सोडे (ड्राय प्रॉन्स):
रस्सा:
साहित्यः
१. दुधी - १/२ कि.
२. सोडे - १ वाटि
३. कांदा उभा चीरुन - १ मध्यम
४. ओलं खोबरं - १/२ वाटि
५. लसुण पाकळ्या - ४
६. आख्खे धणे - १ चमचा
७. जीरं - १/२ चमचा
८. सुख्या लाल मिरच्या - २
९. हळद - १/२ चमचा
१०. मसाला - २ चमचे (टिप नं १ बघा)
११. तेल
१२. चींचेचा कोळ किंवा १/२ लिंबाचा रस
१३. चवीनुसार मीठ
१४. बारीक चीरलेली कोथिंबीर
कॄती:
१. सोडे स्वःच्छ धुवुन बाजुला ठेवा
२. एका फ्राय पॅन मधे १ चमचा तेल तापलं कि अनुक्रमे त्यात कांदा, लसुण पाकळ्या, खोबरं, धणे-जीरं आणि सुख्या लाल मिरच्या घालुन परता
३. खमंग परतल कि मिक्सरमधे वाटुन त्याची मुलायम पेस्ट करा
४. आता एका नॉनस्टिक पॅन / कढई मधे ५ पळ्या तेल तापलं कि १ चमचा मोहरी घाला
५. मोहरी तडतडली कि हिंग, हळद घाला. आता वाटलेली पेस्ट घालुन परतत रहा
६. कडेने तेल सुटु लागलं कि २ चमचे मसाला घाला
७. मसाल्याचा कच्चा वास गेला कि चीरलेला दुधी आणि सोडे घाला
८. गरजेपुरतं पाणी, लिंबाचा रस घालुन मंद आचेवर रस्सा शीजु द्या. मधुन मधुन पाण्याचं प्रमाण चेक करुन रस्सा ढवळत रहा
९. दुधी शीजला कि गॅस बंद करुन बारीक चीरलेली कोंथींबीर पेरा
१०. गरमागरम रस्सा भाताबरोबर किंवा तांदुळाच्या भाकरीबरोबर हाणा. आज डब्यात हाच मेनु आणलाय.
टिपा:
१. साहित्यात जो मसाला म्हणालोय जो खासकरुन नॉनव्हेज करता वापरतात. मागे स्नेहातैने ह्याची पाकृ पण दिलेली आठवतयं. अगदि नसेलच तर कांदा-लसुण मसाल्यानी पण चव येईल
२. दुधी एवजी वांगी-सोडे पण रस्सा करतात...माझ्या मते ती सीकेपी स्टाईलने अधीक चवीष्ट बनते
३. रस्सा म्हटलं कि बटाटा हा हवाच...तो जरुर घाला. माझा राहिला :)
प्रतिक्रिया
14 Apr 2014 - 3:01 pm | कवितानागेश
भारी आहे पाककृती.
सोडे वगरै काही खात नाही, पण त्याशिवाय वेगळी काहितरी घालून छान लागेल
रस्सा मस्तच दिसतोय.
बाकी सोडे घाळून साधे फोडणीचे पोहेपण करतात असं ऐकलय. एकदा प्रयोग करुन बघा आणि टाका इकडे.
14 Apr 2014 - 3:05 pm | पैसा
छान वेगळीच पाकृ. पण दीपक, तू वापरलीस ती सुकी कोळंबी. सोडे म्हणतात ते जरा वेगळे दिसतात. मोठी कोळंबी अगदी साफ करून सुकवतात. ती अशी दिसते.
(फोटो आंतरजालावरून साभार)
14 Apr 2014 - 3:06 pm | सौंदाळा
वाह,
दिपकभाऊ फर्मास एकदम, टिप २ प्रमाणे घरी केली जाते, अशी पण करुन बघायला हवी.
पुर्वी दिघीहुन आणलेले सोडे आठवले, नुसते तोंडात टाकले तरी दिलखुष झालेला.
14 Apr 2014 - 4:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
दिपक.कुवेत साहेब, हे सोडे नाहीत ही "करंदी सुकट" आहे.
कोषांसकट सुकवलेली कोलंबी म्हणजे सुकट. कोष काढून सुकवलेला कोलंबीचा केवळ मांसल भाग म्हणजे सोडे.
ही पाकृ आवडीची आहे... रस्सा हवा असल्यास दुधी भोपळा टाकल्याने कालवणाला मस्त चव व जाडसरपणा (बॉडी) येते. करंदी सुकट कांदा, लसूण, तिखट, हळद व मीठासह तव्यावर तेलात परतूनही भन्नाट लागते. बरोबर तांदळाची गरमागरम भाकरी असली तर मग क्या कहने !
14 Apr 2014 - 4:48 pm | दिपक.कुवेत
आता सुकट आणि सोड्या मधला फरक बरोब्बर कळला. तरी पाकॄ लिहिताना एकदा मन साशंक झालच पण म्हटलं हरकत नाय....आपली जाणकार मंडळि आहेतच कि! असो. ह्या वेळि भारतातुन येताना पैसातै नी दाखवले तसे सोडे आणायचे होते पण आईपुढे काय हिम्मत झाली नाय! दुसर्या एका मित्राचं 'सुकट' पार्सल आणलं तर मला तंबी दिली कि पुढच्या वेळेस मी असलं काहि नेता कामा नये पन जल्ला ह्या जिभेचे चोचले काय कमी होत नाय :D
14 Apr 2014 - 5:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
करंदीपेक्षा निम्म्या आकाराच्या कोलंबी वाळवून "जवळा सुकट" बनवतात. तिचीही एका वेगळी फक्कड चव आणि टेक्स्चर असते. भाताबरोबर तिचे कालवण किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर करंदीसारखीच तव्यावर परतलेली जवळा सुकट आणि पोह्यांचा तळलेला पापड... म्हणजे वॉव !
सोडे खरेदी करताना नीट पाहून घ्या. चांगल्या प्रतीचे "खरे" सोडे बर्यापैकी महाग असल्याने माश्यांचे (विशेषतः रावसाचे) सोड्यांच्या आकाराचे तुकडे वाळवून अनभिज्ञ ग्राहकाला ते (बनावट) सोडे म्हणून विकले जातात. खरेदी करताना जरादेखील कुजकट वास असलेले सोडे घेउ नका. ते उतरलेल्या (बहुदा न विकल्या गेल्याने शिल्लक उरलेल्या, शिळ्या) कोलंबीपासून बनवलेले सोडे असतात. ते चवदार लागत नाहीत.
14 Apr 2014 - 6:19 pm | दिपक.कुवेत
हा "जवळा सुकट" हा प्रकार खाल्ला आहे. भरपुर कांदा घालुन तर अजुनच टेस्टी लागतो विशेषत: तांदळाच्या भाकरीबरोबर!
14 Apr 2014 - 6:55 pm | पिंगू
पनवेल-उरणला ताजा माल मिळेल.. कधी येतोस ते सांग.
14 Apr 2014 - 7:24 pm | दिपक.कुवेत
उरणला ताजा माल मिळतोच रे पण ओपनली घरी (उरणच्या) आणुन करता येत नाहि म्हणुन ईथे जे काय ओलं/सुखं मिळत त्यावर कशीतरी गुजराण करतो बिचारा!
14 Apr 2014 - 7:37 pm | पिंगू
हाहाहा.. एंजोय.. पुढे काही बोलूच शकत नाही..
14 Apr 2014 - 5:15 pm | कुंदन
असले चमचमीत खाता न वर विचारता पोट कमी कसे कराय्चे....
14 Apr 2014 - 5:23 pm | अत्रुप्त आत्मा
ईईईईईईईईईई ......... पय्ल्या फोटूतलं..वाळक्या मिरच्यांवानी दिसायलय! :-/ खरच्च..हे खातेत का??? :D
14 Apr 2014 - 5:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
नुसतं खातेत आसंच नाय. लै चवदार प्रकार हाय. यकदा खाल्लं की जिभेची सवय सुटत नाय, बुवा.
14 Apr 2014 - 5:54 pm | अत्रुप्त आत्मा
@यकदा खाल्लं की जिभेची सवय सुटत नाय, बुवा. >>> अस्सं म्हनताव व्हय..मंग दोनशे टक्के भारी असणार!
14 Apr 2014 - 5:54 pm | दिपक.कुवेत
अन्नाला नावं ठेवु नये. ईईईईई तर मुळ्ळिच म्हणु नये....त्यातल्या त्यात सोडे, सुकटाला तर नाहिच नाहि! एक्कासाहेब म्हणत्यात त्या प्रमाणे जल्ला एकदा चटक लागली कि सुटता सुटत नाय!
14 Apr 2014 - 7:17 pm | प्यारे१
आम्चं सुटलं ब्वा ! एखाद्याच्या जीवापेक्षा का जीभेचे चोचले जास्त? ;)
कन्व्हर्टेड :)
14 Apr 2014 - 7:19 pm | शुचि
झाड-पाल्याला जीव नसतोच ना मुळी. अरेच्या... किंवा असे असेल की तुम्ही फलाहार अन दुग्धाहारावरच असाल ;)
14 Apr 2014 - 7:21 pm | प्यारे१
:) कुठे शाकाहार मांसाहाराच्या मागे लाग ते शुचि मामी. खा की तुला जे आवडतं ते. आमी का नाय म्हनलंय काय बिल फाडा आपलं भरायला! ;)
14 Apr 2014 - 7:21 pm | दिपक.कुवेत
अगदि हाच विचार कधी कधी प्रबळ होतो पण डिश समोर आली कि (त्यातल्या त्यात मासे) जल बिन मछली अशीच हालत होते. बघु कधी सुटतय ते!
निग्रहि (होउ घातलेला)
14 Apr 2014 - 7:31 pm | शुचि
हाहाहा अहो कुवेत साहेब, "तळ्यात की मळ्यात अशा गिल्ट रिडन कालावधीत" मी माझ्या सिंधी मैत्रिणीला विचारले होते - तिचे उत्तर हे होते - "त्या जीवांना मारुन आपण त्यांची एकप्रकारे त्या योनीतून मुक्तताच करत असतो" :D
__________
कालच एकवीरा देवीचे (रेणुका) परशुराम्कृत स्तोत्र वाचत होते. त्यातील मांसाचा उल्लेख वाचून मी अगदी निश्चिंत झाले ;) -
कालरात्रि महारात्रि मद्यमांसशिवप्रिये |
भक्तानां श्रीपदे देवि लोकत्रयविमोहिनि ||१७||
14 Apr 2014 - 7:37 pm | दिपक.कुवेत
तुझ्या सिंधी मैत्रिणीचं उत्तर भारीच. कळतं पण वळत नाहि ना!
14 Apr 2014 - 7:39 pm | शुचि
होय मलाही वळले नाही पण आमच्या कुलदैवतेच्या स्तोत्राने मी तरी निश्चिन्त झाले. डोस्क्याला ताप नाय पायजेल ;)
14 Apr 2014 - 7:38 pm | प्यारे१
देव्हार्यात बस शुचिमामी. तुझी पण मद्यमांसानं पूजा करतो नि स्तोत्र म्हणतो. ;)
14 Apr 2014 - 7:42 pm | दिपक.कुवेत
का उगाच मामीचं डोस्क खातोयस. तु आपली नुसती दुधी घालुन वरील पाकृ कर....चल तुझ्या करीता खास पुढली पाकॄ दुधीचीच पण अस्सल शाकाहारी आणतो मग तर झालं?
14 Apr 2014 - 7:45 pm | शुचि
दुधी सर्वात "सात्विक" भाजी असते असे लहानपणी ऐकलेले. अल्कलाइन असेल म्हणून असेल. दुधीही आवडते. खरं तर खाण्यात सगळं आवडतं. ह्म्म - बीफ विशेष आवडले नाही. वातड असते. असो.
15 Apr 2014 - 2:47 pm | अत्रुप्त आत्मा
14 Apr 2014 - 7:22 pm | यशोधरा
बुवा, कुफेहेपा? सुकटाला ईईई करता? हा हंत!
14 Apr 2014 - 6:20 pm | त्रिवेणी
आम्ही अजुन पापलेट आणि सुरमई च्या वर्गात आहोत. सोडे, सुकट पर्यंत कधी पोहोचायचे?
14 Apr 2014 - 6:54 pm | पिंगू
एकदा विकत आणा आणि करुन बघा.. लगेच पोचाल पुढच्या वर्गात..
14 Apr 2014 - 7:19 pm | कपिलमुनी
मस्तच डिश ..
सोडे घालून केलेली सारस्वती खिचडी आठवली ... कुणाकडे आहे का पा़कृ ??
14 Apr 2014 - 8:08 pm | सूड
मासळी बाजार मांडलंनीत रे नुसता !!
14 Apr 2014 - 8:42 pm | कंजूस
हा लेख /पाकू सोडून "मराठी व्याकरणातील चुका ईत्यादि गहन विषयाकडे वळणार होतो पण दिपकचे नाव वाचून उघडला .
आत्मुबुवांच्या प्रतिसादांवरून एक मजेदार घटना आठवली .
आमचे अय्यर मित्र कंपनीच्या कैंटिनमध्ये राजमा उसळ असली की उसळ भात आवडीने चापत असत .एकदा एकटेच गेले आणि सांगत आले की "टुडेज राजमा सिम्पली वंडरफुल "आजची उसळ अप्रतिम होती .नंतर जेवायला गेलेल्यांनी सांगितले की अय्यरने चुकुन सोड्यांची उसळ मिटक्या मारत राजमा समजून खाल्ली होती .
त्यादिवशी संध्याकाळी अय्यरने "परफॉमड स्पेशल पुजा अव विनायका ".
आत्मुबाबा सोडा तुमचा हट्ट आणि चला कुवेतला .
15 Apr 2014 - 7:01 am | स्पंदना
अय्यराऽऽ!!
काय झालं असेल त्या बिचार्याच नंतर? :))
15 Apr 2014 - 3:02 pm | दिपक.कुवेत
त्या अय्यरची आठवुन आठवुन काय स्थीती झाली असेल ह्याची कल्पना करवत नाहि!!! आयुष्यात पुन्हा त्यानी राजम्याला हात म्हणुन लावला नसेल!
14 Apr 2014 - 8:46 pm | प्रभाकर पेठकर
दिपक आत्ताच येताना भरपूर सोडे, करंदी आणि जवळा आणले आहेत. आमच्या घरीही चालत नाही. पण माझा भाचा खाणारा आहे. त्याच्या घरी ठेवतो. प्रत्यक्ष विमानतळावर निघण्याआधी तो आणून देतो आणि सर्व 'माल' सुखरूप मस्कतला पोहोचतो.
इथे २-४ मित्रांकडे पण द्यायचे असल्याने जवळ जवळ अडीच-तिन हजाराचा माल असतो.
तुझ्या पाककृतीत दाखवलेली करंदी आहे हे पैसा आणि इतरांच्या प्रतिसादातून तुला समजले आहेच. मला करंदी अशीच सुंदर मिळाली. एकसारखा सोनेरी रंग आणि कुरकुरीत. जवळाही भन्नाट आहे.
सोडे आणि करंदीची भरलेली वांगी आणि खिचडी भन्नाट होते. जवळा किंचित भाजून नंतर कांद्यावर परतून त्यात तिखट मिठ आणि आमसुलं टाकून जरा पाणी घालून वाफवायचं आणि शिजल्यावर (लगेच शिजतं) पाणी आटवून टाकायचं. कधी ताजे मासे नाही मिळाले तर असे सुकट कामी येते.
शुचि, >>>>त्या जीवांना मारुन आपण त्यांची एकप्रकारे त्या योनीतून मुक्तताच करत असतो.
मी कधीच प्राण्यांना मारत नाही. दुसर्यांना मारायला सांगतही नाही. पण त्यांनी आधीच मारलेले असतात. त्या बिचार्या प्राण्यांचा जीव आधीच गेलेला असतो त्यांना असेच फेकून देण्याऐवजी त्यांचे बलीदान सार्थकी लावण्याचा प्रयत्न मी करतो. त्यांच्या सुंदर सुंदर पाककृती बनवून मित्र मंडळींना खूश करतो त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करतो आणि त्यांचा शुभआशिष त्या प्राण्यांना मिळवून देतो. असो. गंमतीचा भाग सोडता हे निसर्गचक्र आहे. अपराधी वाटून घ्यायचे कारण नाही.
14 Apr 2014 - 9:24 pm | शुचि
:) अगदी अगदी!!!
15 Apr 2014 - 3:05 pm | दिपक.कुवेत
"दिपक आत्ताच येताना भरपूर सोडे, करंदी आणि जवळा आणले आहेत" वाचुनच सुकट झालो. आता येतोच एकदा....होउन जौ दे बकार्डि विथ सुकट्/सोडे रस्सा.
14 Apr 2014 - 9:22 pm | मुक्त विहारि
बादवे,
मंगफच्या सुलतान मार्केट मध्ये सुकट मिळते.
आणि तिथे न मिळाल्यास, फाईलच्या लुलु सेंटरला हमखास मिळेल.
ताजी मासळी हवी असेल तर शुक्रवारी फाईलच्या मच्छी मार्केटला जरूर भेट दे.
३ ते ४ दिनारमध्ये भरपूर कोलंबी मिळते.कुवैतला असतांना, आमच्या ग्रूपचा दर शुक्रवारचा बेत हाच असायचा.इतर लोक बिर्याणी नामक काहीतरी खात असतांना आपण कोलंबी-भात खाणे म्हणजे पर्वणीच असायची.
(च्यामारी, आता यांबूच्या मच्छी मार्केटला भेट द्यावी लागणार.)
(मत्स्यप्रेमी) मुवि.
15 Apr 2014 - 3:09 pm | दिपक.कुवेत
मंगफला सुकट मिळते हे माहित नव्हते. आता एखाद्या शुक्रवारी जाईन तिथे. ताज्या मासळिसाठि मात्र फाईलपेक्षा मी सीटि (बुढ्ढी मार्केट) किंवा शर्क मधे जातो. दोन्हि ठिकाणी छान मिळते आणि जवळहि आहे शीवाय ऑफिसच्या वाटेवर.
14 Apr 2014 - 10:20 pm | भाते
रस्श्याचा फोटो मस्तच आहे.
भल्या माणसा,
काय मिळालं रे तुला सोमवारी असली पाकृ टाकुन? हे वाचुन झाल्यावर दुपारी हापिसात बसुन काम कसं करायचं आम्ही?
त्यामुळे दुपारी धागा न उघडता आत्ता जेवण झाल्यावर उघडला. विकांताला देत जा ना पाकृ!
15 Apr 2014 - 12:12 pm | सुहास झेले
मस्त... दमदार पाककृती :)
15 Apr 2014 - 2:44 pm | तुमचा अभिषेक
एक पदार्थ आवडीचा आणि एक पदार्थ नावडीचा. वेचून वेचून खावे लागेल हे. अर्थात वेचून खायचा पदार्थ सोडेच हं, नाहीतर कोणाला दुधी वाटेल.
बाकी आमच्याकडे वांग्यामध्ये सोडे टाकले जातात. त्यातही वांगे माझ्या नावडीचेच, पण चटणीला जी काही चव येते तिला तोड नाही.
15 Apr 2014 - 3:15 pm | दिपक.कुवेत
असं असेल तर एकदा हा रस्सा नक्कि करुन बघ (अर्थात दुधी घालुन)....ताट चट्टामट्टा करशील.
1 May 2014 - 6:25 pm | तुमचा अभिषेक
शक्यय, दुधीशी तसा पंगा नाही कारण दुधी हलवा आवडीने खातो मी. पण त्याच दुधीला भाजी म्हणून खाणे जीवावर येते, नव्हे खातच नाही. जर सोड्यांनी त्या दुधीमधील भाजीत्व काढून टाकले तर नक्कीच डिश साफ होईल जे फिश म्हटले की होतेच. बघूया, पावसाळ्यातच आता सुकटाचा सीजन सुरू होईल, सध्या आमचा मटणाचा रतीब चालूय.
15 Apr 2014 - 6:33 pm | कंजूस
पावभाजीची सुरुवात ७२ साली नुकतीच जवेरी बाजारच्या फुटपाथवर होऊ लागली होती आणि त्यात कांदा नसायचा .सर्व उकडलेल्या भाज्या 'अमूल'मध्ये तव्यावर परतून बनायच्या .हे 'लोण' लवकरच पार्ले ,माटुंगा आणि घाटकोपरला पसरले .पाच वर्षात हल्लीची पावभाजी आली .परंतु यापूर्वी इराणी हॉटेलांत शाकाहारी लोकांसाठी दुधीची रस्साभाजी पावाबरोबर द्यायचे .याचा रस्सा कलिंगडाच्या बियांच्या मगजाचा करायचे .फारच छान लागायचे .दुधी आणि भेंडी आखाती देशांत फारच प्रिय आहे .आत्मुबाबांसाठी हा दुधी रस्सा एकदा करून पाहा .
15 Apr 2014 - 8:28 pm | प्रभाकर पेठकर
मुंबईत सुरुवातीला 'पावभाजी' हॉटेलात आली. त्याला ते 'घोटाळा' किंवा 'घोटाळा भाजी' असे म्हणायचे. पण त्याने विशेष जम पकडला नाही. पुढे तीच भाजी फुटपाथवर हातगाडीवर आली. भल्या मोठ्या तव्यावर कांदा, टोमॅटो, फ्लॉवर असे जिन्नस मांडून हातातल्या जाड कलथ्याने तव्यावर ठाण..ठाण असा आवाज करत गिर्हाईकांना आकर्षित केलं जायचं. गुजराथी समाजाने ह्या भाजीला राजाश्रय दिला. तेंव्हा भाजी पूर्णपणे चेचायचे नाहीत. जरा आख्खे तुकडे असायचे. तसेच तेलातली आणि अमूल बटरमधली (पेश्शल) अशी भाजी मिळायची. नंतर भाजी पूर्ण चेचायचे सुरु झाले. आणि साधी पावभाजी आणि खडा (किंवा फ्राय भाजी) असे दोन प्रकार मिळायला लागले. फ्राय भाजी पूर्णपणे अमूल बटर मध्ये बनवतात. पाणी वापरत नाहीत. त्यामुळे ती चवीला उजवी वाटते (उष्मांक भरपूर). तेलातली भाजी नंतर मागे पडली आणि बंद झाली. आता ती भाजीही अमूल मध्येच बनवितात पण शिजविण्यासाठी पाणी वापरतात. नंतर ड्रायफ्रुट भाजी, मश्रूम भाजी, चिझ भाजी आली. बहुतेक ठिकाणी ४-५ पावभाजींच्या गाड्यांशेजारी एखादा 'मथुरा का कुल्फीवाला' असतोच. अंडाफ्राय, भेजाफ्राय, फिशफ्रायच्या गाड्या ह्या शाकाहारी गर्दीपासून दूर असतात. तिथेही 'वेगळी'च गर्दी असते. मुंबईत वाढत्या रात्रीबरोबर ह्या गाड्यांवर गर्दी वाढत जाते. तो आनंदच निराळा.
16 Apr 2014 - 7:40 pm | कंजूस
पावभाजीचा प्रवास अगदी बरोबर पेठकर काका .फावल्या वेळात एक वेगळा लेख काढाच एकदा .मी अमुलची खडाच खातो ,कांदावाली नाही .आणि दिपक एकदा दही बडीशेप वाला जो काश्मिरी /हिमाचली रस्सा करतात(राजमा वगैरेसाठी) त्याची पण एक पाकृ येऊदे .
16 Apr 2014 - 7:53 pm | दिपक.कुवेत
मी पण खडा पावभाजीच करतो (अजीबात पाणी न घालता; तेल+अमुल बटर अंमळ जरा जास्त घालुन) आणि तशीच आवडते देखील. कुकर मधे वाफवुन केलेली भाजी तर अजीबात आवडत नाहि. चोथट होते (हे माझं मत)
16 Apr 2014 - 8:59 pm | जेनी...
दिपु काका मी वाफवुनच करते .. खडाची स्पेशल तुमचीवाली रेसीपि पण यु द्या कि ओ मला बी पाव्
भाजी खौद्याकि ओ =))
15 Apr 2014 - 7:05 pm | दिपक.कुवेत
तुमच्याकडे पण माहितीचा बराच खजीना दिसतोय. नेक्स्ट टाईम आलो कि तुमची हजेरी नक्किच हवी आहे!
15 Apr 2014 - 9:20 pm | मयुरा गुप्ते
दिपक, तुमचं कन्फुजन दूर झालेलंच आहे, वरचा फोटो सुकटीचा आहे.
सोडे जरा काळपट आणि लांबट असतात.
सोड्याची खिचडी, सोड्याचं कालवण, दुधी सोडे,वांग सोडे, फ्लॉवर सोडे,मेथी सोडे, सोडे विथ पोहे, सोडे विथ उपमा, सुकटीचं कालवण, जवळ्याची भजी...ह्या सगळ्याची चव आवडायला नक्कीच वेळ लागतो, पण एकदा चव आणि वास ह्याची सवय्,आवड निर्माण झाली की बास रे बास.
-मयुरा.
16 Apr 2014 - 9:23 am | जेनी...
दिपु काका एकदम लवली दिसतीय भाजी .. कस्काय बॉ जमतं तुम्हाला नोकरी न किचन ???
काकु लै नशिब्वाने !!
16 Apr 2014 - 11:56 am | दिपक.कुवेत
तु नाहि का पुजा ते जेनी होतेस तितकच सोपं आहे ते!
16 Apr 2014 - 12:46 pm | पक्या
छान रेसिपी. सोड्या बरोबर जास्त छन लागेल असे वाटते .
16 Apr 2014 - 7:47 pm | अनन्या वर्तक
दिपक.कुवेत फोटो मस्त आहे रेसिपीचा. चव कशी असेल त्या बद्दल मला काहीच कल्पना नाही. Dry फिश मी कधी खाल्ले नाही आहेत पण ऐकुन माहीत आहे.
17 Apr 2014 - 11:01 am | आरोही
सोडे आणि सुकी करंदी यातील फरक कळला ..पदार्थ छान आहे ..मी खात नसले तरी इतरांसाठी बनवून बघेन ...
1 May 2014 - 3:39 pm | सस्नेह
दुधी आणि सोडे हे काँबिनेशन जरा अजब वाट्ले. त्याऐवजी बटाटा घातला तर ?
मसालाही वेगळाच आहे. चविष्ट लागत असणार.