आपण असं विचित्र का वागतो?

मन's picture
मन in काथ्याकूट
15 Oct 2013 - 10:00 pm
गाभा: 

पुरेसे भंपक ,थिल्लर, उथळ किंवा काही बाबतीत chauvinist झाल्याशिवाय लोकप्रिय (मराठीत पॉप्युलर) होणं अवघड आहे.
"ठेचून काढा साल्यांना", "फार झालय आता" , "एखादा अणुबॉम्बच टाकला पाहिजे " असे म्हटल्याशिवाय टपरीवर ढोसल्या जाणार्‍या चहाला चव काही येत नाही.
अणुबॉम्ब सोडा, गेलाबाजार नुन्सता बॉम्ब टाकणं सोपय का? तुम्ही त्यासाठी काय काय सोसायला तयार आहात?
बॅटल् ऑफ ब्रिटन च्या दरम्यान, दुसर्या महायुद्धात नाझींनी बेसुमार बॉम्बफेक करुन इंग्लंड बेचिराख करायचा चंग बांधला.
त्यातही लंडन तर भुइसपाट व्हायची वेळ आली.धडाधड बिल्डिंगा पडल्या.(हो. त्याच. स्क्वेअर फुट, फुटाफुटांच्या दराने घेतल्या जाणार्‍या जमिनिंसारख्याच अपार्टमेंटा धडाधडा पडल्या.
रस्त्यात बॉम्ब पडले. मूलभूत सुविधा उखडून पडल्या. रस्त्यात पाच्-पाच दहा फुट व्यासाचे खड्डे पडले. कुठे पाणीपुरवठा बंद पडला. कुठे वीज पुरवठ्यानं राम म्हटलं.
अशा वेळी तुम्ही हापिसात कसे जाणार? राहणार कुठं ? पोराला शाळेत कसे सोडणार? मुळात शाळाच उध्वस्त झाली असेल तर कसे करणार?
सोसवेल हे? झेपेल हे?) तसं आपल्याकडं झालं तर चालणार आहे का? हा विचार ही माणसं चहाच्या घोटासोबत करत असतील का?
.
एकाशी शेवटी बोलताना हा मुद्दा मांडला तर त्यानं तावातावात "हो. चालेल. एकदाच काय व्हायचं ते होउ द्या." असं उत्तर दिलं .
पण त्याला खरच चालणार होतं का? तासभर वीज गेली तर काय भंबेरी उडते शहरात हे आपल्याला चांगलच ठाउक आहे. एकदम दोन्-चर दिवस वीज नाही. आठ-दहा दिवस पाण्याची बोंब ;
जागचे हलू शकत नाहित असे खड्डे हे सगळे सोसाल? (हॅ हॅ हॅ पुण्यात ऑलरेडी खूप खड्डे आहेत वगैरे अवांतर व्हायचा इथे स्कोप आहे. पण इथल्या खड्ड्यातून कुरकुरत का असेना तुमची बाइक्,कार, बस जाउ शकते.
आख्ख्या बसचं चाक रुतून बसेल इतके मोठे खड्डे रस्त्यात सर्वत्र पडले असतील तर चालेल? ते खड्डे नसतना तुमच्या वाहतूक परिस्थितीचा विचार करा; मग बोला.)
असो.
.
.
चहाला किंवा इतरत्रही कुठलाही मुसलमान भेटला तर गप्पांत की अचानक "सब पॉलिटिशियन बुरे हय ; वहिच झगडा लगाते हय" हे तरी वाक्य येतं
किंवा " सभीच धरम मे अच्छाइच सिखाया हय. लेकिन कुच बुरे लोग सभी तरफ हय."
हे अधनं मधनं ऐकवणं कम्पलसरी आहे का? आडून आडून "आम्ही तुलाही बरोबरीचेच मानतो बरं का" हे सुचवणं विचित्र नाहिये का? वाटाघाटीच्या टॅबलावर बसल्यासारखं कृत्रिम वागणं का असतं पब्लिकचं?
जो खरोखर एखाद्याला बरोबरीचा मानत असेल तो "मी तुला/तुम्हाला बरोबरीचा मानतो" हे पुन्हा पुन्हा ऐकवेल का?
समजा साठे आणि माटे नामक दोन व्यक्ती भेटताहेत. ते सरळ "छ्या बुवा फार उकडतय हल्ली. " किंवा " चल जरा भेळ खाउ" असं म्हणतील आणि इकडचं तिकडचं बोलतील की नाही?
की साठे पुन्हा पुन्हा माटेंना म्हणतील "खरेतर तुम्हीही चांगलेच आहात हो. तुमच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे."
"थोरामोठ्यांनी चांगलं वागायचाच उपदेश केला. माणुसकी हाच धर्म.(इन्सानियत ही धरम हय)" असलं विचित्र बोलाल.(म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीत, साठे अणि माटे हे दोन परिचित गृहित धरलेत;
सहज चहापाण्याला भेटतात तसे भेटलेत. )
.
एखादा "सलिम" साठ्यांना भेटला तर ते साठे आडून आडून नम्रपणाचा आणि विशेषतः उदारतेचा आव का आणतात?
सलिमला डायरेक "काय बे अशात कोणता पिक्चर पाहिलास" किंवा "काय कुठे फिरायला जायचा प्लॅन आहे ह्या वीकांतास " असे विचारणे ह्यांना पुरत नाही का? का पुरत नाही? सलिमची आयडेंटिटी एक मुस्लिम म्हणूनच गृहित धरतो. मुस्लिम हा एक टेम्प्लेट आणि ते सगळे काही कोटी ह्यातच बसणारे असं काही इतरांच्या ब्याक ऑफ द माइंड मध्ये चाललेलं असतं का?
.
.
त्याहून चमत्कारिक प्रकार म्हणजे भारताचे राष्ट्रपती नि पंतप्रधान विचित्र शुभेच्छा का देतात. त्यांच्या शुभेच्छांत विचित्र अध्याहृत्/गर्भित विनवणी का असते?
"तमुक तमुक सण्/धर्म शांती आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतो" असे हे दर सणाला का म्हणतात? गपगुमान किम्वा मनमुराद सेलिब्रेट का करत नाहित?
किंवा सरळ "हा दिवस चांगला जावो ही शुभेच्छा" इतक्या सरळ शुभेच्छा देणं पुरेसं नाहिये का? दरवेळी "ईद हा सामाजिक ऐक्याचा संदेश देते" हे का ऐकायचं.
ते खरं जरी असलं तरी तुमचं त्यामागचं टोनिंग प्रामाणिक आहे का? तुम्ही म्हणताय तेच तुम्हाला म्हणायचय का?
.
परवा तर चक्क कुणीतरी "दसरा हा सुद्धा सामाजिक शांततेचा संदेश देतो. सोनं लुटून आणणं हे शांतता नांदवण्याचं प्रतीक आहे" असाही संदेश दिला.
आणि ह्याच्याच पाठोपाठ "आपले पराक्रमी राजे रजवाडे शेजारी मुलूख लुटून ते लुटीचे खरेखुरे सोने आणत " हे सुद्ध दरवेळी पेप्रात छापून येतं; इलेक्ट्रॉनिक मिडियात ऐकू येतं.
अरे? लुटालूट ना ही? शांततेचा संदेश कसा देइल ? हयतही एक भंपक "समन्वयवादी" पळवाट आहेच. "अरे ते शेजारच्या राज्यातून आणायचं" किंवा "स्वतःचं घर नाही लुटायचं काही. शेजारच्यांचं लुटायचं!"
हे शिकवलं जातं. अरे पण सगळ्यांनीच अशी सगळ्या शेजार्‍यांशी मारामारी करायची काय? मग काय घंटा शांतता मिळणार ? आनंद आहे.
.
.
बरं हा मवाळवाद, समन्वयवाद कुठल्या टोकाला जाइल ह्याचा नेम नाही. आज चक्क एकानं "बकरी ईद म्हणजे काही खरे बकरे बळी द्यायचे नसतात्.तर स्वतःतील दुर्गुणांचा बळी(sacrifice)द्यायचे असते."
असे ऐकवले. त्याला विचारलं की बाबा रे , असं कुठं लिहिलय ते तरी सांग, एखादी कुराणातील आयत नि सूरा सांगता नाही आली तरी चालेल, एखादी हदिस मधील घटना/कथा ह्याला आधार म्हणून आहे का?
तर मात्र सटपटून अ‍ॅक्च्युअली ते माझं इंटरप्रिटेशन आहे वगैरे वगैरे बडबड सुरु केली. अरे पण असं ज्याचं त्याचं इंटरप्रिटेशन असेलच की! हे तुझं तुझ्यापुरतं आहे.
.
.
हे का होतं? गोष्टी पवित्र मानल्या जातत. आणि मग पवित्र गोष्टी आपल्या मानसिक चौकटीपेक्षा वेगळ्या दिसल्या की मग चौकट आणि पवित्रतेचे नियम दोन वेगळे आहेत हे सरळ साधं मान्य करणं सोडून
त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न होतो. ती गोष्ट कशी माझ्या चौकटीला अनुसरुन आहे हेच मी सांगतो.
ह्यानं कधीच प्रगती शक्य नाही.
.
.

"आपल्याला सगळ्यांची एकजूट हविये. भांडण नकोय. शांतता हे सर्वोच्च मूल्य. विनाकारण मारामारी/विध्वंस नको." हे असं एखादं मूल्य आपण ठरवतो.
पण त्याचवेळी ह्याविरुद्ध असलेल्या परंपरेनं केल्या जाणार्‍या गोष्टींना अफाट जनसागराचा पाठिंबा दिसतो. मग ९९.९९% लोकांना "तुम्ही आणि तुमचे वाडवडिल करताहेत ते पटत नाही" असं स्वच्छ सरळ सांगता येत नाही.
हे होतं कधी आदरयुक्त(आपुलकीयुक्त) भीतीने किंवा कधी भीतीयुक्त आदराने.
पहिली केस म्हणजे एखादी व्यक्ती घरच्यांना दुखावणे टाळते. दुसरी केस म्हणजे मुस्लिमांशी बोलताना जरा टरकूनच बोलते.(मुस्लिम "छ्छी छ्छी" आहेत तसेच ते "भयंकर" आहेत, हे घट्ट रुजलय डोक्यात.
ह्याच्यावर उपाय काय? तर समन्वयवादी मंडळी परंपरांचा "खरा अर्थ" चांगलाच आहे; कालौघात तो बदलला आहे वगैरे वगैरे सांगतात.
आपल्या परंपराविरोधी सुधारणांना परंपरांचाच आधार घेउ पाहतात. हे विचित्र आहे.
हा विचित्रपणा मी कशाला म्हणतो? "खुदा के लिये" पाच सात वर्षांपूर्वी आलेला एक पाकिस्तानी बहुचर्चित चित्रपट. ह्यात शेवटच्या प्रसंगात नसीरुद्दीन शहा
ह्यांनी भूमिका केलेले एक पात्र आहे. हे पात्र मौलवी का तत्सम धार्मिक पदावर कार्यरत आहे. पण ते बरेच मवाळ आहे. चित्रपटातील घटना पाकिस्तानी धर्मांधतेच्या
काळात घडत असताना धार्मिक क्षेत्रातील अशा व्यक्ती आशेचा किरण असू शकतात हे ध्वनित करणारे हे पात्र. त्याची कोर्टातील जुबानी(तपासणी/साक्ष??) घेतली
जाण्याचा प्रसंगात अत्यंत कौतुक केला गेला. ह्यात तो उठसूट इस्लाम कसा पुरोगामी आहे; तो किती छान आहे; शांतता; अमन वाला आहे वगैरे वगैरे
सांगत असतो.दरवेळी त्यासाठी तो कुराण आणि हदिसमधली उदहरणं काढून देतो. काही प्रेक्षक एवढ्याने भारावून जाउन इस्लाम आणि अमन हे समानार्थीच आहेत असे मानत बाहेर पडतात.
म्हणजे दोन समूहांतील काही लोकांचं एकमेकांबद्दल, एकमेकांच्या श्रद्धांबद्द्ल चांगलं मत होतय तर. चांगलय की!
हो; होत असेल तर चांगलच आहे हो. पण फक्त एक शंका आहे.
"अहो बघा हे धर्मग्रंथातही सांगितलय . म्हणून हा कायदा(किंवा अमुक एका व्यक्तीची वागणूक) बरोबर आहे. ह्याला मान्यता द्या हो." अशी विनवणी केल्यासारखं होत नाही का? म्हणजेच दरवेळी धर्मग्रंथाची साक्ष काढलिच पाहिजे का? ह्याचा साइड इफेक्ट म्हणून मग एखादी गोष्ट धर्मग्रंथाला अनुसरून नसली तर त्यावर सरसकट बंदी
घालणार का? म्हणजे हा "शरिया" गळी उतरवण्याचाच प्रकार झाला की.
धर्मग्रंथाचं प्रामाण्य नाकारणारा कोपरनिक्स , अंत समयीचा गॅलिलिओ , सचोटिचा सॉक्रेटिस हे इथून पुढे अशा समाजात अगदि एक्विसाव्या शतकातही निर्माण होणे शक्य कसं होइल?
पूर्वी लोकमत वगैरे पेपरमध्येसुद्धा पैगंबरवासी रफिक झकेरिया ह्यांचं सदर येइ. त्यातही "अमुक चांगली गोष्ट आमच्यकडे कशी सांगितली आहे" हे येइ.किंवा लेखाचा टोन समजावणीचा असे. "चार बायका केल्याच पाहिजेत असे नाही. अमुक अमुक हदिस पहा." असा तो टोन असे. असे विचार व प्रयत्न उदात्त आहेतच.
पण त्यातून दरवेळी ग्रंथाची साक्ष, मौलवींची परवानगी घेण्याचा प्रयत्न विचित्र आहे. म्हातारी गेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये म्हणतात ते हेच की.
.
अर्थात ह्याचा प्रतिवाद म्हणून लागलिच "अरे पाकिस्तानात तालिबानी आहेत तसे तुमच्यातही काही जुनी आत्मघातकी खोडं आहेतच की" असं उत्तर येण्याची दाट शक्यता.
तसे असेलही, पण मूळ मुद्दा फक्त एका धर्माचा नसून प्रवाहीपणा नसण्याचा आहे. दरवेळी फार पूर्वी लिहून ठेवलेल्या कशाला तरी आमचे कायदे, वागणूक , आख्खं आयुष्य
compliant असावं अशी अपेक्षा ठेवत बसण्याला आहे. तो त्यांच्यात असू शकेल तसा ह्यांच्यातही असू शकेल.
.
.
ता क :- कुठल्याही धर्माच्या व्यक्तीबद्दल केवळ तो त्या विशिष्ट धर्माचा आहे म्हणून मला द्वेष नाही. (हे असं सांगावं लागणं सुद्धा ह्या लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या
भंपक उदाहरणाच्या लायनीवर जातय ह्याची कल्पना आहे; पण नाव घेउन लिहिल्यानं गैरसमज होउ शकण्याची शंका वाटली, म्हणून खुलासा.)
.
--मनोबा

प्रतिक्रिया

तुम्ही जाज्वल्य पुणेकर आहात का हो?

मन१'s picture

15 Oct 2013 - 10:14 pm | मन१

त्याचा काय संबंध?

हेच म्हणतो. बहुतेक विजुभौंचा धाग्याचा टयाब चुकला असावा.

पैसा's picture

15 Oct 2013 - 10:38 pm | पैसा

पण एवढा विचार करायला आम्हाला वेळ नसतो आणि वेळ असेलच तरी ते अनेक आघाड्यांवर परवडणारं नसतं. तरीही एखादा समाज असा का वागतो याला तात्कालिक कारणांपेक्षा समाजाच्या स्मृतीमधे असलेली अनेक शतकांची कारणे आणि एकत्रित अनुभव्/शहाणपणा/वेडेपणा असतो.

अर्धवटराव's picture

15 Oct 2013 - 10:48 pm | अर्धवटराव

कुठल्याच कटकटीत काहिच सहभाग नसताना उगाच मनस्ताप भोगणार्‍या प्रत्येक सामान्य माणसाचं मनोगत अगदी व्यवस्थीत मांडलय.

अवतार's picture

15 Oct 2013 - 11:13 pm | अवतार

Divide and rule is the ONLY way to rule.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2013 - 12:53 am | अत्रुप्त आत्मा

:)

बॅटमॅन's picture

16 Oct 2013 - 1:00 am | बॅटमॅन

जबराट!!!!

अरुण मनोहर's picture

16 Oct 2013 - 1:25 am | अरुण मनोहर

लेख खूप आवडला.
साधेपणाने आणि सुसुत्रपणे "मना"तील कोलाहल मांडला आहे.
आपण असे कां वागतो ह्याचे उत्तर मात्र मिळणे कठीण आहे.
तसेच एक उत्तर देखील नसणारेयं.
समाजमानसशास्त्रवाले, राजकारणी,विचारजंत.... प्रत्येकाचे विष्लेषण वाचायला आवडेल.
पण तशी उत्तरे वाचून देखील हे विचित्र वागणे नाही संपणारेयं.

तेव्हा मनातली वादळे नेहमीप्रमाणे मनातच विरून जाणारेयं.

पण ते अलहिदा. एक प्रामाणिक चिंतन वाचायला रंजक वाटले.

अनिरुद्ध प's picture

17 Oct 2013 - 7:37 pm | अनिरुद्ध प

+१ सहमत

मनातली वादळे म्हटलेले खरे. प्रामाणिक लेखन.

शिल्पा ब's picture

16 Oct 2013 - 2:16 am | शिल्पा ब

+1

स्पंदना's picture

16 Oct 2013 - 4:20 am | स्पंदना

सुरेख रे मना सुरेख!
हे अस नुसत होत रहात ब्वा! आमच्या हातात परिस्थीती रहात नाही.

श्रीरंग_जोशी's picture

16 Oct 2013 - 8:19 am | श्रीरंग_जोशी

व्वा, काय लिहिले आहे मनोबा!!

यापैकी बहुतांश विचार कधी ना कधी अंधुकपणे का होईना मनात डोकावत असतात पण इतके स्पष्टपणे कुणी लिहिल्याचे प्रथमच अनुभवतोय.

मुक्त विहारि's picture

16 Oct 2013 - 8:48 am | मुक्त विहारि

+ १

अद्द्या's picture

16 Oct 2013 - 11:24 am | अद्द्या

मनोबा .
लेख तर छानच आहे .

हे असं चहा घेताना बहुतेकदा मीही विचार केलाच आहे .
पण मग .

हे सगळे विचार करताना . एखादा मेल येतो . फोन येतो .
कि लागले सगळे रोजच्या रगाड्यात .

या सगळ्यासाठी काही करायचं जाउद्या .
शांत बसून विचार करायला तरी कोणाला फुरसत असते का इथे

जेपी's picture

16 Oct 2013 - 12:24 pm | जेपी

सहमत

अग्निकोल्हा's picture

16 Oct 2013 - 3:37 pm | अग्निकोल्हा

हे नाव लेखकाला जास्त शोभुन दिसेल... असे वाटायला लावणारा लेख !

ग्रेटथिन्कर's picture

16 Oct 2013 - 8:37 pm | ग्रेटथिन्कर

misalpav!

Note: If using color names, different browsers may render different colors, and Firefox have problems if the attribute value is in RGB code (will not display correct color).

Tip: To produce equal results in all browsers, always use hex code to specify colors.

However, the color attribute was deprecated in HTML 4, and is not supported in HTML 4.01 Strict DTD or in XHTML 1.0 Strict DTD. Use CSS instead.

मन१'s picture

22 Oct 2013 - 7:36 am | मन१

सर्व वाचक , प्रतिसादकांचे आभार.सध्या मिपा हापिसातून उघडत नसल्याने काही प्रतिसादांना उपप्रतिसाद द्यायचा असूनही जमेलसं वाटत नाही.

मन१'s picture

23 Oct 2013 - 7:23 am | मन१

मूळ धाग्याचच एक्स्टेंशन असलेला हा प्रतिसाद देत आहे.
.

पब्लिकच्या कृत्रिम वागण्याबद्दल :-
मी नुकताच एक आंतरराष्ट्रिय ब्यंकेची सॉफ्ट्वेअर पाहणार्‍या उपकंपनीत भरती झालोय.(software arm of MNC, international bank असं म्हणता यावं.)
इथे ऑफिस भारतात असले तरी कित्येक युरोपीय वंशीय काम करतात. त्यांच्याशी कसे वागावे ह्यावरही एक भाग होता.(बहुदा त्यांच्या फीडबॅक वरून त्यातील सिलॅबस तयार केला असावा.)
तिथे सुरुवातीच्या वागणूक मार्गदर्शन शिबिरात(behaviour training) काही पथ्ये सांगितली.
वागणूक प्रोफेशनल असावी ही कुठलीही कॉर्पोरेट वर्तुळातील अपेक्षा तिथे होतीच. पण वातावरण फ्रेंडली असावं हाही मुद्दा ठसवण्यात येत होता.
अर्थात फ्रेंडली ह्याचा अर्थ नको तितके वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसणे नव्हे ; हे ही आवर्जून सांगितले. त्याचा सारांश:-
भारतीयांच्या प्रतिक्रिया ह्या एकट्या राहणार्‍या प्रौढ व्यक्तीबद्दल विचित्र असतात. स्त्रिया , अधिक वयाच्या असतील तर अजूनच विचित्र. आणि स्त्री घटस्फोटित किंवा विधवा ; त्यातही तिला अपत्ये असतील तर अजूनच विचित्र.
युरोपीय वंशीय लोकांच्यात हे सिंगल लोकांचे प्रमाण भारतापेक्षा अधिक आहे.( मनोबा, विदा द्या. जा फुट. देत नै.) भारतीय "स्त्री एकटी आहे ह्याचा अर्थ ती available आहे" असा घेताना दिसतात.
त्यातही तिने चुकून कॉफी किंवा लंच वगैरे बोलावले, ट्रीटला बोलावले तर त्यांची खात्रीच होउन जाते.
घटस्फोटित असली तर आडून आडून कुठे सहानुभूतीचा उगीचच खांदा द्यायला जातात किंवा "नक्की कुणात प्रॉब्लेम असावा" ह्याची डिटेक्टिवगिरी सुरु करतात.
पण सगळं कसं आडून आडून. घटस्फोटिता ही चिडकी, निराश, हताश किंवा अतिआक्रमकच किंवा माजोरडी असली पाहिजे किंवा गरिब बिचारी, victim म्हणून जगणारी असली पाहिजे असे पब्लिक ठरवूनच टाकते.
सगळं कसं type casting.आम्ही इतर काही म्हणून पाहूच शकत नाही. दरवेळी उगीचच स्वतःच्या कृत्रिमतेने दुसर्‍यास अवघडायला लावतो.
.
गे लोकांबद्दलही हेच आणि असेच्.विचित्र नजरेने पाहणे.
.
ह्या ट्रेनिंगच्या उपदेशानंतर आठवला तो अगदि असाच मुद्दे असलेला वर्षभरापूर्वीचा TOI मधील एक लेख (हो. अजूनही TOI वाचतो.(गटणे "पूर्वी पीत होतो" असा कबुली जबाब देतो ना, तसेच.)).
त्यातही हेच मुद्दे मांडण्यात आले होते.
.
स्वतःपुरते:-
माझे स्वतःचे सांगायचे तर पूर्वी गे लोक आसपास असले तरी अंगावर घाण पडल्यासारखे वाटे.(अमुक एक व्यक्ती गे आहे हे तुला कसे कळे रे मनोबा? काही नाही, ते ऐकण्यात येइ;
क्वचित व्यक्तीने स्वतःच कधी तसे घोषित केलेले असे.) हल्ली त्यांची वैयक्तिक प्राथमिकता मान्य किंवा तो पूर्ण मुद्दा दुर्लक्षित करण्याइतकी तरी समज आहे. पण स्त्रैण वागणारे पुरुष पाहिले की अजूनही शिसारी येते. डोक्यात जातात ही मंडळी. गंमत म्हणजे आकर्षक बांधा असलेल्या मुलीची पुरुषी हालचाल (कमी लवचिकता, अधिक मोकळेधाकळेपणा, शारिइर्क सलगी अधिक) अजिबात डोक्यात जात नाही. उलट अधिकच आकर्षक वाटते. गंमत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2013 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनोबा लेख सहीच आहे.

-दिलीप बिरुटे