कालचा क्रिकेटचा सामना पहायचा राहिला , त्याच्या हायलाईट पाहण्याआधी चेहरा पुस्तकाच्या भिंतींवर भारतीय विजयाची बातमी वाचली , वृत्त पत्रात सविस्तर वाचले आणि अपेक्षाभंग झाला ,
भारत जिंकला पण क्रिकेट हरले
पाटा निर्जीव खेळपट्टी वर फलंदाजांनी गोलंदाजांचे वस्त्र हरण केले , मला नख काढलेल्या वाघाची व दात काढलेल्या नागाची आठवण झाली.
क्रिकेट लोकप्रिय करण्याच्या नादात भारतीय उपखंडात
अश्या निर्जीव व सदोष खेळपट्ट्या बनवल्या जाऊ लागल्या ,
व खेळाची रया केली , समतोल खेळ पाहायला मिळेनासा झाला , वाईट एकाच गोष्टीचे वाटते , एकेकाळी राहुल ,
सचिन , सौरभ , व स्टीव , मार्क , ह्या सारख्या खेळाडूंनी
समतोल पिचवर टिचून धावा काढल्या व त्यांचे विक्रम
आजकालच्या खेळाडू विशेष मेहनत न घेता मोडणार ,
आणि चुकून परदेशात आखाडा खेळपट्टी मिळाली तर रेशन ची रांग लावणार
हे बरोबर नाही ,
मागच्या जन्माचे पाप म्हणून ह्या जन्मी गोलंदाज झालो असे वाटण्याची वेळ खेळाडूंवर येऊ नये असे वाटते
अश्या पिचवर चिडून इम्रान ने चेंडू कुरतडणे सुरु केले
निदान खेळत गोलंदाजाला अनकुल असे बदल करणे गरजेचे आहे.
८० च्या दशकात १८० तर ९०च्य दशकात २३० धावा एक आव्हान म्हणून प्रतिस्पर्ध्याला वाटायच्या
२००० साली हेच आव्हान २७५ पर्यंत पोहोचले व गेल्या काही वर्षात हेच आव्हान ३०० ते साडे तीनशे असे झाले
इतक्या दशकात क्रिकेट मध्ये गोलंदाजाचे हे अवमूल्यन आपल्या रुपयाच्या जोडीने झाले,
पूर्वीचे गोलंदाज सरस होते की आजकालचे फलंदाज सरस आहेत हेच कळेनासे झाले आहे .
अजून काही वर्षात ४०० धावा फळ्यावर लागल्या की आव्हान शाबूत आहे असे म्हणण्याची नौबत येईल ,पण क्रिकेटची अब्रू शाबूत आहे का
प्रतिक्रिया
17 Oct 2013 - 6:40 am | चौकटराजा
आपण म्हणता असे असेलही पण आज आपल्या चुका सुधारण्यासाठी काही साधने अधिक प्रभावीपणे उपलब्ध आहेत ही बाब ही लक्षांत घावी लागेल. फिजिकल फिटनेस वर आज जास्त जोर दिला जात असेल.पाटा विकेट असली तरी ती दोन्ही टीमसाठी असते .फारतर काय होईल हाय स्कोअर सामना होईल. क्रिकेटचा आनंद खेळाडूना खेळ खेळण्यात व प्रेक्षकाना खेळ पहाण्यात असतो. स्कोअर हे एक त्यातील खेळणे आहे. आपण केविन पीटरसनने ओफ स्टंपच्या फार उजवीकडे असलेला चेंडू मिडविकेटला ओव्हर बाउंड्री पाठविलेला वा पोलार्ड॑ ने वाईड आउटसाएड दे ऑफ स्टंप असलेला चेंडू थर्ड्॑ मॅनला सिक्सरला पाठविलेला पाहिला नाही काय ? ते दोन्ही चेंडू क्रिकेटच्या शास्त्र्राप्रमाणे डॉट बॉलच्या लायकीचे होते .
17 Oct 2013 - 6:53 am | निनाद मुक्काम प...
चौकटराजा
काही दशकात क्रिकेट सामन्यात झालेले सर्व बदल हे फलंदाजांच्या सोयीचे आहेत , त्यांना एका षटकात कितीही चौकार व षटकार मारण्याची मुभा पण गोलंदाजांना चेंडू बीमर करणे किंवा डोक्यावरून टाकण्यास मर्यादा .
असे अनेक नियम सातत्याने होत गेले , त्यामुळे
जसे फलंदाजी मध्ये पूर्वीच्या नियमाने डॉट बॉल वर षटकार बसले तसे गोलंदाजी मध्ये रिवर्स सिंग , स्लो बाउन्स चा शोध लागला पण निर्जीव खेळपट्टी सगळच मुसळ केरात घालते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटचे आय पी एल होऊ नये असे वाटते.
दोघांनी एकमेकांचा आब राखावा
२० २० चे सावट एकदिवसीय सामान्यांवर पडत आहे
हे लक्षात घेता समतोल खेळपट्टी अपेक्षित आहे ,
परदेशात चेंडू उसळणारी खेळपट्टी असते , तर पूर्वी भारतात चेंडू वळणारी असायची , अर्थात जंबो ला दोन्ही आवडायच्या
पण निर्जीव , बेजान खेळपट्टीवर एखादा नवशिका फलंदाज , दर्जेदार गोलंदाजाच्या गोलंदाजीवर फुशारक्या करतो तेव्हा
पिंजर्यातील वाघाला खडे मारणाऱ्या पोराची आठवण येते.
17 Oct 2013 - 12:50 pm | मालोजीराव
कातिल प्रतिसाद
शेन वॉर्न, जवागल, जम्बो,मक्ग्रा,अक्रम,डोनाल्ड यांना मुजरा !
17 Oct 2013 - 12:57 pm | बॅटमॅन
जोर्दार अणुमोदण!!!
17 Oct 2013 - 6:55 pm | टवाळ कार्टा
शेन वॉर्न, जम्बो,मक्ग्रा,अक्रम,डोनाल्ड या यादीमधे जवागल ????
17 Oct 2013 - 7:00 pm | बॅटमॅन
+१.
जवागल लाईन अँड लेन्ग्थ मध्ये लै कै खास नव्हता. त्याला कैकदा "अजागळ श्रीनाथ" म्हटल्या जायचे ते अजूनही आठवते =))
17 Oct 2013 - 7:04 pm | मालोजीराव
विस्डेन वाले यादीत स्थान देत नाहीत, म्हंटलं आपण तरी देऊयात :))
17 Oct 2013 - 7:10 pm | बॅटमॅन
"जवागल म्हञ्जे गरीबाञ्चा ****" इथे रिकामी जागा कशी बरे भरता येईल?
30 Oct 2013 - 9:33 pm | जिन्क्स
२००३ च्या वर्ल्ड कप चा कोणताही सामना पहावा. मॅकग्राथ हा स्रीनाथ कडे शिकवणीला होता काय अशी शंका येयिल.
31 Oct 2013 - 5:46 pm | टवाळ कार्टा
तो अपवाद होता
17 Oct 2013 - 1:46 pm | बाळ सप्रे
बदल फलंदाजांच्या सोयीचे आहेत हे मान्य.. पण यावरुन क्रिकेट हरले ही प्रतिक्रीया नक्कीच अयोग्य..
जेव्हा एखादा खेळाबाहेरील मुद्दा (पैसा, भारत पाक वाद, काळे गोरे, निकाल निश्चिती, ई) खेळाहुन वरचढ होउ लागतो तेव्हा क्रिकेट हरले म्हणु शकतो..
17 Oct 2013 - 7:41 am | फुंटी
अहो त्या गोलंदाजाना धावा देण्याचे पण पैसे मिळतात...तुम्ही कशाला भावूक होताय??
17 Oct 2013 - 8:39 am | श्रीरंग_जोशी
लेखनाच्या भावनेशी सहमत.
मधल्या काळात पॉवर प्लेची षटके १५ वरून २० केली गेली. पूर्वी नोबॉलवर एकाहून अधिक धाव मिळत नसे तो नियम पण बदलला गेला. भारतीय उपखंडातील सीमारेषाही ऑस्ट्रेलियाप्रमाणे अधिक लांब केली गेल्यास काही फरक पडेल कदाचित.
17 Oct 2013 - 8:57 am | चिंतामणी
विषेशतः
मागच्या जन्माचे पाप म्हणून ह्या जन्मी गोलंदाज झालो असे वाटण्याची वेळ खेळाडूंवर येऊ नये असे वाटते
ह्या वाक्याशी.
17 Oct 2013 - 9:11 am | मुक्त विहारि
१९७० ते १९८० तंत्रशूद्ध क्रिकेट
१९८० ते १९९० ह्यात असलेल्या जमिनी खालील पैशांचा शोध चालू
१९९० ते २००० उत्खनन
२००० क्रिकेट = पैसा आणि माझे मनापासुन क्रिकेट बघणे बंद.....
सध्या जे काही क्रिकेट चालू आहे तो खरोखर खेळच आहे.....
17 Oct 2013 - 9:20 am | नानबा
सध्या क्रिकेटच्या फॉर्मेटमध्ये होणारे सगळे बदल फलंदाजांना अनुसरून किंवा त्या त्या देशाच्या शक्तीस्थळाला केंद्रस्थानी ठेऊन केलेले दिसतात. त्याचमुळे भारतीय उपखंडात पाटा सारख्या ताबडतोड बॅटिंगच्या खेळपट्ट्या, कॅरिबियन बेटांवर आणि ऑस्ट्रेलियन उपखंडात गवत असणार्या आणि त्यामुळे वेगवान गोलंदाजांना सहाय्य करणार्या खेळपट्ट्या बनवलेल्या दिसतात. तद्वत आजकाल पूर्वीसारखं क्रिकेट पाहण्याची मजा येत नाही. आणि अशा गोष्टींमुळे आता कॅरेबियन खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांचीच धुलाई करणारा ब्रायन लारा, पर्थच्या जलद खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघाचा घाम काढणारा शेन वॉर्न, इंग्लंडमधल्या ओव्हल मैदानावर शतक ठोकणारा लेगस्पिनर अनिल कुंबळे असे तगडे खेळाडू तयार होतीलसं वाटत नाही.
17 Oct 2013 - 10:17 am | कोमल
अगदी सहमत नानबा..
पूर्वी सारखी देशासाठी धडाडीने खेळणारी मंडळी तरी कुठे राहीली आहेत सद्ध्या.
आज कालच्या भारत-पाक मॅचमधे सुद्धा तितकी हमरी-तुमरी राहिली नाहिये.
:(
पूर्वी पेपरमधली मॅच जिंकल्याची कात्रणे काढून ठेवायचे, अन् आजकाल बातमी पण वाचावीशी वाटत नाही..
नव्वदीतल्या क्रिकेटला मिस् करणारी
17 Oct 2013 - 4:41 pm | शैलेन्द्र
+१११११
Difference in good cricket and great cricket is sense of connection.
हल्ली साल काही आपलं वाटत नाही..
17 Oct 2013 - 11:10 am | सुबोध खरे
प्रथम राव पटले नाही.
आजचा खेळ जास्त वेगवान झाला आहे.पैसा सुद्धा जास्त आहे हे मान्य आहे. गैरप्रकार पूर्वी सुद्धा होतेच(उदा लिव्हर आणि त्याची व्हासलीन पट्टी) पूर्वीच्या टेस्ट मीच पहिल्या तर एकदा बॉल बाजूने गेला तर तो पकडण्याचा किंवा जोरदार धावून थांबवण्याचा प्रयत्न करताना बेदी चंद्रशेखर किंवा प्रसन्न करताना दिसत नव्हते. एकदा बॉल मारला कि सीमारेषेवरून परत आणण्यासाठी या लोकांना चालत जाताना पाहिले कि अंगाची लाही होत होती. आज क्षेत्ररक्षण कमीत कमी शंभर टक्के सुधारले आहे. आजचे फलंदाज धावबाद होऊ नये म्हणून किंवा चौकार जाऊ नये म्हणून क्षेत्ररक्षक जसे सूर मारताना दिसतात तसे पूर्वी मुळीच होत नसे. जूना काळ चांगला होता असे म्हणण्याची पद्धत आहे ते ठीक आहे.
17 Oct 2013 - 1:33 pm | नानबा
की आजच्या काळात क्षेत्ररक्षण प्रचंड सुधारलंय. पूर्वी एखादे एकनाथ सोलकर होते, नंतर एखादा जॉन्टी र्होडस होता. आता सुकाळीचे सगळेच धडाधड झोपून चेंडू अडवायलेत. त्याबद्दल वादच नाही.
मुद्दा खेळपट्ट्यांचा आहे. आजकाल ज्या देशात सिरीज आहे त्या संघाचा कर्णधारच पिच क्युरेटर्सना कशा प्रकारचं पिच बनवायचं हे सांगतो म्हणे. हे म्हणजे स्कॉलरशिप किंवा होमी भाभाच्या परिक्षेला बसलेल्या पोरानं आपल्याच शाळेतल्या पेपर काढणार्या शिक्षकाला फितवून आधीच प्रश्नपत्रिका माहित करून घेण्यातला प्रकार झाला.
आजकाल बघा ना. सगळी ऑस्ट्रेलियन आणि कॅरेबियन पिच वेगवान गोलंदाजांसाठी पोषक, भारतीय उपखंडातील स्पिन गोलंदाज आणि फलंदाजांसाठी पोषक (नाईट वॉचमन म्हणून खेळपट्टीवर येऊन २०१ धावा काढणारा ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाज जेसन गिलेस्पी आठवतोय? हा पराक्रम त्याने बांग्लादेशमधल्या चितगावच्या खेळपट्टीवरच केला होता) असतात. खेळाची गुणवत्ता आणि नितीमूल्यं ढासळत चालल्याची ही लक्षणं नव्हेत का?
17 Oct 2013 - 8:14 pm | रंगोजी
पटलं नाही. खेळपट्टी कशी असावी हे आपल्या लोकांनी ठरवणे यात काहीच गैर नाही. प्रत्येक देशाची खासियत असते जसे आपण फिरणार्या खेळपट्ट्या ठेवतो आणि बाहेर त्या हिरव्या असतात. किंबहुना 'home advantage' असणे यात वाईट काय आहे? सामन्याची परीक्षेशी तुलना झेपली नाही. परीक्षा प्रश्न वि विद्यार्थी असते. सामना पिच वि संघ नसतो. खेळपट्टी फार तर लेखणी म्हणता येईल. म्हणजे असं की, आपण म्हणतो बॉलपेनने लिहा आणि इंग्लंड तिथे गेल्यावर म्हणते शाईच्या पेनने. सवय नसेल तर अवघड वाटेल. खेळपट्टी दोन्ही संघाना समानच असते.
गिलेस्पी च्या २०० धावांनी खेळाची गुणवत्ता कशी ढासळेल? खेळपट्टी वाईट नव्हती. तो सामना अनिर्णित राहिला नव्हता. ऑस्ट्रेलियन गोलंदाजानी २० बळी घेतलेच होते. उलट म्हणता येईल की अशा अनपेक्षित खेळ्यांमुळे मजा येते. एखादा आगरकर/ हरभजन १०० काढतो त्यात जास्त थ्रिल असते. कपिलदेवने १७५ काढल्या त्यावर म्हणता येणार- खेळपट्टी पाटा होती. एवढ्या मागे जायचीही गरज नाही. आशेस मध्ये आगर ने ११व्या क्रमांकावर येउन ९८ काढल्या त्यात सगळे कर्तृत्व त्याचेच होते. खेळपट्टी/खराब मारा नाही म्हणता येणार.
17 Oct 2013 - 9:47 am | बाळ सप्रे
क्रिकेट बदललयं.. पण हरलं?
नाही वाटत असं.. काळाप्रमाणे खेळही बदलणार..
आजच्या पिढीच्या फलंदाजांच कौतुक वाटत.. कितीही पाटा खेळपट्टी, कमकुवत गोलंदाजी म्हटली तरी ..
still you have to put loose ball away.. you have to score consistently..
गोलंदाजही त्यावर नवनवीन क्लुप्त्या शोधतातच.. दुसरा.. तिसरा.. कॅरम बॉल.. स्लो बाउंसर.. असे कितीतरी प्रकार पहायला मिळतात जे पूर्वी नव्हते.. क्षेत्ररक्षणातील प्रगती थक्क करणारी आहे असं नाही वाटत ??
क्रिकेट बदलत रहाणार.. सचिन सौरव राहुल जाउन... विराट धोणी धवन येत रहाणार .. एवढं निराश होउ नका :-)
17 Oct 2013 - 9:54 am | चौकटराजा
+१
काल ची मॅच मोठा स्कोर होउन्ही एकतरफी झाली म्हणून निनाद साहेब जर्मनीकर ज्ररा दुखावले आहेत.
17 Oct 2013 - 9:59 am | मुक्त विहारि
ही गोष्ट एकदम सत्य आहे....
१. राजकारणी लोकांचा प्रवेश
२. नाचणार्या बाहुल्या
३. पैशांचा धबधबा
४. व्यापार ( एक उदा. मी एकदा रणजी सामना बघायला गेलो होतो.डोंबिवलीहून डबा आणि वॉटर बॅग सहीत.पण आज काल असे खाण्या-पिण्याच्या वस्तू घेवून जाता येत नाही ऐसे ऐकून आहे.)
५. शेवटच्या चेंडू पर्यंत चालणार्या मॅचेसचे प्रमाण.
६. आखाती देशात चालणार्या क्रिकेट नंतर मिळणार्या भेटी.
खरे सांगायचे तर तांदूळात खडा असेल तर ठीक पण खड्यातच तांदूळ असतील तर.......
17 Oct 2013 - 9:56 am | चौकटराजा
सा. आफिका व ऑसीज यांच्या तील " ती" ४३४ ची मॅच अगदी अविस्मरणीय झाली कारण शेवटपर्यंत लढली गेली. माणसाचा हा स्वभावधर्म आहे त्याला सहज पराभव व सहज विजय दोन्ही आवडत नाहीत !
17 Oct 2013 - 11:05 am | मुक्त विहारि
रिकी पाँटिंग+अॅड्र्य सायमंड = गिब्ज+ग्रॅमी स्मिथ
फरक योग्य वेळी खेळलेला ब्राउचर
चौरा काका ये हमारी तरफसे आपको दिवाली की भेट (हमारा हिंदी ऐसा ही है.)
http://vidpk.com/23099/South-Africa-Vs-Australia-5th-ODI-2006-full-highl...
17 Oct 2013 - 10:57 am | अद्द्या
जिंकलं तरी चूकच आणि हरलं तर ते महापाप .
कधीच समाधानी होत नाहीत लोक
17 Oct 2013 - 11:05 am | डॉ सुहास म्हात्रे
चुकून परदेशात आखाडा खेळपट्टी मिळाली तर रेशन ची रांग लावणार
मागच्या जन्माचे पाप म्हणून ह्या जन्मी गोलंदाज झालो असे वाटण्याची वेळ खेळाडूंवर येऊ नये असे वाटते
लेखनाची अफलातून गोलंदाजी आणि फलंदाजी करून तुम्ही ह्या धाग्याची मॅच प्रेक्षणिय..आपलं... वाचनिय बनवली आहे ;)
तुमचा उद्वेग समजण्यासारखा आहे. पण:
१. व्यापारी तत्वावर चालणारे (भारतात क्रिकेट, युरोपात फूटबॉल तर अमेरिकेत बास्केट्बॉल-अमेरिकन फूटबॉल-बेसबॉल) सगळे "लोकप्रिय" खेळ चालवणार्यां संघटना जास्तीत जास्त पैसे कमावण्यासाठी त्या खेळांची लोकप्रियता टिकवून ठेवण्याच्या मागे असतात. त्यामुळे जशी लोकांची आवड बदलते तसे ते खेळाचे नियम / आयोजन (खेळपट्ट्यांची तयारी, सामन्यांच्या वेळा, शटकांची संख्या, इ.) बदलतात. लोकांना फलंदाजाने मारलेले जोरदार फटके कौशल्यपूर्ण गोलंदाजीपेक्षा जास्त आवडतात... कारण सर्वसाधारण प्रेक्षकाला खेळाच्या तांत्रिक गोष्टींपेक्षा चार-आठ तासांचे नेत्रसूख जास्त महत्वाचे वाटते. टेस्ट मॅचेस मागे पडण्याचे हेच कारण आहे... त्याही किती वर्षे तग धरतील याची शंका आहेच.
यात आणि बॉलिवूड मध्ये फार फरक नाही: तिथेही कला आणि तांत्रिक दृष्ट्या उत्तम चित्रपट बॉक्स ऑफिसवर मार खातात तर जलद गतीचे उथळ पण मनोरंजक चित्रपट कोटींची शंभरी गाठतातच नाही का?
२. सरकारी तत्वावर चालणारे खेळ कितीही लोकप्रिय आणि कितीही उत्तम खेळाडू असलेले असले तरीसुद्धा सरकारी जावई अधिकारी खेळापेक्षा स्वार्थाकडे जास्त लक्ष देऊन स्वतःचे भले आणि खेळाचे व खेळाडूंचे वाटोळे करतात असाच अनुभव आहे (उदा. भारतीय हॉकी, नेमबाजी, कुस्ती, इ) .
त्यामुळे वाईट व अतिवाईट यात वाईट बरे असे म्हणण्याची परिस्थिती आहे.
शिवाय जोपर्यंत लोक तिकीटे काढून असे वेगवान क्रिकेट बघताहेत किंवा पैसे भरून टिव्हीवर खेळ बघत आहेत आणि म्हणूनच व्यापार जोरात चालू आहे तोपर्यंत क्रिकेट्तंत्राच्या चाहत्यांना बरे दिवस नाहीत. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये पैसे नसले तर केवळ प्रेम म्हणून त्यात करियर करणारे चांगले खेळाडू येण्याचे दिवस गेले असेच खेदाने नमूद करावेसे वाटते.
"जसा प्रेक्षक तसा खेळ" हेच अंतिम सत्य ! :)
17 Oct 2013 - 11:09 am | मुक्त विहारि
काय बोलणार?
वरील सगळे मुद्दे पटले...
17 Oct 2013 - 11:43 am | रमताराम
आमची रिक्षा रांगेत लावतो आहे.
क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे काय?
17 Oct 2013 - 9:21 pm | पैसा
मीटर नुसता धावतो आहे, मिल्खासिंगाच्या स्पीडने!
17 Oct 2013 - 11:50 am | अतुलनियगायत्रि
बाकी सगळा जाऊदे , पण काल एकही फटका वाजला नाही राव …
फार वाईट वाटलं . ….
लॉर्डस वरची ती कैफ आणि युवी ने जिंकून दिलेली (हो हो .. गांगुली ने shirt काढून फिरवला होता तीच) match आठवली. लोकांनी आणि आम्हीसुद्धा अक्षरशः दिवाळी साजरी केली होती.
nostalgic वाटलं .. (nostalgic ला मराठी शब्द काहि आठवला नाही बुवा)
17 Oct 2013 - 11:59 am | मुक्त विहारि
ती जवळ जवळ बदला म्हणूनच खेळल्या गेली होती...
शर्ट वि शर्ट
अशीच झाली ती मॅच....
17 Oct 2013 - 11:53 am | सौंदाळा
एक नियम तर अगदी डोक्यात जातो माझ्या..
उसळता चेंडु जर वाईड किंवा नो-बॉल पडला तरी अंपायर वन फॉर द ओव्हरचा इशारा करतात.
हे म्हणजे वापरण्याआधीच शस्त्र काढुन घेण्यासारखे आहे.
17 Oct 2013 - 12:24 pm | एक तारा
तुम्ही लोकांनी जुन्या tests आणि क्रिकेट पाहिले आहेत म्हणून तुम्हाला जुने ते सोने वाटतं. आजच्या पिढीला आजचेच क्रिकेट आवडते (जुन्या सहित). म्हणून सरसकट क्रिकेट पाहण्यासारखा राहिला नाही असं म्हणण्यात point नाही असा मला वाटतं. त्यातही क्रिकेट हरले हि तर अतिशयोक्ती. anyway, क्रिकेट आलं तिथे अतिशयोक्ती आलीच.
बाकी pitch बद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलिया असं नाही म्हणाले कि हि flat pitch आहे, आम्ही runs नाही काढणार. त्यांना पण तोच आणि तेवढाच chance मिळाला जो आपल्याला मिळाला, ते पण आपल्या आधी (first batting असल्यामुळे).
17 Oct 2013 - 12:28 pm | बॅटमॅन
लेखाशी बहुतांश सहमत. बहुतेक बदल हे गोलंदाजांना प्रतिकूल असेच आहेत.
17 Oct 2013 - 1:28 pm | अग्निकोल्हा
.
17 Oct 2013 - 3:30 pm | नावातकायआहे
आवडत नसेल तर बघु नये.
मी बघत नाही.
पुर्वीचे पुणे राहीले नाही...पुर्वीचे पुणे राहीले नाही हा घोश लावण्यात काही अर्थ नाही.
Only constant in universe is change!
17 Oct 2013 - 4:38 pm | शैलेन्द्र
+१११११११
17 Oct 2013 - 7:11 pm | विजुभाऊ
क्रिकेटच्या धाग्यात पुण्याचा उल्लेख कशासाठी?
17 Oct 2013 - 7:13 pm | कोमल
वाट चुकली असावी.. ;)
20 Oct 2013 - 2:23 pm | नावातकायआहे
:-)
17 Oct 2013 - 5:10 pm | तुमचा अभिषेक
अश्या पाटा खेळपट्ट्यांवर धोनी, रैना, युवराज, धवनसारखे मारत असतील.. पण कोहलीसारख्यालाही कमी लेखणे हा त्याच्यावर अन्याय आहे.. जर विषय कालच्या सामन्याचाच घेतला तर त्याने सुरुवातीपासूनच जे पुढे सरसावत उचलून मोठे फटके मारले ते उत्तम बॅलन्स साधलेल्या फूटवर्कचा उत्कृष्ट नमुना होता..
कोहली सचिनचा एकदिवसीयमध्ये शतकांचा रेकॉर्ड नक्कीच तोडणार, तेव्हाही त्याच्या विक्रमावर अश्याच प्रतिक्रिया येणार की सचिनचा जमाना वेगळा असल्याने तोच भारी, अर्थात हि तुलना योग्यही नव्हे पण तरीही कोहली हा माझा आवडता खेळाडू असल्याने त्यालाही सरसकट एकाच तागडीत बसवले जाऊ नये म्हणून हा प्रतिसाद टाकला..
बाकी कितीही पाटा खेळपट्टी असली तरी कोणीही युसुफ पठाण सारखा ताकदीवर मोठाले फटके खेळून धोनी बनू शकत नाही, त्याला देखील एक प्रकारचे कौशल्य हे लागते ज्या साठी धोनीच असावे लागते.. तसेच रैना अन युवराज यांच्यातही काहीतरी आहेच.. फक्त अश्या पाटा खेळपट्ट्यांवर सामने जास्त होत असल्याने जे त्यांच्यात नाही आहे ते म्हणजे तंत्र त्यांना लपवता येते.. जे पहिल्या सामन्यात थोडेसे गवत असल्याने उघडे पडले होते..
@ धागाकर्ता - इतके निराश व्हायची गरज नाही, भारत वगळता इतर सर्वत्र आजही स्पोर्टींग विकेट बनवल्या जातात. दुर्दैवाने तिथे आपल्या नशिबी पराभव जास्त येत असल्याने आपण ते जास्त एंजॉय करू शकत नाही. म्हणजे आपल्याला चांगले क्रिकेटही बघायचेय पण जिंकायचेही आहे असे झालेय आपले :)
17 Oct 2013 - 7:38 pm | उपास
बदल हा अपरिहार्य आहे.. शिवाय प्रत्येक देश आपल्या सोयीप्रमाणे (!) खेळपट्ट्या बनवतो, त्यामुळे भारतात अशा खेळपट्ट्या बनल्यास आश्चर्य नाहीच. उलट असं झालं नाही तरच आश्चर्य (आठवा कांबळी रडला होता ती इडन गार्डनवरची सेमिफायनल जिथे जयसूर्या ने हातभर चेंडू वळवले, अशी खेळपट्टी का बनवलि क्युरेटरने इतक्या महत्त्वाच्या मॅच मध्ये, कॅप्टन अझरुद्दीनने असं होऊच कसं दिलं असं वादळ उठलं होतं) तस्मात जोपर्यंत दोन्ही बाजू एकाच खेळपट्टिवर खेळतायत तोपर्यंत क्रिकेट हरले म्हणणं आततायीपणाच ठरेल.
आता गोलंदाज आणि फलंदाज ह्यांच्याबाबतीत. हे अस्सचं होतं पूर्वी देखील. आठवा डेनिस लिली आणि थॉम्प्सन.. बॉडी लाईन गोलंदाजी.. मी जुन्या व्हिडीओजमध्ये (वेस्ट इंडिज वि. ऑस्ट्रेलिया) ऑस्ट्रेलियातल्या मॅचमध्ये पूर्ण स्टेडियम ओरडताना ऐकल 'लिली किल, लिली किल..' त्या रागातूनच क्लाईव्ह लॉइडने द्रुतगती गोलंदाजांची अभेद्य फळी उभारली (मिळाला तर टाकेन तो व्हिडीओ..)
गेल्या काही दशकांत नियम फलदाजांच्या बाजूने थोडे बनलेले आहेत पण माझा आक्षेप वेगळाच आहे. पॉवर प्ले, आता तर पाच क्षेत्ररक्षक आत असं असल्यावर कुण्या फलंदाजाने काढलेल्या १०० आणि काही वर्षांपूर्वी (१५-२०) काढलेल्या शंभर ह्यांची तुलना होऊच शकत नाही. पण तरिही वाढतं तंत्रज्ञान, थर्ड अपायरचं लक्ष ह्यामुळे बेनिफीट ऑफ डाऊट मिळण्याच प्रमाणही कमी झालय. तसंच रनरला मनाई करण्याचा उपक्रमही स्तुत्यच म्हणायला हवा.
गोलंदाजांवर अन्याय होत असेल तर त्यांनी आपली गोलंदाजीची पद्धत बदलायला हवी, व्हेरिएशन आणायला हवं आणि क्षेत्ररक्षकांनी एकही झेल सोडण्याची चूक करु नये इतकच म्हणेन. शेवटी प्रेक्षक हे हाय स्कोरिंग गेम पाहायला येतात हे सत्यच!
अवांतर -
सद्ध्या होतय काय की परदेशी खेळाडूंना आयपील मुळे भारतातल्या वातावरणाचा आणि खेळपट्ट्यांचा सराव होतोय त्यामुळे त्यांच्याही धावा होत आहेत आणि तरूण खेळाडू झक्कास इंप्रोव्हायझेशन करतायत अगदी गुड लेंथ चेंडुला शफल होऊन/ पुढे येऊन हाफ वॉली/ लो फुलटॉस घेऊन चोपतायत हे कौतुकास्पद आहेच. तुमच्यात कॉन्फीडन्स असल्याशशिवाय (विशेषतः कीपर स्टंपजवळ असताना) तुम्ही क्रीज सोडून पुढे येणार नाही बॉल तटवायला आणि त्यासाठीच रोहित, शिखर आणि विराटला कडक सलाम....
18 Oct 2013 - 8:49 am | चौकटराजा
तस्मात जोपर्यंत दोन्ही बाजू एकाच खेळपट्टिवर खेळतायत तोपर्यंत क्रिकेट हरले म्हणणं आततायीपणाच ठरेल.
याला प्लस ११११
17 Oct 2013 - 7:41 pm | बाबा पाटील
भारतीय टीम काय फक्त भारतात पाटा खेळपट्या बनवुन ,त्यावर मोठे मोठे स्कोर बनवुन नंबर एक बनलिय असा मला आता वाटतय्,शिंच्या धोनी धोनी आणी कपंनीला स्पोर्टींग विकेटवर खेळताच येत नाय राव,हाय का नाय ? ? ? ?
17 Oct 2013 - 9:58 pm | नानबा
१००% पटल्या गेले आहे...
19 Oct 2013 - 7:11 am | निनाद मुक्काम प...
पाटा खेळपट्टी ही भारतात भारतीय संघ जिंकावा म्हणून अजिबात करत नाहीत , कारण दांडपट्टा फिरवण्यात प्रतिस्पर्धी संघात तितकेच ताकदीचे खेळाडू असतात उलटपक्षी खूपवेळा पाटा खेळपट्टी वर समोरच्या संघात आपल्या पेक्ष्या चांगले गोलंदाज असतात..
.
त्यांमुळे पाटा खेळपट्टी ही भारतीय संघाच्या विजयासाठी नाही तर आय पी एल आधारित मनोरंजनाचा बाप जनतेला दाखविण्यासाठी असतात. आपण विचारलेली शंका निराधार
आहे .
17 Oct 2013 - 8:21 pm | रंगोजी
इशांत शर्मा हा सिंह आणि विनयकुमार हा नागरुपात डोळ्यासमोर आला. अंमळ हसू आले.
१२० च्या गतीने आखूड चेंडू टाकणार्याला कसली आलीत दात आणि नखे?
18 Oct 2013 - 7:29 am | निनाद मुक्काम प...
पाटा खेळपट्टी वर विनासायास धावा मिळत असल्याने व हतबल गोलंदाजाला धुतल्यावर अनेक फलंदाज आपले फलंदाजीचे तंत्र सदोष करतात. , त्याचे पदलालित्य कुचकामी होते. व पुढे चांगल्या खेळपट्टी वर त्यांची भंबेरी उडते , कारण दर्जेदार खेळपट्टी वर टिच्चून खेळण्याचे तंत्र ते विसरले असतात,आणि थोडक्यात एकदिवसीय सामने फलंदाजांचे व कसोटी गोलंदाजांची असे एकसुरी , एकतर्फी सामने पाहणे आपल्या नशिबी येते.
एक फलंदाज हा पाटा खेळपट्टीवर धावांचा डोंगर रचतो व चांगल्या खेळपट्टीवर शून्यावर बाद होऊन येतो ,
मग त्या फलंदाजाला तुम्ही गुणवान म्हणाल का
फलंदाजाने खेळपट्टी चा गुलाम होणे तुम्हाला मंजूर आहे का
चार दिवसात संपणारे कसोटी सामने हे देखील पाटा खेळपट्टी ची चटक लागलेल्या फलंदाजी चे दुष्परिणाम आहेत. फिरकी गोलंदाजांची गौरवशाली परंपरा असलेल्या भारतात
आज अश्या खेळपट्टी मुळे दर्जेदार लेग स्पिनर जवळपास सर्वच संघातून एकदिवसीय सामन्यातून बाद झाले आहेत.
ज्या प्रगत देशातून म्हणजे इंग्लंड , कांगारू ,किवी क्रिकेट ह्या खेळात पैसा आला व त्याचे व्यापारीकरण झाले , दिवस रात्र क्रिकेट , रंगीत गणवेश आले , त्यांनी आपल्या वेगवान खेळपट्ट्या का बरे पाटा मध्ये परिवर्तित केल्या नाही ,
का बरे वेस्ट इंडीज ने क्रिकेट ला परत जुने सोनेरी क्षण
प्राप्त करण्यासाठी पाटा खेळपट्ट्या बनविल्या नाहीत.
साउथ आफ्रिकेने सुद्धा भारताचा कित्त्ता का गिरवला नाही ,
पाटा खेळपट्टी मग धावांचा डोंगर व प्रेक्षकांची गर्दी हे समीकरण फक्त भारतात आहे.
ह्यामुळे आपल्या गल्लीत टेनिस बॉल चे सामने होतात.
त्यात धावांची बरसात होते तसे भारतातील सामने वाटतात.
माझ्यामते धावपट्टी कशी असावी ह्याबाबत सर्व जगभरात
निकष कडक केले पाहिजे
निर्जीव पाटा व आखाडा खेळपट्टी करणाऱ्या देशावर दंड आकारले पाहिजे.
आणि अभिषेक ने म्हटले त्याप्रमाणे भारत वगळता संपूर्ण जगात समतोल खेळपट्ट्या बनविल्या जातात. पण भारत क्रिकेट विश्वात महासत्ता आहे त्यानेच असा खेळाचा बेरंग करणे पचनी पडत नाही.
19 Oct 2013 - 8:00 am | राजेश घासकडवी
कुठचाही आकडा तपासून न बघता लोकं 'भारत जिंकला पण क्रिकेट हरलं' वगैरे गड आला सिंह गेला स्टाइलचं भावनिक काहीतरी कसं बोलू शकतात हे मला नेहमीच कोडं पडलेलं आहे. १८० च्या वरचा स्कोअर हा कायमच महत्त्वाचा राहिलेला आहे - ८० चं दशक असो, ९० चं की २००० चं.
पहिल्या बॅटिंग करणाऱ्या टीमने १८० पेक्षा अधिक धावा केल्यावर त्यांनी किती मॅचेस जिंकल्या आणि हरल्या याची आकडेवारी खाली दिलेली आहे. विन/लॉस रेशो पहा. १.३२, १.४२, १.४१ . म्हणजे ८० च्या दशकात १८० पेक्षा जास्त रन केल्या तर तुमची जिंकण्याची शक्यता ९० किंवा २००० च्या दशकापेक्षा कमी होती! उग्गाच आपलं काहीतरी रडगाणं कशाला गायचं?
Span ........Mat Won Lost Tied NR W/L
1980-1989 388 216 163 2 7 1.32
1990-1999 752 429 302 10 11 1.42
2000-2009 1119 637 450 7 25 1.41
(आकडेवारी क्रिकइन्फोवरून साभार)
19 Oct 2013 - 10:32 pm | श्रीगुरुजी
>>> ८० च्या दशकात १८० तर ९०च्य दशकात २३० धावा एक आव्हान म्हणून प्रतिस्पर्ध्याला वाटायच्या
२००० साली हेच आव्हान २७५ पर्यंत पोहोचले व गेल्या काही वर्षात हेच आव्हान ३०० ते साडे तीनशे असे झाले
इतक्या दशकात क्रिकेट मध्ये गोलंदाजाचे हे अवमूल्यन आपल्या रुपयाच्या जोडीने झाले,
पूर्वीचे गोलंदाज सरस होते की आजकालचे फलंदाज सरस आहेत हेच कळेनासे झाले आहे .
अजून काही वर्षात ४०० धावा फळ्यावर लागल्या की आव्हान शाबूत आहे असे म्हणण्याची नौबत येईल ,पण क्रिकेटची अब्रू शाबूत आहे का
फक्त भारतातच अशी वाईट परिस्थिती आहे. ऑस्ट्रेलियात २०१२ च्या फेब्रु-मार्च मध्ये खेळल्या गेलेल्या भारत्-श्रीलंका-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत अनेक सामन्यातून २३०-२४० च्या आसपास धावा होत होत्या. एका सामन्यात श्रीलंकेने २३६ धावा केल्यानंतर भारताने देखील २३६ केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. अजून एका सामन्यात श्रीलंकेच्या २३८ विरूद्ध ऑस्ट्रेलियाला फक्त २३० च करता आल्या होत्या. अजून एका सामन्यात अशाच २३० च्या आसपास असलेल्या धावसंख्येचा भारताने यशस्वी पाठलाग केला होता. अंतिम ३ सामन्यात सुद्धा २ सामन्यात २४० च्या आसपास धावा झाल्या होत्या. इतकी कमी धावसंख्या असून सुद्धा सामने थरारक होत होते.
भारतात मात्र ३०० धावा झाल्या तरी जिंकण्याची खात्री नसते.
20 Oct 2013 - 6:03 pm | निनाद मुक्काम प...
श्री गुरुजी ह्यांच्याशी सहमत
20 Oct 2013 - 9:18 am | चौकटराजा
भारतात मात्र ३०० धावा झाल्या तरी जिंकण्याची खात्री नसते.
कालचीच म्याच पहा ! एका ओव्हर मधे ३० धावा ! आता सगळ्याना पटेल की महान काय आहे ? खेळाडू ? फलंदाज? गोलंदाज ? अंपायर, आयसीसी बीसीसीआय ... काही ही नाही ! महान आहे क्रिकेट खेळाची रचना ! इतर कोणत्याही मैदानी
खेळात असा गुण नाही. कोणता तो गुण.....ते जिम लेकर, हिरवानी, यजुवेंद्र सिंग ,कुंबळे, ब्रॅडमन, रिशीकेश कानिटकर, जावेद मियांदाद, बौचर, क्लाईन, मकाय, नाना जोशी, ही नावे आठवून पहा !
20 Oct 2013 - 9:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
कालचं फेसबुक वरचं एक स्टेटस.
"ईशांत शर्मा च्या आईला मॅच चालु असताना आणि झाल्यावर बर्याचं उचक्या येतं होत्या."
20 Oct 2013 - 11:08 am | माझीही शॅम्पेन
बापरे म्हणजे लोक अजूनही इतक्या आवडीने क्रिकेट बघतात ? त्यावर लेख लिहितात अणिं तितक्याच पोट तिडिकेने प्रतिसाद देतात , कमाल आहे बुवा .... :)
20 Oct 2013 - 9:29 pm | उपास
आता त्याला नखं काढलेला वाघ म्ह्णयाचं की वाघाचं कातडं पांघरलेला (एकही यॉर्कर न टाकता येणारा) गाढव समजयाच? आंतरराष्ट्रीय स्तरावर असा बिनडोक गोलंदाज भारतातून खेळतोय याची लाज वाटतेच!
21 Oct 2013 - 2:16 am | निनाद मुक्काम प...
उपास जी तुमच्या भावनेशी सहमत
सचिन द्रविड , सौरभ ह्यांच्या निवृत्ती नंतर आता पुढे काय असा प्रश्न फलंदाजी मध्धे आला नाही ,जंबो च्या निवृत्ती नंतर आपल्या कडे कोणत्याही खेळपट्टी वर खडूस गोलंदाजी करणारा अजून निर्माण झाला नाही आहे , जहीर न एकही काळ आशा पल्लवित केल्या हो त्या पण सध्या तो दुखापतग्रस्त जास्त असतो ,
अर्थात जंबो निवृत्त झाल्याची सचिन , द्रविड एवढी चर्चा चेपू वर झाल्या नाहीत ,
बिचारा
पाटा खेळपट्टी बनविणाऱ्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचा प्रतिस्पर्धी संघांच्या उरात धडकी भरवेल असा जलदगती गोलंदाज निर्माण होणे हे भांगेत तुळस दिसण्या एवढे दुर्मीळ आहे.
21 Oct 2013 - 6:02 am | निनाद मुक्काम प...
माझ्या लेखातून मी जे मत मांडले
तेच मत इयन चॅपल ने आता व्यक्त केले आहे.
21 Oct 2013 - 12:25 pm | सुबोध खरे
परवाच्या सामन्यात त्यांनी ३ ० ३ धावा पार करून भारताला हरविले. आता इयान चापेल किंवा धागाकर्ता काय म्हणतात यचे कुतूहल आहे. हरल्यावर गळा काढणे असते. असो
22 Oct 2013 - 5:40 am | निनाद मुक्काम प...
ह्या सामन्याच्या आधी तीनशेचा टप्पा पार करू भारत जिंकला होता ,
मुळात येथे कोण जिंकते व हरते हा मुद्दाच नाही आहे ,
एकदिवशीय सामन्यात ६०० पेक्ष्या धावा निघणे व त्याचवेळी कसोटी चार दिवसात आटोपण्याचे प्रमाण वाढणे
हा विरोधाभास क्रिकेटचा घसरलेला. दर्जा दर्शवितो,
मी जे लेखात लिहिले तेच थोड्या फार फरकाने काही दिवसानंतर इयान ने लिहिलेले पाहून मला बरे वाटले ,
त्याला गोलंदाजांचा कैवार का घ्यावासा वाटला हे विकीपंडित किंवा गुगलपंडित जरुर ह्यांनी शोधून काढावे ,
इम्रान च्या आत्मचरित्रात त्याने पाटा खेळपट्यांवर तोडगा म्हणून चेंडू कुरतडणे सुरु केल्याचे म्हटले.
आणि अशी खेळपट्टी इशांत सारख्या गोलंदाजाला चेपू व इतर सोशल नेट्वर्किंग साईट वर चेष्टेचा विषय बनवते
उद्या भारतीय युवा खेळाडूंनी गोलंदाज होण्यासाठी आदर्श म्हणून कोणाकडे पहायचे.
21 Oct 2013 - 6:28 am | वेल्लाभट
नो दादा; नो क्रिकेट
दादा बाहेर गेल्यापासून क्रिकेट ची मॅच कधी आवर्जून बघावीशी वाटली नाही. युवराज, कोहली, बरे वाटतात कधी कधी बघायला. पण बातम्यांमधल्या हायलाईट्स मध्येच.
22 Oct 2013 - 6:30 am | उपास
निनाद, तुझी कळकळ समजू शकते पण इशांत शर्माच्या त्या ओव्हरच्या बाबतित खेलपट्टीला दोष देण वेडेपणाचंच ठरेल. त्याच विकेटवर जॉन्सनने टिच्चून मारा केला ते.. मॅग्रा, अक्रम टाकायचे ते.. तुम्हाला शेवटच्या ऑव्हर्सेमध्ये ट्प्प्प, दिशा ठेवता येत नसेल, दबावाखाली खेळता येत नसेल तर खेळपट्टीला दोष कसा द्यायचा..
ऑन लार्ज स्केल, गोलंदाजांवर अन्याय होतोय भारतिय उपखंडात हे विदित आहेच, साहेबांना काही सुचलं ह्यातून तरच काहीतरी घडू शकतं, शेवटी खेळाचं बाजारीकरण झालच आहे, अर्थकारण नियमांना वळवते आणि तदनुरुप प्रत्येक दशकात खेळ त्याचे स्वरुप बदलणारच. भारतिय उपखंडातून खेळात पैसे येतात आणि लोकं विकेट बघण्यापेक्षा धावा पहायला येतात त्यामुळे मागणी तसा पुरवठा असं साधं समीकरण आहे! त्याउप्पर, घरच्या खेळपट्ट्या कशा ठेवायचा ह्याचा अधिकार कर्णधाराला असल्याने तो त्याच्या बलस्थानानुरुपच त्या बनवणार, पाहुण्यांच्या नाही.. नाहीतर त्याची काही धडगत नाही :)
22 Oct 2013 - 8:05 am | निनाद मुक्काम प...
उपासजी
भारतात गोलंदाजाचे नशीबच फुटके आहे ,
इशांत शर्मा हा क्रिकेट विश्वात काही पहिला गोलंदाज नाही आहे ज्याला शेवटच्या षटकात मार पडला ,
चेतन शर्मा म्हटला की लोकांना शारजाचा विजयी षटकार
आठवतो , मात्र त्याची हॅटट्रिक आठवत नाही.
ह्याउलट भोपळ्यांची माळ लावणारा एखादा फलंदाजाने मग तिहेरी धावसंख्या गाठली की त्याचा उदो उदो सुरु होतो.
थोडक्यात भारतीय क्रिकेट विश्वात फलंदाज म्हणजे बिझनेस क्लास व गोलंदाज म्हणजे वर्किंग क्लास आहेत
किंबहुना पूर्वी शेवटच्या षटकात गोलंदाज व फलंदाज ह्यांना समसमान संधी असायच्या ,
आजकाल भारत असो किंवा प्रतिस्पर्धी संघ
शेवटच्या षटकात एखादा गोलंदाज जरी फलंदाज म्हणून खेळायला आला तरी पाटा खेळपट्टी वर तो सामना जिंकून देईल
गोलंदाज हतबल होतात.
भारतीय क्रिकेट बोर्ड हे डॉलर मिया व पुढे श्रीनिवासन ते राजकारणी माणसांच्या कडे आले आणि खेळाचा खेळखंडोबा झाला
आणि भारतात पाटा खेळपट्टी हि भारतीय संघ जिंकण्यासाठी
होत असेल असे मला वाटत नाही ,
इयन ने लिहिले त्या प्रमाणे येथे तंत्रा पेक्ष्या ताकद महत्त्वाचं जी प्रतिस्पर्धी संघात सुद्धा असते ,
पण ह्या खेळपट्टी वर धावांचे डोंगर उभे राहिले तरं फलंदाजांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजणाऱ्या त्यांच्या प्रायोजक कंपन्यांचे उखळ पांढरे होते.
खेळाडूंच्या प्रायोजक कंपन्या व त्यांचे क्रिकेट मधील हित संबंध हा एक वेळच रंजक विषय आहे.
सध्या मुंबई क्रिकेट बोर्डाची निवडणुकीचे उमेदवार पहिले तरं महाराष्ट्राच्या विधान व लोकसभेच्या निवडणुकीची आठवण येते.
30 Oct 2013 - 9:24 pm | बाबा पाटील
दोन्हीकडच्या गोलंदाजांवर फ़लदाजांचा चमत्कार .
31 Oct 2013 - 2:54 pm | श्रीगुरुजी
काल पुन्हा एकदा भारत जिंकला आणि क्रिकेट हरले. पाटा खेळपट्टीवर धावांचा महापूर बघताना गोलंदाजांचे हाल बघवत नव्हते. बीसीसीआयला कधी अक्कल येणार खुदा जाने.
31 Oct 2013 - 5:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाटा खेळपट्टीवर धावांचा महापूर बघताना गोलंदाजांचे हाल बघवत नव्हते. बीसीसीआयला कधी अक्कल येणार खुदा जाने.
-दिलीप बिरुटे
1 Nov 2013 - 6:54 pm | उपास
पाटा खेळपट्टीला असा सरसकट दोष देता येणार नाही. माझ विश्लेषण -
१. भलतच फास्ट आउटफील्ड - फार कमी फटके झेप मारुन अडवले गेलेत बॉन्ड्रीवर, इतक्या वेगात चेंडू सीमापार होतोय की तीन रन धावायची वेळ येतच नाहीये, बॅट्समनला तुलनेने कमी धावायला लागतय, त्यामुळे होणारी दमछाक कमी.
२. गोलंदाजांना बदलत्या नियमांशी जुळवून घेता येत नाहीये. किती प्लेयर्स सर्कलच्या आत असणारेत कधी ह्याचा नविन नियमांप्रमाणे डोक्यात सराव ठेवून त्याप्रमाणे फिल्डींग आणि त्याला अनुकूल बॉलिंग असं होत नाहीये. लेग स्टंपवर टप्प ठेवलात तर मार मिळाणारच. सगळेच बॉलर डचमळताना दिसतायत. अर्थात ज्या रितीने युवराजला बोल्ड केले मिशल जॉन्सन बरेच चाम्गले चेंडू टाकतोय.
३. जडेजा पण टिच्चून टाकतोय की गोलंदाजी अगदी इकॉनॉमिकल टाकली त्याने पलिकडल्या मॅचमध्ये. पोवर प्ले मधे अन्याय होतो हे मान्य केलं तरी तो खेळाचा एक भाग / नियम आहे म्हटल्यवर त्याप्रमाणे तंत्रात बदल केलात तरच टिकाव लागेल बॉलरचा!
2 Nov 2013 - 3:29 am | निनाद मुक्काम प...
उपास जी दुर्दैवाने तुमच्या मताशी विजेता संघाचा कर्णधार धोनी व मग कोहली सुद्धा सहमत नाही आहेत. त्यांनी गोलंदाजांच्या बाजूने केलेले विधान पहिले तर त्यांच्या माझ्या मूळ लेखाशी नाळ जोडता येईल.