तेरी आंख के आंसू पी जाऊ ऐसी मेरी तकदीर कहां
मी आज दवाखाना उघडा ठेवला होता
आज दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन त्यामुळे आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर ठणाणा बोंबलणारे कर्णे आणि धडा धडा वाजणारे ढोल ताशे याच्या आवाजाची कटकट होणार होती ती टळली. मी थोड्या विचारात होतो संपादक मंडळाने व्यनि करून एक लेख लिहिण्यास सांगितले होते. मुळात मी काही सिद्ध हस्त लेखक नाही तेंव्हा असा मनात आला की लेख लिहिणे माझ्याच्याने जमणारे नव्हते. चार पाच मिनिटे विचार करून डोके शिणले तेंव्हा म्हटले कि गाणी लावावी. तलत महमूद ची सी डी लावली आणि पहिले गाणे लागले "तेरी आंख के आंसू पी जाऊ ऐसी मेरी तकदीर कहां"
तलत मेहमूद (मला एक प्रश्न पडतो कि तलत मेहमूद यांना हिंदीतील अरुण दाते म्हणावे कि अरुण दातेना मराठीतील तलत) आवाज म्हणजे मृदू मुलायम आणि सुरेल. जणू एखाद्या शांत सायंकाळी संधीप्रकाशात केशरी मलईयुक्त बासुंदी चवीने खात बसावे असे.
एवढ्यात एक पंचविशीच्या आत बाहेर असलेली आई एका गोड गोंडस अशा एक वर्षाच्या आर्यमानला घेऊन आली. आता रुग्णसेवा प्रथम म्हणून मी सी डी बंद केली आणि ठरवले कि शांतपणे सर्व रुग्ण झाल्यावर तलत ऐकू.
आर्यमनला पोटात दुखत होते आणि शौचास साफ होत नव्हते. त्याला बेडवर झोपवले तेंव्हा तो कुरकुर करू लागला. आता एवढा गोड मुलगा अशी कुरकुर करू लागला तर मला हसूच येते कारण त्यांचा चेहरा पाहण्यासारखा असतो. मी त्याची सोनोग्राफी सुरू केली. उजवी बाजू बघून (यकृत, पित्ताशय ई) डावीकडे वळलो. तर डावी बाजू फुगल्यासारखी दिसली. तिथे पहिले आणि माझ्या काळजात चर्र झाले. त्याच्या डाव्या मुत्रापिंडात एक क्रिकेटच्या बॉल एवढा गोळा होता.
या वेळे पर्यंत आर्य मान ने रडायला सुरुवात केली. मी त्याच्या आईला विचारले कि त्याचे वडील कुठे आहेत? तेंव्हा ती म्हणाली कि ते बिझी असतात. मी त्याच्या आईला त्याला घट्ट पणे पकडायला सांगितले. तिने विचारले की डॉक्टर काय झाले. मी तिला सांगितले कि मुलाच्या मुत्रापिंडात गोळा आहे आणि आपल्याला तपासणी नीटपणे करणे आवश्यक आहे. त्या आईला धक्का बसला. मी तिला थोडासा धीर दिला तपासणी पूर्ण केली आणि त्याला सोनोग्राफी रूम मधून बाहेर आणायला सांगितले. त्या आईने मुलाला शांत करण्यासाठी बाहेर नेले. इतक्या वेळात मी बालरोग तज्ञांना फोन करून त्याच्या आजाराबद्दल कल्पना दिली. आर्यमान ची आई परत आली तेंव्हा तिचे डोळे पुसलेले दिसले. मी तिला एवढेच सांगितले कि त्याची तपासणी करणे आवश्यक आहे आणि कदाचित त्याचा गोळा शस्त्रक्रियेने काढावा लागेल मी तुमच्या बालरोग तज्ञांशी बोललो आहे तेंव्हा त्यांना भेट म्हणजे ते पुढे काय करायचे ते सांगतील.
आर्यमानचे वडील नसल्यामुळे मी आर्यमानला कर्करोग (wilm's tumour) आहे हे सांगितले नाही. कारण तो धक्का तिला कदाचित सहन झाला नसता. तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव कदाचत हे सांगत होते कि इतक्या लहान मुलाला हि शिक्षा का? आर्यमानच्या वडिलांना आता तरी वेळ मिळेल का? या सर्वातून जाण्यासाठी माझ्याकडे बल असेल का?आणि चिमुकल्या आर्यमान ने असा काय गुन्हा केला होता कि त्याला या सर्व अग्नि दिव्यातून जावे लागत आहे. तरी तिला रोगाचे गांभीर्य अजून पूर्ण माहित नव्हते.
विल्म ट्युमर वरून मला हिरानंदानी रुग्णालयातील एक गोष्ट आठवली. एक अठरा वर्षाची मुलगी (शांभवी) खोकला येतो म्हणून एक्स रे ला आली होती तिचा एक्स रे पाहून मी तिच्या डॉक्टरना फोन केला आणि त्यांच्या परवानगी नंतर सी टी स्कैन केला तेंव्हा माझी शंका खरी निघाली. तिच्या फुफ्फुसात सर्वत्र कर्करोग पसरला होता. तिच्या आईला मी हळू हळू सांगण्यास सुरुवात केली कि फुप्फुसात गोळा असण्याची शक्यता आहे तेंव्हा ती म्हणाली कि डॉक्टर तिची एक वर्षाची असताना शस्त्रक्रिया झालेली आहे. मी कसली विचारले असता ती आई म्हणाली कि तिला विल्म ट्युमर होता आणि तिची उजवी किडनी काढलेली आहे. त्या आईला शंका आली आणी तिने विचारले की डॉक्टर तुम्हाला काय म्हणायचे आहे? मी तिला चाचरत म्हणालो कि एखाद्या वेळेस त्या ट्युमरचा पुनरुद्भव झाला असल्याची शक्यता आहे. त्यावर तिची आई म्हणाली की डॉक्टर ती फक्त अठरा वर्षाची आहे आणि तिने अजून काहीच आयुष्य पाहिलेले नाही. या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते. आणी मला एक गोष्ट पक्की माहित होती कि तो मूळ विल्म ट्युमर असो कि दुसराच नवीन कर्करोग असो तो अतिशय घातक असा कर्करोग होता आणि तो सर्व शरीरभर पसरलेला होता. शाम्भवीकडे फार तर वर्ष दोन वर्ष शिल्लक होती.
त्याच दिवशी मंदार आपल्या आईला धाप लागते म्हणून घेऊन आला होता तिच्या एक्स रे मध्ये न्यूमोनिया होता म्हणून तिला सी टी स्कैन साठी घेतले आणी मी त्याला माझ्या शेजारी बसवून घेतले होते. सीटी च्या प्रतिमा पाहताना माझी शंका खरी ठरली होती. तिला फुप्फुसाचा कर्करोग होता. मी त्या प्रतिमा परत पाहू लागलो तेंव्हा मंदार ने अधीर होऊन विचारले डॉक्टर काय वाटते आहे? मी जरा अडखळत बोलू लागलो कि मला फुप्फुसाच्या कर्करोगाची शंका वाटते आहे. त्यावर मंदार काकुळतीने बोलू लागला कि डॉक्टर दुसरा कोणताही रोग सांगा पण फुप्फुसाचा कर्करोग सांगू नका. मी त्याला विचारले कि असे का? त्यावर तो म्हणाला कि डॉक्टर चारच महिन्यापूर्वी माझे वडील फुप्फुसाच्या कर्करोगाने गेले आहेत आता परत तोच रोग आईला कसा होऊ शकतो? कारण आई आणि वडिलांमध्ये अनुवांशिकतेचा कोणताही धागा नाही. मी तिला कोणत्या तोंडाने सांगू असे म्हणून तो ओक्साबोक्शी रडू लागला. त्याचा पहिला भर ओसरल्यावर तो परत परत तेच विचारत होता की त्या दोघांच्यात कोणतेही अनुवांशिक नाते नाही आणि माझे बाबा सिगारेट सुद्धा ओढत नसत. मी फक्त त्याला एकच सांगू शकत होतो की हा केवळ विचित्र पण दुर्दैवी योगायोग आहे.
परवा माझ्याकडे रचना आली होती. वय ३४ लग्न न झालेली मुलगी. अतिशय पोट फुगत असल्याची तक्रार घेऊन. साधारण दोन महिन्यापूर्वी ती माझ्याकडे आली होती मानेत गाठी झाल्या म्हणून तेंव्हा मी तिला क्षय रोग असण्याची शक्यता आहे म्हणून लिहून दिले होते. दुर्दैवाने तिच्या इतर चाचण्या नक्की काहीच दाखवत नव्हत्या. आणि आज ती मला सारखी पोट दुखते आणि काहीही खाल्ले तरी पोट डब्ब होते म्हणून सांगत होती. मी सोनोग्राफी सुरुवात केली तर प्रथमच पोटात खूप पाणी साचल्याचे लक्षात आले. पोट झोपले असताना सुद्धा भरलेले आणि फुगीर होते. मी तिला पोट पाण्याने भरले असल्याचे सांगितले. त्यावर तिने अत्यंत संकोचाने आणि शरमेने सांगितले कि तिच्या कार्यालयातील सह कर्मचार्याने गरोदर आहेस का हे विचारले? एका प्रौढ कुमारिकेला असे विचारताना लाज कशी वाटत नाही. रचनाला मला हे सांगताना अतिशय शरम वाटत होती कि कोणतीही चूक नसताना तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना लोकांना कोणतीही लाज कशी वाटत नाही? तिचा चेहरा मला पाहवत नव्हता. मला अतिशय वाईट वाटत होते पण मी त्याच्याबद्दल काहीच करू शकत नव्हतो.
अशाच एक पन्नाशीच्या पुढच्या बाईना मी दोन वर्षापूर्वी पहिले होते. त्यांची रजोनिवृत्ती झालेली होती. त्यांचे पोट फुगलेले होते. दुर्दैवाने त्यांच्या यजमानांचे सहा महिन्यापूर्वी निधन झाले होते. यावर लोकांनी त्यांना व्यभिचारी ठरवून टाकले होते वर मल्लीनाथी हि कि जास्त दिवस झाल्यामुळे बहुधा गर्भपात करण्याच्या पलीकडे गेले असावे. सोनोग्राफी केली तर त्यांच्या पोटात बीजांड कोशाचा फुटबॉल एवढा ट्युमर दिसत होता. मी त्यांना हे सांगितले तर त्यांना रडू फुटले आणि बराच वेळ त्या हमसून हमसून रडत होत्या. रडण्याचा उमाळा आवरल्यावर त्या अतिशय शरमेने सांगत होत्या कि आता या वयात असले धंदे मी करेन का इतका साधा विचार सुद्धा त्यांना करता येऊ नये का? माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. मुळात मला त्यांना ट्युमर आहे हे कसे सांगावे हे सुचत नव्हते वर लोकांच्या अशा वावड्या ऐकून मला धक्काच बसला. आपण लोकांचे दुःख जरासे हि कमी करू शकत नाही याची कठोर जाणीव होऊन फार असहाय्य वाटत होते.
केवळ विल्म ट्युमर या शब्दाने माझी स्मरण शक्ती मला कुठच्या कुठे घेऊन गेली होती. माझे मन फार उदास झाले होते. आपण माणूस म्हणून किती नगण्य आहोत आणि आपली झेप किती तोकडी आहे हे परत परत जाणवत होते. या उदासीनतेत मी परत माझी म्युझिक सिस्टीम लावली तर तेथे तीच सी डी परत चालू झाली.
"तेरी आंख के आंसू पी जाऊ ऐसी मेरी तकदीर कहां, तेरे गममे तुझको बहलाउं ऐसी मेरी तकदीर कहां?"
आर्यमान ची आई आपले पैसे भरून आणि बिल घेऊन त्याला कडेवर घेऊन बाहेर गेली. तिला तसेच बाहेर जाताना पाहून माझ्या मनात तेच उदास आणि असहाय्य भाव आले. आता मला तो तलत चा सूर फार आर्त वाटत होता म्हणून मी ते गाणे बंद केले.
प्रतिक्रिया
13 Sep 2013 - 9:12 am | दादा कोंडके
आतडी पिळवटून टाकणारे अनुभव.
13 Sep 2013 - 9:12 am | चौकटराजा
आपल्या शरीराची गुंतागुंत पाहिली ( ग्रेज अनाटामीची पुस्तकातील प्लेट्स ) की थक्क व्हायला होते. आता कितीही प्रगति झाली असली तरी बाहेरून शरीरातील सूक्ष्म बदल दिसतील असा डॉक्टर जन्माला येणे अशक्यच ! कोणत्याही कॅन्सरच्या उघड दर्शनाची सुरूवात खोकला, ओकारी ,छोटा रक्तस्त्राव अशा ने होते. पण अशावेळी तपासणी करता पसरलेला कर्करोग सापडला असेल तर पेशंटच्या वा नातेवाईकांच्या डोळ्यातील अश्रू पिंण्याचे भाग्य निष्णाताला ही मिळत नाही.
13 Sep 2013 - 9:35 am | अग्निकोल्हा
अहो डॉक्टर सकाळ प्रसन्न होती, हा लेख वाचला अन मग... पण खरच कमाल आहे तुमच्या व्यवसायाची/सेवाव्रुत्तिची, अन आपल्या सर्वांच्याच असहायतेचिही.
13 Sep 2013 - 9:46 am | जेनी...
.
डॉक्टर हि शेवटी एक माणुसच असतो ... कसं सहन करत असाल लोकांच्या डोळ्यातलं पाणि ??
13 Sep 2013 - 10:09 am | झकासराव
:(
13 Sep 2013 - 10:24 am | नानबा
......
13 Sep 2013 - 10:27 am | कोमल
:(
13 Sep 2013 - 10:28 am | भ ट क्या खे ड वा ला
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ........
13 Sep 2013 - 10:31 am | भ ट क्या खे ड वा ला
लिहित रहा डॉक्टर साहेब
13 Sep 2013 - 10:36 am | दशानन
:(
सुन्न करणारे अनुभव.
लोकांची मानसिकता पाहून तर.... काय बोलावे तेच सुचत नाही आहे.
13 Sep 2013 - 11:30 am | चित्रगुप्त
निस्तब्ध. असे काही वाचले की काय वाटते, हे सांगणे कठीण.
कदाचित असे काहीतरी:
जिंदगी देनेवाले सुन..तेरी दुनियाँ से दिल भर गया..मैं यहाँ जीते जी मर गया
ऐ मेरे दिल कहीं और चल गम कि दुनियासे दिल भर गया...
अंधे जहान के अंधे रास्ते जाये तो जाये कहा...
जाये तो जाये कहां समजेगा कौन यहां...
देख ली तेरी खुदाई, बस मेरा दिल भर गया...
फिर वही शाम, वही गम, वही तनहाई हैं...
http://geetmanjusha.com/
13 Sep 2013 - 6:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
वैद्यकीय व्यवसायातिल विषण्ण करणार्या अनुभवांचे चपखल वर्णन ! कितीही वर्षे आणि कितीही अनुभव गाठीला जमा झाले तरी त्यांची "पुरेशी" सवय कधीच होत नाही.
13 Sep 2013 - 6:26 pm | पैसा
एखादा किती जगणार हे सगळं शेवट कोण ठरवतं? अशा कितीशा गोष्टी आपण आपल्या मनासारख्या घडवून आणू शकतो आयुष्यात?
13 Sep 2013 - 6:45 pm | मुक्त विहारि
हतबल मानव
13 Sep 2013 - 7:21 pm | सौंदाळा
डॉक्टर एक कळकळीचा प्रश्न..
काही ठराविक उत्तर नसेल याची पुर्ण कल्पना आहे पण तुमचे उत्तर बहुमुल्य आहे.
कर्करोग (कोणत्याही प्रकारचा) वेळेवर लक्षात येण्यासाठी काय करावे?
अशा कोणत्या २-३ चाचण्या, तपासण्या आहेत का की ज्या करुन बहुतांश प्रकारच्या कर्क्रोगाच्या शक्यता रुल्ड आउट होतात?
असल्या तर कोणत्या आणि किती अंतराने रिपीट कराव्यात?
14 Sep 2013 - 9:43 am | चौकटराजा
तोंडात बरा न होणारा फोड व चट्टा , त्वचेवर नव्यानेच आलेला तीळ, सततचा खोकला,थुंकीतून मुत्राद्वारे वा शौचाद्वारे होणारा रक्त स्त्राव स्तन काठिण्य, पाळीच्या स्त्रावातील फरक,बदललेला घोगरा आवाज, कधी मलावरोध तर कधी अतिसार अशी अवस्था अन्न गिळण्यास त्रास ई लक्षणे कर्करोगाची शक्यता दर्शवितात.
13 Sep 2013 - 7:49 pm | सस्नेह
खरोखर तलतच्या आवाजात सार्या दुनियेतला दर्द सामावला आहे..
13 Sep 2013 - 8:27 pm | प्यारे१
काय बोलायचं?
ठसठशीत दिसणारी दु:खं नि न दिसणारी दु:खं ह्यामध्ये आपल्या वाट्याला आलेली दु:खं ह्याच्या क्रमवारीत फक्त फरक आहे.
एखाद्याची साधी कैद, एखाद्याची सक्तमजुरी.
एखादा राजकैदी तर एखाद्याला ३ फुटी अंडा सेल.
कैदी तर सगळेच आहोत आपण. एकानं दुसर्याकडं बघून सांत्वन करुन घ्यायचं एवढंच.
13 Sep 2013 - 8:29 pm | सूड
>>एकानं दुसर्याकडं बघून सांत्वन करुन घ्यायचं एवढंच.
पटलं !!
13 Sep 2013 - 8:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
"जग हे बंदीशाळा..." आठवलं !
13 Sep 2013 - 11:11 pm | किसन शिंदे
हे वाचत असताना मनात विचार येतो 'व्वा! काय उपमा दिलीये डॉक्टरांनी'. पुढचा सगळा लेख अशीच मेजवानी मिळेल बहूदा, पण जसंजसं स्क्रोल डाऊन करत खाली वाचत जातोय तसतसं मनात कुठेतरी हतबलतेची भावना पकड घेतेय.
13 Sep 2013 - 11:50 pm | निनाद मुक्काम प...
डोक पार सुन्न झाले राव
सिंगल मोल्ट नरड्या खाली उतरवतो तेव्हा कुठे चित्त थार्यावर येईल ,
युवराज ,मनीषा कर्क रोगातून वाचले त्यांचे उपचार अमेरिकेत झाले
ते भारतात होऊ शकतात का
असा डॉ ह्यांना प्रश्न
14 Sep 2013 - 11:49 am | सुबोध खरे
एक म्हणजे वैद्यकीय ज्ञान हे सहज सर्वत्र उपलब्ध असल्याने आणि मोठ्या शहरातील वैद्यकीय सुविधा या आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या असल्याने कर्करोगावर भारतात उपचार अगदी आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे होतात. आज बहुतांश तर्हेचे कर्करोग हे पूर्ण बरे होऊ शकतात. काही कर्करोग सुरुवातीच्या अवस्थेत निदान झाल्यास पूर्ण बरे होतात तर काही कर्करोग अगदी शेवटच्या/ चौथ्या टप्प्यात सुद्धा पूर्ण बरे होतात. वरील विल्म ट्युमर हा पूर्ण बरा होण्याची शक्यता जवळ जवळ पंचाण्णव टक्के आहे. फक्त इतक्या लहान बालकाला शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या विकिरण चिकित्सेतून जावे लागणे हे अतिशय क्लेशदायक असते.
14 Sep 2013 - 9:59 am | नंदन
उपमा-अलंकार-भावुक वाक्यांची पेरणी यातल्या कशाचाही आधार न घेता हे इतक्या सरळ, थेट मनातून लिहिलं गेलंय (सुहास.. सारखं) की त्या अनुभवाचा अस्सलपणा, भेदकता वाचकापर्यंत नेमकी पोचते.
14 Sep 2013 - 10:21 am | तिमा
नका हो एवढे भयानक अनुभव एका वेळेस वाचायला लावू ! तलतच्या गाण्यामुळे धागा उघडला आणि भलतेच समोर आले.
अवांतरः तलतची अरुण दात्यांशी तुलना केलेली बघून जीव आणखीनच कासावीस झाला.
16 Sep 2013 - 2:09 pm | स्पंदना
..........
घरातल्या डोक्टरने घरातल्याच पेशंटला लक्ष न दिल्याने किती त्रास झाला ते सांगवत सुद्धा नाही. वर आणि घरातले म्हणुन त्यांचाच शहाणपणा आणी उलट सुलट उपचार अन चर्चा...त्यापेक्षा तुम्ही फारच हळवे आहात डॉक्टर.
16 Sep 2013 - 7:03 pm | रेवती
वाईट.
16 Sep 2013 - 10:25 pm | सुधीर
आपण माणूस म्हणून किती नगण्य आहोत आणि आपली झेप किती तोकडी आहे हे परत परत जाणवत होते.
साधारण असाच विचार (आणि अनुभव) गेल्या महिन्यात माझ्या डॉक्टर मामेबहीणीने प्रवासात सांगितले होते त्याची आठवण आली.
18 Sep 2013 - 12:38 am | एस
तुमचं माणूसपण भावतं.
7 Oct 2013 - 3:12 pm | सुमीत भातखंडे
करणारे अनुभव
7 Oct 2013 - 3:59 pm | मदनबाण
वाचुन फार वाईट वाटले... :(
8 Oct 2013 - 1:38 am | प्रभाकर पेठकर
काय बोलणार?
असाध्य रोगातील असहाय्यता, आयुष्यातील उरलेले नेमके दिवस समजणं आणि त्या अटळ मृत्यूपर्यंतची वाटचाल 'अंगावर काटा आणणारी असते' हे म्हणणंही, रुग्णाच्या मानसिक अवस्थेच्या वर्णनासाठी तोकडे ठरणारे आहे.
शब्द संपले.
9 Oct 2013 - 2:05 pm | विटेकर
अगदी असहाय आणि हतबल !
हे सारे पचवून पुन्हा नव्या दु:खाला (पेशंटला )सामोर्या जाणार्या डॉक्टर लोकांना सलाम !
आपण कधी मरणार हे न सांगून नियती आपल्याशी किती क्रूर खेळ खेळते ! ते कधी ही येऊ शकते आणि आल्यावर स्वीकारणे इतकेच आपल्या हाती ! नो निगोशिएन नो एस्कलेशन !
समर्थ म्हणतात तेच खरे :
जन्म दुःखाचा अंकुर| जन्म शोकाचा सागर |जन्म भयाचा डोंगर| चळेना ऐसा ||१||
25 Oct 2013 - 3:19 pm | मधुरा देशपांडे
गेल्या महिनाभरातच माझी सख्खी मावशी आणि मग सख्खा काका दोघेही पंधरा दिवसांच्या अंतराने कर्करोगानेच गेले. तो सगळा त्रास, असहाय्यता हे सगळं नुकतंच खूप जवळून पाहिलंय. याच भावना होत्या तेव्हा. त्यामुळे हा लेख खूप जास्त भावला.
27 Oct 2013 - 9:13 pm | खटासि खट