मिपा संपादकीय - "अब और कितना गिरना बाकी है "?

संपादक's picture
संपादक in विशेष
27 Jul 2008 - 11:51 pm
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...

"अब और कितना गिरना बाकी है "?

२००५ मध्ये "मातृभूमी ए नेशन विदाउट विमेन" नावाचा सिनेमा पाहिला..बरीच परीक्षणं वाचलेली होती,गोष्ट माहित होती, आपण एक सामाजिक आशय असलेला सिनेमा पाहून संदेश वगैरे घेऊन प्रसन्न मनाने बाहेर पडणार इतकी बाळबोध अपेक्षा नव्हती तरी सिनेमा इतका त्रास देऊ शकेल असंही वाटलं नव्हतं... लिंगभेद, स्त्रीभ्रूणहत्या, जातिभेद यांचं इतकं भडक भयानक रूप पाहताना कोणीतरी कानाखाली आवाज काढल्यासारखं वाटलं.....बाहेर येताना सुन्न वगैरे झालोच, मग एक पहिली प्रतिक्रिया म्हणजे एका संवेदनशील विषयावर इतका भडक सिनेमा बनवल्याबद्दल "मनीष झा'ला यथेच्छ शिव्या घातल्या...

पुढचे काही दिवस "मला सिनेमा अजिबात आवडला नाही " असे म्हणत राहिलो " असं कुठे असतं का? आपला समाज इतका काही वाईट व्हायचा नाही "अशा डिनायलमध्येही गेलो....त्यालाही काही अर्थ नव्हता...या विषयावर गुळमुळीत, सपक, गोग्गोड सिनेमा कसा बनवणार होता तो ? आणि समजा बनवला असता तरी इतका भिडला असता का?

तंत्रज्ञान जसं वाढत गेलं तशा गर्भलिंगनिदानाच्या टेस्ट अधिकाहिक विश्वसनीय, परवडणार्‍या होत गेल्या पण त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण फ़ार वाढलं. १९९४ला स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायदा झाला व गर्भलिंगनिश्चितीवर बंधने घालण्यात आली. तरी १९९१ मध्ये भारतातील स्त्रियांचं प्रमाण हजारी ९७१ होतं ते २००१ च्या सुमारास ९४१ इतकं कमी झालं.असल्या प्रॊब्लेमचं मूळ खेड्यात आणि अशिक्षित जनतेत असावं असा गैरसमज मी सुद्धा अनेक वर्षं जोपासला. पण आकडेवारी काही वेगळंच सांगते. हरयाणा आणि पंजाबमधल्या काही सधन जिल्ह्यांमध्ये स्त्रियांचा जन्मदर ८५०च्याही खाली उतरला आहे, असं ऐकतो...

महाराष्ट्र प्रगत आहे, तिथे असलं नसेल किंवा कमी असेल असं मानण्याचं काही कारण नाही..उलट भारतातील सर्वात जास्त अल्ट्रासाउंड क्लिनिक्स महाराष्ट्रात आहेत आणि जिथे अल्ट्रासाऊंड क्लिनिक्स जास्त तिथे जुवेनाईल सेक्स रेशो घटतोच हे नक्की सिद्ध झाले आहे. ...श्रीमंत आणि प्रगतिशील जिल्ह्यांमध्ये , कारखाने आणि बागायती असलेल्या जिल्ह्यांमध्ये स्त्रीभ्रूणहत्या जास्त दिसते...पुणे मुंबई, कोल्हापूर, नाशिक आणि सांगली हे जिल्हे यात प्रचंड आघाडीवर आहेत.... ( आणि अरुणाचल, मणिपूर आणि छत्तीसगढमधले आदिवासी बहुसंख्य असलेले काही जिल्हे असे आहेत जिथे स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक आहेत.)

जालावरच्या एका चर्चेत सुशिक्षितांपैकी अनेक जण व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली लिंगनिश्चितीचं समर्थन करताना पाहिले तेव्हा अंगावर काटा आला. हायकोर्टात याचसंदर्भात एका जोडप्याने गेल्या वर्षी एक याचिका दाखल केली होती, "पहिली मुलगी असल्यास आम्हाला दुसर्या मुलासाठी लिंगनिश्चितीचा अधिकार मिळायला हवा..माझ्या कुटुंबाचा समतोल राखणं हा माझा मूलभूत मानवी अधिकार आहे" असं त्यांचं म्हणणं होतं....ही याचिका हायकोर्टने कडक शब्दांत फ़ेटाळली की अशी परवानगी देणं हे स्त्रीभ्रूणहत्येला कायदेशीर परवानगी दिल्यासारखं होईल ... ती याचिका फ़ेटाळली म्हणून बरे...तशाही पळवाटा आहेतच...

१९९४ च्या गर्भनिदान विरोधी कायद्यान्वये खालील कारणासाठी गर्भपातांना परवानगी आहे

१....(failure of contraception) चुकून झालेली / नको असलेली गर्भधारणा..

२....( genetic abnormality) गर्भामध्ये काही गंभीर आजार / डिफ़ॊर्मिटी असतील तर
परंतु याच गोष्टी इच्छुकांसाठी उत्तम पळवाटा आहेत...

एका हॊस्पिटलमध्ये नोकरी करणार्या सोनॊलोजिस्टने सांगितलेली गोष्ट प्रातिनिधीक मानता येईल... त्यांनी एका जोडप्याला गर्भलिंगनिदानासाठी स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि हे बेकायदेशीर आहे अशी जाणीव करून दिली. मग त्यांनी बाहेरून कुठून तरी लिंगनिश्चितीचे काम करून घेतले, आणि पुन्हा त्याच हॊस्पिटलला येऊन गायनॆकॊलोजिस्टकडे जाऊन पुढचा कार्यभाग उरकला...अशा वेळी हे जोडपे त्या गायनेकॊलोजिस्टला ही नको असलेली गर्भधारणा आहे असे कारण देते.... ते सोनॊलोजिस्ट म्हणाले, "हे असेच चालू असते, मी तरी काय करू शकतो?"
मला या बाबतीत दोन महत्त्वाचे मुद्दे मांडावेसे वाटतात...
...
१. डॊक्टरांनी जबाबदारीने वागायची आवश्यकता...

वरील उदाहरणात जर बाहेरच्या डॊक्टरांनी गर्भलिंगनिदान सांगितलेच नाही तर हे घडायचा संबंधच येत नाही... बहुसंख्य डॉक्टर जरी हे नियम पाळत असले तरी थोड्या पैशांच्या मोहाने हे सारे करणारे डॉक्टरही आहेतच... याला कोणतेही नैतिक कारण वगैरे असेल असे पटण्यासारखेच नाही...

...असाही एक किस्सा वाचला होता की एक डॊक्टर कायद्याच्या भीतीने स्पष्ट लिंगनिदान सांगत नसत परंतु पुढची अपॉइन्ट्मेंट monday ला दिली तर मेल आणि friday ला दिली तर फ़ीमेल अशी त्यांची पद्धत होती.( त्याबद्दल इतर स्टाफ़कडून पेशंटला आधीच पढवून ठेवण्यात येत असे).. आता या डॊक्टरला कसं काय पकडणार?

एक दक्षिण महाराष्ट्रातले एक मोठे गायनॆकॊलोजिस्ट आहेत ... ३० वगैरे वर्षांची प्रॆक्टिस, मुलगा सून वगैरे सुद्धा डॊक्टर्स, रेप्यूटेड मोठे हॊस्पिटल वगैरे वगैरे झकास आहे.. पण त्यांना बेकायदेशीर गर्भपाताच्या कायद्यान्वये अटक होऊन त्यांचं सोनोग्राफी मशीन सील केलं गेलं, हा पेपरातला फोटो पाहून माझ्या काकानं मला माहिती दिली की त्यांना काही वर्षांपूर्वी सुद्धा अशीच अटक झाली होती, आरोप सिद्ध न होता त्यांना सोडून देण्यात आलं.... म्हणजे एकदा अटक होऊनही त्यांचं काम चालूच राहिलं होतं... इतकी वर्षं प्रचंड कमावूनसुद्धा हेच काम पुन्हा आपल्या मुलाला सुनेला करायला लावणार्या या डॉक्टरांना केवळ पैशांचं मोटिव्हेशन असेल की अजून काही उदात्त विचार असतील ? मला तरी काही उत्तर सापडलं नाही... जनाची नाही निदान मनाची तरी लाज ठेवावी...?

मग कन्व्हिक्शन नसल्यामुळे अशा डॊक्टरांना कायद्याचं भय उरलेलं नाही, कायदा अजून कडक केला पाहिजे, दंड वाढवला पाहिजे, सक्तमजुरी वाढवली पाहिजे वगैरे सारं ठीक आहे पण डॊक्टरांची आणि एकूणच समाजाची मानसिकता बदलेपर्यंत हा मार्ग प्रभावी ठरेल असे मला वाटत नाही.

( कायद्याचा बडगा आणि पोलीस असल्याशिवाय आपण चांगलं वागूच नये का ? दंडुका घेतलेल्या पोलिसानं किती कायदे इम्प्लिमेंट करायचे ? सगळी जबाबदारी पोलिसांचीच का? पोलीसांनी दंगली खून दरोडे यांचा तपास करायचा की तुमचा पोरगा हुक्का ,सिगरेट, ड्रग्ज ओढतो का ते पहायचे? असा प्रश्न एका टॊक शो मध्ये पोलीस अधिक्षक नांगरे पाटलांनी विचारल्याचं इथे आठवतं.. )

२.लिंगभेदाची मानसिकता बदलायची गरज ...

....आपल्याकडे आशीर्वाद तरी कसे असतात? पुत्रवती भव वगैरे.... कथा कादंबर्‍यांतूनसुद्धा देशरक्षणासाठी शूर पुत्र होऊ दे वगैरेच भाषा.... का?.नवीन लग्न झालेल्या बाईला आडून आडून का होईना " मुलगाच हवा" वगैरे टाईपातले सूचक इशारे, कधी टोमणे, घरगुती समारंभात मुलगा असलेल्या बाईला स्पेशल प्रिव्हलेजेस असणे, हुंडा आणि लग्नसमारंभाचा प्रचंड खर्च वधुपित्याला करावा लागणे ( इथे माहितीतला एक आय टीमध्ये काम करणारा एक आंध्रातला इंजिनियर आठवतो जो स्वत:चा लग्नाच्या बाजारातला भाव अंमळ अभिमानानेच २० लाखापर्यंत असेल असे सांगत होता) या असल्या गोष्टीच गर्भवती स्त्रीवरचा मानसिक ताण प्रचंड वाढवत असणार यात शंका नाही. त्यातूनच ती कुटुंबाच्या दबावामुळे स्त्रीभ्रूणहत्येचा टोकाचा निर्णय घेत असणार...

एका दूरच्या नातेवाईक स्त्रीने पहिल्या मुलीनंतर मुलासाठी तीन वेळा गर्भपात करून घेतला होता, असं ऐकलं.... तिचे विचार असे की ती स्वत: तीन बहिणींबरोबर एकत्र वाढलेली होती आणि तिला म्हणे तिच्या मुलीचं असं होऊ द्यायच नव्हतं. ( असं म्हणजे नक्की कसं ते काही मला कळलं नाही आणि तिचंही तेच म्हणणं होतं की बाकीच्यांना काय कळणार माझ्या भावना?")
मातृभूमी सिनेमा पाहिला त्याच काळात एका नातेवाईकांकडे गेलो होतो आणि तिथे महिलावर्गाची आसपास कोणाकडेतरी मूल जन्माला आल्यानंतर काही गुंतागुंत होऊन दुर्दैवाने वाचले नाही , यावर काही चर्चा चालू असताना एक बाई एकदम म्हणाल्या ," ... आणि मुलगा होता हो...." सगळ्या बायकांनी संमतीदर्शक माना हलवल्या...मी जाम उखडलो, "याचा अर्थ काय , तर ती गेलेली मुलगी असती तर तुम्हाला कमी दु:ख झालं असतं, असंच ना?"

मान्यय, या सगळ्या मनात खोलवर रुजलेल्या गोष्टी असतात, पण प्रयत्नपूर्वक त्या कमी तर करायला हव्यात... जिथे अशा गोष्टी दिसतात, अशा रूढी-परंपरांना क्वेश्चन तरी करायला हवं.. ही जबाबदारी कोणाची ?? आपण ते करतो का? की हा तर प्रत्येकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न म्हणून गप्प बसतो ? की कधी हा आगदी चावून चोथा झालेला विषय म्हणून दूर ढकलत राहतो?? साहजिक आहे , मग साउथ दिल्लीचा सेक्स रेशो पोचतो ७६२ वरती आणि बोरीवलीमधला ७२८ वरती... दहा पंधरा वर्षांत आपण केवढे खाली गेलो आहोत...अजून पाच दहा वर्षांत हे आकडे ६०० होतील, ५०० सुद्धा होतील कदाचित.....हे असंच चालू राहिलं तर मातृभूमी सिनेमातलं मनीष झानं वर्तवलेलं भविष्य फ़ार दूर नाही..

म्हणूनच म्हणतो, "अब और कितना गिरना बाकी है "?

पाहुणा संपादक : भडकमकर मास्तर.

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jul 2008 - 12:15 am | बिपिन कार्यकर्ते

हे खरोखरच भयानक आहे. माझ्या मते, हा एक फार गुंतागुंत असलेला प्रश्न आहे. त्याची मुळं आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या प्रथांमधे आहे. अश्या समस्या नष्ट करायला समाजप्रबोधन हाच एकमेव मार्ग आहे. नुसते कायदे करून वगैरे भागणार नाही. (कायदा नुसता करून भागत नाही तर त्याची अंमलबजावणी ही कडक पणे झाली पाहिजे. कोण ते परकिय इंग्रज पण त्यांनी सती सारखी भयानक प्रथा निग्रहाने मोडून काढली आणि आपल्याला स्वतंत्र भारतात साधी गर्भलिंगचाचणी नाही थांबवता येत, गर्भपात थांबवणे तर पुढची गोष्ट.)

( कायद्याचा बडगा आणि पोलीस असल्याशिवाय आपण चांगलं वागूच नये का ? दंडुका घेतलेल्या पोलिसानं किती कायदे इम्प्लिमेंट करायचे ? सगळी जबाबदारी पोलिसांचीच का? पोलीसांनी दंगली खून दरोडे यांचा तपास करायचा की तुमचा पोरगा हुक्का ,सिगरेट, ड्रग्ज ओढतो का ते पहायचे? असा प्रश्न एका टॊक शो मध्ये पोलीस अधिक्षक नांगरे पाटलांनी विचारल्याचं इथे आठवतं.. )

बहुतांशी सहमत.

२.लिंगभेदाची मानसिकता बदलायची गरज ...

माझ्या पुरतं बोलायचं झालं तर, मला दोन्हीही मुलीच आहेत. मला त्याबद्दल कधीच वाईट वाटत नाही, ना माझ्या बायकोला आणि घरी अजून कोणाला. आमच्या मनात सुद्धा कधी आलं नाही. (माझा अनुभव, मुली बापाच्या जरा जास्तच लाडक्या असतात आणि त्याही बापाच्या पक्षपाती असतात.) माझ्या माहितीत अशी बरीच जोडपी आहेत ज्यांना १ किंवा २ मुली आहेत आणि त्या बाबतीत काहीसुद्धा तक्रार नाहिये त्यांची. म्हणजे, परिस्थिती सुधरते आहे हळूहळू, पण तो पर्यंत अजून किती बळी जाणार आहेत?

एक बाई एकदम म्हणाल्या ," ... आणि मुलगा होता हो...." सगळ्या बायकांनी संमतीदर्शक माना हलवल्या

भयानक... बरं झालं मी तिथे नव्हतो. त्या बाईंची खैर केली नसती.

मास्तर, तुम्ही एका अतिशय महत्वाच्या प्रश्नावर लिखाण केले आहे. आणि लिखाण ही अभ्यासपूर्ण आहे.

बिपिन.

इनोबा म्हणे's picture

28 Jul 2008 - 12:19 am | इनोबा म्हणे

या लेखातील विचारांशी पुर्णपणे सहमत...!
मास्तर, फारच महत्वाच्या विषयावर लिहीले आहे आपण... धन्यवाद!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

भाग्यश्री's picture

28 Jul 2008 - 12:22 am | भाग्यश्री

मास्तर खूप आवडला अग्रलेख.. मातृभूमी अजुन पाहायचाय, पण खूप जणांकडून ऐकले की काटा येतो अंगावर वगैरे.. पण खरंच हे असंच चालू राहीले तर ती वेळ दुर्दैवाने येईल.. हा अत्यंत गंभीर प्रश्न असला तरी अजुन लोकांना त्याचं गांभीर्य नाही कळलेले दिसतं.. स्त्रीभृणहत्या करणे तर सरळ-सरळ ह्त्या-खून आहे.. मग त्याला त्याप्रमाणेच शिक्षा का नाही होत?
असो, खूप छान, कळकळीने लिहीले आहे.. नाव समर्पक! :)

भडकमकर मास्तर's picture

28 Jul 2008 - 1:15 am | भडकमकर मास्तर

स्त्रीभृणहत्या करणे तर सरळ-सरळ ह्त्या-खून आहे.. मग त्याला त्याप्रमाणेच शिक्षा का नाही होत?

प्रश्न रास्त आहे...जीवनाची सुरुवात नक्की केव्हा सुरू होते यावर मतभेद असतात...( या प्रश्नाला अध्यात्मिक, मानसिक , वैद्यकीय दृष्टीकोन आहेत)... उदा. पूर्वीच्या ख्रिश्चन समजुतीप्रमाणे जेव्हा चौथ्या पाचव्या महिन्यात गर्भाची हालचाल जाणवायला लागते , (त्याला बहुधा क्विकनिन्ग म्हणतात) तेव्हा जीवनाची सुरुवात होते... आता हे उद्योग करणारे कदाचित असं मानत असावेत की तेव्हा त्या भ्रूणाच्या आयुष्याला सुरुवातच झालेली नसते....... असो...

माझं वैयक्तिक मत असंच की बीज फलित झाले की आयुष्य सुरू झाले....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बेसनलाडू's picture

28 Jul 2008 - 1:30 am | बेसनलाडू

विचारप्रवर्तक अग्रलेख. अभिनंदन. या समस्येवर माझ्या बाजूने काय करता येईल,याचा विचार करतो आहे.
(विचारमग्न)बेसनलाडू

नंदन's picture

28 Jul 2008 - 1:42 am | नंदन

आवडला, एका महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडल्याबद्दल अभिनंदन.

एक पहिली बेटी, धनाची पेटी ही (बहुधा सांत्वनपर) म्हण वगळली, तर 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' पासून 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' पर्यंत सारे आशीर्वाद, सार्‍या म्हणी याच मानसिकतेचे दर्शन घडवतात. भारतीय जोडप्यांच्या दत्तक घेण्याच्या टेन्डन्सीवर एक लेख मागे वाचनात आला होता. बहुतेक जोडप्यांची पसंती अर्थात मुलांनाच होती.

पुढील काही वर्षांत स्त्री-भ्रूणहत्या थांबवण्याबरोबरच, एकंदरीतच समाजाची मानसिकता बदलण्यावर भर दिला नाही तर मातृभूमीत रंगवलेले कल्पनाचित्र प्रत्यक्षात उतरणे अशक्य नाही.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Jul 2008 - 2:05 am | ब्रिटिश टिंग्या

मास्तर अतिशय ज्वलंत प्रश्नाला हात घातलाय!

मागील काही वर्षांपर्यंत बर्‍याच जोडप्यांचा "मुलगाच हवा" असा आग्रह होता.
सुदैवाने सध्या काही प्रमाणात साक्षरता अन् ग्लोबलायझेशनमुळे ही परिस्थिती बदलत आहे असे निदर्शनास येऊ लागले आहे.
बर्‍याच कुटुंबात मुलगा-मुलगी हा भेद केला जात नाही....घरात, कार्यालयात स्त्री-पुरुष समानता दिसुन येते....ही सर्व त्या दृष्टीने टाकलेली पहिली पावले मानता येतील.

नो डाऊट की आजही दुर्दैवाने काही प्रमाणात सुशिक्षीत कुटुंबात वंशाचा दिवा हवा असाच हट्ट धरला जातो. परंतु, ऍटलीस्ट शहरी भागाततरी लवकरच ही परिस्थीती बदलेल अशी आशा वाटते.

ग्रामीण भागाबद्दल जास्त कल्पना नाही परंतु त्यांना प्रबोधनाची नक्कीच जास्त गरज आहे!

असो लेख आवडला अन् यावर जाणकारांची मते वाचायला आवडतील!

- टिंग्या

भडकमकर मास्तर's picture

28 Jul 2008 - 2:27 am | भडकमकर मास्तर

ग्रामीण भागाबद्दल जास्त कल्पना नाही परंतु त्यांना प्रबोधनाची नक्कीच जास्त गरज आहे!
मलाही बराच काळ असे वाटत असे...
पण मग शहरी भाग जर इतका पुढारलेला असेल तर तिथली आकडेवारी इतकी विसंगत कशी??

या बाबतीत शहरी आणि ग्रामीण अशी विभागणी थोडी फसवी आहे असे मला वाटते...
( कदाचित ग्रामीण भागात तंत्रज्ञानाला ऍक्सेस नाही तितका म्हणूनही ग्रामीण भाग बरा दिसत असेल परंतु त्यामुळे शहरी भाग कसा चांगला ठरणार?)

श्रीमंत जिल्हे नेहमीच कमी जुवेनाईल सेक्स रेशोवाले असतात.... वाचा हा दुवा... त्यातला एक ग्राफ दाखवतो की महाराष्ट्रातले नंदुरबार आणि गडचिरोली हे भाग अविकसित मानता येतील पण तिथला सेक्स रेशो ९८० च्या आसपास आहे....
http://infochangeindia.org/200601035920/Children/Books-Reports/The-riche...

आणखी काही दुवे..
http://www.hgalert.org/sexselection.PDF
http://foeticide.blogspot.com/

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रियाली's picture

28 Jul 2008 - 2:43 am | प्रियाली

कळीचा मुद्दा विषयाला घेतल्यानेही लेखाला रंगत आली आहे. स्त्री-पुरूष हा भेद कायम राहणार. जोपर्यंत मुलीचे लग्न होऊन ती परक्या घरी जाण्याची प्रथा आहे आणि आई-वडिलांना उतारवयांत चरितार्थाचे साधन म्हणून मुलाकडे पाहण्याची गरज आहे तोपर्यंत मुलगा होणे हे अनेक कुटुंबांना हवे हवेसे वाटणारे आहे. शास्रांत सांगितले आहेच की मुलाने उत्तरक्रिया केल्याशिवाय पालकांना स्वर्गप्राप्ती नाही. ;)

एक मजेशीर गोष्ट इथे ध्यानात येते की शहरांत हे मुलगा हवे असण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. याचे कारण शिक्षण, समानता इ. आहेच याबरोबर जागेचा प्रश्न हे ही आहे. दोन मुलगे असणार्‍या कुटुंबांना हे मुलगे वयांत आले की पोटात खड्डा येतो. त्यांची लग्ने करून इतकी कुटुंबे ३-४ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहणे शक्य नसते आणि शहरांत दुसर्‍या जागा घेणे ही फार कठीण असते. या वरवर साध्या वाटणार्‍या पण मोठ्या समस्येतून लोकांना हल्ली निदान एक तरी मुलगी हवी असते. :( कारण मुलींची लग्न उरकली की गेल्या आपापल्या घरी. म्हणजे खर्रेखुर्रे कारण मुलगी हवी हे नसून उतारवयात एकापेक्षा अधिक मुलगे असल्याने निर्माण होणार्‍या समस्यांना तोंड देऊ लागू नये हे असते.

असो, मातृभूमी हा चित्रपट पाहिलेला नाही. उत्तर भारतातील गावातील आहे का? पुण्या-मुंबईतही हीच परिस्थिती आहे असे ऐकून आहे. चू. भू.द्या.घ्या. लग्नाला उभे राहिलेले मुलगे आहेत पण पुरेश्या मुली नाहीत. ज्या आहेत त्यांनी आधीच आपल्याला हवे तसे नवरे निवडलेले आहेत.

भडकमकर मास्तर's picture

28 Jul 2008 - 2:51 am | भडकमकर मास्तर

मातृभूमी हा चित्रपट पाहिलेला नाही. उत्तर भारतातील गावातील आहे का?
हो... त्यांना भविष्यातला कधीतरीचा उत्तर भारत दाखवायचा असावा....
म्हणजे खर्रेखुर्रे कारण मुलगी हवी हे नसून उतारवयात एकापेक्षा अधिक मुलगे असल्याने निर्माण होणार्‍या समस्यांना तोंड देऊ लागू नये हे असते.
हं...हे एक वेगळे आणि योग्य निरीक्षण...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

गुंडोपंत's picture

28 Jul 2008 - 3:49 am | गुंडोपंत

लेखानेच इतकी विमनस्कता आली...

आपला
गुंडोपंत

मुक्तसुनीत's picture

28 Jul 2008 - 6:21 am | मुक्तसुनीत

भडकमकरांनी एका ज्वलंत समस्येला अग्रलेखाचा विषय केले आहे. समस्येवर सांगोपांग विचार केला आहे. व्याप्ति नि खोलीच्या बाबतीत लेख उत्कृष्ट झाला आहे. या आणि स्त्रीवर्गाच्या इतर अनेक जटील समस्यांवर विचार करता काही मुद्दे सांगता येतील.) ( या मुद्द्यांचे स्वरूप र्‍हेटॉरिकल् (मराठी शब्द ?) आहे हा दोष मान्य करतो. म्हणजे "काय आवश्यक आहे" हे सांगतो आहे ; ते "कसे व्हायचे" याची चर्चा न करता. )

१. प्रतिगामी, कर्मठ विचारांच्या विळख्यातून समाजाची मुक्तता. वैज्ञानिक, मानवतावादी, विवेकी विचारांचे प्रबोधन.
२. स्त्रियांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने अस्तित्वात आलेल्या हुंडाबंदी सारख्या कायद्यांचे कठोर पालन.
३. या प्रश्नांच्या नैतिक बाबींचे यथायोग्य ज्ञान (अवेअरनेस) वैद्यकीय प्रशिक्षणामधेच सामील करणे.
४. समाजातल्या तळागाळातल्या महिलांना या प्रश्नाबद्दल तक्रार नोंदणे सहजशक्य होईल अशा सुविधा शासकीय पातळीवर निर्माण करणे, अमलात आणणे.
५. मिडीया आणि एन जी ओज यांचा सहभाग. या प्रश्नाला प्रसिद्धी देत ठेवणे , प्रबोधन-मदतकार्य या बाबतीत या प्रश्नाला महत्त्वाचे स्थान देणे.
६. सेक्स रेशो, लहान बालिकांच्या मरणाचा दर , स्त्रियांच्या शिक्षणाचा दर , त्यांचा आर्थिक क्षेत्रातील सहभाग या नि अशा स्त्रियांच्या समाजातल्या स्थानाचा वेध घेणार्‍या मापकांची नियमित काळाने नोंद घेत ठेवणे.

यशोधरा's picture

28 Jul 2008 - 6:31 am | यशोधरा

मास्तर, फारच महत्वाच्या विषयावर लिहीले आहे आपण... धन्यवाद!

डिट्टो! सुरेख जमला अहे लेख. २१ व्या शतकात, एकीकडे आपण परम संगणक तयर करतो अन् दुसरीकडे हे असंही लज्जास्पद वागू शकतो!!

खर्रेखुर्रे कारण मुलगी हवी हे नसून उतारवयात एकापेक्षा अधिक मुलगे असल्याने निर्माण होणार्‍या समस्यांना तोंड देऊ लागू नये हे असते.

खूप अंशी सत्य!

nutanm's picture

27 Jan 2022 - 6:12 am | nutanm

अतिशय सहमत. नूतनमा.

पिवळा डांबिस's picture

28 Jul 2008 - 7:33 am | पिवळा डांबिस

मास्तर, प्रतिक्रिया तरी काय देणार?
अशा लोकांपुढे प्रतिक्रिया तर सोडाच पण आपण कपाळ जमिनीवर आपटून जीव जरी दिला तरी त्याचा काय उपयोग!!!
बाकी,

मग कन्व्हिक्शन नसल्यामुळे अशा डॊक्टरांना कायद्याचं भय उरलेलं नाही, कायदा अजून कडक केला पाहिजे, दंड वाढवला पाहिजे, सक्तमजुरी वाढवली पाहिजे वगैरे सारं ठीक आहे पण डॊक्टरांची आणि एकूणच समाजाची मानसिकता बदलेपर्यंत हा मार्ग प्रभावी ठरेल असे मला वाटत नाही.

सहमत आहे! याबाबतीत कायद्याची नव्हे तर समाजप्रबोधनाची गरज आहे...
पण तोपर्यंत किती अश्राप मुलींचे बळी जाणार आहेत कोणास ठाउक!!!

भडकमकर मास्तर's picture

28 Jul 2008 - 9:48 am | भडकमकर मास्तर

याबाबतीत कायद्याची नव्हे तर समाजप्रबोधनाची गरज आहे...
हे खरे आहे.... पण धनंजय म्हणतात त्याप्रमाणे हा बदल साहजिकच अति हळू होणार आहे.... आणि कितीही कडक कायदे केले तरी डॉक्टर आणि पेशंट अकला चालवून त्यातून सुटणार.
तोपर्यंत किती अश्राप मुलींचे बळी जाणार आहेत कोणास ठाउक!!!हेच म्हणतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मी पण खूप, खूप खिन्न, मुलगी असण्याचे खॄप दुःख भोगलेली

अरुण मनोहर's picture

28 Jul 2008 - 7:49 am | अरुण मनोहर

भृणहत्या होणे आणि ती करणार्‍यांना उजळ माथ्याने समाजात वावरता येणे हे समाजाला लांच्छनासपद आहे. अशा विषयाकडे मिपाकरांचे लक्ष वेधून भडकमकर मास्तरांनी चांगले काम केले आहे. ह्या बाबतीत वेगवेगळ्या मार्गांनी जनजागृती होणे आवश्यकच आहे. केवळ सरकार किंवा एन जी ओ. वर विसंबून न रहाता नागरीकांनी जागरूकता दाखवणे हा जास्त परीणामकारक मार्ग ठरतो. समाजानेच जर ही काळी करणी लांच्छनास्पद आहे अशी धारणा दाखवली तर हळूहळू अशी कृत्ये बंद जरूर होतील. अर्थात ह्याला वेळ लागेल. हे काम एक दोन वर्षात होणारे नाही. मिपासारख्या सामाजीक जबाबदारी समजणार्‍या संस्थळांनी नेटाने करण्याचे काम आहे. हा विषय घेतल्याबद्दल भडकमकर मास्तरांचे अभिनंदन.
>>>बहुसंख्य डॉक्टर जरी हे नियम पाळत
असले तरी थोड्या पैशांच्या मोहाने हे सारे करणारे डॉक्टरही आहेतच..
........ अशा डॉक्टरांच्या खाटीक खान्यांपुढे शांततापूर्ण निदर्शने करता येतील कां?

मुक्तसुनीत यांनी "काय आवश्यक आहे" हे खूपच परीणामकारक सांगीतले आहे. मिपा खालील बाबतीत पुढाकार घेऊ शकते. आपण सर्वच लेखकांनी हे लक्षात ठेवायला हवे.

१. प्रतिगामी, कर्मठ विचारांच्या विळख्यातून समाजाची मुक्तता. वैज्ञानिक, मानवतावादी, विवेकी विचारांचे प्रबोधन.
५. मिडीया आणि एन जी ओज यांचा सहभाग. या प्रश्नाला प्रसिद्धी देत ठेवणे , प्रबोधन-मदतकार्य या बाबतीत या प्रश्नाला महत्त्वाचे स्थान देणे.

तात्यांसारखा संवेदनशील आणि सामाजीक जागृती असलेला सरपंच लाभलेल्या मिपावर आपण नक्कीच ह्या दॄष्टीने काही ठोस कामगीरी करू शकतो.

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 7:55 am | विसोबा खेचर

मास्तर अतिशय सुरेख अग्रलेख...

मिपा संपादकीय अग्रलेखाची दर्जेदार परंपरा राखल्याबद्दल मनापासून धन्यवाद...

आपल्या अग्रलेखाचा विषय केवळ संतापजनक आहे. जी जी मंडळी स्त्रीभृणहत्येमागे जबाबदार असतात, कारणीभूत असतात ती मंडळी, 'आपली आईही एक स्त्री आहे आणि तिच्यामुळेच आपण हे जग पाहू शकलो' इतका साधा विचारही करू शकत नाहीत, किंबहुना त्यांची विचारशक्तिच इतकी खुंटलेली असते याचे नवल वाटते!

माझ्या मते स्त्रीभृणहत्येकरता संबंधित मंडळींचे हातपाय तोडून टाकण्याइतपत अधिकाधिक कडक कायदे केले पाहिजेत तरच या प्रकाराला शिक्षेची जबर दहशत बसून काही अंशी आळा बसेल. माझा उपाय कदाचित क्रूर व अमानुष वाटेल परंतु स्त्रीभृणहत्येसारख्या क्रूर व अमानुष कृत्यास अशीच शिक्षा हवी!

तात्या.

एकलव्य's picture

28 Jul 2008 - 8:38 am | एकलव्य

"मातृभूमी ए नेशन विदाउट विमेन" हा चित्रपट फार पूर्वीच पाहिला होता. आजूबाजूला घडलेल्या काही घटना अशा चटका देणार्‍या आहेत की हा चित्रपट भडक वाटत नाही. दुधाने भरलेल्या हंड्यात नवजात बालिकेचा बळी देणे आणि केवळ स्त्रीलिंग आहे म्हणून शास्त्रशुद्धपणे गर्भातच निचरा करून टाकणे यांत काहीही फरक नाही. आजही मुलींचा लग्नात आणि लग्नानंतर मांडला जाणारा बाजार, लावली जाणारी विल्हेवाट पाहिली तर चित्रपटात दाखविलेली विवाहित स्त्रीची विटंबना बटबटीत वाटणार नाही.

मास्तरांनी विषय मांडला हे चांगले झाले. माणसाच्या सद्सद् विवेकबुद्धिला पाझर फुटावा ह्यासाठी जरूर प्रयत्न व्हावेत. पण तितके पुरेसे नसते हे अगदी स्पष्ट आहे. जे कोणी नराधम (येथे लक्ष्य फक्त "नरा"पुरते मर्यादित नाही.) असे हत्येचे/स्त्रीछळाचे कृत्य करतील वा करावयास हातभार लावतील त्यांस येनकेन प्रकारेण अद्दल घडवण्यास आपण (स्वतः तसेच समाज/कायदा) मागेपुढे पाहू नये. असो...

आणखी काही -
(१) जिथे अल्ट्रासाऊंड क्लिनिक्स जास्त तिथे जुवेनाईल सेक्स रेशो घटतोच हे नक्की सिद्ध झाले आहे.
> हे पटले नाही. समाधान होण्यासाठी आणखी थोड्या माहितीची अपेक्षा आहे.
> जरी हे खरे असले तरीही "अल्ट्रासाऊंड क्लिनिक्स"हे कारण असू शकत नाही. या क्लिनिक्सचा होणारा दुरुपयोग रोखण्यास येणारे अपयश आणि हलकट बाजारू वृत्ती हे सार्‍यांचे मूळ आहे.

(२) साऊथ दिल्ली आणि बोरिवली यांचे सेक्स रेशो कमी आहेत म्हणजे तेथे स्त्रीभृण हत्या होते आहे असा अर्थ निघत नाही. (कदाचित प्रत्यक्षात तसे असेलही पण किंबहुना नसेलही!) उद्योग व्यवसायात आजही पुरुष वर्गाचे प्रमाण जास्त आहे. खेड्यांकडून शहरांकडे पोट्यापाण्यासाठी जाणारी जनता प्राधान्याने पुरुष वर्गातील आहे. या सार्‍यांमुळेही शहरातील सेक्स रेशो फसवे असू शकतात. नेमके काय घडते आहे आणि कोणत्या प्रांतात घडते आहे हे नीट पाहणे गरजेचे आहे. म्हणजे मग हे कशाने घडते आहे याचा अधिक चांगला अंदाज बांधता येईल.

(३) २००१ मध्ये सेक्स रेशो सुधारला होता असे काहीसे वाचनात आले होते. पण ते म्हणे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने घडले होते. (कारणे ओळखा पण बक्षीस नाही - व्यसने, अपघात, तंबाखू इ.इ. ) http://www.indiatogether.org/2004/apr/hlt-csratio.htm

(४) हे पाहावे - सहज पण सुंदर माहिती http://www.mapsofindia.com/census2001/sexratio/sexratio-india.htm

भडकमकर मास्तर's picture

28 Jul 2008 - 9:30 am | भडकमकर मास्तर

(१) जिथे अल्ट्रासाऊंड क्लिनिक्स जास्त तिथे जुवेनाईल सेक्स रेशो घटतोच हे नक्की सिद्ध झाले आहे.
> हे पटले नाही. समाधान होण्यासाठी आणखी थोड्या माहितीची अपेक्षा आहे.

भारतातील सर्व गावे , जिल्हे आणि त्यांमधील अल्ट्रासाउंड क्लिनिक्स यांचा एक नकाशा आणि एक उत्तम आकडेवारी / सर्व्हे मी वाचलेली आहे...गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स ने घेतलेला सर्व्हे आहे...
त्याचा दुवा हा...
http://infochangeindia.org/index2.php?option=com_content&do_pdf=1&id=5971
http://www.hindu.com/2004/02/19/stories/2004021908070500.htm
अजून गूगलून पाहिले तर भरपूर दुवे मिळतील...

जरी हे खरे असले तरीही "अल्ट्रासाऊंड क्लिनिक्स"हे कारण असू शकत नाही. या क्लिनिक्सचा होणारा दुरुपयोग रोखण्यास येणारे अपयश आणि हलकट बाजारू वृत्ती हे सार्‍यांचे मूळ आहे.
अचूक बोललात....पर्फेक्ट.... दोष अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा नाहीच्...ते अतिशय उपयोगीच आहे.

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jul 2008 - 11:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण ते म्हणे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने घडले होते. (कारणे ओळखा पण बक्षीस नाही - व्यसने, अपघात, तंबाखू इ.इ. )
स्त्रिया अनेक बाबतीत पुरूषांच्या पेक्षा जास्त कणखर असतात. संदर्भासाठी म.टा.तला हा लेख पहा:
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3178004.cms
विश्वास बसेल अशी विधानं आणि आकडेवारी (?) दिलेली आहे.

(समानतावादी) अदिती

मेघना भुस्कुटे's picture

28 Jul 2008 - 8:43 am | मेघना भुस्कुटे

'मातृभूमी' पाहताना हातपायाला कापरे भरल्याचे आठवते. अक्षरशः एखाद्या गाईसारखी दावणीला बांधली गेलेली ती स्त्री, तिच्या आयुष्यात नसलेले कुठल्याच प्रकारचे स्वातंत्र्य आणि माणसांची ती रानटी अवस्था पाहताना जीव घशाशी गोळा झाला होता. श्रीकांत बोजेवारांनी चित्रपटाचे परीक्षण करताना दिग्दर्शकाच्या बटबटीतपणाला नावे ठेवल्याचेही आठवते. ते वाचून माझ्यावरच कुणीतरी वैयक्तिक हल्ला करावा, तसे संतप्त आणि हवालदिल झाल्याचेही आठवते.

अखेरशेवट तुमच्या जातीचे (species) अस्तित्वाचे प्रश्न दुसर्‍या जातीला कळणे अशक्य नसले, तरी काहीसे दुरापास्तच, असे वाटले होते.

या अग्रलेखामुळे ते सगळे पुन्हा जागे झाले.

ज्या 'मातृभूमी'चे निमित्त झाले, त्यातला लिंगभेदाचा अनुभव हा लैंगिक अत्याचाराचे चित्रण करणारा, अंगावर येणारा, प्रतीकात्मक, भीषण अनुभव असेलही. पण वास्तवात त्याची बहुसंख्य आणि सूक्ष्म रूपे असतात. तुमच्यासोबत चालणारा तुमच्याइतकाच शहाणासुरता मित्र गर्दीतून जाताना एकाएकी तुमचा संरक्षक आणि पालनकर्ता होतो. एरवी व्यक्तिस्वातंत्र्य मानणारा बाप काही विशिष्ट बाबतीत तुमचे निर्णय स्वतः घेऊ पाहतो. नेहमी शहाणी वाटणारी माणसे 'मुलगा हवा - वारस हवा' म्हणून वेडीपिशी होऊन लिंगनिश्चिती आणि गर्भपातही करतात. आपल्यासारखीच वाटणारी सख्खी मैत्रीण लग्नानंतर 'आमच्याकडे असंच असतं' असं म्हणून निमूट नोकरी सोडून खेड्यात राहायला जाते. एक ना दोन.

संताप ही पहिली प्रतिक्रिया असते खरी. पण मग त्याची जागा हळूहळू कडवटपणा, मग तीव्र दु:ख आणि सरतेशेवटी एक शहाणपणा घेतो. हा अस्तित्वाचा झगडा आहे. सत्तेचा झगडा आहे. त्यात राजकारण आणि अशा अनेक घृणास्पद सूक्ष्मातिसूक्ष्म खेळी व्हायच्याच. दुर्दैवाने वा सुदैवाने - आपण रेषेच्या या बाजूला आहोत. रेषेच्या त्या बाजूला जाण्यासाठी नव्हे, तर रेषा पुसून टाकण्याकरता प्रयत्न करायला हवेत, याचे भान येत जाते. हे भान कधी पुसले न जावो. फक्त माझेच नव्हे, कुणाचेच.

मास्तर, एका भीषण प्रश्नावर नेमके बोट ठेवणारा अग्रलेख. अभिनंदन.

धनंजय's picture

28 Jul 2008 - 8:52 am | धनंजय

स्त्रीभ्रूणहत्या हा मोठा गुंतागुंतीचा विषय चर्चेस घेऊन पाहुण्या संपादकांनी जबाबदारी चोख बजावली आहे.

हा एक जालीम सामाजिक गुन्हा आहे. पण या गुन्ह्याला कुठल्याही वैयक्तिक उदाहरणात पुरावा देता येत नाही. कुठल्याही एका गर्भपाताबद्दल गरोदर-स्त्री/पुरुष/डॉक्टर तिकडीला विचारले, तर "हा अनपेक्षित (अन्प्लॅन्ड) गर्भ होता" असेच काही उत्तर मिळेल - असा गर्भपात कायदेशीर असतो. पण सांख्यिकी आपल्याला सांगते, की हे असे फक्त स्त्री-गर्भाबाबतच होणार नाही, समप्रमाणात पुं-गर्भाबाबतही होईल, आणि शेवटी समसमान प्रमाणात मुली आणि मुले जन्म घेतील. ज्या अर्थी जिवंत जन्मलेल्या मुलींच्याच संख्येत घट झाली आहे, त्यावरून स्पष्ट अनुमान निघते, की स्त्री-भ्रूण म्हणून गर्भपात केला जात आहे.

समस्या अशी - संख्याशास्त्र सांगते की मोठ्या प्रमाणात गुन्हे होत आहे, पण प्रत्येक व्यक्ती कायदेशीर वागल्याचा सफल कांगावा करू शकतो. स्वतंत्र राज्यांमध्ये व्यक्तीच गुन्हा करू शकतो, "समाज" गुन्हा करू शकत नाही, व्यक्तीलाच दंड केला जाऊ शकतो, "समाजा"ला नाही. इथे कायदा किंकर्तव्यमूढ झालेला आहे.

(अशाच प्रकारे सांख्यिकी सामाजिक गुन्हे/वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे जातीबाहेर लग्न होऊ न देणे, परजातीच्या लोकांना सोसायटीतल फ्लॅट देणे, इ. इ. इथेसुद्धा प्रत्येक व्यक्ती जातीतल्या व्यक्तीशी लग्न करण्याचे स्वातंत्र्य सांगते, सोसायटीत घेतलेल्या लोकांचेच उत्तम अर्ज होते, असे सांगतात, आणि हे सांगण्याचे स्वातंत्र्य असते.)

या सर्व बाबतीत मास्तर म्हणतात ते खरे - समाजाच्या मनात हा अन्यायच "श्रेय" म्हणून खोल रुजला आहे. "...आणि मुलगा होता हो..." हे चुकून बोललेले वाक्य मनातली ठाम कल्पना सांगते. कायदा हतबुद्ध झाला आहे तेव्हा संस्कृतीत बदल करणे हेच महत्त्वाचे आहे.

समाजाच्या संस्कृतीची बाब आहे, हे कसे कळते? मास्तरांनी काही आदिवासी जमातींचे आकडे सांगितलेच आहेत. पण कर्नाटक, केरळ, तमिळ नाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल - या सर्व राज्यांत स्त्रीजन्मप्रमाण जीवशास्त्राच्या अपेक्षेप्रमाणे दिसते. यांच्यात गरीब राज्ये आहेत, श्रीमंत राज्ये आहेत, सुशिक्षित राज्ये आहेत, अशिक्षित राज्ये आहेत, साम्यवादी जोराची राज्ये आहेत, साम्यवादी कमजोर असलेली राज्ये आहेत - जे काही आहे ते आहे, पण त्या ठिकाणी स्त्री-शिशु-जन्माचे लांछन मानले जात नाही अशी संस्कृती आहे. ती महाराष्ट्रातही रुजू शकेल.

या बाबतीत तात्यांनी व्यक्त केलेली चीड मलाही तशीच वाटते. पण कठोर शिक्षा करायला जाळ्यात फार थोडे सापडतील असेही वाटते.

मुक्तसुनीत आणि इतरांनी सांगितलेले लोकशिक्षणात्मक आणि समाजसुधारणेचे उपाय हळूहळू (अति-हळू) वाटतात, तरीही कालांतराने काम देतील असे वाटते.

चित्रा's picture

28 Jul 2008 - 9:56 am | चित्रा

गंभीर विषय आणि हाताळणी.
तुम्ही दोघी बहिणीच का, भाऊ नाही का म्हणून लहानपणी अनेकांकडून प्रश्न ऐकले आहेत. अजूनही विचारतात!

ओळखीतल्या एका स्त्रीने दहा वर्षांपूर्वी मुलगा झाल्यावर सांगितले होते, की पहिल्या गर्भधारणेनंतर गर्भपात करून घेतला कारण मुलगी होती आणि एकच मूल हवे होते तर ते मुलगाच झालेले चांगले असे घरच्या सर्वांनी (ती धरून) ठरवले - तेव्हा काय बोलायचे ते कळले नव्हते.

अजून एका घरात "मुलीस भाऊ नसलेने" मुलीला लग्नाला नकार मिळाल्याची माहिती आहे. म्हणजे नवरीच्या भावावर (त्याच्या आणि कदाचित बहिणीच्याही ) घराची जबाबदारी, आणि त्या भावाच्या बहिणीचे मन माहेरी लागून रहाण्याचे कारण नाही, अशी खात्री झाल्यावरच लग्न करायचे.

मुलींना इतका तुच्छ समजणारा समाज किंवा त्या समाजाच्या धारणा समजायला अवघड आहेत, आणि ही परिस्थिती मनाला चटका लावून जाणारी आहे. सुशिक्षित म्हणवल्या जाणार्‍या घरांत असे दॄष्य दिसते तेव्हा वाईट वाटते म्हणण्यापेक्षा संताप येतो.

पण वर काही प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे कितीही हळू असला तरी लोकशिक्षण हा योग्य मार्ग आहे.

सहज's picture

28 Jul 2008 - 10:03 am | सहज

अतिशय गंभीर विषयाला ह्या उत्तम अग्रलेखातुन हात घातल्याबद्दल मास्तरांचे अभिनंदन.

वरील सर्व प्रतिसादातुन बरीचशी कारणे, उहापोह आलाच आहे त्याच्याशी सहमत.

सामाजीक परिस्थिती [प्रियाली, मुक्तसुनित यांनी लिहल्याप्रमाणे] बदलल्याशिवाय पर्याय नाही. तो पर्यंत कडक कायदे व उदाहरण घालुन दिले पाहिजे अश्या शिक्षा कितिही कडक वाटल्या तरी झाल्या पाहीजेत.

मुलांनी अजुन किती बेजबाबदार वागले पाहीजे की आई-वडलांना आपल्याला मुलगीच व्हावी असे वाटेल. :-)

डॉ.प्रसाद दाढे's picture

28 Jul 2008 - 10:04 am | डॉ.प्रसाद दाढे

भारतीय समाजातल्या अनिष्ट रूढी- पर॑पराही स्त्री-भ्रूण हत्त्येस कारणीभूत आहेत असे मला वाटते. 'हु॑डा' हे मला ठाऊक असलेली सर्वात चीड आणणारी प्रथा! माझ्या एका शेट्टी मैत्रिणीने सा॑गितलेला अनुभव अ॑गावर काटा आणणारा. त्या॑च्यात मुलगा झाला की बाप अत्यान॑दाने उड्या मारतो व वीस-प॑चवीस वर्षा॑न॑तर मिळणार्‍या घसघशीत हु॑ड्याची स्वप्ने पाहू लागतो. आणि मुलगी झाली तर रडतो व हु॑ड्याच्या प्रच॑ड रकमेची त्याच वेळेपासून जमवाजमव करायला सुरूवात करतो. शिकलेल्या मुलास कमीत कमी तीस लाख रेट पडतो (तिच्या अनेस्थिटिस्ट नवर्‍याला मिळाला होता!)
महाराष्ट्रातही हे प्रमाण लक्षणीय आहे. काही विशिष्ट जाती॑मध्ये हु॑डा पद्धतीचे फार स्तोम आहे. माझ्या काही लेवा-पाटिल मित्रा॑नी आपल्या पदव्युत्तर शिक्षणाचा वीस-प॑चवीस लाखा॑चा खर्च देऊ करणार्‍या वधूपित्या॑च्याच मुली॑शी लग्न केली आहेत व प्रवेश मिळविले आहेत. शिवाय न॑तर आलिशान दवाखाने थाटण्यासाठीसुद्धा सासर्‍याकडून पैसे उकळलेले आहेत. ग॑मत म्हणजे त्या मुली दिसायला, शिक्षणात वगैरे त्या मुला॑च्या तुलनेत एकदम बे॑गरूळ आहेत :)
शिक्षणाचा अभाव असे ह्या॑च्या बाबतीत म्हणावे तर ही म॑डळी एम.डी., एम.एस आहेत बर॑ का! असले डॉक्टर असले की मग गर्भलि॑गनिदानही करणे अवघड नाही. अर्थात मला कुठल्याही जातीवर शरस॑धान करायचे नसून वृत्ती॑वर आक्षेप घ्यायचा आहे हे सूज्ञा॑स सा॑गणे न लगे. चा॑गली उदाहरणेही असू शकतील.
असो. मास्तरा॑नी एका ज्वल॑त समस्येस हात घातला आहे व अग्रलेखाचे शिवधनुष्य उत्तमरित्या पेलले आहे.

भाग्यश्री's picture

28 Jul 2008 - 10:16 am | भाग्यश्री

खरंच हुंडा ही देखील चीड आणणारी घटना! माझ्या नवर्‍याचा मित्र आंध्रचा आहे, दिसायला बेताचा,शिक्षण ओके टाईप, आणि नोकरी अमेरीकेमधे कन्सल्टंट म्हणून.. म्हणजे कायमस्वरूपी नोकरी नाही.. प्रोजेक्ट मागे प्रोजेक्ट शोधायचे न तेवढे करायचे.. त्या मुलाला जवळ जवळ ५० एक लाखाचा ऍक्चुअल हुंडा आणि तेव्हढ्याच किंमतीची जमीन दिली हुंडा म्हणून.. म्हणे युएस मधे काम करणार्‍याचा 'रेट' तेव्हढा आहे!! पथेटीक !! मुलीला, घरच्यांना देण्यात काही वाटत नाही आणि यांना घेण्यात लाज वाटत नाही!! खरंच पथेटीक..

छोटा डॉन's picture

29 Jul 2008 - 1:29 am | छोटा डॉन

आंध्रात ह्या गोष्टी अतिशय कॉमन आहेत. आपल्याकडे शक्यतो असे घडत नाही त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटते . मी सांगतो डिटेस्ल ...
आंध्रात "रेड्डी" नावाचा जो समाज आहे त्यात ह्या गोष्टी घडतात, हे लोक पुर्वी लँडलॉर्ड असत त्यामुळे जमीन / प्रचंड हुंडा ह्या गोष्टी येतात.
प्रचंड श्रीमंती असल्याने शिक्षण जवळपास नाहीच. शेती व उद्योगधंद्यात पुढे ...
त्यामुळे मुलगा जर "शिकलेला " असेल तर त्याला प्रचंड डिमांड असते ....
लाज वाटाणे वगैरे जाणीवा थोडे शिकल्यावर , जाण आल्यावर व थोडे माणुस समंजस झाल्यावर येतात ...

आता एक उदाहरण सांगतो ...
माझ्या जुन्या कंपनीत एक सहकारी होता, आंध्राचा रेड्डी खानदानचा ...
बुद्धीने , रुपाने , कर्तुत्वाने अगदी यथातथा. आख्ख्या खानदानात सगळ्यात शिकलेला हाच. बाकी परिस्थीती सधन म्हणावी अशी ...
त्याचे लग्न ठरले तो आमच्याबरोबर असताना ....
त्यानंतर त्याचे वागणेच बदलले, एका महिन्यात त्याने कार घेतली, पुण्यात फ्लॅट बुक केला, बाकीची प्रचंड खरेदी केली ...
आम्ही एकदम चाट पडलो. एकदा अनौपचारीक गप्पांमध्ये त्याला छेडताना विचारले "लै हुंडा मिळाला दिसतोय" तर त्याचे उत्तर ऐकुन आम्हाला फेफरे यायची वेळ आली ...
त्याला हुंडा म्हणुन "४० लाख कॅश , पुण्यात फ्लॅट, होंडा सिटी गाडी, दागदागिने व इतर गोष्टी" असा जवळजवळ १ कोटीचा माल मिळाला होता ...
मग आमचा जेष्ठ सहकारी ज्याची मते हुंडाविरोधी आहेत तो भडकला व त्याने त्याला खुप झाडले ....
त्यावर त्याचे उत्तर असे होते की "जर हुंडा दिला नाही तर मुलीला त्रास होतो व हुंडाबळी जातो " अशी तिकडे रित आहे ...
त्यामुळे "ज्याठिकाणी हुंडा घेत नाहीत तेथे सासरचे पुढे पैसा मागुन त्रास देतील ह्या भितीने मुलगी देत नाहीत व पर्यायाने त्या मुलाचे लग्न राहते" अशी परिस्थीती आहे.
त्यामुळे योग्य वयात लग्न व्हायचे असेल तर "हुंडा घेणे हा तिथला रिवाज " आहे असे म्हणायला हरकत नाही ....

आता ह्यालाच "पॅथेटीक " म्हणातात का ते माहित नाही ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भाग्यश्री's picture

30 Jul 2008 - 4:11 am | भाग्यश्री

नाही, तो हुंडा घेतला नाही, तर म्हणे त्या मुलाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे,जर सगळं व्यवस्थित असेल तर हुंडा घेतलाच पाहीजे म्हणे....असं समजत असतील तर का नाही घेणार मुलं/पालक हुंडा..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jul 2008 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्त्री भ्रृणहत्या हा विषय उत्तम हाताळला त्या बद्दल प्रथम अभिनंदन !!!

मास्तर आपल्या लेखातील आकडेवारी पाहता स्त्री जिथे पुजनीय असते तिथे अशा हत्या कमी होतात असे जरी ग्रहित धरले तरी भविष्यात आपले कसे होईल आधार शोधण्याच्या प्रयत्न्नात अशा स्त्रीहत्या होतात, असे वाटते. अर्थात अशा समस्यांचे मुळ कशात आहेत. कायदे, रुढी,नीतीनियम, या बरोबर सामाजिक जीवनाला पद्धतशीर वळण लावण्यासाठी शासन, धर्म, इ.इ. संस्था असतात. त्याच्या योग्य परिणामाने आणि शिक्षणाने समाजावर काही बदल झाला तर अशा भ्रृणहत्या कमी होऊ शकतात.

अर्थात कधी-कधी वाटते चर्चा करणे मला सोपे वाटते पण प्रत्यक्षात डॉक्टरांपेक्षा पालकच अशा घटनांना जवाबदार असतात.
फार कमी पालकांना वाटते आपल्या घरात मुलगी जन्माला यावी.
मुलींचे शिक्षण, परक्याचे धन, लग्नझाले आणि तिचा संसार व्यवस्थित चालला तर ठिक नाही तर आई-बापांना मुलगी जन्माला घातल्याचा पश्चाताप, या आणि अशा कितीतरी गोष्टी मुलगी नको च्या पाठीमागे आहेत. असे वाटते. याचाही विचार झाला पाहिजे.

अवांतर : उत्तम कांबळेचे 'आई समजून घेतांना' हे पुस्तक वाचत होतो. मुलगी झाल्याचे ऐकल्यावर उत्तम कांबळेच्या आईचा पडलेला चेहरा बराच काही सांगून गेला. असे अनेक कुटुंबे आपलया आजुबाजूला वावरत असतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदयात्री's picture

28 Jul 2008 - 10:40 am | आनंदयात्री

लेख अन प्रतिक्रिया वाचुन शहारा आला ! मातृभुमी कधी बघेल असे वाटत नाही आता. लेखात अन प्रतिक्रियांमधे समस्येचा उहापोह अगदी योग्य झालाय.
मास्तरांचे चांगल्या अग्रलेखाबद्दल अभिनंदन.

स्वाती दिनेश's picture

28 Jul 2008 - 11:16 am | स्वाती दिनेश

तुम्ही दोघी बहिणीच का, भाऊ नाही का म्हणून लहानपणी अनेकांकडून प्रश्न ऐकले आहेत. अजूनही विचारतात!
चित्रासारखाच माझाही अनुभव, पण हे ही तितकेच खरे की आमच्या आईवडिलांनी 'मुलगी' म्हणून अनेक इतरांकडे असतात तशी बंधने कधी घातली नाहीत.अर्थात इतर मैत्रिणींच्या घरातली बंधने पाहताना ,त्यांच्या घरून अनेक कार्यक्रमांसाठी परवानग्या मागताना हे जास्त प्रकर्षाने जाणवत असे.
लोकशिक्षण आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये होणारा बदल कायद्यापेक्षा प्रभावी ठरेल असे वाटते.
कायद्याचा बडगा आणि पोलीस असल्याशिवाय आपण चांगलं वागूच नये का ? दंडुका घेतलेल्या पोलिसानं किती कायदे इम्प्लिमेंट करायचे ? सगळी जबाबदारी पोलिसांचीच का? पोलीसांनी दंगली खून दरोडे यांचा तपास करायचा की तुमचा पोरगा हुक्का ,सिगरेट, ड्रग्ज ओढतो का ते पहायचे?
हे फारच पटले.
ह्या गंभीर विषयाबद्दलच्या अग्रलेखाबद्दल अभिनंदन.
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jul 2008 - 11:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला मोठा भाऊ असला तरी आई-बाबांनी कधीही आम्हाला वेगळी वागणूक दिली नाही. बहिणींनी भावासाठी त्याग करायचा आणि भावाने मजा मारायच्या असं कधीही झालं नाही. एका वर्षीपासून आम्ही राखी बांधणं, बांधवणंही सोडून दिलं. तेव्हा आम्हाला हे डावं-उजवं समजत नव्हतं, पण आता वाटतं, त्यामधे एवढाच विचार होता की, त्याने माझं रक्षण का करावं? मला स्वतःला स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे. आणि दुर्दैवाने वेळ पडलीच तर तो माझं रक्षण करेलच पण त्याच्यावर वेळ आली तर मीही त्याच्याबरोबरीने उभी राहेन.
मी कटाक्षाने आता पुरूष नातेवाईकांकडून "ओवाळणी" घेत नाही, भले तो भाऊ असो वा नवरा! मुलींना मिळणाय्रा कमी दर्जाच्या वागणूकीविरुद्ध बोलायचं, लिहायचं आणि स्वतः मात्र परंपरांच्या नावाखाली पुरूषी वर्चस्व मान्य करायचं, आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत हे दाखवायचं, हे मला पटत नाही.

मास्तर लेख उत्तम आहे, आणि विषयही खूप चांगला आहे. थँक्स!

अदिती

मनिष's picture

28 Jul 2008 - 2:40 pm | मनिष

मला स्वतःला स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे. आणि दुर्दैवाने वेळ पडलीच तर तो माझं रक्षण करेलच पण त्याच्यावर वेळ आली तर मीही त्याच्याबरोबरीने उभी राहेन........
मुलींना मिळणाय्रा कमी दर्जाच्या वागणूकीविरुद्ध बोलायचं, लिहायचं आणि स्वतः मात्र परंपरांच्या नावाखाली पुरूषी वर्चस्व मान्य करायचं, आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत हे दाखवायचं, हे मला पटत नाही.

हे खूप आवडले....१०१% सहमत!
राखीबद्द्ल मात्र मला फारच प्रेम आहे....ओवाळणी सोडून फक्त प्रेमाचा धागा म्हणून राखी बघावी असे वाटते....खास करून पाश्चात्य देशातले टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य, ताणलेले, तुटलेले नातेसंबध पाहिले तर आपले नात्यांचे हे धागे तुटू नयेत, विरू नयेत असे वाटते...

अवांतर - माझी बहिण लहान असतांना हट्ट करून आमच्याकडूनही राखी बांधून घ्यायची... :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jul 2008 - 5:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

राखीबद्द्ल मात्र मला फारच प्रेम आहे....ओवाळणी सोडून फक्त प्रेमाचा धागा म्हणून राखी बघावी असे वाटते....खास करून पाश्चात्य देशातले टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य, ताणलेले, तुटलेले नातेसंबध पाहिले तर आपले नात्यांचे हे धागे तुटू नयेत, विरू नयेत असे वाटते...
गंभीर आणि परिस्थितीप्राप्य विषयावर एवढा अंतर्मुख करणारा लेख आणि विचार असले तरीही या वरच्या वाक्यावरून मला हे लिहिण्याचा मोह आवरत नाही आहे:
"हमारा भाई-बहन का प्यार किसी राखी का मोहताज नही है!"
स्वगतः अद्वैत (मोरे भय्या) ही प्रतिक्रिया वाचून मला आणखी पकवू नकोस.

(छोटी बहना) अदिती

अवांतर: ज्या नात्यातल्या आणि मानलेल्या भावांना प्रतिकं महत्त्वाची वाटतात त्यांना मी (अजूनतरी) राखी बांधते.

केशवसुमार's picture

28 Jul 2008 - 1:14 pm | केशवसुमार

भडकमकरशेठ
स्त्री भ्रृणहत्या हा अतिशय गंभीर विषय उत्तम हाताळला त्या बद्दल प्रथम अभिनंदन !!!
स्वातीताई म्हणतात तसे लोकशिक्षण आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये होणारा बदल कायद्यापेक्षा प्रभावी ठरेल असे वाटते.
हे दर्जेदार संपादकिय लेख आणि त्यावर होणारी साधक बाधक चर्चा पाहता, मिपावर चालू केलेल्या संपादकिय सदराची लवकरच सर्व प्रसारमाध्यमांना दखल घ्यावी लागेल असे वाटते..
(वाचक)केशवसुमार

भडकमकर मास्तरांनी भयानक परंतु दाहक वास्तव दाखवणारा लेख लिहीला आहे.
खरंच हा लेख आणि त्याला आलेले प्रतिसाद वाचून निशःब्द झाले. :|

श्रीमंत दामोदर पंत's picture

28 Jul 2008 - 1:56 pm | श्रीमंत दामोदर पंत

मास्तर, फारच महत्वाच्या विषयावर लिहीले आहे आपण... धन्यवाद!

अंगावर शहारा आला लेख वाचून.........

समाजातील खूप लोकांचे डोळे उघडतील असा लेख.........

बाकि काय प्रतिक्रीया देणार...............?

भविष्यात फक्त असे खरच घडु नये अशी अपेक्षा..............

पुन्हा एकदा धन्यवाद.......!

अन्जलि's picture

28 Jul 2008 - 1:59 pm | अन्जलि

हे खरच आहे केवळ मुलिला भाउ नाहि म्हणुन तिला नकार देणारे महाभाग आजहि आपल्याकडे आहेत. कारण नन्तर तिच्या आइ वडिलाना बघावे लागेल, दुसरे तिलाहि तिच्या आइसार्ख्याच नुस्त्या मुलिच झाल्या तर इ.इ.माझ्या माहितितिल हे उदाहरण आहे आणि गमतिचि गोश्ट अशि कि नन्तर त्या मुलिला २ मुल्गे झाले आणि तिला नकार देवुन दुसर्या मुलिशि लग्न क रणार्या मुलाला मात्र मुलिच झाल्या आहेत. दोघेहि जण माझ्या ओळखिचे आहेत. पण जोपर्यन्त आपलि मानसिकता बद्लत नाहि तोपर्यन्त असेच चालणार आपण आपल्यापरिने प्रयत्न करायचा बदलण्याचा तेवढेच आपण करु शकतो.

विसोबा खेचर's picture

28 Jul 2008 - 2:05 pm | विसोबा खेचर

लग्नाचा बाजार आणि हुंडा या विषयावरचं 'मुलगी झाली हो!' नावाचं नाटक फार सुंदर होतं, त्यातली गाणीही अगदी छान चालीतली व अर्थपूर्ण होती. माझ्या आठवणीप्रमाणे २० ते २५ स्त्रिया मिळून हे नाटक सादर करीत असत..

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jul 2008 - 5:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुलगा किंवा मुली होणं वंशपरंपरागत नसतं, मुलाकडूनही आणि मुलीकडूनही!
आता तो नकार देणारा मुलगा कसा नाकाडावर आपटला यावर हसता येईल.
अदिती

मनिष's picture

28 Jul 2008 - 2:34 pm | मनिष

आम्ही फारच वेगळ्या वातावरणात वाढलो....त्यामुळे ही समस्या माहिती असली तरी तिचे रुप किती उग्र आहे, हे जाणवून शहारा आला.

पुढचे काही दिवस "मला सिनेमा अजिबात आवडला नाही " असे म्हणत राहिलो " असं कुठे असतं का? आपला समाज इतका काही वाईट व्हायचा नाही "अशा डिनायलमध्येही गेलो....त्यालाही काही अर्थ नव्हता...

एका उत्तम लेखाबद्द्ल मास्तरांचे अभिनंदन. कायद्यापेक्षाही मानसिकता बदलने महत्वाची....आणि स्पष्ट सांगायचे चे तर स्त्रियांचीसुद्धा मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jul 2008 - 5:00 pm | प्रकाश घाटपांडे

जर स्त्रियांचे प्रमाण घटले तर बहुपतित्व ची प्रथा चालु होउ शकेल. मागणी कमी पुरवठा जास्त झाला भाव कमि होतो. हुंडा मागणार्‍याला जेव्हा समजेल कोणी आता हुंडा देणारी सांगुन येत नाही तेव्हा हे मागणार्‍याचे प्रमाण आपो आप कमी होईल.
घरातील स्त्रीच जेव्हा स्त्री भ्रुणहत्येच समर्थन करत असते त्यावेळी आपल्या वाट्याला जे आल ते या अर्भकाच्या वाट्याला येउ नये अशीच तिची इच्छा असते.
लोकांचीच मागणी असते म्हणुन असे खाटीक डॉक्टर तयार होतात. आपण गर्भपात केला नाही तर दुसरा डॉक्टर ते करणारच असतो. म्हणुन डॉक्टर देखील गिर्‍हाईक सोडायला नको म्हणतात.
प्रबोधन हाच त्यावर सावकाश पण परिणामकारक इलाज आहे. "मुलगी झाली हो" हे नाटक त्याचाच भाग आहे.
प्रकाश घाटपांडे

विकास's picture

28 Jul 2008 - 9:27 pm | विकास

अग्रलेख आवडला आणि "हा विषय आजही महत्वाचा आहे" असे म्हणताना वास्तवीक लाज वाटते...

प्रबोधन हाच त्यावर सावकाश पण परिणामकारक इलाज आहे. "मुलगी झाली हो" हे नाटक त्याचाच भाग आहे.

प्रबोधन हे सातत्याने करावी लागणारी गोष्ट आहे. "मुलगी झाली हो" चे वैशिष्ठ्य असे होते की ते वगनाट्यासारखे घेतले होते. थोडक्यात हलक्याफुलक्या अंगाने घेतले होते. त्यात समाजशिक्षण करण्याची ताकद नक्कीच होती. तत्सम विषयावर आलेले बाकी माहीतीपट/चित्रपट/नाटके (?) ही कुठेतरी स्त गंभीरपणे घेतलेली आहेत असे वाटते. पर्यायाने ती अशा सामाजीक स्तरापर्यंत पोचतात की ज्यांना या लोकशिक्षणाची गरज नसते (त्यांच्यात स्त्रीभॄण हत्या कमी असते...).

शेवटी लोक शिक्षण हे प्रभावि जाहीरातीसारखे असते. ते जितके तळागाळात पोहचेल तितका त्याचा खप (येथे स्त्री भॄणहत्या थांबणे) होऊ शकेल. कोकाकोला तमाम जगाला माहीत आहे, तरी कोक जाहीरात करायचे थांबत नाही... तसेच लोकशिक्षणाचे असते. एका "मुलगी झाली हो" आणि ते पण कोणे एके काळी होवून होणार नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हावे लागतील. अर्थातच त्यासाठी असे प्रकल्प तयार होण्यासाठी मायबाप सरकार तसेच "दानशूर" खाजगी उद्योगांनीपण मदत करावी लागेल आणि आपल्या (त्यात मीपण आलोच!)सारख्या सुजाण नागरीकांनी हा विषय विविध ठिकाणी (चळवळीसारखे नाही पण सहज हक्य होईल तसे) बोलून त्यातील गांभिर्य आणि अप्रत्यक्ष लोकशिक्षळा हातभार लावण्याची गरज आहे.

II राजे II's picture

28 Jul 2008 - 7:23 pm | II राजे II (not verified)

वा छान !

एका ज्वलंत अशा विषयाला वाचा फोडली आहे तुम्ही.... !!

स्त्री भ्रृणहत्या हा अतिशय गंभीर विषय उत्तम हाताळला त्या बद्दल प्रथम अभिनंदन !!!

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

सुचेल तसं's picture

28 Jul 2008 - 8:37 pm | सुचेल तसं

भडकमकर मास्तर,

ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडणारा अभ्यासपुर्ण लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन.

मी अशीही उदाहरणं पाहिली आहेत की पती,पत्नी आणि दोघांचेही आई-वडिल एकत्र रहात आहेत. पण अशी उदाहरणं अगदी बोटावर मोजण्याइतकी. मुलगा हा आपल्या वृद्भापकाळाची काठी बनेल ह्या आशेवर पालक विसंबुन राहतात. पण तुमचा मुलगा तुम्हांला सांभाळेलच अशी अजिबात खात्री देता येत नाही. गर्भलिंगनिदान चाचणीवर फक्त कायद्याने बंदी असुन काहीही उपयोग नाही. समाजाची मानसिकता जोवर बदलत नाहे तोवर हे बंद होणार नाही.

काही पालक तर पहिला मुलगा असताना मुलगी हवी म्हणुन दुसरा चान्स घेतात. मला वाटतं की पूर्वी जेवढं मुलाचं महत्व होतं तेवढं काही आता राहिलं नाही. आजकाल तर जे पहिलं होईल तेच शेवटचं असा लोक विचार करतात. मुलगी झाली तर बरं होईल असं मानणारे लोकही आहेत. आजच्या ह्या महागाईच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात दोन मुलं असणं परवडतही नाही (आर्थिक तसेच वेळेच्या दृष्टिने). अर्थात हे चित्र मोठ्या शहरांचं झालं. छोट्या शहरांमध्ये आणि खेडेगावांमधल्या लोकांच्या मानसिकतेमधे कदाचित हा बदल झाला नसेल.

http://sucheltas.blogspot.com

झकासराव's picture

28 Jul 2008 - 8:59 pm | झकासराव

अग्रलेख अगदि उत्तम आहे.
एका महत्वाच्या प्रश्नाची ओळख करुन दिलीत तुम्ही.

अवांतर : मातृभुमी पाहिला तेव्हा बराच अंगावर आला होता.
अगदी पहिल्या सीनपासुनच.
बाहेर आलो तेव्हा एकहि शब्द न बोलता रूम गाठली होती.
फक्त आजुबाजुला बर्‍याचशा स्त्रिया पाहिल्यावर थोडस टेन्शन कमी झाल.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्राजु's picture

28 Jul 2008 - 9:15 pm | प्राजु

मास्तर, आपला लेख वाचून सुन्न झाले. मी साधारण २ वर्षापूर्वी ऐकलेली आकडेवारी आणि आपण इथे लिहिलेली यामध्ये बरीच तफावत आहे. इतका बदल झाला असेल असं वाटलं नव्हतं.
जोपर्यंत मुलगाच वंशाचा दिवा वगैरे समजूती मनातून जात नाहीत तोपर्यंत कदाचीत अशीच परिस्थिती राहिल. मुलगी ही लक्ष्मी आहे... हीच समजूत पसरली पाहीजे. याविषयावरचा "लज्जा" हा चित्रपट पाहण्यासारखा आहे.
लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

28 Jul 2008 - 9:34 pm | भडकमकर मास्तर

मी साधारण २ वर्षापूर्वी ऐकलेली आकडेवारी आणि आपण इथे लिहिलेली यामध्ये बरीच तफावत आहे. इतका बदल झाला असेल असं वाटलं नव्हतं.

लहानांचे सेक्स रेशो जास्त महत्त्वाचा...

भरपूर गूगलून अनेक प्रकारची आकडेवारी वाचल्यावर मला असं वाटायला लागलंय की स्त्रीभ्रूणहत्येसंदर्भात जर आपल्याला सेक्स रेशो पाहयचा असेल तर (० ते ६ वर्षे वयापर्यंतच्या मुलींचे प्रमाण )चाईल्ड सेक्स रीशो किंवा जुवेनाईल सेक्स रेशोच पहायला हवा. .... कारण एकूण सेक्स रेशो जिथे ९५० च्या आसपास असेल तिथे हा लहानांचा सेक्स रेशो नक्की ८५० च्या आसपास दिसतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अभिज्ञ's picture

28 Jul 2008 - 10:50 pm | अभिज्ञ

सर्वप्रथम ,एका परखड व उत्तम अशा अग्रलेखाबद्दल मास्तर तुमचे हार्दिक अभिनंदन.

वैद्यकिय व्यवसायातील छुपी गुन्हेगारी,आजकालच्या प्रगत जमान्यातले सुशिक्षित व सुजाण म्हणवून घेणारे
होणा-या "मुलाचे" पालक,ह्या सर्व प्रकाराकडे पहायचि एकुणच सामजिक मनोवृत्ती, व सुचवलेले काहि उपाय हे सर्वच
आपण थोडक्यात व अतिशय मुद्देसुदरित्या व्यक्त केले आहेत.

आजच्या समाजात स्त्रीभ्रुण हत्या ,गर्भजल परिक्षा वगैरे प्रकार होणे जितके दुर्दैवी आहे तितकेच स्वाभाविकहि आहे.
ह्याबाबतचे एकंदर समाजकारण पाहता सर्वात मोठा मुद्दा हा अर्थकारण हाच आढळतो.
हुंडापध्दती जोपर्यंत अस्तित्वात आहे/राहिल तो पर्यंत हे सर्व प्रकार अव्यातहतपणॆ चालुच राहतील असे वाटते.
आजच्या समाजरचनेत मुलाच्या लग्नाचे टेंशन हे त्याच्या बापाला जेवढे असते त्याच्या कितीतरी पट हे मुलीच्या बापाला असते.
मुलगा/मुलगी कितिहि उच्चशिक्षित असले तरीहि बहुतांश वेळा त्यांच्या लग्नाच्या वेळेस ज्योतिष,कुंडल्या, गोत्र, राशी हे सर्व प्रकार
पाहिलेच जातात.मुलीची परिक्षा हि बहुतांशवेळा तिच्या रुपावरूनच हो्ते.मुलगी जितकी रुपवान व गोरी तितके तिचे लग्न लवकर व स्वस्तात व्हायचे चान्सेस जास्त.
हेच कमी रुपवान मुलींना जास्त अवघड असते.तिच्या रुपातल्या कमतरतेची उणीव हि जास्त हुंड्यातून भरुन काढली जाते.किंवा कमी कुवतीचे स्थळ पाहिले जाते.
त्याउपरहि लग्न करुन दिल्यानंतर मुलीच्या बापाचा ताण हलका होतोच असे नाहि.सणवार वगैरे प्रकारातुन हे भरडणॆ चालुच राहते.
तशातच मुलीचा संसार नीट होतोय कि नाहि,तिला सासरी काहि प्रॊब्लेम तर नाहि अशी सततची काळजी वधुपित्याला असते.
बर योग्य वयात लग्न झाले तर उत्तम.नाहितर आणिक काहितरी उद्योग होऊन बसायला नको अशा एक का दोन विवंचना वधु माता पित्याला असतातच.
मुलीचा जन्म झाल्यापासूनच ह्यांचे तिच्या लग्नाविषयीचे प्लॆनिंग मनातल्या मनात सुरु होते.मुलिच्या नावाने पहिल्यापासूनच शिल्लक बाजुला टाकलि जाते.
आता हे सर्व प्रकार व समाजाची एकंदर मनोवृत्ती पाहिल्यानंतर स्त्रीभ्रुण हत्या हा प्रकार होणे दुर्दैवी असले तरी स्वाभाविक आहेच.

परंतु ह्या विवेचनानंतरहि स्त्रीभ्रुण-हत्या हि समस्या उभी राहते ती म्हणजे सेक्सरेशो मध्ये य़ॆणा-य़ा तफ़ावतीमुळे.
आणि दिवसेंदिवस हि तफ़ावत हि वाढतच जाताना दिसते.अन लोकसंख्येच्या वाढत्या वेगात हि तफ़ावत अतिशय हिंस्त्र रुप धारण करते आहे.
समाजप्रबोधन हि काळाची गरज असली तरी,ह्यासर्व प्रकारात सरकारची भुमिका अतिशय आवश्यक व महत्वाची आहे.
चीनसारख्या देशात वाढती लोकसंख्या पाहून सरकारनेच "घरटी एकच संतान" सारखा कडक कायदा करून त्याची अंमलबजावणीहि कडकपणॆ केलेली आढळते.
त्याच प्रमाणॆ ह्या समस्येवर जास्त अभ्यास करणॆहि आवश्यक आहे.
भारतात प्रचलित असलेल्या जातीअंतर्गत रोटिबेटि व्यवहाराचा मोठा फ़ायदा करुन घेता येइल.
आकडे हे जातीवार पणॆ विभागले तर कुठल्या जातीत हे गुणोत्तर बिघडले आहे हयाचा सहज मागोवा घेता येइल.
त्यानुसार तिथे प्रबोधन,आर्थिक मदत,मुलींची संख्या वाढवायला प्रोत्साहन वगैरे उपाय योजून हि विस्कटलेली घडी काहि अंशी परत बसवता येइल.
अर्थात त्यात पुन्हा शहरी-ग्रामीण वगैरे फ़रक येणारच,परंतु ग्रामीण भागात ह्याचा जास्त फ़ायदा करुन घेता येइल.

वरति प्रियाली ताईंनी मांडलेला मुद्दा
दोन मुलगे असणार्‍या कुटुंबांना हे मुलगे वयांत आले की पोटात खड्डा येतो. त्यांची लग्ने करून इतकी कुटुंबे ३-४ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहणे शक्य नसते आणि शहरांत दुसर्‍या जागा घेणे ही फार कठीण असते. या वरवर साध्या वाटणार्‍या पण मोठ्या समस्येतून लोकांना हल्ली निदान एक तरी मुलगी हवी असते. कारण मुलींची लग्न उरकली की गेल्या आपापल्या घरी. म्हणजे खर्रेखुर्रे कारण मुलगी हवी हे नसून उतारवयात एकापेक्षा अधिक मुलगे असल्याने निर्माण होणार्‍या समस्यांना तोंड देऊ लागू नये हे असते.
हा आकर्षक वाटत असला तरी पटत नाहि. फ्लॆटमध्ये राहायला जागा कमी पडेल ह्या विचारावरून तरी कोणि मुलगा नको असे म्हणॆल हे अशक्यप्राय वाटते.
कारण माझ्या पाहण्यात एक नव्हे तर ४ केसेस आहेत कि दुसरीहि मुलगीच झालेली पाहून "बाप" हा माणूस एखाद्या बाइ सारखा ढसाढसा रडताना मी पाहिला आहे.

स्त्रीभ्रुण हत्या हि तर बरिच पुढची पायरी म्हणता येइल.
आजकाल एक चायनीज फ़ोर्म्युला बाजारात फ़िरतोय. त्यानुसार कुठल्या दिवशी "संबंध" ठेवले तर हमखास "मुलगाच" होतो हे निश्चित करता येते.त्याची शक्यता ९५% हून जास्त आहे अशी वंदता आहे.
तो वापरून आम्हास मुलगाच झाला हे सांगणारे महाभाग हि माझ्या माहितित आहेत.
आता बोला.

कठोर कायदे ,तसेच मुलगी झाल्यासपालकांस काहितरि प्रोत्साहन/प्रलोभन, त्याच बरोबर समाज प्रबोधन हि काळाची गरज आहे असे वाटते.

असो,
एका उत्तम व परखड अग्रलेखाबद्दल मास्तरांचे आभार व अभिनंदनहि.

मिसळपाव वरील दर सोमवारी येणारे संपादकीय हे खरोखरच आकर्षण बनले आहे.
मुक्तसुनीत,बिरुटेसर,घाटपांडेकाका ह्यांचे अग्रलेखही अतिशय उत्तम व वाचनीय झाले आहेत.त्याबद्दल त्यांचे हि अभिनंदन करु इच्छीतो.
व तात्यांनी सुरु केलेल्या ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा.

अभिज्ञ

भडकमकर मास्तर's picture

28 Jul 2008 - 11:08 pm | भडकमकर मास्तर

रे अभिज्ञा....
दीर्घ प्रतिसादाबद्दल धन्यवाद...

आजकाल एक चायनीज फ़ोर्म्युला बाजारात फ़िरतोय. त्यानुसार कुठल्या दिवशी "संबंध" ठेवले तर हमखास "मुलगाच" होतो हे निश्चित करता येते.त्याची शक्यता ९५% हून जास्त आहे अशी वंदता आहे.
तो वापरून आम्हास मुलगाच झाला हे सांगणारे महाभाग हि माझ्या माहितित आहेत.

हे तर चिनी झालं .... माझ्या क्लिनिकशेजारी एका बी ए एम एस प्रॅक्टिशनरने मधुमेह, हृदयविकार आणि इतर आजारांबरोबरच मुलगाच / मुलगीच होण्यासाठी औषधे दिली जातील असे भिंतीवर लिहिले होते... आयुर्वेदात यावर काही उपाय (! ??) सांगतात म्हणे... त्या प्रॅक्टिशनराकडे मुलगीच होण्यासाठी कोणी पेशंट आले की नाही यावर माझ्याकडे काही माहिती उपलब्ध नाही... :(

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

29 Jul 2008 - 7:55 am | डॉ.प्रसाद दाढे

आयुर्वेदात मुलगाच अथवा मुलगीच (हे दुर्मिळ) होण्यासाठी प्रॉपर ट्रिटमे॑ट आहे. माझ्या काही मित्रा॑नी घेतली होती व फायदाही (!) झाला होता. अर्थातच हा उपचार खूप महागही आहे कारण सदर वैद्य एका वेळची कन्सटेशन फी पाचशे ते आठशे रू. घेतात (औषधा॑चे वेगळे) व अशी जवळजवळ वीस-प॑चवीस सिटी॑ग्ज होतात.
जय॑त नारळीकरा॑ची 'पुत्रवती भव' (यक्षा॑ची देणगी) ही गोष्ट आठवली.
माझ्या माहीतीनुसार अमेरिकेत सोनोग्राफी करता॑ना बाळाचे लि॑ग सा॑गतात. व त्यानुसार होणार्‍या बाळाचे नाव आधीच ठरवावे लागते. अमेरिकेत मुलगी आहे म्हणून गर्भपात करतात काय?

भडकमकर मास्तर's picture

29 Jul 2008 - 8:03 am | भडकमकर मास्तर

माझ्या माहीतीनुसार अमेरिकेत सोनोग्राफी करता॑ना बाळाचे लि॑ग सा॑गतात. व त्यानुसार होणार्‍या बाळाचे नाव आधीच ठरवावे लागते. अमेरिकेत मुलगी आहे म्हणून गर्भपात करतात काय?

अमेरिकन्स नक्कीच करत नाहीत पण तिथल्या ( अशा विचारांच्या )भारतीयांचं काय?
यावर एका अमेरिकन डॉक्टराबद्दल वाचले होते की त्याने म्हटले होते की तेथील भारतीयांना बाळाचे लिंग सांगावे की नाही याबद्दल प्रश्न पडतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

29 Jul 2008 - 2:23 pm | भडकमकर मास्तर

आयुर्वेदात मुलगाच अथवा मुलगीच (हे दुर्मिळ) होण्यासाठी प्रॉपर ट्रिटमे॑ट आहे. माझ्या काही मित्रा॑नी घेतली होती व फायदाही (!) झाला होता. अर्थातच हा उपचार खूप महागही आहे कारण सदर वैद्य एका वेळची कन्सटेशन फी पाचशे ते आठशे रू. घेतात (औषधा॑चे वेगळे) व अशी जवळजवळ वीस-प॑चवीस सिटी॑ग्ज होतात.

असे महागडे उपचार घेणे , त्याचा फायदा (!) वगैरे होणे , हा ज्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे..याबद्दल माझ्या नो कॉमेंट्स ....
पण हे सारे उपचार करावेसे वाटणे आपल्या मनात खोलवर रुजलेल्या भावनांचे द्योतक आहे असे मी मानतो...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ज्यांची या विषयात स्पेश्यालिटी आहे.

ते हमखास जोडप्याला मुलगा देवू शकतात. (कदाचीत in-vitro fertilization / artificial insemination technique वापरून असेल.)

ही अशी लोकं तर भृणहत्या करणार्‍यांपेक्षाही नालायक आहेत असं माझंमत आहे.

सर्किट's picture

28 Jul 2008 - 11:56 pm | सर्किट (not verified)

पाहुणा संपादक म्हणून एका गंभीर विषयाला हात घातल्याबद्दल मास्तरांचे अभिनंदन.

हिंदु धर्मातील वाईट चालीरीती, तसेच सामाजिक प्रघात, हे जोपर्यंत थांबणार नाही, तोवर कितीही कायदे केलेत, तरी सद्य परिस्थितीवर काहीही परिणाम होणार नाही.

शेवटी डॉक्टर ही "सेवा" पुरवतात, मागणी आहे म्हणून. जोवर मागणी थांबणार नाही, तोवर हे असेच सुरू राहणार.

- सर्किट

मदनबाण's picture

29 Jul 2008 - 3:54 am | मदनबाण

सगळ्या मनात खोलवर रुजलेल्या गोष्टी असतात, पण प्रयत्नपूर्वक त्या कमी तर करायला हव्यात... जिथे अशा गोष्टी दिसतात, अशा रूढी-परंपरांना क्वेश्चन तरी करायला हवं..
अगदी मनातल बोललात बघा..

मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

सामाजीक जबाबदारीची जाणिव असलेल्या प्रत्येक प्रबोधनकाराने स्त्री -लिंगभेदावर आधारीत अन्यायाला विरोध केला आहे .आपला लेख ह्याच दर्जाचा आहे.मिसळपावच्या अग्रलेखाच्या निमीत्ताने आज कमीतकमी हजार जणांना विचार करायला भाग पाडले आहे.पण..अफाट लोकसंख्या ,किमान दोन शतकाची गरीबी ,सुशिक्षीत असलेली अशिक्षीत माणसं ,प्रबोधनकाराचे विचार मेंदूआड करतात. या गर्दीत आपले विचार अरण्यरुदन ठरू नयेत यासाठी किमान साडेसातशे (आतापर्यंतची वाचने)माणसांनी तरी एक किमान कार्यक्रम ठरवला तरी हा अग्रलेख सफल झाला असे वाटेल.
माझे स्नेही विनायकराव प्रभू यांची माझ्याबरोबर काल जी चर्चा झाली त्यानंतर ही समस्या किती गंभीर आहे आणि दिवसेंदिवस कडेलोटाकडे आपण जातो आहे असाच भास झाला.
जन्मापूर्वी जर स्त्रीला ही वागणूक मिळत असेल तर नंतर मरेपर्यंत तिचे काय पोतेरे होत असेल याची कल्पना पण भयावह आहे.
प्रभूंनी सांगीतलेले आकडेवारी जरी जुनी असली तरी भीषण आहे.
दहा वर्षापूर्वी रोज विस ते पंचवीस ऍबॉर्शन्स ते काम करत असलेल्या हॉस्पीटल मध्ये व्हायची.
या समस्येला तोंड देण्यासाठी प्रबोधन तर हवेच आहे पण कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी पोलिटीकल विल ची पण आवश्यकता आहे.
या विषयावर आणखी विचारमंथन व्हावे.

सखी's picture

29 Jul 2008 - 6:48 pm | सखी

एका परखड व उत्तम अशा अग्रलेखाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन.
नक्की आठवत नाही पण मागे एकदा एनपीआर या अमेरीकेतल्या प्रसिद्ध रेडीओवरुन अशाच प्रकारच्या प्रश्नाचा उहापोह चीनबाबत केला होता. त्यांनी चीनमधल्या आता २५-३५ वयोगटातल्या मुलांच्या व त्यांच्या घरच्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या व मुलगी मिळणे किती अवघड झाले आहे ते जवळजवळ सर्वजण सांगत होते. एका मुलाला जवळजवळ ७-८ वर्षे मुलगीच मिळत नव्हती.
ब-याच मुलांचे आईवडीलच आता मुलींना हुंडा देण्याची पद्धत पडत चालली आहे असे सांगत होते. अशीच परिस्थिती अजुन २०-३० वर्षांनी भारतातही येऊ शकेल, तेव्हा ह्या लोकांचे डोळे उघडतील की त्यांनी काय करुन ठेवले आहे, खंत इतकीच बाकीच्या लोकांना ज्यांना मुले आहेत तेही यात भरडले जाऊ शकतील.

कलंत्री's picture

29 Jul 2008 - 8:17 pm | कलंत्री

कालपरत्वे समस्या बदलत जात असतात हेच खरे. पूर्वी मुली अथवा मुलांच्या बाबतीत असा भेदभाव अथवा अतिरेकीपणा केला जात नसे. शेवटी माणूस हा आतमध्ये रानटी आणि हिंस्त्र असाच राहिलेला आहे हेच मान्य करावे लागेल.

माझ्या एका परिचिताने ४८ वर्षी दोन मुलीवर मुलगा व्हावा म्हणून सफल असा प्रयत्न केला आणि आपल्या पत्नीला ४२व्या वर्षी गरोदर ठेवण्याचे पुण्य संपादन केल्याचे स्मरते. स्त्री एक जननाचे यंत्र आहे अशीच समजूत व्हावी अशीच घटना वाटते.

या सर्व चर्चेमध्ये विधायक अशी कोणतीही उपाययोजना पूढे आलेली नाही याचा खेद वाटतो.

माझ्या मते सध्या अनेक संगणक तज्ज्ञाच्या जोडप्या मध्ये मुले दत्तक घेत असतात. यालोकामध्ये मुलीच दत्तक घेण्याचे प्रमाण आहे असे ऐकतो.

अजूनही काही उपाययोजना सुचवाव्यात जेणे करुन ही कीडकी विचारसरणीचे उन्मुलन होईल असे पाहता येईल.

भडकमकरांनी एका चांगल्या विषयाला वाचा फोडली आहे याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहे.

भडकमकर मास्तर's picture

30 Jul 2008 - 8:10 am | भडकमकर मास्तर

या सर्व चर्चेमध्ये विधायक अशी कोणतीही उपाययोजना पूढे आलेली नाही याचा खेद वाटतो.

१.डॉक्टरांची मानसिकता बदलण्यासाठी प्रबोधन आणि गुन्हेगारांना अधिकाधिक कडक शिक्षा
२. मानसिकता बदलण्यासाठी समाजाचे प्रबोधन...( मुक्तसुनीत यांचा प्रतिसाद पहा )....

धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे, (संख्याशास्त्र सांगते की मोठ्या प्रमाणात गुन्हे होत आहे, पण प्रत्येक व्यक्ती कायदेशीर वागल्याचा सफल कांगावा करू शकतो)याला सोपा आणि प्रभावी उपाय मिळणे मुश्किल याचा मलाही खेद वाततो...त्यामुळे कितीही उशीर लागला तरी प्रबोधन हाच उपाय...

माझ्या मते उपायांवरही अशी बरीचशी समाधानकारक चर्चा येथे झाली आहे ....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मास्तर मुद्देसुद उदाहरणा सहित लेख छान मांडला आहे, आणी त्यातील आशय तर जिव्हारी लागणारा आहे.
स्त्रीच जो पर्यंत खंबीर पणे उभी राहणार नाही तो पर्यंत असेच होत राहिल.
पण परिस्थिती चिंता जणक आहे, नाही तर महाभारताल्या पांचाली सारखी स्थिती होण्याची वेळ येईल.

बापु देवकर's picture

30 Jul 2008 - 6:11 pm | बापु देवकर

प्रियाली "लग्नाला उभे राहिलेले मुलगे आहेत पण पुरेश्या मुली नाहीत. ज्या आहेत त्यांनी आधीच आपल्याला हवे तसे नवरे निवडलेले आहेत."

-->अगदी बरोबर...म्हणून की काय लोक आंतर जातीय विवाह करताना दिसत आहेत.

"अब और कितना गिरना बाकी है "?
-->जर हे असेच चालू राहीले तर समाजातील या विषमतेमुळे बलात्करा सारख्या घटना वाढतील..

सर्व प्रतिक्रिया वाचून प्रतिसाद द्यायला मला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.

ही समस्या फार गंभीर आहे. आपल्याकडच्या अनेक सामाजिक प्रश्नांप्रमाणे ह्याही प्रश्नाबाबतचे प्रबोधन हे लहान वयातच सुरु व्हायला हवे. स्त्री-पुरुष समानता असे मी म्हणणार नाही कारण नैसर्गिकरीत्या स्त्री-पुरुष हा फरक आहे आणि तो रहाणारच त्यात जीवाच्या निर्मितीचे रहस्य आहे! परंतु जन्माला येणारा जीव हा प्रथम एक जीव आहे आणि नंतर मुलगा-मुलगी आहे हे सत्य मनावर बिंबणे आवश्यक आहे. लग्नेच्छू तरुण-तरुणींना ह्याबाबतचे योग्य ते मार्गदर्शन मिळणे जरुरीचे आहे. कायद्याच्या बडग्याबरोबरीनेच समस्येतले भयाण सामाजिक वास्तव आकडेवारीनिशी त्यांना समजले तर कित्येक तरुण-तरुणींचे विचार बदलतील किंवा ज्यांना त्यांच्या घरातल्या लोकांकडून दबाव येतो त्याला तोंड द्यायला ते सक्षम होतील.
हा एक भाग झाला.

दुसरे असे की आपल्याकडे लग्न होऊन आलेल्या मुलीकडे सासू-सासरे ह्या लोकांनी प्रेमाने बघितले पाहिजे. घरी फक्त राबायला, आपल्या मनातल्या गोष्टी लादायला एक हक्काचे माणूस अशी जर तिची अवस्था केली तर तिथेच ह्या सर्व गोष्टींना एक वेगळे वळण लागते. आजकाल असे त्रास कोणत्याही नवीन मुली सहजासहजी स्वीकारत नाहीत पण अत्यंतिक दबावाखाली मान तुकवली जाते. मुलींना त्यांच्या माहेराचा पुरेसा मानसिक आधार असला तर त्या खंबीरपणे अशा समस्यांना तोंड देऊ शकतात. 'एकदा लग्न झाले की तू त्या घरची झालीस आता प्रश्न घेऊन येऊ नकोस, काय ते तुझे तू बघ' असे तोडून टाकले तर आधार संपतो आणि समस्या निर्माण करणार्‍यांना जोर येतो.

भ्रूणहत्या ही वाईट आहे ह्याचे थोडे प्रबोधन डॉ.चेही करणे आवश्यक आहे. मेडिकल कॉलेजेसमधे भावी डॉ.ना सामाजिक प्रश्न म्हणून ह्या गोष्टीची जाणीव करुन द्यायला हवी आणि हा प्रश्न बर्‍याच अंशी कमी करण्यासाठी ते कसा प्रयत्न करु शकतात त्याबद्दल त्यांना जागरुक करायला हवे.
अशा अनेक अंगांनी काम केले तर घसरणार्‍या पायांना ब्रेक लागेल पण तोपर्यंत तोल जायला नको म्हणजे झालं!

चतुरंग

भडकमकर मास्तर,

आपला मुद्दा प्रबोधन करायला हवे हा मान्य आहे परंतु ही हळू चालणारी प्रक्रिया आहे. त्या योगे समाजमन बदलण्यास बराच वेळ लागतो.

आपल्याला काहीतरी कृती करायला हवी. उदा. आपला लेख वाचल्यानंतर माझ्या मनात अनेक कल्पना आल्या. त्यापैकी एक म्हणजे आपण कोणातरी एका मुलीचे कन्यादान ( उपेक्षित, गरीब अथवा मागासलेल्या ( वैचारिक अथवा आर्थिक दृष्ट्या) मुलीचे लग्न लावले पाहिजे) केले पाहिजे.

आपण शहरात किंवा कोठेही चक्कर मारली तर आपणास असे नक्कीच आढळून येईल की स्त्रियासाठी सामान्य असणारे प्रसाधन गृहही नसते. पुरुष लघवी लागली तर कोठेही करु शकतो, स्त्रियांची कुचंबणा आपण समजु शकतो. त्यासाठी शहरात आपण मोहिम आखु शकतो. यामुळे स्त्रियांची सबलीकरण होऊ शकते. शेवटी प्रत्येक गोष्ट लढुनच साध्य करावी लागते.

माझ्या एका मित्राने गृहिणी असणार्‍या स्त्रियांसाठी व्यवस्थापन वर्ग सुरु केले होते. कोणीही ८ जणांचा गट करुन त्याच्याकडे शिकायला जात असे. त्यात वेळेचे नियोजन, निर्णयक्षमता, ताण नियंत्रण असे २ तासाचे ८/१० सत्र तो घेत असे. हे सर्व विनामुल्य होत असे.

गरीब मुलीसाठी शिक्षणाचा खर्च करणे हाही एक भाग होऊ शकतो.

नन्हीकली हा उपक्रम आपण ऐकला असालच.

आपली कळकळ आणि संवेदना अश्या उपक्रमातुन व्यक्त झाली पाहिजे.

कालच एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशाश्त्रज्ञाची भेट झाली. त्यात अनेक चर्चा झाल्या. त्यात मुलीच्या भ्रुण हत्यावर मी विचारले असता त्याने मान्य केले की ही समस्या फक्त भारतात आहे. मला काल रात्रभर अस्वस्थ वाटत होते.

आपण चांगला विषय हाती घेतला आहे त्याला असेच मध्ये सोडु नका ही विनंती.

काही चुकले असेल तर माफ करा.

द्वारकानाथ कलंत्री

भडकमकर मास्तर's picture

1 Aug 2008 - 11:44 pm | भडकमकर मास्तर

तळमळीने लिहिलेल्या आपल्या दीर्घ प्रतिसादाबद्दल मनापासून आभार ...
...
असे गुंतागुंतीचे प्रश्न समोर आले की माझं मन खूप निराशेने भरून जातं, सिनिक होतो मी... या इतक्या भयानक प्रश्नाला मी एकटा कुठे पुरा पडणार ? असे विचार मनात येतात...

आपण अनेक मार्ग / उपक्रम सुचवले आहेत , ते खूप महत्त्वाचे आहेत... आपापली निराशा झटकून निदान शक्य ते छोटे पाऊल तरी टाकले पाहिजे , हेच खरे...
हा विषय मनात अनेक वर्षे त्रास देत साठून आहे, त्यामुळे लगेच विसरून जाणे शक्य नाही...यापुढे मला शक्य ते सारे करत राहीन , इतकेच म्हणतो...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अविनाश ओगले's picture

1 Aug 2008 - 9:32 pm | अविनाश ओगले

सुन्न करणारा लेख. खूप बेचैन झालो...

प्रकाश घाटपांडे's picture

7 May 2012 - 7:56 pm | प्रकाश घाटपांडे

मास्तरांचा विषय अमीर खानने सत्यमेव जयते आता कार्यक्रमात घेतला आहे

शाहिर's picture

7 May 2012 - 8:07 pm | शाहिर

परीस्थीती अजून भीषण होत चालली आहे

रेवती's picture

7 May 2012 - 8:54 pm | रेवती

या मुलींवरील अत्याचारांमुळे/भृणहत्यांमुळे एक विचित्र गोष्ट झालीये. सगळेजण मुलींचीच बाजू घेतात आणि एखाद्या जोडप्याला मुलगा हवा हे म्हणणं अवघड होऊन बसलय. दरवेळी त्यात मुलगा आणि मुलगी हा भेद असतोच असे नाही. "आम्हाला मुलगी झाली तर आनंद होईल." असे म्हणणार्‍या जोडप्यांकडे आदराने पाहिले जाते तर्'मुलगा हवासा वाटतोय' म्हटले की झाले कल्याण! खरी लिंगनिरपेक्षता तीच म्हणता येईल जेंव्हा दोन्ही जीवांना सारख्याच आनंदाने स्विकारले जाईल. चीनमध्ये म्हणे मुलाला हुंडा द्यावा लागतो, बायको आणण्यासाठी. माझ्या कॉलेजात एक चीनी मुलगी नोकरीतून ठराविक रक्कम आपल्या भावाला मदत म्हणून साठवत असे......त्याचे लग्न लवकर व्हावे म्हणून.

मस्त कलंदर's picture

7 May 2012 - 10:08 pm | मस्त कलंदर

आपल्याकडे आशीर्वाद तरी कसे असतात? पुत्रवती भव वगैरे.... कथा कादंबर्‍यांतूनसुद्धा देशरक्षणासाठी शूर पुत्र होऊ दे वगैरेच भाषा.... का?.नवीन लग्न झालेल्या बाईला आडून आडून का होईना " मुलगाच हवा" वगैरे टाईपातले सूचक इशारे, कधी टोमणे, घरगुती समारंभात मुलगा असलेल्या बाईला स्पेशल प्रिव्हलेजेस असणे, हुंडा आणि लग्नसमारंभाचा प्रचंड खर्च वधुपित्याला करावा लागणे

हाहा.. लग्नातही मुलगा 'चिरंजीव' आणि नवरी मुलगी 'चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी' असते. आणि याबद्दल अगदी तिच्या घरच्या कुणालाही काही वाटत नाही. आणि चुकून जर हे 'चिरंजीव' आपलं चिरंजीवीत्व हरवून बसले की.... असो!!

प्रसाद गोडबोले's picture

27 Jan 2022 - 2:19 pm | प्रसाद गोडबोले

उत्तम लेख !

लेख उत्तम आहे ह्यात शंका नाही , पण खुप जुना आहे , जवळपास १४ वर्षे जुना ! इतक्या वेळात पुलाखालुन खुप पाणी वाहुन गेले आहे !
आधीच्या पिढीने केलेल्या पापांची फळं आता आजच्या पिढीला भोगायला लागत आहेत ! आमच्या सातार्‍याच्या गल्लीतील कित्येक तरुण ३०-३५ पुढे जाऊन अजुनही गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलेले आहेत , लग्नाला पोरीच नाहीत ! आता बसा हलवत अन आधीच्या पिढ्यांना शिव्या घालत !
त्यातील गुटखा खाऊन पचापचा थुंकणारे अन बापाच्या पैशावर गाड्या पळवणारे सोडुन द्या पण काही काही खुप उच्च विद्या विभुषित , चांगल्या घरातील मुलांनाही लग्नाला मुली मिळत नाहीयेत ही खरी शोकांतिका आहे.

शिवाय मुलींनाही डिमांड सप्लाय चे गणीत कळुन चुकलं आहे की मुलांची संख्या इतकी जास्त आहे की त्यामुळे मुलींना प्रचंड डिमांड आलेला आहे , त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत , सातारा सांगली कराड कोलापुर ह्या साडेतीन जिल्ह्यात वगैरे व्यवसाय नोकरी करणार्‍या पोरांना पोरी अशाच फाट्यावर मारत आहेत , शेती करणार्‍यांचा तर विषयच सोडा ! अगदी जरा नाकी डोळी ठिक असलेल्या पोरीलाही पुण्यात आय्टी मध्ये जॉब करणारा , स्वतः त्चा पुण्यात २बी.एच.के असणारा अन आई वडील बहिण वगैरे जबाबदार्‍यांची ओझी नसणारा मुलगा हवा आहे =)))) मुलांना स्वतःचा स्टंडर्ड वाढवणे हे आता अनिवार्य झालेले आहे ! थातुरमातुर पोरांना लग्नाला स्थळेच नाहीत आता !!

आता ज्या पिढ्यांनी , ज्या अधुनिक अश्वथाम्यांनी स्त्रीभ्रुणहत्या केल्या त्यांच्या पुढच्या पिढ्यांना प्रजोत्पादनासाठी मुलीच मिळत नाहीत हा निसर्गाचा एकदम काव्यमय न्याय पोएटिक जस्टिस म्हणायला हरकत नाही ! ह्या असल्या नीच लोकांचा जीनपुल समाजातुन हळु हळु नष्ट होईल , अन सुज्ञ लोकांचाच समाज टिकेल असा एक आशावाद आहे .

पण तोवर ही "छोट्या मित्राला शांत न केलेली" अन लग्न संसार पोरंबाळं असले पाश नसलेली , टवाळ पोरं कोणत्याही भंपक आंदोलनांना टाकीभर पेट्रोल, ३००-५०० रुपये अन एक चपटी देऊन उपलब्ध्द होतील त्यामुळे राजकारणात मात्र मजा येणार आहे , आपण आधी सारखेच पॉपकॉर्न घेऊन बसु !

द्या रे कोणती ती घोषणा एकदम वरच्या आवाजात =))))

चौथा कोनाडा's picture

27 Jan 2022 - 6:00 pm | चौथा कोनाडा

प्रश्न गंभीर आहे !

सुबोध खरे's picture

28 Jan 2022 - 10:54 am | सुबोध खरे

आपला सात्विक संताप ठीक आहे परंतु वस्तुस्थिती काही वेगळी आहे.

आपण लिहिलेले आहे ते मध्यम वर्गापुरते ठीक आहे.

गरीब वर्गात फार वाईट स्थिती आहे

मुली उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी बलात्काराचे प्रमाण वाढते आणि वेश्या व्यवसाय फोफावतो

हरयाणात तर भयानक स्थिती आहे. तेथे हरयाणातील मुली मिळत नाहीत म्हणून दोन किंवा तीन भावात मिळून एक गरीब मुलगी वधू म्हणून बिहार मधून आणली जाते (लग्न धाकट्याशी केलेले असते) आणि अक्षरशः तिचा लैंगिक गुलाम किंवा भोगवस्तू म्हणून वापर केला जातो.

गरीब मुलगी कुठेही जाऊ शकत नाही किंवा पोलिसात तक्रार करू शकत नाही. तक्रार केली तरी नवरा हा घरचा मामला आहे म्हणून सारवासारव केली जाते. मेली तरी पैशाचा वापर करून दुसरी आणली जाते.

गरीब आईबाप पैशाचे पाठबळ नाही म्हणून काहीही करू शकत नाहीत. मुळात असे लग्न हेच "खायला एक तोंड कमी" व्हावे म्हणून केलेले असते.

पोएटिक जस्टीस वगैरे सर्व मनाचे समाधान असते. वस्तुस्थिती फार फार वेगळी आणि वाईट आहे.

फक्त परिणामांबद्दल भाष्य करणारा आपला हा प्रतिसाद फारच अपुरा आहे असं वाटतं.

सौन्दर्य's picture

28 Jan 2022 - 12:21 am | सौन्दर्य

मार्कसनी लिहिल्याप्रमाणे मुलींचे प्रमाण घटत चालल्याने त्यांचा लग्नाच्या बाजारातील भाव वधारला आहे व आहे तोच ट्रेंड चालू राहिला तर पुढील १५/२० वर्षे हा भाव अजूनच वाढेल.

अश्या स्थितीत जोडप्यानी मुली होऊ दिल्या तर त्या मुलींना पुढे चांगलेच दिवस दिसणार ह्यात शंका नाही. एक प्रकारे स्त्रीभ्रूण हत्या न होऊ देण्यामागचे ते एक सबळ कारण ठरू शकेल.