मिपाकर कुठेही का भेटेनात; मिपावरील आयडी, डू आयडी, खादाडी ह्या सगळ्या चर्चा संपल्या की मध्येच कोणीतरी भटकंतीचा विषय काढतं. काही वेळा हा विषय पब्लिक लैच सिरीयसली घेतं मग व्हॉट्स अॅप वर ग्रूप क्रीएट होतात भटकंतीच्या चर्चेसाठी!! अशीच एक पब्लिकने मनावर घेतलेली भटकंती म्हणजे हरिश्चंद्रगडाची. सात डिसेंबर तारीख पक्की झाली आणि मग कसं जायचं कुठे थांबायचं यावर चर्चा रंगायला लागल्या. आता जाणारे सगळेच नवखे, त्यात कळलं की गडावर जायच्या पाच (?) वाटा आहेत. त्यातली नळीची वाट म्हणजे कठीण आणि पाचनई गावातून जाणारी बर्यापैकी सोपी.
शेवटी पाचनईच्या वाटेने जायचं ठरलं. त्यासाठी आम्ही निवडलेला मार्ग म्हणजे कल्याण्-ईगतपूरी-राजूर-पाचनई. जाणार्या मंडळीत मी एकटाच पुणेकर (पक्षी: पुण्याहून जाणारा!! लगेच बाटगा बाटगा म्हणून चोच मारायला येऊ नये, अपमान केला जाईल). मग जास्तीची मेजॉरिटी बघता मीही कल्याणहून सगळ्यांसोबत प्रवास करायचं ठरवलं. हां हां म्हणता ट्रेकचा दिवस जवळ आला. कल्याणहून गाडी सात तारखेला सकाळी सात वाजता, मग सगळ्यांसोबत कल्याणहून जायचं म्हटल्यावर मला इथून आदल्या दिवशीच निघणं भाग होतं. आदल्या दिवशी हापिसातलं काम पटापट आटपून रात्री अकराची मुंबई पॅसेंजर पकडायला साडेदहाला पुणे स्टेशन गाठलं. गाडी वेळेवर आली, पण वेळेवर निघाली मात्र नाही. अकरा पाचला निघणार्या गाडीने सवाअकराला एक धक्का दिल्यासारखा केला आणि पुन्हा ढिम्म!! दरवाज्याजवळच्या पॅसेजमध्ये उभा होतो तोच समोर बसलेल्या काकू शिवाजीनगरला उतरणार असल्याचं कळलं आणि त्यांची जागा आपल्याला मिळून,आपल्याला निवांत बसून प्रवास करता येणार ह्या विचाराने मन में लड्डू फुटले. शेवटी अकरा पंचवीसला आणखी एक धक्का देऊन ट्रेन चालती झाली. कासवाच्या गतीनं का होईना शिवाजीनगर गाठलं आणि मला डुलक्या काढायला जागा मिळाली.
ट्रेनमधली एकंदर अवस्था बघून मला पु.ल. देशपांडेंचं म्हैस वारंवार आठवत होतं. समोरच्या सीटवर एक काका बसले होते. त्यांच्याकडे बघून त्यांना थोडी जास्त झाली असावी असा वारंवार संशय येत होता. पायापासच्या जागेत अख्खं कुंटुंब नसलं तरी एक सद्गृहस्थ आसर्याला आले होते, आसर्याला आले होते म्हणजे काय चक्क आडवेच झाले होते. त्यांनी झोपेत लाथा मारल्या तर काय सांगा अशा विचाराने आमचे पाय सांभाळून बसावं लागत होतं आणि आमचा जरा डोळा लागतोयसं वाटलं की पलिकडच्या सीटवरल्या बाईंचं पोरगं भोकाड पसरत होतं. त्या पोराला थो(धो)पटून त्या बाई पोराचं रडं वाढवित होत्या. ट्रेनने घेतलेला वेग आणि गार वारा यामुळे या सगळ्या गदारोळातही डोळा लागला. गाडी थांबलीशी वाटली म्हणून डोळे उघडून पाह्यलं तर साडेबारा झालेले आणि स्टेशन कोणतं तर चिंचवड !! झाली का पंचाईत आता!! म्हणलं गाडी पोचवतेय का नाय वेळेत. पण तसं काही झालं नाही. लोणावळ्यानंतर गाडीने बराच वेग पकडला आणि पहाटे तीनला आम्ही बदलापूर मुक्कामी पोचलो. येवढ्या सगळ्यानंतर प्रवासाची दगदग संपलीसं वाटलं होतं. पण खरी मजा तर सकाळी होती.
घरी जरा पाठ टेकून सातच्या गाडीसाठी सकाळी साडेसहाला कल्याण स्टेशन गाठलं, नेहमीपेक्षा गर्दी थोडी जास्त दिसत होती. तसं का असावं त्याचा अंदाज काही लागेना. नंतर लोडशेडिंग नंतर लाईट्स लागावेत तसा लख्ख उजेड पडला डोक्यात. सहा तारखेला आपल्या परमप्रिय नेत्याचं दर्शन घ्यायला आलेला जनसमुदाय परतीच्या प्रवासाला निघाला होता. गाडीत चढल्या चढल्या दुसरं सरप्राईज होतं. आम्ही बुक केलेल्या शीटांच्या दिशेने निघालो तो साक्षात एक नामवंत प्राध्यापक कवी एका सीटवर बसलेले होते. त्यांनी खास त्यांच्या प्राध्यापकी शैलीत, "आता बरं का, तुम्ही तुमच्या रिझर्वेशन केलेल्या जागा यांच्याकडून कशा मिळवता यात तुमचं स्किल आहे." असं सांगितलं. आवाजात शक्य तितका खवचटपणा एकवटून "हो!! ते बघूच !!" असं उत्तर मी कधी दिलं ते माझं मलाच कळलं नाही. शेवटी त्या भाविकांच्या गयावया केल्यानंतर आम्ही रिझर्व केलेल्या सहा शीटांपैकी चार शीटा त्यांनी आम्हाला आमच्यावर दया येऊन देऊ केल्या आणि इगतपूरीचा प्रवास सुरु झाला. बसायला ज्यांना म्हणून जागा मिळाली होती ते माझ्यासारखे लोक झोपेची थकबाकी गोळा करायचा प्रयत्न करीत होते. त्यातही गप्पा, थट्टामस्करी चालूच होती. इतक्यात इगतपुरी कधी आलं ते कळलं पण नाही.
इगतपुरीत एकेक उसळ वडा हाणून सगळे पुढच्या प्रवासाला निघालो. राजूरची बसही वेळेत मिळाली पण राजूरला पोचून खाण्याच्या गोष्टी खरेदी करेपर्यंत राजूर पाचनई यष्टी निघून गेली. मग राजूर पाचनई प्रवास एका जीपड्यातून घडला. पाचनईला पोचेपर्यंत एक-दिड वाजला होता आणि पोटात रेडे पळायला लागले होते. मग भाकरी पिठल्यावर ताव मारला आणि सुसाट निघालो.
पिठलं भाकरी तयार होईपर्यंतची भटकंती:
सुरुवात:
अर्ध्या वाटेत:
पायर्या चढून पुढे आल्यानंतरची वाट:
जवळपास पोचलोच!!:
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर (हा फोटु सकाळी निघता निघता काढलेला आहे):
गडावर रमतगमतच चाललो होतो, पोचेपर्यंत पाच वाजले होते. सर्वांनी बॅगा हरिश्चंद्रेश्वराच्या देवळाशेजारच्या गुहेत ठेवल्या आणि सुर्यास्त बघायला कोकणकड्याच्या दिशेने निघालो.
सुर्यास्ताचा फोटो काढण्याचा एक प्रयत्न:
सूर्य मावळला तसं पुन्हा मंदिराच्या दिशेने निघालो. दिवस मावळताच हवेत प्रचंड गारवा जाणवायला लागला होता. जाकिटं, स्वेटर अशा तयारीनिशीच कोकणकड्यावर पोचल्यामुळे परतताना फार काही वाटलं नाही. परत येऊन थोड्या गप्पाटप्पा झाल्या आणि रात्रीच्या जेवणाचे वेध लागले. म्यागीची जी काही पाकिटं राजूरला उतरून खरेदी केली होती ती उपयोगी आली.
मॅगी शिजून तयार:
मॅगी खाण्यात गुंग मंडळी:
दिवसभराचा थकवा आणि नुकतीच पोटात पडलेली मॅगी यांनी रंग दाखवायला सुरुवात केली होती. काही मंडळी पेंगून गुहेत आडवी झाली. हवेतला गारवा वाढला होता, त्यात काही (आमच्यासारखी) हौशी मंडळी रात्रीच्या जेवणानंतर गडावरच्या टपर्यांमध्ये कुठे चहा मिळतो का बघायला रवाना झाली. परत येऊन अंग टाकलं. जमिनीवर नुसतीच एखादी चादर अंथरलेली आणि त्यात हवेतला गारवा बर्यापै़की होता. सकाळी जाग आल्यानंतर काहीसं असं चित्रं होतं.
सकाळची आन्हिकं आटोपून तारामती शिखर गाठलं. शिखरावर पोचल्यानंतरचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. शिखरावर थोडा क्लिकक्लिकाट करुन परतीच्या वाटेला लागलो.
अशी ही पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण!!
फोटो सौजन्यः किसन शिंदे, स्पा, सौरभ उप्स
टीपः माझ्या शब्दात वृत्तांत लिहायचा प्रयत्न केला आहे, तरी काहीसं कमी पडल्यासारखं वाटतंय. ट्रेकला हजर मंडळींनी आपल्याकडचे चार शब्द लिहून आणि पदरचे चार अधिक फोटो टाकून धाग्याची शोभा वाढवावी ही विनंती. ;)
प्रतिक्रिया
17 Dec 2013 - 2:59 am | पाषाणभेद
छान वर्णन अन फोटोही छान!
17 Dec 2013 - 4:46 am | मुक्त विहारि
झक्कास,,,,
तुर्त इतकेच....
(मनातले सगळेच कागदावर थोडीच उतरवता येते?)
17 Dec 2013 - 6:34 am | चित्रगुप्त
मस्त भटकंती आणि फोटो.
सर्वात शेवटल्या फोटोतल्या सप्तर्षींची नावे उदाहरणार्थ डावीकडून उजवीकडे वगैरे लिहावीत, ही विनंती.
17 Dec 2013 - 6:59 am | कंजूस
शिर्षक वाचून वाटले की राजा हरिश्र्चंद्राला स्वप्न पडले (वेळ०२.०७ची आहे) आणि ते त्याने व्हॉटसअॅपवरून लगेच सर्वांना कळवले त्याचा विनोदी वृत्तांत आहे .
तुम्ही पुण्यापासून काय सजा आणि मजा (उप)भोगलीत ती पोहोचली .
ते वरचे देऊळ खिरेश्वराचे नाही ते इकडे खुबिफाटा(माळशेजघाटमाथा) कडून येण्याच्या वाटेवर आहे .
वरती देऊळाच्या उजवीकडे गुहेतल्या पिंडीभोवती थंडगार पाण्यातून प्रदक्षिणा घातली का ?
बाकी वर्णन आणि फोटो छानच .
17 Dec 2013 - 8:31 am | प्रचेतस
काय बे सूडक्या, आँ.......
हरीश्चंद्रगडावर गेलास अन् कोकणकड्याचा एकपण फोटू नै.
बाकी वर्णन मस्त. पण नमनाला घडाभर तेल आणि प्रत्यक्ष गडाचं वर्णन फार कमी असं झालंय.
ते मंदिर हरीश्चंद्रेश्वराचे आहे. मढ-खिरेश्वर मार्गे येणार्या टोलार खिंडीच्या पायथ्याच्या खिरेश्वर गावात आहे ते नागेश्वराचे मंदिर.
17 Dec 2013 - 8:39 am | राजेश घासकडवी
आयला, हरिश्चंद्रगडला (किंवा कुठल्याही ट्रेकला फॉर द्याट म्याटर) जाऊन मॅगी खायची हे आजही चालू आहे हे पाहून डोळे पाणावले. इतकी वर्षं ही परंपरा चालू आहे तर! ती प्लेट आधी 'लिक-क्लीन' करायची आणि मग उरलेली थंड पाण्याने कुडकुडत विसळायची... पातेलं घासण्यासाठी काही आणलेलं नसेल तर मॅगीच्या मसाला पाकिटांचाच स्क्रबरसारखा वापर करायचा...
टपऱ्या? हा मात्र सांस्कृतिक धक्का आहे.
कोकणकड्याचा फोटो नाही हे पाहून माझाही विरस झाला. पोटावर सरपटत कोणालातरी पाय घट्ट धरायला सांगून त्या टोकावर शक्य तितक्या पुढे गेल्याचं अजूनही आठवतं आहे.
17 Dec 2013 - 9:04 am | किसन शिंदे
हा घ्या कोकणकडा
पालथे पडून पार खालचं टोक पाह्यलं होतं.

केदारेश्वराची गुहा

17 Dec 2013 - 8:39 am | किसन शिंदे
मस्त खुसखुशीत वृत्तांत!
17 Dec 2013 - 10:24 am | दिपक.कुवेत
कि आधी फोटो पहाणे आल(चं). लय मजा केलेली दिसतेय राव. फार जळजळ होतेय.......आता त्यावर उतारा म्हणुन वर्णन सावकाश सवडिने वाचतो. बाय द वे कोण मिपाकर सामील होते ते कळलं तर प्रत्यक्ष नाहि तर निदान फोटोतुन तरी भेटल्याचा आनंद मानु.
17 Dec 2013 - 10:26 am | सौरभ उप्स
मस्त खुसखुशीत वृत्तांत >> +१
पण अर्धवट झाल्यामुळे मूड ऑफ …
17 Dec 2013 - 10:34 am | स्पा
ले भारी
17 Dec 2013 - 10:40 am | यसवायजी
भारी..
17 Dec 2013 - 12:22 pm | सुहास झेले
भारी रे :)
17 Dec 2013 - 12:23 pm | कंजूस
खिरेश्वर गावातल्या नागेश्वर देवळात महाशिवरात्रीच्या २ दिवस अगोदर मस्त प्रसाद असतो आणि वरतीपण भजन आणि प्रसाद असतो .पण या यात्रेनंतर केदारेश्वराच्या गुहेतल्या पाण्याला फार घाण वास येतो .
17 Dec 2013 - 12:45 pm | स्पा
उपवृतांत
बहुतेक सगळे सोंडे पहिल्यांदीच हरिश्चंद्रगडावर जात होते. आधी इतक्या सुरस कहाण्या या गडाबद्दल ऐकलेल्या होत्या कि एक आदरयुक्त कुतूहल वाटत होतं, मुख्य आकर्षण होतं कोकण कडा!!!!
तपोवन एक्स्प्रेस मधून इगतपुरीला उतरलो, आणि थंडी जाणवायला लागली. सकळी सकाळी पोटभर नाष्टा करून घेतला आणि राजूर बस पकडली.
यावेळी सोबत "बायका" नसल्याने राज्य परिवहन मंडळावर सगळे अवलंबून होते. :D
राजूरला घासाघीस करून ५०० रुपयात एका जीप वाल्याला पटवले आणि पाचनई गावात आलो. दुपारचे २ वाजलेले होते .आता गडाचे भव्यपण जाणवायला लागलेले. खाली गावात झकास पिठले भाकरी कांदा असा घसघशीत आहार घेऊन चालायला सुरुवात केली.
पाचनई गावातली वाट अगदी सोपी. थोडा अपेक्षाभंगच झाला. आरामात वर आलो. मध्ये एका ठिकाणी फोटो काढत असताना मला काहीतरी दणदणीत चावले, गवत भरपूर माजलेलं. मजबूत डंख होता. साप चावला का काय, मिपावरचे JD चे लेख आठवायला लागले, पटकन बूट काढून टाकला. एकच डंख दिसत होता ,म्हणजे साप नसणार असा बेसिक अंदाज सर्वांनी बांधला.
पाउल व्यवस्थित सुजल, पण तसेच वर सरकलो, अर्धा तास काही झाले नाही, मग अंगात जरा हुशारी आली :D . पण थोड्यावेळान पोटरीवरची नस एम्बोस होऊन दिसायला लागली, आणि पार मांडीपर्यंत दुखायला लागले, परत फाटली. पण थोड्यावेळाने तेही ओसरलं आणि नॉर्मल ला आलो. बहुतेक मधमाशी असणार.
तोवर आम्ही वर आलेलो होतो. शंकराचे मंदिर दिसायला लागले. सूर्यास्तही जवळ येत होता, आणि आम्हाला कोकण कडा गाठायचा होता. पटापट एका गुहेत ब्यागा टाकल्या आणि कोकणकड्याकडे कूच केले. सुदैवाने खूप अशी गर्दी नव्हती. एकदाचे त्या कड्यावर पोचलो आणि समोरचे दृश्य पाहून झीट यायचीच बाकी होती. निसर्गाचा चमत्कार. शब्दच तोकडे पडतील.
मावळतीला जाणारा सूर्य , अर्धचंद्राकृती अफाट तासला गेलेला सह्याद्रीचा अतिभव्य कडा,समोर मावतीला जाणारा सूर्य , दरीत पसरलेलं धुकं, ती भव्यता एवढी अंगावर येणारी होती , काही बोलायचीच गरज नव्हती, नुसते टोकाला आडवे पडून समोर बघत बसलो. थोड्यावेळात सुर्व मावळला आणि मनाविरुद्ध तिथून उठावेच लागले. थंडी अंगावर यायला लागली.गुहेत पोचेस्तोवर चांगलाच अंधार झालेला होता. वेगवेगळ्या गृप्सनी जेवण बनवायला घेतलेले होते. आम्ही देवळातच एका माणसाकडे म्यागी बनवायला दिले.आमचे शेफ सूडराव जातीने लक्ष घालत होते. चुलीपाशी किसनशेठ उबेला बसलेले होते. पंधरा एक मिनिटात गरमागरम म्यागी तयार झाली आणि मावळे त्यावर तुटून पडले. भयानक गारठ्यात ती म्यागी कधी पोटात गडप झाली समजलेच नाही.
थोडावेळ असाच टाईमपास केला आणि झोपायच्या तयारीला लागलो. आता खरी परीक्षा होती. एवढी थंडी असेल असे कोणालाच वाटलेले नव्हते. अंगावरचे स्वेटर काही कामाचे नव्हते. उलटणारया प्रत्येक मिनिटानंतर थंडी आणि वर वाढतच होता. आमच्याजवळ खाली अंथरायला पेपर होते, आणि वर एक चादर बास. खालचा दगड खी वेळात बर्फाच्या लादिपेक्षाही थंड झाला आणि सगळे हादरले. घडल्यात वेळ फक्त रात्रीचे दहा दाखवत होती, अक्ख्यी रात्र उलटायची होती. काहीतरी गप्पा मारणे सुरु होते
पण त्यात दम नव्हता, कशीबशी ती भयाण रात्र संपली, आणि सकाळ झाली. २, २ चहा पोटात गेल्यावर सगळे बधीर झालेले अवयव काम करायला लागले. सोबतिला मस्त मेथी पराठे. त्यातही एकेकाची डोकी चालायला लागली. ते पराठे आम्ही परत चुलीवर भाजले, आणि पोटात ढकलले , ती चव अवर्णनीय होती हे नक्की. आता तारामती शिखर सर करायचे होते. उंची साधारण ४५०० फुट, एखाद तासात तिकडे पोचलो, हा निसर्गाच्या भव्यतेचा अजून एक अनुभव.
तिथून खाली उतरलो.
गड खूप मोठा आहे, पाण्याची टाकी भरपूर आहेत , एका लेणीत प्रचंड मोठी शंकराची पिंडी आहे. मोठा दगडी हौद आहे, बर्याच गुहा आहेत.बाले किल्ला आहे.
थोड्या वेळात आवरून निघालो. मध्ये एका ठिकाणी संपादक श्री किसन शिंदे आणि अल्पेश यांनी जलतरणाचे विविध प्रयोग केले. :D खाली येईस्तोवर अकरा वाजलेले होते,आणि आमच्याकडे भरपूर वेळ होता, कारण संध्याकाळी ७ ची इगतपुरीहून ट्रेन होती. सोबत आणलेले पोहे बनवायला दिले आणि त्यावर नंतर दणकून तावही मारला.एखाद तासात जीपडे आले आणि आम्ही राजूर कडे मार्गस्थ झालो.
एक, दीड वाजता राजूरला आलो. अजून ६ तास काय करायचे हा प्रश्न होता. म्हणून सगळे आरामात होते. पण त्याच गडबडीत एक इगतपुरीला जाणारी बस सुटली. तरी सगळे कुल होते. मग समजले कि आता बस डायरेक ५ ची आहे. आता जरा सगळे अलर्ट झाले, प्रायवेट गाड्या काहीही भाव सांगत होत्या, त्यामुळे बस ने"च" जायचे हे नक्की होते.तसहि अगदी पाच ला बस लई तरी आम्ही इगतपुरीला वेळेतच पोचणार होतो. आणि बस आली देखील वेळेवर.गर्दी होती, पण बस आली यामुळे सुटकेचा निश्वास टाकला. पण लोच्या झाला.
ती बस कसार्याला जाणार तर होती, पण "भंडारदरा" मार्गे. भंडारदरा दर्शन पण आमच्या नशिबात होते. आरामात फिरत फिरत बस जात होती, आणि वेळ भसाभसा संपत होता, थोड्याच वेळात समजले कि आपली तपोवन जाणार.येतानाही उभ्यानेच आलो ,आणि जाताना तर साधी ट्रेन पण मिळणार नाही. इगतपुरीला उतरण्यात आता अर्थच नव्हता. कसार्याला जाऊन लोकल ट्रेक पकडणे इष्ट होते .
बैलगाडीच्या स्पीड ने त्याने सव्वा आठ ला कसार्याला पोचवले, ५ ते सव्वा आठ,फुल धमाल. कसार्याहून सुदैवाने लगेच ट्रेन मिळाली, आणि साधारण तपोवनच्या वेळेत मंडळी घरी पोचली.
( माझे मेमरी कार्ड करप्ट झाल्याने ८०% हून सर्व फोटो गेले, त्यामुळे बाकी लोकस फटू टाकतीलचब :( )
ता.क. : १. रात्रीचा चोर कोण हे उत्तर ण मिळाल्याने परत जाणेचे ठरलेले आहे
२. प्रत्येक मेम्बराला धौती योग चूर्ण सोबत बाळगणे बांधील राहील :P
17 Dec 2013 - 12:57 pm | प्रचेतस
मस्त उपवृत्तांत.
बाकी गडाचे काही फोटो बघायला मिळणार असे वाटत होते पण त्याऐवजी लालभडक मिसळीचा फोटू बघून निराशा झाली.
17 Dec 2013 - 2:19 pm | सूड
>> बाकी गडाचे काही फोटो बघायला मिळणार असे वाटत होते पण त्याऐवजी लालभडक मिसळीचा फोटू बघून निराशा झाली.
तुमचा काडीसारक स्वभाव आता चांगलाच ओळखून आहोत, त्यामुळे हा प्रतिसाद योग्य त्या ठिकाणी मारलेला आहे.
@ बाकीचे लोक्सः उपवृत्तांत आणि फोटोंसाठी बाकीच्या लोकांचे आभार, लिहायला घेतलं की नेट गंडत होतं. त्यामुळे लिहीताना नीट लिंक लागतच नव्हती. पुढला वृत्तांत (जर लिहायची वेळ आली तर) चांगला लिहीण्याचा प्रयत्न केल्या जाईल.
17 Dec 2013 - 2:25 pm | प्रचेतस
अरेरेरे.
आता स्पष्ट मत व्यक्त करायचीही चोरी झाली म्हणायची.
17 Dec 2013 - 2:54 pm | अभ्या..
ते काहीही असो सुडा, निदान या धाग्यामुळे तरी आम्हा पडीक लोकांना काही अत्यंत बिजी नावाना हजर सदस्यात पाहायला मिळाले हे नसे थोडके ;-)
बाकी ट्रेक चान चान
18 Dec 2013 - 12:03 pm | वेल्लाभट
क्या बात है ! वाटच बघत होतो वृत्तांताची.... तो ही छान आहे पण उपवृत्तांतही जबर आहे. मजा आली ना वाचून राव ! मीही गेलेलो नाही अजून त्या ट्रेकर्स च्या पंढरी ला.... :( २०१४ तो योग जुळवून आणेल अशी खात्री आहे....
17 Dec 2013 - 1:00 pm | स्पा
टीप वाचलेली दिसत नाहीये
कि मुद्दामून खवचट प्रतिसाद होता :)
17 Dec 2013 - 1:04 pm | सौरभ उप्स
कोकण कड्याच्या सनसेट हा हरिश्चंद्र गडाचा गोल्डन पॉइन्ट…

अन गोल्डन पॉइन्ट चा अनुभव घेताना ग्रुप चे मेम्बेर्स

डावीकडून: अल्पेश, सूड, किसन, रॉबिन, स्पा, सिद्धू, सौरभ
ग्रुप फोटो सौजन्य श्री. श्री. क्यामेरा बाबा सेल्फ टाईमर

तेथील मंदिराच्या आतला विउव्ह

17 Dec 2013 - 1:07 pm | प्यारे१
>>>डावीकडून: अल्पेश, सूड, किसन, रॉबिन, स्पा, सिद्धू, सौरभ ह्यांच्या स्टेन्सिल आकृती
असं हवं.
अरे सौरभ फोटो छान आहेत पण लोक असं कसं समजू शकतील?
17 Dec 2013 - 1:27 pm | सौरभ उप्स
डावीकडून : सौरभ, अल्पेश, सिद्धू, रॉबिन, किसन, स्पा, सूड.

17 Dec 2013 - 1:05 pm | प्यारे१
ऐश केलीसा म्हणा की!
बाकी स्पांडुच्या वर्णनामुळं नि किस्नाच्या फटुमुळं आता जरा भटकंतीचं वर्णन वाटतंय!
सूडनं स्वत:च टीप लिहील्यामुळं तो वाचला. रात्री वाचतानाच समथिंग मिसिंग मिसिंग वाटत होतं. ;)
17 Dec 2013 - 3:28 pm | अत्रुप्त आत्मा
भारी आली फिरून पोरं,भारी आली फिरुन
पण...
शेकोटी जवळचा स्पांडु पाहून,मण आलं भरून!!! =))
कस्ला कॉमेडी दिसतोय..टोपिवाला पांडू =))
17 Dec 2013 - 6:34 pm | बिपिन कार्यकर्ते
हॅ!!! त्यात काय! आजकाल कोणीही जातो हरिश्चंद्रगडावर! ;) बाकी 'चान चान' आहेच! ;)
बाकी तब्येत नाजुक असेल तर थंडी सहन होत नाही म्हणतात! ;)
17 Dec 2013 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो वृत्तांत शॉर्ट बट स्वीट. ( फोटोची भर पाहिजे होती पण एवढं तेवढं चालायचंच)
-दिलीप बिरुटे
17 Dec 2013 - 8:33 pm | पैसा
एकत्र ट्रेक केलात तसा एकत्र वृत्तांत दिल्यामुळे धागा सुफळ संप्रूण झाला! मस्तच!
18 Dec 2013 - 8:31 am | शैलेन्द्र
वा, मस्त वृतांत,
राजुर हे माझे आजोळ, काही दिवसापूर्वीच मी हरिशचंद्राच्या शेजारच्या रांगेतील पाबरगडावर गेलेलो.
बाकी पाचनईचा रस्ता फारच सोपा आहे,
18 Dec 2013 - 12:08 pm | वेल्लाभट
फोटोझ !!!!!! कूल आहेत
18 Dec 2013 - 2:29 pm | विजयराजे
18 Dec 2013 - 2:34 pm | पैसा
तुमच्या उपक्रमाबद्दल स्वतंत्रपणे जरूर लिहा!
18 Dec 2013 - 2:38 pm | सूड
त्या फ्लेक्सवर काय लिवलंय ते दिसंना !!
'हे आता थांबलंच पायजे' येवढंच वाचता आलं.
18 Dec 2013 - 5:45 pm | विजयराजे
प्रत्येक गडावर भगवा आणि हा फ़्लेक्स आम्ही लावणार आहोत तसेच गडावरील दारूच्या बाटल्या आणि कचरा गोळा करून खाली आणणार आहोत.
18 Dec 2013 - 6:08 pm | विजयराजे
18 Dec 2013 - 3:06 pm | सुहास..
हरिश्चद्रंगडावार मिपाकरांचा कट्टा असे शीर्षक जास्त सुट झाले असत.....गडापेक्षा जास्त मिपाकरांचेच फोटो आहेत :(
काय प्रतिसाद देवु ते देखील कळेना !!
18 Dec 2013 - 6:16 pm | विजयराजे
19 Dec 2013 - 10:09 am | किसन शिंदे
असाच एक फ्लेक्स मढे घाटाच्या नावाने याआधी बर्याचदा पाहीलाय. किल्ले हरिश्चंद्राच्या जागी मढे घाट, बाकी सगळं तसंच्या तसंच.