जयकिशन यांचा पुण्यस्मरण दिवस !

psajid's picture
psajid in काथ्याकूट
12 Sep 2013 - 4:04 pm
गाभा: 

आज हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेचे बेताज बादशाह शंकर जयकिशन या जोडगोळी पैकी जयकिशन यांचा पुण्यस्मरण दिवस ! आजच्याच तारखेला (१२ सप्टेंबर १९७१) वयाच्या केवळ ३९ व्या वर्षी "जिना यहां मरणा यहां, इसके सिवा जाना कहां" म्हणणारा हा अवलिया यकृताच्या आजाराने हे जग सोडून निघून गेला. त्यांची आठवण येत असताना त्यांनी शैलेन्द्र, हसरत जयपुरी, वर्मा मलिक, नीरज, इंदीवर इत्यादी गीतकारांबरोबर संगीतबद्ध केलेल्या कर्णमधुर आणि आशयपूर्ण गाण्यांचा उल्लेख इथे मुद्दाम करावा वाटतो. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे या क्षेत्रातील आगमनानंतरचे करिअर घडवण्याचे कार्य त्यांना उत्तोमोत्तम गाणी गायला देऊन त्यांनी पूर्ण केले.
जयकिशन यांचे पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाल होते आणि यांचा जन्म गुजरात मध्ये झाला होता. यांचे हार्मोनियम वरती उत्तम प्रभुत्व होते. त्यांच्या या छंदाला नवीन आकार देण्याच्या वेडापोटी ते मुंबई सारख्या मायानगरी मध्ये आले. जिथे त्यांची भेट पृथ्वी थिएटर मध्ये तबला वाजवणाऱ्या शंकर यांच्याबरोबर झाली. हे दोघेही त्याकाळचे प्रसिद्ध संगीतकार हुस्नलाल- भगतराम यांच्या हाताखाली सहायक म्हणून काम करू लागले. पृथ्वी थिएटर ची निर्मिती "बरसात" या चित्रपटासाठी राज कपूर हे संगीतकार म्हणून नवीन जोडीच्या शोधात होते त्यांनी शंकर आणि जयकिशन यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. आणि १९४८ साली प्रदर्शित झालेल्या "बरसात" ची गाणी सुपरहिट झाली आणि इथून पुढे शैलेंद्र, हसरत जयपुरी, लता मंगेशकर, मुकेश आणि शंकर - जयकिशन यांनी भारतीय संगीत क्षेत्रात एक इतिहास घडवला.
प्रसिद्धीचे शिखर पादाक्रांत करत असतानाच त्यांनी आपल्यासाठी गोपनीयता म्हणून कुटच्याही गीताची चाल वैयक्तिक कुणी बांधली ते कुणालाही सांगायचे नाही असा एक अलिखित नियम पाळला होता. मात्र संगम चित्रपटातील एक गीत "ये मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज न होना कि तुम मेरी जिंदगी हो… !" हे बिनाका गीतमाला या नभोवाणीवरील एका कार्यक्रमामध्ये खूप दिवस प्रथम क्रमांकावर वाजू लागले आणि जयकिशन यांनी हे गीत मी रचले असे सांगून तो नियम मोडला. मग दोघांमध्ये काही काळ दुरावा निर्माण झाला. नंतर मो. रफी आणि राज कपूर यांनी त्यांच्यातील मतभेद मिटवून त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण केला. शंकर - जयकिशन या जोडीने जवळजवळ १७० हून जास्त चित्रपटांना संगीतसाज चढवला. ज्यामध्ये विशेष संगीतामुळे गाजलेले बादल, सीमा, बसंत बहार, चोरी - चोरी, कठपुतली, यहुदी, अनाडी, छोटी बहन, दिल अपना और प्रीत पराई, जिस देश मे गंगा बहती है, जंगली, प्रोफेसर, दिल अपना और प्रीत पराई, हमराही, राजकुमार, आम्रपाली, सुरज, तिसरी कसम, मेरा नाम जोकर, असली नकली इत्यादी चित्रपटाचा समावेश होतो.
त्यांना चोरी - चोरी , अनाडी, दिल अपना और प्रीत पराई, प्रोफेसर, सुरज, ब्रम्हचारी, मेरा नाम जोकर, पहचान, आणि बेईमान या चित्रपटासाठी एकूण नऊ वेळा सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून फिल्मफ़ेअर पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी संगीतबद्ध केलेली काही लोकप्रिय गीते आजही लोकांच्या ओठावरती रेंगाळून राहिली आहेत त्यापैकी उदाहरणा दाखल काही इथे देत आहे.

बहारो फुल बरसाओ मेरा मेहबूब आया है (सूरज)
आजा सनम मधुर चांदनी ( चोरी चोरी)
जाऊ कहा बताए दिल ( छोटी बहन)
तेरी प्यारी प्यारी सुरत को किसी कि नजर न लगे ( ससुराल)
दिलके झरोखे मे तुझको बिठाकर (ब्रह्मचारी)
जिंदगी एक सफर है सुहाना ( अंदाज)
जाने कहा गये वो दिन (मेरा नाम जोकर)
तेरा जाना दिल के अरमानोंका लुट जाना (अनाडी)
किसी कि मुस्कुराहटो पे हो निसार (अनाडी)
हम तेरे प्यार मे सारा आलम (दिल एक मंदिर)
जिना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहां (मेरा नाम जोकर)

या जोडगोळीने संगीत देऊन हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेत एक रेकॉर्ड बनवला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
- साजीद पठाण

प्रतिक्रिया

पैसा's picture

12 Sep 2013 - 5:35 pm | पैसा

छान ओळख करून दिली आहे. राज कपूर, शंकर जयकिशन, शैलेन्द्र आणि लता मंगेशकर ही एक जबरदस्त टीम होती. हिंदी सिनेसंगीताचा सुवर्णकाळ असंच या काळाला म्हणावं लागेल. जयकिशन गेल्यानंतर एकटा शंकर स्वतंत्रपणे फार काम करू शकला नाही यावरून या जोडीचं एकत्व लक्षात यावं.

प्रचेतस's picture

12 Sep 2013 - 6:32 pm | प्रचेतस

छान ओळख.
मला गाण्यांची आवड नसूनही शंकर जयकिशनची गाणी मात्र लैच आवडायची.

चौकटराजा's picture

12 Sep 2013 - 8:55 pm | चौकटराजा

१९६२ मधे मी यत्ता तिसरीत होतो. त्यावेळी " जिस देशमे " ची गाणी गाजत होती. त्याच वेळी शं ज च्या प्रेमात पडलो , पण पुढे १९६५ मधे मेरे सनम या चित्रपटाद्वारे ओपी नय्यर भेटले. त्यांच्याकडे एस जे सारखा रेंज नाही पण मेलडी व रिदम यांचा सुरेख संगम दिसे . त्यांच्या गीतांशी जणू माझे लगीन लागले. पण आजही पहिलं प्रेम विसरलेलो नाही.
माझ्या मते, आरजू हा चित्रपट म्हणजे त्यांच्या कारकीर्दीचा कळस ! बाकी रागदारीचा फार वेगळा असा उपयोग एस जे नी केला यात शंका नाही. भैरवी पहाडी, कामोद, शिवरंजनी, बसंत बहार भूपाली ई नी नटलेले त्यांचे संगीत अजरामर आहे. बरोबरच शंकर यांचे काउंटर मेलडी वरचे प्रभूत्व ही विसरून कसे चालेल ? जयकिशन यांच्यात रूप व स्वरप्रतिभा यांचा मिलाफ इतका ही क्या कहने ?

प्रचेतस's picture

12 Sep 2013 - 8:56 pm | प्रचेतस

काउंटर मेलडी म्हणजे काय?

चौकटराजा's picture

13 Sep 2013 - 9:35 am | चौकटराजा

गीताच्या धव्निमुद्रणात गायकाचा एक लेअर मानला तर स्वरांच्या भरण्याचे, फॉलो पीसचे, फिलर्स चे काम दुसर्‍या काही लेअर वर करतात.मुळ चालीला उत्तम साद घालेल असा ( चाल म्हणजे मेलडी ) आणखी एक थर म्हणजे काउंटर मेलडी. उदा. दिलके झरोकोमे ही गीत ऐकल्यास त्यातील मागच्या लेअरवर वाजणारा वायलीनचा ताफा काउंटर मेलडीचे काम करतो. सर्वच संगीतकार या प्रकारच्या स्वरमेलनाचा उपयोग करतात पण " शंकर" त्यात बाप होते असे म्हटले जाते. " नजरमे बिजली
अदामे शोले" "मदहोश हवा मतवाली फिजा" कहता है जोकर सारा जमाना ई उदाहरणे अशीच आहेत.