तांबडा-पांढरा व्हाया स्ट्रॉबेरी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
31 Dec 2013 - 7:44 am

बरेच महिन्यांपासून एका मोठ्या ब्रेकच्या प्रतिक्षेत होतो. कामाच्या वाढ्त्या मापामुळे तो ब्रेक घेणं जमत नव्हतं. मग शेवटी वेळ मिळालाच. कुठे जायचं हा एकच प्रश्न होता. गोवा म्हणावं तर क्रिसमस चा काळ, म्हणजे मुंबईच नाही तर देशभरातून तिथे गर्दीचे लोंढे आलेले असणार, मग कलकलाटापासून लांब जाणं होणारच नाही, त्यामुळे गोवा बाद. कोकणात जाणं शक्य होतं, पण ते इतर वेळी होतच राहतं. मग कुठे? क... कोल्हापूर ! असं लई भारी डेस्टिनेशन सुचलं, शिक्कामोर्तब झालं. कसं जायचं हे आधीच फिक्स होतं.....

1

मी, बायको आणि एक बॅग असे गाडीत बसलो, आणि स्टार्टर दिला. ऐरोली पास करत असताना मला कुणीतरी नावाने हाक मारली. काचा जराशा खाली केल्या होत्या त्यामुळे ती खणखणीत ऐकूही आली. गाडी बाजूला घेतो तर माझा मित्र, ज्याला मी दोन वर्ष भेटलो नव्हतो, मला हात करत होता. हातात एक बॅग होती. मी विचारलं, ‘कुठे जातोयस? इथे कसा?’ ‘अरे पुण्याला चाललोय परत, शनिवार रविवार इथे आलो होतो. आणि इथे...’ बंद पडलेल्या हिरकणी (म्हणजे एशटी चा एक अवतार) कडे हात दाखवत तो म्हणाला. ’चल म्हटलं चायला कुठे तिष्ठत बसलायस, बरं झालं हाक मारलीस आणि मुख्य म्हणजे ओळखलंस एवढ्या चटकन.’ गप्पांचा स्टॉक इतका होता की पुणं कधी आलं कळलंच नाही. त्याला पुण्याला सोडून पुढे निघालो.

4

महाबळेश्वर उजवीकडे ५२ किमी असा बोर्ड बघितला. लोचन टू लोचन कम्युनिकेशन अ‍ॅण्ड अनुमोदन झालं; आणि मी गाडी उजवीकडे वळवली. आमच्या ट्रिप मधे हा डी-टुअर होता. वाईला गणपतीचं दर्शन घेऊन पुढे महाबळेश्वर ला निघालो. मॅप्रो चं सॅंडविच खायची बायकोला जबर इच्छा झाली, मग मॅप्रोलाच जेवण केलं आणि महाबळेश्वरास एका चांगल्याशा हॉटेलात जाऊन थडकलो. दोन तास वामकुक्षी घेऊन मार्केट मधे फेरफटका करायला बाहेर पडलो. मार्केट फुल्ल गर्दीने भरलेलं होत. पण रंगीबेरंगी स्कार्फ, स्वेटर बघताना मजा येत होती. मक्याचे दाणे, स्ट्रॉबेरी, चरत होतो, फिरत होतो. महाबळेश्वर मधली एक सुपर संध्याकाळ सरत होती.

2

3

5

6

7

दुस-या दिवशी ९ वाजता, म्हणजे भल्या पहाटे आम्ही वेण्णा लेकला आलो. थं..ड वारा सुटला होता. पण तरीही स्वेटर घालायचा नव्हता. ती थंडी गरम पोहे आणि चहानेच पळवायची होती. इथे आश्चर्य म्हणजे चहा पोहे मिळायला खूप चालावं लागलं. कारण प्रत्येक स्टॉलवर पावभाजी, डोसा, पॅटिस, सॅंडविच, असेच पदार्थ मिळत होते. एका इसमाने तर चक्क सांगितलं आम्हाला, ‘इदर पोहा उपमा कही नही मिलेगा आपको’. मला मी महाराष्ट्रात आहे का ही शंका वाटायला लागली. पण मग काही फर्लांग आणखी पायपीट केल्यावर एका मावशींची गाडी दिसली, ज्यावर चहा पोहे मिसळ असे पदार्थ मिळत होते. बोटिंग च्या बरोब्बर समोर ती गाडी असते. मग काय विचारता.... आहाहा! काय पोहे, काय तो आलं वाला दणदणीत चहा! खूश; खूप खूश झालो! वा!

8

9

10

11

पुढे पॉईंट वगैरे बघण्यात आम्हाला काही पॉईंट वाटत नव्हता; त्यामुळे आम्ही महाबळेश्वर सातारा मार्गावरून गाडी सोडली. झाडांची कमान सतत येऊन जाऊन असलेला मेढा घाटातून जाणारा हा रस्ता इतका उत्तम आहे म्हणून सांगू ! की असाच तो चालू रहावा असं वाटत होतं. पण अवघा ५० किलोमीटरचाच तो होता. पुढे साता-यात शिरलो; आणि जेवायला वेळ होता, त्यामुळे किल्ले अजिंक्यतारा कडे कूच केलं. उन डोक्यावर आलं होतं खरं; पण तरीही तो बुलंद दरवाजा, त्या सुरेख पाय-या, देऊळ, पडका वाडा बघत आम्ही गडाच्या एका कडेवर आलो. खाली सरळसोट जाणारा कातळ; ज्यावर नजर ठरत नव्हती. इथून नजरेच्या टप्प्याला आव्हान देणारा परिसर दिसत होता. लांबच लांब पसरलेली, पुढे धूसर होत गेलेली शेतं, गावं बघत तिथे उभं राहिलो. घामाच्या चार धारा कपाळावरून ओघळत होत्या आणि त्यातच एक गार वा-याची झुळूक येऊन त्या उन्हातही आम्हाला थंड्ड करून जात होती. हा कॉन्ट्रास्ट काही वेळ अनुभवला; तिथली ती शांतता मनात भरायचा प्रयत्न केला आणि पुन्हा साता-यात उतरलो.

12

13

कंदी पेढे, कलाकंद (कुंदा) खरेदी झाली आणि मग कोल्हापूर ची वाट धरली. बॅक टू एन एच फोर. कोल्हापूर च्या वाटेवर कोल्हापूर पासून ३२ किमी वर साई मंगलम नावाचं एक छान हॉटेल आहे. नाश्ता, जेवण, करायला मी नक्की सुचवेन. तिथे फिल्टर कॉफी मारून आम्ही कोल्हापुरात दाखल झालो. क्रिसमस निमित्त इथेही गर्दी होती आणि हॉटेलं फुल होती. तरी, एका ओळखीच्या व्यक्तीने आम्हाला काही हॉटेल्स सुचवली होती, ती चेक करून शेवटी ताराराणी चौकात यात्री निवास मध्ये मुक्काम ठोकला. रात्री जेवायला भेळ हाच मेनू ठेवावा असं डोक्यात आलं. कोल्हापुरात येण्याचं एक मुख्य कारण हेच तर होतं; खादाडी, जिभेचे चोचले. मग मायबोली.कॉम वरील एका धाग्याचा जो रिसर्च केला होता, त्या आधारे राजाभाऊंची ऑल इंडिया स्पेशल भेळ शोधत निघालो. पण दुर्दैवाने राजाभाऊ भेळ बंद होती. ‘राजाभाऊंची तब्येत बरी नाहीये, त्यांना हॉस्पिटल मधे अ‍ॅडमिट केलंय’ असं अगदी कळकळीने एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं. ठीक तर मग; शोधत शोधत रंकाळ्याला पोचलो, तिथे प्रति राजाभाऊंची, म्हणजे राजाभाऊ असं लिहीलेल्या एका गाडीवरची भेळ चाखली. पोट भरलं नाही. मग स्टँड जवळ गोकुळ हॉटेल मधे भरलं वांगं आणि भाकरीने ती कसर भरून काढली.

14

दुस-या दिवशीचा मेनू आदल्या दिवशीच फिक्स केला होता. चलो फडतरे ! चा नारा लावला, आणि फडतरे मिसळ सेंटर च्या दारात रांग लावली. मिसळीसाठी रांगा लागणं, आणि मिसळीच्या पंगती उठणं मी पहिल्यांदा बघत होतो. फार मजा येत होती. माझ्या बायकोला मिसळीच्या तिखट असण्याचं भय होतं. पण तरीही तिखट असेल तर ती तू खायची अशा अटीवर ती आली. आम्ही पंगतीला बसलो. एक भाऊ आले, सगळ्यांच्या ऑर्डर घेऊन गेले. मग ताटं मांडली, मिसळीची भाजी वाढली, मग कट आणला, मग पाव. आणि आम्ही हर हर महादेव करून मिसळीचा घास घेतला. कोल्हापुरी च्या नावाखाली इतरत्र जो जाळ तुमच्या पानात वाढला जातो, त्या संकल्पनेला संपूर्णपणे तडा देणारी ही चविष्ट मिसळ होती. उसळ, त्यात जरासं दही, जरासं फरसाण असलेली ही मिसळ गोडसर अशा त्या स्लाईस ब्रेडबरोबर अजूनच भारी लागत होती. तिचा आस्वाद आम्ही दोघांनीही पुरेपूर घेतला. इथे अनलिमिटेड पातळ भाजी आणि कट तुम्हाला वाढला जातो, ही विशेष बाब आहे. थोडी मिसळ खाऊन झाल्यावर मग मी त्यात आणखी थोडा कट मिसळला. त्या मसालेदारपणामुळे मिसळीची चव अजून वाढली. या मिसळीत काय वेगळं आहे असं विचाराल तर नेमकं सांगता येणार नाही, पण तरीही ती वेगळी आहे हे नक्की. तृप्त झालो आणि तिथून निघालो. कोल्हापुरात जाल तर फडतरे मिसळ चाखाच असं मी प्रत्येकाला सांगेन. इतरही फेमस मिसळ मिळणारी ठिकाणं आहेत, पण हे भारी आहे.

15

16

कणेरी मठ हे आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं. कोल्हापूर पासून २० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. इथे सिद्धगिरी महाराजांचा मठ आहे, आणि मातीच्या मूर्तींमधून आपले ऋषिमुनी, महर्षी, आणि तसंच गावातील वेगवेगळी मंडळी, त्यांचे व्यवसाय, गावातील घरं, उत्सव यांच दर्शन घडवणारं एक म्युझियम आहे. इथल्या मातीच्या कलाकृती इतक्या उत्तम आहेत की त्यांचं वर्णन करणं कठीण आहे. सूक्ष्मात सूक्ष्म गोष्टी या मूर्तींमधे जिवंत केलेल्या आहेत. विटीदांडू खेळ्णा-या मुलाचा हवेत उडलेला शर्ट, रथ ओढणा-या माणसाच्या चेह-यावरील आवेश, मुलाला घेऊन जत्रेत फिरणा-या आईच्या चेह-यावरचं समाधान, जात्यावर दळण दळताना ओव्या म्हणणा-या स्त्रीच्या चेह-यावरील भाव, सगळं निव्वळ कमाल आहे. फोटोग्राफीची परवानगी नसल्याने फोटो मात्र नाहीयेत, पण प्रत्यक्षच बघावी अशी ती गोष्ट आहे.

17

तिथे फिरायला ३-४ तास लागले. मग परत कोल्हापुरात आलो. चप्पल गल्ली ची वाट धरली. कोल्हापुरी चपलांची खरेदी करणं मस्टच होतं. ती झाली, आणि मग खरी मजा करायचा समय आला. माझ्यासाठी. माझ्यासाठी असं म्हणण्याचं कारण माझी बायको शुद्ध-शाकाहारी आहे. (फार दु:खाची बाब) मग काय, आम्ही तांबडा पांढ-यासाठी प्रसिद्ध अशा ओपल हॉटेलला गेलो. एका टेबलावर सुरक्षित अंतर ठेवून बसलो. आणि मी ऑर्डर दिली.... एक तांबडा पांढरा - स्मॉल. वेटर माझ्याकडे प्रश्नचिन्ह घेऊन बघत उभा राहिला. ‘...मग... मटण नको???’ असा प्रश्न आला. मी तांबडा पांढरा प्रकरण पहिल्यांदाच खात होतो, त्यामुळे ते कसं कशाशी खातात मला काहीही माहित नव्हतं. ‘हवं ना! म्हणजे काय!’ मी चूक सारवून घेत म्हटलं; जणु हा प्रश्नच उद्भवत नाही अशा सुरात. ‘बर. मग एक मटण मसाला, एक तांबडा पांढरा छोटी वाटी आणि चपाती... बरोबर?’ त्याने विचारलं. ‘हो’ उत्साहपूर्वक हातावर हात चोळत मी म्हटलं. पुढे ऑर्डर आली, मी त्या नवीनच चाखलेल्या पण प्रथमानुभवातच माझ्या मनाचा थेट वेध घेतलेल्या चवीत रममाण होतो, बाकी काहीच मला ठाउक नाही.

18

19

तांबडया-पांढ-या रश्श्याच्या त्या मंत्रमुग्धतेत दुसरा दिवस कधी उजाडला कळलंच नाही. सकाळी सकाळी मी एकटाच गंगावेशीत पोचलो. निरसं दूध प्यायचं होतं. तिथे सकाळची लगबग चालू होती. फळवाले आपापल्या गाड्या लावत होते. जुन्या धाटणीच्या घरांच्या खिडक्या हळू हळू उघडत होत्या. दुकानांसमोर झाडलोट चालू होती, कुणी स्कूटर तर कुणी सायकल घेऊन दूध न्यायला येत होतं. कोप-यावरच्या गोठ्यातल्या शेणाचा मंद सुगंध तिथल्या परिसरात दरवळत होता. ते ग्लासभर अमृत प्यायलं आणि मी हॉटेलवर परत आलो. नाश्ता केला. आता आम्हाला पन्हाळा गाठायचा होता. कोल्हापुरातून बाहेर पडलो आणि लांबच लांब शेतजमिनी दिसायला लागल्या. पुढे काही वेळाने सकाळच्या धूसरशा क्षितिजावर डोंगर उगवत गेले आणि आम्ही गाडीने वर थेट चार दरवाज्यातून पन्हाळ्यावर जाऊन पोचलो. तिथे एक गाईड केला, कारण परिसर फार मोठा होता, आणि चुकत चुकत शोधाशोध करायला हा माझा ट्रेक नव्हता. पन्हाळा हे महाराष्ट्रातलं नंबर तीन चं थंड हवेचं ठिकाण आहे - इति गाईड. ‘कसं काय?’ हे मी विचारणार इतक्यात त्याच्या या वक्तव्याचा आधार आम्हाला त्याने सांगितला. की, लोणावळा खंडाळा कोल्हापुरचा पन्हाळा....कुठे कुठे जायाचं हनमुन ला. असं दादा कोंडकेच्या गाण्यात बरं का, त्याने म्हटलंय. म्हणजे म्हणून नंबर तीन....हसू जबरदस्त आवळत मी ‘हं’ म्हटलं. एवढं एक आणि त्याचं सतत ‘या... तुमचा इथं फोटो काढतो’ म्हणत माझा कॅमेरा हाताळणं सोडलं तर मला काहीही खटकत नव्हतं. दोन तास इतिहासाचं ते वैभव बघून, ऐकून आम्ही स्तिमित झालो होतो. त्यातच तिथली ती हॉटेलं, आणि ते बंगले बघून दु:खीही. पण त्याकडे दुर्लक्ष केलं, बाजीप्रभूंच्या त्या विशाल पुतळ्याला, शिवा काशिद च्या पुतळ्याला वंदन केलं आणि कोल्हापुरात परतलो.

20

21

22

23

24

मग नवीन पॅलेस बघायला गेलो. ग्रॅंड्युअर... एकच शब्द मला सुचत होता. शान होती ती या लोकांची. बाकी आजकालची श्रीमंती फुसकी वाटते यापुढे. ती दालनं, त्या तलवारी, ते नजराणे, पदकं, ढाली, शिकार केलेले प्राणी, महाल, चांदीच्या कैक वस्तू, सगळं आम्ही आ वासून बघत होतो. ‘आई... शाउ महाराजांचं घर इतकं मोठ्ठं कसं??’ तिथे आलेल्या एका लहान मुलाने त्याच्या आईला प्रश्न केला. नेमका हाच्च प्रश्न नंतर बराच काळ मला पडला होता.

25

26

27
...जनरेशन्स...

28

त्यानंतर पन्हाळा-रंकाळा यमक जुळवलं. निवांत फेरफटका मारत बसलो, घारींची शिकार न्याहाळत बसलो, रंकाळ्याचा सूर्यास्त कॅमेरात टिपला, आणि हॉटेलवर परत आलो. कोल्हापुरात शाकाहारी जेवायचं असेल तर स्टॅंड च्या जवळ कावळा नाक्याकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर हॉटेल राजपुरुष मस्त आहे बरं का. हमखास आवडण्यासारखं आहे. तिथे कोल्हापुरातलं शेवटचं ‘डिनर’ केलं. मेथी-बेसन, अख्खा मसूर विथ भाकरी. एकदम यो! बेत झाला.

दुस-या दिवशी सकाळी महालक्ष्मी देऊळ गाठलं. देवीचा आशिर्वाद घेऊन परत निघालो. एन एच फोर अगेन. मख्खन रस्ता. ड्रायव्हिंग ची पुरेपूर मजा घेत आम्ही किमी वर किमी कापत होतो. सूर्य अस्ताला यायला लागला होता. हॉर्न चा ठणाणा बंद काचांमधूनही आम्हाला त्रास द्यायला लागला होता. ओव्हरटेक करून जाताना उगाचच लोकं गाडीकडे बघून डोळे वटारायला लागली होती. मुंबईची वेस आम्ही ओलांडली होती.

-------------------------------------------------------
तळटीपः कोल्हापूर खादाडी विषयक अगदी सविस्तर आणि पुरेशी माहिती माबो सोडून इतर कुठेही मिळाली नाही. मिपावर असा एखादा धागा म्हणा, किंवा एखादा डेटाबेस तयार झाला तर उपयोगी ठरेल.
-------------------------------------------------------

प्रतिक्रिया

छान वर्णन. मिपावर कोल्हापूर खादाडीबाबत धागा वाचल्याचे आठवते आहे.

स्पा's picture

31 Dec 2013 - 8:56 am | स्पा

झकास भटकंती केलीस रे :-)

ब़जरबट्टू's picture

31 Dec 2013 - 9:08 am | ब़जरबट्टू

एवढ फिरलाय.. थोडे फोटो टाका की राव... अजुन रंगत येते...

वेल्लाभट's picture

31 Dec 2013 - 9:13 am | वेल्लाभट

लोड होत नाहीयेत का?

प्रचेतस's picture

31 Dec 2013 - 9:16 am | प्रचेतस

छान लिहिलंय एकदम.
फोटो पण सुरेख.

मस्त लिहिलं आहे आणि फोटोही मस्त!

वासु's picture

31 Dec 2013 - 10:04 am | वासु

छान वाटल वाचुन.... कधी एकदा जाऊ अस झालय.

प्रभाकर पेठकर's picture

31 Dec 2013 - 10:21 am | प्रभाकर पेठकर

ह्या इथे परदेशात राहून आम्ही काय काय 'मिस' करतोय हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं. वर्णन अगदी प्रवाही आणि झणझणीत झालं आहे. महाबळेश्वर, पन्हाळा, फडतरे इत्यादी आधीही अनुभवले आहे. पण हे असे दिलखेचक वर्णन वाचल्यावर 'च्यायला, आपण कांहीच पाहिलं नाही' असं वाटून गेलं.

फडतरेंच्या मिसळीला मटणाच्या रश्श्याची चव आहे. ते मिसळीत मटणाचा स्टॉक वापरतात असा माझा दाट संशय (आणि खात्री) आहे. शिवाय कोल्हापुरी मसाला हा तिखट कमी आणि चविष्ट जास्त असतो.

त्रिवेणी's picture

31 Dec 2013 - 10:29 am | त्रिवेणी

महाबळेश्वरच्या हॉटेल बद्दल थोडी डीटेल माहिती द्या ना?
म्हणजे कोणते हॉटेल, स्वचता(हा शब्द कसा लिहायचा). आणि गरम पाणी 24 तास होते का? कारण मध्ये एकदा महाबळेश्वर, माथेरान मधील हॉटेल सर्च करताना मिळालेल्या माहितीत गरम पाणी फक्त सकाळीच available होते.
धन्यवाद

वेल्लाभट's picture

31 Dec 2013 - 10:42 am | वेल्लाभट

http://www.hoteluday.com/
स्वच्छता - s v a c C h a t a a असं लिहावं.
गरम पाणी होतं २४ तास. आम्ही ते सकाळीच वापरलं, त्यामुळे खरंच ते २४ तास available होतं का हे सांगणं कठीण आहे. :) गमतीचा भाग. पण खरंच.

छान हॉटेल आहे, व्ह्यू मस्त आहे, गार्डन आहे, पार्किंग मुबलक.
खोली, ३०००-६००० या रेंज मधे मिळते. दोन प्रकार आहेत, एक खोली, आणि दुसरं म्हणजे कॉटेज. कॉटेज अर्थात, महाग आहेत.
पण सुरेख वाटलं हॉटेल आम्हाला. एक तर सेक्ल्यूडेड आहे जरासं, त्यामुळे शांतता आहे. ते मला जास्त आवडलं.

त्रिवेणी's picture

31 Dec 2013 - 11:01 am | त्रिवेणी

खुप खुप धन्यवाद.
कोल्हापुरचे फोटो बघुन लगेच जावेसे वाटायला लागले आहे. आम्ही गेलो त्यावेळी मठ पहायचे राहुन गेले आता यावेळी नक्की. मागच्या जानेवारीत आम्ही गेलो तेव्हा हॉटेल बुकिंग न करताच गेलो, पण नेमके लग्नाचे वर्‍हाड हॉटेल ओपेल मध्ये थांबल्याने कावळा नाक्यावरील हॉटेल अयोध्या(?) थांबलो. चांगले होते ते पण.

प्रभाकर पेठकर's picture

1 Jan 2014 - 3:45 am | प्रभाकर पेठकर

>>>>स्वच्छता - s v a c C h a t a a असं लिहावं.

s v a c h c h h a t a a असही लिहीता येतं.

सविता००१'s picture

31 Dec 2013 - 10:34 am | सविता००१

आणि लिखाण

अमेय६३७७'s picture

31 Dec 2013 - 10:41 am | अमेय६३७७

मीही गेले काही दिवस सुट्टीवर आहे आणि कोल्हापुरात हे सगळे अनुभवतो आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. फोटोज तर अप्रतिम हा शब्दही कमी पडेल असे चांगले आलेत.
यावेळी आतापर्यंत जिथे खाल्लेले नाही अशी हॉटेले शोधण्यावर भर होता. बिन्दू चौकातील पार्किंगमध्ये कोल्हापुरी नावाचे प्युअर नॉनवेज हॉटेल सापडले. बेफाट थाळी होती.

27 to 31 Dec 13 fotoj

सौंदाळा's picture

31 Dec 2013 - 10:42 am | सौंदाळा

मस्त वर्णन आणि फोटो.
जरा हटके सहल केल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
कोल्हापुरात सवडीने फिरणे झालच नाही कधी. तुमचा अनुभव उपयोगी पडेल.

सूड's picture

31 Dec 2013 - 11:25 am | सूड

फोटो झकासच !!

>>मिपावर असा एखादा धागा म्हणा, किंवा एखादा डेटाबेस तयार झाला तर उपयोगी ठरेल.

हे म्हणजे सदाशिवात लोक आपल्याशी सौजन्याने वागतील किंवा रत्नांग्रीत आपल्याशी कोणी खवचट्पणाने/ तिरकसपणाने बोलणार नाहीत अशी अपेक्षा करण्यासारखे झाले. प्रयत्न करुन बघा एकदा, रोगापेक्षा औषध भयानक नाय निघालं तर डुआयडी घेईन !! ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Dec 2013 - 11:32 am | डॉ सुहास म्हात्रे

लेख मस्त ! फोटो दिसत नाहीत... गणेशा का काय म्हणतात तो झालाय ! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

31 Dec 2013 - 11:43 am | अत्रुप्त आत्मा

जब्बरदस्त रहो वेल ला भट! मज्जा मज्जा आली फोटू पाहून! :)

आणी शाहू पॅलेस मधल्या "त्या" अठवणी जाग्या जाहल्या! ( अगोबा =)) )

>>शाहू पॅलेस मधल्या "त्या" अठवणी जाग्या जाहल्या! ( अगोबा )

आयला!! काय सांगता काय !! *JOKINGLY*

अत्रुप्त आत्मा's picture

31 Dec 2013 - 1:25 pm | अत्रुप्त आत्मा

@ काय सांगता काय !! >>> अपेक्षित प्रतिसाद! धन्यवाद!

कवितानागेश's picture

31 Dec 2013 - 11:59 am | कवितानागेश

मस्त धागा.
पन्हाळा देखिल रहाण्यासारखं आहे. एसटी स्टँड्जवळच्या १-२ खानावळी चांगल्या आहेत.
आम्ही ३ दिवस राहून तिन्ही दिवस तबक उद्यानातून उतरुन पूर्ण गडावर पायी फिरलो होतो. सकाळी लवकर गेले तर खूप छान छान पक्षी दिसतात तिथे.
मिसळीचं वर्णन वाचून धीर आलाय मला. पुढच्या वेळेस कोल्हापूरात फडतरेमध्ये जाईन नक्की.

दिपक.कुवेत's picture

31 Dec 2013 - 12:16 pm | दिपक.कुवेत

हे भारतातले असे भटकंती धागे वाचले ना कि काहि सुचत नाहि. जायची ईच्छा प्रचंड प्रबळ होते. त्या तिसर्‍या फोटोत जो माणुस सँडविच तयार करतोय ते जंम्बो आहे का? पण मिसळि बरोबर स्लाईस ब्रेड देतात ते काय पटत नाहि ब्वाँ. मिसळिची खरी मजा तर लादि पावाबरोबर येते. त्यातुन लादिपाव गरमागरम असतील तर चार चाँद लागतात.

दिपक.कुवेत's picture

31 Dec 2013 - 12:18 pm | दिपक.कुवेत

धाग्याचं शीर्षक खुप आवडलं.....एकदम हटके!

सस्नेह's picture

31 Dec 2013 - 12:39 pm | सस्नेह

आमचं कोल्लापूर यवढं भारी हाय ?
आणि एकदा प्रेमात पडले कोल्हापूरच्या !

अनिरुद्ध प's picture

31 Dec 2013 - 1:02 pm | अनिरुद्ध प

उत्तम प्रकाशचित्रे,(वेल्लाभट भाय फोटा बहु सरस कलमकारी साथे)

मुक्त विहारि's picture

31 Dec 2013 - 1:51 pm | मुक्त विहारि

आवडले

आमच्या परगण्यात गेला होतात ???
वा वा वा!
जस्ट लव्ह माय वाई, पाचगणी, महाबळेश्वर

बॅटमॅन's picture

31 Dec 2013 - 1:59 pm | बॅटमॅन

माझा झालाय गणेशा पण वर्णन आवडले.

अवांतर: वर्णन हा शब्द ऐकला की लहानपणी वरणभात खायची इच्छा होत असे त्याची आत्ता उगीचच आठवण झाली.

मोदक's picture

31 Dec 2013 - 2:00 pm | मोदक

उत्तम फोटो आणि वर्णन!

राजाभाऊंची खरी भेळ खासबाग मैदानाजवळच मिळेल - बाकीचे विक्रेते कै च्या कै माहिती सांगतात. (अर्थात राजाभाऊंचे वय भरपूर असल्याने तुम्हाला दिलेली माहिती खरी असण्याचीही शक्यता आहे)

मिसळीबाबत सहमत.. ती एक मटणाचा रस्सा घातलेली मिसळ कुठे मिळते ते सांगा राव.. लै शोधतो आहे.

तसेच.. कुंदा वेगळा आणि कलाकंद वेगळा.

पांथस्थ's picture

6 Jan 2014 - 6:47 pm | पांथस्थ

बातमी दुर्दैवाने खरी निघाली - कोल्हापूर : राजाभाऊ भेळवाले यांचे निधन

बॅटमॅन's picture

6 Jan 2014 - 7:08 pm | बॅटमॅन

आयला....ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.

(कोल्लाप्रात राजाभौंची भेळ खाण्याचे भाग्य लाभलेला) बट्टमण्ण.

भवानी मंडपातल्या भाउंच्या भेळीची आठवण येतेय..
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो..

कुसुमावती's picture

9 Jan 2014 - 2:44 pm | कुसुमावती

कोल्हापुरकरांसाठी भेळ म्ह्णजे फक्त राजाभाऊंचीच.

मृतात्म्यास शांती लाभो.

कपिलमुनी's picture

6 Jan 2014 - 7:36 pm | कपिलमुनी

मटणाचा रस्सा घातलेली मिसळ कुठे मिळते ते सांगा राव

बालेवाडी फाट्याला ..बाणेर येथे अशी मिसळ मिळते ..

पण फार ऑथेंटिक वाटली नाही ..

आनंदराव's picture

31 Dec 2013 - 5:22 pm | आनंदराव

कचकचीत लेख. तुमच्यामुळे कोल्हापुरात एवधे खाण्यासारखे आहे हे माहित न्व्हते. झाकास !

यसवायजी's picture

31 Dec 2013 - 6:44 pm | यसवायजी

मिसळीचा फटु १ लंबर आलाय..

वेल्लाभट's picture

31 Dec 2013 - 9:21 pm | वेल्लाभट

आभार
यसवायजी, प्यारे, आनंद, मोदक, बॅटमॅन, अनिरुद्ध, स्नेहांकिता, दीपक, लीमाउजेट, आत्मा, एक्का, सूड, सौंदाळा, अमेय, सविता, त्रिवेणी,
सगळ्यांचे आभार...

काय गोड फोटू आलेत! वर्णनही भारी.
लोचन टू लोचन कम्युनिकेशन वगैरे भारीच!

खेडूत's picture

1 Jan 2014 - 3:02 am | खेडूत

आवडले!

काय एवढं चांगलं हाय कुल्हापुर ?
जातोच आता .
फोटो छान आणि वर्णनपण .

पण रंगीबेरंगी स्कार्फ, स्वेटर बघताना मजा येत होती.

सुबोध खरे's picture

1 Jan 2014 - 11:46 am | सुबोध खरे

वेल्लाभट ,
आपण आम्हाला अगदी छान सैर करवून आणलीत. सर्व ठिकाणे परत एकदा भेटल्याचा आनंद मिळाला. कोल्हापुरात १९९५ पासून दर दोन तीन वर्षांनी जातो आहे. सर्वप्रथम लष्कराच्या भरतीसाठी(पुण्याहून) गेलो आणि त्या शहराच्या प्रेमात पडलो.इतके कि लष्कर सोडल्यावर इथेच स्थयिक व्हावे असे वाटत होते. एखादे टुमदार मोठे गाव किंवा लहान शहर असे होते. साधी सरळ आणि प्रेमळ माणसे भेटली. खाद्यसंस्कृती बद्दल काय म्हणावे. गेल्या वर्षी परत गेलो होतो. परंतु गेल्या काही वर्षात शहर आपले वैशिष्ट्य घालवू लागले आहे असे जाणवत आहे. (बाजारीकरण चढत्या भाजणीने वाढत गेले आणि माणसांचे पण व्यापारीकरण.) मलाच इतके वाईट वाटत आहे तर कोल्हापूरच्या मूळ निवासी लोकांना काय वाटत असेल?
हीच अवस्था महाबळेश्वरची इयत्ता चौथी मध्ये प्रथम शाळेची सहल गेली होती तेंव्हा पासून असंख्य वेळा गेलो आहे आणि जात आहे. आता सुटीचे दिवस सोडून जातो तरीही गर्दी असतेच.
असो.
उत्तम लेख आणि उत्तम फोटो. असेच आनंद यात्री रहा, लिहिते रहा
धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

1 Jan 2014 - 3:35 pm | प्रभाकर पेठकर

>>>>आता सुटीचे दिवस सोडून जातो तरीही गर्दी असतेच.

महाबळेश्वरच्या तोडीची, डोंगरमाथ्यावरील, ४-५ पर्यटनस्थळे, सरकारी पर्यटनखात्याने, महाराष्ट्रात निर्माण करण्याची नितांत गरज आहे. प्रसंगी (कांही अटी घालून) त्याचे खाजगीकरण केले तरी हरकत नसावी.

सौंदाळा's picture

1 Jan 2014 - 4:15 pm | सौंदाळा

+१
सहमत.
आंबोली एकच बर्‍यापैकी डेव्हलप झाले आहे. गगनबावडा, फोंडाघाट रादर पश्चिम महाराष्ट्रातुन कोकणात उतरणारे सगळेच घाट (ताम्हीणी, वरंधा, कुंभार्ली, आंबेनळी आणि कशेडी पण मस्त डेव्हलप होऊ शकतात)

लवासा हे ठिकाण देखील डॅव्हलप केले आहेच की!

वेल्लाभट's picture

4 Jan 2014 - 10:39 am | वेल्लाभट

येस... धन्यवाद....

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Jan 2014 - 4:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

चिखलदरा

भंडारदरा

तोरणमाळ

ग्रेटथिन्कर's picture

1 Jan 2014 - 9:36 pm | ग्रेटथिन्कर

दावणगिरी लोणी डोसा खाल्ला नाही? त्याची सध्या कोल्हापुरात क्रेझ आहे.
स्टॅण्डच्या पाठीमागे मिसळीची हॉटेले आहेत, तिथे मिसळ चांगली मिळाली होती.अस्सल कोल्हापूरी .
सोलंकी कोल्ड्रींग वगैरे मिसलत .
खरा अस्सल तांबडा पांढरा खायचा असेल तर राजारामपुरीत हॉटेल निलेश म्हणून आहे तिथे जा , पन्हाळ्यावरही अस्सल तांबडा पांढरा मिळतो.

चांगला तांबडा-पांढरा पद्मा गेष्ट हौस नामक हाटलातही मिळतो. उर्मिला व सरस्वती थेटराजवळ हे हाटेल आहे. थाळी उत्तम असते.

राजारामपूरी ११ (की १३ व्या?) व्या गल्लीत "गजाली" नामक मासेखाऊंसाठीचे ठिकाण आहे. (या गजालीचा आणि मुंबईच्या गजालीचा काही संबंध नाही!)

तेथे सुरमई, कोळंबी हाणावी आणि जवळच राजाबाळ पान मंदिर - तेथे वाळा फ्लेवरचे हैद्राबादी मसाला पान चेपावे.

धन्यवाद, वामन सोडून हे अजूनेक नाव कळाले. जाईन तेव्हा खाईनच!!!

वेल्लाभट's picture

4 Jan 2014 - 10:43 am | वेल्लाभट

नाही खाल्ला... समहाऊ त्याच्या अनेक पाट्या बघूनही नाही खाल्ला. पुढच्या ट्र्रिप ला. बाकी बरीच हॉटेलं समोर आलेलीच आहेत आता.. त्यामुळे पुढच्या ट्रिपची चेकलिस्ट बनवून ठेवायला हरकत नाही.

संजय क्षीरसागर's picture

2 Jan 2014 - 12:08 am | संजय क्षीरसागर

अपूर्व-सुरेख सहल झालीये.

कपिलमुनी's picture

3 Jan 2014 - 3:57 pm | कपिलमुनी

मस्त मासे मिळणारे ठिकाण ..रेल्वे स्टेशन च्या जवळ गोकुळ हॉटेल आहे .. त्याच्या मागची गल्ली..

बाकी रामदूत ला मट्ण थाळी उत्तम मिळते ..मंगळवार पेठेमधली बहुतांश हॉटेल्स उत्तम आहेत ..

तुमची ट्रीप आणि वृतांत मस्तच !!

Well planned and well executed trip.

कोल्हापुर चे फोटो बघुन, "बस्सं कर पगले अब रुलायेगा क्या?" अशी अवस्था झाली.

<<चप्पल गल्ली ची वाट धरली. कोल्हापुरी चपलांची खरेदी करणं मस्टच होतं. ती झाली, >>
कोल्हापुरात येउन सगळेजण आवर्जुन कोल्हापुरी चप्पल खरेदी करतात आणि काही वेळा फसतात्.चप्पल लाइन ला मिळणार्या कोल्हापुरी चप्पल एकदम तकलादु आणि शोभेच्या वस्तु असल्या सारख्या.

अवांतरः मागे एकदा माझ्या हपिसातल्या एकाने मला चप्पलबद्दल टोकलेले.'काय ती कोल्हापुरी चप्पल ? १५ दिवसात तुटुन गेली'. चप्पल लाइन ची खरेदी, फिर अपना भी दिमाग घुम्या. मग काय त्याच्या पायाचे कागदावर माप घेतले आणि बनवुन आणुन दिली.गेली ४ वर्ष झाली तो ती चप्पल वापरत आहे.

पैसा's picture

3 Jan 2014 - 10:46 pm | पैसा

मस्त वर्णन आणि फोटो तर अगदी खासच!
एन एच४ नीट झाला का आता? दोन एक महिन्यांपूर्वी पुणे-कोल्हापूर रस्ता हा नॅशनल हायवे आहे का हायवेचं भूत असा प्रश्न पडला होता. रस्ता मुळी दिसत नव्हताच. सगळे खड्डे!

वेल्लाभट's picture

4 Jan 2014 - 10:38 am | वेल्लाभट

हो हो... नीट आहे आता. पुणं सोडलं की जरा डायव्हर्जन्स आहेत... पण थोडीशीच.

फार फार वर्षांपूर्वी बाबांचं बोट धरून कोल्हापूर बघितलं होतं. तेव्हा पन्हाळ्यावर कुठल्याश्या मराठी चित्रपटाचं शूटींग चालू असल्याचं अंधूक स्मरतंय. मी पाहिलेलं पहीलंच शूटींग. नंतर जेवायला एका खानावळीत गेलो होतो.. खानावळ म्हणजे अगदी जुन्या पद्धतीची.. हॉटेल नाही. खाली पाट मांडून आग्रह करकरून वाढणारी!

आयुर्हित's picture

4 Jan 2014 - 7:47 pm | आयुर्हित

झकास लेख लिहिता राव!

हे असे दिलखेचक वर्णन वाचल्यावर 'च्यायला, आपण कांहीच पाहिलं नाही' असं वाटून गेलं.

हे प्रभाकर पेठकर यांच्या वाक्याला सहमत. परत जायला आवडेल, लेख १००% यशस्वी!
धन्यवाद
आपला लाडका: आयुर्हीत

शिद's picture

6 Jan 2014 - 10:05 pm | शिद

वाचनखुण साठवली आहे.

टवाळ कार्टा's picture

8 Jan 2014 - 7:42 pm | टवाळ कार्टा

टेस्टी पांढरा रस्सा ठाण्यात कुठे मिळतो का??

वेल्लाभट's picture

8 Jan 2014 - 9:10 pm | वेल्लाभट

पुरेपूर कोल्हापूर, घंटाळी, नौपाडा, ठाणे

टवाळ कार्टा's picture

9 Jan 2014 - 1:43 pm | टवाळ कार्टा

ठ्यांकु