बाई : मराठी नाट्यसृष्टीत या संबोधनाशी निगडीत असलेला - आणि त्यातून लगोलग ध्वनित होणारा - आदरयुक्त आणि जिव्हाळापूर्ण दबदबा-दरारा गेल्या कित्येक वर्षांपासून-दशकांपासून राखून असलेल्या मराठी रंगभूमीच्या अध्वर्यू - विजया मेहता ... एक मनस्वी-तपस्वी रंगयात्री! अखिल मराठी - किंबहुना खरंतर भारतीय व काही अंशाने जागतिक सुध्दा - रंगभूमीला दशकानुदशके अत्यंत मोलाचे योगदान देऊन कित्येक दर्जेदार नाटकांच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा उचलणार्या प्रयोगशील विजयाबाई आज त्यांच्या निवृत्तीच्या काळात सुध्दा त्यांची ही आगळी प्रतिभा टिकवून आहेत ही खचितच एक विशेष व आश्वासक बाब आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'झिम्मा : आठवणींचा गोफ' या एका ओघवत्या-रसाळ शैलीत मांडलेल्या व अनंत आठवणींच्या कोषात डोकावून पहाणार्या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात त्यांच्या या प्रतिभेची-प्रगल्भतेची चुणूक पुन्हा एकदा दिसून येते. प्रत्येक नाट्यप्रेमीने जरुर वाचावं असं हे पुस्तक. १९५१ सालापासून ते आजतागायत नाटकासाठी-रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या बाईंच्या - आणि रंगभूमीच्याही - अनेक स्थित्यंतरांतून घडलेल्या रंगयात्रेचा हा सफरनामा मराठी रंगभूमीवर प्रेम करणार्या रसिक प्रेक्षक-वाचकाला शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवेल यात संदेह नाही. नाटकवेड्या मराठी प्रेक्षकवर्गाची अभिरुची व अनुभव-विश्व संपन्न-समृध्द करणार्या विजयाबाईंच्या अफाट कार्याची पोचपावती त्याच वर्गातील एका सर्वसामान्य प्रेक्षकाच्या भूमिकेतून देणे निव्वळ एवढाच या लेखनप्रपंचामागील उद्देश वा प्रयोजन.
विजयाबाई या पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत होत. लहानपणापासून घरात - जवळच्याच नात्यांतील नलिनी जयवंत, शोभना समर्थ व त्यांच्या कन्यका नूतन-तनुजा यांच्यामुळे - मोहमयी हिंदी चित्रसृष्टीशी जवळचा संबंध येऊन देखील त्यांची भावनिक जवळीक मात्र सतत मराठी रंगसृष्टीशी राहिली. पुढे दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी विवाह झाल्यावर देखील हिंदी चित्रपटांच्या मायाजालामध्ये न गुरफटण्याचा निर्णय त्यांनी कायम ठेवला हे पहाता 'आपल्या मराठी रंगभूमीचे नशीब बलवत्तर' असेच म्हणावयास हवे.
साठ-सत्तरच्या दशकांत तेंडुलकर-खानोलकर-एलकुंचवार व इतर समकालीन संवेदनक्षम नाटककारांची, नाट्यक्षेत्रातील तत्कालीन प्रचलित रुढींना सुरुंग लावून आणि प्रमाण मानल्या गेलेल्या प्रस्थापित संकेतांची चौकट नाकारुन वा प्रसंगी धुडकावून देऊन प्रयोगशीलतेला प्राधान्य देणारी, नवनवीन नाटके-एकांकिका 'रंगायन' वा अन्य माध्यमांतून मंचावर आणण्यात बाईंचा आणि त्यांच्या जोडीने अरविंद देशपांडे-सुलभा देशपांडे-माधव वाटवे-कमलाकर सारंग-श्रीराम लागू या त्यांच्या सहकार्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. 'रंगायन' संस्था - व त्या अनुषंगाने एक चोखंदळ प्रेक्षकवर्ग सुध्दा - उभारुन प्रायोगिक एकांकिका-नाटकांची चळवळ त्या काळात त्यांनी दहा-बारा वर्षे जोमाने चालवली. सतत काहीतरी नवीन करण्याचा-देण्याचा ध्यास घेतलेल्या बाई प्रायोगिक-समांतर रंगभूमीने त्या काळात अक्षरशः झपाटल्या गेल्या. मात्र पुढे दुर्दैवाने जेव्हा 'रंगायन' अंतर्गत बेबनाव-मतभेदांमुळे फुटली तेव्हा प्रायोगिकतेच्या चौकटीतच कायम रहाण्याच्या विचारांचे गाठोडे-ओझे ऊराशी न बाळगता व्यावसायिक - किंवा, त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, लोकमान्य - रंगभूमीवर सुध्दा तितक्याच ताकदीने व उत्साहाने त्या परत कार्यरत झाल्या व स्थिरावल्या. वैयक्तिक जीवनात सुध्दा, लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांतच - पदरात दोन लहान मुलं असताना - पतिनिधनाचा प्रचंड आघात सोसून व त्यामुळे आयुष्याला मिळालेली विलक्षण कलाटणी पचवून, बाई न खचता परत कंबर कसून उभ्या राहिल्या. पुढे कालौघात फरोख मेहता यांच्याशी पुनर्विवाह करुन त्या पुनश्च स्थिरस्थावर झाल्या.
'श्रीमंत', 'मादी', 'एक शून्य बाजीराव', 'अजब न्याय वर्तुळाचा', 'पुरुष', 'बॅरिस्टर', 'महासागर', 'हमीदाबाईची कोठी', 'वाडा चिरेबंदी', 'हयवदन', 'सावित्री' अशी अनेक लक्षणीय नाटके-एकांकिका तसेच 'पेस्तनजी', 'रावसाहेब', 'स्मृतिचित्रे' अशा अनेक लक्षवेधी चित्रकृती बाईंच्या रेखीव-बांधीव दिग्दर्शनाने फुलल्या-फुलवल्या. केवळ अर्थकारणाच्या - म्हणजेच 'गल्ल्याच्या गणिता'च्या - दृष्टीने पाहिल्यास यातील बरीचशी चांगलीच तरली-तरारली-फोफावली असली तरी क्वचित काही बुडाली-फसली देखील. मात्र यातील प्रत्येक कृतीवर आपला असा एक वैशिष्ठ्यपूर्ण कलात्म ठसा उमटवून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व बाईंनी निश्चितच प्रस्थापित केले. बाईंनी स्वतःची अशी एक स्वतंत्र पठडी वा घराणं निर्माण केलं याविषयी दुमत असू नये. मराठी नाट्यक्षेत्रातील आजचे अनेक आघाडीचे व प्रथितयश कलाकार त्या काळात बाईंच्या हाताखाली हळूहळू जडत-घडत गेले. विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, नाना पाटेकर, रिमा लागू, भक्ती बर्वे, प्रदीप वेलणकर, सुकन्या कुलकर्णी, उदय म्हैसकर, नीना कुलकर्णी अशा अनेक अभिनयनिपुण कलाकारांची एक अख्खी नवीकोरी फळी त्यांच्या कुशल दिग्दर्शकीय हातातून तयार झाली.
नाटकाची संहिता व तिचा आशय-आकृतीबंध-शैली-मांडणी-संघर्ष-गुंता-अवकाश-पट या सार्यांचा साकल्याने पूर्ण अभ्यास केल्याशिवाय नाटकाच्या तालमींचा विचार सुध्दा करु नये असे त्यांचे स्पष्ट मत असे. भूमिकेचा संपूर्ण पोत-गाभा-बेअरिंग मनामध्ये आतून सापडल्याशिवाय व त्या भूमिकेचे विविध सारे कंगोरे-धागे-पदर-स्तर-छटा पूर्णपणे समजावून-चाचपून घेऊन पूर्वतयारी झाल्याखेरीज नाटकातील अगदी दुय्यम भूमिका करणार्या कलाकाराने सुध्दा रंगमंचावर - पहिल्यावहिल्या तालमीसाठी देखील - पाऊल टाकता कामा नये हा त्यांचा नियमवजा खाक्या वा शिरस्ता नाट्यप्रयोग एकसंध-बंदिस्त होण्यास व विस्कळीत-खंडित न होण्यास मदत करतो. कलाकाराने केवळ सवंग लोकप्रियतेसाठी वा हमखास टाळ्या मिळवण्यासाठी जिवाचा आटापिटा करण्यापेक्षा अथवा रोजचा रतीब घातल्यासारखा अभिनयाच्या निव्वळ 'जिलब्या' पाडण्यापेक्षा प्रत्येक भूमिका स्वतःशी ताडून-तपासून पाहून व त्या भूमिकेमागील लेखकाच्या-दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाशी-विचारांशी एकनिष्ठ राहून काम करण्यावर भर द्यावा याकडे त्यांचा कल दिसून येतो. नटाने आपली बलस्थाने आणि मर्यादा दोन्ही नेमकी ओळखली तर भूमिका समजून-भिनवून घेण्याच्या प्रक्रियेस त्याची मदतच होते असा साधासरळ पण महत्वाचा विचार त्यांनी मांडला. त्यांच्या अनेक नाटकांतील कलाकारांना बेगडी-भडक-आत्मकेंद्री - किंवा, बाईंच्या शब्दात, 'टरफली' - अभिनयापासून दूर ठेवून त्यांच्याकडून सहजसुंदर-उठावदार अभिनय करवून घेण्यास व नैसर्गिकरीत्या भूमिका सादर होण्यास ही त्यांची शिस्त व मेहनतच कारणीभूत झाल्याचे सातत्याने दिसते.
बर्याचदा बाईंमधील कसलेली अभिनेत्री त्यांच्यातील दिग्दर्शिकेवर चक्क मात करताना दिसत असे. 'संध्याछाया'मधील परदेशस्थ पुत्राच्या विरहाने झुरणारी प्रेमळ कुटुंबवत्सल नानी असो वा 'बॅरिस्टर'मधील केशवपन केलेली-आलवण नेसलेली-भावनेच्या कोंडमार्याने घुसमटणारी मावशी असो किंवा 'हमीदाबाईची कोठी'मधील कोठी-संस्कृतीतील गायकी परंपरेचा र्हास असहाय्यपणे पहाणारी हमीदाबाई असो अथवा 'वाडा चिरेबंदी'मधील पतिनिधनानंतर कोसळणारी नाती व वाड्याचं ढासळणारं गतवैभव पचवणारी विधवा आई असो - बाईंनी मात्र समोर हाती आलेल्या भूमिकेला केवळ न्याय आणि संपूर्ण न्यायच दिला. गोळीबंद संवादफेक, हवा तो परिणाम नेमका साधण्यासाठी संवादांतील लयीवर आणि प्रसंगी शब्दविरामांवर देखील दिलेला भर, चेहर्यावर पसरलेले अस्सल हावभाव आणि अचूक देहबोली यातून व्यक्तिरेखा नेमकी पकडून प्रत्ययकारकपणे जिवंत उभी करण्याकडे त्यांचा कटाक्ष दिसून येतो.
'लाईफलाईन' ही त्यांनी ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस दिग्दर्शित केलेली व हॉस्पिटलच्या जीवनावर बेतलेली अप्रतिम दूरदर्शन-मालिका कोण विसरेल? उत्तम दिग्दर्शनाचा एक आदर्श नमुना ठरलेली ही मालिका आजही मनात घर करुन आहे, हे त्यातील तन्वी आझमी, संजय मोने, केके रैना, सुकन्या कुलकर्णी, चंदू पारखी अशा उत्तमोत्तम अभिनेत्यांच्या समर्थ अभिनयाच्या जुगलबंदीमुळे हे निश्चित. निव्वळ उदाहरणादाखल सांगायचं झालं तर, चंदू पारखी या प्रचंड ताकदीच्या-दमाच्या व तरीही प्रसिध्दीच्या झोताबाहेर राहून काम करणार्या अभिनेत्याने साकारलेली गुजराती-मिश्रित हिंदी बोलणार्या हरकाम्या वॉर्डबॉयची या मालिकेतील लक्षवेधी भूमिका आजही कित्येकांच्या चांगली लक्षात असेल. 'पेस्तनजी'मधील मनाचा-नात्यांचा-सत्याचा तळ शोधणारा नसिरुद्दीन 'पिरोजशा' शहा व त्याचा जिवलग मित्र अनुपम 'पेस्तनजी' खेर, 'पुरुष'मधला खलवृत्तीचा-सत्तांध नाना 'गुलाबराव' पाटेकर व परिस्थितीमुळे गांधीवादाकडून हिंसेकडे सरकलेली रिमा 'अंबिका' लागू, 'बॅरिस्टर'मधील उच्चशिक्षित-भारदस्त विक्रम 'रावसाहेब' गोखले व दाराआड अडकलेली सुहास 'राधाक्का' जोशी अशा एकाहून एक सरस व दिग्गज कलाकारांच्या संचांकडून त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन व त्यांच्याकडून अविस्मरणीय काम करवून घेऊन एकेक अभिजात कलाकृती रसिकांसमोर त्या काळात नित्यनेमाने सादर करणे हे एक त्या विजयाबाईच जाणोत. आजही या सर्व रथी-महारथी कलाकारांच्या बोलण्यातून बाईंबद्दलचा आदर-जिव्हाळा-ओलावा डोकावताना दिसतो.
केंद्र शासनाने १९८७मध्ये बाईंना 'पद्मश्री' प्रदान करुन त्यांच्या रंगकार्याचा यथोचित गौरव केला. याचबरोबर त्यांना 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार', 'कालिदास सन्मान', 'तन्वीर सन्मान', 'विष्णुदास भावे सुर्वणपदक', महाराष्ट्र शासनाचा 'नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार', 'नाट्यदर्पण पुरस्कार', चतुरंग प्रतिष्ठानाचा 'जीवनगौरव पुरस्कार', 'रावसाहेब'मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय फिल्म पारितोषिक, एसएनडीटी विद्यापीठाची डॉक्टरेट, इचलकरंजी मराठी नाट्यसंमेलनाध्यक्षपद असे अनेक सन्मान-किताब-मानमरातब मिळाले पण बाई काही बदलल्या नाहीत. एकंदरीतच रंगभूमीकडे एका निकोप व अभ्यासू वृत्तीने पहाण्याचा त्यांचा निरोगी दृष्टिकोन आजही त्यांच्या मुलाखतींमध्ये वा लेखनामध्ये कायम असलेला-ठसलेला दिसतो.
दामू केंकरे, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सुलभा-अरविंद देशपांडे अशा मराठी रंगकर्मींबरोबरच इब्राहिम अल्काझी, अदी मर्झबान, अलेक पदमसी, गिरीश कर्नाड, बादल सरकार अशा अमराठी नाटकमंडळींमध्ये देखील त्यांचा राबता असे. हळूहळू हिंदी-इंग्रजी रंगभूमीवर देखील - थोड्याफार प्रमाणात का होईना - अभिनय आणि/अथवा दिग्दर्शन करुन बाईंनी आपला कार्यपरीघ विस्तारला. याचबरोबरीने 'पाश्चात्य रंगमंचावरील जे भावले ते मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे' या भावनेने बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या 'कॉकेशियन चॉक सर्कल'चे रुपांतर 'अजब न्याय वर्तुळाचा', आयनेस्को यांच्या 'चेअर्स' या एकांकिकेचे अनुवादित रुप 'खुर्च्या' या व अशा इतर काही विदेशी नाट्यकृती त्यांनी मराठी रंगमंचावर आणल्या. याच धर्तीवर 'मराठी नाटकांतील काही उत्तम कृती सुध्दा पाश्चात्य प्रेक्षकांसमोर सादर झाल्या पाहिजेत' असा विचार करुन जर्मन दिग्दर्शक फ्रिट्झ बेनेव्हिट्झ व ब्रिटिश दिग्दर्शक पीटर ब्रुक यांच्या मदतीने 'अजब न्याय वर्तुळाचा', 'मुद्राराक्षस', 'शाकुंतल', 'हयवदन', 'नागमंडल' या नाटकांचे प्रयोग - मूळ व/वा रुपांतरित वेषात - परदेशी मंचांवर सादर केले. भाषिक-सांस्कृतिक-भौगोलिक मर्यादा ओलांडून त्यांनी मराठी नाटक सीमेपार नेले. मुंबापुरीतील शिवाजी मंदिर ते साहित्य संघ ते भुलाभाई मेमोरियल इन्स्टिट्यूट ते भारतीय विद्या भवन ते एनसीपीए असा रंगभूमीच्या विविध पातळ्यांवर थेट व चौफेर संचार लीलया करणार्या बाईंनी उर्वरित भारतातील - आणि परदेशातील - नाट्यप्रेमींचे सुध्दा लक्ष वेधून घेतले यात अजिबात नवल नाही.
कारकीर्दीच्या उत्तरार्धात बाईंनी 'एनसीपीए'च्या संचालकपदाची धुरा तब्बल सतरा वर्षे सांभाळली. नाटकांच्या प्रयोगांच्या कारणाने त्यांचे होत असलेले झंझावाती आंतरराष्ट्रीय दौरे - विशेषतः युरोपमधील अथक भ्रमंती - पहाता, मराठी साहित्य-कलाजगतातील कोणालाही न सोडता आपल्या निखळ-निर्विष विनोदाने कोपरखळ्या मारणार्या ठणठणपाळाने त्यांचे 'विजयोस्की मेहतोविच' असे नामकरण केले यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. अशा या प्रतिभासंपन्न व प्रसन्न-दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या विजयोस्कीबाईंनी वयाची आरोग्यपूर्ण अशी किमान शंभरी गाठो, सध्याच्या निवृत्तीतून - थोड्याच काळासाठी का होईना - बाहेर पडून त्यांच्या हातून अजून काही दर्जेदार नाट्यकृतींची सृजनशील निर्मिती घडो आणि मराठी रंगभूमीला त्यांच्या वरदहस्ताचा उदंड आशीर्वाद सतत व चिरंतन लाभो हीच रंगशारदेच्या आणि नटराजाच्या चरणी प्रार्थना!
————————————————————————
प्रतिक्रिया
1 Nov 2013 - 3:28 pm | बहुगुणी
एका उत्तुंग कारकीर्दीचा आढावा आवडला. धन्यवाद! (त्यांची कलाकार कन्या अनाहिता उबेरॉय हिच्याबद्दल नुकत्याच वाचलेल्या कुठल्यातरी लेखाच्या संदर्भात ही सर्व माहिती पुन्हा एकदा डोळ्याखालून गेली होती.)
1 Nov 2013 - 4:52 pm | प्यारे१
+१ आवडलं.
1 Nov 2013 - 8:37 pm | शिवोऽहम्
बाईंची छान ओळख! आवडली हेवेसांनल.
2 Nov 2013 - 3:17 am | प्रभाकर पेठकर
अगदी शब्दाशब्दाशी सहमत.
'अखेरचा सवाल' ह्या नाटकाद्वारे विजयाताईंच्या अस्सल अभिनयाचा पोत अनुभवास मिळाला. तसेच, त्यांनी एनसीपीएत आयोजित केलेल्या एका शिबिराला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.
विजयाताईंनी दिग्दर्शित केलेले प्रत्येक नाटक म्हणजे दिग्दर्शनाची एक एक कार्यशाळाच म्हणावी असे. त्यांच्या बद्दल लिहावं/बोलावं तितकं कमीच.
त्यांच्या कार्याचा आढावा एका लेखात घेणं शक्यच नाही पण प्रयत्न स्तुत्य आहे.
2 Nov 2013 - 7:59 am | पैसा
एका महान म्हणाव्या अशा कलावतीचा प्रवास छान वर्णन केला आहे. छान ओळख!
2 Nov 2013 - 9:15 am | मुक्त विहारि
धन्यवाद...
3 Nov 2013 - 9:24 pm | सुधीर मुतालीक
..... किती महान रंगकर्मीला दिवाळी अंकाच्या या पटलावर आणलंस ? सर्वात प्रथम धन्यवाद. बाईंच्या बाबतीत बोलताना, वाचताना, लिहिताना मला " लाइफलाईन " चा उल्लेख नाही झाला तर, तर रागच येतो ! कारणे दोन, बहुदा तीन : एक तर बाईंची लाइफलाईन ही - माझ्या लेखी - सर्वात उच्च कामगिरी आहे. ही मालिका कमाल होती, क्रिएटीविटीची हद्द होती. अभिनयाची चटक लागुन नुकतीच थोडीफार मला त्यावेळी ( १९८८-८९ ) नाटकवाला अशी - अगदी थोडी ओळख मिळायला लागली होती. त्यामुळे बाईंचे दिग्दर्शन हा माझा माझ्या नाट्यविश्वातला एक अति महत्वाचा संदर्भ होता. मोने, पारखी, ( बहुदा अजय भुरे सुद्धा - जो हल्ली विवेक बेळे लिखित अलिबाबा आणि चाळीशीतले चोरचे दिग्दर्शन करतो ) यांच्यावर तर मी इतका फिदा होतो - की ( पैसे उधार घेऊन ) मोने, पारखी यांना पुण्या ठाण्याला भेटून आलो ! …. तुझ्या या लेखामुळे त्या सगळ्या आठवणी मला माझ्या एका खूप मस्त विश्वात घेऊन गेल्या. लेख मस्त झालाय. तुझे प्रचंड कौतुक - या विषयावर तुला लिहावेसे कसे वाटले …. ?
4 Nov 2013 - 5:02 am | दिपोटी
प्रतिसाद देणार्या सर्वांचे सर्वप्रथम आभार!
प्रभाकर पेठकर, विजयाबाईंच्या कार्यशाळेत उपस्थित रहाण्याची संधी मिळाली हे निश्चितच तुमचे भाग्य.
सुधीर मुतालीक, ‘लाईफलाईन’ ही बाईंची सर्वोच्च कामगिरी आहे या तुमच्या मताशी एकदम सहमत. पण मग ‘पुरुष’, ‘बॅरिस्टर’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘हमीदाबाईची कोठी’ ही सर्व नाटके आठवली की मात्र ‘त्यांची सर्वोच्च कामगिरी कोणती’ याविषयी पार द्विधा मनःस्थिती होते. केलेल्या कामाचा दर्जा एका उत्तुंग शिखरावर नेणेच नव्हे तर तो तेथे सातत्याने कायम देखील राखणे हे मात्र एखादी प्रतिभावंत व्यक्तीच साधू शकते. या विषयावर मला लिहावेसे का वाटले? मला नाटकांचे अतिप्रचंड वेड आहे. वयाच्या एकतिसाव्या वर्षांपर्यंत मुंबईकर असताना पाहिलेली असंख्य नाटके आजही चांगलीच लक्षात आहेत. मात्र गेली बरीच वर्षे परदेशस्थ असल्याकारणाने आजकाल मंचावर येणारी सर्वच मराठी नाटके पहायला मिळतात असे नाही, पण तरीही एखाद-दोन वर्षांतून् होणार्या प्रत्येक मुंबई-भेटीत जमेल तेवढी व जमेल तेव्हा नाटके बघून घेतो. शिवाजी मंदिरात जवळजवळ पडीकच असतो असे म्हणायला देखील हरकत नाही. महिन्याभराच्या मुक्कामात दहा-पंधरा नाटके सहज होतात. अर्थात आजकाल सर्वच नाटके दर्जेदार असतात असेही नाही. पण एकंदरीत, अशा रीतीने बघत असलेल्या नाटकांबरोबरच मराठी रंगसृष्टीशी संबंधित असलेल्या लेख-पुस्तके-मुलाखती वाचून सुध्दा, मराठी रंगभूमीशी जमेल तेवढा संपर्क ठेवण्याचा व नाटकांविषयी एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून असलेली विशेष आस्था-प्रेम कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या स्पष्ट मते आपण सर्व आपल्या सकस-समृध्द अशा या मराठी रंगभूमीचे व त्या भूमीवरील रंगकर्मींचे देणे लागतो. चित्रगृहातील मोठ्या पडद्याचा - वा दिवाणखान्यातील छोट्या पडद्याचा – चंदेरी-रुपेरी मोह टाळून (वा किमानपक्षी कमी करुन) नाट्यगृहाचा पडदा वर गेल्यावर निव्वळ एक जिवंत अनुभव रसिकांना देण्यासाठी झटणार्या सर्व नाटकमंडळींचे आपण ऋणी आहोत. या भावनेतूनच याआधी मी विजय तेंडुलकर (http://www.misalpav.com/node/12389) व दिलीप प्रभावळकर (http://www.misalpav.com/node/19839) यांच्यावर देखील लेख लिहिले होते, जे मिपावर प्रकाशित केले आहेत.
• संपादक मंडळास विनंती : या लेखासोबत जोडलेली सर्व पाच छायाचित्रे low resolution मुळे फार धूसर आली आहेत. मी पाठवलेली मूळ छायाचित्रे मात्र medium-high resolution होती, जी फाईल-साईझ मोठी नसूनही वरील आकारमानासाठी मात्र चांगली sharp आहेत. ही मूळ छायाचित्रे तुम्हाला वर लेखासोबत जोडता-दाखवता येतील का? मी संपादन करण्याचा प्रयत्न करुन पाहिले, पण ‘पिकासावेब’वरील माझ्या अल्बममधील छायाचित्रे येथे दिसतच नाहीत. (कदाचित मी कोठेतरी चुकत असेन). दिलीप प्रभावळकरांवर २०११ साली लिहिलेल्या माझ्या लेखातील (http://www.misalpav.com/node/19839) सहा छायाचित्रे सुध्दा आता दिसत नाहीत (जी दोन वर्षांपूर्वी दिसत होती). प्रभावळकरांवरील माझा हा लेख तर मी आता संपादन देखील करु शकत नाही. Any tips/help for inserting images from PicasaWeb into the articles over here? येथील ‘वाविप्र’चा / मदत पानाचा आधार घेऊन फायदा झाला नाही.
आज ४ नोव्हेंबर … विजयाबाईंचा ७९वा वाढदिवस! वयाच्या ८०व्या वर्षात पदार्पण करताना त्यांना आपल्या सारख्या असंख्य प्रेक्षकांच्या (आणि, अर्थातच, मिपाकरांच्या) वतीने अनेकानेक शुभेच्छा!
- दिपोटी
6 Nov 2013 - 6:22 am | दिपोटी
शेवटी - बर्याच प्रयत्नानंतर - छायाचित्रे sharp / high-resolution mode मध्ये चढवण्यात आली आहेत.
- दिपोटी
4 Nov 2013 - 5:25 am | यशोधरा
पुस्तक ओळख आवडली.
4 Nov 2013 - 8:16 am | सुधीर कांदळकर
अनेक आठवणी जाग्या झाल्या. छबिलदासमध्ये मोठे मोठे कलाकार तिकीट काढून येत. सिगरेट ओढीत बसलेले अमोल पालेकर आवर्जून आठवतात. अरविंद देशपांडे यांच्या आठवणीतून दिलीप कुलकर्णी, चित्रा पालेकर, यांच्या पण आठवणी जाग्या झाल्या आणि काळजात कळ उमटली.
छान पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद.
6 Nov 2013 - 7:03 am | स्पंदना
"वाडा चिरेबंदी" हे मला अतिशय आवडलेल नाटक.
व्यवस्थीत अन मांडणीबद्ध लेखन.
6 Nov 2013 - 9:50 am | इन्दुसुता
लेख आणि माहिती आवडली
1 Dec 2013 - 10:37 pm | रेवती
लेखन आवडले.