दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा.
शाळेतील दिवाळीची सुट्टी जाहीर झाल्यापासून दिवाळीचा आनंद सुरू व्हायचा. आज येईल, उद्या नक्की येईल, अशी दिवाळीच्या सुट्टीची नोटिस घेऊन येणार्याा शिपायाची आतुरतेने वाट पाहायची. हो, माझ्या लहानपणी शाळेतील प्रत्येक वर्गात ध्वनिक्षेपक वगैरे नसायचा. सूचनावहीद्वारे प्रत्येक वर्गात कुठलीही महत्त्वाची घोषणा व्हायची. तो आला की दिवाळीच्या अनारसारखेच आमचे चेहरे फुलायचे. दिवाळीच्या सुट्टीच्या घोषणेचा आनंद बाक वाजवून साजरा केला जायचा. अगदी ‘मॅडमनी’ किंवा ‘सरांनी’ दिवाळीच्या अभ्यासाच्या नावाखाली तो हिरावून घ्यायचा प्रयत्न केला, तरीही. कोंडवाड्यातून गुरे सोडावीत, तसे दिवाळीच्या सुट्टीआधीच्या शेवटच्या दिवशी आम्ही चारही दिशांना उधळायचो.
घरी झाडलोट, साफसफाई, पितळेची भांडी, पाणी तापवायचा बंब चिंच लावून घासून चकाचक करण्याने दिवाळीची सुरुवात व्हायची. आई फराळाचे अनेक पदार्थ करायची. चकल्या (अत्यंत आवडत्या), चिवडा, कडबोळी (अजिबात आवडायची नाहीत), करंज्या, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, अनारसे, शेव, शंकरपाळे असे सर्व पदार्थ त्या काळी फक्त दिवाळीतच दृष्टीस पडायचे. आईचा हात ‘अन्नपूर्णेचा’ होता. अत्यंत चविष्ट आणि भरपूर फराळ बनवणं हे तिचं वेडच होतं. आमचं घर मोठं असल्याने उडदाचे, तांदळाचे, पोह्याचे, बटाट्याचे पापड, कुरडया, साबुदाण्याच्या पापड्या, चिकवड्या, उपासाचा बटाट्याचा चिवडा इत्यादी उन्हाळी पदार्थ बनवायला आजूबाजूच्या ८-१० बिर्हाडातल्या आईच्या मैत्रिणी यायच्या. सहकारी तत्त्वावर सर्वांचे पदार्थ बनायचे. पण दिवाळीचा फराळ आई कोणाच्या मदतीशिवाय एकहाती बनवायची. माझी आणि ताईची तिला मदत असायचीच, पण घरची 'एक्झिक्युटिव्ह शेफ' तीच असायची. रद्दी पेपरचे A4 आकाराचे तुकडे कापून त्यावर चकल्या पाडल्या जायच्या. मांडी घालून जमिनीवर बसायचं आणि समोर कागद घेऊन त्यावर चकली पाडायची. मांडी घालून बसायचा कंटाळा आला की उक्कड बसायचं. पण उक्कड बसून चकल्या पाडायच्या म्हणजे जाम हसू यायचं. भाजणीच्या पिठाचा गोळा भरायच्या आधी सोर्याला पाण्याचा हात लावावा लागतो. चकली पाडण्यासाठी सोर्या जोरात दाबला की कधीकधी ‘चमत्कारिक’ आवाज यायचा. मला जाम हसू यायचं. ताईलाही हसू आवरायचं नाही. आई रागवायची. पण कधीकधी तिलाही हसू अनावर झालं आणि तिचा राग फुसका आहे हे जाणवलं की आम्ही गडबडा लोळून हसून घ्यायचो. अनारसे करताना अजिबात हसायचं नाही, असा तिचा नियम होता. ‘हसल्याने अनारसे फुटतात’ असं ती म्हणायची. माझी आणि ताईची नजरानजर झाली की मला (आणि तिलाही) कारण नसताना हसू यायचं. मग आई दोघांनाही बाहेरच्या खोलीत पिटाळायची.
आकाशकंदिलाला कागद चिकटवणं हे शाळेला सुट्टी लागल्यानंतर पहिलं काम असायचं. कधीकधी आकाशकंदिलाचा सांगाडा जुना झाला आहे, ह्या सबबीखाली नव्याने सांगाडा बनवला जायचा. एक जरा ओलसर बांबू मिळवायचा. त्याच्या कामट्या बनवायच्या आणि त्या मापाने कापून दोर्यााने घट्ट बांधून दणकट आकाशकंदील तयार व्हायचा. मग मैद्याची खळ बनवून त्यावर रंगीबेरंगी कागद आणि बॉर्डरला सोनेरी कागद, सांध्यांवर कागदी फुलं चिकटवायची. नंतर वर-खाली कागदाच्या करंज्या चिकटवून तो उंचावर टांगायचा आणि झिरमिळ्या लावायच्या. झाला कंदील तयार. त्या पाठोपाठ दारासमोर मातीचा ओटा करायला लागायचा. ८ फूट X १० फूट आणि ६ इंच उंच. आधी विटा मांडून चौकोन करून घ्यायचा. त्यात माती आणून टाकायची. पाणी शिंपडून ठोकून घ्यायची. हे वजनदार धुपाटणं आमच्याकडे नव्हतं. मग ते ओळखीत मागून आणायचं. नीट ठोकून ठोकून माती बसवली की ती वाळायला तीन दिवस लागायचे. (तोपर्यंत फळ्या टाकून त्यावरून ये-जा करायची). असा तो ओटा वाळला की गाईचं ताजं शेण आणून तो सारवायचा. शेणाचा वास मला आवडतो. त्यामुळे मी हे काम हौसेने करायचो. कधी ताई नाहीतर आई करायची.
एव्हाना एकेका खुसखुशीत पदार्थांनी चकचकीत पितळी डबे भरून फडताळात आपापल्या जागी पोहोचलेले असायचे. दिवाळीच्या सुट्टीत ह्या सर्व डब्यांकडे, त्यांच्या ‘अंतरंगा’वर विचार करत मी फार प्रेमाने आणि आशाळभूत नजरेने पाहत राहायचो. वडिलांकडे फटाक्यांची यादी द्यायला लागायची. माझे आवडते फटाके म्हणजे सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बार, डबलबार, बाण, चिड्या, मोठे अनार, इलेक्ट्रिक किंवा तडतड्या फुलबाज्या, इलेक्ट्रिक फटाक्यांच्या माळा; तर साध्या फुलबाज्या, टिकल्या, भुईचक्र, सुदर्शन चक्र, छोटी झाडं, रंगीत काड्यापेट्या आणि साप अशी ताईची अगदी ‘साने गुरुजी’ छाप यादी असायची. ताईच्या यादीत मी काही लक्ष्मी बार, इलेक्ट्रिक फटाक्यांची लड असे ‘बाबुराव अर्नाळकरी’ फटाके घुसवायचो. पण माझी चलाखी वडिलांच्या नजरेतून सुटायची नाही. मग आम्हा तिघांत जरा एक छोटीशी गोलमेज परिषद व्हायची आणि माझ्या जास्तीच्या काही मागण्या मान्य व्हायच्या. पुढे ३-४ दिवस ह्या फटाक्यांना ‘ऊन दाखवणं’ हा प्रकार असायचा.
करता करता दिवाळीचा पहिला दिवस म्हणून ‘वसुबारस’ उजाडायचा. संध्याकाळी फटाके उडवायला परवानगी मिळावी म्हणून मी वडिलांकडे एक ‘दुष्टीअर्ज’ करायचो. पण ‘आज नाही. उद्या, धनत्रयोदशीपासून’ असा दम मिळायचा. अर्ज फेटाळला गेल्याने मी हिरमुसून, इतरांचे फटाके ‘ऐकायला’ बाहेर जाऊन बसायचो. आमच्या घराला मोठ्ठी गॅलरी आणि लाकडी कठडा लाभला आहे. दर फुटावर एकेक पणती, पायर्यां वर दोन्ही बाजूला एक-एक अशा सहा पणत्या, रांगोळीशेजारी (हे ताईचं डिपार्टमेंट) दोन पणत्या, आकाशकंदिलात एक, मागच्या दारी तिन्ही पायर्यांरवर दोन-दोन अशा एकूण सहा पणत्या, बाथरूमच्या खिडकीत एक अशा असंख्य दीपज्योती आणि डौलदार आकाशकंदिलाने आमचं राहतं घर उजळून निघायचं. राजवाडाच जणू.
रांगोळीच्या पुस्तकातून ‘४० बूँदे खडे आणि ३५ बूँदे आडे’ अशी भव्यदिव्य रांगोळी ताई काढायची. त्यात मनमोहक रंग भरले जायचे. दारावर लेसचं तोरण लागायचं. माझ्या लहानपणी आमच्या घरी वीज नव्हती. ती नंतर आली. त्यामुळे तेव्हा विजेची माळ वगैरे चैन नव्हती. आईने केलेलं लेसचं राजेशाही तोरण, नाहीतर ताईने फुटक्या बांगड्या मेणबत्तीच्या ज्योतीवर तापवून, वाकवून केलेलं रंगीबेरंगी काचेचं तोरण असायचं.
धनत्रयोदशीला धनाची (पिताश्री त्यासाठी कोर्यात करकरीत नोटा आणायचे), सोन्याच्या बांगड्यांची पूजा व्हायची. मला त्यात रस नसायचा. मी अधिर असायचो सुतळी बॉम्बचा दणदणीत आवाज घुमवायला. आईकडून गूळ-खोबर्याचा नैवेद्य मिळाला की वडिलांकडून फटाक्यांसाठी ‘हिरवी झंडी’ मिळायची. संपूर्ण दिवाळीभर फटाके पुरले पाहिजेत, म्हणून कुठल्या दिवशी कुठले आणि किती फटाके उडवायचे, ह्याचं कोष्टक तयार असायचं. ‘हिरवी झंडी’ मिळताच सुतळी बॉम्बच्या वातीवरील कागदाचं पातळ आवरण काढून आतील काळा धागा काळजीपूर्वक बाहेर काढला जायचा. हा चटकन पेटतो आणि हळूहळू जळतो. उदबत्तीने बॉम्बची वात पेटवली जायची. ताई विस्फारल्या नजरेने, कानात बोटं घालून उभी असायची. आधी हळूहळू आणि नंतर एकदम सुरसुरत 'धSSSSड्डाSSSSSSSम्म्म्म'करून सुतळीचा, तोफ उडविल्यासारखा आवाज आख्ख्या गल्लीत घुमायचा आणि पेठकरांची दिवाळी सुरू व्हायची. ‘सांभाळून रे!’ वडील माफक दम भरायचे. कुठे अनार, कुठे भुईचक्र, कुठे सुदर्शन चक्र अशी आतशबाजी सुरू व्हायची. हाका मारून मारून आईला बोलावणी पाठवायला लागायची. पण तिला ‘घरचं काम’ असायचं. शेवटी आमच्या इच्छेखातर थोडा वेळ ती ओट्यावर येऊन आमच्या आनंदात सहभागी व्हायची.
नर्कचतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठायला लागायचं. भयंकर थंडी (त्या काळी) असायची. मागच्या दारी दात घासताना कुडकुडायला व्हायचं. डोळ्यांवरची झोप उडायची नाही. पण आपल्याही आधी उठून आईने मागच्या दारी पणत्या लावल्या आहेत, वडिलांनी आकाशकंदिलात, तसंच इतर २५-३० पणत्या लावल्या आहेत, हे पाहून त्यांच्याबद्दल कौतुकमिश्रित आश्चर्य आणि आदर वाटायचा. पाटासमोर रांगोळी आणि एक पणती असायची. अशा सुशोभित आसनाशेजारी दिवाळीचं खासमखास तेल, टाटाचं लाल रंगाचे सुगंधी कॅस्टर ऑईल एका वाटीत, तर उटणं दुसर्याम वाटीत असायचं. त्या सुगंधी तेलाने आई रगडून मालिश करायची. वर्षभरात एकदाच आईचा हात प्रेमभराने माझ्या अंगाला लागायचा. पण त्यानेही वर्षभर खाल्लेल्या रट्ट्यांचा आणि पट्ट्यांचा विसर पडायचा. हाताला, पायांना, पाठीला, पोटाला (पोट नव्हतंच त्या काळी. च्च्च! गेले ते दिन गेले...) डोक्याला, चेहर्याला सुवासिक तेलाने मसाज व्हायचा. नंतर उटणं नावाची मला भयंकर आवडणारी गोष्ट अंगाला फासली जायची. अशा तर्हेने मी चहूबाजूंनी सुगंधी व्हायचो. तोपर्यंत वडील आंघोळीला गेलेले असायचे. ४-६ तांबे पाणी अंगावर घेऊन झाले की बाथरूमचा दरवाजा उघडायचा. मग त्यांचं औक्षण व्हायचं. मी किंवा ताई फुलबाजी ओवाळायचो. पुन्हा दरवाजा बंद आणि साग्रसंगीत आंघोळ व्हायची. त्या नंतर बाथरूममध्ये मी घुसायचो. हो, घुसायचोच. मला फटाके उडवायचे असायचे नं! पुन्हा तेच विधी. थंडी वाजत असायची, औक्षण व्हायचं. डोक्यावर तांदूळ पडायचे, ताई फुलबाजी ओवाळायची. त्या फुलबाजीच्या टोचणार्याघ ठिणग्या आणि फटाक्याच्या दारूचा मस्त खमंग वास. औक्षणविधी आटोपला की बंबातलं गरम पाणी संपेपर्यंत किंवा आईच्या लक्षात येऊन ‘आता बस झालं, आमच्या आंघोळी बाकी आहेत’ असं ती ओरडेपर्यंत, अंग शेकत आंघोळ करायची. आंघोळ झाली की नवे कोरे करकरीत कपडे (ह्यांचा वास आणि थंडीत सुखावह वाटणारा तो टोचणारा स्पर्श...) अंगावर चढवायचे. थोरामोठ्यांच्या (माझ्यापेक्षा सर्वच जण मोठे होते) पाया पडायचं. आईने दिलेला फराळ आणि दूध घाईघाईने पोटात ढकलून फटाक्यांची पोतडी बाहेर काढायची. आजच्या दिवसाचा कोटा बाहेर काढून धूमधडाका सुरू व्हायचा. एव्हाना ताईसुद्धा आंघोळ वगैरे उरकून फराळ करतच ओट्यावर यायची. फटाक्यांचा षौक पुरा केला जायचा.
अजून उजाडलेलं नसायचं. असंख्य पणत्यांमुळे प्रकाशमान होऊन आमचं आणि गल्लीतील इतर घरं विखुरलेल्या मोत्यासारखी चमचमत असायची. गल्लीतील मित्रमैत्रिणी नवनवीन वसने लेवून वगैरे मस्तपैकी सण साजरा करीत असायची. कसली फिकीर नाही. बहुतेकांनी सुट्टीच्या पहिल्या तीन दिवसांतच दिवाळीचा गृहपाठ ‘उरकल्या’मुळे सण साजरा करण्यात एक मनस्वी मोकळेपणा असायचा. त्या मोकळ्या वातावरणात, वर्षभरात ज्यांच्याशी कांही कारणाने ‘कट्ट्या’ झाल्या असतील, त्यांच्याशी कुणा मित्राच्याच मध्यस्थीने ‘बट्ट्या’ व्हायच्या. अवघडलेपणा दूर व्हायचा. वेगवेगळ्या घरांसमोरील आकर्षक रांगोळ्या, आकाशकंदील पाहायला एक प्रभातफेरी व्हायची. विविध रांगोळ्या. तेलावरील रांगोळी, वाळूचे आकार (बहुतेक वेळा फ्लॉवरपॉट) बनवून 3D रांगोळी, पुढार्यांाची छायाचित्रं (नेहरू, टिळक, गांधीजी वगैरे) वापरून त्यांची हुबेहूब बनवलेली रांगोळी. विविध किल्ले, चित्रविचित्र स्थिर आणि फिरते आकाशकंदील पाहण्यास सकाळ उजाडायची. घरी परतेपर्यंत पुन्हा भूक लागलेली असायची. मग पुन्हा निवांत फराळ व्हायचा. दुपारची वेळ ही खासकरून टिकल्या फोडायची असायची. आईची वामकुक्षीची वेळ आणि माझी टिकल्या फोडायची वेळ, कशी कोण जाणे, एकच असायची. त्यामुळे ‘एSSSS जरा शांतपणे झोपू दे बघूSSSS!’ असा, ‘नाहीतर फोडून काढीन’ हा गर्भित इशारा असणारा सज्जड दम मिळाला की मी पळायचो गल्लीतील कालच्या रात्री ‘न फुटलेले’ फटाके शोधायला.
लक्ष्मीपूजनाला गव्हाने भरलेल्या तबकात चांदीची लक्ष्मी ठेवली जायची. तिची विधिवत पूजा व्हायची. पूजा झाली की दूध-साखरेचा नैवेद्य मिळायचा. उलट्या मुठीने किंवा शर्टाच्या बाहीला तोंड पुसत लक्ष्मी देवीला आणि मोठ्यांना वाकून नमस्कार करायचा आणि फटाके उडवायला पळायचो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाहेर फटाक्यांचा धडाका असतो. मीही ऐय्याशी करून घ्यायचो. एका लांब काठीला खिळा लावून त्यावर लवंगी फटाके फोडत ताई बसलेली असायची. तिच्याकडे एक केविलवाणा दृष्टिक्षेप टाकून मी पणतीवर इलेक्ट्रिकच्या माळेला पेटवून अंगणात फेकायचो आणि पुन्हा एकवार तिच्याकडे विजयी कटाक्ष टाकायचो. उगीचच.
पाडव्याला वडिलांचं औक्षण व्हायचं. औक्षण तबकात ते पाच रुपये टाकायचे. ही त्या काळी मोठ्ठी रक्कम होती. निरांजनाच्या प्रकाशात आईचा चेहरा उजळायचा. वडिलांच्या चेहर्याषवर मंद की काय म्हणतात तसं स्मित असायचं. जेवणात त्यांच्या आवडीचे गुलाबजाम असायचे. बसायला चांदीची फुलं बसवलेला पाट, चांदीचं ताट, वाटी, तांब्या-भांडं, ताटाभोवती सुरेख रांगोळी आणि उदबत्त्याळात मंद तेवणार्या, सुगंधाची उधळण करणार्या उदबत्त्या.
भाऊबीजेपर्यंत मी महत्प्रयासाने फटाके वाचवलेले असायचे. भाऊबीज फटाक्यांविना सुनीसुनी जाऊ नये, ताईला वाईट वाटू नये असं वाटायचं (वर्षभर भांडायचो, खोड्या काढायचो). भाऊबीजेला सर्व फटाके फोडून टाकायचो. भाऊबीज जोरात असायची. एकुलती एक बहीण आहे. नंतर पाटावर बसायचं, जरीची टोपी घालायची. (ती उलटी की सुलटी - माझ्या लक्षातच यायचं नाही. वडील ओरडायचे आणि नीट करायला लावायचे.) ताई कपाळावर कुंकवाचा टिळा लावून अक्षता टाकायची. सोन्याच्या अंगठीने एकदा सुलट- एकदा उलट असं फिरवून निरांजनाचं तबक ओवाळायची. मग वडिलांनीच दिलेला कोरा करकरीत रुपया मी उदार मनाने जहागीर लिहून द्यावी तसा, निरांजनापासून दूर, तबकात टाकायचो. ताईचं महत्त्व आणि प्रेम आयुष्यात अनेकदा अनुभवलं आहे. भाऊबीज असो नाहीतर राखी पोर्णिमा - ज्यांना सख्खी बहीण नाही, त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. आई-वडील, पती-पत्नी, भाऊ-भाऊ ही नाती महत्त्वाचीच; पण बहीण-भावाच्या नात्याची सर इतर नात्यांना नाही.
दिवाळी संपली तरी अजून तुळशीच्या लग्नाची आशा असतेच. आवाज करणारे फटाके संपलेले असतात. तुरळक फुलबाज्या, ताईकडे लवंगीच्या माळा वगैरे उरलेले असतात. फराळावर आईचं नियंत्रण आलेलं असतं. ‘आल्यागेल्या पाहुण्यांसाठी असू देत जरा दिवाळीचे पदार्थ’ असं सांगते. तरीही बेसनाचा किंवा रव्याचा लाडू कुठूनतरी काढून हातावर ठेवतेच.
वडिलांना ओवाळलं गेलं, आम्हा भावंडांना ओवाळलं गेलं. पण आईला कोणी ओवाळलं? कोणीच नाही. तिच्यासाठी फुलबाज्या का नाही पेटवल्या आपण? पुढच्या वर्षी नक्की आईलाही ओवाळायचं, तिच्यासाठी फुलबाज्या पेटवायच्या, असा संकल्प (वर्षभरात पुन्हा विसरण्यासाठी) केला जायचा आणि दिवाळीच्या सुखद आठवणी मित्रांमध्ये वाटण्यासाठी मी ‘वेळापत्रकानुसार’ दप्तर भरू लागायचो.
प्रतिक्रिया
1 Nov 2013 - 1:56 pm | पियुशा
व्वा व्वा काका जियो , रम्य ते बालपण अन रम्य त्या आठवणी :)
1 Nov 2013 - 2:14 pm | विटेकर
अगदी.. अगदी..
मजा आली वाचताना ! च्यायला ते बालपणं अंमळ लौकरच संपलं
1 Nov 2013 - 2:15 pm | चित्रगुप्त
मस्त आठवणी.
अगदी अशीच दिवाळी असायची आमच्यापण बालपणी.
फक्त मला स्वतःला फटाके अजिबात नको असत, मात्र 'चांदोबा' अगदी हवा-हवासा असे.
1 Nov 2013 - 2:19 pm | ऋषिकेश
आमच्या दिवाळीच्या आठवणींचे तपशील पूर्ण वेगळे आहेत.. पण भावना, उत्साह असाच..
नॉस्टॅल्जिक लेखन तेच ते होत असलं तरी टाळावत नाही हेही खरंच!
1 Nov 2013 - 2:24 pm | यशोधरा
किती हृद्य लिहिलं आहेत काका! फार आवडल्या आठवणी :)
1 Nov 2013 - 2:30 pm | मुक्त विहारि
" हाका मारून मारून आईला बोलावणी पाठवायला लागायची. पण तिला ‘घरचं काम’ असायचं. शेवटी आमच्या इच्छेखातर थोडा वेळ ती ओट्यावर येऊन आमच्या आनंदात सहभागी व्हायची."
इकडे पण असेच.सध्या तीच भुमिका बायको निभावत आहे.
1 Nov 2013 - 2:39 pm | बहुगुणी
खूप आवडला. जवळजवळ प्रत्येक डिटेल आणि संदर्भाशी नातं ओळखू आलं.
(हा लेख वाचून दिवाळी अंकात वाचनखुणा साठवता येत नाहीयेत याची खंत वाटली. असो. नक्कीच फॉरवर्ड करण्यासारखा लेख झाला आहे.)
1 Nov 2013 - 3:30 pm | गवि
एकदम त्या वातावरणात घेऊन जाणारा लेख. पहाटेची अंधारी थंड हवा. तेलाचा सुगंध आणि उटण्याची खरखर..
आणि बाहेर फटाक्यांचा दाणदाण आवाज.. फटाक्याच्या दारुचा ठसकेदार वास आणि आधी चकली उचलू की आधी बेसनलाडू अशा विचारात लाळावलेली जीभ.. खरंतर आग असूनही डोळे निववणार्या पणत्या.. आणि तिच्यावर फुलबाजीचा पहिला पेट.. असं पंचेंद्रियांनी त्या ठिकाणे हजेरी लावून आलो, इतका उत्तम लेख.
1 Nov 2013 - 3:48 pm | mvkulkarni23
Nice article. Khup detail lihile aahe. Crisp karta aale aste....
1 Nov 2013 - 3:54 pm | विजुभाऊ
पेठकर काका. दिवाळीत विठोबाच्या देवळात पहाटे पाचला होणारी काकड आरती आठवली. नरकचतुर्दशीचे कीर्तन आठवले. अचानक हात आरतीसाठी पुढे झाला. कपाळाला कोणीतरी बुक्का लावला.
सर्वे:सुखीनःसन्तु सर्वे सन्तु निरायम, सर्वे भद्राणी पश्यन्तु. मा कश्चीत दु:ख भाग्भवेत......
1 Nov 2013 - 4:38 pm | पैसा
त्या काळात घेऊन गेलात अगदी!
1 Nov 2013 - 5:03 pm | प्यारे१
+१
सुंदर आठवणी.
1 Nov 2013 - 7:25 pm | राही
अद्भुतरम्य आठवणींचा अद्भुतरम्य काळ. पणत्या त्याच (किंचित फॅशनेबल झाल्यात म्हणा..),फटाके तेच(थोडेसे अॅड्वान्स्ड) पण आता नजर ती नाही. चिमुकले मिचमिचे डोळे आता चष्म्याआड गेलेत. तरीही आठवणींनी काचा धुरकट झाल्याच.
लेख आवडला. तपशिलात थोडी भर : मोती साबण राहिला, आणि गोठलेले खोबरेलही.. अंगाला सुगंधी तेल असे पण केसांसाठी खोबरेलच. आणि मग तेलाची ती कथली न्हाणीजवळ नाही तर बंबाजवळ ठेवून द्यायची कारण ऐन थंडीत तेलाचा तो थिजलेला गोळा डोक्याला चोळायचा म्हणजे एक दिव्य असे.
आणि हो, अधून मधून दिवाळीत हलकासा पाऊस पडे आणि ठिपक्यांच्या रांगोळीवर थेंबांची आणखी एक नक्षी तयार होई....
1 Nov 2013 - 7:43 pm | प्रभाकर पेठकर
खरं आहे. घाईघाईत (लेख द्यायची वेळ टळून गेली होती) एका बैठकीत लेख लिहीला आहे. लेख लिहून मिपा संपादकांना पाठविल्यानंतर मोती साबणाची आठवण झाली पण राहिला तो राहूनच गेला. असो. मोती साबणाशिवाय मध्यमवर्गीय दिवाळीला पूर्तता नाही एव्हढे मात्र १००% खरे.
3 Nov 2013 - 9:41 am | सुधीर
मोती साबणाचा धागा पकडून डॉ. संजय ओकांनी लिहिलेला "उठा उठा दिवाळी आली" हा लेखही आवडला.
1 Nov 2013 - 8:40 pm | अनन्न्या
"वडिलांना ओवाळलं गेलं, आम्हा भावंडांना ओवाळलं गेलं. पण आईला कोणी ओवाळलं? कोणीच नाही!" खरं आहे! पण आता आईच्या भूमिकेत आल्यावर त्यातला आनंद कळतो. घेण्यापेक्षा देण्यात जास्त सुख वाटते.
1 Nov 2013 - 10:36 pm | पाषाणभेद
छान आठवणी जागवल्यात काका तुमच्या लेखाने!!
1 Nov 2013 - 11:22 pm | चाफा
प्रत्येक प्रसंग उभा केलात डोळ्यासमोर.. आगदी नेमकेपणे, केवळ अप्रतिम :)
2 Nov 2013 - 1:25 am | शिद
बालपणीच्या सगळ्या आठवणी जश्याच्या तश्या उभ्या केल्या डोळ्यासमोर…काका दंडवत स्वीकारा _/\_
आणि शेवटचा परिच्छेद तर केवळ अप्रतिम…. डोळ्यांत पाणी आले वाचून व बालपणीच्या आठवणींनी.
2 Nov 2013 - 1:26 am | रेवती
अगदी सुरेख लेखन आहे. कितीतरी आठवणी ताज्या झाल्या. दर दिवाळीत माझीही साने गुरुजी छाप यादी असे. मग ती आणायला कोणत्यातरी मैदानावर शिवकाशी असं लिहिलेल्या अनेक स्टॉल्स असलेल्या ठिकाणी जायचं. टिकल्या, फुलबाज्या, भुईनळा एवढं मिळालं तरी उरायचं, मग 'आयटम बॉम्ब्' ;) फोडून संपले की भाऊ माझे फटाके वापरून टाकायचे. मोठी झाल्यावर मला आईनं तेल लावलेलं नको असायचं. मग एका दिवाळीत ती म्हणालीच की बायो, पुढचा तुझा दिवाळसण असणार, त्या गडबडीत तेल लावून व्हायचं नाही. त्यावर आँ? माझं कुठं लग्न ठरलय? असं म्हणालेले आठवतय. नंतर खरच दोन महिन्यात लग्न ठरलं. ही आठवण दर दिवाळीत हटकून येतेच! आता मुलाला तेल लावायला घेतलं की याचं आपलं नाक मुरडलेलं. तरी लावतेच! सगळ्यांना चांदीची ताटं, तांब्या फुलपात्री दिवाळीत आणि ज्याच्या त्याच्या वाढदिवसाला बाहेर काढली जायची. देवाची चांदीची उपकरणीही तेंव्हाच निघायची! मग तुम्ही वर्णन केलय तसं औक्षण! टोपीची मागची शिवणीची बाजू हमखास पुढं यायची, मग ती मागं करायची. आणि दर दिवाळीत बाबांच्या लहानपणची दिवाळी हे भाषण तेच ते ऐकायचं. ;)
2 Nov 2013 - 2:06 am | किलमाऊस्की
घरापासून लांब असल्याने जास्त भिडलं. रम्य ते बालपण!
2 Nov 2013 - 1:21 pm | दिपक.कुवेत
पुर्विची दिवाळि अगदि डोळ्यासमोर उभी केलीत. दिवाळिच्या मनःपुर्वक शुभेच्छा!
2 Nov 2013 - 1:46 pm | आदूबाळ
मस्तच, पेठकरकाका!
2 Nov 2013 - 2:19 pm | प्रकाश घाटपांडे
मस्त दिवाळी उभी केलीत. दिवाळीच्य सुट्टीची जी प्रतिक्षा असायची ती काही औरच. औक्षण करुन घेताना किती मस्त वाटायच. गेल ते दिन गेले!
2 Nov 2013 - 7:52 pm | अनिता ठाकूर
सगळं जसच्या तसं आठवलं. मोती साबण, गोठलेलं खोबरेल असायचच. पण, आजही दिवाळी साजरी होतेच की.तीही छानच असते.फक्त आपण आता 'बाल' राहिलो नाही, त्यामुळे आपले प्राधान्यक्रम बदलले एवढेच!
2 Nov 2013 - 8:53 pm | प्रभाकर पेठकर
खरं आहे. त्यामुळेच तक्रार नाही.
2 Nov 2013 - 11:31 pm | सुधीर
माझ्या लहानपणी दिवाळीच्या गृहपाठासाठी पण एक खास वही करावी लागायची. तो गृहपाठ नुसताच अभ्यास नसायचा. त्यात, हस्तकाला, चित्रकला आणि इतर गमतीशीर गोष्टीही असायच्या. मजा यायची करताना. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुटी संपल्यानंतर सुंदर वही असणार्याला बक्षिस असायचं.
वर म्हटल्याप्रमाणे मोती साबणाशिवाय दिवाळी अपूर्णच! फटाक्यांचं "राशनींगही" अगदी सेम! अजून एक, दिवाळीच्या सुटीत कंदील उडवणं. (मला पतंग बदवता नाही यायची) पण ते कंदील लावायला मदत करायला आणि फिरकी पकडायलाही मजा यायची. कित्येक वर्षांनी आजचं आम्ही चार मित्रांनी गच्चीवर कंदील उडवला. मजा आली.
लेख भूतकाळात गेऊन गेला. सुंदर!
3 Nov 2013 - 11:10 pm | किसन शिंदे
अतिशय सुंदर लिहलंय पेठकर काका. शब्दन शब्द फार म्हणजे आवडला. काही ठिकाणी तुम्ही केलेल्या कोट्यांना खूदकन हसूही आलं. :)
5 Nov 2013 - 3:40 am | जुइ
आठवणी. बर्याच वर्षानी मागील दिवाळी माहेरी राहाता आले. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
5 Nov 2013 - 6:48 am | भानस
एकदम मस्त आठवणी. भावूक करुन गेल्या.. आजोळच्या आठवणी जाग्या झाल्या.
5 Nov 2013 - 10:39 am | चतुरंग
सगळ्या आठवणी जागवल्यात. मी आणि माझी धाकटी बहीण सुद्धा असेच आईला मदत करायला बसायचो, कागदावर चकल्यांची चक्रे टाकत. मधेच एखाद्या चकलीचे चक्र विस्तारलेले सुटेसुटे पडले की आईची बारीक नजर असे ती लगेच ते सुधारायला सांगायची. थोडे मोठे झाल्यावर तळणीजवळ सुरक्षितपणे वावरता येते आहे याची खात्री पटल्यावर चकल्या तळायला देखील मदत करीत असे. दुसरे मोठे काम म्हणजे अनरशाचे पीठ पाट्यावर कुटून देणे ते मोठे काम आणि ताकदीचे म्हणून मला आवडे. आणखी नाजूक काम म्हणजे काटेरी चाकाच्या चमच्याने करंज्या कातणे, हे फार आवडायचे!
फटाक्यांचे असंख्य प्रकार त्यात भुईचक्र आणि रंगीत नळे फार आवडायचे. अॅटमबाँब सुद्धा असायचेच.
नुकत्याच विझलेल्या फुलबाज्यांच्या तापत्या काड्यांनी चटका बसू नये म्हणून पायात चपला घालूनच फटाके उडवायला जायचा दंडक असे.
तेल, उटणे आणि मोती साबण ही त्रिमूर्ती त्याकाळी घरोघरी असायचीच.
माझी आई चित्रे उत्तम काढते आणि तिच्या रांगोळ्याही बर्याचदा ठिपक्यांच्या नसून मुक्त चित्रकला असे. फडकणारा झेंडा, आकाशकंदील अशी चित्रे ती काढे. त्या आधी रस्त्याचा तेवढा भाग स्वच्छ झाडून घेणे मग त्यावर सडा टाकून शेणाने सारवून घेणे ही कामे आम्ही करीत असू. आणि नंतर मग रांगोळीत रंग भरण्याचेही.
आता परदेशातही शक्य तितक्या सर्व गोष्टी करुन दिवाळीचे वातावरण अनुभवतोच. काळाप्रमाणे गोष्टी बदलतातच त्यामुळे फार वाईट वाटून घ्यायचे नाही हे खरे. पण लेख वाचून तो अनुभव पुन्हा एकवार जगलो हे खरेच!
(मोतीप्रेमी) रंगा
5 Nov 2013 - 12:39 pm | दिपोटी
प्रभाकर पेठकर,
अतिशय सुरेख लेख! अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तुमची लिहिण्याची शैली तर छानच आहे, त्यामुळे अथ ते इति लेख वाचनीय झाला आहे.
फराळ करण्याची तयारी, 'साने गुरुजी छाप' / 'बाबुराव अर्नाळकरी' फटाके ... गोलमेज परिषद ... फटाक्यांचा कोटा ... आईची न झालेली ओवाळणी ... क्या बात! एकूणच लेखातील बर्याचशा आठवणी वाचकाला आपापल्या लहानपणीच्या काळात नेऊन सोडतात.
- दिपोटी
5 Nov 2013 - 9:24 pm | इन्दुसुता
आमच्याकडे अमेरिकन साबण / मोती साबण असे. अमेरिकन साबण ( वडिलांनी आणलेला) फक्तं दिवाळीत वापरल्या जात असे. अजूनही त्या साबणाचा वास आठवतो.. नंतर मोती साबणच... आणि गोठलेले खोबरेल तेल...
पण आईला कोणी ओवाळलं? कोणीच नाही. तिच्यासाठी फुलबाज्या का नाही पेटवल्या आपण? पुढच्या वर्षी नक्की आईलाही ओवाळायचं, तिच्यासाठी फुलबाज्या पेटवायच्या
हे काम, जराशी कळती झाल्यावर माझे असे. फक्तं माझेच, माय प्रिव्हिलेज ( अॅन्ड माईन अलोन )!!!
सर्व आठवणी आल्या आणि परत एकदा सर्व एन्जॉय केल्या.
6 Nov 2013 - 6:34 am | स्पंदना
किती सुरेख वर्णन आहे पेठकरकाका.
न पहाताही तुमच दिवाळीच्या पणत्यांनी झगमगणार घर डोळ्यासमोर उभे राहीले.
8 Nov 2013 - 10:07 am | सौंदाळा
मस्त लेख पेठकरकाका,
दिवाळी झाल्यावर वाचला आणि परत एकदा दिवाळी साजरी केल्यासारखे वाटले.
8 Nov 2013 - 11:47 am | रुमानी
आज हि दिवाळी तशिच आहे थोड्या फार फरकाने ,फकत आजि गेले तिच्य सोबत काकड आरतीची मज्जा पण गेली आनि आता आई च्या जागी स्वत: आहोत म्ह्नुन पुन्ह पाडव्याच्या दिवशी माहेरी जान्याची ओढ लागते . पण मामाच्य गावी (आजोळी) जाउन दिवाली साजरी करण्यात एक वेगळीच मज्जा होति....! :)
14 Nov 2013 - 12:27 pm | त्रिवेणी
खुपच मस्त लिहिलय काका
मी 3 इ. पर्यन्त आजीकडे होते रहायला. आजीकडे ही मागच्या अंगणात बंब असायच. आजी, मावशी बरोबर माझीही रांगोळी साठी लगबग असायची. पण पुढच्या अंगणात मावशी रांगोळी काढायची मलाही तिथेच बाजूला रांगोळी काढायची असायची. पण तेव्हा माझी रांगोळी म्हणजे भारी प्रकरण असायचे. मावशी मग चिडायची तिच्या रांगोळी शेजारी नवीन रांगोळीचा प्रकार पाहून, मग आमची भांडण. त्यात मी पडले जावयाची पोर सो मला न रागावत आजी मावशीला रागवायची, असू दे लहान आहे ती. नंतर वाटाघाटीअंती मी मागच्या अंगणात रांगोळी काढायची.
शेणाने अंगण सारवणे हे सुद्धा खुप आवडायचे. कामवालीला सांगुन शेण मागवायची, कधी नाही मिळाले तर तिला परत पाठवायचे शेण शोधून आण म्हणुन. तिने सारवायला घेतले की परत माझी लुडबूड सुरू व्हायची.
दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्टीत तर मी रोज अंगणात कढीलिंबाच्या झाडाखाली खाटेवर बसुन जेवायचे.