राजसाहेब आपली वक्तृत्वशैली असो वा जीवनशैली त्याचे प्रचंड आकर्षण आजच्या तरुणाईला आहे, तर इतरांना कौतुक. मग तो विरोधी पक्षातील असो वा अमराठी!!! अर्थात आम्हीही त्यास अपवाद नाही आहोत. पण ते वैचारिक साम्यतेमुळे. साहेब कोणत्या विषयावर काय बोलतील, कोणावर टीका करतील, कोणाचे कौतुक करतील याचे अचूक अंदाज आम्ही बांधत असू, ते इतके अचूक असत की काही मित्रांना मी भाषणे लिहून देतो की काय अशी शंका येते. पण आता साहेबांची मोहिनी ओसरत चालली आहे, आमचे अंदाजही चुकू लागलेत. जसा पक्षाचा विकास वेगाने झाला तशाच लोकांच्या अपेक्षाही वाढल्या, पण त्यांचा भ्रमनिरासच झाला.
समर्थकांसह विरोधकांचेही लक्ष नाशिकवर केंद्रित झालंय, होणारच. कारण नाशिक शहरात आपले तीन आमदार आहेत ज्यांचा कालावधी संपत आलाय, महापालिकेत सत्ता आहे. पण विकासाची कुठे सुरुवात आहे असे दिसत नाही. लोकांचा भ्रमनिरास होतोय आणि याची आपणास निश्चित जाणीव आहे. वेळोवेळी पुरेसा कालावधी पूर्ण झाला नाही, पूर्ण सत्ता नाही अशी कारणे आपण देत आहात. नाशिक शहरात आपले तीन आमदार आहेत ज्यांचा कालावधी संपत असताना, महापालिकेत सत्ता असताना आपण अशी कारणे देणे शोभत नाही. सत्तेत असल्याशिवाय कामे होत नाही हे पटत नाही. कारण विरोधी पक्षातीलही काही आमदार-खासदार आहेत जे सत्तेत नसताना जोमाने काम करत आहेत. मग इतरांना का अडचण यावी. आपण एक-दोन वर्ष पाळणा नाही हलला तर अनेक शंका घ्यायला. अनाहूत सल्ले द्यायला सुरुवात करतो. मग एक वर्षानंतर काही कामांची अपेक्षा करणे निरर्थक नक्कीच नाही. लोकांसाठी स्वत:ची संस्कृती,अस्मिता टिकवण्याबरोबरच विकासही महत्त्वाचा आहे. बायको नुसती सुंदर असून चालत नाही तिला मुलंही व्हायला हवीत ना?
मोदींनी ठेका दिल्याप्रमाणे गुजरातेतून जशा विकासाच्या बातम्या येतात तशाच बातम्या नाशिकमधून येतील अशी आमची भोळी आशा होती. होती अशासाठी की, आता वर्ष उलटून गेले पण तिकडे विशेष काही होतेय याची जराशीही कुणकुण लागत नाहीये. गुजरातेत काय, किती आणि खरंच विकास झालाय हे आम्ही थोडंच पाहिलंय? पण सगळेच उदोउदो करतायत आणि आपण स्वत: गुजरातचा विकास पाहून आला आहात आणि तोंडभरून स्तुतीही केली आहे म्हणजे नक्कीच विकास होतोय असे मानायला हरकत नाही. पण आपल्या नाशिकमधून, महाराष्ट्रातून अशा बातम्या कधी येणार?
आता विधानसभा निवडणूका जवळच आल्यात. काही दिवसांत आपण सभा घ्यायला सुरुवात कराल. पण खरं सांगतो साहेब, सभा ऐकण्याची ती ओढ शिल्लक नाही राहिली. मान्य आहे बरेचशे वैचारिक दिवाळखोर नेते आहेत. त्यांच्यावर आपण टीकाटिप्पणी करता, त्यांची खिल्ली उडवता, नक्कल करता. आम्ही ते शेकडो वेळा पाहिलंय. पुन्हा पुन्हा, पण आता ते पाहून आम्हाला हसू येत नाही. त्या नेत्यांनी सुद्धा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काही ना काही कामं केलीत, काही तजवीज केलीय. याउलट आपल्या नेत्यांची- कार्यकर्त्यांची नावे खंडणी वसुली, खून, मारामारी, बलात्कार अशा अनेक गुन्हेगारी खटल्यांत येतायत आणि आपण सभामधून एकहाती सत्तेची मागणी करताय. जनतेचं राहू दे बाजूला, पण कार्यकर्त्यांचे काय. त्यांना अपेक्षित ऊर्जा मिळालीच नाही, कसं काम करणार ते. सत्तेची पहिली पायरी म्हणून नाशिककडून काही अपेक्षा होत्या पण सर्वांच्या पदरी निराशाच पडलीय. आपल्या टीकेचा, कारणांचा आम्हाला उबग आला आहे. त्यामुळे उद्या कोणीही एखादा टग्या उठून साहेबांना रड्या म्हणेल, आम्हाला ते बिलकूल आवडणार नाही. पण त्याचा विरोध तरी आम्ही कसा करायचा?
प्रतिक्रिया
28 Jan 2014 - 10:06 pm | पैसा
तुम्ही तळमळीने लिहिलंय. पण हे कोणाच्या कानावर पडणार आहे? अशा अनेकांची प्रगतीपुस्तकं कोरी सापडतील. आपण आम जन्ता वेगवेगळे पर्याय निवडून बघतो. शेवटी ये रे माझ्या मागल्या!
29 Jan 2014 - 9:51 am | जेपी
तुम्ही हे पत्र राज ठाकरेंना का नाही पाठवत .
हा सल्ला कितपत गांभीर्याने घ्यायचा हे तुम्ही ठरवा .
परीणाम खळ्ळ फटॅक होऊ शकतो .
(हघ्याहेवेसांनल)
29 Jan 2014 - 10:02 am | आतिवास
राजकीय पक्षाला 'अराजकतेचं' हत्यार वापरावं लागणं हे सध्या तरी सामान्य लोकांशी त्यांची नाळ तुटल्याचं आणि राजकीय व्यवस्था बदलण्याइतपत त्यांच्यात बळ नसण्याचं लक्षण आहे.
एकाला झाकावं आणि दुस-याला काढावं तरी फरक लक्षात येणार नाही अशी आपली अवस्था आहे सध्या.
तुमची तळमळ जाणवली लेखातून.
29 Jan 2014 - 10:05 am | विटेकर
पण खरं सांगतो साहेब, सभा ऐकण्याची ती ओढ शिल्लक नाही राहिली.
अगदी पटलं, मला एक वैयक्तिक समाधान असे आहे की जनता आता शिवराळ बोलणे आणि भूल-थापांना बळी पडत नाही अशी एक अंधुकशी आशा वाट्ते आहे .
राज ठाकरे सुद्धा त्याच वळणाने जाणार ! वळचणीचे पाणी आढ्याला कसे जाईल? तत्वहीन राजकीय पक्ष पाण्यावरील फेस,जसे लवकर बनतात तसेच लवकर फुटतात ही ! "खळ्ळ खट्याक" टेक्नॉलॉजी फार काळ चालत नाही !
यापेक्षा काँग्रेस परवडली , ते ताकाला जाऊन भांडे तरी लपवत नाहीत . पिढ्यांपिढ्या उजळ माथ्याने खा खा खातात आनि निर्लज्जपणे पुन्हा निवड्णुकीला उभे राहतात. भाबडा आशावाद निर्माण करुन लोकांच्या तोंडाला पाने तरी पुसत नाहीत.
बाकी लेखातील तळमळीशी पूर्ण सहमत !
29 Jan 2014 - 10:10 am | मंदार कात्रे
लेख व विटेकर जी यांच्या मताशी सहमत
29 Jan 2014 - 10:53 am | चिरोटा
महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांचे राजकारण सभांपुरतेच मर्यादित होते/आहे असे वाटते.वक्तृत्वशैली,खिल्ली उडवणे वगैरे ठीक असले सत्तेवर येण्यासाठी बर्याच गोष्टी लागतात.
29 Jan 2014 - 2:44 pm | चौकटराजा
प्रामाणिकपणा, कार्यक्रम व या दोन्ही गोष्टी जनांच्या मनात रुजण्यासाठी अमोघ वाणी. या तीन चीजा नेत्यात आवश्यक आहेत.आता मोदी, राजबुवा, पवार, म्याडम ( तिन्ही) .युवराज यांच्यांत या तिन्हीचा एकत्र संगम कोंणाकडे जास्त आहे ते तुम्हीच ठरवा ! ( ज्यायला काय वेळ आलीय मनमोहन यांच्यावर त्यांचे नाव ते सुद्धा या यादीत टाकायला विसरलेत !)