित
सर्वात महत्वाचे:
१)प्रत्येक विमा योजनेत काहि मुद्दे हे वगळलेले(exclusions)असतात. विमा योजना घेण्याआधि ते काळजीपुर्वक पहावे लागतात. नाहितर विमा घेवुन सुद्धा त्याचा पूर्ण फायदा होवु शकत नाही.
२)जेवढे मुद्दे हे वगळलेले(exclusions)असतील तेवढा हफ्ता(premium)कमी होत असतो. त्यामूळे जेवढी स्वस्त पॉलिसी तेवढिच आपण घेत असलेली जोखिम(risk)जास्त असते.जर अशा वेळी वगळलेल्या मूद्दयावरुन दावा(claim)आला तर ते पैसे आपल्याला आपल्या खिशातुनच भरावे लागते.मग ओळखीतल्या विमा एजंट अथवा विमा कंपनीचा व्यवस्थापक असला तरी त्याचा उपयोग होत नसतो.
३)प्रत्येक कंपनिच्या योजनेत अनेक फरक, फायदे व तोटे सुद्दा असतात. सफरचंद व नारींगी यात गुणात्मक व दराबाबत फरक हा नेहमीच असतो, दोघांची तुलना होवु शकत नाहिच. तेव्हा एक जाणकार व अनुभवी पॉलिसी एजंट कडुनच विमा पॉलिसी घेतली पाहीजे.
असा जाणकार हा प्रत्येक ग्राहकाची गरज समजूनच विमा सुचवित असतो. कारण प्रत्येक ग्राहकाची गरज ही भिन्न भिन्न असते कारण त्याचे व कुटुंबियांचे वय, आर्थिक परिस्थिती,जोखिम घेण्याची वॄत्ती, आजारांबाबत कुटुंबाचा इतिहास आणि भविष्यातील होवू शकणारे आजार, व्यवसाय व व्यवसायामूळे होणारे आजार/त्रास (occupational hazards) यात जमीन आसमानाचा फरक असतो.
आरोग्य हा माझा आवडता प्रांत आहे. मला आपल्या गरजा कळवल्या तर यावर अधिक सखोल मार्गदर्शन मी नक्किच करु शकेल, याची खात्री आहे.
धन्यवाद.
25 Jul 2014 - 11:07 pm | धन्या
जोक ऑफ दी ईयर. :)
आजू-बाजूला नजर टाकली तर चिकाटीने लोकांचा पिच्छा पुरवून अनावश्यक पॉलिसी लोकांच्या गळ्यात मारणारे विमा एजंटच दिसतात.
असा विमा एजंट मला भेटला तर मी त्याला दुर्वांकूरला जेऊ घालेन. :)
यात काही गर्भित अर्थ नाही असं गृहीत धरतो. :)
26 Jul 2014 - 1:59 am | यशोधरा
*lol*
28 Jul 2014 - 4:14 pm | नाखु
खरी बाब.
विमा एजंटाची गोम अशी कि जे त्यांना (किंवा विमा कंपनीला) विकायचेय तेच आणि तेव्हढच कसं तुमच्या फायद्याचं आहे हे वारंवार पटवून देतात्.तुम्हाला काय आवश्यक आणि उपयुक्त आहे त्याच्याशी यांना काही घेणे/देणे नसते.टर्म ईंश्य्रन्स सुचविणारा एजंट माझ्या पाह्ण्यात नाही उलट मनीबॅक्चा घोशा लावणारेच जास्ती पाहिलेत.(लोकसत्ता मध्ये याचे "चिरफाड विश्लेषण" वाचले कि खरी बाब समजते.)
टीपःजवळचे ३-४ मित्र २.५ ते ३.५ नातेवाईक विमा एजंट अस्लेला तरी अजून गळाला न लागलेला एक भावी "विमेकरी"
26 Jul 2014 - 10:52 am | पिलीयन रायडर
हं आता समजलं...!! मला "व्यनीच" करा अशा आग्रहा मागचं कारण...!!
26 Jul 2014 - 1:31 am | पाषाणभेद
ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस बाबत काय म्हणणे आहे?
ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस मध्ये एजंट येत नाही. त्यामुळे खरोखर हप्त्यात बचत होते काय? तसेच क्लेम सेटलमेंटला काही अडचणी येतात काय?
26 Jul 2014 - 1:35 am | पाषाणभेद
ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस एका खाजगी कंपनीकडून काढला असता खुप चांगली सर्व्हीस मिळाली. विमादेखील लगोलग दिला गेला.
परंतू
भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीने नुकताच ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस चालू केल्याने त्यांच्याकडे याबाबत चौकशी करणारा ईमेल पाठवला असता अजून उत्तरदेखील आलेले नाही. ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस विकतांना कमीतकमी ऑनलाईन चौकशी होईल असे त्यांना वाटत नाही काय?
असलीच परिस्थीती असेल तर "भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीकडून" ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस काढावा काय?
"भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" आणि "खाजगी विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" यात क्लेम सेटलमेंटबाबत काय अनुभव आहे?
26 Jul 2014 - 10:39 am | धन्या
ती सर्वात मोठी भारतातील विमा कंपनी सरकारी कंपनी आहे. त्यामुळे तुम्हाला जो अनुभव आला त्यात नवल असे काही नाही.
या प्रश्नाचे उत्तर इतक्यात मिळणार नाही. मुळात टर्म इंन्श्यूरंस ही गोष्ट विमा बाजारात आता आता रुजू लागली आहे. काल परवापर्यंत विमा पॉलीसी एन्डॉवमेंट आणि मनी बॅक प्रकारातील असायच्या. त्यातही "खाजगी विमा कंपनीचा ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस" हा प्रकार तर नुकताच सुरु झाला आहे.
त्यामुळे क्लेम सेटलमेंटचा विदा इतक्या लवकर उपलब्ध होणार नाही.
26 Jul 2014 - 10:51 am | धन्या
भारतातील सगळ्यात मोठ्या विमा कंपनीच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या ग्राहक सेवा केंद्रात मी एक प्रश्न विचारला:
तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स काढला तर भरावा लागणारा हप्ता हा त्याच त्याच अटींवर काढलेल्या खाजगी कंपनीच्या ऑनलाईन टर्म इन्शुरन्सच्या हप्त्यापेक्षा खुपच जास्त आहे. मी स्वतः टर्म इन्शुरन्स घेताना हा फरक वार्षिक हप्त्यासाठी सात हजार इतका होता. असे का?
त्यांचे उत्तरः क्लेम सेटल करायचेच नसतील तर विमा हप्ता अगदी वर्षाला दोन हजार असला तरी कंपनीचा फायदाच असतो.
माझा प्रतिप्रशनः तुम्ही हे ईतक्या ठामपणे कसे म्हणू शकता?
त्यांचे उत्तरः मी या क्षेत्रात वीस वर्षांपेक्षा अधिक काम केलंय, त्या अनुभवाच्या जोरावर.
संभाषण संपले. :)
याच प्रश्नाचे उत्तर मी इतरत्र शोधले असता मिळालेले उत्तरः
ऑनलाईन टर्म इन्श्युरन्स घेणारा ग्राहकवर्ग सुशिक्षित असून आरोग्याच्या बाबतीत जागरुक असतो. वेळोवेळी विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या आणि उपचार करुन घेत असतो. त्यामुळे जोखीम कमी असते. जोखीम कमी तर विम्याचा हप्ता कमी.
28 Jul 2014 - 6:31 pm | प्रसाद भागवत
(१) धनाजीरावांनी दिलेल्या सुचना महत्वाच्या आहेत, त्यात सर्वकाही आलेच आहे एक मुद्दा जोडतो...मोठ्या रकमेचा विमा उतरवताना कंपनी प्रतिनिधीकडे स्खोल आणि सर्वंकष वैद्यकीय चाचण्या करुन घेण्याचा आग्रह धरा ( याचा खर्च विमा कंपनीच करीत असते) वय वा अन्य मुद्द्यांमुळॅ देत असलेली नॉन मेडिकल पॉलिसी शक्यतो टाळा, कोण्त्याही स्थितीत 'decleration of good health' वा तत्सम परिशिष्टावर स्वाक्षरी करुन पॉलिसी घेउ नका.
(२) सेटल करायचेच नसतील तर विमा हप्ता अगदी वर्षाला दोन हजार असला तरी कंपनीचा फायदाच असतो....... या विषयी भारतातल्या प्रमुख विमा कंपन्यांचे 'क्लेम सेटलेमेंट रेशो' प्रसिद्ध होत असतातच. तेथे पडताळणी करा... दुघ का दुघ होवुन जाईल http://www.mintwise.com/claims-settlement-ratio-2012-2013/
(३) कोणत्याही व्यक्तीला युनिट लिन्क्ड, एंडॉन्मेंट पोलिसी न विकता व वैयक्तीक पातळीवर टर्म वगळता अन्य कोणत्याही प्रकारच्या पॉलिसीज् घेण्यापासुन पराव्रुत्त करुनही मी MDRT आणि सर्वोच्च वर्गातील क्लब मेंबर झालो आहे..... धनाजीराव, चला , दुर्वाकुरला भेटुयात. .
28 Jul 2014 - 7:04 pm | धन्या
एक नंबर सर. तुमच्यासारख्या वित्त सल्लागारांची देशाला गरज आहे. :)
आपण भेटूयात आणि दुर्वांकुरला जेवणही घेऊया. (मी मुळचा पुणेकर नसल्यामुळे जेवणाच्या आमंत्रणाच्या बाबतीत निश्चिंत राहावे.)
26 Jul 2014 - 11:02 am | आयुर्हित
कालच रिलायंस लाइफ च्या वेब साईटवरुन ऑनलाईन इंन्श्यूरंस घेण्यासाठी माझी माहिती भरली. नंतर त्यांचे सर्व टर्म्स आणि कंडिशन्स मान्य असल्याबद्दल एका बॉक्स मध्ये टि़क करुनच पूढे दुसर्या पानावर जाता येत होते.
टर्म्स आणि कंडिशन्स मध्ये The policy document issued to you may contain certain specific terms, conditions and rates. You are advised to go through the document carefully. असे वाक्य आहे.
हे सर्व वाचून १००% अर्थ समजुन घेणे आवश्यक आहे. तरच ऑनलाईन टर्म इंन्श्यूरंस चा फायदा होईल.
(महत्वाचे वगळलेले मुद्दे(exclusions) समजुन घेणे अती आवश्यक आहे.)
हप्त्यात बचत नक्किच होते परंतु क्लेम सेटलमेंटला मदत कोणाची घेणार? त्या कंपनिचे स्थानिक कार्यालयही त्यात रस घेत नाहि. कारण ते केंद्रिय कार्यालयातुनच (रिलायंस लाइफच्या केस मध्ये चेन्नईला आहे)होणार असते. मग अशा वेळी जाणकार त्याला काहीही फायदा नसतांना कसा मदत करेल? हा विचार करुनच विमा घ्यावा.
26 Jul 2014 - 10:31 am | धन्या
विमा एजंटांना विमा पॉलीसीवर किती कमिशन मिळते या प्रश्नाचे उत्तर मी खुप पूर्वी शोधले असता जागो इन्व्हेस्टर या प्रख्यात संकेतस्थळावर उत्तर मिळाले:
The commissions are 25% in first year ,7.5% in 2nd and 3rd year and 5% their after.
26 Jul 2014 - 10:58 am | सुबोध खरे
एल आय सी या सरकारी कंपनी कडे तुम्ही सरळ गेलात तर तुम्हाला ते भिक घालत नाहीत. एजंट तुम्हाला त्यांना(स्वतःला) सर्वात फायदेशीर अशी पॉलिसी च विकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. (तुमच्या फायद्याची पॉलिसी जर विकेल तर त्याच्या खाण्याचे वांधे होतील). आयुर्विमा महामंडळाची ऑन लाईन पॉलिसी येण्याला त्यांच्या प्रचंड पसरलेल्या एजंटांच्या जाळ्याचा जोरदार विरोध आहे म्हणून ते प्रकरण आस्ते कदम चालू आहे.
खाजगी कंपन्यांचा ऑन लाईन विम्याला पाठींबा असण्याचे साधे कारण एकाच आहे त्याला लागणारा पायाभूत सुविधांचा खर्च फार कमी आहे. एकाधिकार शाही इतकी वर्षे गाजविल्यावर "आपले योगक्षेम" उत्तम चालवल्यावर आयुर्विमा महामंडळाची या क्षेत्रात असलेली आगेकूच आता बरीच कमी झाली असल्याने क्लेम सेटल मेंटचे एक तुणतुणे ते वाजवीत आहेत(त्यात थोडेफार तथ्य आहे).
बाकी ग्राहक न्यायालयात सर्वात जास्त खटले सरकारी आरोग्य विमा कंपन्यांविरुद्ध आहेत हि गोष्ट आपण लक्षात घेत्लीत तर वस्तुस्थिती आपल्या लक्षात येइल.
क्रमशः
26 Jul 2014 - 11:10 am | धन्या
काही नगण्य अपवाद सोडले तर विमा एजंट टर्म पॉलीसीचे नावसुद्धा घेत नाहीत ते याच कारणासाठी. टर्म पॉलीसीवर विमा एजंटांना सर्वात कमी कमिशन मिळते. त्यामुळे टर्म पॉलीसी ही ग्राहकासाठी सर्वोत्तम पॉलीसी असली तरी ते ग्राहकाच्या गळयात मात्र एन्डोवमेंट आणि मनी बॅक पॉलीसीच मारतात.
24 Aug 2014 - 9:34 pm | सुजल
राष्ट्रीयीकृत बँकामध्ये बचत खात्याशी संलग्न "आरोग्य विमा" विमा एजंट कडुन मिळतो का ?
25 Aug 2014 - 2:44 pm | कपिलमुनी
तो केवळ संबधित बँकेकडूनच मिळतो
24 Aug 2014 - 10:52 pm | दादा कोंडके
परवा ऑफिसमध्ये याच विषयावर सहकार्यांशी चर्चा करताना लक्षात आलं की जवळ जवळ सगळ्यांचंच एलायसी मध्ये एन्डोवमेंट किंवा तत्सम गळ्यात मारलेल्या पॉलिसीज आहेत. आंतरजालामुळे आत्तात्ता थोडिशी जागरुकता वाढली आहे त्यामुळे लोकं मनीकंट्रोल, वॅल्युरिसर्चऑनलाईन वगैरे वाचत आहेत. प्रत्येकांच्या वडिलांच्या मित्राने किंवा नातेवाईकांनी पोलिसी विकली होती आणि नकळून आणि आवडलेली नसून सुद्धा बहुतेकवेळा सोशल प्रेशरमुळे ती घेतली गेली होती. (अवांतरः सहज उत्सुकता म्हणून या एजंटांची अगदी दहा-बारा लोकांना नावं विचारल्यावर ही सगळीच एका विशिष्ठ जातीतली लोकं निघाली. ;) ).
या पोलिसीजचे रिटर्न्स ५-६% पेक्षाही कमी असतात आणि सरेंडरकेल्यामुळे तेव्ह्डच नुकसान होतं. त्यामुळे हे अवघड जागेचं दुखणं होउन बसतं. मी सुद्धा सहावर्षापुर्वी एका युलिप पोलीसीमध्ये एका एजंटच्या ससेमिर्याला कंटाळून पैसे गुंतवले होते. साधारण आता त्याची किंमत साधारण ७% दराने मिळते आहे आणि त्यामुळे सरेंडर करण्याचा दोनदा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी, इतके दिवस थांबलाच आहात तर अजुन एक-दोन महिन्यानंतर मार्केट वर गेल्यावर काढा असा सल्ला देण्यात आला. जास्त नॅव्ह आलेकी आम्हीच तुम्हाला फोन करू असंही आश्वासन देण्यात आलं. दुसर्यावेळी तर अजून दुसरीच एक पॉलिसी गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एक चांगलाच धडा घेतला आहे. एजंटांचा सल्ला कधिही घ्यायचा नाही. त्यापेक्षा दोनेक हजार खर्च करून व्यावसायीक प्लॅनरचा सल्ला घ्यावा.
25 Aug 2014 - 1:57 am | हवालदार
तुमचे मित्रही त्याच विशिष्ठ जातीतले आहेत काय ??? प्रत्येकांच्या वडिलांच्या मित्राने किंवा नातेवाईकांनी पोलिसी विकली होती म्हणून म्हण्टले विचारावे. क्रु.ह.घे.
30 Aug 2014 - 1:41 pm | तुषार काळभोर
मॄत्यूनंतर जीवनवीम्याचे (विशेषतः टर्म इन्श्युरन्स) क्लेम मंजूर/नामंजूर होण्याचे, तसेच आरोग्यविम्याच्या क्लेम सेटलमेंटचे बरे-वाईट अनुभव कोणाला आहेत का (विशेषतः स्वतः घेतलेल्या आरोग्यविम्याच्या बाबतीत. कारण एम्प्लॉयर तर्फे मिळणार्या आरोग्यविम्याचे सेटलमेंटच्या बाबतीत बहुतेक काही समस्या येत नाहीत)? माझ्या कुटुंबात अजून पर्यंत जीवनविमा/आरोग्यविमा क्लेम करायची आवश्यकता पडलेली नाही, त्यामुळे मला वैयक्तिक अनुभव नाहीये.