हा लेख मी खालील लिखाणाला पुरवणी म्हणून काढत आहे. श्री खटासी खट यांनी काढलेला धागा
http://www.misalpav.com/node/26446.
यात माझे स्वतःचे काही अनुभव मला विशद करायचे आहेत. मुळात स्त्री पुरुष संबंध (केवळ शरीर संबंध नव्हे) या बद्दल मला फार कुतूहल आहे. माझे लग्न होऊन २१ वर्षे झाली आहेत आणि ते बर्यापैकी सफल आहे असे मला वाटते. वैद्यकीय शास्त्र शिकून त्याबद्दल थोडीफार शास्त्रीय माहिती मिळाली तरीहि बहुसंख्य गोष्टींबद्दल अजूनही खूप कुतूहल बाकी आहे.
खालील गोष्टी या संपूर्ण सत्य आहेत पण उघड कारणांसाठी नावे बदलेली आहेत
१) नितीन माझ्या मामेभावाचा खास मित्र. माझ्या घराजवळ राहतो. त्याचे लग्न ठरले तेंव्हा तो हवेत तरंगत होता. आपले मधुचंद्राचे बेत त्याने मला सांगितले होते. काही काळानंतर(सुमारे महिन्याभरानंतर) भेटला तेंव्हा तो कोमेजलेला होता. मी सहज त्याला विचारले कसे काय? बरे आहे! त्यात काही दम नव्हता म्हणून त्याला परत विचारले तेंव्हा तो मोकळेपणाने बोलू लागला. मधुचंद्राच्या रात्री फक्त अमावास्येच्या गेल्या. चंद्र उगवलाच नाही. संबंधाचा प्रयत्न केल्यावर त्याची बायको जोरात ओरडत असे आणि त्याचा "मूड" जात असे. तो म्हणाला एवढा पाउस पडूनही आम्ही कोरडेच राहिलो. आणि अजूनही तीच स्थिती आहे. नितीन अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होता. मी त्याला त्याच्या बायकोच्या माहेरच्या स्त्रीरोग तज्ञाकडे जायला सांगितले कारण स्त्री आपल्या माहेरच्या माणसांशी जास्त मोकळी होते असा माझा अनुभव आहे. आणि एक चिट्ठी लिहून दिली. पुढे नितीन बरेच दिवस भेटला नाही पण माझ्या भावाने आता सर्व चांगले आहे आणि नितीनच्या बायको कडे गोड बातमी आहे हेही सांगितले. केवळ बायकोच्या भ्रामक कल्पनांमुळे त्यांचा संसार कड्यावर आला होता परंतु त्या स्त्रीरोग तज्ञांनी केलेल्या उत्तम कामाने आज नितीन सुखाने संसार करीत आहे.
२) मी गोव्याला होतो तेंव्हाची गोष्ट. तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षक(DIG- DEPUTY INSPECTOR GENERAL) साळवे साहेबांनी मला आवर्जून सहकुटुंब जेवायला बोलावले होते. आम्ही जेवायला गेलो तेंव्हा साहेब आणि बाईसाहेबांनी आमची फार उत्तम बडदास्त ठेवली. जेवून घरी येताना बायको म्हणाली कि ते एवढे तुझ्यावर मेहेरबान कसे? मी तिला सांगितले कि ती एक मोठी कहाणी आहे. साळवे साहेब (वय वर्षे ४५-४७) एकदा माझ्याकडे आपल्या पत्नीला(वय ४३ वर्षे) घेऊन आले होते, पोटदुखीसाठी. पत्नीची तपासणी केल्यावर माझ्या लक्षात आले कि त्यांना गर्भाशयाला जंतुसंसर्ग झाला आहे. मी सौ साळवेना विचारले कि तुम्हाला संबंध करताना त्रास होतो का? त्यांनी चाचरत चाचरत होय सांगितले. मला सगळा प्रकार लक्षात आला. मी साळवे साहेबाना विचारले कि साहेब मी सांगतो तशीच तुमची परिस्थितीत आहे काय? ते मला सांगा. तुमच्या सौ. ना संबंध केल्यावर त्रास होतो त्यामुळे संबंधाना त्या राजी नसतात आणि सारखी चिडचिड करीत असतात त्यामुळे तुमच्या परस्पर संबंधात थोडा तणाव आला आहे. साळवे साहेबाना अतिशय आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले डॉक्टर तुम्हाला बरोबर कसे कळले अगदी हेच प्रकार गेले सहा महिने चालू आहेत.सारखी काही तरी कुरबुर चीड चीड चालु असते. मी त्याना म्हटले, "साहेब,त्यांना आतमध्ये सूज असल्याने त्यांना संबंधाना त्रास होतो त्यामुळे संबंधांचा विचार आला कि त्यांचा मानसिक तणाव वाढतो आणि त्यातून सारखी चिडचिड होते. साहेब म्हणाले याला उपाय काय? मी त्यांना म्हटले कि याला पिंग पोंग इन्फेक्शन म्हणतात यात दोन्ही जोडीदारांना उपचार करावे लागतात अन्यथा एकालाच उपचार केले तर त्याचे इन्फेक्शन बरे होते पण जोडीदारापासून परत इन्फेक्शन होते त्यामुळे मी आता तुम्हा दोघांना एकत्र उपचार करणार आहे. एक आठवडा दोघांनी औषधे घ्या एक आठवडा संबंध ठेवायचे नाहीत आणि त्यानंतर दोघेच परत दुसर्या मधुचंद्रासाठी जा. मी त्यांना म्हटले कि साहेब सोने सुद्धा कितीही शुद्ध असले तरी त्यावर पुटे चढतात परत त्याला झळाळी आणण्यासाठी पॉलिश करावे लागते तसेच नात्याचे आहे.
त्यावर सौ म्हणाल्या डॉक्टर आमच्या दोन्ही मुली आता मोठ्या आहेत आम्ही असे कसे जाऊ? मी त्यांना म्हटले ते कसे जमवायचे ते साहेब ठरवतील परंतु तुम्हाला दोघांना एकमेकांसाठी थोडा वेळ काढणे अतिशय आवश्यक आहे. त्याप्रमाणे साळवे साहेबानी एक आठवड्याने कारवारला एक अधिकृत काम काढले आणि ते दोघे दुसर्या मधुचंद्रासाठी जाऊन आले परत आल्यावर साळवे साहेबांनी मला मुद्दाम फोन करून धन्यवाद दिले आणि सौ च्या तर्फे खास जेवणाचे आमंत्रण दिले.
३) माझ्याकडे संपदा सोनोग्राफी साठी आली होती (वय वर्षे ३५) ते तिच्या ओटीपोटात दुखत होते म्हणून. सोनोग्राफी करताना सुद्धा तिला थोडा त्रास झाला कारण तिच्या गर्भाशयाच्या मागे सूज येउन पाणी झाले असल्याचे दिसत होते. म्हणून मी तिला प्रश्न विचारला कि तुला शरीर संबंध करताना सुद्धा दुखते का? यावर तिने सांगितले कि आमचा शरीर संबंध फारसा झालेला नाही. तिच्या लग्नाला तेरा वर्षे झाली होती. २२ व्या वर्षी लग्न झाले त्यानंतर योनी संकोच( VAGINISMUS) मुळे तिला संबंध सुरु करताच प्रचंड वेदना होत असत त्यामुळे त्यांचा संबंध असा तीन वर्षेपर्यंत झालाच नव्हता.त्यानंतर तिच्या नवर्याला शरीर संबंधात रस उरला नव्हता. अशी पुढची १० वर्षे गेली होती.आश्चर्य असे कि हि गोष्ट त्या दोघांच्या आई वडिलांना पण माहित होती. मला याचा धक्का बसला. संपदाच्या डोळ्यात अश्रू होते.मी तिला सांगितले कि रविवारी सकाळी तुम्ही आपल्या मिस्टरांबरोबर निवांतपणे एका हॉटेलात बसला आहात. आणी वेटर ने गरम गरम केशरयुक्त जिलबी आणली तर? या विचारानेही तुमच्या तोंडाला पाणी सुटले. पण तेच एखाद्या गटाराच्या बाजूला उघड्यावर तळलेली जिलबी कोणी जबरदस्तीने तुमच्या तोंडात कोंबली तर काय होईल? शरीर संबंधाचे असेच आहे. तुम्ही हि गोष्ट समजली पाहिजे. संपदा म्हणाली डॉक्टर मला माझी चूक कळली आहे पण आता माझ्या नवर्यालाच त्यात काही रस राहिला नाही. घरचे लोक आम्हाला डॉक्टरांकडे जायला सांगत आहेत पण मिस्टर आता कुठेही यायला तयार नाहीत. माझे पण वय वाढत आहे. मलाही वेळेत मूल हवे आहे. मी तिला सांगितले कि तुला वाटत असेल तर मी तुझ्या नवर्याशी बोलतो. त्यावर ती तयार झाली आणी तिने त्याला फोन लावला पण तिचा नवरा दवाखान्यात यायला मुळीच तयार नव्हता. मी त्याला बावर्ची हॉटेलात भेटायची तयारी दाखवली पण तो तयार नव्हताच. शेवटी तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात किती शिरू शकता हा एक प्रश्नच असतो. ते दोघे तेरा वर्षे संबंधाशिवाय (नुसतेच शरीर संबंध नव्हेत) कोरडे आयुष्य जगत होते. जसे कल्पवृक्षाच्या खाली राहून उपाशी होते
४) हिरानंदानी रुग्णालयात काम करत असताना रिया माझ्याकडे आली होती तिला नवर्याच्या शुक्राणूंचे रोपण (ARTIFICIAL INSEMINATION) करून मुल हवे होते. तिला एक सहा वर्षाची मुलगी होती. त्यासाठी ती सोनोग्राफी साठी आली होती कि सर्व व्यवस्थित आहे कि नाही ते बघण्यासाठी. मी तिला हसत हसत विचारले कि हे कृत्रिम उपाय का करत आहात? नैसर्गिक आरोपण (NATURAL INSEMINATION) का नाही? त्यावर ती आणी तिचा नवरा म्हणाला कि डॉक्टर आमच्या लग्नाला तेरा वर्षे झाली आहेत पण आमच्यात शरीर संबंध नाहीत. आमची पहिली मुलगी सुद्धा अशीच कृत्रिम शुक्राणू रोपणाने झाली आहे? आता तिला एक भावंड पाहिजे म्हणून आम्ही इथे आलो आहोत. मी त्यांना आश्चर्याने विचारले पण शरीर संबंध का नाहीत काही प्रश्न असेल तर तो आपण सोडवू. त्यावर ते दोघेही म्हणाले डॉक्टर आम्ही दोघे या बद्दल COMFORTABLE आहोत आणी आम्हाला शरीर संबंधात रस नाही. तुम्ही फक्त आम्हाला तेवढीच मदत करा.
५) वर साळवे साहेबांची कथा प्रमाणे एक जोडपे गेल्या आठवड्यात माझ्याकडे आले होते. सौ. भावनाताईना ओटीपोटात दुखत होते, अंगावर पांढरे जात होते आणी पाळी अनियमित झाली होती. मी त्यांना तपासले तर असाच जंतू संसर्ग झाला होता. मी त्यांना संबंधाबद्दल विचारले तेंव्हा वसंतराव म्हणाले कि मी अबुधाबीला असतो त्यामुळे मी दहा महिने नसतोच पण मी जेंव्हा येतो तेंव्हा तिची कधीच संमती नसते. मग मी त्यांना विचारले कि तुमचे संबंध कधी येतात. त्यावर ते काही बोलले नाहीत. तपासणी झाल्यावर मी आणी ते बाहेर आलो आणी भावना ताई आत कपडे बदलत होत्या. एवढ्या वेळात वसंतरावांनी सांगितले डॉक्टर मी आता या प्रकाराला कंटाळलो आहे. प्रत्येक वेळेला मी सुटीवर यायचे आणी हिचे इतके नखरे. ही एक शारीरिक गरज अशी आहे कि ज्यात दोन्ही जोडीदारांची मर्जी हवी. प्रत्येक वेळेला हिची मनधरणी करावी आणी तिने मला झिडकारावे. मला अगदी लाचारासारखे वाटते मी तिथे चार सहा महिने एकटा राहतो जेवणाखाण्य़ापासून सर्व एकट्याने करतो आणी सुटीला इथे परत आलो तर हिची चिडचिड असतेच. मी काय फक्त यांच्यासाठी पैसे मिळवण्याचे मशीन आहे? शेवटी आता मी दोन तीन महिन्यांनी एक बँकोकची ट्रीप करतो. तिथे माझी एक मैत्रीण(!!) आहे. मी तिला अगोदर फोन करतो आणी सगळे ठरवून ठेवतो दोन तीन दिवस अगदी मजेत जातात. मी एवढे पैसे मिळवतो आणी कुटुंबाला पाठवतो तर त्यातील थोडे पैसे स्वतःसाठी खर्च करायचे मला स्वातंत्र्य हवे कि नको? त्यामुळे आता मी परत मुंबईला आलो कि आमच्यात तेवढा ताणतणाव नसतो. मी याच्या वर काही बोलणार तेवढ्यात भावना ताई बाहेर आल्या. त्यामुळे माझे बोलणे थांबले. मी अजूनही विचार करतो आहे कि यात काय बरोबर आहे आणी काय चूक आहे
क्रमशः
प्रतिक्रिया
12 Jan 2014 - 12:29 am | कवितानागेश
हम्म्म.. सेक्स एज्युकेशनची गरज आहे.
वाचतेय
12 Jan 2014 - 1:35 am | खटपट्या
+१
समस्या आहे हे मान्य करणे (जे होत नाही)
मान्य केल्यावर इलाज करणे (जे होत नाही, लाजेमुळे किंवा इतर काही कारणांमुळे)
डॉक्टरकडे गेल्यावर मोकळेपणाने बोलणे (हे सुद्धा होत नाही)
12 Jan 2014 - 4:32 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मुद्ददलात सेक्स एज्युकेशन बद्दल एज्युकेशनची गरज आहे.
12 Jan 2014 - 4:43 pm | टवाळ कार्टा
+१११
12 Jan 2014 - 12:39 am | आयुर्हित
मान्य. सत्यच आहेत ह्या गोष्टी!
छान लेख लिहून एक बंद झालेला/होऊ पाहणारा मार्गच ह्या निमित्ताने पुन: मोकळा करताय आपण.
हे व असे अनेक बदल आपल्या शरीरात होत असतात, यांची जाणीव होणे व त्यांची पूर्ण समीक्षा करणे हे आपल्याच फायद्याचे ठरते.
अगदी मासिकपाळी बंद झाल्यावर(harmonal changes after menopause)होणारी चीड चीड देखील घटस्फोटाला कारणीभूत ठरू शकते.
तसेच अचानक वजन अवास्तव वाढणे हे PCOD/PCOS Polycystic ovary syndrom) ला व नंतर IGT ला.
ज्या ज्या लोकांची अंतिम सत्य शोधण्यासाठी लागणारी तळमळ कमी पडते त्यांना आयुष्यभर दु:खात/नैराश्येच्या गर्तेत खितपत पडावे लागते, हे नक्कीच.
शत शत धन्यवाद.
आपला लाडका: आयुर्हीत
12 Jan 2014 - 10:34 am | पैसा
अशा प्रकारांमागे शारीरिक, भावनिक, मानसिक बरीच कारणं असतात. प्रत्येक जोडपं आपल्या प्रकारे युनिक असतं त्यामुळे एकच उपाय सर्वांना लागू होईल असं नाही. सर्व प्रकारच्या डॉक्टर्संना अशा प्रकारातल्या केसेस वेगवेगळ्या प्रकारे हाताळाव्या लागत असणार. कोणाला मानसोपचार आवश्यक असतील तर कोणाला औषधे किंवा एखादे ऑपरेशन.
अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद!
12 Jan 2014 - 11:48 am | बर्फाळलांडगा
एज्युकेशन मधे सेक्स आवश्यक आहे.
12 Jan 2014 - 2:51 pm | प्यारे१
सुधारणा थोडी.
एज्युकेशन मधे सेक्स थिअरी आवश्यक आहे आणि सेक्स मध्ये एज्युकेशन त्याहून जास्त! :)
12 Jan 2014 - 3:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
एज्युकेशन मधे सेक्स थिअरी आवश्यक आहे
आत्ता ठीक आहे :)12 Jan 2014 - 5:39 pm | बर्फाळलांडगा
शिक्षणात प्रेक्टिकल एप्रोच जास्त महत्वाचा असताना ? ;)
12 Jan 2014 - 3:06 pm | शिल्पा ब
माझा एक रशियन मित्र आहे त्याने एकदा विचारल होतं कि कामसूत्र लिहिणार्यांच्या देशात sex बद्दल असे विचार कसे ?
12 Jan 2014 - 4:28 pm | बॅटमॅन
पुन्हा चर्चा झाली तर सांगा हे ब्रिटिशांचे उपकार म्हणून!
12 Jan 2014 - 4:31 pm | टवाळ कार्टा
म्हणजे १७५० पर्यंत असे नव्हते???
12 Jan 2014 - 4:51 pm | बॅटमॅन
नक्कीच नाही. ब्रिटिश अंमल दृढमूल झाल्यावर त्यांच्या शिक्षणाने प्रभावित झाल्यावरची ही नाटके आहेत. अगोदरही प्रॉब्लेम्स होते पण वेगळ्या प्रकारचे, मुख्यतः मेडिकल सायन्सची प्रगती न झाल्यामुळे असतात तसले होते. सेक्सबद्दलचा अॅटिट्यूड मोकळा होता पुष्कळच. इंग्लंडमध्ये व्हिक्टोरिया राणी सत्तेवर आल्यावर तिकडे ढोंगीपणा सुरू झाला आणि भारतात त्याचे अनुकरण सुरू झाले. सेक्स म्हणजे कैतरी निषिद्ध असा विचार तेव्हापासूनचाच आहे.
अहो साधी उदाहरणे बघा. लग्नपत्रिकांवर शरीरसंबंध योजिला आहे असे ढळढळीतपणे लिहिणारे लोक असा विचार करतील हे संभवत नाही. पेशव्यांच्या कागदपत्रांत उल्लेख सापडतात- एके ठिकाणी सरळ लिहिले आहे की राघोबाबरोबर आनंदीबाई येत होती, तिची पाळी आयत्यावेळेस सुरू झाली म्हणून यायला उशीर झाला. हे इतके ओपनलि होत असेल सर्व तर काय घंटा अडचण होती?
तेव्हाही सेक्स ही एक कला असते इ.इ. गोष्टी जनसामान्यांना कळतच नव्हत्या म्हटले तरी चालेल. तसेही अशा गोष्टी कुठल्याच काळातल्या जनसामान्यांपर्यंत पूर्णपणे झिरपत नाहीत. पण मुळात सेक्स म्हणजे काय अन त्यासंबंधी अॅटिट्यूड कसा असावा हे सर्व ओपन होते. ब्रिटिश अमदानीत ब्रिटिशांचे अनुकरण करून ब्राह्मण बिघडले अन त्यांचं बघून बाकीचे लोकही बिघडले. आत्ता कुठे ओपनपणा येतो आहे.
12 Jan 2014 - 6:27 pm | काकाकाकू
'ओपनपणा' वाचून बटाट्याच्या चालीतला "त्याला एक तर्हेचा परमनंटनेसपणा" आठवला !
12 Jan 2014 - 6:30 pm | बॅटमॅन
हा हा हा ;)
12 Jan 2014 - 6:03 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
जिथे पिकते तिथे विकत नाहि हि मराथि म्हन त्याला थाउक नसावि बडवे म्याडम
12 Jan 2014 - 6:24 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मग काय उत्तर दिलेत?
12 Jan 2014 - 4:50 pm | वेताळ
शाळेच्या पुस्तकासोबत कामसुत्र देत नाहीत.सेक्स बद्दल आपली माहिती म्हणजे ब्लू फिल्म बघणे आणि त्यातल्या मॉडेलच्या स्टेमिना बद्दल बोलणे ,आपण पण तसे करण्याचा प्रयत्न करणे. त्यामुळे निकोप शारिरीक संबध रहात नाहीत. जोडीदार एकमेकांना समजण्या आधी एकदुसर्याचे वैगुन्य अगोदर शोधुन काढतात.
लोकजाग्रुती,शाळेत मुलाना लैगिंक शिक्षण देणे असे उपाय करुन हे आटोक्यात येवु शकेल.
12 Jan 2014 - 5:12 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
ओपनपणा :-P
13 Jan 2014 - 4:44 am | रेवती
शाळेच्या अभ्यासक्रमात यायला हवाच असा 'विषय'.
हामेरिकन शाळांमध्ये हे शिक्षण ;) मुलाला सुरु झालेले आहे. संपूर्ण वर्षभर नसते पण काही अठवडे असते. भारतातही अनेक शाळांमध्ये असते, निदान माझ्या शाळेत तरी होते. त्यांनी सांगितलेल्या माहितीमधील कोणताही प्रकार झाला नाही असे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशा आशयाची लेक्चर्स होती कारण आम्ही दहाव्या यत्तेत होतो पण त्यावेळच्या सरकारच्या सर्वेक्षणानुसार अगदी चांगल्या म्हणवणार्या शाळांमधील अनेक मुलींची लग्ने दहावीनंतर होत किंवा शिक्षण बंद होत असे म्हणून कुटुंब कल्याण आयोगाकडून हा प्रयत्न झाला होता असे वाटते.