कैलासगड, घनगड, तैल-बैला, कोरीगड
पावसाळ्याची सुरवात,मस्त वातावरण, त्यात रविवार आणि ट्रेक प्लान. यावेळी सकाळी ५ वाजता उठून सिंहगड पकडून कर्जतला जायचा जाम कंटाळा आलेला. बाइक पण बऱ्यांचं दिवसात पिदडवली नव्हती. म्हणून मग मुळशी जवळचे किल्ले करायचा प्लान झाला.
भूषण मुंबई वरून पहाटे चारची गाडी पकडून पुण्यात ९ वाजता हजर. कोथरूड वरून मग आमची वरात निघाली ताम्हिणी घाटात.
"ह्या किल्ल्याला मुळशी रस्त्याने बाइकवर जाऊ नका" असे मिळालेले अनाहूत सल्ले आम्ही न मानता आमचेच 'घोडे' दामटले, आणि मग तेच 'घोडे' पंक्चर झाल्यावर ६ किमी ढकलत नेताना आमचे मालकाचे म्हणणे न ऐकणारे 'गाढव' झाले
भौगोलिक संदर्भ :
मुळशी परिसर हा पावसाळ्यात खरंच जन्नत असते. याच मुळशी मावळच्या पश्चिमेकडे पुण्यातून जवळपास ८० किमी अंतरावर घनगड आहे. लोणावळ्यापासून जवळपास ५० किमी असून येथून रस्ता बरा आहे.
घनगडाच्याजवळच तैलबैला, कैलासगड (वद्रे), सुधागड, सरसगड, कोरीगड आहेत.
येण्याजाण्याच्या वाटा :
घनगडावर जाण्यासाठी 'एकोले' गावातूनच वाट आहे. हे एकदम छोटे असे गाव असून जवळपास १०० लोकांची वस्ती असावी. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मातीचा रस्ता केलेला आहे. गावात गाडी पार्क करूनही किल्ल्यावर जाता येते.
पुण्याहून :
एकोलेगावात पोहोचण्यासाठी पुण्यातून ताम्हीणीमार्गे जाता येते. चांदणी चौक-> पौड-> ताम्हिणी-> वद्रे->निवे-> आडगाव पाझरे-> एकोले
रस्ता फार खराब असून दुचाकीवर जाणे अवघड आहे. टायर चांगले असतील तर ठीक. गाडी पंक्चर झाल्यावर निवे आणि भांबुर्डे गावाशिवाय कोठेही सोय नाही.
स्वारगेट येथून सकाळी नऊला भांबुर्डे बस असून तीच बस दुपारी दोनला परत जाते. एक दुपारची बस येथे मुक्कामी येते.
लोणावळ्याहून :
लोणावळ्याहून भांबुर्डेगावात येणारी ST बस आहे. ती बस दिवसातून दोन वेळच आहे.सकाळी दहा आणि दुपारी चार. आंतरजालावर मुबलक बस असल्याची नोंद आहे पण तसे नाही.
भांबुर्डे ते एकोले अंतर २० मिनिटे,३ किमी आहे. रिक्षा व इतर कुठल्याही गाड्यांची सोय नाही.
आमचा ट्रेक अनुभव:
सकाळी नऊ ला आम्ही गाडीला टांग मारली. एक गाडी दोघे जण. बरेच पुढे गेल्यावर अत्यंत गावंढळ पब्लिक कसेही रस्त्यावर हिंडत होते. त्यावरून आम्ही पौड आले हे ओळखले.
ताम्हिणीला लागलो आणि मस्त प्रवासाची सुरवात झाली. सकाळची वेळ असल्याने जास्त गर्दी नव्हती. बरेच अंतर कापून गेल्यावर लोणावळ्याचा फाटा आला. तेथून उजवीकडे वळून घनगडाच्या मार्गास लागलो.
मध्येच येणारे तीव्र चढण आणि खराब रस्ते याने गाडीचा जीव जायची सुरवात झालीच होती. गप्पा टप्पा मारत वेळ कसा गेला ते कळले नाही पण वद्रे गावापर्यंत यायला जवळपास अकरा वाजले होते.
वद्रे गावानजीकच कैलासगड आहे. कैलासगड हा फक्त डोंगर असून त्यावर विशेष पाहण्यासारखे काही नाही. किल्ला चढून उतरायला एक तास पुरेसा आहे. आमचे मुख्य लक्ष घनगड आणि तैलबैला असल्याने थोडा वेळ चढून आम्ही परत खाली आलो.
पूर्णतः निर्मनुष्य रस्त्यावर निवांत गाडी मारत आमची स्वारी चालली होती.
मध्येच एक भारी स्पॉट लागला. पावसाळ्यात हा स्पॉट जन्नत असेल. चारही बाजूने रखरखते डोंगर कडे आणि मध्ये दरीतून पाण्याला काढून दिलेली वाट.
एवढ्या रखरखत्या उन्हात मृगजळ दिसावे तसे हि गाडी पार्क केलेली दिसली. काय थाट होता तिचा वा !
निवे गावापर्यंत आलो. आता भूक लागली होती पण वेळ घालवायचा नव्हता. मग गाडी चालवतानाच प्याटीस खाऊन घेतले. निवे गावापासून ५-६ किमी आलो आणि फारच खराब रस्ता लागला म्हणून गाडीवरून उतरून ढकलत नेऊन पुढे जायचो. गाडी चालवताना मनात धाकधूक होती ती म्हणजे गाडी पंक्चर होण्याची. आणि थोड्या वेळातच ती धाकधूक संपली कारण गाडी खरंच पंक्चर झाली होती.
हा फोटो काढला आणि गप्प गाडीवरून उतरून गाडी ढकलायला लागलो. बघतो तर टायर शेवटचा श्वास मोजत होता.
येथे आजूबाजूला सर्वत्र डोंगर रांगा आणि निर्मनुष्य रस्ता. एका माणसाकडून कळले की येथून ५ किमी मागे निवे गावात पंक्चरची सोय होईल अथवा पुढे १२ किमी भांबुर्डे गावात. हे ऐकूनच पोटात गोळा आला. नाईलाजाने ६ किमी गाडी ढकलत नेऊन अक्षरशः छाती भरून आली. एके क्षणी वाटले की "इथेच स्मारक होतेय की काय आपले."
६ किमी गाडी ढकलून 'आडगाव पाझरे' गावात पोहोचलो. तिथे एक आज्जी ना विचारले तेव्हा त्यांनी त्यांच्या घरातील मुलांना आवाज दिला. ती मुले बाहेर आली आणि म्हणाली की " पंक्चर काढणारा बाहेर गेला आहे, आमच्याकडे सगळी हत्यारे आहेत. आम्ही ट्राय करू"
तसेही माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. म्हटले ठीक आहे.
आता 'पंक्चर काढणे' सोहळा सुरू झाला. तीन मुले हत्यारे घेऊन आली, त्यांचे वडील मोठी परात घेऊन आले. आज्जी लगबगीने जाऊन त्यात पाणी घेऊन आल्या. तिघांनी चर्चा करून टायर काढायला चालू केले. 'अरे हे असे कर', ते तसे कर अश्या सूचना पालन करत काम चालले होते. सहा लोक मिळून पंक्चर काढत होते. शेवटी दीड तासाने हा सोहळा संपन्न झाला. आजींनी 'प्रसाद' म्हणून काही कैऱ्या दिल्या आणि थोडे पाणीही दिले. आता त्या पाण्याची चवही आम्हाला अधिक तजेलदार वाटली.
एव्हाना बारा वाजले होते. परत गाडी दामटवायला चालू केले. जाताना हा डोंगर अगदी माहुली सारखा दिसत होता. 'पुण्याचा माहुली' म्हणूनही तो खपला असता.
भांबुर्डे नावाच्या अलीकडे एक फाटा फुटतो. तिथून सरळ घनगडाच्या पायथ्याशी. गावात गाडी लावून पुढे चालत जाऊ शकतो पण आम्ही मात्र अर्ध्या वाटेपर्यंत गाडी वर नेली. आता जे काही होईल ते बघून घेऊ असे म्हणत.
पायथ्याकडून दिसणारा घनगड.
गाडी पायथ्याशी लावली आणी थोडे १५ मिनिटे चालत वरती आलो तर लगेच 'गारजाई देवीचे' मंदिर दिसले. थोडा वेळ परत विश्रांती झाली.
आता येथूनच किल्ल्याचा एक बुरूज दिसत होता. त्याचा माग काढत सरळसोट अश्या रस्त्याने चढाई सुरू झाली. येथून थोडे वर आल्यावर घनगड आणि त्या शेजारचा डोंगर यांच्यामधील खिंडीत एक वाट जाते. तेथे एकावर एक दगडांची रास केल्यासारखा एक एक कमाल स्पॉट आहे.
तेथून परत फिरून किल्ल्याची वाट धरली. मग वाटेतच थोडी हौस करून घेतली.
मंदिरापासून अर्धा ते पाऊण तासातच आपण किल्ल्याच्या महादरवाज्याशी पोहोचतो. दोन भक्कम आणि बुलंदी बुरुजांनी झाकले गेलेले प्रवेशद्वार दृष्टीस पडले.
प्रवेशद्वाराशीच असलेल्या बुरुजाने गडाची सुरक्षितता आणखीनच अभेद्य झाली होती. मूळ किल्ल्यात प्रवेश केल्यावर लगेचच पाण्याची टाकी नजरेस पडली.येथून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी येथे एक शिडी लावलेली आहे. आधी या उभ्या कातळात केलेल्या खोबणीतून चढाई करावी लागे. आता ह्या शिडीमुळे फारच सोपे झाले आहे.येथून खाली बघितल्यास बुरूज आणि प्रवेशद्वार दिसत होते.
आता शिडी चढून वर आलो. थोडा डोंगर बाजूला झाला आणि बालेकिल्ल्यात पोहोचताच दोन बुरूज आणि समोर तैल-बैल कातळकड्यानी लक्ष वेधून घेतले.
दिवसभर उन्हाने तापलेल्या वातावरणात जरा गारवा आला. क्षणात निसर्ग कूस बदलून घेतो याची प्रचीती आली.
थोडे फोटोसेशन झाल्यावर जेवण पदरात पडून घेतले. थोडेसे ढगाळ वातावरण, पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच. गोड शिरा, छोले उसळ. कमाल बेत झाला होता.
थोडी कारागिरी झाली आणि मग परतीची वाट धरली.
आम्ही किल्ला उतरताच किल्ल्यावर ढग दाटून आले. क्षणात वातावरण बदलले.
पायथ्याशी लावलेली गाडी काढली आणी लोणावळ्याच्या दिशेने निघालो. Aamby Vally च्या जवळपास आलो आणि येथून एकदम चांगले रस्ते सुरू झाले. कोरीगड आधीच झाला होता त्यामुळे लांबूनच कोरीगडला टाटा केला आणि लायन्स पॉइंट ला निघालो.
जरा वेळ इथे टिपी केला आणी लोणावळा स्टेशन मार्गे निघालो. भूषण लोणावळ्यावरून मुंबईला गेला आणि मग आम्ही हाय-वे पकडून दोन तासात घरी.
"कोथरूड ->चांदणी चौक-> पौड-> ताम्हिणी-> वद्रे->निवे-> आडगाव पाझरे-> एकोले->भांबुर्डे -> लोणावळा-> चांदणी चौक-> कोथरूड " एकंदर फारच मोठा राउंड झाला होता पण बरीच ठिकाणे पाहता आली. या प्रदेशात स्वतःची गाडी असेल तर बरीच भटकंती करता येते.
एका दिवसात आरामात "चांदणी चौक-> ताम्हिणी -> कैलासगड -> घनगड -> तैल-बैला -> कोरीगड-> लायन्स पॉइंट-> लोणावळा - चांदणी चौक" अशी ट्रीप /ट्रेक होऊ शकतो.
प्रतिक्रिया
18 Dec 2013 - 3:34 pm | मोदक
शिडीकडे तोंड करून उभे राहिल्यानंतर उजव्या बाजूला एक सुटी झालेली अतीप्रचंड शिळा आहे.. त्याचा लेटेस्ट फटू आहे का..?
हे माहूलीसारखे डोंगर म्हणजेच तैलबैलावरून दिसणारा "ताजमहाल" का..?
19 Dec 2013 - 4:53 pm | सुज्ञ माणुस
अतीप्रचंड शिळा>> फोटू सर्चतो !
ताजमहाल >> मी कधी ऐकले नाही याबद्दल :(
19 Dec 2013 - 11:08 pm | मोदक
20 Dec 2013 - 10:08 am | सुज्ञ माणुस
ओह्ह आले लक्षात.

डकवायला सोपे असल्याने ब्लोगवरच्या लेखात हे फोटो टाकले होते. इथे फोटू टाकताना ते लिंक शोधून साईज लिहून पेशन्स जातो :(
19 Dec 2013 - 2:02 pm | प्रचेतस
वर्णन आवडले.
बाकी पावसाळ्यात हा भाग खरोखर स्वर्गच असतो.
तुमच्या पहिल्या फोटोतील दृश्य पावसाळ्यात असे दिसते.
19 Dec 2013 - 4:50 pm | सुज्ञ माणुस
ओहो ! भारी आहे बरका हा फोटू ! पावसाळ्यात खरच जन्नत !
19 Dec 2013 - 2:05 pm | जेपी
मस्त आहे .
19 Dec 2013 - 3:01 pm | वेल्लाभट
उत्त्तम ! हा आहेच अजेंड्यावर.
फोटो कमाल. अजून चालले असते राव. आणि दोघेच होतात त्यामुळे वर्णनास वाव कमी होता असा माझा अंदाज. तरीही सुरेख वर्णन! मजा आली. लई भारी.
19 Dec 2013 - 4:24 pm | मुक्त विहारि
फोटो आणि त्या जोडीला प्रवाही आणि पकड घेणारे लिखाण....
19 Dec 2013 - 4:58 pm | सौंदाळा
+१००००
19 Dec 2013 - 4:50 pm | राजेंद्र मेहेंदळे
लिस्टवर राहीलेत केव्हाचे...लेख वाचुन स्वतः जाउन आल्यासारखे वाटले..
मात्र मुळशीमार्गे गेल्यास रा.प.म ने जायची काळजी घेईन
19 Dec 2013 - 4:53 pm | पैसा
मस्त फोटो आणि वर्णन!
=)) हे फारच आवडलं!!
19 Dec 2013 - 7:50 pm | किसन शिंदे
वर्णन आणि फोटो दोन्ही जाम आवडले. बाकी मोदक म्हणतो तसे त्या डोंगराकडे पाहील्यावर ताजमहालाच्या मोठ्या घुमटासारखा आणि दोन्ही बाजुंना दोन मिनारांसारखा आकार वाटतो.
20 Dec 2013 - 10:10 am | सुज्ञ माणुस
हम्म खरेच ! लक्षातच आले नव्हते! धन्यवाद !
20 Dec 2013 - 3:31 pm | मोदक
तैलबैला अर्धा चढून झाल्यावर दूरवर घनगडाकडे पाहिले की हे डोंगर ताजमहालासारखे दिसतात.
19 Dec 2013 - 10:45 pm | सुहास..
जबराट !!
लिस्टवर टाकतो आहे ..जानेवारी डन !!
21 Dec 2013 - 8:34 am | कंजूस
माझं आवडतं ठिकाण .
मी बसच्या वेळा पाहून जातो .
टुव्हिलरने जाण्याचा सुखद अनुभवही येथे घेतला गाडी न ढकलता .(एकदा राजमाची ते खंडाळा एमेएटि गाडीवर एका गाववाल्याने डबलसीट वीस मिनीटात पोहोचवले होते ,आणि "कसं आहे माझं डरायविंग ?"अजून लक्षात आहे .हाच गाववाला याच गाडीवरून बायको आणि सासऱ्याला घेऊन येतांना पाहिला होता .
एम एटी गाडीला आणि गाववाल्यांच्या पाहुणचाराला सलाम )
एक वाईट गोष्ट (ट्रेकिंगच्या दृष्टीने )म्हणजे या भागात एक रात्र काढायला आसरा गुहा वगैरे नाही .सुधागडला जावे लागते .
4 Feb 2015 - 3:33 pm | नितिन५८८
कोथरूड ->चांदणी चौक-> पौड-> हाडशी -> पवना धरणाची मागील बाजू -> सरळ एकोले->भांबुर्डे …
जाताना चिन्मय विभुती आश्रम, प्रती पंढरपुर, पवना धरण, लोहगढ, विसापुर, तुंग पहावयास मिळते आणी दोन चाकी साठी रस्ता उत्तम आहे. चार चाकी साठी मधे मधे खराब रोड आहे.
अत्यंत गावंढळ पब्लिक कसेही रस्त्यावर हिंडत होते कारण त्यादिवशी पौडचा बाजाराचा दिवस असतो
4 Feb 2015 - 5:56 pm | कहर
"एक गाडी दोघेजण "
पण गाडीच्या फोटोत गाडीला सीट एकच दिसतीये …
दया … कुछ तो गडबड है
*secret* :-X :-x X: x: :-# :# :secret:
(शेरलोक होम्स चा भक्त) कहर