तुम्ही काहीही म्हणा मंडळी पण आमची १९५० च्या दरम्यान जन्मलेली पिढी फार नशीबवान हं. आता एक बरीक खरं की आम्हाला नाही पहायला मिळाला महात्माजींचा 'चले जाव' चा नारा. ना आम्हाला पहायला मिळाले ब्रॅडमनचे एका दिवसात केलेले त्रिशतक! आम्ही वंचित राहिलो प्रभातचे चित्रपट अगदी ताजे ताजे असताना पाहण्यापासून. आमच्या नशिबी नव्हताच हो विजय मर्चंट यांचा नाजूक स्क्वेअर कट. मग म़हंमद निसार, लारवूड यांचा तुफानी मारा निरखणे दूरच. मित्रानो, आम्हाला गणपती उत्सवात "आई" ही कविता म्हणून रसिकांच्या काळजाला हात घालणारे,"त्या गावी त्या तिथवर चल झरझर मना पुन्हा", "बेईमान झालो पुरा,पुरा मी देशाचा अपराधी खरा", "वारा फोफावला", अशी रसाळ गीते ऐकवणारे गजाननराव वाटवे त्यांच्या ऐन उमेदीत असलेले पहायला मिळाले नाहीत. आम्ही जाणते झालो त्यावेळी तलतचा मखमली आवाज बाजूला सारून रफी साहेब राज्य करू लागले होते. शम्मी कपूरच्या 'तुमसा नही देखा' ने सारे चित्रच पालटून टाकले होते राव! आमच्या जन्माअगोदरच कुंदनलाल सैगल (बाबुल मोरा, क्या मैने किया है), पंकज मलिक (ये राते ये मौसम हंसना हसाना, सुंदर नारी प्रीतम प्यारी), सुरेंद्र (आवाज दे कहां है), सी एच आत्मा (प्रीतम आन मिलो) असे खर्ज सम्राट हजेरी लावून गेलेले होते. अशोक कुमार-दादामुनी यानीही गायकांच्या यादीत आपल्या परीने हजेरी लावली होती. जोहराबाई अंबालावाली, काननबाला, सुरय्या यांचे आवाजही लोकप्रियता मिळवून होते. आमच्या हातून नारायणराव राजहंस बालगंधर्व यांच्या दाणेदार ताना, 'दादा ते आले ना' सारखे संवाद निसटले होते. मास्टर दिनानाथांची,"रवि मी हा चंद्र कसा मग", "दिव्य स्वांतंत्र्य रवि", "शांत शांत कालिका ही", "परवशता पाश दैवे", अशा पदांमधून झेप घेणारी तडफदार गायकी प्रत्यक्ष झाले आज सूर्यदर्शन अशा पुण्याईने ऐकायला मिळाली नाहीत. होय तरीही आमची ही पिढी भाग्यवान-नशीबवान!
कारण आमच्या या काळात म्हणजे साधारण १९५९ ते २०१० दरम्यान अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडल्या. दूरदर्शन आले, डीएन्ए टेस्ट आल्या, नॅनो टेक चा उदय झाला. स्टेमसेल थेरपी हा शब्द कानी पडला. किडनी ट्रान्सप्लान्ट, मानवाची चंद्रावर स्वारी, संगणकाचे युग, इंटरनेट, धान्यक्रांति, प्रिकास्ट स्लॅब्स! काही विचारू नका. मळसूत्राचा शोध, चाकाचा शोध, विजेचा शोध, इंटर्नल कम्बस्शन इंजिनचा शोध असे महान शोध पाहिलेल्या ही अनेक पिढ्या असतील पण आम्ही अनुभवलेला बदलाचा वेग त्यांच्या नशिबी होता का? नव्हता.
पण आजच्या लेखाचा विषय जरा वेगळाच आहे. या चाळीसेक वर्षात आम्हाला अनेक वैशिष्ट्यपूर्ण आवाजाच्या गायकानी आपल्या आवाजाने भारून टाकले.त्यांच्या आमच्या आयुष्यातील संचाराची ही गाथा.
पहिले नमन करितो वंदन. मग माझ्या भूतकाळात मी शिरतो. १९५७ चा सुमार असेल मी अगदीच चारेक वर्षाचा. आईचा हात पकडून गणपती पहायला गेलेला. स्थळ आपले पुणे जिल्ह्यातले भोर. आरास छोटीशीच. मागे स्पीकरवर गाणे चालू आहे. "एका तळ्यात होती बदके पिले सुरेख". त्या वयात त्या आवाजाने मोहिनी घातली ती अजूनही आहे. आशाबाईचाच तो आवाज! मग या आवाजाने काय दिले नाही असाच प्रश्न पडावा. "शूरा मी वंदिले" असो की "आओ हुजूर तुमको", वा "दम मारो दम", "चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी" असो वा "नाविका चल तेथे", "आगे भी जाने ना तू" असो की "काली घटा छाय मोरा जिया घबराय", " निगाहे मिलानेको जी चाहता है" असो की "युं सजा चांद"! बाई आपली कित्येक वर्षे न थकता गातेय. ग्रेट! ग्रेट!! काय आहे आशाबाईंचे खास? त्यानीच सांगितलेय ते. "गळा सोडला तर मी तुमच्यासारखीच आहे. मी कुणासाठी गाते याचा विचार माझ्या मनात पक्का असतो. तो गायकी अभिनय आपोआप मग बाहेर येतो." आशाताईंचा आवाज बेस कडे मस्त जसा 'यही वो जगाह है' (ये रात फिर ना आयेगी) तसा तो सुनले पुकार (संगीतकार रवि)' या गीतात पार तार सप्तकाला कवेत घेतो. तितक्याच सामर्थ्याने. चित्र विचित्र हरकती, आलापी, मुरक्या ऐकायच्या असतील तर ओपी-आशा हे कॉम्बो जरूर ऐका. विशेषकरून 'जाईये आप कहां' आलापीसाठी (मेरे सनम) व 'आओ हुजूर तुमको'- सेन्सुअस आवाजासाठी (किस्मत).
आशाताईंच्याच घरात असलेले एव्हरेस्ट कोणते ते आपण सर्वजण जाणतोच. लतादीदी यानी निकड म्हणून गायनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. एरवी मा. दिनानाथ जर जगते तर दीदीचे लग्न केंव्हाच झाले असते असे त्यांचे बंधूंचे म्हणणे. नियतीने दिनानाथांची इहलोकाची यात्रा संपवून त्यांच्या पोटचे हे रत्न या देशाला अर्पण केले. बारीक आवाज आहे अशी या आवाजाबाबत प्रथम तक्रार करणार्यांनीच या पातळ पण बावनकशी आवाजाला मग कालांतराने आपल्या हृदयातच स्थापिले नाही तर डोक्यावर घेतले. "खामोश है जमाना.... आयेगा आनेवाला, मुश्किल है बहोत मुश्किल चाहत का भुला देना" ही अप्रतिम गाणी सुरवातीच्याच काळात त्याना लाभली. गुणी गायिका नूर जहाँन यानाही या आवाजाचा मोह पडावा इतका अस्सलपणा लाभला होता लताबाईंच्या दैवदत्त आवाजाला . रोशन (जुर्मे उल्फतकी हमे लोग सजा देते है, सारी सारी रात तेरी याद सताये, दुनिया करे सवाल, रहे न रहे हम), नौशाद (बेकसपे करम कीजिये, उठाय जा उनके सितम , प्यार किया तो डरना क्या, न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहां जाते), सलील चौधरी (मिला है किसी का झुमका, आजा रे परदेसी, मचलती आरजू खडी बाहे पसारे, ओ सजना बरखा बहार आयी) सचिनदा (ठंडी हवाए, तुम न जाने किस जहांमे खो गये, फैली हुई है सपनोंकी बाहें), लक्ष्मी प्यारे (मेरे दिलमे हलकीसी, कोई नही है फिर भी है मुझको,आ जाने जा), सी रामचंद्र (ये जिंदगी उसीकी है, बलमा अनाडी मन भाये, बलमा बडा नादान है, धीरे से आजा अखियनमे नींदिया) खरे तर अशी यादी करून हात थकून जातील. लताबाईंचा आवाज मात्र वेगळेपणाने खुलला तो त्यांचे मानलेले भाऊ मदनमोहन यांच्या बरोबर. लताबाईही मदनभैयाचे गाणे असले की कोठून तरी खास आर्त लगाव आणून या गाण्याना लावीत. (है इसीमे प्यार की आबरू, जाना था हमे दूर बहाने बना लिये, मेरी बीना तुम बिन रोये, आप की नजरोने समझा जो हमे दास्तां अपनी सुनायी) या गीताना लताबाईंच्या स्वरांचा परिसस्पर्श झालेला दिसतो. अर्थात लताबाई समोर गाणार आहेत या जाणिवेनेच मदनमोहन यांची प्रतिभा झपाट्याने कामाला लागत असणारच. लताबाईंच्या आवाजाचा विचार करताना मराठीतील वसंत प्रभू याना विसरून जाईल तो कृतघ्नच म्हणावयास हवा. (जन पळ भर, आली हासत पहिली रात, प्रेमा काय देऊ तुला आणि अनेक) या गीतातील गोडी अनेक पारायणांनंतरही संपणारी नाही. काय आहे लताबाईंच्या आवाजाचे खास? मध्य व तार सप्तकात खुलून दिसणारा, पातळ आवाज असला तरी प्रत्येक उच्चार अगदी रजिस्टर होणारच असा! शिवाय शास्त्रीय संगीताची बैठक पक्की. मराठी मातृभाषा पण उर्दू उच्चार तितकेच निर्दोष!
साठाचे दशक गाजविले ते एका खास आवाजाने. त्या अजरामर आवाजाचे नाव मोहंमद रफी. नायकाचा आवाज कसा असावा याचा मानदंड रफींच्या आवाजाने तयार झाला तो अगदी १९६९ सालचा "आराधना" हा सिनेमा येईपर्यंत. तीनही सप्तकात त्याच शुद्धतेने चालणारा. पहाडी आवाज म्हणजे रफी साहेब. तलत सारखी सॉफ्ट गीतेही ते म्हणू शकत (फिर वो भूली सी याद आयी है, सुहानी रात ढल चुकी) व मन्ना डे यांच्यासारखी शास्त्रीय संगीताची बैठक असलेली गीतेही.(मधुबनमे राधिका, कुहु कुहू बोले कोयलिया) नायकाच्या प्रमाणे आपल्या स्वरधर्मात काहीसा बदल करून नायक गळ्यातूनच उभा करणे हे रफींचेच वैशिष्ट्य. शम्मी कपूर (तारीफ करू क्या उसकी, लाल छडी मैदान खडी, तुमने मुझे देखा होकर मेहरबां), राजेंद्र कुमार (मेरे मेहबूब तुझे, बहारो फूल बरसाओ), देवानंद (क्या से क्या हो गया, मै जिंदगीका साथ निभाता चला गया, अपनी तो हर आह एक तुफान है), धमेंद्र (गर तुम भुला न दोगे, आज मौसम बडा बेईमान है, मै कही कवि न बन जाऊं ), जीतेंद्र (ढल गया दिन हो गयी शाम, अरे हो गोरिया कहां तेरा देस), दिलीपकुमार (कोई सागर दिलको बहलाता नही, तेरे हुस्न की क्या तारीफ करूं) या गीतांची ही केवळ अल्पशी झलक. यातून रफी तो नायक आपल्या आवाजातून कसा उभा करू शकत हे दिसायचे. या खेरीज शायराना अंदाज (किसीकी यादमे दुनियाको हम भुलाये हुए, मै निगाहे तेरे चेहरेसे हाटाऊं कैसे, हमको तुम्हारे इश्कने क्या क्या बना दिया, कल रात जिंदगीसे मुलाकात हो गयी, ये महलो ये तख्तो य ताजो की दुनिया), देशभक्ती (अपनी आजादीको हम, ऐ वतन ऐ वतन हमको तेरी कसम), विनोदी (जंगलमे मोरा नाचा, ऑल लाईल किल्यर, हम काले है तो क्या हुवा दिलवाले है), शास्त्रीय संगीतप्रचुर (मधुबनमे राधिका नाचे रे, नाचे मन मोरा , राधिके तूने बन्सरी चुरायी), मुलांसाठी (नन्हे मुन्हे बच्चे तेरी मुट्ठीमे मे क्या है, हम भी अगर बच्चे होते.) अशा बहुविध रित्या रफीनी स्वत:ला सादर केले.
रफी लता आशा ही प्रामुख्याने या काळात यशाच्या शिखरावर असले तरी मुकेश, मन्ना डे, हेमंत कुमार, महेंद्र कपूर, १९६९ पर्यंत किशोर कुमार व गीता दत्त तसेच शमशाद बेगम, यांनी ही आपापला वाटा उचलला याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या आवाजाची जात.
मन्ना डे यांचा आवाज असा होता की रफींच्या आवाजाच्या उपस्थितीत हिरोसाठी वापरावा असे बर्याच संगीतकाराना वाटले नाही. कारण त्यांच्या आवाजात "तारुण्य" दिसत नसे. त्यामुळे मन्नादा हे रफींसारखेच हरहुन्नरी गायक असूनही चरित्र भूमिका व विनोद वीर यांच्यासाठी त्यांचा वापर झाला. अपवादाने राजकपूर (प्यार हुवा इकरार हुवा, ये रात भीगी भीगी, मुडमुडके ना देख, लागा चुनरीमे दाग) यांच्या साठी हिरो म्हणून वापर झाला. पण उत्तम गायकी गळा असलेले मन्नादा चमकले ते हिदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारलेल्या गीतात. सप्त सूर तीन ग्राम (एस एन त्रिपाठी), लागा चुनरीमे दाग (रोशन), तेरे नैना तलाश करे (एस डी बर्मन), झनक झनक तोरे बाजे पायलिया (शंकर जयकिशन), ए मेरे जोहरा जबीन (रवि), तुम गनगने चंद्रमा (लक्ष्मी प्यारे), आयो कहांसे घनशाम (राहुलदेव बर्मन), भोर आयी गया अंधीयारा (मदन मोहन) ही त्या पद्धतीच्या गीतांची केवळ यादी. या खेरीज विनीद वीरांसाठी फुल गेंदवा ना मारो (आगा), दुनिया बनाने वाले (महमूद), नजारा मुझे किसने चिलमनसे मारा (जॉनी वॉकर) अशी गीते मन्ना डे यानी गाऊन अजरामर केली.
गीता दत्त या एकेकाळी आघाडीच्या गायिका होत्या परंतु १९५५ च्या सुमारास आशा भोसले यानी प्रथम गीतादत्त यांच्या आवाजाच्या थ्रो ची नक्कल करीतच आपला जम बसविला. गीताजींचा आवाज मुळातच गोड, काही वेळा विशिष्ट हेल त्यांच्या आवाजातून येताना आढळतो.(हो आशाबाईंच्या येत नाही). गीतादत्त आवाजाच्या फेकीत मात्र नंबर एक! एका बाजूला वक्त ने किया क्या हंसी सितम, जा जा जा जा बेवफा यासारखी दर्दभरी गीते गाताना दुसरीकडे तकदीरसे तदबीरकी बिगडीको बनाले, मेरा नाम चिन चिन चू, अरे तौबा ये तेरी अदा अशी दिलफेक गाते गाताना त्यांच्या आवाजाला तुलनाच नसे.
मुकेश यांच्या आवाजातच एक प्रकारचा निरागस पण होता. राजकपूरच्या चेहर्याशी त्यांचा आवाज जुळला यात मग नवल ते काय? मुकेश यांच्या गायनात रफींसारखे आवाजाचे बदल नसत. काहीसा एकसूरी अनुनासिक आवाज हेच त्यांचे बलस्थान. मग गंभीर गाणे म्हटले की मुकेश ही संगीतकारांची पहिली पसंती. मुकेश यांचे सूर विशेषत: रोशन (बहारोने मेरा चमन लूटकर,ओहरे ताल मिले नदीके जलमे, खयालोंमे किसीके इस तरह आया नही करते), शंकर जयकिशन (मेरा नाम राजू, जाने कहां गये वो दिन, आवारा हू,),कल्याणजी आनंद्जी (मेरे टूटे हुए दिलसे,चांद आहे भरेगा,मै तो एक ख्वाब हू इ. इ.),सलील चौधरी (जिंदगी ख्वाब है, कहीं दूर जब दिन ढ्ल जाये, दिल तडप तडपके) यांच्याशी जुळले.
अपवाद म्हणून, चलरी सजनी अब क्या सोचे, (एस डी बर्मन), चल अकेला चल अकेला (ओ पी नय्यर), तू कहे अगर (नौशाद), वक्त करता जो वफां (रवि), जिस गली मे तेरा घर न हो बालमा (आर डी बर्मन) यांचे कडे ही मुकेश गायले.
वैशिष्ट्यपूर्ण ठसकेबाज आवाज म्हणून शमशाद बेगम यांनीही या आमच्या पिढीला मोह घातला. चांदनी आयी बनके रात ओ साजना, गाडी वाले गाडी धीरे हाक रे (नौशाद) युं ही बातोंमें बना दूं, कजरा मोहब्बतवाला, बूझ मेरा क्या नाम रे (ओ पी नय्यर), मेरे पिया गये रंगून (सी रामचंद्र) ही त्यांची काही गाजलेली गीते.
१९६९ पर्यंत किशोर कुमार हे आघाडीचे गायक नव्हते. भारतीय सिनेमातील नायकाची इमेजच मुळी अशी होती की तिथे रफी, रफी अन रफी असाच मामला होता. इतका की खुद्द किशोर अभिनेता असलेल्या काही सिनेमात रफींनी किशोरना आवाज दिला होता. "यॉडलिंग" हे खास प्रांत ज्याचा होता तो म्हणजे किशोर अशा ओळखीत ठंडी हावा ये चांदनी सुहानी, सुरमा मेरा निराला, पिया पिया हमे काहे पुकारे, इना मिना डिका, चांद रात अब हो साथ अशी अनेक गीते गाताना काही गंभीर गीतेही किशोर कुमार यानी गायिली होती. उदा. मेरे मेहबूब कयामत होगी. बाकी आराधना नंतर आर डी बर्मन, सचिनदा, भप्प्पी लाहिरी, कल्याणजी आनंदजी यानी किशोर कुमारलाच प्राधान्याने घेऊन अनेक उत्तमोत्तम म्हणजे चिंगारी कोई भडके, मेरे नैना सावन भादो, खिलते है गुल यहां, मेरा जीबन कोरा कागज, ये शाम मस्तानी ........ अशी अगणित गाणी किशोरदानी गायिली.
खास आवाज असलेले काही गायक आमच्या या पिढीला आपली झलक दाखवून गेले. हेमंतकुमार यांचा आवाज गंभीर व रोमॅन्टिक. अशा आवाजात त्यांनी अनेक गीते गायली. बेकरार करके हमें यू न जाईये, ये नयन डरे डरे, चुप है धरती चुप है चांद सितारे अशी ती गीते.
अतिशय गोड आवाज म्हणजे तलत महमूद साहेब. आपल्या कापर्या आवाजाला तू सोडू नकोस असे त्यांना अनिल विश्वास यांनी बजावले. तलतनी गजल टाईपच्या हिंदी गीतात जान आणली. फिर वही शाम,जलते है जिसके लिये, तेरी आंखके आसू पी जाऊं, प्यार पर बस तो नही लेकिन, आंसू समझके क्यू मुझे... आणि अनेक गीताना या मखमली आवाजाने नटविलेले आहे. सचिन देव बर्मन यांच्या एक विशेष हेल असणारा आवाजही विसरून कसे चालेल? ओ रे माझी, मेरी दुनियां है मॉ, सफल होगी तेरी आराधना, सुन मेरे बंधू रे इ. निवडक गीतांना गाऊन सुद्धा सचिनदानी कान तृप्त केले.
रफींना गायकीत गुरुस्थानी मानून महेंद्र कपूर यांनीही आपली कारकीर्द गाजविली. मनोजकुमारच्या देशभक्तीपर गीतांचा शिक्क्का (मेरे देशकी धरती, दुल्हन चली, ए प्रीत जहांकी रीत सदा इ.) त्यांच्यावर बसण्यापूर्वी नौशाद (हुस्न चला है इश्कसे मिलने), सी रामचंद्र (आधा है चंद्रमा रात आधी, दिल लगा कर हम य समझे), एन दत्ता (तेरे प्यार का आसरा चाहता हूं), रवि (नीले गननके तले, न मुंह छुपाके जियो )यांचे बरोबर त्यानी काम केले होते. ऩंतर लक्ष्मी-प्यारे (और नही बस और नही) यांनी ही कपूर यांचा आवाज वापरला. पण नय्यर साहेबानी कमाल केली. (यारोंकी तमन्ना है, तुम्हारा चाहनेवाला, लाखो है यहां दिलवाले, आँखेमे कयामत के काजल, जो दिया था तुमने एकदिन इ.) अनेक गीतात कपूर ओ पी यांची युती अवतरली.
जसे रफींच्या आवाजाच्या छायेत वावरणारे महेंद्र कपूर तसे लताबाईंच्या सुरेल गोड आवाजाच्या छायेत वावरलेला आवाज म्हणजे सुमन कल्याणपूर व किशोरकुमार यांच्या आवाजाच्या छायेत वावरलेला आवाज म्हणजे कुमार शानू. यापैकी सुमनताईंची हिंदी संगीतातील कामगिरी मर्यादित असली तर वेळप्रसंगी मुख्य प्रवाहातील संगीतकारांनीही त्यांचा आवाज वापरलेला दिसतो. अजहू ना आये बालमा (शंकर जय किशन), मेरे मेहबूब न जा (जानी बाबू) हे यापैकी एक उल्लेखनीय उदाहरण.
कुमार शानू यानी तर आपली गायनाची कारकीर्दच मुळी किशोरदांची गाणी गाऊन सुरू केली. यानीही एक काळ तुफान गाजविला. अब तेरे बिन जी लेंगे हम, जब कोई बात बिगड जाये पासून पार एक लडकी को देखा तो ऐसा लगा पर्यत संस्मरणीय प्रवास आपल्या परीने त्यांनी केला.
हिदी संगीतात आणखी काही आवाज आपला ठसा उमटवून गेले त्यात वरचेवर खपाचे उच्चांक प्रस्थापित करणारे अनुप जलोटा यानी इतिहास घडविला. अचाट दमसास व अत्यंत स्थिर व सुरेल असणारा आवाज मधूनच गद्यातून संवाद साधायची संवय असलेल्या अनुपजींची शास्त्रीय संगीतावर असलेली पकड स्तिमित करणारी. "चदरिया झीनी रे झीनी" असो की "इतना तो करना स्वामी" असो पुन्हा पुन्हा ऐकूनही कंटाळा न येणारी अनेक पदे त्यानी गायिली.
त्यांच्या प्रमाणेच दुसरा एक खास आवाज म्हणजे जगजितसिंह. अत्यंत मुलायम आवाज म्हणजे काय चीज असते यांचा प्रत्यय तलत साहेबानंतर देणारा हा खास आवाज! "बरस बरस प्यासी धरतीपर", "होशवालो को खबर क्या बेखुदी क्या चीज है", "होटो़को छू लो तुम", एक ना अनेक गीतातून गोडवा पाझरतो त्यांच्या कंठातून.
जे फार यशस्वी झाले नाहीत पण वेगळेच आवाज म्हणून आजही आठवतात; ते म्हणजे हाय पिच मधले दोन मस्त आवाज. "एक झूम बराबर झूम शराबी", तसेच "चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा वाले", अझीज नाजा! दुसरे "बेशक मंदिर मसजीद" व "मै बेनाम हो गया" वाले नरेंद्र चंचल! याच बरोबर "मै शायर तो नही" किंवा "माँ ने कहां था ओ बेटा", वाले शैलेंद्र सिंह. तसा गायिकांमधील मस्त आवाज म्हणजे मुबारक बेगम! लाडिक गोड आवाज, "बेमुर्वत बेवफा", "कभी तनाहाईंयोंए यू हमारी याद आएगी", " मेरे आंसूओपे न मुस्कुरा", अशी मोजकीच पण अविस्मरणीय गीते त्या गाउन गेल्यात.
मित्रहो या संगीतमय आठवणीना ना अंत ना पार. अनेक गुणी संगीतकारानी गायकांच्या आवाजाचे खास पैलू हेरून त्या त्या वेळी ही गीते गाऊन घेतली व आमच्या पिढीचे कान तृप्त केले. ये वक्त वक्त की बात है यारो! सलाम त्या आवाजांना!
तिकडे हिंदीत असे गायक गायिका आपापल्या शैलीने आमचे कान तृप्त करीत असताना मराठी भावसंगीत, चित्रपट संगीत , नाट्य संगीत व लोकसंगीत या चारही प्रकारात अनेक खास आवाज येऊन गेले. अगदी लहानपणीचे आठवतात ते म्हणजे प्रथम सुधीर फडके. गीतरामायण प्रथम प्रसारित झाले ते १९५६ च्या सुमारास. त्यानंतर यशवंत देव (तिन्ही लोक आनंदाने, कधी बहर कधी शिशिर, त्या तरूतळी विसरले गीत), श्रीनिवास खळे (लळा जिव्हाळा शब्दच खोटे), वसंत पवार (एक वार पंखावरूनी, रूपास भाळलो मी), दत्ता डावजेकर (संथ वाहते कृष्णामाई), राम कदम (कानडा राजा पंढरीचा, कशी नशीबानं थट्टा आज मांडली) अशा प्रकारे फडके साहेबांचा आवाज; ते सोडून इतर संगीतकारांनाही कशी भुरळ पाडणारा होता हे कळते. गोड पण पुरूषी आवाज. स्पष्ट शब्दोच्चार आवाज कधी मुलायम तर कधी जोरकस करण्याची हातोटी. मेलोड्रामा हा रफींप्रमाणेच त्यांच्या गायनाचा आत्मा असे. त्यामुळे "हा माझा मार्ग एकला" या गीतातील एक प्रकारचा हताशपणा ते जसा दाखवू शकत, तसे "तू अन मी मी अन तू" या युगल गीतात 'तुला पाहता क्रिडांगणावर ताबा नव्हता खूळ्या मनावर' यातील तारूण्य ते आवाजातून प्रकट करून शकायचे. "आकाशी झेप घे रे पाखरा" यातील भाव जसे वेगळेच तसे "नीज माझ्या सोनुल्या" ही लोरीही ते गाउन गेले.
बाबुजींसारखेच आणखी एक गायक म्हणजे जयवंत कुलकर्णी. आपल्या आवाजातील नाट्य कधी सोडू नको असे वसंतराव देसाईनी त्यांना पढविले होते. कुलकर्णी त्यामुळे "नाच लाडके नाच जगा पासुनी दूर राहु या नको जनांचा जाच" असेह धुंदफुद गीत गाऊ शकले. "वाट संपता संपेना" या दत्ता डावजेकरानी स्वरात गुंफलेल्या भावगीतात तर आपण जयवंतरावांखेरीज कुणाचीही कल्पना करूच शकत नाही. अशा गायकाने "अंतरंगी तो प्रभाती, रामकृष्ण गोविद नारायण हरी" अशी गोड भक्तिगीते गायली. पण खरा कळस झाला तो, जयवंत हे दादा कोंडके यांचा आवाज बनले. "लब्बाड लांडगं ढ्वांग करतंय" असो की "माळ्याच्या मळ्यांमदी कोन गं उभी" असो.
फडके साहेब व जयवंत कुलकर्णी यांच्या सारखे अष्टपैलू नव्हेत पण खास आवाज असलेले व दीर्घकाळ यश संपादन केलेले गायक म्हणजे अरूण दाते. काही वेळा कापणारा तर काही वेळा दाबून घेतलेला असा आवाज ते लावीत असत. खर्जातही चालायचा त्यांचा आवाज. जसे "डोळे मिटून घेता दिसतेस तू समोर" ही ओळ ऐकून पहा किंवा मग "धुके दाटलेले उदास उदास" ही ओळ ऐका. तार स्वरांच्या बाजूने ते सामर्थ्याने फिरू शकतात. "तेंव्हा म्हणू नको तू माझी उदास गाणी "या ओळीतला ‘तू’ ऐका.
मराठीत गाताना सुमन कल्याणपूर याना मात्र हिंदीपेक्षा अधिक संधी मिळाली. त्यांच्या आवाजात नाट्य नसले तरी गोडव्याच्या जोरावर त्यानी अशोक पत्की (मृदुल करानी छेडित तारा, शब्द शब्द जपुन ठेव), राम कदम (भक्तीच्या फुलांच्या गोड तो सुवास), सुधीर फडके (लिंब लोण उतरू कशी.), एन दत्ता (लिंबोणीच्या झाडामागे) वसंत पवार (उघडले एक चंदनी दार) अशी एका सरस गीते गायलेली आहेत.
हिंदीत जसा एक ठसकेबाज आवाज म्हणजे शमशाद बेगम तसा मराठीतील ठसकेवाज आवाज म्हणजे सुलोचना चव्हाण हा होय. खरे तर सुलोचना कदम या नावाने त्या लताबाईंच्याही अगोदर हिंदीत पार्श्वगायन करीत होत्या. मराठीत मात्र "लावणी सम्राज्ञी" या किताबासह त्यांची ओळख आहे. "तुझ्या उसाला लागलं कोल्हा", "आई चिडली बाब चिडले", "पदरावरती जरतारीचा", "तरूणपणाच्या रस्त्यावरच" अशी एक सो एक गाणी त्यानी गायिली. त्यांचे हे पद काहीसे हिरावून घेतले ते उषा मंगेशकरानी.
उषाबाईही लहान असल्या पासून चित्रपटात गात होत्या पण 'पिंजरा' या चित्रपटाने त्यांच्या आयुष्यात एकदम मोठा बदल घडवून आणला. "दिसला ग बाई दिसला" ने सुरूवात करत नंतर त्या राम कदम, राम लक्ष्मण या संगीतकारांकडे गायल्याच पण "कल्पनेचा कुंचला" हे गीत त्या फडके साहेबांच्याकडेही गायल्या.
लोकसंगीतात अनेक शाहीर मंड्ळीनी आपला वावर ठेवलेला होत त्यात गोड आवाजाचे शाहीर कृष्णराव साबळे यांचा आवाज अगदी तगडा !"विंचू चावला" हे भारूड असो अथवा "गर्जा महाराष्ट्र माझा" साबळे हे नाव लोकसंगीतात अग्रस्थानी राहिले. पण काही आवाज लोकसंगीतात ही आणखी गाजले. त्यात प्रल्हाद शिंदे या आवाजाचा खास उल्ल्लेख हवा. "देवा मला का दिली बायकू अशी"," आता तरी देवा मला पावशील का" अशी आपल्या वेगळ्याच उच्च पट्टीत गाऊन त्यानी तो एक वेगळाच बाज लोकप्रिय केला. त्या परंपरेत मग आनंद् शिंदे यांचा आवाज फिट्ट बसला. "कोबडी पळाली", "जवा नवीन पोपट हा" या गीताना घेऊन त्यानीही आपले स्थान पक्के केले.
'शरदाचे चांदणे आले माझिया दारी 'असे ज्या आवाजाला ऐकून मनोमन वाटावे असा आवाज म्हणजे माणिक वर्मांचा आवाज. हा आवाज काही लताबाई आशाबाईं इतका गोड नाही. आवाज अनुनासिक असणे हा तर संगीत शास्त्रात दोषच मानलाय. पण माणिकताईनी मेहनती रियाझ करून तो मुलायम व नितळ बनवला. सुधीर फडके, द्शरथ पुजारी, पु.ल. देशपांडे यांनी हा आवाज मराठी चित्रपट संगीतात व भाव संगीतात वापरला. माणिक वर्मा यांचे गायन प्रामुख्याने भक्तिगीते व प्रेमगीते यात झालेले आहे. "सावळाच रंग तुझा", "घन नीळा लडिवाळा", "आवाज मुरलीचा आला", "शरदाचे चांदणे", "चांदण्या रात्रीतले ते", "तुझा नि माझा एकपणा" अशी अनेक अविस्मरणीय गीते त्यांनी गायलीत. पण त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. नाट्यसंगीतात आपल्या दाणेदार, सुरेल गायनाने त्यांनी आपला एक वेगळा नूर दाखविलेला आहे. "नरवर कृष्णासमान", "रूपबली तो नरशार्दुल साचा", "खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी", "यदुमनी सदना", अशा जुन्या पठडीतील गीतांबरोबर 'निघाले आज तिकडच्या घरी सारखे' नाट्यगीत ही त्यानी म्हटलेय.
माणिक वर्मांप्रमाणे दुसरा मोहात पाडणारा आवाज म्हणजे ज्योत्स्ना भोळे यांचा. "ऊठ मुकुंदा रे गोविंदा" ही भूपाळी असो "की माझीया माहेरा जा" त्या मस्त खुलून गायच्या. "बोला अमृत बोला", " तुझे नि माझे जमेना" या नाट्य गीतांमुळे त्यांचा आवाज गाजला.
रामदास कामत व राम मराठे व छोटा गंधर्व तसेच डॉ. वसंतराव देशपांडे हे ही आवाज अनोख्या आवाजात मोडतील. पैकी रामदास कामत व छोटा गंधर्व यांचे आवाज या चौघात अधिक गोड आहेत. रामदास कामतांचा गायनातील स्पष्टपणा,(यति मन मम मानीत या, गुंतता हृदय हे, साद देती हिमखरे) छोटा गंधर्व यांची लाडिक गायनाची शैली (प्रिये पहा, कोण तुज सम सांग मज गुरूराया, आता या परते उरले नाही काही) अशी काही उदाहरणे. तर राम मराठे व वसंतरावांचे आवाज अनुनासिक पण जटिल ताना लयकारी हे त्यांचे अलंकार. राम मराठे (कशी नाचे छमाछम मत्त मयुरी, जय शंकरा, तारील हा तुज) तर वसंतरावांची सर्वप्रिय गीते म्हणजे "घेई छंद", " गुलजार नार ही मधुबाला", "आज सुगंध आला लहरत", "सुरत पियाकी", अर्थात याच बरोबर "कुणी छेडिली तार", "झांझीबार झांझीबार", "बगळ्यांची माळ फुले" इ. इ. मधील सुगम संगीतातील वसंतरावांचा आवाज विसरता येणार नाही.
जिच्या गायनाने या मैफलीचा आरंभ केला तिचा मराठीत बुलंद ठसा आहे. ती म्हणजे आशाताई. लताबाईनी मराठीत श्रीनिवास खळे यांच्या व वसंत प्रभु व हृदयनाथ यांच्याबरोबर केलेले काम (जाहल्या काही चुका, नीज माझ्या नंदलाला या चिमण्यानो परत फिरा रे, सुंदर ते ध्यान, सप्तपदी ही रोज चालते, निजल्या तान्ह्यावरी माउली, आली हासत पहिली रात, कशी काळ नागिणी, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, मावळत्या दिनकरा) इ. इ. अनेक बहारदार गीते लताबाईनी मराठीत गायली. पण आशाबाईंचा मराठीतील तोरा काही अजबच! बालगीते, भक्तिगीते, लावण्या, प्रेमगीते. एक ना अनेक प्रकार! "शूरा मी वंदिले", "राधा गवळण", "भारतीय नागरिकांचा", "कोण येणार गं पाहुणे", "गळ्यात माझ्या तूच जिवलगा", " कारे दुरावा", "राजहंस सांगतो", "जिवलगा कधी रे येशील तू", "तरूण आहे रात्र अजुनी", "बाई माझी करंगळी मोडली" ..... यादी अनंत आहे.
तर मंडळी, आता आम्ही आमच्या पिढीला भाग्यवान समजण्यात काही चूक केलीय असे वाटते का तुम्हाला?
सर्वाना दिवाळी व नवीन वर्ष सुखाचे, आरोग्याचे व संगीतमय जावो!
प्रतिक्रिया
1 Nov 2013 - 2:29 pm | चित्रगुप्त
वाहवा वाहवा, क्या बात है....
आम्ही पण तुमच्याच पिढीचे. त्यामुळे तुम्ही लिहिलेल्या सर्व गायक-गायिका, संगीतकार वगैरेंनी आमचेपण बालपण समृद्ध केलेले आहे.
कुमारांचे 'मला उमजलेले बालगंधर्व' 'आज अचानक गाठ पडे' वगैरे ???
1 Nov 2013 - 4:15 pm | बहुगुणी
आता बरीच recommended गाणी पुन्हा एकदा ऐकली जातील. इतका मोठा कालखंड निवडला आहात चौकटराजेसाहेब, की काही नावं राहून जाणं साहजिक आहे (अजित कडकडे, आशा खाडिलकर, कृष्णा कल्ले, अभिषेकी, शिलेदार, कारेकर ही काही चटकन आठवलेली) तरीही तुमची यादी समृद्धच आहे. खूप धन्यवाद!
1 Nov 2013 - 4:18 pm | प्रचेतस
सुरेख लेख.
1 Nov 2013 - 5:22 pm | पैसा
पण कुमार सानु अन अनुप जलोटा यांच्यापेक्षा मला आवडणारा एक मोठा गायक म्हणजे पंडित सुरेश वाडकर आणि दुसरे हृदयनाथ मंगेशकर. सुरेश वाडकरनी हिंदी आणि मराठीत तर नाट्यगीते अभंग, भावगीते काही म्हणायचं शिल्लक ठेवलं नाही. अगदी चुकीच्या काळात जन्माला आलेला गायक. हृदयनाथांनी जे थोडे गायले आहे ते न विसरण्यासारखे.
1 Nov 2013 - 10:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
हृदयनाथांनी जे थोडे गायले आहे ते न विसरण्यासारखे.
त्यांचे संगित निर्देशन मोजके आहे पण मनमोहक आणि फार उंचीचे आहे.1 Nov 2013 - 5:38 pm | प्रचेतस
भीमसेन जोशींची अनुपस्थिती खटकली. त्यांचे फिल्मी गायन जरी बरेच कमी असले तरी त्यांनी 'रम्य ही स्वर्गाहूनी लंका..' सारखी अप्रतिम गाणी केलेली आहेत.
1 Nov 2013 - 6:04 pm | चौकटराजा
काही नावे गळणे स्वाभविक वाटले या बद्द्ल धन्यवाद ! अनोखा आवाज व सुगम सगीत हे निकष मुख्यतः घेतले.तसे पाहता सी रामचंद्र यांचा आवाज अनोखाच आहे पण गायक म्हणून क्वालिटी. ? ...... सुरेश वाडकर व ह्र्दयनाथ यांचे बद्द्ल आदर आहे पण त्यांचे आवाज वैशिष्ट्यपूर्ण मला तरी वाटत नाहीत. अलिकडील उदा द्यायचे झाले तर बेला शेंडे हिचा आवाज मला काही अपीलिंग वाटत नाही. कुमारजी व भीमसेनजी जास्त करून ख्यालातच आवडते आहेत.
1 Nov 2013 - 10:46 pm | मुक्त विहारि
ते तुम्ही लिहीलेत.
मॅटर क्लोज्ड...
पण जे लिहीलेत ते मनापासून...दॅटस ऑल.....
2 Nov 2013 - 1:55 am | संजय क्षीरसागर
अत्यंत सुरेख आढावा घेतलायं एका व्यापक विषयाचा.
2 Nov 2013 - 6:46 pm | प्यारे१
+१
खूप सुरेख.
पुन्हा सावकाश वाचन होईलच.
2 Nov 2013 - 5:06 am | दीपा माने
धन्यवाद. आपण सर्वच स्वर्गीय गाण्यांचा नावांसकट खजिनाच उघडून दिलात त्यामुळे निवांत वेळी पुन्हा वेगळ्या विश्वात रमता येईल.
मला वाटतं वाणी जयराम ह्यांच्याही गाण्यांत सुमन कल्याणपूरांसारखीच गोडी होती/आहे. मला त्यांचाही आवाज फारच आवडायचा. असो.
2 Nov 2013 - 6:03 am | चित्रगुप्त
जगजीत कौर चे 'तुम अपना रंजोगम' अविस्मरणीय...
आणि अलिकडे कार्तिकी गायकवाडचे 'घागर घेऊन', तसेच 'उघड्या पुन्हा जहाल्या' पूनम यादवचे 'वंदे मातरम' नॅन्सी अजरमचे 'इब्न इल गिरान' ही आठवणीत रुतलेली लाजवाब गाणी .
http://www.misalpav.com/node/21441
http://www.misalpav.com/node/21764
2 Nov 2013 - 12:22 pm | प्रभाकर पेठकर
माझा जन्मही ५४चा त्यामुळे तुमच्या लेखातील शब्द अन शब्द अनुभवलेला आहे. पण संगीत क्षेत्रातील जाणकारी कमीच. गाणं ऐकलं, आवडलं, लक्षात राहिलं, पुन्हा गुणगुणलं, विस्मारणात गेलं आणि अशाच कांही हृद्य आठवणींनी ते पुन्हा वर आणलं, असाच आमचा संगीतभक्ती प्रवास आहे.
उत्तम लेख. दिपावलीचा सांगितिक फराळ अत्यंत चविष्ट सणासुदीच्या वातावरणास पोषक असाच आहे.
3 Nov 2013 - 12:30 pm | दिपक.कुवेत
पुन्हा एकदा सगळि गाणी कानाता वाजायला लागली आहेत. छान जमलय.
3 Nov 2013 - 5:55 pm | चित्रगुप्त
आज पुन्हा एकदा अगदी सावकाशीने, त्यातल्या एकेका गाण्याचे स्मरण करत लेख वाचला, आणि कृतकृत्य झालो. फारच सुंदर आठवणी.
चौरा साहेब, असेच लिहीत रहा. शुभेच्छा.
4 Nov 2013 - 8:36 am | सुधीर कांदळकर
झकासच. मुख्य म्हणजे व्यक्तिगत आवडनिवड, खासकरून नावड वगैरे बाजूला ठेवून रसास्वाद मांडलेला आहे. छान.
6 Nov 2013 - 12:32 am | इन्दुसुता
बहारदार......
या निमित्ताने अनेक जुनी गाणी आठवली.
11 Nov 2013 - 5:40 am | स्पंदना
संगीत रसिकांसाठी एक धावते वर्णनच ठरावा हा लेख! वाचणखुण साठवली आहे. कधी काही छान ऐकावेसे वाटले तर हा लेख रेफर करुन ऐकता येइल.